भारताच्या सांस्कृतिक इतिहासाचा विस्तृत पट वेगवेगळ्या गाठी, थर आणि जटिल नक्षींनी युक्त असा आहे. या महाकाय पटाचे धागे तपासताना नेमके कसे उकलायचे, त्यांचा उलगडा कसा करायचा हा प्रश्न अभ्यासकांपुढे नेहमीच उभा राहतो. कधी इतिहास अध्ययनशास्त्राच्या विद्यापीठीय पद्धतींना असलेल्या चौकटींच्या शिडय़ांवरून उतरून परंपरेच्या गाभ्यात जाऊन क्वचित त्या गाठी सोडवाव्या लागतात. तर कधी त्या गाभ्याकडे पाहायच्या पद्धतींना आधुनिक संशोधनशास्त्राच्या चक्रात बसवून त्यांचे मंथन करावे लागते. इतके द्राविडी प्राणायाम करूनही काही मुद्दे राहतात, तर काही वेळा मांडणी करताना विशिष्ट संदर्भाना जोखताना वापरायच्या प्रमाणांवर आणि निकषांवर संकुचिततेचे किंवा हेत्वारोपाचे आरोप होतात. आजच्या संदर्भात विवक्षित राजकीय विचारसरणींच्या युद्धात उपलब्ध संदर्भसाधने आणि पुरावे यांच्यापेक्षा भावनिक पदरांना अतिरेकी महत्त्व प्राप्त होताना आपण पाहतो. अशा वेळी इतिहासाच्या प्रामाणिक अभ्यासकाने उपलब्ध साधनांविषयीचा विवेक, संशोधनपद्धतींचे प्रामाण्य आणि परंपरांच्या जडणघडणीच्या प्रक्रिया यांचा अधिकाधिक साकल्याने अभ्यास करणे क्रमप्राप्त ठरते. तोच इतिहासअभ्यासकाचा खरा ‘धर्म’ ठरतो.

गेल्या लेखामध्ये आपण ‘धर्म’ या महाकाय संकल्पनेच्या विवरात प्रवेश करून तिचे बहुपदरी अर्थ समजून घेण्यास प्रारंभ केला. हा अर्थ समजून घेताना आपण प्रारंभ ऋग्वेदापासून केला असला तरी पुढील मांडणी करताना आपल्याला वेद, बौद्ध साहित्य, जैन साहित्य असा एकच एक विशिष्ट क्रम किंवा त्याअंतर्गत पोटशाखा व ज्ञानप्रणालीविषयीचा कालानुक्रम किंवा विषयाच्या विस्ताराचा अनुक्रम ठेवून पुढे जाणे काहीसे अनुचित होईल. त्यामुळे या ठिकाणी जागेची-माध्यमाची मर्यादा आणि विषयाचा विस्तृत आवाका लक्षात घेऊन एक एक मुद्दा किंवा संकल्पना हाताळणार आहोत. अर्थात, या पद्धतीने जाता कोणत्याही प्रकारचा कालविपर्यास होणार नाही हेदेखील आपल्याला लक्षात घ्यायचे आहे. आजच्या संदर्भात ‘धर्म’ हा शब्द श्रद्धाप्रणाली किंवा तिच्याशी निबद्ध अशा कर्मकांड व सांस्कृतिक रचनेच्या अनुषंगाने रूढ पावला आहे. आपण आधीच्या लेखात पाहिल्यानुसार, पृथ्वीवरील विशिष्ट सृष्टीनियम, सूर्यचंद्रादींची गती, त्यानुसार चालणारे ऋतुचक्र, इत्यादी तत्त्वांना ऋग्वेदीय ऋषींनी अतिशय महत्त्व दिले होते, त्यासंबंधींच्या नियमनप्रणालीला त्यांनी ‘ऋत’ हे नाव दिले. मानवी जीवनाची गती आणि सारेच व्यवहार या ऋतनियमांवर अवलंबून असल्याने मानवी जीवनाच्या सुरळीत संचलनासाठी त्यांनी ऋतप्रणालीचे नियमन करणाऱ्या देवतांनादेखील अनन्यसाधारण महत्त्व दिल्याचे दिसून येते. बारकाईने निरीक्षण केले असता उपखंडामधील बहुतांश जीवनप्रणाली आणि इथे निपजलेल्या मुख्य धर्मव्यवस्थेवर (श्रद्धा-तत्त्वज्ञानप्रणाली)  या ऋत संकल्पनेचा प्रभाव ठळकपणे दिसून येतो.

