01 October 2020

News Flash

आधुनिक धारणा व मध्ययुगीन बीजं

मूर्ती नसल्याचे पाहून राजकन्या व्याकूळ होते आणि मूर्तीच्या ओढीने मंदिराजवळ येते.

हेमंत प्रकाश राजोपाध्ये rajopadhyehemant@gmail.com

समाजातील आणि आपल्या मर्यादित भवतालातील दिसून, समजून येणाऱ्या घटनांमुळे प्रभावित होणे आणि त्याला प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष प्रतिसाद देणे, हा सहज मानवी स्वभाव आहे. प्रत्येक काळातील वेगवेगळ्या छोटय़ा-मोठय़ा स्थानिक अगर व्यापक पातळीवरील वैयक्तिक किंवा सामूहिक पातळीवर घडलेल्या राजकीय अथवा सांस्कृतिक घटनांचा प्रभाव तत्कालीन आणि उत्तरकालीन समाजावर पडत असतो. संबंधित घटनेविषयीच्या वैयक्तिक आणि सामूहिक स्मृती त्या समकालात किंवा उत्तरकाळात वेगवेगळ्या साहित्य प्रकारांतून आणि मौखिक वा लिखित माध्यमांतून लिहिल्या जातात आणि पुढील पिढय़ांत हस्तांतरित होत जातात. प्राचीन-मध्ययुगीन काळात छपाईकलेच्या अभावामुळे आणि माध्यमांच्या संकुचित अवकाशामुळे लिखित साधनांच्या हस्तलिखित प्रती बनवताना त्यात प्रक्षेप (मूळ घटनेच्या अवकाशाबाहेरील सोयीचा तपशील) घुसडले जातात. मौखिक परंपरा स्मृतिकेंद्री असल्याने संबंधित साहित्याच्या प्रसारासोबतच त्यात वेगवेगळे पाठभेद घडून आल्याचे दिसते. हे पाठभेद म्हणण्याच्या-गाण्याच्या परंपरेत किंवा संबंधित साहित्यकृतीच्या तपशिलात प्रादेशिक आचार-चालीरीती आणि सामाजिक-भौगोलिक संदर्भ यांची जोड मिळून निर्माण होतात. असे पाठभेद काहीवेळा जाणूनबुजून केले जातात, तर कधी एखाद्या कानगोष्टीच्या खेळासारखं आपोआपच शब्द-वाक्यांमध्ये बदल होऊन वेगळे संस्करण-व्हर्जन निर्माण केले जाते. नजिकच्या किंवा दूरच्या भूतकाळातील घटनांविषयीच्या या स्मृतींना आणि त्यांच्या वेगवेगळ्या आविष्कारांना मिळणाऱ्या लोकप्रियतेतून समाजात वेगवेगळ्या धारणा रुजल्या जातात; आणि त्यातून निरनिराळे समज-अपसमज निर्माण होऊन वेगवेगळे ‘धारणांचे धागे’ निर्माण होतात. या धारणा आपल्या वर्तमानातील व्यक्तिगत आणि सामाजिक पातळीवर प्रभावित करत असल्याने, त्या त्या वर्तमानातील राजकीय घडामोडी आणि संदर्भाचा पायाही या धारणांवरच बेतलेला असतो. आपल्या लेखमालेच्या अंतिम टप्प्यात आपण आजवर तपासलेल्या धारणांची उजळणी करत प्राचीन आणि मध्ययुगीन संदर्भाना आजच्या आपल्या धारणांची बीजे त्यात शोधायची आहेत.

