News Flash

समाज-धारणांच्या गाभ्याकडे

तत्कालीन समाजाला अभिप्रेत असलेल्या संकल्पनांचा मागोवा घेत हा विस्तृत पट उलगडणार आहोत.

|| हेमंत प्रकाश राजोपाध्ये

धर्म या संकल्पनेच्या मुळाशी जाताना आपण वेदकाळात जाऊन तत्कालीन समाजाचे नियमन करणाऱ्या चौकटींचा अथवा जीवसृष्टीच्या निर्मितीविषयी, हे जग चालण्यासाठी आवश्यक मानल्या गेलेल्या निसर्गातील आणि मानवी समूहांतील विशिष्ट व्यवस्थांचा आणि धारणांचा विचार आपण करतो आहोत. धर्माच्या आणि त्याला आधारभूत होणाऱ्या सृष्टीतील नसíगक घटना आणि मानवी यज्ञादिक कम्रे, इत्यादींविषयीच्या धारणांपासून ते धर्मशास्त्रातील, वैदिक-जैन-बौद्ध समाजातील आणि तत्त्वज्ञान प्रणालीतील विशिष्ट चौकटीचा आढावा घेत असताना आपण धर्म संकल्पनेच्या विविध अर्थच्छटा, बौद्ध तत्त्वज्ञानामध्ये दिसून येणारा ‘धम्म’ हा शब्द अशा काही प्रमुख कळीच्या शब्दांचा आणि संकल्पनांना हात घातला आहे. भारतीय उपखंडामधील इतिहासाच्या इतिहासाचा महाकाय पट पाहाताना त्या पडद्याला घट्ट करणाऱ्या तपशिलाच्या आणि धारणांच्या धाग्यांच्या गाठी आपण आजच्या काळात उलगडतो आहोत, हे भान ठेवणं गरजेचं आहे. या इतिहासपटाच्या दर्शनी बाजूला असलेल्या धाग्यांची वीण जसजशी समजून घेत जाऊ; तसंतसं आतल्या अनेक गाठींची उकल कशी आहे हे आपल्याला थोडंफार लक्षात येऊ शकेल. धर्म, धम्म या कल्पनांच्या प्राचीन अर्थाना  मागे सारून आजच्या श्रद्धाविश्वाला अभिप्रेत असलेला श्रद्धाव्यवस्थापर अर्थ आज धर्म या संकल्पनेचे केंद्र बनला आहे. आधुनिक पाश्चात्त्य धारणांमधील रिलिजन ही व्यवस्था आपण प्राचीन आणि आधुनिकपूर्व एतद्देशीय कल्पनांच्या चौकटीत कशी बसली याचा विचार आपल्याला पुढे अधिक सविस्तर करायचा असला; तरीही आपण धर्म आणि देवश्रद्धा या कल्पनांची सरमिसळ होण्याची प्रक्रिया अफगाणिस्थानामध्ये असलेल्या ग्रीकबहुल भागातील अशोकाच्या शिलालेखात जवळजवळ दोन-अडीच हजार वर्षांपूर्वी बीजरूपाने रुजवली गेली होती, हे आपण गेल्या भागात संक्षेपात पाहिले. प्राचीन धारणांच्या धाग्यांनी बनलेल्या पटाची उकल आज करताना आधी त्या पटाच्या-पडद्याच्या वरच्या दर्शनी भागाची- जो तुलनेने अगदीच अर्वाचीन, ताज्या धाग्यांनी आणि गाठींनी विणला आहे त्याची उकल करत आपल्याला आत जावं लागेल. आजच्या भारतीय समाजातील, अर्थात भारताच्या फाळणीनंतर उर्वरित जो भूभाग आज भारतीय गणराज्य म्हणून ओळखला जातो, त्या भूभागातील समाजांमध्ये गेल्या काही दशकांत रुजलेल्या दृढमूल झालेल्या किंवा केल्या गेलेल्या धारणा आणि आखल्या गेलेल्या चौकटी उलगडत आपण प्राचीन मंडळींनी मांडलेल्या, तत्कालीन समाजाला अभिप्रेत असलेल्या संकल्पनांचा मागोवा घेत हा विस्तृत पट उलगडणार आहोत.

