13 August 2020

News Flash

राजनीतिशास्त्र आणि समाजधारणा

मानवी समाजाची जडणघडण ही एक उत्क्रांत होत गेलेली संकल्पना आहे.

|| हेमंत प्रकाश राजोपाध्ये

मानवी समाजाची जडणघडण ही एक उत्क्रांत होत गेलेली संकल्पना आहे. विशिष्ट भूप्रदेशातील समूहांच्या नियमनासाठी आकाराला येणाऱ्या व्यवस्था या त्या समाजाचे नियमन करण्यासाठी बनवल्या जातात. आणि मग त्या व्यवस्थांच्या चौकटी अनेकदा बंदिस्त होत होत विशिष्ट मर्यादित काळापुरत्या त्या समूहाच्या नियमनासंदर्भातले सर्वप्रमाण असा निकष ठरतात. मुळातच प्रगमनशील आणि सतत उत्क्रांत होत असलेल्या मानवी समूहांना एकसाची, बंदिस्त चौकटींत राहणे देश-कालानुसार व मानवी समूहांतल्या स्थित्यंतरांनुसार शक्य नसतं; आणि त्यामुळेच या व्यवस्था व त्यांचे आकार, त्यांची शास्त्रे ही परिवर्तनशील असतात. या शास्त्रांच्या उदयाला कारणीभूत असते- तत्कालीन सामाजिक, राजकीय व आर्थिक परिस्थिती आणि व्यवस्थांची गरज.

‘धर्म’ या संकल्पनेचा गाभा हा मुख्यत्वे समाजधारणा करणे आणि समाजाला विशिष्ट चौकटींतून आकार देणे हा असल्याचं आपण नेहमी ऐकतो. समाजधारणा होत असताना किंवा ती घडवली जात असताना त्या व्यवस्थेच्या विविध अंगांचे नियमन करणारे वर्गदेखील आपसूक निर्माण होतात. त्या वर्गाच्या चौकटी बहुतांशी साचेबद्ध होतात आणि त्या वंशपरंपरागत होत जाऊन विशिष्ट वर्गाची मक्तेदारी बनतात. मग त्या साचेबद्धतेतून अधिकारव्यवस्थांचे भागधारक आणि सामाजिक उतरंडी जन्माला येतात. अर्थात मानवी समाजाच्या नियमनासाठी निर्माण झालेल्या व्यवस्थांना मानवी स्वभावाचे निकष लागू होणं अगदीच स्वाभाविक असतं. तरीही त्या व्यवस्थांना मग ईश्वरी अधिष्ठानाचे पदर जोडून त्यांचे अपरिवर्तनीयत्व अधोरेखित करण्याची रीत या संरचनेतल्या हितसंबंध जपणाऱ्यांकडून रुजवली जाते. काळाच्या विशिष्ट मर्यादांच्या तुकडय़ांनी जोडल्या गेलेल्या महाकाय पटावरच्या या तुकडय़ांवर सर्वसाधारणपणे या पद्धती कमी-अधिक फरकाने अशाच दिसून येतात. ज्ञाननिर्मिती आणि त्या ज्ञानाच्या जतनासाठी असलेली एक आणि समाजाला करपद्धती-न्यायप्रणाली व संरक्षणव्यवस्थादींच्या नियमनाद्वारे नियंत्रित करणारी दुसरी – अशा दोन व्यवस्थांना या सामाजिक स्थित्यंतरांमध्ये प्रतिष्ठा प्राप्त होत असते.

