भारताच्या इतिहास आणि संस्कृतीविषयी वस्तुनिष्ठ मांडणी करताना सुरुवातीला ‘भारत म्हणजे काय?’ किंवा ‘भारतीय असणे म्हणजे काय?’ असे प्रश्न विचारात घ्यावे लागतात. या लेखमालेच्या विषयप्रवेशानिमित्त मागील लेखात आपण ‘भारत’ आणि ‘भारतवर्ष’ या कल्पनांवरील चर्चेस प्रारंभ केला तो त्याच दृष्टीने. त्या लेखात सध्याच्या राजकीय सीमांद्वारे निश्चित झालेला भारतीय गणराज्याच्या अंतर्गत येणारा भाग आणि प्राचीनकाळापासून असलेल्या भारतवर्षांच्या व्याप्तीविषयीच्या विविध धारणा यांच्यातला फरक आपण थोडक्यात समजावून घेतला. ‘भारतवर्षां’विषयीच्या त्या धारणा किंवा     व्याख्या त्या काळातील लोकांच्या भौगोलिक व सांस्कृतिक आकलनाला अनुसरून बनवल्या गेल्या होत्या. त्याची व्याप्ती कुठल्याही विशिष्ट, एकसाचेबद्ध अशा ठरावीक भौगोलिक प्रदेशापुरती निश्चित नव्हती, हेदेखील आपण पाहिले. थोडक्यात, जंबूद्वीप किंवा भारतवर्ष या कल्पना बौद्ध साहित्य किंवा पुराणांच्या काळातील लोकांना व त्या ग्रंथांच्या रचयित्यांना ज्ञात असलेल्या जगाच्या रचनेविषयीच्या (cosmography) आणि सांस्कृतिक अस्तित्वाच्या मर्यादित आकलनातून निर्माण झालेल्या काहीशा सैलसर (मुक्त?) कल्पना होत्या.

मनुस्मृती वगैरे स्मृतीग्रंथांतून या विवक्षित भूभागाच्या सांस्कृतिक धारणांविषयीच्या जाणिवांना श्रद्धा-कर्मकांडकेंद्री व्यवस्थेची एक किनार असल्याचेही ठळकपणे जाणवते. मनुस्मृतीच्या दुसऱ्या अध्यायात म्हटल्याप्रमाणे –

‘कृष्णसारस्तु चरति मृगो यत्र स्वभावत:।

स ज्ञेयो यज्ञियो देशो म्लेच्छदेशस्त्वत: पर: ।।’

(कृष्णसार नामक मृग जेथे स्वभावत: / आपणहून विचरण करतो तो देश यज्ञीय (वैदिक धर्म-कर्मासाठी अनुकूल व योग्य) देश असून त्याच्या पुढचा देश हा म्लेच्छदेश आहे.)

या एका व्याख्येतून चातुर्वण्र्य-वैदिक व्यवस्था मानणाऱ्या ‘आर्य’/ शिष्ट लोकांना राहण्यास अनुकूल प्रदेश कोणता हे सांगितले असले, तरी ‘कृष्णसाराच्या संचाराची भूमी नर्मदेच्या खालील उपखंडाच्या भागात होती अगर नव्हती’. किंवा ‘त्या मृगाचा संचार नसलेला देश म्हणजे कोणता प्रदेश’ यांविषयीची माहिती मनुस्मृती देत नाही. मात्र मनूने दिलेल्या या व्याख्येमध्ये ‘कृष्णसार’ मृगाचा संचार नसलेल्या भूप्रदेशाचा ‘म्लेच्छदेश’ म्हणून आलेला संदर्भ आपल्या या लेखमालेतील पुढच्या टप्प्याच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे.