ऋत संकल्पनेत अध्याहृत असलेल्या ऋतुचक्रामुळेच इथले सृष्टीचक्र सुरू असल्याने इथल्या अन्नव्यवस्था, जलव्यवस्था, त्यातून आकाराला येणाऱ्या सांस्कृतिक धारणा आणि जीवनपद्धती, इत्यादी गोष्टीदेखील ऋताधिष्ठितच आहेत. त्यातूनच पुढे राजकीय व्यवस्थेतील राजा वा समूहाचा नेता असलेल्या किंवा त्या त्या समूहावर अथवा भौगोलिक प्रदेशावर नियंत्रण ठेवून त्याचे नियमन करणाऱ्या व्यक्तीला ऋतपालक असलेल्या मित्रा-वरुणाच्या शक्तीचा अंश मानण्यास सुरुवात झाली. वरुण राजा ज्याप्रमाणे आपल्या गुप्तचरांच्या-गणांच्या माध्यमातून विश्वाचे नियमन करतो त्याप्रमाणे इथला नेता-राजा त्या प्रदेशाचे पालन करतो, अशा मध्यवर्ती कल्पनेवर बेतलेल्या मंत्रांनी अभिमंत्रण होऊन राजन्य वर्गातील नेत्यांना राज्याभिषेकादी कर्मकांडांतून अधिकार मिळू लागले. विशिष्ट ऋतूंच्या प्रारंभीचे उत्सव, ऋतुबदलाच्या वेळचे, कृषिहंगामाच्या निमित्ताने साजरे होणारे सण यांच्या अभ्यासाच्या दृष्टीने ऋत या संकल्पनेकडे पाहणे अगत्याचे ठरते, हे आपण पुढील भागांतून चच्रेचा विस्तार करताना पाहूच. पण थोडक्यात, धर्म या संकल्पनेचा विचार करताना आपल्याला मुख्य तीन गोष्टींचा विचार करावयाचा आहे. एक म्हणजे ‘श्रद्धा-तत्त्वज्ञानप्रणाली’ हा धर्म शब्दाचा आजच्या संदर्भातील रूढ अर्थ; दुसरा म्हणजे, वैश्विक मानलेल्या नियमांच्या चौकटींच्या आधारे मानवी समूहजीवनाच्या नियमनासाठी आखलेल्या नियमांच्या-कर्तव्यांच्या चौकटी हा दुसरा अर्थ आणि तिसऱ्या चौकटीत आपल्याला पाहायचे आहेत- श्रुति-स्मृति आणि बौद्ध व जैन तत्त्वज्ञान प्रणालींना अभिप्रेत असलेले अन्य संकीर्ण अर्थ. बौद्ध-जैन आणि धर्मशास्त्रीय संदर्भाची चर्चा करण्याआधी आपण आणखी काही संकल्पनांचा थोडक्यात परामर्श घेऊन मग धर्म शब्दाच्या गतिमानतेकडे पाहू या.

ऋत या संकल्पनेसोबतच धर्मशास्त्रात येणारी दुसरी महत्त्वाची संकल्पना म्हणजे- ‘ऋण’! ऋग्वेदामध्ये ऋषींच्या गोत्रांच्या व्यवस्था, पशूंची खिल्लारे, देवताशास्त्रीय प्राचीन-आदिम कल्पना, इत्यादी विविध घटकांतून साकारलेली संस्कृती आपल्याला ठळकपणे प्रतीत होते. पशुपालनासोबत कृषिव्यवस्था व अन्य स्थिर अशा लोकवस्तीच्या व्यवस्था आकाराला येऊ लागल्यावर विनिमय व अन्य मानवी जीवन व्यवहारांमध्ये ‘ऋण’ या संकल्पनेचा उद्गम झाला असावा. ‘शब्दकल्पद्रुम’ या उत्तरकालीन/आधुनिकपूर्व काळातील ग्रंथामध्ये ‘पुनर्देयत्वेन स्वीकृत्य यद्गृहीतम्’ (परत करण्याच्या बोलीवर घेतलेले धन) अशी ‘ऋण’ या संकल्पनेची व्याख्या केलेली असली तरी या कल्पनेचा विस्तार आणि प्रचलन वेदकाळापासून दिसते. त्या संकल्पनांना भौतिक जगातल्या मानवी व्यवहारातील निकषांच्या आधारे चित्रित केल्याचे स्पष्ट दिसून येते. ऋग्वेदामध्ये विविध देवतांना उद्देशून असलेल्या सूक्तांमध्ये (२.२७.४, २.२८.९) आदित्य, वरुण, इत्यादी देवतांची स्तुती-प्रार्थना करताना आलेले ऋणमुक्तीचे किंवा त्यासाठीच्या याचनांचे संदर्भ दिसतात. अशा संदर्भाची संख्या पाहता ‘ऋण घेणे-देणे’ हा प्रकार ऋग्वेदकाळात अगदी सर्रास चालत असे, असे दिसते. ऋग्वेदानुसार (१०.३४) जुगार खेळण्यासाठी कर्ज घेणाऱ्या (व हरलेल्या) माणसाला कर्ज देणाऱ्याकडे जाऊन सेवकत्व पत्करावे लागत असे. मात्र ‘ऋण’ फेडल्यावर त्या ऋणकोला त्या बंधनातून मुक्तीही मिळे (यथा शफं यर्थण संनयन्ति, अथर्ववेद ६.४६.३) असे अथर्ववेदात स्पष्ट म्हटले आहे.

