|| हेमंत प्रकाश राजोपाध्ये

धारणाद्धर्म इत्याहु: धम्रेण विधृता प्रजा।

नीतिनियमादि अटींद्वारे समाजाचे संचलन-नियमन होत असल्यानं त्या चौकटींना ‘धर्म’ असं म्हणतात, हे आपण पूर्वीच्या लेखांतून पाहिलंच. परंपरांविषयी चिकित्सक अथवा पारंपरिक अंगाने अभ्यास करणाऱ्या अभ्यासकांपासून सर्वसाधारण सश्रद्ध माणसापर्यंत अनेकांना हे वचन परिचयाचे असते. आजवर आपण धर्म-धारणेविषयीची वेगवेगळी उदाहरणे आणि प्राचीन समाजातले त्याविषयीचे दृष्टिकोन पाहिले होते. धर्म या वेदांतून विकसित होऊ लागणाऱ्या संकल्पनेला भगवान बुद्धांच्या आणि महावीरांच्या परंपरांनी नवीन आयाम निर्माण करून दिले. त्यांच्या पूर्व/-समकालीन समाजात वैदिक कर्मकांडाचा अतिरेक आणि त्या अतिरेकातून जाणवणारी निर्थकता यामुळे जीवनातील आधिभौतिक, तात्त्विक आणि आध्यात्मिक सत्यांचा शोध घेऊ पाहणाऱ्या अनेक तत्त्वज्ञ, चिंतकांचं प्रभावी अस्तित्व इथल्या चिंतनविश्वाला नवनवी परिमाणे आणि ओघानेच व्यापकता प्रदान करत राहिलं. यज्ञीय विधींच्या हिंसक प्रकृतीचा उबग आलेल्या समाजातून इथल्या धार्मिक-राजकीय समाजप्रतलांमध्ये आणि धारणांमध्ये आमूलाग्र परिवर्तन होत अिहसेसारख्या मूल्याचा उदय झाला, त्यातून नवीन धर्मव्यवस्था निर्माण झाल्या हे आपण पाहिलं. कर्मसिद्धांतासारखं समाजावर हजारो र्वष अधिराज्य गाजवणारं, समाजात मुरलेलं तत्त्वदेखील याच गतिमानतेतून आकाराला आलं. सम्राट अशोकाच्या शिलालेखांतून जाणवणारी अशोकाची व्यापक दृष्टी आणि त्याचे समाजावर झालेले परिणाम आपण थोडक्यात पाहिले. बौद्ध-जैनादि तत्त्वज्ञान आणि धर्मप्रवाहांशी तात्त्विक संबंध मान्य न करता स्वतंत्र अस्तित्व जपू पाहणाऱ्या वैदिक धर्मव्यवस्थांमधल्या प्रवाहांनाही या सर्व घडामोडी आणि तात्त्विक मंथनातून गतिमानता आणि दिशा-उपदिशा मिळत गेल्या.

