जय पाटील
निवडणुका आल्या की उमेदवारांना आपली पाळं-मुळं आठवणं हे भारतीयांसाठी तसं काही नवं नाही, पण जागतिक महासत्ता असलेल्या अमेरिकेच्या निवडणुकांची अवस्थाही आपल्यापेक्षा काही वेगळी नाही. उपराष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणूक रिंगणात उतरल्यापासून कमला हॅरिस यांना आपल्या भारतीयत्वाची प्रकर्षाने आठवण येऊ लागली आहे. भारताविषयीच्या विविध आठवणींना उजाळा देऊन झाल्यानंतर त्यांनी आता इन्स्टाग्रामवर अमेरिकी-भारतीय असण्याची तीन लक्षणे दाखवणारा व्हिडीओ शेअर केला आहे. त्यात त्यांनी भारतीयांच्या आहारात डाळींवर असणारा भर अधोरेखित केला आहे.

व्हिडीओमध्ये हॅरिस आणि अभिनेत्री मिंडी केलिंग एकत्र स्वयंपाक करताना दिसतात. कमला हॅरिस यांची आई आणि मिंडीचे आई-वडील दोघेही भारतीय असल्यामुळे अमेरिकी भारतीय म्हणून वाढलेल्या व्यक्तींच्या वैशिष्ट्यांविषयी दोघींमध्ये हास्यविनोद सुरू असल्याचे दिसते. यात त्यांनी अमेरिकी भारतीय ओळखण्याचे तीन मार्ग सांगितले आहेत. एक म्हणजे भारतीयांना मसाले आणि अन्य जिन्नस काचेच्या बरण्यांमध्ये भरून ठेवायला आवडते. त्यामुळे अमेरिकी भारतीयांच्या किचनमध्ये टेस्टर्स चॉइस या कॉफीच्या वापरून झालेल्या बरण्यांमध्ये विविध जिन्नस साठवलेले हमखास दिसतात. दुसरे म्हणजे भारतीयांसाठी आपल्यापेक्षा वयाने मोठी असलेली प्रत्येक व्यक्ती अंकल किंवा आंटी असते. आणि तिसरा गुणधर्म म्हणजे भारतीयांचं डाळींवर असलेलं प्रेम. ज्याच्या आहारात डाळींचा मुबलक प्रमाणात समावेश आहे, ती व्यक्ती भारतीय आहे, असे समजावे, असे या व्हिडीओत म्हटले आहे. किचनमध्ये मसूरची डाळ शिजवण्यात येत असल्याचे आणि भारतीय जेवणाचा आस्वाद घेत असल्याचे दृष्यही या व्हिडीओमध्ये आहे.

अमेरिकेत भारतीय मतदारांची संख्या मोठी आहे. त्यामुळे एरव्ही स्वतःला आफ्रिकन अमेरिकन म्हणूनच जगासमोर सादर करणाऱ्या हॅरिस यांना उपाध्यक्षपदाची उमेदवारी मिळाल्यापासून भारतीयत्वाची वारंवार आठवण होऊ लागली आहे. याआधीही त्यांनी आईच्या हातची इडली, देवळात जाऊन नारळ फोडणे, चेन्नईत आजोबांबरोबर मारलेला फेरफटका अशा भारताशी संबंधित आठवणींना उजाळा दिला होता. आता त्यात या डाळीची भर पडली आहे. याचा फायदा त्यांना होईल का, भारतीय मतदारांपुढे त्यांची डाळ शिजेल का हे निकालांनंतरच स्पष्ट होईल.