मानवी समाजात रुजलेल्या धारणांचे धागे उलगडताना उपलब्ध लिखित साधने, भौतिक साधने, मौखिक परंपरा तसेच परंपरागत जपल्या गेलेल्या सामूहिक स्मृती अशी विविध साधने तपासावी लागतात. ही साधने अभ्यासताना वस्तुनिष्ठ साधनचिकित्सेच्या दृष्टीने निर्माण केलेल्या संशोधन पद्धतींच्या आधारे इतिहासाचा अभ्यासक भूतकाळातील घडामोडींचा उलगडा करत असतो. इतिहासलेखन हे मुळातच उत्क्रांत होत जाणारं शास्त्र असल्याने उपलब्ध होत जाणारे अनेक प्रकारचे पुरावे आणि त्यांची साकल्याने केलेली चिकित्सा यांचा ताळेबंद गवसतो त्या स्वरूपात स्वीकारणे हे इतिहासाच्या विद्यार्थ्यांचे व वाचकांचेही मुख्य कर्तव्य असायला हवे. अशा धारणांचा अभ्यास करताना घटना अगर व्यक्तींची प्रकृती अनेकदा गुंतागुंतीची किंवा परस्परविसंगत असते. अनेकदा बदलत्या मूल्यव्यवस्थेनुसार काळानुरूप या प्रकृती व त्यांविषयीचे आकलन व धारणा यांचे संदर्भ गुंतागुंतीचे होत जातात. अशा वेळी संबंधित घटना, व्यक्ती किंवा तत्त्वाविषयीच्या धारणांचे पदर वेगळे करून ते पदर त्या त्या काळातील व्यवस्थांच्या व मूल्यव्यवस्थेच्या पटलावर काळजीपूर्वक उलगडून दाखवावे लागतात.

मागील लेखात आपण ‘देव’ आणि ‘असुर’ या शब्दांतून अभिव्यक्त होणाऱ्या धारणांचे बदलत गेलेले संदर्भ काही महत्त्वाच्या प्राथमिक साधनांतून मिळणाऱ्या पुराव्यांच्या आधारे पाहिले. एकाच प्रजापतीपासून निर्माण झालेले असुर व देव हे दोन समूह आणि त्यांच्याविषयीच्या सकारात्मक आणि नकारात्मक प्रतिमा घडत जाण्याच्या प्रक्रियांविषयीची थोडक्यात चर्चा आपण केली. तसेच या प्रक्रियेची गतिमानता आजच्या आधुनिक अस्मितांच्या निर्मितीपर्यंत सातत्य कसे राखते, याचाही आपण संक्षेपात आढावा घेतला.

देव, असुर किंवा तत्सम मिथकात्म मानल्या गेलेल्या विषयांसंदर्भात जगभरात झालेल्या चर्चेनुसार मिथकात्मतेची व्याख्या करायचे अनेक प्रयत्न झाले. एखादा समुदाय आपली सामूहिक ओळख जगाला पटवून देण्यासाठी इतिहास-पुराणांतील संदर्भाशी नातं सांगतो. या नात्याद्वारे तो समुदाय आपल्या समूहाच्या सांस्कृतिक- राजकीय- सामाजिक अस्तित्वाला अधिष्ठान मिळवून देत असतो. अशा धारणांना नेहमीच अलौकिकतेची किंवा अतिमानवीय परिमाणांची जोड मिळते. त्यातून मिथकांची निर्मिती होत असते. या मिथकांची गुंतागुंत व त्याविषयीचे बदलते राजकीय संदर्भ यांच्यासंदर्भात मागील लेखात आपण पाहिलेले महिषासुराच्या कथेचे उदाहरण याचेच द्योतक आहे. महिषासुराशी जैव नाते सांगणारा एक समाज महिषासुराच्या कल्पित सकारात्मक, उदात्त गुणांना अधोरेखित करत स्वत:ची सामूहिक ओळख सांगू पाहतो. त्याचप्रमाणे महिषासुराविषयीची पुराणादि ग्रंथांत रंगवलेली काहीशी खलनायकी प्रतिमा प्रमाण मानत ईश्वरी शक्तीशी तादात्म्य पावलेल्या स्त्रीस्वरूपाची उपासना करणारे आजचे समुदायही आहेत. या दोन्ही समूहांच्या धारणांचे सहअस्तित्व संघर्षांचे रूप का आणि कसे घेते, हा वाद-चर्चेचा विषय असला तरी दोन धारणांची मुळे ज्या ‘असुर’ व ‘देव’ या प्राचीन कल्पनांशी निबद्ध आहेत त्या कल्पनांची व्याप्ती व प्रकृती ही एकाच विशिष्ट समुदायाला खल अथवा साधू ठरवणारी नक्कीच नाही.