वैदिक-जैन-बौद्ध किंवा कोणत्याही अन्य तत्त्वज्ञानप्रणाली अतिशयित प्रभावशाली असल्या तरी सामान्य जनरीतींचा त्यांच्यावर प्रतिप्रभाव पडणे स्वाभाविकच आहे. लोकमानसातल्या विविध मनोरंजक, श्रद्धापर, नीतिनियमांचे महत्त्व पटवून देणाऱ्या दृष्टांतांनी युक्त असलेल्या कथाबीजांना किंवा कथांच्या चौकटीला त्या-त्या तत्त्वज्ञानप्रणालीने त्यांना अभिप्रेत असलेल्या चौकटींतून मांडायचा प्रयत्न केला. त्यातूनच बौद्ध जातककथा, जैनकथासाहित्य, पुराणे आणि गेल्या लेखांत चच्रेमध्ये आलेल्या आर्षमहाकाव्यांची निर्मिती झाली. रामायण आणि महाभारतासारख्या काव्यांनी आणि पुराणांतील कथांनी उपखंडातील समाजाच्या सांस्कृतिक-राजकीय प्रवाहांना नव्या दिशेला नेलं. रामायण आणि महाभारत या दोन्ही काव्यांची मध्यवर्ती कथावस्तू आपण जाणतो. त्यामुळे आपण त्यावर चर्चा करण्यात न गुंतता, त्या महाकाव्यांनी इथल्या राजकीय-सांस्कृतिक धारणांच्या चौकटीची वैशिष्टय़े थोडक्यात पाहून मग पुढच्या मुद्दय़ाला हात घालू. रामायणातील नायक अयोध्येचा युवराज आणि नंतर राजा झालेला श्रीराम हा रामायणाच्या पहिल्या आणि शेवटच्या कांडांमध्ये (भागांमध्ये) रामाचे ईश्वरी अवतारित्व उल्लेखित असलं तरी अन्य कोणत्याही भागात राम हा नायक देवत्व-विष्णुस्वरूप प्रकट करत नाही किंवा /त्याविषयी निर्वाळा देताना दिसत नाही. महाभारतातील नायक असलेल्या पांडवांसारखं किंवा श्रीकृष्णांसारखं वलयांकित वीरत्व मिरवताना राम दिसत नसला, तरी रामायणकारांनी त्यांना अभिप्रेत असलेल्या नीतीच्या चौकटीतून त्याचे वेगळेपण, ईश्वरी गुणसंपदा प्रतीत होईल याची काळजी घेतली आहे. महाभारताप्रमाणे रामायणामध्येदेखील कर्म सिद्धांताला आणि कर्तव्यपरायणतेला महत्त्व दिलं गेल्याचं दिसून येतं. अर्थात, त्याला दैव आणि वरदान-शापासारख्या अतिमानवीय तत्त्वांची जोड दिसतेच. बुद्धांच्या परंपरेतून प्रभावीपणे प्रतिपादित झालेल्या कर्मसिद्धांताचे प्रकटन रामायणात वारंवार दिसते. अगदी रामायणामधल्या खलनायकी व्यक्तित्वांनादेखील (रावण असो किंवा कैकेयी) साक्षात दोषी किंवा दुष्ट न ठरवता त्यांच्या प्रारब्धकर्मानुसार त्यांच्या हातून चुका घडल्याचा निर्वाळा रामायण देतं. या प्रारब्धादि चौकटींनादेखील नीतिमूल्यांच्या चौकटीत बसवण्याचा प्रयत्न रामायणातून प्रतीत होताना जागोजागी दिसून येतो. एका ठिकाणी, (प्रारंभीच्या दुसऱ्या कांडात) राम-लक्ष्मण संवादामध्ये ‘‘दैवाचे आणि प्रारब्धाचे विचार वीरपुरुष करत नसतात, ते आपल्या कर्तृत्वाने आयुष्य घडवतात, त्यामुळे आपण आपल्या मार्गात येणाऱ्या अडथळ्यांना संपवून, मारून टाकून आपला मार्ग सुकर करावा,’’ असं प्रतिपादन करणाऱ्या लक्ष्मणाला स्वत: रामच दैव-प्रारब्धादि गोष्टींचे महत्त्व समजावून सांगताना- पित्याचे वचन पाळणे हाच खरा धर्म असून कैकेयीला दोष देणे निर्थक असल्याचे ठामपणे सांगतो. कर्तव्यबुद्धी, नीतिमूल्यांविषयीच्या निष्ठा इत्यादी बाबींमुळे राम हा भारतीय जनमानसामध्ये आदर्श राजा अर्थात राजर्षी म्हणून मान्यता पावला. राजपद प्राप्त झाल्यावर शतावधी अश्वमेध करणाऱ्या रामाला युद्ध, क्षात्रकर्म आणि तद्नुषंगिक हिंसा यांचे वावडे नसल्याचे रामकथेत वारंवार दिसून येते. उलट तो त्याचा धर्मच असल्याचं रामायणातून अगदी सहजरीत्या सूचित केलं गेल्याचंच प्रत्ययाला येतं.

