18 February 2019

News Flash

परंपरांच्या पल्याड..

वारशासारखी चिकटून जातात आणि जगण्याचा अविभाज्य भाग बनतात.

आज साधारणत: पन्नाशीच्या टप्प्यावर असलेल्या मंडळींनी आधुनिकता, विज्ञानयुग, संगणकयुग, इत्यादी शब्द त्यांच्या वाढत्या वयात ऐकले असावेत. दुसरीकडे श्रद्धा, अस्मिता, विचारसरणी, वंश, संस्कृती वगैरे शब्द तर आपल्यासाठी रोजच्या जेवणाइतके परिचित आणि जिव्हाळ्याचे आहेत. एक व्यक्ती म्हणून आणि समाजातला घटक म्हणून जगत असताना या सर्व घटकांचे परिमाण आपल्या जगण्याला आपसूकच लागते. अनेकदा ही परिमाणे आपण स्वत:हून आपल्याला लावून घेतो किंवा कुटुंबव्यवस्था, सामाजिक व्यवस्था आणि भवताल यांच्या प्रभावातून ही परिमाणे वारशासारखी चिकटून जातात आणि जगण्याचा अविभाज्य भाग बनतात.

यापैकी आधुनिकता, विज्ञान-तंत्रज्ञान वगैरे गोष्टींना बौद्धिक वर्तुळातून जी प्रतिष्ठा मिळते तिचं स्वरूप हे श्रद्धा, अस्मिता, संस्कृती, वंशवाद वगैरे व्यूहातून अभिव्यक्त होणाऱ्या गोष्टींपेक्षा पुष्कळच वेगळं आहे हे आपल्याला दिसून येतं. विज्ञानादिक गोष्टींना मिळणाऱ्या प्रतिष्ठेला बुद्धिप्रामाण्यवाद, प्रत्यक्ष प्रमाण आणि व्यावहारिक जीवनातील उपयोगिता इत्यादी कारणांची जोड असते. मात्र श्रद्धा, अस्मिता, वंशवाद वगैरे गोष्टींना एक सापेक्षता व राजकीय वादग्रस्ततेच्या छायेत असलेलं विवक्षित पद्धतीचं वलय मिळालेलं असतं. त्यांच्या ठायी उपजतच असलेल्या सापेक्षतेमुळे त्यातून वैचारिक-राजकीय धारणांशी निष्ठा सांगणाऱ्या समूहांच्या आकांक्षा आणि समाजकारण-राजकारणातील हितसंबंध जोडले गेलेले असतात. विज्ञान आणि तंत्रज्ञानादी गोष्टींची व्याप्ती मानवी गरजांतून व कुतूहलातून निर्माण झालेल्या वेगवेगळ्या संशोधन प्रणाली आणि नवीन शोधांद्वारे वाढत जाते. तर श्रद्धा, अस्मिता, विचारसरणी, वंश, संस्कृती वगैरे शब्दांची परिमाणं चर्चाविश्वाच्या व्याप्तीनुसार बदलत जातात. कधी सामाजिक-सांस्कृतिक विश्वाचा अवकाश वाढत जातो, तर क्वचित अर्थनिष्पत्तीचे निकषच बदलतात. अनेकदा विशिष्ट सामाजिक-राजकीय कृती अगर घटनांमुळे किंवा पर्यावरणीय अथवा आर्थिक स्थित्यंतरांमुळे त्या घटनाप्रवाहांना वेगळीच, अनपेक्षित दिशा मिळते. या सर्व बदलांविषयीच्या धारणा व स्मृतीदेखील काळानुसार व समूहागणिक बदलत गेलेल्या दिसतात.