इंग्रज आणि अन्य युरोपीय वसाहतकारांनी आपल्या देशात ठिकठिकाणी वसवलेल्या वसाहती आणि त्याद्वारे तिथे गाजवलेल्या सत्तेविषयी प्राथमिक माहिती आपल्या सर्वाना असतेच. ब्रिटिश, गोव्यातले पोर्तुगीज, दक्षिणी राज्यांमधल्या व अन्य प्रांतातल्या संकीर्ण-छोटय़ा फ्रेंच व डच वसाहती, इत्यादी युरोपीय शासनव्यवस्थांच्या जोखडातून आपण १५ऑगस्ट ४७ आणि नंतरच्या काही वर्षांत स्वतंत्र झालो. दीड शतकाहून अधिक काळ प्रत्यक्ष शासन व यापूर्वीची दोन-तीन शतके व्यापारी अधिसत्तेच्या माध्यमातून युरोपीय संस्कृतीची आपल्या समाजाला या वसाहतकारांनी आपल्या देशात राजकीय, सांस्कृतिक, आíथक चौकटींच्या रूढ व्याख्या बदलून टाकल्या, इथल्या गुंतागुंतीच्या सामाजिक वास्तवांना आणि राजकीय-सांस्कृतिक व्यवस्थांना एका विशिष्ट युरोपीय धारणांची चौकट घालून दिली. हे लक्षात घेतानाच आधुनिक काळातल्या पाश्चिमात्य वसाहतकारांनी ज्याप्रमाणे इथल्या सामाजिक-सांस्कृतिक विश्वाची घुसळण घडवून आणली, त्या प्रकारची घुसळण अशोकाच्या काळातल्या ग्रीक शासनकर्त्यांनी, इराण-इराक येथून आलेल्या शक, हुणांनीदेखील उपखंडामधील सांस्कृतिक-सामाजिक विश्वाला नवे आयाम दिले. त्याचा आढावा आपल्याला पुढे संबंधित विषयांचा मागोवा घेताना घ्यावा लागेलच. तूर्तास आपल्याला धर्म या शब्दाच्या आणि संकल्पनेच्या भोवती विणल्या गेलेल्या धारणांचा मागोवा घेण्यासाठी आधुनिक धारणांच्या परिप्रेक्ष्यातून काही चर्चा करायची आहे.

