34-ls-diwali-2016-travel‘अरे, कशाला जाताय तिकडे वाळवंटात मरायला? जीव जड झालाय का?’ मुंबई विमानतळावर इमिग्रेशनचे ठप्पे मारणाऱ्या बाईने मला अजीजीने विचारले.

‘डॉक्युमेंटरी शूट करायला काबूलला चाललोय,’ असे सांगून पासपोर्टवर ठप्पा घेऊन मी निघालो.

मी काबूलला जाणार आहे असे कळल्यावर मित्र, नातेवाईक, ओळखीच्यांच्या आलेल्या प्रतिक्रिया काहीशा अशाच होत्या. ‘सेफ आहे ना तिकडे? सिक्युरिटी आहे का तुम्हाला?’ ‘तिकिडे जाऊन काही गडबड झाली तर इन्शुरन्स कंपनीही पसे देणार नाही..’ ‘चांगले फोटो काढून ठेवले आहेस ना? तिकडून परत नाही आलास तर लावायला बरे..’ एक ना दोन..

त्यातच आम्ही अफगाणिस्तान व्हिसासाठी गेलो असताना जलालाबादमध्ये भारतीय दूतावासावर झालेल्या हल्ल्यामुळे आणि आमच्या आधी व्हिसा घेऊन अफगाणिस्तानात गेलेले काही लोक करकर ला जाऊन मिळाल्यामुळे अफगाण व्हिसा मिळणे फारच कठीण होऊन बसले होते. पण दूतावासातील व्हिसा ऑफिसरने सांगितलेल्या क्लिष्ट प्रक्रिया पूर्ण केल्यावर अफगाणिस्तानच्या व्हिसाचे ठप्पे पासपोर्टवर पडले आणि आम्ही १४ मार्चला दुबईमाग्रे काबूलला जाण्यासाठी निघालो..

काबूलला जाण्याआधी एकूणच काबूल, अफगाणिस्तान, तिथे सतत चालू असलेली युद्घे, अस्थिर  सामाजिक परिस्थिती, वॉर लॉर्ड्स, ड्रग लॉर्ड्स, सध्या मोडकळीस आले असले तरीही सुसाइड बॉम्बर्सच्या स्वरूपात आपले अस्तित्व दाखवून देणारे तालिबान, अल्-कायदा आणि करकर चा वाढता प्रभाव, दिवसाढवळ्या होणारी अपहरणे आणि आत्मघाती हल्ले यांबद्दल BBC, CNN, National Geographic, अल्-जझिरा यांच्या वेगवेगळ्या डॉक्युमेंटरीज् आणि लेखांमधून बरंच काही पाहून आणि वाचून असल्यामुळे, तसेच जानेवारीमध्ये काबूलमधून आलेल्या आमच्या काही अफगाण मित्रांनी सांगितलेल्या आत्मघाती हल्ल्यांच्या घटनांबद्दल ऐकल्यानंतर काबूलच्या आमच्या मुक्कामात समोर काय वाढून ठेवले आहे, ही धाकधूक मनात बाळगतच आम्ही काबूल विमानतळावर पाय ठेवला.

24-ls-diwali-2016-kabul

तीन मिनिटांत इमिग्रेशन कसे काय संपले याचे आश्चर्य मनात बाळगत बाहेर पडलो आणि लक्षात आले की आपण काबूलमध्ये आलो आहोत. लगेज काऊंटरवर उसळलेल्या गर्दीत मोठय़ा मिनतवारीने, जवळजवळ झगडे करूनच बॅगांचा ताबा मिळवावा लागला. कारण बॅगेज काऊंटरवर जमा झालेले अफगाण येणारी कोणतीही बॅग ही आपलीच आहे, या समजुतीने बाहेर काढत होते आणि ती आपली नाही असे लक्षात आल्यावर बाजूला फेकून देत होते. आमच्या अफगाण मित्राने आम्हाला घ्यायला रौफ नावाचा आडदांड ड्रायव्हर पाठवला होता. बॅगा शोधण्यात रौफची प्रचंड मदत झाली. बॅगांचा ताबा मिळवल्यानंतर अफगाणिस्तानातील मिनिस्टरी ऑफ इंटिरियरचे फॉरेनर्स रजिस्ट्रेशन कार्ड बनवल्याशिवाय शहरात प्रवेश नाही हे लक्षात आले. आमच्याकडे कार्डावर लागणारे फोटो नव्हते. त्यामुळे त्या अधिकाऱ्याच्या हाता-पाया पडून आमची पलटण काबूलमध्ये पासपोर्टसाइज फोटो काढायला निघाली.

दुपारचे बारा वाजले होते तरीही थंडी मी म्हणत होती. विमानतळाबाहेर दादरमधील खांडके बिल्डिंगसारख्या दिसणाऱ्या एका इमारतीत रौफ आम्हाला फोटो काढायला घेऊन गेला. आम्ही भारतीय आहोत हे ऐकल्यावर स्टुडिओवाल्याची कळी खुलली.   ‘इंडियन-अफगाण फ्रेंड्स..’ असं म्हणत त्याने आपलं काम करायला सुरुवात केली.

शेजारीच एक अफगाणी नानचे दुकान होते. वेगवेगळ्या आकारांच्या, चारजणांना पुरून उरतील अशा आकाराच्या खमंग नानच्या वासात मी हरवलो होतो, तोच जोराचा घरघराट ऐकू आला आणि आत्तापर्यंत फक्त हॉलीवूडच्या चित्रपटांतून पाहिलेली ब्लॅक हॉक जातीची हेलिकॉप्टर्स दणाणत गेली आणि आपण कुठे आहोत, याचे पहिल्यांदा भान आले!