भारतीय उपखंडासारख्या भौगोलिकदृष्टय़ा विस्तीर्ण आणि सांस्कृतिकदृष्टय़ा गुंतागुंतीच्या धारणांनी युक्त असलेल्या भूप्रदेशामध्ये हे प्रश्न वसाहतवादप्रणीत आधुनिकतेसोबत नवी रूपडी धारण करून समोर आले. पुढे उत्तराधुनिकतेच्या प्रवाहात बौद्धिक व्यवहार करणाऱ्या पाश्चात्त्य व एतद्देशीय समूहांनी त्यांच्या अर्थनिष्पत्तीचे नवीन पर्यायी मार्ग व पद्धती शोधून काढल्या. या सर्व बौद्धिक-सांस्कृतिक व राजकीय घडामोडींचे बोचके कळत-नकळत पाठीवर घेऊन आजचा समाज उत्तराधुनिकतेलाही (Post-modern period) ओलांडून जाण्यासाठी सज्ज आहे. या नव्या काळाला ‘मेटामॉडर्न’ किंवा ‘पोस्टमिलियनलिजम’ वगैरे नावे देऊन त्यांच्या सिद्धांतनाची प्रक्रियादेखील पाश्चात्त्य अकादमिक विश्वात सुरू झाली आहे. या पृष्ठभूमीवर भारतीय उपखंडातील इतिहासप्रवाह, श्रद्धा, अस्मिता, वंशवाद, संस्कृती वगैरेंचा परामर्शही आपसूकच नव्याने घेतला गेला पाहिजे. आणि तो तसा घेतला जाईलही. त्या प्रक्रियेचा एक भाग म्हणूनच भारतीय उपखंडातील इतिहास, त्यातून निर्माण झालेल्या धारणा, धर्मप्रणाली, श्रद्धा, सामाजिक-राजकीय आणि तत्त्वज्ञानाधिष्ठित चळवळी, त्यांचे संघटन, विविध काळात विविध समूहांच्या संदर्भाने निर्माण झालेल्या व केल्या गेलेल्या स्मृती आणि त्यांचे बदलते स्वरूप या विषयांवर एक चर्चा घडवून आणण्याचा प्रयत्न ‘संचिताचे प्रवाह’ या सदरातून आपण करणार आहोत.

इतिहास, संस्कृती आणि त्याविषयीच्या अस्मिता केवळ भारतातच नव्हे, तर सबंध जगभरातच पुन्हा एकदा समाजजीवनाच्या केंद्रस्थानी येत असल्याचे आपण पाहतो आहोत. इतिहासाच्या पानापानांवर लिहिली गेलेली सामूहिक स्थलांतरांची वर्णने, वेगवेगळ्या समूहांतील संघर्ष, विशिष्ट भूभागांमधील अंतर्गत सामूहिक संघर्ष, वैचारिक, राजकीय आणि तत्त्वज्ञानाधिष्ठित चर्चाविश्वाला मिळणारी अत्याग्रहाची वाढत जाणारी धार व त्यातून होणारे संघर्ष आजचा आपला समाज पुन्हा नव्याने अनुभवू लागला आहे. या अत्याग्रहातून वाढू पाहणारी किंवा वाढीस लागलेली असहिष्णुता, व्यक्तिद्वेष आणि समूहद्वेष तर घरबसल्या समाजमाध्यमांवरील रोजच्या गप्पाटप्पा आणि खुसखुशीत चर्चातून डोके वर काढून डोळे विस्फारत खुणावतो आहे. इतिहासाची किमान आवड असलेल्या व दुय्यम-तिय्यम साधने किंवा कादंबऱ्यांतून ऐतिहासिक घटनाक्रमांकडे पाहणाऱ्या वाचकांनादेखील वर नमूद केलेल्या गोष्टी कळत-नकळत जाणवत असतात.

