कोलंबस शहर सभागृह, पहिले बाप्टिस्ट चर्च, पहिले ख्रिश्चन चर्च अशा एक ना अनेक ऐतिहासिक वास्तूंचा वारसा घेऊन अमेरिकेत वसलेल्या कोलंबस इंडियानाची आणखी एक ओळख आहे ती- अभियांत्रिकीची. कोलंबस- इंडियानामध्ये जगातील तमाम बडय़ा मोटार कंपन्या तसेच विविध उद्योगांना लागणारी इंजिने पुरवणारी ‘कमिन्स’ ही बडी कॉर्पोरेट कंपनी वसली आहे. अभियांत्रिकीत अनेक संशोधने करून मोठय़ा ट्रकपासून ते अगदी जनरेटरच्या   इंजिनापर्यंत विविध प्रकारची इंजिने या कंपनीत बनविली जातात. ‘कमिन्स’मधील कार्यसंस्कृतीवर एक दृष्टिक्षेप..

व्हाइट नदीच्या पूर्वेला वसलेले इंडियानातील कोलंबस हे शहर अमेरिकेतील विसावे मोठे शहर आहे. या शहराची आणखी एक खासियत म्हणजे येथे इतिहासाच्या अनेक पाऊलखुणांची नोंद आहे. यामुळे ‘नॅशनल जीओग्राफिक ट्रॅव्हलर’ने या शहराला जगभरातील ऐतिहासिक स्थानांच्या यादीत अकरावे स्थान दिले आहे. अशा ऐतिहासिक शहरात उद्योगाचाही इतिहास लिहिला गेला आहे. इंजिन विकसित करणारी जगातील सर्वात मोठी कंपनी ‘कमिन्स’चे मुख्यालय याच शहरात आहे. या कंपनीत काम करण्याची संधी मला मिळाली हे माझे भाग्य. या कंपनीत काम करणे म्हणजे प्रत्येक क्षणाला नवीन काहीतरी शिकण्यासारखे आहे.

आयआयटीमध्ये अभियांत्रिकीचे शिक्षण घेत असताना मी टाटा मूलभूत विज्ञान संस्थेत संशोधनाकरता गेलो होतो. तेथील प्राध्यापक डॉ. मयांक वाहिया यांनी विद्यार्थी उपग्रह विकसित करण्याची संकल्पना माझ्या मनावर बिंबवली. मला मुळातच संशोधनाची आवड असल्यामुळे त्यांचे प्रोत्साहन मिळाल्याने ती वाढत गेली. पुढे आयआयटीत मी विद्यार्थी उपग्रहाची मुहूर्तमेढ रोवली. माझे आयआयटीतील शिक्षण २००९ साली पूर्ण झाले. त्यानंतर मी ‘प्रथम’ या विद्यार्थी उपग्रह मोहिमेत पूर्णवेळ सहभागी नव्हतो तरी विविध कारणांनी त्या चमूशी माझी चर्चा होत होती. नुकतेच या उपग्रहाचे प्रक्षेपण झाले आणि माझे संशोधनातील एक स्वप्न पूर्ण झाले.