‘म्लेच्छ’ हा शब्द आजच्या काळातल्या ऐतिहासिक धारणा व स्मृतींनुसार मध्ययुगातील मुस्लीम राज्यकर्त्यांना अनुसरून वापरला गेल्याचे दिसते. त्या शब्दातून अभिव्यक्त होणाऱ्या भावातून एक प्रकारचा ‘इतरे’पणा (otherness) तर व्यक्त होतोच, पण सोबतच त्या शब्दात स्वत:ला ‘भद्र’, ‘अभिजन’ समजणाऱ्या समाजाला अभिप्रेत असलेल्या पावित्र्याच्या चौकटीत न बसणाऱ्या धारणाही अभिप्रेत असल्याचे दिसते. मात्र, आपल्याला चर्चेचा रोख न्यायचा आहे तो प्राचीन, मध्ययुगीन आणि अर्वाचीन काळातील ‘स्वकीय’ आणि ‘परकीय’ किंवा ‘आपला-परका’ (Us and them) याविषयीच्या बदलत जाणाऱ्या धारणांच्या शोधाच्या दिशेने. मनूने वापरलेला ‘म्लेच्छ’ हा शब्द सांस्कृतिक इतरेपणाच्या (Cultural otherness) जाणिवेतून लिहिलेला आहे हे तर त्या श्लोकातून स्पष्ट जाणवतंच. ही इतरेपणाची भावना आणि त्यातून निर्माण झालेले भेद तपासणे आजच्या आधुनिकोत्तर म्हणवल्या जाणाऱ्या काळातील समूहाधिष्ठित कल्पनांतून आकार घेणाऱ्या समाजकारण व राजकारणाच्या आकलनाच्या दृष्टीने महत्त्वाची बाब ठरते. मनूने वापरलेल्या ‘म्लेच्छदेश’ या शब्दाची उकल ‘म्लेच्छांचा देश’ किंवा ‘म्लेच्छ लोक राहत असलेला देश’ अशी होते, हे आपल्याला अगदी सहज लक्षात येते. थोडक्यात, मनू ज्या सांस्कृतिक व श्रद्धा विश्वाचे प्रतिनिधित्व करतो त्या विश्वाच्या दृष्टीने असलेले ‘सांस्कृतिक इतरेजन’ (cultural others) हे ‘म्लेच्छ’ या शब्दाने मनूने संबोधित केले आहेत. भारतीय उपखंडातील लोकांच्या आप-परभावाविषयीच्या ऐतिहासिक ‘धारणांचे धागे’ तपासताना आपण सुरुवात या ‘म्लेच्छ’ शब्दाच्या उकलेतून करायची आहे.

इ. स. पूर्व सातव्या-आठव्या शतकात रचल्या गेलेल्या ‘शतपथब्राह्मण’ या शुक्ल यजुर्वेदाशी संबद्ध असलेल्या ब्राह्मणात (वेदांचे कर्मकांडपर विवेचन करणाऱ्या ग्रंथांना ब्राह्मणग्रंथ असे संबोधिले जाते.) तिसऱ्या अध्यायात ‘म्लेच्छ’ या शब्दाचा अर्थासहित उल्लेख सर्वप्रथम सापडतो. त्याचा साधारण गोषवारा असा :

‘पूर्वी प्रजापतीपासून देव आणि असुर दोघेही निर्माण झाले. ते आपल्या पित्याकडून दाय (पैतृक संपत्ती) मिळवते झाले. पैकी देवांना यज्ञ आणि असुरांना वाणी मिळाली. प्रजापतीपासून वाणी न मिळाल्याने काहीसे खट्टू झालेल्या देवांनी असुरांकडून वाणी हिसकावण्याचे प्रयत्न सुरूकेले. तेव्हा असुरांनी ‘हेलव: हेलव:’ असे अनाकलनीय निर्थक शब्द उच्चारले. असे निर्थक- अशास्त्रीय काहीतरी बरळल्यामुळेच ते असुर त्या संघर्षांत पराभूत झाले.’

पाणिनीय व्याकरणावर भाष्य करणाऱ्या पतंजली मुनींच्या ‘महाभाष्य’ या ग्रंथात (इ. स. पूर्व दुसरे शतक) व्याकरणशुद्ध भाषेचे महत्त्व विशद करताना अशीच एक दृष्टांतवजा कथा पतंजलींनी दिलेली आहे. तिचा साधारण आशय वर ‘शतपथब्राह्मणा’तल्या कथासाराशी साधर्म्य दाखवतो व शेवटी, ‘तस्मात् ब्राह्मणेन न म्लेच्छितवै न अपभाषितवै।’ (असुर ‘हेलय हेलय’ या अशास्त्रीय-निर्थक उद्गारांमुळे पराभूत झाले. यापासून बोध घेऊन यागादी कर्म करणाऱ्या ब्राह्मणाने म्लेच्छ भाषा-अशास्त्रीय भाषा कदापि वापरू नये.) असा संकेतपर उपदेश दिला आहे.