या सगळ्या पृष्ठभूमीवर आजच्या चष्म्यातून इतिहासाकडे पाहतानाची दृष्टी, ऐतिहासिक घटनांकडे आणि तपशिलाकडे पाहण्याचे निकष, त्यासंदर्भात निर्माण होणारी विविध संभाषिते (rhetorics) आणि सांस्कृतिक अन्वयार्थाचे विविध प्रवाह यांचा आपण या लेखमालेद्वारे ऊहापोह करणार आहोत. हे करत असताना आपल्याला दक्षिण आशियायी भूभागाचे भौगोलिक वेगळेपण, प्राचीन-मध्ययुगीन काळातील स्थित्यंतरे, वसाहतपूर्व कालखंड, वसाहतकाळात दृढमूल झालेला राष्ट्रवाद, स्वातंत्र्यासोबत झालेलं उपखंडाचं विभाजन, त्याचे उपखंडातील राजकारण, धर्मकारण आणि संस्कृतीकारण या तिन्ही प्रतलांवर झालेले दूरगामी परिणाम असे अनेकविध घटक आणि तद्नुषंगिक सिद्धांतांच्या चौकटीचे भान ठेवावे लागणार आहे. प्राचीन-मध्ययुगीन संस्कृतिकारणाचा आजच्या संदर्भात विचार करताना आपल्याकडच्या इतिहास लेखकांनी व विचारकांनी ब्रिटिशकालीन व स्वातंत्र्योत्तर काळात आधुनिकतेशी परिचय झाल्यावर घडवून आणलेली आमूलाग्र स्थित्यंतरे, राष्ट्रवादाचा उदय, त्यामागचे सामाजिक संदर्भ विचारात घ्यायचे आहेत. दुसरीकडे सामाजिक सुधारणांच्या चळवळीतून आज आपल्यापर्यंत आलेल्या सुधारणावादी धारणा आणि त्याविषयी निर्माण झालेले मत-मतांतरांचे राजकारणदेखील आज विचारात घ्यावे लागणार आहे. साधारणत: विद्यमान भारतीय वैचारिक विश्वाच्या मुख्य प्रवाहाची धुरा रूढार्थाने पुरोगामी, समाजवादी, लिबरल वगैरे लेबलांनी ओळखल्या जाणाऱ्या किंवा तसे म्हणवून घेणाऱ्या वर्गाकडे असल्याचं म्हटलं जातं. गेल्या काही दशकांपासून डावे-उजवे किंवा सेक्युलर-कम्युनल वगैरे वादांनी आपल्याकडे जी वळणे घेतली आहेत आणि त्यातून राजकारण-समाजकारणाला ज्या प्रकारची दिशा मिळते आहे ते पाहता या तथाकथित ‘पुरोगामी’ आणि ‘प्रतिगामी’ चौकटींचादेखील नव्याने विचार केला गेला पाहिजे असं दिसतं.

इतिहास आणि संस्कृतीविषयीच्या आजच्या अस्मितांच्या लढाया व राजकारणाचा विचार करताना प्राचीन आणि मध्ययुगीन साहित्य, धर्मपरंपरा आणि आचार याविषयीच्या अर्थनिर्णयनाचा आणि चिकित्साजनित बंडखोर परंपरांचा विचार करणे अनिवार्य आहे. आणि अर्थातच या चिकित्सेला व बंडखोरीला परंपरानिष्ठ समाजाकडून कशा प्रकारचे प्रत्युत्तर दिले गेले, हेदेखील तपासले गेले पाहिजे. भारतीय आधुनिक पद्धतीच्या इंग्रजी शिक्षणपद्धतीमध्ये शिकलेल्या पहिल्या काही पिढय़ांतील अभ्यासक-विचारकांनी भारतीय समाजातील समस्या, विविध प्रकारच्या गुंतागुंती व समाजाविषयीच्या त्यांच्या धारणा यांकडे बुद्धिप्रामाण्यवादी दृष्टीने पाहून त्याची कठोर चिकित्सा आरंभिली. एकीकडे आधुनिक मूल्यव्यवस्थेचा व शिक्षणव्यवस्थेचा होणारा परिणाम पेलताना परंपरानिष्ठ समाजातून त्यावर प्रतिक्रियात्मक मांडणीदेखील काही प्रमाणात होऊ लागली. तर दुसरीकडे बंगालच्या व महाराष्ट्रातल्या वैचारिक प्रबोधनपर चळवळीत परंपरा आणि आधुनिकता यांचा समन्वय साधणाऱ्या काही चळवळी व वैचारिक प्रवाह निर्माण झाले. वर म्हटल्याप्रमाणे, अभ्यासाची परंपरा व वैचारिक व्यूह आज पुरोगामी-सेक्युलर म्हणवून घेणाऱ्या वर्गाच्या हातात आहे, तर गेल्या काही वर्षांत उजव्या व प्रतिगामी समजल्या जाणाऱ्या पक्षांच्या हातात राजकीय सत्ता आली आहे. यातून गेल्या तीन-साडेतीन वर्षांत वाढीला लागलेला हा संघर्ष कर्कश्श, एकसुरी आणि शत्रुलक्ष्यी होऊ  लागला आहे. बुद्धिप्रामाण्य आणि वर्गव्यवस्थेला विरोध करणाऱ्या वर्गाकडून मांडली जाणारी संभाषिते ही उजव्या म्हटल्या जाणाऱ्या वर्गात आणि वैचारिक विश्वात राष्ट्रद्रोही वगैरे समजली जाते आहे. तर उजव्या पक्षाकडून घेतल्या जाणाऱ्या आक्षेपांना, त्यांच्या सामूहिक संभाषितांना व कळत-नकळत त्यांची बाजू घेणाऱ्या घटकांना सरसकटपणे खलनायकी, कर्मठ, स्त्रीद्वेष्टे, मनुवादी वगैरे संबोधिले जाते आहे.