रौफ मिनिस्टरी ऑफ इंटिरियरचे काम संपवून आल्यावर आम्ही आमच्या हॉटेलवर आलो. ‘हॉटेल क्यू काबूल’ म्हणजे जणू कडेकोट किल्लाच आहे..’ अशा कमेंट्स आम्ही फक्त इंटरनेटवर वाचल्या होत्या. हॉटेलच्या बाहेर असलेली सिक्युरिटी पाहून आम्ही थक्कच झालो. आत्मघाती हल्ले रोखण्यासाठी घातलेल्या सिमेंटच्या मोठय़ा मोठय़ा ब्लॉक्समध्ये हॉटेलचा चेहराच दिसत नव्हता. कोणतेही वाहन आत जाताना तीन प्रचंड दरवाजांची मालिका ओलांडून आत जात होते. पहिला दरवाजा बंद झाल्याशिवाय पुढचा उघडत नव्हता. प्रत्येक दाराआडून वाहनातील माणसांची बारीक नजरेने पाहणी होत होती. स्निफर डॉगने तपासल्याशिवाय कोणतेही वाहन हॉटेलच्या मुख्य आवारात जात नव्हते. आमचीही या कडेकोट बंदोबस्तात कसून तपासणी झाली आणि सर्व काही आलबेल असल्याचा इशारा मिळाल्यावर पहिल्यांदा ‘हॉटेल क्यू काबूल’चे दर्शन झाले.

चेक-इन केल्यावर आम्हाला आमची सिक्युरिटी कार्ड्स दिली गेली. ‘कुठेही बाहेर जाताना ही कार्ड्स जवळ बाळगा,’ असा इशाराही मिळाला. ‘कार्ड दाखवलं तर चेकिंग होत नाही का?’ असा प्रश्न विचारल्यावर ‘चेकिंग तितकंच होतं, पण हे कार्ड नसलेल्या लोकांना आम्ही चेकिंगपर्यंतही येऊ देत नाही,’ असं उत्तर मिळालं. त्यामुळे केवळ हॉटेलबाहेर जातानाच नव्हे, तर हॉटेलमध्ये फिरतानाही सिक्युरिटी कार्ड गळ्यात घालूनच फिरले पाहिजे असा विचार केला आणि सात दिवसांसाठी ही मंगळसूत्रे गळ्यात चढवली.

हॉटेलमध्ये फिरताना हे हॉटेल खरोखरच एक किल्ला असल्याची जाणीव झाली. आलेल्या पाहुण्याला कोणतीही वस्तू घेण्यासाठी हॉटेलबाहेर पडावे लागू नये याची पुरेपूर सोय करण्यात आली होती. एक छोटेखानी डिपार्टमेंटल स्टोअर, एक प्रचंड जीम, स्वीिमग पूल, कपडय़ांची दुकाने, छोटेसे मेडिकल सेंटर, गिफ्ट शॉप्स, रेस्तराँ, तसेच हॉटेलवर हल्ला झालाच तर बचावासाठी सुसज्ज अशा पॅनिक रूम्सही आहेत याची आम्हाला कल्पना देण्यात आली.

हॉटेलमध्ये चेक-इन् केल्यानंतर काही तासांतच आम्हाला हॉटेलच्या कडक सुरक्षाव्यवस्थेचा आणखी एक अनुभव आला. हॉटेलमध्ये फिरता फिरता सहज आम्ही हॉटेलच्या गच्चीवर गेलो आणि वरून दिसणारा काबूल शहराचा आणि आसपासच्या हिमाच्छादित डोंगरांचा देखावा पाहण्यात गुंग झालो. नकळत आमचे मोबाइल फोन्स बाहेर पडले आणि आम्ही फोटो क्लिक करणार तोच कोणीतरी हातवारे करतं आहे असं जाणवलं. समोरच्या गच्चीत टॉवरवर एके-४७ घेतलेला एक गार्ड आम्हाला हातवारे करून फोटो न घेण्याचे सुचवीत होता. आम्ही त्याची माफी मागून माघारी वळणार तोच हॉटेलचा मुख्य सिक्युरिटी ऑफिसर तिथे धावत आला. त्याने हॉटेलच्या सिक्युरिटीसाठी असे फोटो घेण्यास तसेच गेस्टस्च्या सिक्युरिटीसाठी गच्चीवर फिरण्यास सक्त मनाई असल्याचे आम्हाला सांगितले.

रात्री रिसेप्शनवरही मला ‘तुम्ही गच्चीवर गेला होतात का?’ असं विचारलं गेलं तेव्हा मला फार ओशाळल्यासारखंच झालं. त्या अफगाण रिसेप्शनिस्टला ते लगेच कळलंही. अजीजीने तो सांगू लागला, ‘राग मानू नका साहेब, तुम्ही आमचे गेस्ट आहात. आणि त्यातून तुम्ही भारतीय आहात. आम्हाला भारतीयांबद्दल खूप प्रेम आणि आदर आहे. आधीच आमच्या देशाचं नाव बदनाम आहे. त्यामुळे असं काही पुन्हा करू नका. तसेच कुठे बाहेर जाताना प्लीज सिक्युरिटी घेऊन चला. मला सांगा- मी तुमच्या सिक्युरिटीची व्यवस्था करीन..’ मी त्या रिसेप्शनिस्टचे आभार मानले आणि तिथून काढता पाय घेतला.

‘भारत आमचा मित्र आहे. भारतीयांबद्दल आम्हाला प्रेम आहे..’ हा अनुभव पुढल्या सात दिवसांत काबूलमधील प्रत्येक नाक्यावर, प्रत्येक गल्लीबोळात, प्रत्येक दुकानात, प्रत्येक रेस्तराँमध्ये आम्हाला आला.

‘सिनेमा पामेर’ या काबूलमधील अतिशय गर्दीच्या आणि गजबजलेल्या ठिकाणीही असाच काहीसा अनुभव आला. ‘गर्दीच्या ठिकाणी मोठा कॅमेरा काढायचा नाही’ या आमच्या सूचनेकडे दुर्लक्ष करीत आमच्या अतिउत्साही कॅमेरामन कम् दुभाषा अब्दुलने मोठा कॅमेरा बाहेर काढला आणि सिनेमा पामेर येथील चौकाचे, सिनेमागृहाचे शॉट्स तो घेऊ लागला. हा-हा म्हणता आजूबाजूला गर्दी जमली आणि आम्ही घेरले गेलो. तेवढय़ात तिथे पोलीसही आले. नशिबाने आमच्यापाशी पासपोर्ट होते. आम्ही भारतीय आहोत हे कळल्यावर पोलिसांनी उलट अब्दुललाच झाडायला सुरुवात केली. ‘अफगाण असून भारतीय पाहुण्यांना अशा धोकादायक जागी का घेऊन आलास?’ म्हणून पोलिसाने अब्दुलची बिनपाण्याने केली आणि ‘आत्ताच्या आत्ता इकडून चालते व्हा,’ असा आदेशही दिला.