‘म्लेच्छ’ या शब्दाचे प्राचीनतम संदर्भ पाहता आपल्या लक्षात येईल, की ‘म्लेच्छ’ ही आज सांस्कृतिक इतरेपण दर्शविणारी संज्ञा मुळात वेद-व्याकरणादि शास्त्रे प्रमाण मानणाऱ्या समूहाच्या दृष्टीने अशुद्ध-अशास्त्रीय प्रकारची भाषा बोलणाऱ्या समूहांना उद्देशून वापरली गेली आहे. पैकी व्याकरण हे शास्त्र वेदपरंपरेबाहेरील बौद्ध-जैनादी मंडळींतही प्रमाण मानले जात असे, हे पाणिनीय व्याकरणपरंपरेला व शैलीला प्रमाण मानणाऱ्या पाली आणि प्राकृत भाषांतील व्याकरणपर ग्रंथांवरून लक्षात येईल. ऋग्वेदातील काही सूक्तांत वरील देव-असुर या वर्गवारीला अनुसरूनच ‘जे देव नाहीत आणि ज्यांना देव नाहीत अशा असुरांना’ मारण्यासाठी इंद्राला आवाहन केलेले आहे. ‘शतपथब्राह्मणा’हून ऋग्वेदाचा काल प्राचीन असल्यामुळे इथे ‘असुर’ हा शब्द वेगळ्या अर्थाने वापरलेला दिसतो. मात्र इथे असुरांना म्लेच्छ वगैरे विशेषणे वापरल्याचे दिसत नसले. किंवा त्यांना उद्देशून हीनत्वदर्शक शब्दप्रयोग दिसत नसले तरीही त्यांच्याविषयीची इतरेपणाची भावना मात्र स्पष्ट दिसून येते. परंतु ऋग्वेदातच ‘असुर’ हा शब्द ‘द्यौ’ (आकाश-देवता), ‘इंद्र’, ‘वरुण’ या देवतांना उद्देशून वापरलेला दिसून येतो. ‘असु’ या शब्दाचा शब्दकोशातला अर्थ आहे- प्राण. जो प्राण देतो तो असुर. अर्थात अतिमानवीय गुणांनी युक्त असलेला देवतागण. असुर शब्दाचा नकारार्थी, खलत्वनिदर्शक उल्लेख ऋग्वेदात चार-पाच  ठिकाणीच येतो. अथर्ववेदात मात्र असुरांचा ‘सपत्न’ अर्थात शत्रू असा उल्लेख अधिक ठळकपणे येतो. देवांनी दस्यूंना घोर अंधारात ज्याप्रमाणे लोटून दिले त्याप्रमाणे असुरांनाही देवाने लोटून द्यावे, अशी प्रार्थना केली आहे. या ठिकाणी असुर आणि दस्यू यांची तुलना सूक्तकारांनी केल्याचे ठळक दिसून येते. वैदिक मंत्रकर्त्यां ऋषिसमाजाला ज्यांच्याविषयी असुरक्षिततेची भावना वाटत होती त्यांना ‘दस्यू’ म्हटल्याचे ऋग्वेदात दिसून येते. मायकेल वित्झेल किंवा अस्को पार्पोला या आधुनिक पाश्चात्त्य विद्वानांच्या मते, ‘दस्यू’/‘दास’ हे संबोधन अनुक्रमे उत्तर-इराण आणि मध्य-आशियातील एखाद्या मानवसमूहाला उद्देशून वापरले आहे. डॉ. आंबेडकरांनी त्यांच्या ‘व्हू वेअर द शूद्राज्?’ या ग्रंथात (वैदिक-संस्कृत ‘स’ आणि पर्शियन ‘ह’ यांचे वैकल्पिकत्व लक्षात घेऊन) ‘दास’ शब्दाचा संबंध पारशी धर्मग्रंथ ‘झेंद-अवेस्ता’मध्ये उल्लेखिलेल्या ‘अझि/अहि-दाहक’ या पारशी मिथकविश्वातील दैत्य-कल्पनेशी जोडून त्यांना ‘दास’ या समूहाशी जोडता येऊ  शकते अशी शक्यता ऋग्वेदातील काही दाखल्यांनुसार प्रमाण मानली आहे.