अशावेळी उजव्या बाजूकडील रूढ धारणा, त्यांचा धर्म-परंपरेविषयीचा आणि इतिहासाविषयीचा विचारव्यूह नेमका कसा तयार झाला आहे, डाव्या विचारसरणीला अनुसरणाऱ्या गटांच्या धर्म-परंपरा व इतिहासाविषयीचे रूढ समज आणि त्यांचे विचारव्यूह कसे तयार होत गेले याचा आढावा आपण इथे घेणार आहोत. साधारणत: हजार वर्षांत अनेक प्रवाहांचे अध्यारोपण झालेल्या आणि आज एकसंध मानल्या गेलेल्या परंपरेविषयीचा अत्याग्रह किंवा त्यातील कालबाह्य़ अथवा अप्रस्तुत विषयांचा हट्ट आजचा उजवा म्हणवला जाणारा राजकीय वर्ग करतो आहे का? करत असेल तर तो कसा करत आहे? त्या वर्गाच्या अस्मिता नेमक्या कशाच्या आधारावर उभ्या राहिल्या आहेत आणि तो आधार किती भक्कम आहे, याचे परिशीलन तर व्हायलाच हवे; पण त्याचवेळी पुरोगामी, डाव्या विचारसरणीच्या आजच्या विचारव्यूहाची अवस्था नेमकी काय आहे, त्या चळवळीच्या अध्वर्युनी पन्नास-शंभरहून अधिक वर्षांपूर्वी उभी केलेली प्रतीके, मांडणी आजच्या सामाजिक सुधारणांसाठी आणि प्रबोधनासाठी कितपत उपयुक्त व उचित आहेत, हा विचारदेखील आता व्हायला हवा. प्रागतिक चळवळींनी पाश्चात्त्य अकादमिक चौकटींचा अंगीकार करत परंपरांचे लावलेले अन्वयार्थ, या चळवळीतील नेत्यांची विविध प्रकारची मांडणी, त्यातील तथ्याधार व संभाषिते यांवर आज पुरोगामी चळवळीतून आणि प्रागतिक विचार करण्याचा दावा करणाऱ्या गटांतून कितपत व कशा प्रकारे चर्चा होते आहे, त्या चर्चेतून पूर्वसूरींच्या मांडणीची चिकित्सा होत असल्यास कशी होते, हे पाहणे औचित्याचे ठरेल. परंपरेला पूर्णत: नाकारून त्याज्य ठरवणे आणि परंपरेतील वैविध्य आणि बहुस्तरीय संरचना नाकारून तिला विशिष्ट धर्माधारित दृष्टीने तिचा अन्वयार्थ लावू पाहणे, या दोन्ही पद्धतींवर आपण या लेखमालेतून भाष्य करणार आहोत.

