13 August 2020

News Flash

धारणांच्या गुंतागुंती तपासताना..

अभ्युत्थानमधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहं

|| हेमंत प्रकाश राजोपाध्ये

यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत।

अभ्युत्थानमधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहं ।

परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृताम्।

धर्मसंस्थापनार्थाय सम्भवामि युगे युगे।

भारतीय टेलिव्हिजनचे सुवर्णयुग मानल्या गेलेल्या १९८०-९०च्या दशकांत सर्वतोमुखी झालेले भगवद्गीतेमधले हे दोन श्लोक. दोन्ही श्लोकांची महती ही की, या दोन श्लोकांचा भावार्थ अगदी सामान्यातल्या सामान्य माणसालादेखील सहज सांगता येतो. धर्माची शक्ती आणि नीतिमूल्यांचा स्तर जेव्हा ढासळू लागतो, अधर्मी लोकांच्या हातात सत्ता येऊन ते सज्जनांचा छळ करतात तेव्हा धर्मसंस्थापनेसाठी परमेश्वर अवतीर्ण होतो आणि धर्म व नीतिमूल्यव्यवस्थेची घडी बसवतो, ही हिंदू श्रद्धाविश्वात अतिशयित मान्यता पावलेली धारणा. श्रीकृष्णांनी अर्जुनाला ऐन महाभारत युद्धाच्या आधी, युद्धभूमीवर सांगितलेलं हे रहस्य. या दोन श्लोकांवर हिंदू धर्मातील मुख्य प्रवाह समजला जाणारा, हिंदू श्रद्धाविश्वाचा डोलारा उभा आहे असं म्हटलं तर ती अतिशयोक्ती ठरू नये, इतकी प्रतिष्ठा आणि मान्यता या गीतेतील वचनाला मिळाली आहे. महाभारत व रामायण ही (ऋषिप्रणीत) दोन आर्ष महाकाव्ये भारतीय समाजात सर्वाधिक प्रतिष्ठा लाभलेली. ‘धर्म’, विशिष्ट कुळांतील परिवारांतील नातेसंबंध, राज्याधिकाराविषयीचा कौटुंबिक कलह आणि त्यातून समोर येणाऱ्या सामाजिक व्यवस्था आणि मूल्यांच्या चौकटी हे महाभारत आणि रामायण या दोन्ही महाकाव्यांतील मुख्य विषय असल्याचं दिसतं. आणि युद्ध हा दोन्ही महाकाव्यांतील कथानकांचा चरम व महत्त्वपूर्ण असा घटक आहे. साधारणत: गंगा नदीच्या उत्तरेकडील मदानी प्रदेशांमध्ये महाभारताची कहाणी आकाराला येते. या महाकाय ग्रंथामधील धर्म आणि श्रद्धाविषयक धारणा तपासल्या असता आपल्याला दिसून येतं की, महाभारत हा एकाच वेळी काही मूलभूत धारणांविषयी चर्चा करत त्या धारणांच्या बहुपेडी, अनेकविध काळांतील स्वरूपांचे आणि त्याविषयीच्या विविध तत्त्वज्ञानानं प्रकट करणारा संक्रमणशील अशा प्रकृतीचे दर्शन घडवतो. महाभारतातून ठळक जाणवणारी दुसरी महत्त्वाची बाब अशी की, महाभारत एकाचवेळी वैदिक देवता आणि तुलनेने उत्तरकाळात विकसित झालेल्या-प्रसिद्ध पावलेल्या नवीन प्रमुख देवता (शिव, नारायण-विष्णू) या दोन्ही देवताविश्वांत संचार करते. यज्ञविधी, यज्ञांद्वारे प्राप्त होणारी ईप्सित फळे, पितृकम्रे, इत्यादी गोष्टींना महाभारत महत्त्व देतेच, पण भक्ती या नवीन तत्त्वज्ञानाला आणि त्यातून साधणाऱ्या देवता व मानव यांच्या आधिदैविक व्यवहारांनादेखील महाभारत संहितेत प्राधान्यक्रम दिलेला दिसतो. विशाल कालपटावरील जुन्या-नव्या अशा धार्मिक-सामाजिक संकल्पनांचा वेध घेत वेदपरंपरांसोबत वेदेतर परंपरांमधील मूल्यांना सामावून घेत महाभारत एका वेगळ्या, गुंतागुंतींनी युक्त अशा धारणांनी बनलेल्या विविध महाकाय चौकटी उभ्या करते. महाभारताच्या या अनोख्या दिङ्मूढ करून टाकणाऱ्या वैशिष्टय़ांमुळेच हा ग्रंथ आपल्याकडे ‘पंचम वेद’ म्हणून मान्यता पावला आहे.