गेल्या भागांतून आपण लिच्छवींच्या पराजित करण्यासाठी मंत्रणा देणारे बुद्ध, बौद्ध-जैन झाल्यावरही युद्ध-युद्धजनित हिंसा इत्यादी राजकीय सत्यांविषयी जागरूक राहणारे अशोक-खारवेलादी राजे यांच्याविषयी चर्चा केली. समाजाला अभिप्रेत असलेल्या सामूहिक नीतिनियमांच्या चौकटीत राहत आपला राजकीय अधिकार, शक्ती यांचे पालन करत राजाने आपले मोठेपण साकारायचे असते, अशी सर्वमान्य धारणा प्राचीन समाजांत दिसून येते. त्यातूनच बहुधा राजर्षी या संकल्पनेचा उदय झाला असावा. रामाचे अवतारी पुरुष म्हणून असलेलं वलय बाजूला ठेवल्यावर अशोक-खारवेल यांसारख्या मानवी व्यवस्थांचे नियमन करणाऱ्या राजांसारखंच त्याचं आदर्शत्व समोर येतं. परिपूर्ण आणि आदर्श असा मनुष्य म्हणून रामाचे चित्रण करत, तो खऱ्या अर्थाने राजर्षी असल्याचं रामायण वारंवार सांगत राहतं. मात्र वर उल्लेख केलेल्या दोन राजांप्रमाणे राम वैदिक व्यवस्थांच्या बाहेर जाताना दिसत नाही. शंभर वेळा केलेले अश्वमेध यज्ञ व प्रासंगिक वाजपेय-पौंडरिकादि यज्ञ केल्यामुळे रामाच्या राज्यात पाऊस वेळेत पडत असे. त्याच्या राज्यात माणसांचे आयुर्मान हजार वर्षांचे झाले होते. फळे-फुले, पिके मुबलक होती. अकालमृत्यूचे भय नव्हते. चोर-सर्पादिक गोष्टींचे भय नव्हते. रोग, दु:ख, दुर्भाग्य वगरे गोष्टींना थारा नव्हता. अशा अनेक आदर्श आणि अनुकूल गोष्टींनी रामाच्या राज्यातली प्रजा संतुष्ट होती. रामायणातल्या या स्वप्नवत वाटणाऱ्या कल्पित समाजाला ‘रामराज्य’ ही संज्ञा उत्तरकाळात मिळाली हे आपण जाणतोच. प्राचीन समाजात सार्वत्रिक असलेल्या पितृसत्ताक धर्मव्यवस्थेचा राम हा ध्वजरक्षक असल्याचं रामायण सांगतं. मानवी पातळीवरील गुणदोषांचा परिपोष करणाऱ्या या महाकाव्यात रामाला महत्त्व प्राप्त होतं ते त्याच्या पराक्रमादि पौरुष गुणांमुळे नाही, तर त्याच्या कर्तव्यपरायणत्वामुळे. त्या कर्तव्य-धर्माच्या वर्णाधिष्ठित चौकटींचे पालन करताना, वर्णनियमांचे उल्लंघन करणाऱ्या शंबूक नावाच्या शूद्रजातीतील माणसाला मारणं हे धर्मपालनाच्या दृष्टीने रामायणकारांना अनुचित वाटत नाही. वाली या वानरांच्या राजाला लपून मारणं किंवा लोकापवादासाठी सीतेचा त्याग करणं या गोष्टी रामायणकारांना नीतीच्या चौकटीत बसवणे अनुचित वाटत नाही. आपल्या कामवासनेसाठी राम-लक्ष्मणाकडे आकर्षति होऊन सीतेला मारून टाकण्यास उद्युक्त झालेल्या शूर्पणखेला विद्रूप करण्याची आज्ञा देणारा राम आजच्या आधुनिक नीतिमूल्यांच्या चौकटीत दोषी ठरवला जातो. मात्र, रामायणकालीन समाजाच्या चौकटींनुसार त्यात दोषास्पद असं काही असल्याची भावना रामायणकारांना दिसत नाही. क्वचित ठिकाणी लक्ष्मण किंवा भरताच्या तोंडून धर्माहून अर्थ हा पुरुषार्थ अधिक महत्त्वाचा असल्याचे संभाषित रामायणकार प्रतिपादित करतात व त्याला प्रतिवाद म्हणून रामाने भोगलेल्या अधिकारच्युतीची आणि यातनांची पृष्ठभूमीदेखील तिथेच उभी केली जाते.

