News Flash

मैत्रिणीची गोष्ट

डाएट, वेट लॉस, काय खावं, काय टाळावं याबाबत आता सगळीकडून माहितीचा पूर वाहतोय. पण घोडं अडतं, ते प्रत्यक्ष आचरणात आणताना! थिअरी ते प्रॅक्टिकलमधल्या गमतीजमतीमुळेच डाएटचा

डाएट, वेट लॉस, काय खावं, काय टाळावं याबाबत आता सगळीकडून माहितीचा पूर वाहतोय. पण घोडं अडतं, ते प्रत्यक्ष आचरणात आणताना! थिअरी ते प्रॅक्टिकलमधल्या गमतीजमतीमुळेच डाएटचा संकल्प धुळीला मिळतो. डाएटचं मनावर घेतलेल्या टीनएजर मुलीची ही डायरी त्यासाठीच!

आई ! माझ्या मत्रिणीला तुझ्याशी काही तरी खासगी बोलायचं आहे. मी आईला म्हटलं. तशी आई हसत म्हणाली, ‘आता काय खासगी बोलायचं बाकी राहिलंय? सगळं तर तुम्हा मुलींना हल्ली माहिती असतं. कळत असतं. तूच मला शिकवशील.’ मी तिला मोठे डोळे वट्टारून जरा दमात घेतलं. गमतीनं.. आईऽऽऽ असं जरा लाडात पुकारलं. हो! कारण ती एकदा बोलायला लागली की थांबतच नाही.

झालं असं होतं.. माझ्या मत्रिणीचा- मृण्मयीचा मला आदल्या रात्री फोन आला होता. ती रडत रडतच बोलत होती. टेन्स्ड होती. मृण्मयीला आई नाहीय. हृदयविकाराच्या धक्क्याने ती मृण्मयीच्या लहानपणीच वारली. बाबा, आजी, आजोबा यांची ही मृण्मयी अगदी लाडोबा आहे. फोनवर मला रडत रडत ती काही तरी सांगायचा प्रयत्न करत होती. मी आधी तिला शांत केलं. हळूहळू मला ती काय सांगतेय आहे हे उलगडलं आणि मी तिला माझ्या आईकडे यायचा सल्ला दिला.
दुसऱ्या दिवशी आई, मृण्मयी आणि मी दुपारी कॉफीला भेटायचं ठरलं. नेहमीप्रमाणे आपापली कामं आटोपून आम्ही भेटलो. मी माझ्या लहान बहिणीची पिटाळणी तिच्या मत्रिणीकडे आधीच केली होती. घर एकदम मोकळं व शांत होतं. मत्रिणीचे डोळे सुजलेले होते आणि आईच्या मुखावर एक हलकं स्मित होतं. एकदम समंजस! मी मात्र कुतूहल आणि भीती या मिश्र भावनेतून हा संवाद कसा काय होतो, या चिंतेत होते.