जवळजवळ सबंध उपखंड व्यापणाऱ्या आपल्या विशाल, महाकाय साम्राज्यात सम्राट अशोकाने लोककल्याणकारी योजना, विशिष्ट संदेश, राजकीय आज्ञांच्या घोषणांच्या अनुषंगाने अनेक शिलालेख कोरले. तिथेच भगवान बुद्धांच्या विश्वात्मक संदेशाचा प्रसार करण्याच्या उदात्त हेतूने त्याने स्तूपदेखील बांधले. श्रीलंका, मध्यआशिया, आग्नेय आशिया, इजिप्त, चीन वगरे प्रदेशांत अशोकाच्या काळात बौद्ध शिकवण आणि धम्माचा वारसा जाऊन पोहोचला. अशोकाला अभिप्रेत असलेल्या या धम्माच्या शिकवणीमध्ये भूतदया, धर्म-संप्रदायनिरपेक्ष अशी उदात्त मानवता, वन्यप्राणी विश्वाविषयी आस्था, इत्यादी अद्वितीय संकल्पनांचा परिपोष दिसतो. त्यामुळेच ब्रिटिश सत्तेच्या जोखडातून भारत स्वतंत्र झाल्यावर १९४७ च्या जुल महिन्यात संविधानसभेसमोर तत्कालीन राजकीय नेतृत्वाने भारताचा नवीन ध्वज सादर केल्यावर त्या ध्वजाविषयी राष्ट्रभावनांनी भारावलेली मतं मांडली गेली. सार्वभौम भारताच्या या ध्वजाचा अविभाज्य भाग असलेल्या चक्राविषयीच्या भावना आणि मतं व्यक्त करताना अनेकांनी त्या ध्वजातील सांकेतिकतेवर भाष्य केलं. त्या ध्वजातील चक्राविषयी भाष्य करताना त्या चक्राची संकल्पना, भगवान बुद्धांच्या आणि सम्राट अशोकाच्या धारणांतून अभिव्यक्त झालेल्या, सारनाथच्या सिंहस्तंभावरील चक्रापासून प्रेरित होऊन स्वीकारली असल्याचं भारताच्या पहिल्या पंतप्रधानांनी- पंडित नेहरूंनी स्पष्ट केलं. या कृतीतून आधुनिक भारताच्या संस्थापकांनी प्राचीन काळापासून जगाच्या विविध कोपऱ्यांत पोहोचलेला भगवान बुद्धांचा संदेश आणि त्या शांततेच्या संदेशाचा प्रसार करण्यासाठी देशोदेशीच्या राजांशी, संस्कृतींशी संबंध जोडणारा अशोक हा आधुनिक स्वतंत्र-सार्वभौम भारताच्या विश्वात्मक, बलशाली मात्र नीतिमत्तेवर आधारलेल्या प्रतिमेच्या  प्रमुख प्रेरणा म्हणून चिरस्थायी केल्या. पुढच्या काही महिन्यांतच सारनाथ येथील अशोकस्तंभावरील सिंहमुद्रा भारताची राजमुद्रा म्हणून घोषित करण्यात आली. या अशोकप्रणीत सिंहमुद्रेच्या खाली मुंडकोपनिषदामधल्या ‘सत्यमेव जयते’ हा मंत्र देवनागरी लिपीत कोरण्यात आला. भगवान बुद्धांच्या आणि अशोकाच्या परंपरेला त्या दोघांच्या तत्त्वज्ञानाच्या आधीच्या तत्त्वज्ञानपरंपरांचे अधिष्ठान देण्यात आले. आणि भारताच्या लोकसभेचे ब्रीदवाक्य ठेवले- ‘धर्मचक्रप्रवर्तनाय’ अर्थात, धर्माच्या-नीतिनियमांच्या संचालनासाठी! आपण आजवर आधीच्या लेखांतून आढावा घेतलेल्या धर्म-धम्म या संकल्पनेच्या विविध आयामांतून प्रतीत होणाऱ्या साऱ्या संकेतांचा आढावा घेतला. त्यावरून आपल्याला या राजमुद्रा आणि ध्वजाच्याद्वारे स्वतंत्र भारताच्या शिल्पकारांनी नव्या भारताच्या निर्मितीची उद्घोषणा करताना जगाला उद्देशून एक सांकेतिक विधान केलेलं आहे हे आपल्याला एव्हाना लक्षात आलं असेलच. या ध्वज आणि राजमुद्रेतून या मातीत रुजलेल्या धर्म-धम्म या संकल्पनेत अभिप्रेत असलेल्या लोकसंग्रह-लोककल्याण आणि समाजधारणा या मूल्यांवर बेतलेलं कल्याणकारी व बलशाली राष्ट्र निर्माण करण्याचा ठळक उद्देश आपल्या पूर्वजांनी स्पष्टपणे घोषित केला.