‘प्रथम’मुळे संशोधनातील माझी रुची अधिकच वाढली. २००९ मध्ये आयआयटीत पदवी शिक्षण पूर्ण केल्यावर पुढील शिक्षणासाठी मी परडु विद्यापीठात दाखल झालो. तेथे पीएच. डी. करत असताना एक खूप वेगळा अनुभव मला आला. शाळा, महाविद्यालयात किंवा क्लासमध्ये शिकत असताना शिक्षक सतत आपल्यासोबत असायचे. काही अडचण आली की थेट शिक्षकांना जाऊन भेटायचं आणि आपली समस्या त्यांच्याकरवी सोडवून घ्यायची, हा आपल्याकडचा शिरस्ता. पण इथे असे काहीच नव्हते. इथे प्रत्येक व्यक्ती स्वतंत्र गणली जाते. आणि त्या व्यक्तीने तिच्यासमोरील आव्हानाला स्वत:च तोंड द्यायचे असते. पीएच. डी. करत असताना माझ्या विषयातील वेगवेगळे अनुत्तरित प्रश्न मीच शोधून काढायचो आणि त्यावरील उत्तरंही मीच शोधायचो. माझे मार्गदर्शक केव्हातरी एकदा भेटायचे आणि मी केलेल्या कामाबद्दल आम्ही चर्चा करायचो. ते सदैव आपल्यासोबत नसल्यामुळे एखाद्या समस्येवर उत्तर शोधण्याची आपली जिज्ञासा वाढते आणि त्यानिमित्ताने आपला अभ्यास होतो, ही इथल्या या नियमामागील मानसिकता आहे. पीएच. डी. करत असतानाच ‘कमिन्स’मध्ये मी प्रणाली नियंत्रण विभागात इंटर्नशिपसाठी रुजू झालो. अवकाश प्रणालीतील गुंतागुंतीचा अभ्यास करून त्यावर तोडगा काढणे हा माझा अभ्यासाचा विषय होता. अनेक तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊन मी माझा प्रबंध सादर केला आणि पीएच. डी. पूर्ण केली. पीएच. डी. करत असतानाच ‘कमिन्स’ कंपनीशी माझे नाते जोडले गेले. शिक्षण पूर्ण झाल्यावर मी याच कंपनीत मला पूर्णवेळ कामाची संधी मिळेल का, अशी विचारणा केली. त्यावेळी तेथे मी जे काम करतो त्यासाठीची रिक्त पदे होती. मग माझी रीतसर मुलाखत घेऊन निवड करण्यात आली.

‘कमिन्स’मध्ये पूर्णवेळ रुजू झाल्यानंतरचा अनुभव हा पूर्वीच्या अनुभवापेक्षा आणखीन वेगळा होता. इथे काम करणारे वरिष्ठ आणि कनिष्ठ हे एकमेकांशी चर्चा करून मगच सर्व निर्णय घेत असतात. तसेच आपल्या कनिष्ठांना समजावून सांगण्याचीही चांगली पद्धत इथे असल्याचे जाणवले. मी जेव्हा या कंपनीत पूर्णवेळ रुजू झालो तेव्हा कंपनीत खूप वर्षांचा अनुभव असलेली मंडळी होती. मी त्या चमूमध्ये पूर्णपणे नवीन होतो. चर्चेच्या वेळेस मला जर एखादी गोष्ट कळली नाही तर मी उठून प्रश्न विचारायचो. हे प्रश्न अनेकदा अगदी प्राथमिक असायचे. मात्र, त्याचे उत्तर देण्यासाठी कोणीही कंटाळा करत नसे. प्रत्येक प्रश्नाचे माझे समाधान होईपर्यंत उत्तर दिले जाई. मी ज्या व्यवस्थापकांच्या हाताखाली काम करत होतो त्यांना परिपूर्ण तांत्रिक दृष्टी होते. त्यांना तांत्रिक त्रुटी अजिबात खपत नसत. त्यामुळे संशोधनाच्या वेळी जर एखादी संकल्पना त्यांना सुचवली तर ते त्या संकल्पनेचा तांत्रिक अंगानं किस पाडायचे. ते इतके प्रश्न विचारायचे, की आपल्याला त्या प्रश्नांची उत्तरे शोधणे भागच पडे. पण याचा फायदा असा झाला, की पुढे कोणत्याही गोष्टीचा विचार करताना मी सगळे संभाव्य तांत्रिक मुद्दे लक्षात घेऊन त्यावर काम करू लागलो. एखादे काम दिलेल्या वेळेत कसेतरी पूर्ण करणे असे इथे अजिबात चालत नाही. काम परिपूर्ण आणि अचूक होण्यावरच कायम भर दिला जातो. कंपनीमध्ये दर तिमाही उद्दिष्टे ठरवली जातात. ही उद्दिष्टे वरिष्ठ ठरवतात आणि कनिष्ठ कर्मचाऱ्यांना ती सांगतात असे घडत नाही. तर वरिष्ठ आणि कनिष्ठ कर्मचारी एकत्रित बसून ही उद्दिष्टे ठरवतात. तसेच इथे वेळेला खूप महत्त्व आहे. मी संशोधन विभागात काम करत असल्यामुळे आमच्या विभागाला एखाद्या प्रकल्पावर काम करण्यासाठी मुबलक अवधी मिळत असला तरी उत्पादन आणि अन्य विभागांसाठी काळाची मर्यादा ही तुलनेत कमी अवधीची असते.