25-ls-diwali-2016-kabul-ak47

उत्तम अफगाणी पाहुणचार झोडायचा असेल तर भारतीय पासपोर्टसारखे दुसरे उत्तम साधन नाही असे मला वाटते. दुसऱ्याच दिवशी काबूलपासून दोन तासांच्या अंतरावर सोलांग पास येथे रशियनांनी बांधलेले टनेलस् पाहायला आम्ही गेलो होतो. वाटेत जाताना एक रणगाडय़ांचे कब्रस्तान लागले.

गेल्या ४० वर्षांत रशियन आणि तालिबान्यांनी युद्घात निकामी झालेले असंख्य रणगाडे, रॉकेट लॉंचर्स, मिलिटरी ट्रक्स इथे सोडून दिलेले आहेत. केवळ आम्ही भारतीय आहोत म्हणून तेथील मुख्य अधिकाऱ्याने आम्हाला आत प्रवेश दिला. फोटो काढायलाही परवानगी दिली. मनसोक्त फोटो काढून झाल्यावर चहा आणि नानचे आमंत्रणही दिले. आम्ही नम्रपणे त्यांचे आमंत्रण नाकारून पुढे निघणार तोच अब्दुलने आम्हाला थांबवले आणि ‘तुमच्याकडे काही खाण्याच्या वस्तू आहेत का?’ असे विचारले. आम्ही थोडय़ा आश्चर्याने एकमेकांकडे पाहू लागलो, तेव्हा अब्दुल म्हणाला, ‘या लोकांचा एक समज आहे. अंधश्रद्धाच म्हणा ना! एखाद्याचे लहान मूल लवकर बोलत नसेल तर भारतीयाच्या हातून मिळालेले खाणे त्या मुलाला दिले तर ते लवकर बोलू लागते. या कमांडरचा दीड वर्षांचा मुलगा आहे..’ आम्ही लगेच आमच्याकडे असलेली बिस्किटे कमांडरला दिली. त्याने आमचे मनापासून आभार मानले आणि ‘पुढल्या वेळेस इथे आलात तर जेवल्याशिवाय पुढे जाऊ नका,’ असे आग्रहाचे निमंत्रणही दिले.

असाच अनुभव एका पोलीस चेकपोस्टवरही आला. आमचे तुळतुळीत दाढय़ा केलेले चेहरे पाहून पोलिसाने गाडी थांबवली असावी. आधी आम्ही भारतीय आहोत यावर त्याचा विश्वासच बसेना. ‘यू.. पाकिस्तानी?’ असे विचारल्यावर आम्ही आमचे पासपोर्ट काढून दाखवले. पासपोर्टवरील अशोकस्तंभ पाहताच शिपायाचा नूरच बदलला. ‘हम मजाक कर रहा था..’ असं काहीतरी तो मोडक्या िहदीत म्हणाला. आणि त्याने नुसतेच जेवणाचे आमंत्रण दिले नाही, तर त्याच्याही वर अंगठय़ाची खूण करून त्याचीही सोय असल्याचे सांगितले.

गाडी पुढे गेल्यावर अब्दुल मागे वळून म्हणाला, ‘तो मजाकवजाक काही करत नव्हता. जर तुम्ही खरेच पाकिस्तानी असता तर आपण तिकडून सहजासहजी सुटलो नसतो..’

अफगाणी लोकांच्या भारतप्रेमाइतकाच पाकद्वेष अति-जहाल आहे. पाकिस्तान्यांमुळे आपला देश आज जगाच्या २५ वष्रे मागे पडला आहे याची आज इथल्या सामान्य माणसाला जाणीव होत आहे. त्यामुळे कुठेही गेलो तरी ‘हिंदुस्थान अझीझ दोस्त.. पाकिस्तान xxx…’ अशा प्रतिक्रिया ऐकू यायच्या. आमचे अफगाण मित्रही कट्टर पाकद्वेष्टे होते. त्यांनी पाकिस्तानात बनलेल्या प्रत्येक वस्तूवर बहिष्कार टाकला होता. ‘हम भूखे मरेंगे, लेकिन पाकिस्तान में बनी चीज नहीं खायेंगे..’ असं ते मोठय़ा गर्वाने सांगायचे. आम्ही काबूलमध्ये असतानाच भारत-पाकिस्तान टी-२० सामना होता. भारत सामना जिंकताच ‘आपण पाकिस्तानी दूतावासाबाहेर जाऊन भांगडा करू या,’ असाही आग्रह आमच्या अफगाणी मित्रांनी आम्हाला केला. त्या रात्री भारत सामना जिंकल्यावर काबूलमधील अनेक लोकांनी आपली खुशी जाहीर करायला हवेत बंदुकीच्या फैरी झाडल्या. इतक्या, की काही लोकांना आत्मघातकी हल्ला झाला की काय असेच वाटले. दुसऱ्या दिवशी लोक  रस्त्यावर येऊन पाकिस्तानचा पराभव सेलिब्रेट करीत होते असे समजले. आम्ही खोलीतून बाहेर पडताच बऱ्याच लोकांनी सामना जिंकल्याबद्दल आमचेही अभिनंदन केले. ‘त्या देशाबद्दल लोकांच्या मनात इतका द्वेष आहे, की पाकिस्तानचे नाक कोणत्याही बाबतीत खाली झाले तरी आमचे लोक  सेलिब्रेट करतील..’ असे आमच्या इथल्या मित्रांचे मत पडले.