धारणांचे धागे तपासत प्राचीन भारताच्या इतिहासाकडून मध्ययुगाकडे झेपावताना आपण या सामाजिक व्यवस्थांच्या चौकटीचे नियमन करणाऱ्या प्रणालीचा आढावा घेण्यास प्रारंभ केला होता. गेल्या लेखात पाहिलं त्यानुसार, राजनीतिशास्त्र ही उपखंडात एक महत्त्वाची ज्ञानशाखा म्हणून मान्यता पावलेले शास्त्र होते. कौटिल्याने केलेल्या व्याख्येनुसार, पृथ्वीवर अधिकार प्राप्त करण्यासाठी आणि अधिकारप्राप्तीनंतर तिचे पालन व संरक्षण करण्यासाठीचे शास्त्र हा या शास्त्राचा मुख्य विषय. त्यामुळे विशिष्ट भूप्रदेशात अस्तित्वात असलेल्या राजकीय व्यवस्थांवर आपले स्वामित्व मिळवण्याविषयी मार्गदर्शन हा या शास्त्राचा एक उद्देश असल्याचं राजनीतिशास्त्रकार लपवत नाहीत. यातील स्वामित्व मिळवण्याचा मुद्दा हा लक्षणीय आहे. मानवी व्यवस्थांमध्ये अशा स्वामित्व हक्काविषयीचा विवेक ढळून तो अतिरेकी महत्त्वाकांक्षेत परिवर्तित झाल्याची उदाहरणे कमी नाहीत. इतिहासात आपल्या राजकीय महत्त्वाकांक्षांपायी मंत्र्याने, राजपुत्राने किंवा राणीने राजाचा खून करण्याची उदाहरणे सर्वच काळात दिसून येतात. त्यामुळेच राजाने स्वत:विरुद्ध होणाऱ्या षड्यंत्रांच्या विरोधात सजग राहण्यासंदर्भात मार्गदर्शन हे शास्त्रकार करतात. आणि या षड्यंत्रांविषयीच्या मार्गदर्शनपर सूचनांमध्ये खुद्द स्वत:च्या राण्या (पत्नी) आणि राजपुत्र यांच्यापासूनही सावध राहण्याच्या सूचना राजनीतिज्ञ शास्त्रकार करतात. उपखंडातील प्राचीन राजनीतिज्ञ या आणि अन्य प्रकारच्या राजनतिक संकटांविषयी सावध राहण्याचे असे अनेक सल्ले ज्या प्रकारे देतात, ते पाहता तत्कालीन समाजातील अशा प्रसंगांच्या शक्यता प्रबळ असल्याचं दिसून येतं.

प्राचीन भारतातील राजनीतीचा विचार करताना बहुतांशी कौटिल्याच्या अर्थशास्त्रावर अभ्यासकांचा अधिक कटाक्ष असल्यानं तुलनेनं अन्य शास्त्रकारांच्या मांडणीकडे काही अंशी दुर्लक्ष झाल्याचं दिसून येतं. कामंदक प्रणीत ‘नीतिसार’ हे या कौटिल्येतर शास्त्रकारांपकी अग्रणी नाव. कौटिल्याप्रमाणेच कामंदकदेखील राजप्रासादातील धोक्याविषयी सजगता राखण्याचे निर्देश देतो. राजाने आपल्या व्यक्तिगत आयुष्यात सुखोपभोगांसाठी निर्मिलेल्या अंत:पुरात अथवा राणीवशात जाताना ती एक धोकादायक जागा असल्याचं नेहमीच ध्यानात ठेवावं, अशी स्पष्ट सूचना कामंदकांनी केली आहे. या भवनात येणाऱ्या-जाणाऱ्या लोकांवर लक्ष ठेवण्यासाठी अंत:पुरामात्य नावाचा स्वतंत्र अधिकारीच नेमण्याची युक्ती ते सुचवतात. या भवनात जाताना अंतर्वशिक सन्य (अंत:पुरात ठेवायचं सन्य) किंवा लढण्यात निष्णात असे सशस्त्र लढवय्ये, किरात सोबत ठेवावेत. या सूचना देताना कामंदकांनी कलिंग देशाच्या राजाला- भद्रसेनाला त्याच्या भाऊ वीरसेनाने राणीनिवासात कपटाने मारल्याचे, काशीराजाला त्याच्या पत्नीने लाह्यंत विष घालून मारले किंवा करुश नामक देशाच्या राजाला त्याच्या मुलाने पित्याचे दुसऱ्या भावावर अधिक प्रेम असल्याने राजा राणीच्या (राजपुत्राच्या आईच्या) शयनगृहात झोपलेला असताना ठार केले.. वगरे उदाहरणे दिली आहेत. अगदी आपल्या मातेच्या भेटीसाठी जातानाही राजाने सर्व सज्जे आणि राजवाडय़ातील मार्ग तपासून सशस्त्र सनिकांसोबतच जावे असं कामंदक सांगतात. राजावर येणाऱ्या संकटांची विभागणी बा प्रकोप आणि अंत:प्रकोप अशा दोन प्रकारांत त्यांनी केली आहे. अंत:प्रकोपाची उदाहरणे आपण वर पाहिलीच. बा प्रकोपामध्ये असंतुष्ट अधिकारी, सीमेवरील अधिकारी, वन्य जाती आणि पूर्वीचे शरणागत लोक यांच्यापासून असलेला धोका कामंदक अधोरेखित करतात.