आमची कामाची वेळ सकाळी ८ ते संध्याकाळी ५ अशी आहे. यापेक्षा जास्त वेळ काम करणे हे कमीपणाचे मानले जाते. दिलेल्या वेळेतच काम पूर्ण करणे म्हणजे नियोजनबद्ध काम असे समजले जाते. घरी जाऊन काम करणे हेही चुकीचे मानले जाते. कार्यालयीन वेळातच काम पूर्ण झाले पाहिजे असा इथल्या कंपन्यांचा दंडक आहे. यातूनच इथे काम आणि व्यक्तिगत आयुष्य यांचा समन्वय साधणारी आगळी कार्यसंस्कृती रुजली आहे. कामाच्या दरम्यान वरिष्ठ आणि कनिष्ठ यांच्यात कोणतेही अंतर राहू नये यासाठी कोणत्याही सभेच्या आधी इथे एका कुणाच्या तरी बसण्याच्या जागेवर त्या विषयासंबंधी चर्चा केली जाते. त्यामुळे प्रत्यक्ष सभेमध्ये चर्चा होताना ती अधिक खुली आणि नियोजनबद्ध पद्धतीने होऊ शकते.

आपल्या कर्मचाऱ्यांनी अधिक चांगले काम करावे या उद्देशाने त्यांना तशा सुविधाही कंपनीकडून दिल्या जातात. काम करण्यासाठी आवश्यक असलेली साधने कंपनीच्या स्टोअरकडून मागणीनुसार पुरविली जातात. एखादी वस्तू नाही म्हणून काम थांबले असे कधीच होत नाही. त्यामुळे काम करण्यासही अधिक बळ मिळते. कंपनीमध्ये आलिशान कँटिन असून तिथे जेवणाची उत्तम सुविधा उपलब्ध आहे. इतकेच नव्हे तर कंपनीच्या आवारात मोठे क्रीडासंकुलही आहे. तिथे फुटबॉलपासून सर्व प्रकारचे खेळ खेळण्याच्या सुविधा उपलब्ध आहेत. अर्थात तिथे आपण आपली कार्यालयीन वेळ संपल्यावरच खेळू शकतो. विविध वयोगटातील कर्मचाऱ्यांमध्ये खेळीमेळीचे वातावरण निर्माण व्हावे यासाठी विविध कार्यक्रम आणि स्पर्धाचे आयोजन केले जाते. इथे साजरे होणारे थॅक्स गिव्हिंग डे किंवा अन्य विशेष दिन हे आठवडाअखेरच्या सुटय़ांना जोडून साजरे केले जातात. त्यामुळे भरपूर कामासोबत आवश्यक त्या सुटय़ाही आपल्याला मिळतात. सुट्टीच्या काळात तुम्हाला काही सामाजिक कार्य करायचे असेल तर तशा प्रकारच्या कार्यक्रमांचे आयोजन कंपनीतर्फे केले जाते. म्हणजे आपण राहत असलेल्या ठिकाणच्या शाळांमध्ये जाऊन गणित, विज्ञान, रोबोटिक्स वगैरेचे वर्ग आपण घेऊ शकतो. त्यातून कर्मचाऱ्यांना सामाजिक बांधिलकी जपण्यास मदत होते. कंपनीचे कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या आरोग्याची काळजी म्हणून कंपनीकडून आरोग्य विमाही उतरवला जातो. जेणेकरून कधी कोणती आरोग्य समस्या उद्भवल्यास त्याचा खर्च विमा कंपनीच्या माध्यमातून केला जातो, अथवा आपण केलेला औषधोपचारांवरील खर्च परत मिळतो.