अर्थात, हे सारे तपशील आपल्याला ज्या संदर्भात पाहायचे आहेत ती चौकट ही संस्कृत-प्राकृत-पाली आणि मध्ययुगीन बोलीभाषांतील साहित्याची असणार आहे. किंवा त्या ऐतिहासिक साहित्य-धर्म-तत्त्वज्ञान-संस्कृतीपर ग्रंथांच्या पारंपरिक आणि आधुनिक अन्वयार्थाच्या प्रवाहांची, त्यातून रूढ होणाऱ्या धारणांची व सामूहिक स्मृतींची चिकित्सा करतच आपल्याला आधुनिक व उत्तराधुनिक काळातील समाजकारणाकडे पाहायचे आहे. या मोठय़ा पटाकडे पाहताना या पूर्ण वर्षांत आपण ऋग्वेदादी वैदिक संहिता, कर्मकांडप्रधान ब्राह्मणग्रंथ, आरण्यके, उपनिषदे, बौद्ध-जैन परंपरांतील प्रारंभिक प्रवाह, षड्दर्शने, स्मृती-सूत्रसाहित्य, धर्मशास्त्रांतर्गत स्मृती-सूत्र साहित्य, आर्षमहाकाव्ये, पुराणे, ऐतिहासिक भूगोल (Historical geography), धार्मिक भूगोल (sacred geography), मध्ययुगीन तत्त्वज्ञान-धर्मप्रवाह, मध्यपूर्वेतून झालेला इस्लामी शासकांचा प्रवेश, भक्ती संप्रदाय, वैदिक-पुनरुज्जीवनवादी चळवळी, उत्तर-मध्ययुगातील शिवकाळ-पेशवाई-टिपू वगैरे राजसत्ता आणि वर चर्चा केली त्याप्रमाणे वसाहतवादी व वसाहतोत्तरकालीन इतिहास असा विस्तृत पट पाहायचा आहे. त्या- त्या विषयाच्या अनुषंगाने प्राचीन ते अर्वाचीन अशा काळातील वैचारिक प्रवाहांचा विचार करताना चर्चाविषयांची मांडणी कालानुक्रमानुसार केली जाणे सोयीचे नसल्याने कालानुक्रम लक्षात घेऊन संबंधित घटनांच्या काळाचे भान निश्चितच ठेवले जाईल.

एवढय़ा विस्तृत पटाकडे पाहत आधुनिक काळातील परंपराविषयक वाद-चर्चाची (Debates) चिकित्सा करणे हे अत्यंत कठीण काम असले तरी कालिदासाने रघुवंशाच्या प्रारंभी म्हटल्याप्रमाणे- ‘क्व सूर्यप्रभवो वंश: क्वचाल्पविषयामति:। तितीर्षुर्दुस्तरं मोहादुडुपेनास्मि सागरम्।’ (कुठे तो सूर्यापासून निर्माण झालेला महान राजवंश व कुठे मी मंदमती! तरीही छोटय़ाशा तराफ्यावर बसून मी महासागर ओलांडू इच्छितो.) हे भान मला आहे असे मी विनम्रपणे येथे नमूद करतो. या लेखमालेचा विषय हा आजच्या राजकीय-सांस्कृतिकदृष्टय़ा आत्यंतिक भावनिक आणि काहीशा स्फोटक झालेल्या समाजात मांडणे अतिशय जिकिरीचे काम आहे. त्यामुळे मराठी समाजातील विविध राजकीय आणि वैचारिक प्रवाहांत वावरणाऱ्या अभिरुचीसंपन्न, व्यासंगी व तितकाच चिकित्सक असा वाचकवर्ग आजही मूल्यभान आणि वाद-चर्चाच्या समृद्ध वारशाविषयी संवेदनशील आहे, या विश्वासाच्या जोरावर या लेखमालेचा शुभारंभ करीत आहे.

हेमंत प्रकाश राजोपाध्ये

rajopadhyehemant@gmail.com

(लेखक जर्मनीतील ग्योटिंगेन विद्यापीठात पीएच. डी. संशोधक असून, ऑब्झव्‍‌र्हर रीसर्च फाऊंडेशन, मुंबई येथे वरिष्ठ संशोधक म्हणून कार्यरत आहेत.)

First Published on January 14, 2018 2:28 am

Web Title: metamodernism and postmillennialism