25 October 2020

News Flash

युद्ध आणि मानवी मूल्यांचे द्वैत

र्सव शान्ति: शान्तिरेव शान्ति: सा मा शान्तिरेधि।।

|| हेमंत प्रकाश राजोपाध्ये

द्यौ: शान्तिरन्तरिक्ष शान्ति:

पृथिवी शान्तिराप: शान्तिरोषधय: शान्ति:।

वनस्पतय: शान्तिर्वश्विे देवा: शान्तिब्र्रह्म शान्ति:

र्सव शान्ति: शान्तिरेव शान्ति: सा मा शान्तिरेधि।।

द्यूलोक, अंतरिक्ष, पृथ्वी, पाणी, गुणकारी वृक्ष, वेली जगातील सर्व ज्ञात-अज्ञात दैवीशक्ती आणि विश्वाला व्यापून असणारे ब्रह्म या सर्वातून शांततेची प्रचीती मिळावी या धारणेतून विश्वात्मक शक्तीकडे केलेली ही प्रार्थना शांतिमंत्र म्हणून अनेकदा म्हटली जाते. ९०च्या दशकात दूरदर्शनवर गाजलेल्या चाणक्य या मालिकेच्या शीर्षकगीतात वापरला गेलेला हा शांतिमंत्र अनेकांना आठवत असेल. ८०-९०च्या दशकातल्या दूरदर्शनवरच्या ऐतिहासिक विषयांवरच्या मालिकांमधून प्राचीन वैदिक-बौद्ध व अभिजात संस्कृत साहित्यातल्या रचना लोकसंस्कृतीमध्ये एका नव्या माध्यमातून पुन्हा लोकप्रिय झाल्या. या नव्या माध्यमाच्या मध्यमवर्गीय वर्तुळात झालेल्या प्रसारासोबत बदललेल्या सामाजिक धारणा आणि त्यांतून नव्याने, वेगळ्या पद्धतीने रुजवल्या गेलेल्या इतिहास-संस्कृतीविषयीच्या धारणांविषयी अनेक अभ्यासकांनी विपुल लेखन केलं आहे. ८०-९०च्या दशकात आपल्या देशात नव्याने उदयाला येऊ घातलेला मध्यमवर्ग, माध्यमांच्या प्रसारासोबत वृद्धिंगत होऊ लागलेल्या जागतिक घडामोडींविषयीचे भान व झिरपत जाणाऱ्या नव्या जाणिवा यातून ‘नए भारत की नई तकदीर’ कशी घडत गेली हे तेव्हा तारुण्यात असलेल्या किंवा कळत्या वयात येऊ घातलेल्या मुलांना चांगलं आठवतं. किंवा तो काळ बहुतांश साऱ्याच भारतीयांच्या स्मरणरंजनपर गप्पांचा एक महत्त्वाचा हिस्सा असतो. त्या काळात निर्माण झालेल्या ऐतिहासिक-पौराणिक मालिकांनी भारताच्या संस्कृतिकारणाला वेगळी दिशा दिली. तत्कालीन समाजात वाढीला लागणाऱ्या राजकीय जाणिवा, धर्मविषयक संवेदना आणि चळवळीदेखील या मालिकांच्या लोकप्रियतेच्या आधारे फोफावत गेल्या आणि त्या राजकारणाचे परिणाम आज अडीच-तीन दशकांनंतर अधिक ठळकपणे जाणवू लागले आहेत, असं अनेक प्रख्यात समाजशास्त्रज्ञ आणि इतिहासकारांचे म्हणणे आहे.

