१.७० लाख कोटींचा महसूल जमा

देशात वस्तू व सेवा कर (जीएसटी) संकलनात महाराष्ट्र अग्रस्थानी असून १५ टक्के हिस्सा असल्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी गुरुवारी सांगितले. राज्यात २०१८-१९ या आर्थिक वर्षांत १.७० लाख कोटी रुपयांचा महसूल जीएसटीतून संकलित झाला आहे. गेल्या आर्थिक वर्षांच्या तुलनेत ८ टक्क्यांनी उत्पन्न वाढले असल्याची माहिती मुनगंटीवार यांनी दिली.

मुनगंटीवार म्हणाले की, राज्यात वस्तू आणि सेवा कर प्रणाली आता स्थिरावली आहे. करसुलभता, व्यवसायवृद्धी आणि महसूलात वाढ  असा तिहेरी लाभ राज्याला होत आहे.  राज्यात वित्त, विमा आणि बँकिंग क्षेत्रातील सेवांचा सर्वात मोठा ग्राहक आहे.  त्यांचे दरडोई उत्पन्न इतर राज्यांच्या तुलनेने जास्त आहे. त्यामुळे करसंकलन वाढले आहे. कराच्या दरात कपात आणि खरेदीवर भरलेल्या करात वजावट याचा लाभ ग्राहकांपर्यंतही पोचविण्यात येत असल्याचे मुनगंटीवार यांनी सांगितले.

कर प्रणाली अधिक सुटसुटीत केल्याने नोंदणीकृत व्यापाऱ्यांची संख्या सात लाख ७९ हजारावरुन दुप्पट झाली आहे आणि १५ लाख ६४ हजारापर्यंत गेली असल्याचीही माहिती त्यांनी दिली.