काबूलमधील प्रसिद्ध Dar-la-man palace; जी अफगाणिस्तान पार्लमेंटची इमारत होती, जी तालिबान्यानी नष्ट केली- आजही तिचे भग्नावशेष तसेच राखून ठेवलेले आहेत. जुन्या Dar-la- man palace च्या शेजारीच अफगाणिस्तान पार्लमेंटची नवी इमारतही आहे; जिच्या उभारणीचा खर्च भारताने केला आहे. या दोन्ही इमारती आम्हाला दाखवताना आमचा अफगाणी मित्र बोलून गेला, ‘See, this is  gift from Pakistan and that is gift from India!’

जाज्ज्वल्य देशाभिमान, मेहमाननवाजी करताना जानही कुर्बान करण्याची तयारी आणि बेडर असला, तरीही अतिशय साधा-भोळा स्वभाव ही काबूलमधील लोकांची स्वभाववैशिष्टय़े प्रकर्षांने जाणवली. सोलांग पासहून परत येताना संध्याकाळ झाली. आणि एके ठिकाणी आमच्या लक्षात आले की आमच्या गाडीतील पेट्रोल संपत आले आहे. सोलांग ते काबूल या रस्त्यावर अक्षरश: दर किलोमीटरवर एक पेट्रोल पंप आहे आणि प्रत्येक पंपावर सणासुदीला असावी तशी एलईडी लाइट्सने रोषणाई केली आहे. आणि ही रोषणाई रोजच असते असं आम्हाला समजलं.

गाडी कोणत्याही क्षणी बंद पडेल म्हणून आम्ही ज्या पहिल्या मिळेल त्या पेट्रोल पंपावर शिरलो. जास्त लोक बरोबर असल्यामुळे अब्दुल आणि आमचा टूर मॅनेजर हेच आलटून पालटून गाडी चालवत होते. जवळजवळ १५ लिटर पेट्रोल भरल्यावर लक्षात आले, की गाडी डिझेलची आहे. पेट्रोल भरणाऱ्या पोऱ्यालाही काहीतरी गडबड झाल्याचे समजले. आमच्या टूर मॅनेजरने त्याला ताबडतोब थांबवले आणि आता काय करावे यावर आमचा विचारविनिमय सुरू झाला.

आपण अतिशय धोकादायक परिस्थितीत आहोत असे आमच्या टूर मॅनेजरने आम्हाला सांगितले आणि गाडीतच बसून राहा अशी ताकीदही दिली. ‘रस्त्यावरून जाणाऱ्या गाडय़ांत कोणीही असू शकते. इथले वॉर लॉर्ड्स, ड्रग लॉर्ड्स, तालिबानी, ISIS सुद्धा. आणि त्यांना जर इथे भारतीय आहेत असे समजले, तर आपण सगळे फार मोठय़ा संकटात सापडू शकतो..’ असे त्याने बजावल्यावर सगळेच जरा सीरियस झाले. पण अब्दुलने तशातही पेट्रोल पंपावरच्या पोऱ्याची खेचायला सुरुवात केली.

‘तू त्या टाकीत जळती काडी का टाकत नाहीस? सगळे पेट्रोल जळून जाईल आणि फक्त डिझेल उरेल..’ असे अब्दुलने विचारताच तो पोऱ्या अतिशय सीरियसली अब्दुलला सांगू लागला, ‘नाही. नाही. काडीबिडी टाकली तर टाकीला आग लागेल आणि गाडीही जळेल.’

‘बरं. मग गाडीला दुसरे काही एक्स्टेंशन नाही का- जिथून डिझेल आत घालता येईल?’

‘नाही ना. एकाच ठिकाणहून तेल घालता येतं..’

अब्दुलने आम्हाला हा किस्सा सांगितला तेव्हा त्या परिस्थितीतही आम्ही पोट धरधरून हसलो.

तिकडे आमचा टूर मॅनेजर फोनवरच लागला होता आणि काबूलवरून दुसऱ्या गाडीची व्यवस्था करता येते का, ते पाहत होता. शेवटी असं ठरलं, की आमच्या  टूर मॅनेजरने लिफ्ट मागून काबूलला जायचे आणि तिथून मॅकेनिक आणि दुसरी गाडी घेऊन परत यायचे. त्याचवेळी पेट्रोल पंपचा मालकही तिथे आला. आम्ही भारतीय आहोत आणि कोणत्या परिस्थितीत अडकलो आहोत हे पाहून तो बाजूलाच असलेल्या त्याच्या घरातून एक ऑटोमॅटिक मशीनगनच घेऊन आला. मोठय़ा गर्वाने तो आम्हाला बंदूक दाखवून ‘अमेरिकान!’ असे म्हणाला, आणि आमच्या रक्षणार्थ गाडीच्या बाजूला उभा ठाकला.

आमचा टूर मॅनेजरकाबूलला जायला निघणार तोच अजून एक गाडी पंपावर येऊन थांबली. आमचे नशीब फारच जोरावर होते. त्या गाडीतच एक मॅकेनिक होता आणि त्याला गाडीची टाकी कशी रिकामी करायची याचे पूर्ण ज्ञान होते. त्याने भराभर गाडी जॅकवर चढवली आणि गाडीखाली घुसला. फटाफट नॉब्स फिरवून त्याने टाकी रिकामी करण्यास सुरुवात केली. गाडीखाली त्याला प्रकाश दाखवायला आम्ही सगळेच मोबाइल फोन काढून उभे राहिलो.

पण त्या भाऊगर्दीत कोणाचा तरी जॅकला धक्का बसला आणि गाडी त्या मॅकेनिकच्या अंगावर आली. नशिबाने आम्ही ज्या गाडीतून फिरत होतो ती एक मोठी स्टेशनव्ॉगन होती आणि गाडीचा ग्राऊंड क्लीअरन्स चांगला होता. दुसरी गाडी असती तर तो माणूस गाडीखाली चिरडलाच असता. पण या पठ्ठय़ावर त्याचा जराही परिणाम झाला नव्हता. जणू काही झालेच नाही, या आविर्भावात तो बाहेर आला. त्याच्या मदतनीसाला दोन शिव्या हासडल्या. गाडी पुन्हा जॅकवर चढवली आणि पेट्रोलची टाकी त्याने रिकामी केली. आम्ही बघतच राहिलो. ‘दुसरा कोणीही असता तर पुन्हा गाडीखाली शिरला असता का?’ हा प्रश्न प्रत्येकाच्या तोंडून निघाला.