गेल्या लेखांत आपण आपल्या देशाने स्वीकारलेल्या राष्ट्रीय चिन्हांतून अभिव्यक्त होणाऱ्या संकेतांच्या ऐतिहासिक औचित्याविषयी आणि त्यासंदर्भातील धारणांसंदर्भात चच्रेस प्रारंभ केला होता. आपल्या इतिहास-तत्त्वज्ञानविषयक वाचन-आकलनांतून भारतीय गणराज्याच्या भावी वाटचालीची दिशा आणि जागतिक पातळीवरील भूमिका स्पष्ट करताना ज्या आदर्शवादी भूमिका आपल्या पूर्वजांनी स्वीकारल्या त्यांच्याविषयी आदर राखून त्यांच्या ऐतिहासिक औचित्य-अनौचित्याची चर्चा करणं हे आपल्या या लेखमालेचे उद्दिष्ट आहे.

वर उद्धृत केलेला शांतिमंत्र किंवा प्राचीन काळापासून चालत आलेली (गेल्या भागांतून चíचली गेलेली) चिन्हे जेव्हा आधुनिक परिप्रेक्ष्यात विशिष्ट राजकीय-सांस्कृतिक-सामाजिक संदर्भात नव्या माध्यमांद्वारे, नव्या परिप्रेक्ष्यात पुन्हा प्रस्तुत होतात तेव्हा त्यांसंदर्भात चर्चा करणे समाजशास्त्रांच्या दृष्टीने महत्त्वाचे असते. गेल्या लेखात पाहिल्याप्रमाणे ऋग्वेदामधला दहा राजांच्या युद्धाचा प्रसंग असो, अशोकाच्या किलगादि युद्धांचा संदर्भ असो, राज्यव्यवस्थेचे नियमन करण्यासाठी आणि त्या व्यवस्थेवर हक्क सांगण्यासाठी होत असलेली युद्धे आपल्या इतिहास-पुराणांत कमी नाहीत. अगदी वैदिक विश्वाचा वीर-नेता असलेल्या इंद्राचा दस्यूंशी झालेला संघर्ष असो, बौद्ध धर्माची दीक्षा घेतल्यावर ८ वर्षांनी किलग युद्धाला प्रवृत्त होणारा (प्रचलित समजानुसार किलगयुद्धानंतर अशोकाने बौद्ध धम्म स्वीकारला), नंतरच्या काळात शांततेचा संदेश प्रसृत करणारा सम्राट अशोक असो, शुंग, गुप्त, वर्धन वगरे वंशांचे राजे असोत, यातून ठळकपणे दिसून येणारी गोष्ट ही की, युद्ध, युद्धजनित हिंसा आणि त्यातून निर्माण होणाऱ्या सामाजिक समस्या-संघर्ष हा उपखंडाच्या इतिहासाचा महत्त्वाचा व सातत्यपूर्ण असा भाग आहे. केवळ नरसंहारच नव्हे, तर यज्ञादि विधींद्वारे होणारी हिंसा, धर्मसत्ताधीशांची मग्रुरी, धर्मसंस्था आणि तत्त्वज्ञानपरंपरांमध्ये वाढणारा अनाचार, इत्यादी साऱ्या गोष्टींचे भान असणाऱ्या संवेदनशील चिंतकांनी त्यांच्या विचारव्यूहांना अनुरूप अशा विचारप्रणाली विकसित केल्या. वेगवेगळ्या शिलालेखांतून, प्रार्थनापर किंवा विशिष्ट अनुभूतीपर रचनांतून विश्वकल्याणाची कामना केली. कर्मकांडांतून बोकाळला जाणारा दंभ, त्या व्यवस्थांच्या उच्चनीचतेतून घडत जाणाऱ्या राज्यव्यवस्था आणि सामाजिक व्यवस्थांचा इतिहास पाहिल्यास उपखंडात (अन्य भूभागांच्या इतिहासाप्रमाणेच) संघर्षरहित शांततामय काळ कधीही नव्हता असं दिसतं. वेदपूर्वकालीन सिंधू नदीच्या खोऱ्यातील संस्कृती या गुण्यागोविंदाने नांदत असा एक विचारप्रवाह आपल्याकडे दिसून येतो. मात्र, तिथल्या उत्खननांतून मिळणारी शस्त्रास्त्रेआणि संरक्षक तटबंदींचे अवशेष निराळ्याच वास्तवाकडे निर्देश करतात. प्राचीन आर्यावर्तातल्या राजगृह, चंपा, पाटलीपुत्र वगरे राजकीयदृष्टय़ा महत्त्वाच्या नगरांभोवती कटाक्षाने बांधल्या गेलेल्या भक्कम भिंतींचे अवशेष, किंवा त्याहून जुन्या अशा मेगालीथिक काळातील वीरयोद्धय़ांच्या दफन केलेल्या प्रेतांचे शस्त्रास्त्रांसहित मिळालेले अवशेष अगदी वेदपूर्वकाळापासूनच्या युद्धप्रवण इतिहासाची साक्ष देतात.

