13 August 2020

News Flash

धर्म, धम्म आणि श्रद्धा

‘धारणा’ हा आपल्या सदराच्या शीर्षकात असलेला एक महत्त्वाचा शब्द.

|| हेमंत प्रकाश राजोपाध्ये

‘धारणा’ हा आपल्या सदराच्या शीर्षकात असलेला एक महत्त्वाचा शब्द. मागील लेखात आपण पाहिलं त्यानुसार, ‘धर्म’ हा शब्द ज्या धातूपासून निर्माण होतो त्याच धातूपासून ‘धारणा’ हा शब्ददेखील बनला आहे. त्या शब्दाच्या भावार्थाविषयी चर्चा करताना त्याचे विविध अर्थ, धर्म या कल्पनेचा झालेला विकास व त्यातील प्रारंभिक टप्पे उपलब्ध ऐतिहासिक साधनांतून आणि ग्रंथांच्या आधारे पाहिले.

मानवी अस्तित्वाच्या ज्ञात इतिहासात माणसाच्या प्राथमिक गरजांसोबतच सामूहिक अस्तित्व आणि जगाच्या स्वरूपाविषयी, निर्मितीविषयीची जिज्ञासा या गोष्टीदेखील महत्त्वाच्या मानल्या जातात. मानवी वसाहतींच्या सहअस्तित्वासाठी निर्माण झालेल्या नियमनव्यवस्थांना कुटुंबसंस्था किंवा नीतिमूल्यांची चौकट प्राप्त होत जाते. त्या त्या प्रदेशातील नसर्गिक, सामाजिक आणि पर्यावरणीय परिस्थितीनुसार विकसित होणाऱ्या खाण्या-पिण्याच्या, वस्त्रप्रावरणांच्या पद्धती, समाजातील ईश्वरविषयक संकल्पना, सृष्टिविकसनाविषयीच्या कुतूहलातून निर्माण झालेले विविधांगी सिद्धांत, त्यातून निपजलेल्या मिथककथा अशा विविध घटकांच्या फोडणीतून या चौकटींना वेगवेगळे आयाम प्राप्त होतात. विविध वसाहतींच्या परस्पर संपर्कातून, आदानप्रदानात्मक व्यवहारांतून आणि परिस्थितीनुसार कराव्या लागणाऱ्या तात्पुरत्या किंवा कायमच्या स्थलांतरातून या चौकटींची व्याप्ती वाढते. त्यांच्यातील संवाद किंवा विसंवाद वाढू लागतो. आपपरभावाच्या धारणांना वेगवेगळे राजकीय, भौगोलिक आणि पर्यायाने  सांस्कृतिक आयाम प्राप्त होतात. या प्रक्रियेचा भाग म्हणून निर्माण होणाऱ्या साहित्याच्या धाटणीमध्ये, त्यांच्या अर्थाविषयीच्या धारणांमध्ये आणि पर्यायाने समाजाच्या संरचनांमध्येही बदलत्या धारणांनुसार परिवर्तन होत जाते. अशा सामाजिक, सांस्कृतिक, श्रद्धाविषयक संकल्पनांतून समाजाचे गठन करणाऱ्या धारणांच्या चौकटीला उपखंडातील प्राचीन समाजव्यवस्थेच्या नियमकांनी ‘धर्म’ असे नाव दिले.

धर्म संकल्पनेच्या आदिम स्वरूपाचे, त्याच्या कर्मकांडात्मक स्वरूपाची आणि त्यानुसार त्याला प्राप्त झालेल्या अर्थच्छटांची आपण चर्चा केली. ‘ऋत’, ‘ऋण’, ‘यज्ञ’, आदी संकल्पनांवर बेतलेल्या, मित्रावरुण व अन्य वैदिक देवतांनी रक्षण केलेल्या धर्म संकल्पनेची व्याप्ती कशी वाढत गेली, याविषयीची चर्चा आता आपण करणार आहोत. वेदकाळातील धर्म या कल्पनेविषयीच्या धारणा, वेदोत्तरकाळात कसकशी वळणे घेत नवीन प्रारूपे धारण करतात, याचा विचार करताना वेदोत्तर काळातील बौद्ध-जैन व अन्य श्रमणव्यवस्थेतील धर्मप्रणाली, धर्मसूत्रे, पुराणे आणि आर्ष महाकाव्ये यांचा आढावा घ्यायचा आहे. धर्म या संकल्पनेचे आजच्या समाजात जे अर्थ रूढ आहेत त्यांचा आणि प्राचीन काळातील वैदिक, बौद्ध आणि जैन मतप्रणालीतील धर्म संकल्पनेच्या व्याप्तीचा संबंध जोडताना आपल्याला एक छोटं वेगळं वळण घ्यावं लागणार आहे. त्यानिमित्ताने वेद, त्रिपिटक आणि जैन आगमांतील धर्म आणि आधुनिक काळात रूढ झालेला धर्म या शब्दाचा अर्थ यांची तुलना क्रमप्राप्त आहे.

