20 April 2019

News Flash

कौटिल्येन कृतं शास्त्रम्।

शत्रुराजाला किंवा महत्त्वाच्या अधिकाऱ्यांना मारता येणं सहज शक्य असल्याचं कौटिल्य सांगतो.

चंद्रगुप्त मौर्यच्या राज्यसभेतला एक प्रसंग.

|| हेमंत प्रकाश राजोपाध्ये

‘धर्म’ या शब्दाचा लोक श्रद्धाविश्वाच्या अनुषंगाने विचार करताना या श्रद्धा-श्रद्धास्थानांचा वापर करून कुटिल राजनीती किंवा कपट आचरण्यात कौटिल्याला काहीही चूक वाटत नाही. अर्थशास्त्राच्या १२ व्या अध्यायामध्ये तर देवस्थान, तीर्थयात्रा, स्थानिक देवतांच्या यात्रांच्या काळात फसवणूक, कपट करून शत्रुराजाला किंवा महत्त्वाच्या अधिकाऱ्यांना मारता येणं सहज शक्य असल्याचं कौटिल्य सांगतो.

धर्माची गती आणि मर्यादा याविषयीच्या विविध व्याख्या आणि त्यातून निर्माण झालेल्या समाजात रूढ झालेल्या धारणा यांच्या आधारावर समाजाचे नियमन करणे, त्याविषयीच्या सिद्धांतपर चौकटी निर्माण करणे याविषयीची मत-मतांतरांची घुसळण प्राचीन काळापासून आजपर्यंत सातत्याने चालत आलेली आपण आजही अनुभवतो आहोत. समाजशास्त्राचे आकलन करून घेण्याची प्रामाणिक इच्छा असलेला वाचक, अभ्यासक या साऱ्या प्रवाहांतील विरोधाभास, पूर्ववर्ती सिद्धांतांचे स्वीकार / अव्हेर आणि प्रभाव, तसेच विवक्षित काळातल्या राजकारणासंदर्भातील नीतीपर विचारांचे ऐतिहासिक औचित्य / अनौचित्य आणि संदर्भ लक्षात घेऊनच आपले आकलन घडवतो. धारणांच्या धाग्यांच्या या उकलीमध्ये आपण हे तत्त्व जपायचा आपल्या परीने प्रयत्न करत आलेलो आहोत.

समाजातल्या अर्थकारणाची स्थिती, त्यानुसार आकाराला येणारी समाजव्यवस्था आणि राजनीतीपर विचार यांच्या आधारावर त्या-त्या काळातल्या धर्मव्यवस्था आणि धर्म संकल्पनांना नवे आयाम प्राप्त होतात. विशिष्ट मूल्यांच्या आधारावर घडवली गेलेली, समाजाला संघटित नियमन करणारी चौकट ढोबळमानाने ‘धर्म’ या संज्ञेतून अभिव्यक्त होते हे आपण आजवरच्या चर्चेतून समजून घेतलं. एखादी व्यक्ती वैयक्तिक पातळीवर किंवा सामूहिक रचनेद्वारे एखादी कृती करते तेव्हा तिचे तत्कालीन समाजाच्या घडीवर भलेबुरे परिणाम होतात. सामाजिक-सामूहिक स्तरावर त्या कृतीचे परिणाम पूर्वी त्या किंवा अन्य व्यक्ती / समूहाने केलेल्या कृतीच्या परिणामांशी आपसूक जोडले जातात आणि त्यातून सामाजिक स्थित्यंतरांची साखळी निर्माण होते. तिच्या नियमनासाठी नेतृत्व आकाराला येतं आणि त्याविषयीचे तत्त्वज्ञान, नीतीपर शास्त्रे आकाराला येतात. राजकारण आणि राजनीतीच्या उदयाची ही प्रक्रिया आत्यंतिक गुंतागुंतीची असली तरी ती कमालीची रोचकदेखील आहे. मात्र ती समजून घेताना अभ्यासाची शिस्त आणि व्यापक भान जपणे या धारणांच्या विकसनाचा इतिहास तपासताना गरजेचे असते.