या अशा धोक्यांपासून रक्षण करण्यासोबतच स्वत:चा राजकीय दरारा, दबदबा टिकून राहावा यासाठी राजाने काही महत्त्वाच्या गोष्टी करायला हव्यात, असं कौटिल्याप्रमाणे कामंदकदेखील सांगतात. ‘कामंदक नीतिसारा’ची सुरुवात हीच राजाला ‘दंडनीतीचा अधिष्ठाता’ संबोधून होते. दंड ही वर्ण-आश्रम यांच्या रक्षणासाठी वापरली जाणारी नीती आहे आणि प्रजेच्या उत्कर्षांसोबत राजाचा उत्कर्ष होणेदेखील आवश्यक असल्याने दंडनीतीचा वापर करणे राजासाठी आवश्यक आहे, असं ‘नीतिसार’ सांगतं. त्यादृष्टीने आपली राजकीय ध्येयं किंवा महत्त्वाकांक्षांची पूर्ती करण्यासाठीचा मार्ग अनेकदा कपट, कूटनीतीच्या द्वारे आचरावा लागतो. कामंदकाचार्याना त्यात काही वावगं वाटत नाही. उलट, राजकीय उद्दिष्टांच्या पूर्तीसाठी केलेली हिंसा ही खरं तर ‘सिंहवृत्ती’च आहे, असं ते आवर्जून सांगतात. अनेकदा ‘दुष्ट’ वाटणाऱ्या लोकांकडून संपत्ती प्राप्त करणे कर्मकठीण असते. त्यामुळे अशा माजलेल्या हत्तीच्या गंडस्थळावर पाय रोवलेल्या सिंहासारखं त्याला चिरडूनच ध्येय प्राप्त करावं लागतं, असं ‘नीतिसार’मध्ये म्हटलं आहे. अशा बलपूर्वक दंड प्रयोजनाचे समर्थन  करताना –

‘परस्परामिषतया जगतो भिन्नवर्त्मन:।

दण्डाभावे परिध्वंसी मात्स्यो न्याय: प्रवर्तते।’

या जगात प्रत्येकाचे मार्ग वेगवेगळे असल्यामुळे जग अराजकाकडे जाईल. अशा वेळी कठोर दंडनीतीचे पालन केले नाही तर मात्स्यन्यायाचा (छोटय़ा माशाला मोठय़ा माशाने गिळंकृत करणे!) प्रादुर्भाव होईल, असं कामंदक सांगतात. आपल्या मार्गात येणाऱ्या हितशत्रूंचा, उघड विरोध करणाऱ्यांचा काटा काढण्यासाठी उपांशुदंड (गुप्त हत्या) हा मार्ग असल्याचं कौटिल्याप्रमाणे कामंदकदेखील सांगतात. राजाला अभिप्रेत असलेल्या धर्माच्या मार्गात अडथळे आणणाऱ्या कंटकांना दूर करण्यात अधर्मपर असे काहीही नसून, तिथे दंडनीतीचा वापर आवश्यकच असल्याचं ते म्हणतात.