लेखाच्या समारोपाकडे जाताना रामायणाच्या ऐतिहासिक सत्यासत्यतेच्या वादात पडता पूर्वीच्या लेखांतून झालेल्या चच्रेच्या पाश्र्वभूमीवर आपण काही लक्षणीय बाबींची चर्चा थोडक्यात करू या. क्रूर, असत्यनिष्ठ, दुराचारी माणसाचा शेवट वाईट होतो, ही भारतीय जनमानसामध्ये रुजलेली भावना रामायण-भारतादि आर्ष महाकाव्यांतून अधिक ठळकपणे प्रतीत होते. भीमाने दुर्योधनाला मारणे, रामाने रावणवध करणे या कथा आपण लहानपणापासून ऐकतो तेच मुळी अमुक चांगला (नायक) तर दुसरा वाईट (खलनायक) या द्वैतातून. राजा किंवा सत्ताधीश म्हणून दुर्योधन किंवा रावण चांगले, नीतिमान असल्याचं दोन्ही महाकाव्यांतून दिसतं. पण त्यांच्या वैयक्तिक दुर्गुणांमुळे त्यांच्या खलनायकत्वाला परंपरेत अधोरेखित केलं गेलं. सम्राट अशोकाला त्याच्या पूर्वायुष्यातील उग्र-निष्ठुरतेमुळे ‘चंड अशोक’ हे नाव मिळाल्याचं लिखित साधनांतून दिसून येतं. पण हाच अशोक त्याच्या धम्मलिपींतून अभिव्यक्त झालेल्या विश्वात्मक संदेशांमुळे राजर्षत्विाला प्राप्त झाल्याचं दिसतं. अशोकाचा काळ हा साधारणत: इसविसनाचे तिसरे शतक. रामकथेच्या विकसनाची प्रक्रिया संशोधकांच्या मते ख्रिस्तपूर्व ७ व्या ते ४ थ्या शतकाच्या आरंभी सुरू झाली असावी. अर्थात वाल्मिकी रामायण ही रामकथेच्या विकसनप्रक्रियेतील सर्वात महत्त्वाची संहिता मानली जाते. बौद्धांच्या दशरथ जातक या जातक कथेमध्ये (साधारणत: ४ थे शतक). काही अभ्यासकांच्या मते, दशरथ जातक हे वाल्मिकी रामायणाच्याही आधीचे रामकथेचे संस्करण आहे, तर काहींच्या मते, उलट. त्या वादाचा निष्कर्ष किंवा त्यामागचे वास्तव काहीही असले तरी वाल्मिकींची रामकथा आणि जातकांची रामकथा यांच्या काळात फारसे अंतर दिसत नाही. अशोकाचा काळ साधारणत: इसविसनपूर्व तिसरे शतक. या तिन्ही काळाविषयक तपशिलांना लक्षात घेता त्यांचे समकालीन अस्तित्व लक्षणीय ठरते. लोकमानसात रुजलेली रामाची नीतिपर वीरगाथा, बौद्ध-अशोकप्रणीत तत्त्वज्ञान आणि वेद-ब्राह्मण ग्रंथांतील कथा आणि पौराणिक संकल्पनाबीज यांचा सहसंबंध जोडण्यास काही प्रत्यवाय दिसत नाही. सम्राट अशोकाचे आदर्शत्वाचे निकष त्याने स्वत: घडवले, की ते त्याच्याभवतालच्या आचार्य-भन्तेसमुदायाने घडविले याविषयी निश्चित माहिती नसली तरी अशोकाद्वारे अभिव्यक्त झालेल्या आदर्श राजाचे निकष वाल्मिकींच्या आदर्श रामराज्याहून व आदर्श राज्यकर्त्यांच्या गुणांहून बरेचसे वेगळे आहेत. हिंसा, शिकार वगरे गोष्टी अशोकाने उत्तरकाळात बंद करून इतरांना तसे आवाहनपर सूचन केले आहे. रामायणात तसं काही दिसत नाही. अशोकाचे तत्त्वज्ञान आणि रामकथेच्या निर्मितीचा काही शतकांचा काळ यांच्यात असलेलं सामायिक कालखंडाचं वास्तव बहुधा तत्कालीन समाजातल्या वेद-उपनिषद आणि नुकती आकाराला येऊ लागलेली पुराणं यांच्यातील तत्त्वज्ञान प्रवाहाचे अशोकप्रणीत धम्मव्यवस्थेतून प्रतीत होणाऱ्या मूल्यांशी समकालीन समांतरत्व दाखवून देते.