तेव्हा प्राचीन भारतीय उपखंडातील इतरेजनत्वाची धारणा ही ‘देव-असुर’ या द्वैताशी निबद्ध असल्याचे दिसते. अर्थात, हे सूक्तकर्त्यां ऋषिसमाजाशी जोडले गेलेले समूह हेच देवतांचे उपासक होते, त्यामुळे त्या श्रद्धा-सांस्कृतिक व्यूहातील बाहेरच्या लोकांना त्यांनी असुर-दस्यू अशा संबोधनांनी उल्लेखून त्यांच्याविषयीही परकेपणाची भावना व्यक्त केली आहे. असुर शब्दाचा मूळ अर्थ प्राण संकल्पनेतून वरुणादिक देवांशी जोडला गेला असला तरी ऋग्वेद-अथर्ववेदातच त्या शब्दाला खलत्वनिदर्शक परिमाणे लागल्याचे दिसून येते. पुराणांमध्ये मात्र असुर ही संज्ञा सरसकट राक्षस, दैत्य वगैरे कल्पनांसाठीच वापरली गेल्याचे आपण सारे जाणतो.

आपल्या संस्कृतीहून वेगळी, अपरिचित अशी जीवनशैली अनुसरणाऱ्या समूहांना मागास, रानटी, अप्रगत वगैरे तुच्छतानिदर्शक विशेषणांनी संबोधायची प्रथा मध्ययुगीन आणि आधुनिक काळातदेखील प्रचलित असली तरीही त्या संबोधनांचे किंवा संज्ञांचे अर्थ आणि सामाजिक संदर्भ बदलत जातात. मानवी सहअस्तित्व हे मानवी जैवसंस्थेचे मूळ असल्याने या जनसमूहांमध्ये वैवाहिक-सांस्कृतिक संबंध जोडले जातात. त्यातून बहुपेडी मिश्रसंस्कृतींचा उदय होत या मिश्रतेची जटिलतादेखील तितकीच गुंतागुंतीची होत जाते. या समूहमिश्रणाच्या प्रक्रियेला अनेकदा अभिजनवादी समूहांकडून विरोध होतो. त्यातून अस्मितेची राजकारणे केली जातात. महामहोपाध्याय पां. वा. काणे यांनी त्यांच्या ‘धर्मशास्त्राचा इतिहास’ या ग्रंथात सुरुवातीलाच वैदिक-प्रमाण अभिजन संस्कृतीकडून अशा मिश्र-समाजनिर्मिती / संकराविषयीची प्रतिकूल मते व त्यानुसार केलेली मांडणी यावर भाष्य केले आहे. प्राचीन भारतात वैदिक-ब्राह्मणी परंपरांसमोर उभी ठाकलेली या धर्म-राजकारणाची प्रतिक्रियात्मक अभिव्यक्तीदेखील वैदिक समाजव्यूहाला अभिप्रेत असलेल्या एकसाचेबद्ध (monolithic) कल्पनांच्या चौकटींचा आणि आप-परभावात्मक द्वैताचा अंगीकार करताना दिसते. प्रा. ब्रजदुलाल चट्टोपाध्याय आणि प्रा. उपिंदर सिंह यांच्या लेखनातून त्या विषयीचे विवेचन दिसते.