अफगाणिस्तानातील सामान्य माणूस अत्यंत निर्भीड असला तरी अतिशय भोळा आहे. काहीही लपवणे, हातचे राखून ठेवणे त्याला फारसे जमत नाही. आणि म्हणूनच अख्ख्या जगाने आपला हेतू साधण्यासाठी त्यांचा गैरफायदा घेतला. ओसामा बिन लादेन किंवा अमेरिकेवर हल्ला करणारे अतिरेकी यांपकी कोणीच अफगाणी नव्हते.

काबूल टूरवर आम्हाला भेटलेले सगळेच जण १९७०-८० चा कालखंड आठवून गहिवरत. ‘ते खरे मजेचे दिवस होते. सर्वच बाबतीत आम्ही खूप प्रोग्रेसिव्ह होतो. आम्ही कम्युनिझम स्वीकारून रशियाला मिळालो असतो तर आज आमच्या देशाची जी परिस्थिती आहे, ती नसती..’ असेही काबूलमध्ये आम्हाला भेटलेल्या तरुणाईचे मत पडले.

१९८० मध्ये मझार-ए-शरीफ शहरात फॅशन शोज् होत, ही माहिती ऐकून आम्ही चाटच पडलो.

काबूलमधील आणखीन एका गोष्टीचे अप्रूप वाटले. ते म्हणजे काबूलमधले करन्सी मार्केट. तुमच्याकडील पसे ‘अफगाणी’मध्ये बदलायचे असतील तर कोणत्याही बँकेत किंवा तत्सम संस्थेत जायची गरज नाही. काबूल मार्केटच्या गल्ली-कोपऱ्यावर गळ्यात पाटी आणि हातात नोटा घेऊन लोक उभे असतात. त्यांच्याबरोबर दर ठरवायचा आणि पसे कन्व्हर्ट करून घ्यायचे. लूटमारी आणि अपहरणे यासाठी कुप्रसिद्ध असलेल्या या भागात हातात नोटांच्या गड्डय़ा घेऊन उभ्या असलेल्या या काबुल्यांना कोण कसे उचलत नाही याचे आम्हाला आश्चर्य वाटले.

‘आता तुम्ही जे काबूलचे रहिवाशी बघता आहात, रस्त्यावर सलवार-कुडता घालून फिरणारे, कशाही दाढय़ा वाढलेले बेशिस्त लोक  पाहता आहात, ते काही मूळचे काबुली रहिवाशी नव्हेत. सच्च्या काबुल्यांनी हे शहर तालिबानी यायच्या आधीच सोडले आणि परदेशात स्थायिक झाले. हे जे दिसताहेत ते डोंगरांतून, गावांतून आलेले लोक  आहेत. डॉ. नजीबच्या काळात माझे वडील सूट घातल्याशिवाय बाहेर पडायचे नाहीत. दाढी राखलीत तर ती चांगली मेन्टेन करावी लागायची. तालिबान्यांनी ही बेशिस्ती इथे सोडली..’ आमचा  टूर मॅनेजर आपल्या नीटस कोरलेल्या दाढीवर हात फिरवीत आम्हाला काबूलच्या लोकांबद्दल सांगत होता. बोलता बोलता विषय अफगाणिस्तानातील स्त्रियांवर आला.

‘तालिबानने देशाचा ताबा घेऊन शारिया कायदा लागू केला आणि आमच्या देशातील निम्म्या लोकसंख्येला एका दिवसात घरी बसवले. तालिबानच्या काळात अफगाणिस्तानातील स्त्रियांनी फार सोसले. पण आता परिस्थिती पूर्णत: बदलली आहे..’ त्याने सांगितलं.

आणि याचा प्रत्यय आम्हाला काबूलमध्ये फिरताना ठिकठिकाणी आला. तालिबानच्या काळात सक्तीचे असलेले निळे बुरखे फारसे दिसलेच नाहीत. जे काही दिसले, त्यांना पाहून अब्दुलने ‘त्या गाववाल्यांच्या बायका आहेत,’ असा शेरा मारला. ‘आमच्या बायका फक्त हिजाब वापरतात. आणि तोही फक्त ऊन आणि थंडीसाठी.’

या बदलाचा आणखीन एक प्रत्यय आम्हाला काबूलमध्ये आल्याच्या दुसऱ्याच दिवशी आला. आम्ही सोलांग पासला गेलो असताना काबूलमधील फुटबॉल स्टेडियममध्ये मुलींची बॉिक्सग टुर्नामेंट होती. आणि ती काबूलमधल्याच एका मुलीने जिंकली. याच फुटबॉल स्टेडियममध्ये तालिबानी क्षुल्लक गुन्ह्यंसाठी काबूलमधील बायकांचे शिरकाण करीत. दोनच दिवसांनी आम्ही या फुटबॉल स्टेडियमलाही भेट दिली. अफगाणिस्तान महिला फुटबॉल टीमचा सराव आम्हाला थोडक्यासाठी चुकला.

त्यानंतर दोनच दिवसांनी मारवा (वय वष्रे आठ) आणि साम्या (वय वष्रे बारा) या दोन छोटय़ा काबुली मुलींशी आमची ओळख झाली. लहानपणीच आई-वडील गेल्यामुळे एका अनाथाश्रमात राहणाऱ्या या मुली होत्या. त्या मुलींची प्रगल्भता, हजरजबाबीपणा आणि चटपटीत स्वभाव पाहून आम्ही थक्क झालो. आठ वर्षांच्या मारवाला आर्याना सईद या अत्यंत लोकप्रिय पॉप गायिकेसारखं बनायचं होतं, तर साम्या काबूलमधील संगीत अकादमीत व्हायोलिन शिकत होती. या दोन्ही मुलींबरोबर आम्हाला काही शॉट्स घ्यायचे होते. आयुष्यात कधीही कॅमेरा न पाहिलेल्या या मुलींनी अगदी प्रोफेशनल्सच्या सफाईने शॉट्स दिले. निघताना आम्ही साम्याला ‘You must come to Bollywood!’ असं सांगितल्यावर तिनेही मोठय़ा थाटात ‘Even I wish so…’ असं उत्तर दिलं.