धर्म संकल्पनेविषयीच्या धारणांच्या आधुनिक अभिव्यक्तीचा विचार करण्याआधी आपण जाऊ या थेट भारतीय उपखंडाच्या किंचित पलीकडे असलेल्या अफगाणिस्थानातील कंदाहारच्या प्रदेशात. प्राचीन काळात हा प्रदेश मौर्य राजसत्तेच्या आधिपत्याखाली होता, हे अनेकांना माहिती आहे. शांती आणि सहिष्णुतेचे प्रतीक मानल्या गेलेल्या सम्राट अशोकाचे या भागात आधिपत्य होते. अशोकाच्या महानतेचे पुरावे देणारे शिलालेख अफगाणिस्थानापासून कर्नाटकातील सन्नत्ती किंवा आंध्रप्रदेशातील येरागुड्डीपर्यंत सापडतात. अफगाणिस्थानातल्या कंदाहार येथे सापडलेला अशोकाचा असाच एक शिलालेख आपल्या विषयाच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे. या शिलालेखाचे एक वैशिष्टय़ म्हणजे, या शिलालेखात ‘अरमईक’ या मध्यपूर्व आशियायी प्रदेशात विकसित झालेल्या प्राचीनतम लिपीतील किंवा ग्रीक लिपीतील अक्षरे/ शब्ददेखील आपल्याला मिळतात. इ.स. पूर्व २५८ मधील या शिलालेखात सापडणाऱ्या ग्रीक तपशिलामध्ये ‘धर्म’ या शब्दाला समानार्थी म्हणून ‘eusebeia’ असा ग्रीक शब्द सापडतो. ग्रीक शब्दकोषानुसार या शब्दाचा अर्थ करुणा, दया (pity) असा आहे.

अशोक हा बौद्ध धर्माचे पालन करणारा, प्रसार करणारा सम्राट म्हणून आपल्याला माहिती आहे. त्याच्या लेखांना त्याने स्वत:च ‘धम्मलिपी’ (धर्मलिपी) असे संबोधिले आहे. ‘धम्म’ हा शब्द पाली भाषेत रचल्या गेलेल्या बौद्ध धर्माच्या साहित्यात ‘धर्म’ या संस्कृत शब्दाचेच समांतर रूप आहे, हे सुस्पष्ट आहे. अशोकाच्या शिलालेखांतून मिळणाऱ्या माहितीनुसार, त्याने बौद्ध भिक्खू व त्यांच्या मठांसोबतच वैदिक, आजीवक अशा अन्य पंथीयांना आणि त्यांच्या संस्थांनादेखील राजाश्रय दिला होता असे दिसते. त्याच्या विस्तृत साम्राज्यात वैदिक, जैन, बौद्ध, आजीवक या प्रमुख संप्रदायांप्रमाणेच इतर अप्रसिद्ध अशा अनेक स्थानिक पंथोपपंथांचे समूह अस्तित्वात होते. त्यामुळे अशोकाने वापरलेला ‘धम्म’ हा शब्द केवळ बौद्ध मताला अभिप्रेत असलेल्या धम्म संकल्पनेचीच अभिव्यक्ती करत नसून ‘राज्याच्या सुव्यवस्थेच्या दृष्टीने आवश्यक अशा नतिक चौकटी आणि आपल्या वैयक्तिक आणि सामूहिक कर्तव्यांचे पालन’ अशा व्यापक अर्थाने तो शब्द वापरला गेला असल्याचे अभ्यासकांचे मत आहे.

वर वापरलेल्या ‘eusebeia’ शब्दाकडे पाहिले असता हेलेनिस्टिक ग्रीक काळाच्या (सिकंदराचा मृत्यू ते रोमन साम्राज्याचा उदय या काळाला ‘हेलेनिस्टिक काळ’ असे म्हटले जाते) अभ्यासकांच्या मते, ‘eusebeia’ हा शब्द देवतांची भक्ती-श्रद्धा अशा अर्थानेदेखील वापरला जाई व काही संदर्भामध्ये हा शब्द ‘मानवी आयुष्याच्या नियमनाकडे पाहायचा दृष्टिकोन’ अशा अर्थीही वापरला गेला आहे. तर अन्य संकीर्ण साहित्यामध्ये ‘eusebeia’ हा शब्द आप्त स्वकियांविषयीचा दृष्टिकोन, पती-पत्नींचा परस्परांविषयीचा दृष्टिकोन किंवा गुलाम-सेवकांचा आपल्या मालकांप्रति असलेला दृष्टिकोन अशा अर्थीही वापरला गेला असल्याचे अभ्यासकांनी दाखवून दिले आहे. अर्थात, दिग्विजयी सम्राट अशोकाच्या वायव्येकडील सीमावर्ती भागातील (ग्रीक?) अधिकाऱ्यांनी तेथील भागात प्रचलित असलेल्या ग्रीक भाषेमध्ये ‘धर्म’ या शब्दाचा अर्थ सांगायचा प्रयत्न केला, तोही ग्रीक समाजातील/सांस्कृतिक विश्वातील धारणांनुसार! आणि याचाच दुसरा अर्थ असा की, अशोकाला वा अशोककालीन समाजाला अभिप्रेत असलेली धर्म संकल्पना ईश्वर/देवताविषयक श्रद्धा, मानवी सहसंबंधांत अभिप्रेत असलेली सभ्यता व औदार्य, आपले आप्त-स्वकीय व समाजाविषयीची सद्भावना, सहकार्याची वृत्ती, इत्यादी विविध अर्थाना कवेत घेत समृद्ध झालेली दिसते.