आधीचा लेख व या लेखात आपण पाहिल्याप्रमाणे ‘भारतवर्ष’ ही कल्पना विशिष्ट भूभागातील छोटी राज्ये व जनपदांच्या समूहाला उद्देशून वापरली गेली आहे. नर्मदेच्या वरील विस्तृत भूभागातील या जनपदांच्या विभिन्न सांस्कृतिक धारणा व आयडेंटिटीज् (या बहुधा ग्रीकांचे आक्रमण होईपर्यंत) परस्परांशी काही विशिष्ट साधर्म्य दाखवणाऱ्या, पण आपले स्वतंत्र अस्तित्व जपणाऱ्या होत्या. मात्र त्यांना आज ज्या अर्थी आपण ‘परकीय’ हा शब्द वापरतो तशा अर्थी त्यांकडे पाहिले गेले का, हा मुद्दा उरतोच. उपखंडाच्या आसपासच्या प्रदेशांतून भारतवर्षांत प्रवेश करणाऱ्या जनसमूहांच्या व लोकरीतींच्या समावेशनाची प्रक्रिया काहीशा सैलसर अशा सामाजिक अभिसरणाद्वारे झाली. प्रा. चट्टोपाध्याय म्हणतात त्यानुसार, भारतातील श्रद्धाविषयक धारणा बहुपेडी आणि बहुसामूहिक प्रतलातून निर्माण झाल्या. सामाजिक गतिमानतेच्या प्रवाहांत या धारणा व श्रद्धाविषयक कल्पनांविषयीच्या विविधतेच्या जाणिवा या एकमेकांमध्ये गुंतल्या जाऊन त्यांचे सहअस्तित्व टिकवले गेले. राजाश्रयाद्वारे धर्मश्रद्धांचा वरचष्मा टिकवण्याचा प्रयत्न अर्थातच सर्व प्रमुख श्रद्धासमूहांतून नेहमीच होत राहिला. पण दीर्घकाळ एकछत्री अंमल न राहिल्याने आणि सत्ताधीशांच्या पिढय़ांमध्ये धर्मश्रद्धांच्या अंगीकारासंबंधी दिसून येणाऱ्या परिवर्तनशीलत्वामुळे इथली विविधता कायम टिकून राहिली असावी.

पुढील काही लेखांमध्ये आपण प्राचीन व  मध्ययुगीन काळातील याविषयीच्या द्वैतासंबंधीचे काही तपशील घेऊन त्यावर थोडक्यात विवेचन करणार आहोत. तसेच याच मुद्दय़ाला केंद्रस्थानी ठेवत आधुनिक काळात जुन्या मिथकांच्या, आख्यायिकांच्या आणि पुराणकथांच्या संदर्भाना आधुनिक समाजातील घटनांशी जोडून त्यातून ‘आपला आणि परका’ ही मांडणी वैचारिक-सैद्धांतिक स्तरावर कशी केली गेली, याविषयीची चर्चा जातीय संघटना आणि प्रागतिक चळवळी-आंदोलनांच्या विकसनाच्या पृष्ठभूमीवर करणार आहोत.

संस्कृत साहित्यातला-

‘अयं निज: परो वेति गणना लघुचेतसाम्।

उदारचरितानां तु वसुधैव कुटुम्बकम्।।’

(हा माझा, हा परका असा भेद क्षुद्रमनोवृत्तीचे लोक करतात. उदारमनस्क लोकांसाठी मात्र ही पृथ्वी हे एक कुटुंबच असते.)

हा श्लोक प्रसिद्ध आहे. असे उदार विचार आणि समावेशक मूल्ये ही नेहमी तत्त्वज्ञानाच्या पातळीवर उद्धृत केली जातात. असे विचार वैयक्तिक-सामूहिक राजकीय आकांक्षा व भवतालाविषयीच्या सापेक्ष आकलनामुळे अंगी बाणवणे समाजाला किंवा वैयक्तिक पातळीवर कितपत साध्य होते, हा एक चर्चेचाच विषय आहे. मूल्ये ही सामाजिक किंवा राजकीय व्यवस्थेतील नियमाच्या पातळीला जाऊन पोहोचत नाहीत. त्यामुळे भारतीय इतिहासातील आणि वर्तमानातील सहअस्तित्वाचे गुणात्मक मूल्यांकन आणि समीक्षा हा एका दीर्घ चर्चेचा किंवा स्वतंत्र लेखमालेसाठीचा विषयच असल्याने तूर्तास इथे थांबू या.

– हेमंत प्रकाश राजोपाध्ये

rajopadhyehemant@gmail.com