थोडक्यात, काबूलमधील मुली बुरख्यातून बाहेर पडल्या आहेत आणि त्यामुळे काबूलमधील रस्त्यावरील रौनकही वाढली आहे, असे काबूलमधील नौजवानांचे मत पडले. काबूलमध्ये जितक्या सुंदर मुली आहेत, तितकेच सुंदर नौजवानही आहेत. िहदी सिनेमाच्या निर्मात्यांनी काबूलच्या रस्त्यावर एक फेरी मारावी, दर दुसऱ्या सिग्नलवर एक तरी रणबीर कपूर त्यांना सापडेल. अशा अनेक रणबीर कपूरस्ना रस्त्यावर फळे आणि अंडी विकताना पाहून आम्ही हळहळत असू.

आम्ही काबूलमध्ये असताना ‘अफगाण स्टार’ या अफगाणिस्तानातील ‘इंडियन आयडॉल’च्या शेवटच्या भागाचे चित्रीकरण होणार होते. आम्ही या कार्यक्रमाला उपस्थित राहू अशी व्यवस्था केली होती. ‘इंटरकॉन्टिनेंटल’ या काबूलमधील सगळ्यात जुन्या आणि अत्यंत प्रेक्षणीय हॉटेलच्या बॉलरूममध्ये या कार्यक्रमाचे चित्रीकरण झाले. आर्याना सईद ही पॉप गायिका या कार्यक्रमातील एक जज् होती आणि या कार्यक्रमात ती गाणारही होती. तिच्या गाण्याविषयी सगळ्यांनाच उत्सुकता होती.

आर्यानाने तिचे अतिशय गाजलेले ‘यार बामियानी’ हे गाणे गायले आणि जमलेल्या सर्व लोकांनी उत्तम प्रतिसाद दिला. एकेकाळी याच काबूलमध्ये क्षुल्लक गुन्ह्यंसाठी स्त्रियांना भर चौकात गोळ्या घातल्या जायच्या, तिथे आर्यानाच्या गाण्यावर थिरकणारे लोक पाहून फारच मजा आली.

काबूलमध्ये जायचे आणि तेथील खाण्यावर आणि मुख्य म्हणजे सुक्या मेव्यावर लिहायचे नाही, हा फारच मोठा अन्याय ठरेल. नॉन-व्हेज खाणाऱ्यांसाठी तर काबूल म्हणजे जन्नत आहे. गल्ल्या-गल्ल्यांमध्ये भाजलेल्या मुग्र्या आणि कबाबचे ठेले आहेत आणि त्यांना लागूनच नानच्या भट्टय़ा. कबाब-नान आणि त्यावर अफगाणी चहा म्हणजे ब्रह्मानंदच!

पारंपरिक अफगाणी जेवण जेवायला अब्दुल आम्हाला काबूलमधील ‘शहर-ए-नाव’ भागातल्या एका हॉटेलात घेऊन गेला. आणि मेन्यूकार्ड उघडताच आमचा चेहराच पडला. अफगाणांच्या खाद्यसंस्कृतीवरही चिनी आणि अमेरिकेने आक्रमण केलेले. शेवटी काबुली पुलाव, कोर्मा आणि कबाब असा पारंपरिक अफगाणी खान्याचाच बिसमिल्लाह केला! पण इतका सुंदर, तुती आणि बेदाणे घातलेला पुलाव आणि कबाब जगाच्या पाठीवर कुठेच मिळत नसतील.

अमेरिकन आणि चिन्यांच्या बरोबरीनेच काबूलमध्ये तुर्की रेस्तराँचीही रेलचेल आहे. तुíकश कॉफी, बख्लावा आणि हुक्क्याचा लुत्फ उठवण्यासाठी काबूलमधील तरुणाई या तुíकश रेस्तराँमध्ये गर्दी करते. सढळ हाताने पिस्ता आणि बदामाची पूड घालून केलेला बख्लावा अक्षरश: तोंडात विरघळतो.

काबूलमधून किसमिस आणि सुक्यामेव्याच्या पेटय़ा घेऊन आलेला टागोरांचा काबुलीवाला सिनेमाच्या माध्यमातून घराघरांत पोहोचला. त्यामुळे काबूल म्हणजे किसमिस आणि सुकामेवा ही गाठ आपल्या लोकांच्या डोक्यात पक्की बसलेली. त्यामुळे काबूलहून येताना काय आणू, यावर बहुतेकांचे उत्तर ‘सुकामेवा’ असेच होते. ‘शहर-ए-नाव’मध्येच किसमिस आणि सुक्यामेव्याच्या दुकानांच्या रांगा आहेत. ढिगाऱ्यांनी पडलेल्या सुक्यामेव्याच्या गोणी पाहून काय घेऊ आणि काय नको असंच झालं. जगातले उत्तम प्रतीचे अक्रोड, जर्दाळू, बदाम आणि मनुका येथे मिळतात. बोटाच्या पेराइतक्या लांबीच्या मनुका मी पहिल्यांदाच पाहिल्या. पु. लं.नी म्हटल्याप्रमाणे, जसा भारतीय संस्कृतीचा प्रतीक म्हणजे पानवाला, तसेच काबुली संस्कृतीचा प्रतीक म्हणजे मेहंदी लावून कोरीव दाढी राखलेला, फरकॅप किंवा काबुली फेटा घालून किसमिस विकणारा काबुलीवाला म्हणायला हरकत नाही.