हिंसा-अिहसात्मक विचारांच्या या द्वंद्वात काही महत्त्वाच्या ऐतिहासिक विसंगती दिसून येतात. भक्कम तटबंदीने युक्त असलेल्या पुरांवर (नगरांवर) आक्रमणे करून त्यांचा विध्वंस करणाऱ्या ‘पुरभिद्’, ‘पुरंदर’ अशा इंद्राला गौरविणारी ऋग्वेदातली ऋषिमंडले सृष्टीच्या, भूमातेच्या उत्कर्षांसाठी, त्या-त्या प्रदेशात शांतता आणि समाधान पसरावं यासाठी सूक्ते आळवतात. यज्ञविधींतील कर्कश्श कर्मकांड आणि कर्मठतेला आव्हाने देणारे स्वर हे या यज्ञसंस्थेचे लाभधारक असलेल्या राजन्यवर्गातून आणि तिची संकुचित कर्मठता अधिक भक्कम करणाऱ्या ब्राह्मणवर्गातून उपनिषदांच्या रूपात प्रकटले. वेगवेगळ्या महापराक्रमी राजांचा पराभव करून आपले चक्रवर्तित्व मिरविणाऱ्या राजन्य म्हणविल्या जाणाऱ्या वर्गातूनच अिहसेचे उपासक आणि प्रसारक म्हणून विख्यात झालेले तत्त्वज्ञ निर्माण झाले. त्यांच्या परंपरांतून शांततेच्या प्राप्तीसाठी याचना करणाऱ्या गाथा आणि तत्त्वज्ञानपर रचना प्रकट झाल्या. हे सगळं पाहाता, खरं तर, युद्धप्रवण भागात किंवा काळात अशा प्रकारच्या विचारधारा त्याच सामाजिक वर्तुळातून आकाराला येणे याला विसंगती म्हणण्यापेक्षा सुसंगती म्हणणेच सयुक्तिक ठरेल.

या अशा पृष्ठभूमीतून आकाराला आलेल्या वेगवेगळ्या तत्त्वज्ञानांच्या संरचनेकडे, त्यातील मांडणीकडे पाहिल्यास युद्धपर संज्ञा, विशेषनामे आणि उपमांचा लाक्षणिक वापरही आपल्याला मुबलक दिसून येईल. ‘महा-वीर’ असे नाम धारण करणारे २४ वे र्तीथकर हे मातेच्या उदरात असताना श्वेतांबर जैन परंपरेनुसार, देवतांचा राजा इंद्र त्यांची स्तुती करण्यासाठी येतो. हे महावीरांचे स्तवन करत असताना विविध वासना आणि सांसारिक मोहांविरोधातील युद्धात विजय मिळवलेल्या ‘जिनत्वामुळे’ (जेतेपण) अर्हत् पदाला प्राप्त झालेल्या महात्म्यांची स्तुती हा देवांचा राजा इंद्र नरव्याघ्र वगरे विशेषणांनी करतो. दुसरीकडे बौद्ध ग्रंथपरंपरेतील संयुत्तनिकायामध्ये एका तात्त्विक प्रश्नाला उत्तर देताना बुद्ध म्हणतात, ‘रागाचा वध केला असता आपण शांत झोपू शकतो. रागाच्या वधाचे दु:खदेखील होत नाही. हे देवा, रागाला त्याच्या विषाक्त मूळ आणि मधाने युक्त अशा टोकासहित उखडून त्याचा वध केला असता ती कृती स्तुतिपात्रच ठरते. विद्वान, जाणते लोक अशा वधाची स्तुतीच करतात, कारण त्या हत्येने कसलेच दु:ख मनाला लागत नाही.’