एखाद्या पारतंत्र्यामधल्या किंवा विशिष्ट सामाजिक-राजकीय सांस्कृतिक बंधनांनी जखडल्या गेलेल्या समाजाची अस्मिता जागवताना त्या समाजाला उपलब्ध इतिहासातील विशिष्ट सकारात्मक किंवा नकारात्मक घटना, घडामोडी आणि त्यांतून विकसित झालेल्या धारणांशी जोडून त्याआधारे संबंधित राजकीय, सांस्कृतिक अस्मिता समाजात रुजवल्या जातात. त्यातून समाजाला एकत्र आणून त्या समाजाला विशिष्ट राजकीय कार्यक्रम आणि उद्देश प्रदान करून समोर ठेवलेले राजकीय, सामाजिक अथवा सांस्कृतिक स्वातंत्र्य अथवा तत्सम उद्दिष्ट साध्य करण्यासाठी चळवळी आखल्या जातात. इंग्रजांच्या/पाश्चिमात्य सत्ताधीशांच्या आधिपत्याखाली असलेल्या भारतात स्वातंत्र्यपूर्व काळात किंवा अगदी त्याहीपूर्वी १८७० च्या दशकानंतर राजकीय संवेदना एका वेगळ्या, आधुनिक अंगानं विकसित होऊ लागली होती. आधुनिक परिप्रेक्ष्यात ज्याला आज राष्ट्रवाद म्हटले जाते तो विचार आपल्याकडे तोवर रुजायचा होता. मात्र, भारतवर्ष (पाहा : याच सदरातील ‘र्वष तद् भारतं नाम।’ हा लेख) म्हणून असलेल्या भारताच्या सांस्कृतिक, बौद्धिक, सामाजिक अस्मितांची बीजं शोधताना विविध प्रकारच्या अस्मिताजनक धारणा उपखंडामध्ये मूळ धरू लागल्या होत्या. त्यापकी बहुतांश सर्वच धारणांमध्ये सामाजिक सुधारणा, सहिष्णुता, हिंसा, अिहसा, मानवता आणि सांस्कृतिक ऐक्य -विविधता हे मुद्दे केंद्रस्थानी होते. त्यापकी महात्मा गांधीजींनी जैन, औपनिषदिक आणि गीतेतील विचारांची सांगड घालायचा प्रयत्न करत विशिष्ट संदर्भात आपले असे एक राजकीय तत्त्वज्ञान मांडायचा प्रयत्न केला. धर्म, यज्ञ, वैराग्य, अिहसा या मूल्यांना त्यांनी भगवद् गीतेच्या त्यांच्या आकलनाशी जोडले. पाश्चात्त्य तत्त्वज्ञानाचा व्यासंग असलेल्या गांधींनी पाश्चिमात्य धर्मविचारांनादेखील त्यांना अभिप्रेत असलेल्या धर्मविचाराशी जोडून, त्यांची सांगड घालून काही मांडणी केली. आधुनिक भांडवलशाहीवर बेतलेला, औद्योगिक क्रांतीनंतरचा विचार लोभ, स्वार्थ व शोषणावर बेतलेला असल्याचे त्यांनी मांडले. भगवद् गीतेतील शिकवणीवरून स्वातंत्र्यलढय़ाला धर्मयुद्धाचे स्थान देऊन सशस्त्र क्रांती करणारी क्रांतिकारकांची फळी एकीकडे असताना गांधींनी गीतेची शिकवण निष्काम कर्माच्या सिद्धांताच्या आधारावर थेट अिहसा, सत्य व  वैराग्यपर विचाराच्या चौकटीत बसवली. तर त्यांचे शिष्य असलेल्या नेहरूंनी आपल्या ‘भारताचा शोध’ (The discovery of India) या ग्रंथातून समन्वय, समावेशकता आणि त्यातून सतत प्रवाही राहणाऱ्या भारतीय संस्कृतीचं चित्र पुढे उभं केलं. घटनेचे शिल्पकार असलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या राजकीय-सामाजिक क्रांतीपर विचारांना ऐतिहासिक परंपरांचीच जोड दिली. भगवान बुद्धांच्या उदात्त, समावेशक शिकवणीचे अधिष्ठान देत बाबासाहेबांनी ‘बुद्ध व त्याचा धम्म’ या ग्रंथातून बुद्धाला बुद्धिप्रामाण्यवादी, क्रांतिकारक अशा चौकटींत नव्यानं जगासमोर आणलं आणि बुद्धांनी दिलेल्या सम्यक् अशा मार्गाला शोषित वंचितांच्या उद्धाराचा आणि त्यांना प्रतिष्ठा मिळवून देण्याचा महामार्ग बनवलं. उच्चवर्णीय समाजाच्या शोषणाने मलीन झालेल्या प्राचीन काळातदेखील शोषित-वंचित अशा पूर्वास्पृश्य समाजाने बौद्ध शिकवण निष्ठेने पाळली अशी मांडणी डॉ. आंबेडकरांनी केली. बुद्धप्रणीत मार्गात अिहसा महत्त्वाची असली तरी प्रसंगी बुद्धानेदेखील न्याय्य हक्कांसाठी हिंसेचे समर्थन केले असते, असं बाबासाहेब प्रतिपादित करतात.