बौद्ध, जैन आणि वेदप्रणीत धर्मव्यवस्थांतील मूल्यव्यवस्थांचे आणि विचारांचे आदानप्रदान होणे हे संघटित झालेल्या एकसाची व्यवस्थांच्या चष्म्यातून पाहाणं ऐतिहासिकदृष्टय़ा उचित ठरणार नाही. या तीन परंपरांना समकालीन अशी इतर तत्त्वज्ञानाची वर्तुळेदेखील त्याकाळात अस्तित्वात होती. या गुंतागुंतीच्या चौकटींनी समकालीन आणि पूर्वकालीन समाजातून आलेल्या धारणा आणि संकल्पनांना स्वीकारून, त्या त्या प्रवाहाला अनुरूप अशा पद्धतीने त्यांच्यात बदल करून नव्या मूल्यव्यवस्था उदयाला आणण्याचा प्रयत्न केला. राज्यव्यवस्था आणि तत्त्वज्ञांची वर्तुळे यांच्या सहसंबंधातून विकसित झालेल्या बहुतांशी साऱ्याच प्रवाहांत अिहसा, सत्यादि मूल्यांचा उद्घोष दिसतो. (जैन-बौद्धांत अिहसेचा पुरस्कार अर्थातच तुलनेने अधिक प्रकर्षांने आचरणात आलेला दिसतो.) मात्र, समकालीन समाजातल्या गतिमानतेचा प्रभाव तिन्ही वर्तुळांवर पडून त्यातून कर्म, पुनर्जन्म, मोक्ष-निर्वाणादि समांतर कल्पना तिन्ही प्रमुख तत्त्वज्ञानप्रणालीत उदयाला आल्या व त्यांनी आजवर भारतीय मनातले आपले स्थान तितकेच घट्ट ठेवले आहे.

लिच्छवी, अशोक, खारवेल यांच्याविषयी प्रतीत होणाऱ्या श्रमणपरंपरेतील धारणांतून राजेलोक आणि अन्य शासकयंत्रणांना बलप्रयोग आणि राजकीय हिंसा करण्यास अप्रत्यक्ष मुभा अनुल्लेखित रूपात दिली गेली होती. किंबहुना, त्या राजकीय-सामाजिक वास्तवाचे भान तत्कालीन तत्त्वज्ञमंडळींना निश्चितरूपात होतं असं दिसतं. अशोकाच्या शिलालेखातून संपूर्ण अिहसा सर्वथा अशक्य असल्याचा स्पष्ट उल्लेख यासंदर्भात पुरेसा बोलका आहे.

उपखंडाच्या इतिहासात अशोक, महाभारत आणि रामराज्य-रामायण हे ऐतिहासिक राजव्यवस्थेसंदर्भात मूलभूत आणि चिरस्थायी परिणाम घडवून आणणारे ठळक बदू आहेत. पुढील लेखांत या व्यवस्था आणि धर्मशास्त्रातील व कौटिल्य-चाणक्याच्या नावावर असलेल्या अर्थशास्त्रातील राज्यव्यवस्थापर तपशिलाची थोडक्यात चर्चा करून, आपल्याला मध्ययुगीन इतिहासामाग्रे या प्राचीन आणि मध्ययुगीन काळाचे वर्तमानकाळातील सामाजिक-राजकीय इतिहासाच्या पृष्ठभूमीवर विवेचन करायचे आहे. त्यातून आपल्याला धर्म-धम्म आणि तदं्तर्गत मूल्यांचे आधुनिक श्रद्धापर-रिलिजन या व्यवस्थेशी करविले गेलेले संयोजन आणि त्याचे उपखंडावर झालेले परिणाम चच्रेला घेत या लेखमालेच्या शिखराकडे मार्गाक्रमण करायचं आहे.

rajopadhyehemant@gmail.com