जैन तत्त्वज्ञानप्रणालीमध्ये तर हिंसेच्यादेखील आरंभज हिंसा, विरोधी हिंसा, संकल्पिहसा अशा वेगवेगळ्या परिभाषा केलेल्या दिसून येतात, व त्यांच्या गुणात्मक स्तरांमध्येही भेद सांगितला आहे. जागेच्या अभावी त्या परिभाषांच्या जटिलतेमध्ये आपण न शिरता ऐतिहासिक तपशिलाच्या अंगानेच थोडं पुढे जाऊ या. किलग देशाचा राजा असलेला खारवेल हा जैन धर्माचा अनुयायी. मात्र त्याच्या हाथीगुंफा येथील शिलालेखात त्याच्या दुर्दम्य पराक्रमाचे आणि युद्धकौशल्याचे वर्णन येते. हे वर्णन अर्थात, त्याच्या समाजोपयोगी सकारात्मक कृतींच्या तपशिलासोबतच येत असले तरीही त्याच्या सामरिक दिग्विजयाचा तपशील सम्राटाच्या युयुत्सुवृत्तीकडे निर्देश करतो. गंग, राष्ट्रकूट, होयसळ वगरे जैनधर्माच्या तत्त्वज्ञानाकडे ओढा असलेल्या राजांनी युद्धात गाजवलेल्या पराक्रमांचा उल्लेख इतिहासात ठळक दिसून येतो.

बौद्ध धर्माच्या आदिम काळाचा इतिहासातील आणखी एक रोचक प्रसंग यानिमित्ताने पाहणे रोचक ठरेल. मगध सम्राट अजातशत्रूने पाठवलेला वस्सकार हा मंत्री बुद्धाला लिच्छवींवर विजय मिळवण्याविषयी मार्गदर्शन मागण्यास येतो. त्या प्रसंगी साक्षात बुद्धदेखील त्याला शांतीचा/समेटाचा मार्ग सुचवीत नाहीत. उलट, बुद्धाच्या प्रत्युत्तरातून, प्रबळ अशा लिच्छवींना मदानातील युद्धात हरविणे सोपे नसून त्यांना कूटनीतीद्वारेच हरवावयास हवे, याची कल्पना आल्याने त्यानुसार कूटनीतीचा वापर करून त्याने लिच्छवींमध्ये गृहकलह निर्माण केला आणि त्यांना त्यात गुंतवून मग राजाला आक्रमण करण्याची नीती वस्सकाराने वापरली. बौद्धसाहित्यात अन्यत्र (अंगुत्तरनिकाय) राजाकडे आवश्यक असलेल्या पाच साधनांचा उल्लेख बुद्धांनी केल्याचा संदर्भ मिळतो. हत्ती, घोडे, रथ, धनुष्य आणि तलवार ही बुद्धांनी सांगितलेली ती पाच साधने पाहता, बुद्धांना अभिप्रेत असलेल्या समाजकारणामध्ये युद्ध-राजनीती आणि हिंसा या गोष्टी तितक्याशा वज्र्य नसल्याचेच दिसून येईल.