आपल्याहून वेगळ्या-अपरिचित अशा जीवनशैलीचे आणि आचारपद्धतीचे अनुसरण करणाऱ्या समूहांना आपसूकच आपण वेगळे-परके समजू लागतो. हे परकेपण बहुतांशी सांस्कृतिक-भाषिक-आहारशैलीअनुरूप भेदांच्या मापदंडांवर कसे बेतलेले असते हे आपण लेखमालेच्या प्रारंभी, तिसऱ्या- ‘अयं निज: परो वेति’ या शीर्षकाच्या लेखात पाहिलं. आपल्या संस्कृतीहून वेगळी, अपरिचित अशी जीवनशैली अनुसरणाऱ्या समूहांना मागास, रानटी, अप्रगत वगैरे तुच्छतानिदर्शक विशेषणांनी संबोधायची प्रथा आपण म्लेंच्छ वगैरे शब्दांच्या ऐतिहासिक संदर्भात पाहिली. या आपपरभावाला पुढे देव-असुर वगैरे संकल्पनांची जोड मिळून, या धारणांना देवताकेंद्री धार्मिक संवेदनांची जोड मिळाल्याचेही आपण पाहिले. देवता आणि असुर या द्वैतातून वेगळ्या सांस्कृतिक व्यूहातील लोकांना खलनायकी रूप मिळत गेल्याचे आपण पाहिले. देव-असुर, सभ्य-म्लेंच्छ वगैरे  संबोधनांचे/संज्ञांचे अर्थ आणि सामाजिक संदर्भ मध्ययुगीन वेगळ्या प्रतिमांच्या चौकटीत रूढ झाल्याचे दिसते. या प्राचीन आणि मध्ययुगीन प्रतिमांचा अध्यारोप आजच्या आधुनिक काळातील सामूहिक भेदांच्या राजकारणात अधिक तीव्र होत जात असल्याचे आपण अनुभवत आहोत. या अध्यारोपांचे राजकारण आणि आनुषंगिक धारणांचा बेमालूम वापर करत केले जाणारे राजकारण अधिकाधिक कर्कश होत असताना, काही मोजक्या उदाहरणांद्वारे या अर्थातराच्या प्रक्रिया समजून घेण्याचा प्रयत्न आपल्याला आता करायचा आहे. ही प्रक्रिया समजून घेण्यासाठी आपण दोन वेगवेगळ्या धार्मिक स्थळांवर घडून आलेल्या- घडणाऱ्या ऐतिहासिक घडामोडींची संक्षेपात मीमांसा करणार आहोत.

या चच्रेची सुरुवात आपण एका ऐतिहासिक आख्यायिकेने करणार आहोत. तिरुचिरापल्ली येथील श्रीरंगनाथस्वामी या विष्णुमंदिराच्या ‘कोयिल-ओळूगु’ नावाच्या एका ऐतिहासिक इतिवृत्तामध्ये ही आख्यायिका पाहायला मिळते. गेल्या लेखांत पाहिल्याप्रमाणे इस्लामधर्मी तुर्की-अरबी राजसमूहांनी भारतात बस्तान बसवल्यावर लोकजीवनात रूढ झालेल्या काही आख्यायिकांपैकी एक या इतिवृत्तामध्ये (chronical) नोंदलेली दिसते. १३-१४व्या शतकातील मलिक काफूर या अल्लाद्दीन खिलजीचा सेनापती दख्खनवर स्वारी केल्यावर तो रंगनाथस्वामी मंदिरावर घाला घालून मंदिरातील पालखी/मिरवणूक उत्सवासाठीची (‘अळकिय मनवाळ’, अर्थात रूपवान राजपुत्र रूपातील) विष्णूंची उत्सवमूर्ती इतर लुटीसोबत दिल्लीला नेतो. पुढे सुलतानाची मुलगी ती मूर्ती आपलं खेळणं म्हणून खेळायला घेऊन जाते आणि तिचे निरागस बालपण त्या मूर्तीशी खेळण्यात रमून जाते. इकडे मंदिरातील पुरोहितवर्ग ती मूर्ती आणावयास दिल्लीदरबारी गेला असता, त्यातील एक वृद्ध स्त्री सुलतानाच्या महालातील एका कक्षात राजकन्येशी साक्षात भगवान विष्णू स्वत: सगुण साकार रूपात अष्टैश्वर्यासह प्रकट होऊन खेळत असल्याचे पाहते. इकडे मंदिरातून आलेला समूह सुलतानासमोर कीर्तनादी सादरीकरण करून झाल्यावर बक्षीस म्हणून राजकन्येच्या कक्षातील विष्णुमूर्तीची याचना करतो. सुलतान त्यांना मूर्ती ओळखण्यासाठी राणीवशात प्रवेश करण्यास मनाई करतो आणि ‘‘तुमच्या भक्तीत सामर्थ्य असेल तर तुमच्या देवाला इथे यायला सांगा,’’ असे आव्हान त्यांना देतो. त्यानुसार देवाचे आवाहन केले असता मूर्तिस्थ देव राजकन्येला झोपवून स्वत: दरबारात प्रकट होतो. हा चमत्कार पाहून सुलतान सन्मानपूर्वक मूर्ती त्या मंदिरातील कार्यकारी समूहाला परत करतो व ती मूर्ती घेऊन ते लोक तमिळनाडूतल्या मंदिरात परततात. इकडे आपली लाडकी मूर्ती नसल्याचे पाहून राजकन्या व्याकूळ होते आणि मूर्तीच्या ओढीने मंदिराजवळ येते. पण मूर्तीला बंदिस्त पाहून त्या दु:खावेगाने ती द्वाराशीच प्राण सोडते. दुसऱ्या मेलकोटे येथील आख्यायिकेनुसार, वैष्णवाचार्य रामानुजस्वामी सुलतानाच्या दरबारात मूर्ती आणावयास जातात आणि सुलतान राजकन्येलाही मूर्तीसोबत जाण्याची अनुमती देतो. वाटेत आचार्याकडे असलेली मूर्ती राजकन्येच्या पालखीत प्रकट होते आणि राजकन्या त्या मूर्तीत विलीन होते. मेलकोटे आणि तिरुचिरापल्ली येथील मंदिरातील प्रमुखांनी राजकन्येच्या अद्वितीय भक्तीचा सन्मान म्हणून तिचे, ‘तुलुक्क नचीयार’चे (तुर्की राजकन्या) मंदिर प्रांगणापासून जवळच स्थापन केले आहे. संबंधित विष्णुमूर्तीला दाखवला जाणारा नवेद्यदेखील यामुळे उत्तर भारतीय पदार्थाचा असतो आणि स्थानिक इस्लामी पद्धतीनुसार विडय़ाची पाने विशिष्ट पद्धतीने लावली जातात, असे निरीक्षण ज्येष्ठ अभ्यासक सोमसुंदर पिल्लई यांनी नोंदवले आहे.