या अनेक अर्थापकी ग्रीक धारणेनुसार लावला गेलेला ‘धर्म’ या शब्दाचा अर्थ आहे- ‘देवताविषयक श्रद्धा’!  या ‘eusebeia’ शब्दाचा जवळचा दुसरा ग्रीक शब्द आहे- ‘sebomai’; ज्याचा अर्थ आहे- प्रार्थना करणे, देवतार्चन करणे. या शब्दाच्या वापरामुळे भारतीय धर्माभ्यासाच्या दृष्टीने अशोकाचा हा शिलालेख अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. कारण धर्म/धम्म या संकल्पनेचा मध्यपूर्व आशियायी आणि भूमध्यसागरी प्रदेशातील सामाजिक-सांस्कृतिक चौकटीत अर्थ लावला जाण्याचा हा बहुधा पहिला प्रयत्न/ उपक्रम असावा. अर्थात ग्रीक समाजव्यवस्थेत रूढ झालेला श्रद्धानिदर्शक शब्द ‘धर्म’ या भारतीय संकल्पनेला समांतर पर्याय आहे, असे मानणे चूक ठरेल. मात्र ग्रीक लोकांचा इथल्या सामाजिक-सांस्कृतिक धारणांशी परिचय झाला, तेव्हा त्यांना जाणवलेल्या किंवा आकलन झालेल्या धारणांच्या चौकटीत सामाजिक सहसंबंध आणि नीतिमूल्यांची चौकट इथल्या ईश्वरविषयक धारणांशी घट्ट जोडलेली आहे, हे त्यांना नेमकं समजलं होतं. त्यामुळे इथल्या धर्म या सामाजिक संस्थेचा एक अर्थ त्यांनी श्रद्धापर लावला, यात काही आश्चर्यजनक असे नाही. सिकंदराच्या स्वारीदरम्यान ग्रीकांचा इथल्या ब्राह्मण-श्रमण यतींशी कथित परिचय झाला. तेव्हा त्यांच्या सामाजिक-मानसिक व्यापाराशी झालेल्या या ओळखीतून भारतीय सामाजिक चौकटी या सृष्टीतील रहस्यांचा वेध घेणाऱ्या काहीशा गूढवादी चौकटींशी, देवताविज्ञानाशी किंवा निर्वाणपर संकल्पनांशी निबद्ध असल्याचा ग्रीकांचा समज झाला, हे स्वाभाविकच म्हणावं लागेल.