औपनिषदिक आणि बौद्ध-जैन मतप्रणालींतून आलेल्या उदात्त वैचारिक व्यूहातील विशिष्ट धारणा, सांकेतिक चिन्हे आणि सुविचारांना आधुनिक भारताच्या राष्ट्रीय चिन्हांच्या स्वरूपात मान देणे हे आपले राष्ट्रीय कर्तव्य असले तरी प्रांतीय, धार्मिक, पंथीय, राष्ट्रीय अशा चौकटींच्या पलीकडे असलेल्या विशाल मानवतेचा इतिहास पाहताना आपल्याला या चिन्हांच्या इतिहासाकडे आणि त्याभोवतीच्या घटनांच्या जंत्रीकडे चिकित्सेच्या दृष्टीने पाहणे तितकेच, किंबहुना अधिक महत्त्वाचे आहे. वसाहत, कुटुंब, गणराज्य, चक्रवर्ती सत्ता, सुभे, सल्तनती, स्वराज्य अशा वेगवेगळ्या विकसनाच्या स्थित्यंतरांतून जाताना उपखंडातील समाजाने या व्यवस्थांच्या विकासनातील वेगवेगळे टप्पे अनुभवले, त्यातील परस्परविसंगत, टोकाच्या धारणांतील वैचारिक-सामरिक संघर्ष पाहिले. एखादा साधारण माणसाचा किंवा एखाद्या विलासी राजकुमाराचा प्रवास ऋषी, जिन, बुद्ध या अवस्थांकडे होताना दिसून येणारी मानवी मूल्यांची आणि व्यक्तिकेंद्री आणि व्यवस्थाकेंद्री धारणांमधली स्थित्यंतरेही या उपखंडातील लोकांनी पाहिली. त्या स्थित्यंतरांतून आकाराला आलेल्या उदात्त तत्त्वज्ञानप्रणाली आणि धारणा नसíगक-सामरिक व अन्य प्रकारच्या आपत्तींशी लढत आपापल्या परीने जपल्या, त्यांत भर घातली. अनेकविध मानवसमूहांनी या वैचारिक घुसळणीतून आपापल्या सामूहिक, सांस्कृतिक, राजकीय ओळखी निर्माण केल्या. धारणांचे धाग्यांच्या उकलीची ही बहुपेडी कहाणी परस्परविसंगत, बहुरंगी, बहुढंगी अशा धाग्यांच्या घट्ट विणेतून अधिक मोकळा श्वास घेत जाणार आहे. या संक्षेपातील उकलीतून आपल्या समाजातील या टोकाच्या विसंगती आणि संगतींच्या औचित्य-अनौचित्याची जाणीव कायम राखत आपल्याला हा प्रवास आणखी पुढच्या वळणांवर न्यायचा आहे.

धारणांचे धागे उलगडण्याच्या या प्रवासात बौद्ध-जैन धर्माच्या इतिहासाचा विस्तृत पट इतर वेगवेगळ्या संदर्भात आपल्याला पुन्हा पाहावा लागणार आहे. त्यामुळे आपल्या या संक्षिप्त चच्रेची दिशा पुढील लेखांतल्या चच्रेद्वारे पुन्हा थोडी बदलायची आहे. पुढच्या भागात आपण शुंग-गुप्त काळातील राजे, संस्कृत-प्राकृत महाकाव्यांतील युद्धविषयक धारणा व तत्त्वज्ञाने यांचा संक्षेपात आढावा घेऊन, महाभारताच्या महाकाय प्रासादात पाऊल टाकणार आहोत. त्यातूनच पुढे आपल्याला भगवद्गीता, तिच्यावरील भाष्यांतून आकाराला आलेल्या राजकीय मतप्रणालीविषयीच्या धाग्यांची आणि अन्य सामाजिक धारणांची अलगद उकल करायची आहे.

rajopadhyehemant@gmail.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 17, 2018 3:12 am

Web Title: war and human values
Next Stories
1 मुद्रा भद्राय राजते।
2 समाज-धारणांच्या गाभ्याकडे
3 धर्म, धम्म आणि श्रद्धा
Just Now!
X