आईने सुरुवात केली. ‘कॉफीत साखर किती घालू बाळा!’ आईचं बाळा ऐकल्यावरच तिचे डोळे मुसमुसले. ‘काय झालं बाळा?’ म्हटल्यावर मृण्मयीनं गळाच काढला. ‘दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे’च्या २४ व्या रिपीट टेलिकास्टलासुद्धा रडणारी माझी आई, अशा प्रसंगी एकदम शांत असते. कदाचित डॉक्टर अंगात संचारत असावा. मृण्मयीने सुरुवात केली. ‘मावशी, तीन महिने पाळी आलेली नाहीय मला. काय झालं असेल?’ मृण्मयी माझी लहानपणापासूनची मैत्रीण. ती कशी आहे, याची आईला चांगली जाणीव. त्यामुळे हे पाळी लांबल्याचं प्रकरण प्रेग्नसीमुळे नाही, याची आईला खात्री होती. सध्या मृण्मयीचं डाएट सुरू आहे आणि तिने ६ महिन्यांत १५ किलो वजन कमी केलेलं आहे, हेदेखील आईला माझ्याकडून कळलेलं होतं. (मृण्मयीचीच तर हवा मला लागली होती. त्या फॅड डाएटचं प्रकरणातला तो कागदस्वरूपी आहारतज्ज्ञ तिच्याच काकीचा होता.) आईने नेहमीप्रमाणे प्रश्न विचारायला सुरुवात केली आणि बोलता बोलता तिच्यासमोर खजूर अक्रोडचा केक ठेवला. मृण्मयीनं नाही म्हटलं. आईने तिची सर्व बाजू ऐकली आणि मग म्हणाली, ‘मी आज पालक पनीर करणार आहे. रात्री जेवायला थांब.’ तिने त्यालाही नाही म्हटलं. गेले चार महिने मृण्मयी रात्री नॉर्मल जेवत नाहीय. पाणी, भाज्यांचं सूप वगैरे पिते. तिच्या डाएटचा भाग आहे तो.
आईची एक खासियत आहे. तिला जर कोणाला झापायचं असेल ना तर ती आधी त्याचं कौतुक करते. त्याला थोडंसं झाडावर चढवते आणि मग दोन-तीन चांगले शब्दांचे चाबूक मारून त्यांच्या चुका अशा प्रकारे दाखवते की, तुम्ही ‘मी हे केलंच नाही, हे बोलू शकत नाही.’ मग तुमचा राग, अपराधी भावना परत तुमच्या चांगुलपणाचं कौतुक करून थोडीशी कमी करते.

तुमच्याकडून ‘परत ही चूक करणार नाही’ हे कबूल करून मग सोडून देते. (मला हे माहीत आहे, हे अजून आईला माहीत नाही!)
सर्व चौकशी केल्यावर आईने तिला तिचा सध्याचा दैनंदिन आहार विचारला व आम्ही चाटच पडलो. त्या आहारात ना प्रथिने, ना व्यवस्थित पिष्टमय पदार्थ, ना जीवनसत्त्वांची भर. आईने तिला रक्त तपासायला सांगितलं. प्राथमिक व स्वस्त रक्त तपासण्यांकडे आईचा कल असतो. दोन दिवसांनी मृण्मयी जेव्हा रिपोर्ट घेऊन आली. तेव्हा आम्ही गारच पडलो. बाईचे रक्तातील लोहाचं प्रमाण सहा होतं. मग मात्र आई जराशी काळजीतच पडली. आपण पट्कन, डायट करून जेव्हा वजन कमी करतो तेव्हा आपल्या पोटात पौष्टिक आहार जात नाही. तो जाणं शरीरासाठी, स्नायूंसाठी, हाडांसाठी अत्यावश्यक असतो. आपण बाहय़ सौंदर्यावर भर देतो. त्याबरोबरच आपलं अंतर्गत सौंदर्य – धष्टपुष्टता ही अत्यंत महत्त्वाची आहे. व्यायाम हाही तेवढाच महत्त्वाचा आहे. आहारात खजूर, गूळ, हिरव्या पालेभाज्या गरजेचं आहे. तसेच अंडी, चिकन यांचंही योग्य प्रमाणात सेवन करणं गरजेचं आहे. या सगळ्याची कल्पना मृण्मयीच्या वडिलांना आईनं दिली. तिला ओरडा बसला नाही, पण तिची चूक तिला कळली. बिचारीला हॉस्पिटलमध्ये अॅडमिट व्हायला लागलं. पूर्व चाचण्या वगरे केल्यावर रक्तही द्यायला लागेल कदाचित. अशी ही एक कहाणी.
(लेखिका वैद्यकीय तज्ज्ञ आणि स्पोर्ट्स न्यूट्रिशनिस्ट आहेत.)

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 29, 2016 1:07 am

Web Title: diet stories teenager girl says about her diet
टॅग : Diet,Viva
Next Stories
1 श्रीगणेशा..
2 मॅरेथॉन मॉम
3 ‘फॅड डाएट’ची ऐशीतैशी
Just Now!
X