ग्रीकांच्या स्वारीनंतर भारतीय समाजाचा युरोपीय लोकांशी राजकीयदृष्टय़ा संबंध आला तो वसाहत काळात. त्यामुळे आता ‘धर्म’ या शब्दाच्या अर्थाच्या आजच्या धारणांकडे वळण्यासाठी अशोकाच्या काळातून आपण पुन्हा येऊ या १९ व्या शतकाकडे. वासाहतिक सत्तांनी भारतात बस्तान बसवल्यावर इथे रूढ झालेल्या इंग्रजी शिक्षण व्यवस्थेत शिकलेल्या युरोपीय आणि भारतीय अभ्यासकांनी भारतीय संकल्पनांचा युरोपीय भाषेत अनुवाद करताना वर पाहिलेल्या हेलेनिस्टिक काळापासून युरोपीय परिप्रेक्ष्यात विकसित झालेल्या अर्थाच्या चौकटींचा अंगीकार केला. अशोकाच्या काळातील ‘धम्म’ या शब्दाच्या अर्थनिष्पत्तीची प्रक्रिया नव्या स्वरूपात पुन्हा अभिव्यक्त होताना ‘धर्म’ या शब्दासाठी श्रद्धाविश्वाच्या चौकटीकरिता वापरला जाणारा ‘रिलिजन’ हा शब्द वापरला गेला. वर पाहिल्याप्रमाणे, ‘रिलिजन’ हा ‘धर्म’ या शब्दाचा अनुवाद अशोकाच्या शिलालेखातील ‘eusebeia’हून फारसा वेगळा नाही. ग्रीक ‘eusebeia’ हा शब्द आजच्या आधुनिक इंग्रजीत ‘फी’ Religion किंवा ‘फी’ Religiousity असाच अनुवादीत होतो. अर्थात, अडीच हजार वर्षांपूर्वी ग्रीकांना (अर्थात युरोपीय वैचारिक विश्वाला) ‘धर्म’ या शब्दाचे ज्याप्रकारे आकलन झाले, तेच आकलन १९ व्या शतकात भारतात राजकीय बस्तान बसवणाऱ्या इंग्रजांचे व अन्य युरोपीय वसाहतकारांचेही होते. किंवा खरं तर अडीच हजार वर्षांपूर्वीच्या ग्रीकांचे ‘धर्म’ शब्दाविषयी असलेले आकलन आणि इंग्रजी पद्धतीत शिकलेल्या भारतीय विचारकांचे युरोपियांच्या ‘रिलिजन’ या संकल्पनेविषयीचे आकलन यात कमालीची समानता आहे, असं म्हणायलाही काही हरकत नाही. थोडक्यात, ग्रीकांनी ‘धर्म’ या संकल्पनेसाठी वापरलेला ‘eusebeia’ हा शब्द किंवा आधुनिक भारतीयांच्या सवयीनुसार ‘धर्म’ शब्दाचा अनुवाद करण्यासाठी वापरला जाणारा ‘फी’ Religion हा शब्द ‘धर्म’ या शब्दाला अभिप्रेत असलेल्या सामाजिक नियमांच्या व नीतिमूल्यांच्या चौकटींना श्रद्धापर अर्थाद्वारे ग्रासून टाकतो.

‘धर्म ही समाजधारणा करणारी चौकट’ ते ‘धर्म म्हणजे श्रद्धाविषयांचा परिपोष करणारी व्यवस्था’ अशा या रोचक प्रवासाविषयीचा हा एक महत्त्वाचा ऐतिहासिक संदर्भ आपण थोडक्यात पाहिला. ईश्वर वा देवताविषयक श्रद्धा किंवा वरुण-रुद्र-इंद्र यांसारख्या देवतांच्या देखरेखीखाली जसे सृष्टीतील वैश्विक गतीचे नियमन होते, तसेच मानवी समाजातील नीतिनियमांचे पालनदेखील या देवतांच्या अखत्यारीत होते, अशी धारणा वेदांपासून (किंबहुना वेदांच्या आधीपासूनच) उपखंडात रूढ असल्याचे आपण पाहिले. देवतांकडून होणाऱ्या शिक्षा-दंडाच्या भीतीखाली उभारलेल्या समाजव्यवस्थेचे आकलन मौर्यकालीन भारतातील ग्रीकांना ज्याप्रमाणे झाले त्याच चौकटीला अनुसरून आपल्याकडे ‘धर्म’ ही बाब श्रद्धाविश्वाशी एकरूप झाली. आधुनिकतेच्या ओघात पाश्चात्त्यांच्या ‘रिलिजन’ या संकल्पनेत धर्म ही उदात्त-व्यापक कल्पना काहीशा संकुचितपणे बसवण्यात आल्याने त्या संकल्पनेमागच्या विविध धारणादेखील कशा झाकोळल्या गेल्या, हे आपण पाहिलं.

आता पुढच्या भागात धर्मशास्त्रे, बौद्ध-जैन परंपरा आणि पुराण-महाकाव्ये यांतून प्रतीत होणाऱ्या धारणांकडे वळायचे आहे. धर्मविषयक संकल्पनांच्या या प्रवासाचा पुढील भागात संक्षेपात आढावा घेऊन झाला, की आपल्याला आजच्या काळातील बहुविध धारणांचे धागे उलगडण्यास प्रारंभ करावयाचा आहे. आजच्या राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक धारणांचा, घटनांचा नव्याने पुनरुज्जीवित झालेल्या परंपरा, सुधारणावादी चळवळींच्या संदर्भात विचार करताना मूळ संदर्भ आणि त्यांचे बदलले गेलेले अर्थ उलगडत सांस्कृतिक-सामाजिक गुंते आणि जटिलता तपासणे, हेच या धाग्यांच्या उकलीमागचे प्रयोजन आहे.

rajopadhyehemant@gmail.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 6, 2018 1:36 am

Web Title: religion and shraddha
Next Stories
1 तानि धर्माणि प्रथमानि आसन्।
2 धर्मव्यवस्थांच्या गाभ्याकडे..
3 अथातो धर्मजिज्ञासा।
Just Now!
X