या विष्णूच्या सहचरीच्या आख्यायिकेशी साधर्म्य सांगणाऱ्या अनेक कथा उपखंडातील तत्कालीन साहित्यकृतींत दिसून येतात. स्थानिक राजासमूहांतील राजकन्या आणि राजकुमार यांच्याशी जोडलेल्या कथा ‘कान्हदडे प्रबंध’ नामक अपभ्रंश प्राकृत या भाषेत लिहिल्या गेलेल्या ग्रंथात राजपूत राजकुमार वीरमदेव (प्राकृत नाव वीरमदे) आणि अल्लाद्दीन खिलजीची मुलगी फिरौजा यांच्या प्रेमकथेचे चित्रण आले आहे. जलौरचा वाघेला राजा कर्णदेव याने माधव या मंत्र्याचा अपमान करून त्याच्या भावाला कपटाने मारून टाकल्याचा बदला घेण्याच्या उद्देशाने माधवाने अल्लाद्दीन खिलजीला गुजरातवर हल्ला करण्यासाठी फूस दिली. त्या आक्रमणासाठी कान्हदडे या राजाने मोकळा मार्ग करून दिला नाही. मात्र अन्य मार्गाने गुजरातवर आक्रमण करून उघूरखान नामक सेनापतीने सोमनाथ शिवाचे मंदिर लुटले. पार्वतीदेवीच्या स्वप्नादेशानुसार सोमनाथ लिंग परत मिळवण्यासाठी उघूरखान या ‘असुरा’वर आक्रमण करून कान्हदडे राजाने सोमनाथ शिविलग हस्तगत करून ते पाच भागात आपल्या राज्यातील पाच ठिकाणी स्थापन केले. अल्लाद्दीनने राजावर प्रतिआक्रमण केले, तेव्हा अल्लाद्दीनची मुलगी फिरौजा हिने कान्हदडेचा पुत्र वीरमदेव हा विष्णूचा १०वा अवतार असून तो तिचा पूर्वजन्मीचा पती असल्याचे निवेदन पित्याकडे केले आणि त्याच्याशी लग्न करण्याचा हट्ट धरला. कन्येच्या हट्टामुळे अल्लाद्दीनने ठेवलेला विवाहाचा प्रस्ताव धुडकावून लावल्यावर दोन्ही सन्यात झालेल्या युद्धात वीरमदेव मरण पावला आणि त्याचे मृत शरीर पाहून दु:खी झालेली फिरौजा त्याच्या देहासोबत सती गेली.