वेदोत्तर काळातील स्मृतिवाङ्मयामध्येही ऋण या संकल्पनेची चर्चा विस्ताराने व विविध दृष्टिकोनांतून केली आहे. ‘नारदस्मृती’च्या ‘ऋणादान’ प्रकरणात कुटुंबातील पिता-काका, पितामह, पुत्र, इत्यादींनी केलेल्या कर्जाविषयी चर्चा दिसून येते. ऋण फेडण्याचे (किंवा वसूल करण्याचे) काम पित्याला जमले नाही तर ते काम पुत्राकडून अपेक्षित असल्याचा निर्णय नारद आपल्या स्मृतीत नोंदवतात –

‘इच्छन्ति पितर: पुत्रान् स्वार्थहेतोर्यतस्तत:।

उत्तमर्णाधमर्णेभ्यो मामयं मोचयिष्यति।।’

अर्थ : ऋणको किंवा धनकोपासून (कर्ज फेडून किंवा कर्ज वसूल करून) माझा पुत्र माझी सुटका करेल, अशा स्वार्थनिबद्ध हेतू/ आशेमुळे पिता पुत्रप्राप्तीची अपेक्षा करतो.

शिवाय,

‘न पुत्र्रण पिता दद्याद्दद्यात्पुत्रस्तु पतृकम्।’

अर्थात, पुत्राचे ऋण पित्याने फेडण्याचे कारण नाही, पण पुत्राने मात्र पित्याने केलेले कर्ज फेडले पाहिजे, असेही नारदांनी सांगितले आहे.

‘मनुस्मृती’मध्ये (८.१५९)-

‘प्रातिभाव्यं वृथादानं आक्षिकं सौरिकं च यत् ।

दण्डशुल्कावशेषं च न पुत्रो दातुमर्हति।’

पित्याने जुगार (आक्षिक) अथवा मद्यपानासाठी (सौरिक-सुरापानासाठी)कर्ज काढले असेल तर ते फेडायचे उत्तरदायित्व पुत्रावर नाही, असे स्पष्ट म्हटले आहे. ‘मनुस्मृती’मध्ये ऋणाची परतफेड करण्याच्या पद्धतींचा निर्देश करताना कायिक सेवा (दास्यत्व पत्करून शारीरिक मेहनत करून कर्ज फेडणे), मासिक पद्धतीने व्याज देणे किंवा चक्रवाढ पद्धतीने अथवा कर्जदाराच्या इच्छेनुरूप व्याज देणे अशा पद्धती नमूद केल्या आहेत. व्याज देण्यासंबंधी असलेल्या नियमांप्रमाणे व्याज घेण्यासंबंधीदेखील काही मते व निर्देश स्मृतिकारांनी दिलेले आहेत. व्याज घेताना ऋणकोचे वर्णव्यवस्थेतील स्थान पाहून व्याजाची रक्कम ठरवण्याचा निर्णय ‘मनुस्मृती’ने दिलेला आहे. कर्ज घेणारा ठरावीक मुदतीत कर्ज फेडू शकत नसेल तर कर्जाचा करार पुन्हा करून व्याज फेडण्याची तरतूद व अन्य आनुषंगिक नियम मन्वादि धर्मशास्त्रकार व कौटिल्याने बनवलेले आहेत.