‘धम्र्यामारेभिरे हिंसामृषिकल्पा महीभुज:।

तस्मादसाधून् धर्माय निघ्नन् दोषर्न लिप्यते॥’

अर्थात, अनेकदा धर्मरक्षण करताना राजाला आपल्या दुष्टांची निष्ठूरपणे हिंसा करावीच लागते. यज्ञात ऋषींनी केलेली हिंसा ज्याप्रमाणे धम्र्य (धर्मासाठी अनुरूप) असते, तसे राजालादेखील अशा हिंसेचे पाप लागत नाही. न्याय किंवा धर्मावर आधारलेली व्यवस्था उभारण्यासाठी आणि टिकवण्यासाठी राजाने दंडशक्ती वापरलीच पाहिजे, असे राजकीय हिंसेचे समर्थन कौटिल्य आणि कामंदक हे आचार्य करतात.

शास्त्रांनी घालून दिलेल्या चौकटींचा आजच्या काळात विचार करताना त्या व्यवस्थेचे सरंजामी स्वरूप आपल्याला आज रुचणारे नाही. एका विशिष्ट व्यक्तीने एकहाती सत्ता हातात घेऊन धर्माचे, नीतीचे निकष ठरवून कुणाला स्वत:च्या अखत्यारीत दंड प्रदान करणे हे आजच्या शिष्ट, तुलनेने स्वतंत्र बुद्धीच्या लोकशाही वगरे व्यवस्थांच्या प्रभावाखाली असलेल्या सुशिक्षित नागर माणसाला अनुचित वाटेल. अशावेळी ‘बल’ या तत्त्वांचे मानववंशशास्त्रातील ऐतिहासिक महत्त्व तपासत त्यांच्या वापराचा इतिहास पाहिला तर इतरांवर आधिपत्य गाजवण्याची, स्वत:ला सर्वोच्च स्थानी पाहण्याची आदिम मानवी इच्छा अनेकदा विवेकाहून बलवत्तर होत असल्याचं आपल्याला दिसतं. महाभारत आदी ग्रंथांतून किंवा पुराणांतून या मानवी भावनांचे अजस्र रूप आपल्याला दिसून येते. मानवी समूह एकत्र येताना त्यांच्या साहचार्यातून आकाराला येणाऱ्या वेगवेगळ्या व्यवस्था आणि त्यांची जडणघडण ही मानवी पातळीवरच्या आकांक्षा-इच्छांच्या घुसळणीतूनच होत असते.

समाजात दंडनीतीचा शास्ता होऊन समाजावर अधिकार गाजवण्याच्या इच्छेने पृथ्वीचा लाभ (पृथ्वीवर विजय) मिळवून तिचे पालन करत सर्वोच्च अधिकारपदाची इच्छा पूर्ण करण्यासाठी समाजात हिंसा, कपट, कूटनीती, अधिकारपदावरील ज्येष्ठांना खाली खेचून/ डावलून तिथे स्वत:ला बसवण्याची महत्त्वाकांक्षा प्राचीन काळापासून जगाच्या इतिहासात दिसून येते. उपखंडातील प्राचीन इतिहासात कामंदकाचार्यानी दिलेली काही उदाहरणे आपण वर पाहिली. प्राचीन भारतातील अन्य राजवंशांत हे प्रकार सर्रास आचरले गेल्याचे पुरावे विपुल प्रमाणात सापडतात. केवळ आपल्या कुळातील वा राज्यातील अडथळ्यांचाच नाही, तर इतर राज्यांतील भूमीचा लाभ घेण्याचे विस्तारवादी धोरण राबवल्याचे पुरावेदेखील अनेक राजप्रशस्त्यांतून आणि शिलालेखांतून दिसून येतात. चालुक्य राजवंशाचे वर्णन करणाऱ्या ऐहोळे येथील शिलालेखात तिथल्या राजकुळात मंगलेश या राजाच्या भावाने राजाच्या मृत्यूनंतर राजपद सांभाळल्यावर त्याच्या ठायी उत्पन्न झालेली राज्याकांक्षा, त्याच्या पुतण्याने (राजाचा मुलगा- राजा द्वितीय पुलकेशीने) केलेली हत्या, इत्यादी तपशिलांसह चालुक्य राजाने कदंब, पीठापूर वगरे राज्ये, शहरे कशी चिरडली; वर्धन घराण्याच्या सुप्रसिद्ध हर्ष या राजाला भयाकूल करून त्याला ‘अहर्ष’ कसे केले; लाटमाल व गुर्जरादि राजसमूहांचा फडशा कसा पाडला, याचे तपशीलवार वर्णन येते.