भारतरत्न म. म. पां. वा. काणे यांनी त्यांच्या ‘धर्मशास्त्राचा इतिहास’मध्ये नमूद केल्यानुसार ‘धर्म’ या संस्कृत संज्ञेसाठीचा इंग्रजी अथवा अन्य भाषांमध्ये अगदी अचूक, नेमका समानार्थी शब्द / अनुवाद दुष्प्राप्य आहे. धारणांचे धागे उलगडत इथवर येताना आपण ‘धर्म’ या शब्दाचे वेगवेगळे आयाम आणि विविध काळांतील, तत्त्वज्ञानप्रवाहांतील धर्म संकल्पनेविषयीच्या मांडणींचा संक्षेपात आढावा घेतला. भारतीय राजनीतीपर विचारांचा अभ्यास करताना राजनीतिज्ञ आणि राज्यकत्रे यांच्या धर्मभानाची चिकित्सा करणं आणि राजनीतीशास्त्रानुसार धर्म या संकल्पनेकडे पाहणं हे आपल्या या प्रवासात अगत्याचे आहे. अर्थात जागेच्या मर्यादेमुळे आपल्याला या संदर्भात अधिक सखोल चर्चा करता येणार नसली, तरी आपण थोडक्यात या धारणांचे आकलन करून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. त्याविषयी चर्चा करताना राजनीतीपर शास्त्राचा मूळ विषय ‘राजनीती’ हाच असल्याचं आपल्याला सर्वात आधी लक्षात ठेवणं आवश्यक आहे.

भारतीय राजनीतीशास्त्र हे जगातील राजनीतीपर परंपरांतील एक प्राचीन ज्ञानशाखा म्हणून विख्यात आहे. त्यातही कौटिल्य व त्याच्या ‘अर्थशास्त्र’ या ग्रंथाचं महत्त्व राज्यशास्त्राच्या इतिहासात असाधारण असल्याचं जगभरातल्या विद्यापीठांतून होणाऱ्या त्यावरील संशोधनाद्वारे सिद्ध झालंच आहे. कौटिलीय अर्थशास्त्र व इतर ग्रंथांतून राजनीतीविषयक सिद्धांत व दंडनीती-शत्रूविषयक नीतीचं अतिशयित काटेकोर व काही वेळा कठोर पद्धतीनं विवेचन करण्यात आलं आहे. आपल्या या धारणांच्या धाग्यांच्या या पटाकडे पाहताना या शास्त्रातील धर्मविषयक जाणिवा व जनमानसांतील श्रद्धांच्या राजनीतीतील उपयोजनाविषयी हे नीतीशास्त्र काय मांडणी करते, याचा संक्षेपात विचार आपण करणार आहोत.