महाभारत आणि रामायणासंदर्भातील चच्रेला प्रारंभ करण्यापूर्वी गेल्या काही भागांत चíचले गेलेले काही मुद्दे आठवावे, जे आपल्या या पुढील चच्रेच्या दृष्टीने महत्त्वाचे आहेत. गेल्या भागांत आपण भगवान बुद्ध, सम्राट अशोक, काही जैन-बौद्ध राजे यांच्या संदर्भाने तत्कालीन समाजातील हिंसा-अिहसा-धर्म, इत्यादी संकल्पनांचे राजकारण आणि त्याविषयीच्या धारणांवर चर्चा केली होती. अिहसा हे तत्त्व आणि त्यांचे व्यावहारिक राज्यप्रणाली किंवा सामाजिक जीवनांतील उपयोजन यांचा थोडक्यात आढावा आपण घेतला. त्याचप्रमाणे अशोकाने आपल्या शिलालेखांतून मांडलेलं तत्त्वज्ञान आणि धम्मविषयक जाणिवांविषयीही आपण चर्चा केली होती. अशोकाचे शिलालेख, त्यातून प्रतीत होणारं तत्त्वज्ञान आपल्याला अशोकपूर्वकालीन बौद्ध संकल्पनांसोबतच अशोकाच्या स्वत:च्या (?) वैयक्तिक चिंतनातून आलेल्या किंवा त्याला अनेकविध चर्चातून-चिंतनांतून झालेल्या आकलनाचं दर्शन घडवतं. आधिभौतिक (या जगातले) व्यवहार, मूल्यव्यवस्था आणि राजकारण, इत्यादीसंदर्भात मांडणी करणाऱ्या या शिलालेखांचं सबंध उपखंडात दिसून येणारं अस्तित्व अशोकाने काही विशिष्ट धोरणांतून चालवलेली एक वैचारिक-राजकीय चळवळीप्रमाणे असल्याचं काही अभ्यासकांचं मत आहे. मौर्य साम्राज्याच्या विस्तृत सीमांचा विस्तार करणारा हा सम्राट अशोक राज्यव्यवस्थांच्या चौकटीच्या सर्वोच्च स्थानावर विराजमान होऊन विशिष्ट राजकीय आणि नतिक मूल्यप्रणाली प्रस्थापित करू पाहतो, ही भारतीय इतिहासातील आगळीवेगळी घटना म्हणावी लागेल. अशोकाचे पूर्वकालीन आणि उत्तरकालीन असे उपखंडात असलेले स्थानिक आणि ग्रीस वगरे भागातून आलेले समकालीन राजे आणि सरंजामदार यांच्या तुलनेत अशोकाचे राजकारण, मूल्यांचे आकलन हे वेगळे असल्यामुळे, अशोकाचा ठसा प्राचीन भारतातील मूल्यप्रणाली आणि धर्मप्रणालींवर पडला. आणि एकप्रकारची समावेशक, काहीशी गुंतागुंतीची; पण राजकारण-मूल्यव्यवस्था-श्रद्धा आणि धर्मव्यवस्थांना जोडणारी व्यवस्था अशोकाला अभिप्रेत होती असं आपल्याला त्याच्या विचारांतून दिसून येतं.

अशोकाच्या शिलालेखांतून प्रतीत होणाऱ्या जाणिवा या सर्वस्वी अशोकाच्या असतील किंवा नसतील, यावर अधिक भौतिक-लिखित-मौखिक पुराव्यांच्या आधारे चर्चा झडू शकतील. पण सम्राट अशोकाप्रमाणे अशोकाचा काळदेखील तत्त्वज्ञान-श्रद्धा-मूल्यव्यवस्थांच्या एका मोठय़ा स्थित्यंतराचं प्रतिनिधित्व करीत असावा असा अंदाज बांधण्यास काही अडचण नसावी.

महाभारत अथवा रामायण प्रत्यक्षात घडलं की न घडलं या वादात न पडता महाभारताच्या उपलब्ध संहितेवरून बनवलेल्या मुद्रितशोधन झालेल्या प्रतीवरून (भांडारकर संस्थेची प्रत) महाभारत संहितेचा काळ मात्र निश्चित करता येतो. महाभारत कथेचे मूळ अंदाजे इसविसनपूर्व ८-९ व्या शतकांपर्यंत मागे नेता येत असले तरी उपलब्ध संहितेचा भाग हा साधारणत: इसविसनपूर्व ४०० ते इसविसन ४ थे शतक असा निश्चित करण्यात आला आहे. अशोकाच्या मृत्यूचे इसविसनपूर्व २३२ हे अभ्यासकांनी प्रमाणित केलेले मत लक्षात घेतले तर महाभारत संहितेच्या विकसनाचा काळ अशोकपूर्व काही वर्षांपूर्वी सुरू झालेला दिसतो. महाभारत-संहितेच्या विकसनातील गुंतागुंत आणि त्यातील बहुविध मूल्यव्यवस्था आणि संक्रमणशीलता पाहता अशोकीय तत्त्वज्ञानाचा प्रभाव महाभारतावर पडला नसणं केवळ असंभव आहे. अशोकाच्या शिलालेखांतून धर्म, धम्म या दोन वेगवेगळ्या वर्तुळांतून विकसन पावणाऱ्या प्रणालींना एक वेगळी दिशा मिळाली. बुद्धाच्या काळातील राजे आणि गेल्या भागात लिच्छवीराज्याच्या संबंधाने त्या राजांची बुद्धाशी झालेली मसलत हे बुद्धकालीन राजनतिक व्यवहारांचे आणि धर्मव्यवहारांचे रुपडे अशोकाच्या युद्ध नाकारणाऱ्या तत्त्वज्ञानाहून कितीतरी भिन्न आहे हे एव्हाना आपल्याला लक्षात आले असेल. अशोकाने धम्म किंवा धर्माला श्रद्धा-तत्त्वज्ञानात्मक कोशांतून बाहेर काढले आणि त्यांना सामाजिक-राजकीय तत्त्वज्ञान चच्रेचा केंद्रिबदू बनवलं. राज्याचं नियंत्रण आणि स्वत:च्या मानवी वृत्तींचं नियंत्रण यांना विशिष्ट शैलीत जोडायचा प्रयत्न अशोकाने केला. आणि त्या विचाराची मांडणी देशोदेशी पसरवायचा यशस्वी प्रयत्नदेखील त्याने करून पाहिला. अशोकाच्या काळातील या स्थित्यंतरांचं हलकं प्रतिबिंब आणि त्या तत्त्वज्ञानासंबंधीचं प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष साद-प्रतिसाद महाभारतातील विविध विचारसरणींच्या गुंतागुंतींतून अनेकदा जाणवत राहतात.