मानवी व्यवहारातील या ऋणसंकल्पनेचा विस्तार धर्मकल्पनांच्या अनुषंगानेही झाल्याचे दिसून येते. वैदिक संहिता व ब्राह्मणग्रंथांमध्ये सर्व मानवांसाठी ‘ऋणत्रय’ या संकल्पनेची मांडणी केली आहे. जन्माला येणारा माणूस हा ‘ऋषीऋण’, ‘देवऋण’ आणि ‘पितृऋण’ या तीन ऋणांसोबत जन्मतो. यापकी ‘ऋषीऋण’ हे ब्रह्मचर्य-स्वाध्यायादि कर्तव्यांच्या पालनाने फेडावे, ‘देवऋण’ हे यज्ञादी विधींद्वारे व पितरांचे ऋण हे वंशवृद्धीद्वारे फेडावे असे ब्राह्मणग्रंथांत म्हटले आहे. व्यावहारिक अथवा भौतिक ऋणकल्पनेचा विस्तार असलेली ही कल्पना नीतिशास्त्र व श्रद्धाधिष्ठित धार्मिक कल्पनांशी जोडली गेल्याने ‘ऋण’ या संकल्पनेच्या विस्ताराला वेगळाच आयाम मिळाल्याचे दिसून येते. ‘ऋणत्रयां’च्या संकल्पनेचा साक्षात् संबंध भारतीय समाजव्यवस्थेचा महत्त्वाचे अंग असलेल्या आश्रमव्यवस्थेशी आपसूकच जोडला गेला. समाजातील गरजू व्यक्तींना ऋण देणे ही समाजातील आर्थिक-भौतिक व्यवहारविश्वाची अपरिहार्यता आहे, हे लक्षात घेऊन त्यानुसार स्मृतिकारांनी नियम बनवले. पुढे धर्मकल्पनांची व्याप्ती जसजशी वाढत गेली त्यासोबतच नतिक व श्रद्धाविषयक कर्तव्यांची व कल्पनांची सांगड घालून समाज-नियमन व व्यक्तिनिष्ठ नीतिनियमांद्वारे नतिक नियमनदेखील या संकल्पनांतून साधले गेले. ईश्वरविषयक संकल्पनांतून व्यक्त होणारी कृतज्ञता, ज्ञान देणाऱ्या ज्ञाननिर्मात्या ऋषींच्याविषयीचा ऋणीभाव आणि वंशवृद्धी व मानवजातीच्या वृद्धीचा-रक्षणाचा वारसा व शिकवण हस्तांतरित करणारे आपले पूर्वज यांच्याविषयीची कृतज्ञता अशा अनेक कल्पनांचा परिपोष ‘ऋणत्रय’ या चौकटीत झाला. मानवी कल्पनाविश्वातील आदिम आविष्कारांपकी अतिशय महत्त्वाच्या असलेल्या या कल्पनेतून पुढील सामाजिक-सांस्कृतिक व्यवस्थांच्या विकसनासाठी सुपीक पृष्ठभूमी तयार झाली.

वेदोत्तर/वेदेतर तत्त्वज्ञान व श्रद्धाप्रणालींमध्ये जिनर्तीथकर, भगवान बौद्ध, कपिलादि दर्शनकार व अन्य विवक्षित ज्ञानप्रणाली, तत्त्वज्ञानप्रणालींचे प्रणेते उदयाला आले. या दार्शनिक तत्त्वज्ञांना समाजाने आपले नेतेपण बहाल करून त्यांना आपले मार्गदर्शक, गुरू, आचार्य, भगवान मानले. त्यांच्या तेजस्वी ज्ञानसाधनेतून प्राप्त झालेल्या मूल्यांप्रति कृतज्ञताभाव समाजाने नेहमीच व्यक्त केला. त्यांनी प्रदान केलेल्या संचिताच्या ऋणातून मुक्त होण्यासाठी पुढील पिढीला ते ज्ञान संक्रमित करण्याची धारणादेखील या कल्पनेच्या अनुषंगाने दृढमूल झाली. त्यातूनच इथल्या ज्ञानपरंपरा विकसित झाल्या. ज्ञानाने श्रेष्ठत्व मिळवलेल्या या तत्त्वज्ञ मंडळींना समाजनिर्मितीचा अधिकार आपल्या समाजाने दिला. पुढे त्या प्रणालींतून उदयाला आलेल्या उपशाखा आणि संबंधित आचार्याच्या सामाजिक, सांस्कृतिक अधिकारांना विशिष्ट मर्यादेत राजकीय महत्त्वदेखील प्राप्त झाले. आणि राजसत्ता व धर्मसत्तांचे मक्ते घेणाऱ्या व्यवस्था निर्माण झाल्या. या व्यवस्थांचा इतिहास आणि त्याचे आजच्या संदर्भातून लावले गेलेले अर्थ यांचा विचार आपण पुढील भागांतून करणार आहोत. त्यासाठीची पृष्ठभूमी आणि संकल्पनांचे धागे आपण या आणि आधीच्या भागांतून उलगडत विषयप्रवेशाच्या पुढील टप्प्यावर येऊन पोहोचलो आहोत.

– हेमंत प्रकाश राजोपाध्ये

rajopadhyehemant@gmail.com