कौटिल्याच्या आधी शुक्र, बृहस्पती, इत्यादी पूर्वाचार्याचे ग्रंथ आणि त्यावरील परंपरांचे संदर्भ प्राचीन राजनीतीचा अभ्यास करताना आपल्या दृष्टीस पडतातच. कौटिल्याने या पूर्ववर्ती आचार्याच्या मतांचा परामर्श घेत, आपली मतं प्रतिपादित करत त्यांचे ‘अर्थशास्त्र’ सिद्ध केले आहे. ‘अर्थशास्त्र’ची सुरुवात करतानाच कौटिल्याने ‘पृथिव्या लाभे पालने च यावन्त्यर्थशास्त्राणि पूर्वाचाय्र: प्रस्थापितानि प्रायशस्तानि संहृत्यमेकमिदमर्थशास्त्रं कृतम्’- अर्थात् ‘पृथ्वीच्या लाभासाठी (पृथ्वीवर अधिकारप्राप्तीसाठी) आणि पालनासाठी पूर्वाचार्यानी जी अर्थशास्त्रे रचली त्यांचा परामर्श घेतच हे अर्थशास्त्र सिद्ध केलं आहे, असं म्हटलं आहे. मुळात या शास्त्राच्या ‘अर्थशास्त्र’ या नावातला ‘अर्थ’ शब्द हाच चतुर्विध पुरुषार्थापकी ‘अर्थ’ या संकल्पनेच्या अनुषंगाने वापरला गेला असल्याचं दिसतं. वर पाहिल्यानुसार विशिष्ट भूप्रदेशावर अधिसत्ता गाजवून त्या प्रदेशाचे पालन करण्यासाठी मार्गदर्शक ठरणारे हे शास्त्र असल्याचे सांगत, पुढे हाच ग्रंथ ‘मनुष्याणां वृत्तिर्थ:’ (मनुष्याच्या चरितार्थासाठीचे साधन ते अर्थ) असे स्पष्ट करतो. त्यामुळेच बहुधा कौटिल्य राजनीतिशास्त्रालादेखील चतुर्विध पुरुषार्थाच्या चौकटीत आणून ठेवतो. ग्रंथविषयाला प्रारंभ करताना कौटिल्याने विद्या आणि त्यांचे औचित्य प्रतिपादले आहे. त्यानुसार ‘आन्वीक्षिकी’ (चिकित्सा-विवेकपर आकलन), ‘त्रयी’ (वेदविद्या), ‘वात्त्रा’ (कृषि – वाणिज्य) आणि ‘दंडनीती’ (राजनीतीनुसार दंड / न्यायव्यवस्था) या चार प्रमुख विद्या ‘अर्थशास्त्र’मध्ये प्रतिपादित करून, यांच्याद्वारे धर्म, अधर्म आणि अर्थ, इत्यादींविषयी विवेक प्राप्त होतो हेच त्या विद्यांचे औचित्य असल्याचं कौटिल्य सांगतो. त्रयी, आन्वीक्षिकी वगरे विद्यांचे महत्त्व अधोरेखित करताना कौटिल्याला अभिप्रेत असलेली धर्मव्यवस्था ही वैदिक धर्मप्रवण असल्याचं स्पष्ट दिसतं. ग्रंथाच्या आरंभी चारही वर्णाचे आणि आश्रमांचे पालन करतानाची त्या-त्या व्यक्तीची कर्तव्येदेखील कौटिल्याने ठळकपणे नमूद केली आहेत. त्या चौकटींचे उल्लंघन केल्यास वर्णसंकर होऊन समाजाचा नाश होईल अशी पूर्वसूचनादेखील कौटिल्य देऊन ठेवतो. त्यामुळे या शास्त्राच्या अनुसरणाचे महत्त्व सांगताना कौटिल्याने सांगून ठेवलेलं आहे-

‘धर्ममर्थञ्च कामञ्च प्रवर्तयति च पाति च।

अधर्मानर्थविद्वेषानिदं शास्त्रं निहन्ति॥’

हे अर्थशास्त्र धर्म, अर्थ आणि काम या पुरुषार्थाचे प्रवर्तन आणि पालन करते आणि अधर्म, अनर्थपर गोष्टी व विद्वेषाचे निर्दालन करते.