इथे कामाचे मूल्यमापन करण्याची पद्धत अगदी पारदर्शी असून ती वर्षांतून दोन वेळा केली जाते. पहिल्या सहा महिन्यांनी होणाऱ्या मूल्यमापन प्रक्रियेमध्ये आमचे व्यवस्थापक आम्हाला आमच्या कामातील चांगल्या बाजू तसेच त्यातील त्रुटी सांगतात. त्यावर चर्चा केली जाते. त्रुटींवर मात करण्यासाठी काय करता येईल याचाही विचार केला जातो. यात आवश्यकता असल्यास प्रशिक्षणही उपलब्ध करून दिले जाते. ही प्रक्रिया झाल्यावर वर्षांअखेरीस होणाऱ्या मूल्यमापन प्रक्रियेत पुन्हा वर्षभरातील कामाचा आढावा घेतला जातो. त्यात आपल्याला वर्षभरासाठी दिलेल्या उद्दिष्टांची पूर्तता आपण केली की नाही, केली असल्यास कशी केली, यावर सविस्तर चर्चा होते. यात आपण आपली मते मांडतो आणि आपले व्यवस्थापक त्यांची मते नोंदवतात. या मतांवरही चर्चा होते. इतकेच नव्हे, तर इतर कर्मचाऱ्यांनाही आमच्या कामावर मत नोंदविण्यास सांगितले जाते. या सगळ्याचा आढावा घेऊन वर्षभरात काम कसे झाले याचा परामर्श घेतला जातो आणि त्याआधारे पगारवाढ केली जाते. याबरोबरीनेच तुम्हाला वर्षांला दोन विशेष उद्दिष्टे दिली जातात. त्यामध्ये तुमची कौशल्ये विकसित करणाऱ्या प्रशिक्षणांचा समावेश असतो. म्हणजे जर मी संशोधनात आहे आणि मला व्यवस्थापन शिक्षण घ्यायचे असेल तर ते घेण्याची मुभा मला मिळू शकते. अशा खुल्या कार्यसंस्कृतीमुळे आपला सर्वागीण विकास होत जातो आणि आपल्या क्षेत्रात आपले एक स्वतंत्र अस्तित्व निर्माण होत जाते.

कार्यालयाच्या बाहेर सर्वजण एकमेकांचे मित्र असतात. आमची कंपनी खूप जुनी आणि मोठी असल्यामुळे येथे दोन ते तीन पिढय़ांतील मंडळी काम करताना दिसतात. ‘कमिन्स’मध्ये भारतीय, चिनी, युरोपीय देशांमधील लोक एकत्र काम करतात. त्यामुळे प्रत्येकाची संस्कृती, खाद्यसंस्कृती वेगवेगळी आहे. असे सर्व नानाविध पाश्र्वभूमीचे लोक एकत्रित आल्यामुळे आपले त्या लोकांसंबंधीचे अनेक समज, गैरसमज दूर होतात आणि प्रत्येकाचा देश, प्रांत वेगळा असला तरी आपण सर्व ‘वसुधव कुटुंबकम्’ या उक्तीप्रमाणे एकाच कुटुंबातील आहोत याची जाणीव झाल्याशिवाय राहत नाही. कोलंबसमध्ये भारतीय लोकसंख्या बऱ्यापैकी असल्यामुळे इथे गणेशोत्सवही साजरा केला जातो. त्याचबरोबर भारतीय संगीताच्या कार्यक्रमांचे आयोजनही केले जाते. अशा वेगवेगळ्या उपक्रमांतून इथली कार्यसंस्कृती व्यक्तीला कामासोबत स्वत:च्या विकासालाही प्रोत्साहन देते.
(तंत्रज्ञान विशेषज्ञ, प्रणाली आणि नियंत्रण, कमिन्स, कोलंबस, इंडियाना)
शब्दांकन – नीरज पंडित
शशांक तामस्कर