ज्येष्ठ प्राच्यविद्यापंडित रा. ना. दांडेकर म्हणतात त्यानुसार, हिंदू श्रद्धाविश्वात ‘सैतान’ किंवा पाश्चात्त्य जगतात आहे तशी ‘डेव्हिल’ ही कल्पना तितकी ठळकपणे दिसून येत नाही. झरतुष्ट्रीय धर्मात दिसणारे शुद्ध तेजाचे व घोर अंधाराचे प्रतिनिधित्व करणारे द्वैत हिंदू श्रद्धाविश्वात दिसत नाही. वेदामध्ये इंद्राचा शत्रू म्हणून वर्णन केला गेलेला वृत्र/वृत्रासुर (ज्याला ‘अही’ असं म्हटलं गेलं आहे) हा त्याअर्थी कुणी खलनायकी गुण व अतिमानवी शक्तींचा परिपोष असलेला असा राक्षस नाही. पुढे पुराणांमध्ये तर त्याला ‘त्वष्टृ/त्वष्टा’ या देवतेचाच मुलगा असल्याचे दाखवले आहे. या त्वष्टाच्या मुलाला इंद्राने मारले म्हणून त्याचा बदला घेण्याच्या मिषाने त्याने ‘वृत्र’ हा पुत्र उत्पन्न केल्याचे पुराणांतरी दिसते. ऋग्वेदातील वृत्र हा वैदिक समूहांना जलाशय/ पाणी मिळवण्यास प्रतिबंध करणारी व्यक्ती म्हणून दिसते, आणि त्याला मारून इंद्राने ऋषिसमूहाला पाण्याचा साठा उपलब्ध करून दिल्याचे दिसते. यास्काचार्यासारख्या प्राचीन व्युत्पत्तिशास्त्रज्ञांनी वृत्र म्हणजे मेघ आणि इंद्र म्हणजे विद्युत असा सांकेतिक अर्थ लावत इंद्राचे पर्जन्यदेवता स्वरूप अधोरेखित केले आहे. काही अभ्यासकांनी वृत्राला अवैदिक स्थानिक समूहातील एखादा नेता मानत त्याला आजच्या सामाजिक वैदिक-अवैदिक/ ब्राह्मण-ब्राह्मणेतर वादाची परिमाणे जोडायचाही प्रयत्न केल्याचे दिसून येते.

अशाच पद्धतीचे आणखी एक सर्वपरिचित उदाहरण म्हणजे रामायणातील श्रीरामाचा शत्रू असलेल्या रावणाचे. उपलब्ध रामकथांपैकी बहुतांश संस्करणांमध्ये रावण हा नेहमीच धार्मिक आणि विद्वान ब्राह्मण म्हणून चित्रित केला गेला आहे. ब्रह्मदेवाच्या पुत्राच्या- पुलस्त्य प्रजापतीच्या विश्रवा नामक मुलाचा मुलगा असलेल्या रावणाला राम-रावणाच्या वीरकथेचे संदर्भ लक्षात घेऊनही परंपरेने महापंडित म्हणूनच चित्रित केले आहे. आजही अनेक पांडित्यप्रचूर स्तोत्रे, संगीतशास्त्रविषयक ग्रंथ व सिद्धांत परंपरेनेच रावणाच्या नावे ग्रथित केलेली आहेत. देव आणि असुर या कल्पनांचे आपण मागील लेखात पाहिलेले मूळ स्वरूप लक्षात घेता असुरकन्या केकसी व ब्राह्मण ऋषिकुमार विश्रवा यांच्या पोटी आलेल्या रावणाच्या व्यक्तित्वाविषयीच्या पारंपरिक धारणांतील गुंतागुंत लक्षात येऊ  शकते. दांडेकर म्हणतात त्यानुसार, पुराणे व रामायण-महाभारतादी महाकाव्यांमध्ये चित्रित केल्या गेलेल्या अनेक असुरी/ खलनायकी पुरुषांच्या ठायी असलेल्या उदात्त, कल्याणकारी सद्गुणांचे वर्णनदेखील त्याच पुराणांत वर्णिलेले दिसते. मात्र त्या-त्या कथानकांनुसार त्यांच्याकडून घडलेली एखादी चूक किंवा दोष हा त्यांना असुरत्वाकडे घेऊन जाणारा ठरतो. अशावेळी या ग्रंथांचा आज अर्थ लावताना देवत्वाचे किंवा खलनायकी स्वरूपात रूढ झालेल्या असुरत्वाचे निकष व त्यातून निर्माण झालेल्या धारणा तपासणे औचित्याचे ठरते. पारंपरिक धारणेनुसार ‘पुराण साहित्या’ची व्याख्या अशी –

‘सर्गश्च प्रतिसर्गश्च वंशो मन्वन्तराणि च।

वंशानुचरितं चेति पुराणं पञ्चलक्षणम्।’

(अर्थ : सृष्टीची उत्पत्ती, विलय, देवता-ऋषिसमूहाची सूची, मन्वंतर (वेगवेगळी कल्पित युगं) आणि राजर्षीगणांच्या वंशांची वर्णने ही पुराणांची पाच लक्षणे आहेत.)