याच अफगाणी संस्कृतीशी निगडित एक रोचक किस्सा आमच्याबरोबर घडला. काबुली लोकांचा आवडता मनोरंजनाचा कार्यक्रम म्हणजे शुक्रवारी होणाऱ्या मुरजंगी (कोंबडय़ांच्या झुंजी) आणि शहराबाहेर होणाऱ्या डॉग फाइटस्. सरकारने यावर बंदी घातलेली असली तरीही शहरात लपूनछपून या झुंजी होतातच. हजारो रुपयांचा सट्टा या झुंजींत खेळला जातो.

शहराबाहेरील सोमाली भागात आम्ही अशाच एका मुरजंगी खेळवणाऱ्याचा पत्ता शोधत होतो. तास-दीड तासाच्या भटकंतीनंतर आम्हाला ती शेड सापडली. बाहेर एक आडदांड दाढीवाला लोकांकडून एन्ट्री फी घेत होता. आमच्या मित्रांनी त्याच्याबरोबर मुरजंगी शूट करण्यासाठी घासाघीस सुरू केली. पण दाढीवाला काही बधत नव्हता. इथे ‘आम्ही भारतीय आहोत..’ हे कार्डही चालले नाही. शेवटी त्या माणसाने आम्हाला ‘चालते व्हा. आणि अफगाणिस्तानच्या संस्कृतीचा नाश करू नका..’ असे खडसावले. प्रकरण फारसे न ताणता आम्ही तिकडून गुपचूप निघालो.

आमचे काबुली मित्र मात्र या घटनेनंतर पेटून उठले होते. ‘तुम्ही मुरजंगी बघितल्यामुळे अफगाण संस्कृतीचा नाश होतो! आणि तालिबान, सुसाइड बॉम्बर्स, अपहरणे, ड्रग्ज, एके-४७ यांमुळे अफगाण संस्कृतीचा नाश नाही होत?’ आम्ही त्यांना शांत करण्याचा प्रयत्न करीत होतो. पण यानंतर केवळ अध्र्या तासातच एके-४७ हाताळायला मिळेल असे स्वप्नातही वाटले नव्हते.

कलाश्निकोव्ह! अफगाणी लोक  हिचा उल्लेख फुल फॉर्ममध्येच करतात. आणि अफगाणी बोलीमध्ये तो ऐकायलाही फार गोड वाटतो. दुर्दैवाने रशियन आक्रमणानंतर ही बंदूक अफगाण संस्कृतीचा एक भाग बनली आणि त्यांच्या ऱ्हासासही कारणीभूत ठरली.

मुरजंगीच्या फियास्कोनंतर आम्ही सोमालीतील एका उंच टेकाडावर जाऊन फोटोग्राफी करायचे ठरवले. पावसामुळे रस्ते निसरडे झालेले. त्यामुळे गाडी वर चढेचना. त्याचवेळी तिकडे अजून एक गाडी उभी असलेली दिसली. गाडीतले लोक  फोटो काढण्यात मग्न होते.

आमच्या मित्रांनी त्यांना विचारून आम्हाला त्यांची गाडी काही काळासाठी वापरायला मिळेल का, असे विचारले. गाडीवालाही तयार झाला. आणि त्यांच्या गाडीतली मंडळी आमच्या गाडीत येऊन बसली. त्यांनी त्यांचे सामानही आमच्या गाडीत हलवले. त्यातच एक दुर्बीण लावलेली कलाश्निकोव्हही होती. मी फोटोग्राफर आहे असे लक्षात येताच त्यांनी  कलाश्निकोव्ह घेऊन पोझ द्यायला सुरुवात केली. फोटो काढून झाल्यावर मंडळींनी आमच्या गाडीतील खाण्याचा ताबा घेतला. हे सर्व सोपस्कार चालू असताना आमचा ड्रायव्हर रौफ सीटवर बसून गालातल्या गालात हसत होता.

मंडळी खाण्यात गुंतली आहेत हे पाहून रौफने आम्हाला ‘हे लोक पंजशीर गावचे आहेत आणि अहमदशहा मसूदचे लोक आहेत,’ असे सांगितले. अहमदशहा मसूद हा अफगाणिस्तानचा मिलिटरी कमांडर होता. तालिबान काबूल जिंकून पुढे निघाले तेव्हा पंजशीरच्या सीमेवर अहमदशहा मसूदच्या लोकांनी तालिबानला रोखून ठेवले. त्यामुळे तालिबानींनी काबूल जिंकले, पण ते पंजशीर जिंकू शकले नाहीत, असे तेथील लोक गर्वाने सांगतात. अहमदशहा मसूदने अफगाणिस्तानसाठी त्या काळात फार चांगले कार्य केले असे म्हणतात. पण त्यांचे कलाश्निकोव्हधारी अनुयायी आमच्याशी कसे वागतील याचा विचार आम्ही करीत होतो. त्याचवेळी रौफ काय चीज आहे हे आम्हाला समजले.

आमची ती कलाश्निकोव्ह पाहिल्यावर झालेली घालमेल रौफने बरोब्बर हेरली होती. आणि मागची मंडळी खाण्यात गुंतली आहेत असे पाहून त्याने आम्हाला कोटाच्या आत खोवलेली छोटीशी पिस्तुल दाखवली आणि हसतच म्हणाला, ‘डोंट वरी. काही गडबड झालीच, तर ही कलाश्निकोव्ह लोड होण्याआधीच हे लोक  ढगात असतील..’ पण सुदैवाने तशी वेळ आलीच नाही. त्या लोकांपकी एकजण आमच्या टुर मॅनेजरचा मित्रच निघाला. आणि आम्ही सर्व एकमेकांना मिठय़ा मारून आपापल्या मार्गाने निघून गेलो.

काबुलमध्ये दार-ला-मन पॅलेसला लागूनच काबूल म्युझियम आहे. या म्युझियममध्ये रशियाच्या, तालिबान्यांच्या आणि अमेरिकेच्या आक्रमणापासून वाचलेल्या, बाम्यान, मेस आयनेक येथील उत्खननात सापडलेल्या ख्रिस्तपूर्व काळातील, बाबरच्या काळातील अनेक वस्तू जतन करून ठेवण्यात आल्या आहेत. मला वाटते, काबूल म्युझियमच्या बाजूलाच आणखीन एक म्युझियम बनवण्याची गरज आहे, ‘कलाश्निकोव्ह म्युझियम’! पोलंडमधील आउशवित्झच्या धर्तीवर.. जेणेकरून येणाऱ्या पिढीसाठी हे उदाहरण समोर राहील.