हिंसा-अिहसा किंवा धर्म काय आणि अधर्म काय, याविषयी एकच एक उत्तर महाभारत देत नाही. राजनीती, मूल्ये, जीवन-मृत्यू, पुण्यापुण्य, इत्यादी बहुविध मानवी जीवनांतील अनेक धारणा, प्रश्न आणि अवस्थांना महाभारत वेगवेगळी (कधी पर्यायी तर कधी समांतर) उत्तरे देतं. या चर्चाच्या चौकटी अनेकदा आख्यानात्मक किंवा संवादात्मक असल्याचं दिसतं. सत्ता, बल किंवा अधिकार या संकल्पनांचं महत्त्व, त्यांचा संभाव्य चांगला किंवा अनुचित वापर आणि त्यांच्या उपयोजनांतून उद्भवणाऱ्या परिणामांविषयीची सजगता महाभारतात स्पष्टतया दिसून येते. हिंसा-अिहसा, राजकीय जीवनातील, गृहस्थजीवनातील कर्तव्ये, त्या पालन करताना येणाऱ्या अडचणी, संभ्रमकारक अवस्था यांचा विचार महाभारतात अनेक अंगांनी केलेला दिसून येतो.

सम्राट अशोकाच्या काळात किंवा त्यापूर्वीपासून समाजात सुरू असलेली स्थित्यंतरं आणि त्यांतून निर्माण होणाऱ्या राजकीय, सामाजिक, नतिक परिघांतल्या अडचणींना त्या त्या परिस्थितीप्रमाणे तोंड देण्यासाठी आणि त्याच वेळी स्वत:च्या आत्मभानाविषयीच्या, विवेककेंद्री जाणिवांतून आणि निर्वाण-मोक्षाविषयीच्या धारणांतून बुद्ध, महावीर, अशोक आणि व्यास-वाल्मिकींच्या नावे ख्यातकीर्त झालेली महाकाव्यं यातून विशिष्ट तत्त्वज्ञानं किंवा आचरणपद्धतींचा विकास उपखंडात झाला. त्यांची व्याप्ती जीवनाच्या अनेक अंगांना स्पर्श करत तत्कालीन मानवी समाजाच्या चौकटींना विशिष्ट आकार देईल इतपत प्रभावशाली ठरली. वैदिक, औपनिषदिक, जैन, बौद्ध, आजीवक अशा अनेक स्वतंत्र धर्मप्रणालींतून विकसित झालेल्या या विचारांत सलगता किंवा सातत्य दिसत नसलं तरी त्या चौकाती या भूप्रदेशातील वैचारिक-राजकीय मंथनातून निर्माण झाल्या आणि इथे एकमेकांत मिसळून जात असताना स्वत:चं स्वतंत्र अस्तित्व टिकवायचा प्रयत्नही करत राहिल्या.

यातून पुढच्या काळात महाकाव्ये, पुराणे, आणि धर्मशास्त्रादीक व्यवस्थांच्या चौकटींच्या परंपरा उभ्या राहिल्या. धारणांच्या धाग्यांच्या उकलीचा हा प्रवास आता लेखमालेच्या मध्यावर येत असताना आपण आता पुढील भागांत ही महाकाव्यं, धर्मव्यवस्थांवर चर्चा करत मध्ययुगीन आणि आधुनिक काळाकडे येणार आहोत.

rajopadhyehemant@gmail.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 1, 2018 3:55 am

Web Title: loksatta lokrang marathi articles 8
Next Stories
1 युद्ध आणि मानवी मूल्यांचे द्वैत
2 मुद्रा भद्राय राजते।
3 समाज-धारणांच्या गाभ्याकडे
Just Now!
X