डाएट, वेट लॉस, काय खावं, काय टाळावं याबाबत आता सगळीकडून माहितीचा पूर वाहतोय. पण घोडं अडतं, ते प्रत्यक्ष आचरणात आणताना! थिअरी ते प्रॅक्टिकलमधल्या गमतीजमतीमुळेच डाएटचा संकल्प धुळीला मिळतो. डाएटचं मनावर घेतलेल्या टीनएजर मुलीची ही डायरी त्यासाठीच!

आई! आई! आई ! आई ! मी जोरजोरात हाका मारत घरात शिरले. आई जराशी वैतागून ‘काय आहे? आई, आई ?’

मी लगेच जरा लाडात येऊन ‘मम्मा! मम्मा! मम्मा!’.. आता मात्र आई बऱ्यापैकी वैतागली ‘काय हवंय ते लवकर सांग..’

मला जराशी भूक लागलेली होती. खरं तर भूक लागली होती, पण ती अशी घरच्या जेवणाची नव्हती. म्हणजे आपल्याला कशी कधी कधी कोल्ड्रिंकचीच तहान लागते. साधं पाणी ती भागवू शकत नाही, तसंच मला छान काहीतरी खाण्याची भूक लागली होती. आईला सांगितल्यावर तिने नेहमीचा पाढा वाचला, ‘भाजी – पोळी, आमटी – भात.’ मी नाक मुरडलं. ‘कालचं चिकन, पास्ता, मावशीने पाठवलेलं कोलंबीचं भुजणं?’.. माझं तोंड वाकडंच! दही-भात (शेवटचा ऑप्शन) हवा तर कालवून देते. का मस्त अंडाभुर्जी करू? मग मी माझा ठेवणीतला डायलॉग मारला – ‘शी! काहीच नसतं तुमच्या घरात.’

काय? हा सुखसंवाद ओळखीचा वाटतोय का तुम्हाला? तुमच्या घरातही होतो ना असा संवाद? त्या दिवशी माझी ‘छान काहीतरी खायची’ भूक भागवायला मी सरळ बाहेर पडले आणि टिब्सची चिकन फ्रँकी खाल्ली. चिकन पोटात गेलं आणि फ्रँकीची छान चव घोळत मन शांत होत होतं. फ्रँकीवाले दादा रोज विचारायचे ‘काय आज घरी नाही का जेवण?’ मी म्हणायचे, ‘नाही कंटाळा आलाय आज घरच्या जेवणाचा!’ फ्रँकीचे चावे घेत, आलेला कंटाळा घालवत मी विचार केला – आपल्याला घरच्या जेवणाचा का कंटाळा येतोय? म्हणजे .. वाघाचे पंजे. तेच घर, तेच लोक.. अर्थात माझीच माणसं, सर्व लाडकी; पण तरीही तीच कानामागची भुणभुण. तेच सकस खाण्याचे सल्ले, जीवन जगण्याचे सल्ले, तेच रोजचं रडगाणं.. त्याच रोजच्या मराठी मालिका, उपदेशाचे डोस.. सारंच बोरिंग होतं.

मी लहानपणचे माझे फोटो पाहते तेव्हा मला आई वेगवेगळ्या अवतारात भरवताना दिसते. माझ्या आठवणीतली आई कधी मला धावत, कधी पकडापकडी खेळत, कधी लपाछपी खेळत भरवायची. एका फोटोमध्ये दमलेली आई मला चक्क बाथरूममध्ये पाण्याने भरलेल्या बादलीत बसवून भरवत होती. बिच्चारी! किती त्रास दिलाय मी तिला. पण त्या वेळी तिच्या हाताला, तिच्या जेवणाला काही वेगळीच चव होती. कसं काय बरं आता तिच्या हातचं जेवण नको वाटतं? खूप विचार केला, तेव्हा माझं मलाच कोडं उलगडलं. त्याला कारण म्हणजे मला तिच्यासोबत, तिला माझ्यासोबत मिळालेला वेळ. आजकाल आम्हा दोघींना वेळच नसतो एकमेकींसाठी. ती तिच्या कामाच्या व्यापात. तिची कामं, तिचं तेच दिवसभराच रुटीन. मला मात्र त्याच त्याच रोजच्या गोष्टींचा कंटाळा यायला लागलाय. कंटाळा घालवायचा उपाय मी शोधलाय तो हा असा घराबाहेर पडण्याचा.

परीक्षा संपल्यानंतरची दुपार. दुपारची डुलकी लागली. अर्थात ‘बोअर’ झाले होते, म्हणून एक छान छोटंसं स्वप्न पडलं. स्वप्नात मी शाळेतून घरी आले. आईने चक्क सारं घर फुलांनी सजवलं होतं. तिनं आमचं स्वागत खूप छान केलं. मी, बाबा आणि माझी धाकटी बहीण आश्चर्यचकित झालो. पाहुणे घरी येतात त्याच वेळी काढायची क्रोकरी आज तिने आमच्यासाठी मांडली होती. गणपतीच्या वेळीच बाहेर काढायचा टेबल क्लॉथ अंथरलेला होता. काचेच्या प्लेट्स, ग्लासेस..क्या बात है! आल्या आल्याच स्पेशल वाटलं. आईने फक्कड मासे तळले होते, चिकन होतंच. गरमागरम फुलके, कोिशबीर सर्व वातावरण इतकं मस्त होतं की, खूप मज्जा आली एकत्र जेवताना. शाळेच्या गप्पा, बाबांच्या गमतीजमती, आईच्या जुन्या आठवणी यामध्ये आम्ही चक्क तासभर जेवणाच्या टेबलावर होतो. कोणीही – लवकर आटप, उशीर होतोय, किती बडबड असं काहीही म्हणत नव्हतं. मी आणि माझी लहान बहीण फक्कड जेवलो – न भांडता. तेवढय़ात आईची हाक कानावर आली.

खडबडून जाग आली. मी पट्कन तिच्या कुशीत शिरले. तिला स्पप्नाची हकीकत सांगितली. ती फक्त ऐकत होती. काहीच बोलली नाही. दुसऱ्या दिवशी आम्ही घरी आलो, तर काय.. खरंच! आईने माझं स्वप्न पुरं केलं होतं. जसं स्वप्नात होतं ना तसंच सर्व.. अनपेक्षित मिळालेला आनंद जरी क्षणिक असला तरी तो आठवणींच्या खजिन्यात कायमचा जमा होतो. सर्वाच्या तृप्त नजरा, भरलेली पोटं, तोंडावरील हास्य, अंगावर सांडलेला रस्सा, तडकलेली महागडी प्लेट, डागाळलेला टेबलक्लॉथ, आईच्या मागे मदतीला उभं राहून उपसलेला भरपूर कामाचा रगाडा.. या सगळ्याच्या पाठीमागे मात्र राहिलेली एक सुंदर आठवणीची दुपार!

(लेखिका आरोग्यतज्ज्ञ आणि स्पोर्ट्स न्यूट्रिशनिस्ट आहेत.)