वीरमदेव आणि फिरौजा यांची ही कहाणी वाचताना आपसूकच आठवण होते, अल्लाद्दीन खिलजीच्या वासनेच्या पोटी अग्निप्रवेश करून जोहार करणारी पद्मावतीच्या सुप्रसिद्ध आख्यायिकेची. दोन्ही आख्यायिका प्रत्यक्ष घडल्याचे कोणतेही भौतिक पुरावे आपल्याकडे उपलब्ध नाहीत. पद्मावती हे प्रतीक राजपूत पर्यायाने हिंदू अस्मितेचे प्रतीक म्हणून उभे राहिल्यावर तिच्या जौहाराविषयीचा अभिमान हा एका विशिष्ट पुरुषी मानसिकतेतून आलेल्या गंडातून विकसित झालेला दिसतो. लेखमालेतील पूर्वीच्या भागांत आपण पाहिल्याप्रमाणे कामंदक-कौटिल्य इत्यादी राजनीतिकारांनी नमूद केलेली स्त्री, लहान मुले, धार्मिक प्रमुख व प्रार्थनास्थळे या तुलनेने अधिक संवेदनशील असलेल्या घटकांना उपद्रव देऊन शत्रूराज्याचे मानसिक खच्चीकरण करण्याची रीती लिंगभाव आणि राजनीती  यांच्या समन्वयातून आलेली दिसते. इस्लामी सत्तेचे नृशंसत्व (खलनायकत्व) अधोरेखित करताना देवलदेवी-हिज्रखान किंवा पद्मावतीची आख्याने आपल्याकडे नव्याने पुन:प्रसारित होताना दिसतात. कान्हदडे प्रबंधाचा लेखक तर अल्लाद्दीनच्या सेनापतीला असुर-राक्षस वगैरे विशेषणे लावतो. हिंदू-मुस्लीम अस्मितांच्या संघर्षांला चेतना देणाऱ्या पद्मावतीसारख्या आख्यायिका एकीकडे असताना तुलुक्क नाचियार आणि फिरौजासारख्या स्त्रीपात्रांचे संदर्भ मात्र लोकप्रिय इतिहासातून जवळजवळ पुसले गेलेले किंवा पूर्णत: विस्मृतीत गेलेले दिसतात. आपल्या समूहातील स्त्रीविषयीची अस्मिता ही स्त्रीला धन मानणाऱ्या मध्ययुगीन समाजातील धारणांशी संवादी असल्याचं दिसतं. २०१६-१७ साली आधुनिकता ओलांडून नव्या युगात प्रवेश करणाऱ्या मानवी समाजांत अद्यापही अशा अस्मितांवरून संघर्ष घडताना दिसतात. २०व्या शतकातील राजकीय घडामोडींच्या पाश्र्वभूमीवर, या संघर्षांना राष्ट्रवाद-धर्मवादाची जोड मिळाल्याने त्यांवरील चिकित्सक भाष्ये अनेकदा नाकारली जातात. किंवा त्यांना समाजद्रोहाची अथवा देशद्रोहाची लेबले लावून बदनाम केले जाते. प्रत्यक्षात मात्र मध्ययुगातील या मध्य आशियातून आलेल्या इस्लामी राजवटी आणि उपखंडात प्रस्थापित असलेल्या, एकमेकांशी संघर्ष करणाऱ्या ‘हिंदू’ राजवटी या दोन राजकीय-सामाजिक-सांस्कृतिक समूहांच्या सहसंबंधांतून आकाराला येणाऱ्या या समृद्ध आख्यायिकाविश्वाकडे चिकित्सकदृष्टीने पाहता मानवी इतिहासाच्या गुंतागुंतीच्या, पण अतिशय रोचक अशा भूतकाळाचे आगळेच दर्शन आपल्याला होते. श्रीरंगनाथदेवाची भक्त होऊन देवाशी एकरूप होणारी, त्याच्या दारात देह ठेवणारी अल्लाद्दिनची मुलगी. किंवा वीरमदेवाच्या देहासोबत सती जाणाऱ्या फिरौजाची कहाणी इस्लामी राजसत्ता आणि हिंदू राजवटी आणि धर्मव्यवस्थांच्या सहसंबंधांची वेगळीच बाजू पुढे करतात.

‘धारणांच्या धाग्यां’ची उकल करताना या राजकीय संघर्षांत बीजे असलेल्या, पण नितांत रोचक आणि मनोहारी अशा रीतीने आकाराला येणाऱ्या उपखंडातील भावविश्वाचे सुंदर पदर आपण आज पाहिले. धारणांच्या विशाल चौकटीतील निवडक धाग्यांच्या गुंत्यांची उकल करताना आपल्याला धर्मव्यवस्थांचे वेगवेगळे पलू, जातवास्तवांतील काही गुंतागुंती आणि आजच्या आधुनिकोत्तर काळात या गुंतागुंतींच्या अभिव्यक्तीचे औचित्य आपल्याला तपासायचे आहे.

(लेखक ग्योटिंगेन विद्यापीठ, जर्मनी येथे पीएचडी संशोधक असून ‘ऑब्झव्‍‌र्हर रिसर्च फाऊंडेशन, मुंबई’ येथे वरिष्ठ संशोधक म्हणून कार्यरत आहेत.)

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 4, 2018 12:19 am

Web Title: history about sringangnath swami of vishnu mandir in tiruchirappalli 2
Next Stories
1 ऐतिहासिक संदर्भ आणि चौकटींची व्याप्ती
2 नव्या वाटेवरून पुढे..
3 राजकीय स्थित्यंतरे आणि नव्या वाटांचा वेध
Just Now!
X