काबूलपासून फक्त अध्र्या तासाच्या ड्राइव्हवर पॉघमान नावाचे छोटेसे गाव आहे. आम्ही पॉघमानला पोहोचलो तेव्हा तिथे बर्फ पडत होता. पूर्ण गाव जणू बर्फाची दुलई पांघरून झोपले होते! पश्तू भाषेत लिहिलेली अक्षरे सोडली तर आपण जर्मनी वा स्वित्र्झलडच्या कोणत्यातरी परगण्यातच आहोत असेच वाटत होते. ते सृष्टिसौंदर्य मोबाइलच्या कॅमेऱ्यात पकडण्याचा आमचा पोकळ प्रयत्न चालू असतानाच अब्दुलने प्रश्न टाकला, ‘So would you like to settle down in Kabul?’ त्यावेळी ‘Of course!’ असं म्हणालो खरं; पण माझं हे म्हणणं फसवंच असल्याचं नंतर विचारांती लक्षात आलं.

आमच्या सात दिवसांच्या काबूलमधील मुक्कामात शहरात कोणताही अनुचित प्रकार घडला नाही. सिक्युरिटी अतिशय कडक होती. प्रत्येक कोपऱ्यावर एक सशस्त्र वाहन आणि दर पंचवीस माणसांमागे एक पोलीस उभा असलेला दिसायचा. वरकरणी सर्व काही शांत असल्याचे दिसत असले तरीही ती शांतता फसवी भासत होती. शहरात फिरताना सतत कोणाचीतरी आपल्यावर नजर आहे असा भास होत होता. एक प्रकारचा अस्वस्थपणा जाणवत होता.

अफगाण स्टार कार्यक्रमाच्या आधी या अस्वस्थपणाचे उत्तर मिळाले. ‘इंटरकॉन्टिनेंटल’मध्ये सिक्युरिटी चेक करताना एका कोपऱ्यात बंदुकींचा ढीग पडलेला दिसला. त्या सर्व कार्यक्रमाला आलेल्या माणसांच्या बंदुका होत्या; ज्या सिक्युरिटीच्या कारणास्तव काढून घेण्यात आल्या होत्या. थोडक्यात असं जाणवलं की, येथील लोकांचा एकमेकांवरील विश्वास उडालेला आहे. कोण केव्हा अंदाधुंद गोळीबार करील, किंवा शरीरावर लावलेले सुसाईड वेस्ट उडवून देईल याचा भरवसा नाही. आणि म्हणूनच सदैव सिक्युरिटी चेकिंगचा आणि आत्मघाती हल्ल्याच्या भीतीचा शाप सामान्य अफगाणी माणसाच्या माथी बसला आहे.

कोणत्याही सुंदरतेला शाप हा असतोच. आपल्या काश्मीरला नाही का? अलेक्झांडरची एक आख्यायिका आहे. अलेक्झांडर युरोप जिंकत आशियात अफगाणिस्तानच्या भूमीवर आला आणि अफगाणिस्तानच्या भूमीवर पाय ठेवताच त्याच्या सन्यात बंडाळी माजली. त्रस्त झालेल्या अलेक्झांडरचा बहुतांश वेळ सन्यातील तंटेबखेडे सोडवण्यात जाऊ लागला आणि त्याच्या िहदुस्थान जिंकण्याच्या प्रगतीला खीळ बसला. अफगाणिस्तानच्या भूमीतच कलहाचे बीज आहे यावर त्याचा विश्वासच बसला.

यावर अलेक्झांडरच्या आईने त्याला एक पत्र लिहिले आणि विचारले, ‘तू इतका मोठा जगज्जेता योद्धा.. अशा भाकडकथांवर विश्वास कसा ठेवतोस?’ यावर अलेक्झांडरने एका पिशवीत अफगाणिस्तानमधील माती भरली आणि आपल्या आईकडे पाठवली आणि ‘ही माती आपल्या खोलीबाहेर पसरून ठेव,’ असा संदेशही पाठवला.

काही दिवसांनी अलेक्झांडरला त्याच्या आईचे पत्र आले. तिने लिहिले होते, ‘ज्या दिवशी मी तू पाठवलेली माती खोलीबाहेर पसरली, त्याच दिवशी एकमेकांचे घनिष्ठ मित्र असलेले माझे दोन अत्यंत प्रिय सेवक एकमेकांशी भांडले आणि त्यांनी एकमेकांचे गळे चिरले. तुझे म्हणणे सत्य आहे. जितक्या लवकर तिथून बाहेर पडता येईल तितक्या लवकर बाहेर पड. या मातीला कलहाचा शाप आहे.’

अफगाणिस्तानचा आजवरचा इतिहास पाहता अलेक्झांडरच्या या आख्यायिकेत काहीएक तथ्य आहे असे वाटू लागले. कारण महाभारतात व्यासांनी वर्णिलेली गांधारभूमी म्हणजे आत्ताचं अफगाणिस्तानच! आणि गांधारनरेश शकुनीमामाने घडवून आणलेला कौरव-पांडवांतील कलह, त्यातून उद्भवलेले महायुद्ध, भयंकर नरसंहार हा सारा इतिहास डोळ्यांसमोरून सरकला. इतिहासातून माणूस काहीच शिकत नाही याचे हे जिवंत उदाहरण आहे हे जाणवले. त्याचवेळी सहज पायांकडे लक्ष गेले. काबूल विमानतळावर सिक्युरिटीतून सामान खेचताना बुटांना थोडी माती लागली होती. आणि अलेक्झांडरच्या आईची कथा आठवली. लवकरात लवकर ती माती पुसावी म्हणून एअर होस्टेसला बोलवणार, तोच विमान काबूल सोडत असल्याची घोषणा झाली..
आदित्य परुळेकर