वि. दा. सावरकर यांनी भारतीय इतिहासाकडे पाहाताना हिंदू प्रजेने आणि शासकांनी हिंसक परकीय आक्रमणे व अत्याचार याला केलेला ओजस्वी विरोध या भूमिकेला आपल्या मांडणीत केंद्रस्थान दिलं. तात्यारावांच्या मांडणीमध्ये आणि त्यांच्या या सोनेरी पानांमध्ये अिहसेचा पुरस्कार करणाऱ्या नेत्यांना, राजांना आणि तत्त्वज्ञांना स्थान दिलेले दिसत नाही. सावरकरांनी चंद्रगुप्त आणि त्याचा मंत्री चाणक्य यांना आक्रमक राज्यनिर्मितीसाठी गौरविलेले असले तरी त्यांच्या मते, अशोक आणि बौद्ध शिकवणीच्या अतिरेकातून भारताच्या राजकीय इतिहासाचे अपरिमित नुकसानच झाले.

या अशा विविध मांडणींसोबत लोकमान्य टिळकांचा कर्मसिद्धांत, योगी अरिवद यांची सांस्कृतिक राष्ट्रवाद-क्रांतिकार्य आणि भारतीय तत्त्वज्ञान यांची सांगड घालायचा प्रयत्न करणारी मांडणी, टागोरांची उपनिषदे, बुद्ध आणि पाश्चिमात्य अभिजात तत्त्वज्ञान यांच्या प्रभावातून साकारलेली मांडणी भारताच्या राष्ट्रीय चारित्र्याच्या, राष्ट्रीय संभाषिताच्या (national narrative) काही पलूंचे प्रतिनिधित्व करतात.

वर म्हटल्याप्रमाणे- भारताची, भारतातील विविध तत्त्वज्ञानप्रणालींची, त्यांची मांडणी करणाऱ्या तत्त्वज्ञ-सुधारकांची, अशोकासारख्या सम्राटांची, आधुनिक-मध्ययुगीन आणि प्राचीन सामाजिक चळवळीच्या नेत्यांची नेमकी भूमिका ही आज आपण जशी कल्पित करतो तशीच होती का, त्या भूमिकेचे नेमके स्वरूप कसे होते, त्या भूमिकेचे ऐतिहासिक स्थान, त्यामागची पूर्वसुरींची पृष्ठभूमी आणि या सर्वाचे आजच्या काळातील आपले आकलन-परसेप्शन या महत्त्वाच्या मुद्दय़ांचा विचार आपल्याला वैदिक-औपनिषदिक, बौद्ध, जैन संप्रदायांच्या-तत्त्वज्ञान प्रणालींच्या इतिहासात शोधून त्यांची यथार्थता पाहायची आहे. अर्थातच, सर्वात महत्त्वाचे म्हणजे हे करताना आपल्याला आजच्या आपल्या सामाजिक-सांस्कृतिक-ऐतिहासिक धारणांविषयी असलेली सहानुभूती आणि आस्था थोडी बाजूला ठेवावी लागणार आहे. वस्तुनिष्ठ पद्धतीने इतिहासाकडे पाहायचा प्रयत्न करताना आपल्या मनात रुजलेल्या धारणांना धक्का लागत असला तरी आपल्याला आदरणीय वाटणाऱ्या महनीय विभूतींच्या, राजकुलांच्या, नेत्यांच्या आणि विचारसरणीचा खरा विजय हा सार्वत्रिक कल्याणात आणि विविध विचारप्रणालींच्या सौहार्दपूर्ण सहअस्तित्वात आहे ही जाणीव आपल्या सर्वाना आहेच.

धारणांच्या धाग्यांनी युक्त असलेल्या या महाकाय पटाच्या सुरुवातीच्या काही गाठी उकलून आता आपण मुख्य गाभ्याकडे प्रवास सुरू करतो आहोत. धाग्यांच्या उकलीचा आणि आकलनाचा हा प्रवास आधुनिक धारणा आणि समजुतींचा वस्तुनिष्ठ रीतीने, उपलब्ध ऐतिहासिक तथ्यांच्या आधारे मागोवा आपल्याला सोबतच घेत करायचा आहे.

rajopadhyehemant@gmail.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 20, 2018 12:09 am

Web Title: political and cultural asmita
Next Stories
1 धर्म, धम्म आणि श्रद्धा
2 तानि धर्माणि प्रथमानि आसन्।
3 धर्मव्यवस्थांच्या गाभ्याकडे..
Just Now!
X