कौटिल्याच्या मते, धर्म हा त्रयी- अर्थात वेदविहित तत्त्वांच्या आधारावर उभा आहे. आणि अिहसा, सत्य, शौच, अनसूया आणि क्षमा या तत्त्वांच्या जोडीनेच त्रयीविहित वर्णाश्रमधर्माच्या पालनाकडे कौटिल्याचा कटाक्ष स्पष्ट दिसतो. वरील अिहसादिक तत्त्वांचे आदर्श कौटिल्याने मांडले असले तरी पुढे विजिगीषु राजासाठी मात्र या मूल्यांचे पालन करण्यासंदर्भातली सवलत कौटिल्याच्या कुटिलत्वाचे निदर्शक आहे. ‘अर्थशास्त्र’च्या तिसऱ्या, धर्मस्थीय प्रकरणाच्या (अधिकरणाच्या) अंती काही श्लोकांत ग्रंथकार राजाची जी विहित कर्तव्ये सांगतो, त्यात राजधर्म हा चातुर्वण्र्य आणि अन्य धर्माचे रक्षण करणारा धर्म असल्याचं म्हटलं आहे. ‘व्यवहार’, ‘विवाद’ आणि ‘दंड’ या तीन तत्त्वांना राजधर्मात विशेष महत्त्व असल्याचं इथं प्रतिपादित केलं गेलं आहे. आणि केवळ ‘सत्ये स्थितो धर्म:’ असं म्हणून धर्माचे स्वरूप सांगायचा प्रयत्न या ग्रंथात केला आहे. त्यापलीकडे कौटिल्य धर्माविषयी फारसे भाष्य करत नाही. मात्र, त्याचा वर्णप्रधान व्यवस्थेवरचा कटाक्ष लक्षणीयरीत्या दिसून येतो. असे असले तरी यज्ञव्यवस्थेविषयी त्याचे अलिप्तत्व किंवा तटस्थताही लक्षणीय आहे. श्रौत-यज्ञविधींमध्ये पुरोहितांना श्रद्धापूर्वक दक्षिणा देणे हे अत्यंत महत्त्वाचे कर्म मानले गेले आहे. परंतु कौटिल्याच्यालेखी दक्षिणा केवळ त्या पुरोहिताच्या कामाचा निव्वळ मोबदल्याचा व्यवहार असल्याचं दिसतं.

‘धर्म’ या शब्दाचा लोक श्रद्धाविश्वाच्या अनुषंगाने विचार करताना या श्रद्धा-श्रद्धास्थानांचा वापर करून कुटिल राजनीती किंवा कपट आचरण्यात कौटिल्याला काहीही चूक वाटत नाही. ‘अर्थशास्त्र’च्या १२ व्या अध्यायामध्ये तर देवस्थान, तीर्थयात्रा, स्थानिक देवतांच्या यात्रांच्या काळात फसवणूक, कपट करून शत्रुराजाला किंवा महत्त्वाच्या अधिकाऱ्यांना मारता येणं सहज शक्य असल्याचं कौटिल्य सांगतो-

‘दैवतेज्यायां यात्रायाममित्रस्य बहूनि पूज्यागमस्थानानि भक्तित:।

तत्रास्य योगमुब्जयेत्। १२. ५.१’

(देवपूजन किंवा देवयात्रा इत्यादी निमित्ते अशी असतात, की तिथे शत्रूराजा पूजनानिमित्त येतो. अशा वेळी कुटिल पद्धतीने त्याचा काटा काढावा.)

किंवा

‘देवतागृहप्रविष्टस्योपरि यन्त्रमोक्षणेन गूढभित्ति शिलां वा पातयेत्।

देवतादेहस्थप्रहरणानि वास्योपरिष्टत्पातयेत्।

रसमतिचारयेत् पुष्पचूणौंपहारेण वा। १२.५.२’

(देवतागृहात प्रवेश केलेल्या राजावर वर बांधलेले एखादे यंत्र सोडून किंवा गुप्त भत वा शिळा पाडावी. अथवा देवतेच्या मूर्तीवर असलेलं एखादं शस्त्रं त्याच्या अंगावर पाडावं किंवा विषमिश्रित / विषाक्त फुलांची भुकटी प्रसाद म्हणून द्यावी.)