या व्याख्येनुसार राजवंशांची वर्णने हे एक पुराणांचे लक्षण आहे. त्यानुसार राजर्षी मानल्या गेलेल्या राज्यकर्त्यांच्या वीरगाथांची व उदात्त कार्याची वर्णने त्यांच्यासमोर उभ्या ठाकलेल्या किंवा प्रतिस्पर्धी मानल्या गेलेल्या समुदायांना अथवा व्यक्तिमत्त्वांना अनुलक्षून होणे स्वाभाविकच आहे. संबंधित प्रतिस्पर्धी समूहाने किंवा समूहाच्या नेत्याने त्यांच्या सांस्कृतिक-सामूहिक धारणांनुसार केलेल्या आचरणाला अशिष्ट, अनैतिक ठरवत किंवा त्यांच्या चुकांना अधोरेखित करीत सबंध व्यक्तिमत्त्व किंवा समुदाय खलनायकी रूपात चित्रित केला जातो. किंवा त्या पुराणांच्या आधारे लोकमानसात रुजणाऱ्या लोकप्रिय आख्यानांतून, कीर्तनादी परंपरांतून अधिक मसाला लावत त्या खलनायकी किंवा नायकी गुणांना प्रमाणित व रूढ केले जाते.

अलीकडच्या काळात अशा प्रस्थापित मिथकांना आधुनिक सामाजिक चळवळींच्या अंगाने प्रतिवादात्मक नवी मिथके निर्माण झाल्याचे दिसते. अशा मिथकांमधून चांगल्या-वाईट किंवा संकुचित-समावेशक अशा वेगवेगळ्या चौकटींतून आदर्शवादाविषयीच्या मांडण्या केल्या जातात. पुराणकाळात अशा आदर्शवादी, सात्त्विक स्वरूपात रंगविल्या गेलेल्या गुणांना ईश्वरत्वाचे अधिष्ठान देऊन त्या नायकांना अवतारी स्वरूप दिले जाते. नीतिनियमांविषयीच्या या सापेक्ष चौकटीतून समाजाची घडी बसविणाऱ्या व्यवस्था निर्माण होतात. त्यांना भारतीय संदर्भात या नीतिनियमांच्या व्यवस्थांना धर्म असे संबोधिले जाते. आधुनिक संदर्भात भारतात ‘धर्म’ या शब्दाला परंपरेच्या धुरीणांकडून व विचारवंत आणि राजकीय-सामाजिक नेत्यांकडून काहीसे विपर्यस्त असे स्वरूप प्राप्त झाले आहे. त्याविषयीची चर्चा पुढच्या भागांतून अधिक सविस्तरपणे होईलच.

मागील लेखांतून ‘आपला-परका’ (‘अयं निज: परो वेति’), ‘देव कोण? असुर कोण?’ यांविषयीच्या धारणांच्या धाग्यांची उकल करत आपण आज ‘देव-असुर’, इत्यादी द्वैताच्या आधारे ‘नायकी-खलनायकी’ प्रतिमांच्या निर्मितीच्या प्रक्रियेपर्यंत पोहोचलो आहोत. काही मोजकी उदाहरणे घेऊन नायक-खलनायक ठरविण्याच्या प्रक्रियेचा संक्षेपात आढावा घेताना आपण प्राचीन आणि आधुनिक संदर्भात निर्माण होणाऱ्या धारणांच्या औचित्य-अनौचित्याचा आज विचार केला. सामाजिक गतिमानतेनुसार पौराणिक मिथकविश्वातील पात्रांना नायक-खलनायक ठरविण्याच्या प्रक्रियेचे मापदंड हे देशकालानुरूप बदलल्याचे दिसून येते. अशावेळी त्या पात्रांच्या ऐतिहासिकतेसोबतच त्या ग्रंथांच्या एकूण आशयाची व सामाजिक अवकाशाची समाजशास्त्रीय मीमांसा करणेही क्रमप्राप्त ठरते.

धारणांच्या धाग्यांच्या गुंत्यातील पहिले पातळ थर उकलून झाल्यावर आता यापुढच्या लेखांतून आपल्याला मुख्य गाभ्याकडे हळूहळू प्रवेश करत, काही जटिल गुंतागुंती सोडवायच्या आहेत. हे करताना अशा आणखी काही पात्रांचा व उपविषयांचा आढावा घेणार आहोत. त्या अनुषंगाने प्राचीन आणि आधुनिक राजकारण-समाजकारणात त्या धारणांनी बजावलेली भूमिका व त्यांचे औचित्यदेखील तपासणार आहोत.

– हेमंत प्रकाश राजोपाध्ये

rajopadhyehemant@gmail.com