डाएट, वेट लॉस, काय खावं, काय टाळावं याबाबत आता सगळीकडून माहितीचा पूर वाहतोय. पण घोडं अडतं, ते प्रत्यक्ष आचरणात आणताना! डाएटचं मनावर घेतलेल्या टीनएजर मुलीची ही डायरी त्यासाठीच!
मे महिन्याच्या सुट्टीत आमचं रणथंबोरच्या जंगलात जायचं ठरत होतं. आम्ही लगेचच आमच्या ओळखीच्यांकडे बुकिंग केलं. प्लॅन असा होता – संध्याकाळी आम्ही मुंबईहून ट्रेनने निघणार होतो. सकाळी सवाई माधवपूर. वा! मज्जा येणार. मला ट्रेनचा प्रवास भारी आवडतो. तऱ्हेतऱ्हेचे खाद्यपदार्थ येतात. गावं बदलली की, खाणं बदलतं. अर्थात कुठलं स्टेशन कधी येतं हे काही आठवत नाही मला. पण.. कर्जतचे बटाटेवडे मस्त असतात, डहाणूची डाळिशग – ढोकळा, वलसाडचे डिस्कोवडे, कल्याणचा मसाला डोसा, वाडीला मेदूवडा, कोकण रेल्वेची बिर्यानी, ‘राजधानी’तलं एकूणच जेवण फक्कडच असतं असं म्हणतात. खरं-खोटं देवाला माहीत. आमची ट्रिप ठरल्यावर यावरची चर्चा अफाट झाली. वाटेत येणारी स्टेशनं.. हलत्या गाडीत टॉयलेटला कसं जायचं? पत्त्यांचा डाव, चहावाल्याकडचं प्लॅस्टिक कपमधला चहा वगरे वगरे.. ट्रिपची मजा प्लॅनिंगपासूनच सुरू होते आणि अशा चर्चाना उधाण येतं.

पण आई होती बरोबर म्हटल्यावर.. शेवटी रेल्वेमध्ये येणाऱ्या केवळ गरमागरम गोष्टी खायचं ठरलं. चटणी, पाणी वगरे प्यायचं नाही अशी तंबी देण्यात आली. रात्रीचं जेवण म्हणजे मस्त तिखट पुऱ्या, चुंदा, लोणचं, दहय़ाचे प्रत्येकी छोटे डबे, योगर्ट टेट्रापॅक सकाळी दूध, काही पटकन सोलून खाता येतील अशी फळं, चणे, शेंगदाणे आणि पाणी.. अर्थात आईला न दाखवता आम्ही प्रिंगल्स, लेज वगरेची पाकिटं घेतली होती. काही चॉकलेट्स होती. वितळली नाहीत म्हणजे झालं. ट्रेनच्या प्रवासालाच इतकं खाण्याचं सामान? असं विचारताय.. आमच्या बाजूला खरे काका व काकी राहतात ते चक्क दोन दिवसांचा (हौसेला मोल नाही व उत्साहाला सीमा नाही) प्रवास करून कलकत्त्याला गेले होते. कपडय़ांच्या सामानाएवढंच त्यांचं खायचं सामान होते. मेथीचे थेपले, मिरचीचं लोणचं, पुरणपोळीपेक्षा तेलपोळी जास्त दिवस टिकते म्हणून ती, गूळपोळी चॉकलेटपेक्षा बरी म्हणून ती, शिवाय खाकरे. तसेच चहाबरोबर खायला मठरी, टोस्ट वगरे होतं, सुकामेवा होता, कोकम सिरप घेतलं होतं, थर्मासमध्ये चहा भरायचे आणि चिअर्स करून पत्ते खेळता-खेळता चहाचे भुरके मारायचे. मस्तच जोडी आहे बुवा खरे काका-काकींची. आपल्याला आवडलं हे ट्रेन प्रवासातल्या खादाडीचं प्लॅनिंग.

असो.. आमची तयारी बऱ्यापकी झाली. जंगल सफारीमुळे सगळे कपडे साधे मळखाऊ घेतले होते. तसेच मी माझा सर्व खाऊ (चिप्स, चॉकलेट्स वगैरे) लपवून ठेवला होता आणि लास्ट बर्थवर जाऊन तो मी धाकटीपासून लपवून पुस्तक वाचत गाणी ऐकत खाणार होते. प्लॅिनग सॉलिड होतं. स्टेशनातून गाडी सुटली. आईने सवईप्रमाणे गणपतीस्तोत्र म्हटलं. मी मनात ‘रिअली!!’ म्हटलं. गाडीत आमच्या डब्यात सॉलिड जाडा मुलगा होता. खाते-पिते घर का! त्याचे आईवडीलही अंगाने जबरच होते. प्रत्येक स्टेशनवर ते बाहेरचे खायचे. म्हणजे बटाटेवडे काय, डिस्कोवडे, भजी, ढोकळा, मसाला डोसा, पेप्सी, माझा विचारू नका सगळीकडे घाण करून ठेवली.

आईने माझ्याकडे नुसती नजर टाकली. गपगुमान गांधीजींचे अनुयायी मोदींची स्वच्छ भारत अभियान मोहीम राबवायला लागलो तसे जाग उठा गुजरात लाजेखातर कामाला लागला. डब्बा पाच मिनिटांत स्वच्छ झाला. आई नेहमीप्रमाणे कुठलं तरी आहाराचं पुस्तक वाचत होती. धाकटी नुसतीच इकडेतिकडे बाहुली घेऊन लुडबुड करत होती. आम्ही मात्र सर्व सेकंड एसीमधून बाहेर गरमीच्या झळा बघत सकाळी सवाई माधवपूरला पोहोचलो. जरासा उशीरच झाला होता. मुंबई सोडून सर्व ठिकाणी गरमीच गरमी होती. काश हम नॉर्थ गये होते! मकई की रोटी नि सरसो का साग! उगाच ‘डीडीएलजे’ आठवला. एव्हरग्रीन पिक्चर.

गरमी-उष्मा-साधं खाणं हे एक उत्तम समीकरण आहे. मागच्या सुट्टीत नागपूरला मे महिन्यात मस्त सावजी मटण रापलं व मग माझी कढी पातळ झाली होती. अर्थात रक्तही पडलं. तेव्हापासून ठरवलं. गरमीमध्ये गरम मसाला, मटणाचा मस्त झणझणीत रस्सा वगरेच्या भानगडीत पडायचं नाही. राजस्थानला जाऊनही लालमास हुकणार याने नाश्त्यालाच वाईट वाटलं. आई कदाचित परवानगी देईल म्हणून आलू पराठे व मस्त दही खाऊन घेतलं. भरपूर पाणी प्यायले व जरासं जेवताना चाखायची परवानगी मिळाली. त्यावर मस्त गारगार आईस्क्रीमही खायला मिळालं. चंगळच चंगळ! मज्जाच मज्जा!