या अशा प्रकारच्या कपटी चाली देवस्थानच्या क्षेत्रात खेळण्यामध्ये काही पाप असल्याचं कौटिल्यप्रणीत राजनीती मानीत नाही. पुढे ‘योगवमन’ प्रकरणात राजाला किंवा शत्रूंना फसवण्यासाठी देवतादिकांच्या प्रकटनाच्या खोटय़ा बातम्या पसरवून शत्रूला व सामान्य जनांना भ्रांत करून त्यांचा काटा काढण्याच्या युक्त्या सुचवतो. ज्योतिषविषयक संकल्पनांचा वापर करत शत्रूला भ्रांत करण्याची युक्ती सुचवताना ज्योतिषादि विद्यांवर नकारात्मक भाष्य करायलाही कौटिल्य कचरत नाही-

‘नक्षत्रमतिपृच्छन्तं बालमर्थोऽतिवर्तते।

अर्थो र्थस्य नक्षत्रं किं करिष्यन्ति तारका:।। ’

(नक्षत्रादि गोष्टींच्या आहारी जाणाऱ्या माणसापासून अर्थ नेहमीच दूर राहते. अर्थ हेच अर्थाचे नक्षत्र असल्यानं तिथं तारका-ग्रहांचं काय काम?)

त्याच्याही पुढे जाऊन ‘देवताध्यक्षो दुर्गराष्ट्रदेवतानां यथास्वमेकस्थं कोशं कुर्यात्। तथव चाहरेत् ।’ असं सांगत गरज पडल्यास कधी देवस्थान, प्रार्थनास्थळ लुटण्याचा सल्लाही ‘अर्थशास्त्र’ देतं. थोडक्यात, राजनीतीपर तत्त्वांचा ऊहापोह करताना राज्यव्यवस्थेचा पाया धर्म, सत्य, अिहसादिक मूल्ये असल्याचं प्रतिपादन भारतीय राजनीतीशास्त्रज्ञ करत असले तरीही लोकश्रुतीतील कल्पना, श्रद्धापर धारणा आणि मिथके यांचा वापर शत्रूचा किंवा आपल्या राजकीय ध्येयाच्या मार्गात आलेल्याचा काटा काढण्यासाठी करणे इत्यादी गोष्टी या शास्त्राला वज्र्य नाहीत.

धारणांचे धागे उलगडत मध्ययुगीन कालखंडाकडे जाण्यापूर्वी आपण उपखंडाच्या प्राचीन समाजव्यवस्था, त्यातील गुंतागुंती पाहात धर्म आणि राजनीतीपर कल्पनांचा विचार कसा केला गेला, याचा संक्षेपात आढावा घेतो आहोत. कौटिल्य, शुक्र, कामंदकादिक आचार्यानी सांगितलेल्या राजनीतीपर तत्त्वांच्या आधारे आपण पुढील काळातल्या काही राजकीय घडामोडी आणि त्या घडामोडींविषयी आपल्या आजच्या वर्तमानात घडल्या-घडविल्या गेलेल्या धारणा आणि अस्मितांचा विचार करणार आहोत. त्यासाठी आपल्याला आजच्या भागातल्या चर्चेत घेतलेले काही संदर्भ व इतर नीतीशास्त्रकारांच्या कूटनीती-युद्धनीतीपर मतांचा धर्माच्या सामाजिक आणि श्रद्धापर चौकटीच्या अनुषंगाने विचार करावयाचा आहे. प्राचीन काळातल्या या राजनीतीतत्त्वांनी धर्म आणि श्रद्धाविषयक समजांना पुढच्या काळात दिलेले नवे आयाम आपल्या आजच्या सामाजिक जीवनावर खोल प्रभाव पाडते झाले. त्यातून आपले आजचे विद्यमान राजकीय आसमंत कसे आकाराला आले, याचा मागोवा घेणं हे या धाग्यांच्या उकलीमागचं एक प्रयोजन आहे.

rajopadhyehemant@gmail.com

(लेखक जर्मनीतील ग्योटिंगेन विद्यापीठात पीएच.डी. संशोधक असून ऑब्झव्‍‌र्हर रीसर्च फाउंडेशन येथे वरिष्ठ संशोधक म्हणून कार्यरत आहे.)

First Published on July 29, 2018 12:10 am

Web Title: kautilya chandragupta maurya chanakya