राजकीय हिंसा आणि अहिंसेसारख्या आदर्श तत्त्वाचा अतिरेक, या दोन्हीचा परिपोष प्राचीन भारतीय समाजात झालेला दिसून येतो. या हिंसा-अिहसेच्या तात्त्विक रस्सीखेचीतून इथल्या राजव्यवस्था, मूल्यव्यवस्था आकाराला आल्या. त्या अनुषंगाने मूल्यप्रणाली आणि राजकीय व्यवस्थांचे उदय, अध:पतन, उत्कर्ष, काही काळापुरते सुरळीत संचालन, विच्छेद, इत्यादी साऱ्या अवस्थांतून जात इथल्या मूल्यव्यवस्था आणि राजकीय प्रणाली उत्कर्ष पावल्या, तर कधी रसातळाला गेल्या. मानवी समूहांचा इतिहास सर्वत्र असाच बऱ्यावाईट फरकाने आकाराला येत असतो. या साऱ्या घुसळणीमध्येदेखील भारतातल्या तत्त्वज्ञ, विद्वान आणि सामान्यजनांचे अभिव्यक्तिस्वातंत्र्य, वाद-चर्चाचे फड, टीका-भाष्यादि परंपरा, तात्त्विक आक्षेप-खंडनाची मालिका पूर्णपणे संपली असं मात्र नाही.

धारणांचे हे असे गुंतागुंतीचे, कधी अतिशय चिवट, बोचणारे, तर कधी अतिशय तलम, मऊशार असे धागे तपासताना आपण या इतिहासाला वर्तमानाच्या चष्म्यातून पाहण्याचा  प्रयत्न करतो आहोत. यातून आपल्या समाजातील धारणांना निरनिराळ्या काळात मिळालेले वेगवेगळे मापदंड आपल्याला तपासून पाहायचे आहेत. त्यादृष्टीने चिकित्सा करत आपल्याला या धारणांचा प्रवास आधुनिक धारणांच्या उदय-उत्पत्ती आणि औचित्य-अनौचित्यापर्यंत आणून ठेवायचा आहे. गेल्या दोन भागांतील विचारसूत्रे व राजनीतिशास्त्रीय तपशील घेऊन आपल्याला मध्ययुगातून आजच्या काळापर्यंत झालेल्या घडामोडी आणि त्यांच्याविषयी रुजलेल्या/ रुजविलेल्या स्मृतींची आणि ऐतिहासिक संभाषितांची चिकित्सा करावयाची आहे.

rajopadhyehemant@gmail.com

(लेखक ग्योटिंगेन विद्यापीठ जर्मनी येथे पीएचडी संशोधक असून ऑब्झव्‍‌र्हर रीसर्च फाउंडेशन येथे वरिष्ठ संशोधक म्हणून कार्यरत आहे.)

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 12, 2018 4:35 am

Web Title: political science and society
Next Stories
1 कौटिल्येन कृतं शास्त्रम्।
2 बदलते ‘धर्म’ आणि बदलत्या ‘जाणिवा’
3 धारणांच्या गुंतागुंती तपासताना..
Just Now!
X