पांढरीशुभ्र बर्फाची दुलई पांघरलेल्या आल्प्स् पर्वताची भव्यता अनुभवत रम्य संध्याकाळी आपल्या साहेबासोबत बीअरचा ग्लास हातात घेऊन फॉम्र्युला वनच्या गप्पा मारणे हे तसे नित्याचे. अशावेळी कार्यालयातील गप्पा मारणे ही घोडचूक समजली जाते. इथला निसर्ग जसा रम्य आहे तशीच इथली कार्यसंस्कृतीही..

युरोपमधील तब्बल १२०० कि. मी. विस्तार असलेल्या आल्प्स् पर्वतरांगांच्या कुशीत वसलेल्या देशांपैकी एक- ऑस्ट्रिया. नितांतसुंदर निसर्गसौंदर्य या देशाला लाभले आहे. निसर्गाशीच इथल्या अनेक गोष्टींची नाळ जुळलेली आहे. अगदी इथल्या  कार्यसंस्कृतीचीही. संगीत हा या देशाचा आत्मा असून इथली क्रीडासंस्कृती ही देशाचा प्राण मानला जातो. हिवाळी खेळसंस्कृतीची मुहूर्तमेढ याच देशात रोवली गेली. वाईन उत्पादन ही या देशाची पूर्वापार परंपरा असून, हा उद्योग आजही त्याच तन्मयतेने केला जातो. निसर्गाबरोबरच अनेक मानवनिर्मित आकर्षणे असलेला हा देश कुणीही प्रेमात पडावा असा आहे.

ऑस्ट्रियात टयलोर प्रांतातील इन्सब्रुक येथे मेड-एल मेडिकल इलेक्ट्रॉनिक्स या कंपनीत मी नोकरी करतो. इथे नोकरी मिळणे हा माझ्या दृष्टीने एक योगायोगच म्हणावा लागेल. एका भारतीय कंपनीत काम करत असताना कंपनीतर्फे मला जर्मनीला पाठवण्यात आले. व्यावसायिकांसाठीचे समाजमाध्यम असलेल्या ‘लिंकड्इन’ या संकेतस्थळावर जगातील तमाम अभियंत्यांप्रमाणे मीही माझा परिचय, शिक्षण, कामाचा अनुभव आदी तपशील ठेवला होता. हा तपशील वाचून ‘जॉब हेडहंटर’चा मला कॉल आला. माझ्या व्हिसाचा कालावधी, कौटुंबिक माहिती, कामाचे स्वरूप आदी माहिती त्यांनी घेतली आणि ती मी सध्या काम करत असलेल्या ‘मेड-एल मेडिकल इलेक्ट्रॉनिक्स’ या कंपनीला पाठवली. पुढे कंपनीत माझी मुलाखत झाली आणि माझी निवडही झाली. अल्पावधीत झालेल्या या निवडप्रक्रियेमुळे मी काहीसा दडपणाखालीच होतो. पण इथे ‘दडपण’ हा शब्द चुकीचा असल्यासारखे त्याकडे पाहिले जाते. याआधी मी भारतीय कंपनीत नोकरीला असताना परदेशवाऱ्यांचा अनुभव असल्यामुळे मला परदेशी कार्यसंस्कृतीची थोडीफार ओळख होती. मात्र, या कंपनीत नोकरीला लागल्यावर माझ्या कल्पनेतही नसलेल्या अनेक गोष्टी माझ्या समोर येत गेल्या. नोकरी- त्यातही परदेशातली- म्हणजे प्रचंड तणाव, साहेबाचा ओरडा या माझ्या मनातील भारतीय संकल्पनांना इथे तडा जाऊ लागला.. आणि मी इथल्या कार्यसंस्कृतीत सहजगत्या रुळलो.

कामात टाळाटाळ करणे हा भारतीय तरुणांचा स्वभावच नाही. त्यामुळे माझी पडेल ते काम करण्याची तयारी होतीच. प्रश्न होता तो इथले वरिष्ठ तसेच इतर सहकाऱ्यांसमवेत जुळवून घेण्याचा! अर्थात इथे माझी पहिली ओळख झाली ती इथल्या भारतीयांसोबतच. इतर लोकही अगदी पहिल्या दिवसापासून माझ्याशी खेळीमेळीने वागत होते. त्यामुळे पहिल्या दिवशीच बरेचसे दडपण कमी झाले. इथे साहेबाला नावानेच संबोधले जाते आणि त्याच्याशी ‘अरे-तुरे’मध्येच गप्पा मारल्या जातात. हो.. गप्पाच. साहेब म्हणतो म्हणून एखादे काम करणे इथे कमीपणाचे मानले जाते. कार्यालयामध्ये साहेबाच्या मतावर नुसतीच मान न हलवता त्यावर मोकळेपणाने आपले मत मांडण्याची तुम्हाला मुभा असते. नुसतेच मत मांडून भागत नाही, तर ते पटवूनही द्यावे लागते. आपण ज्या चमूमध्ये काम करत असतो त्या चमूतील प्रत्येक व्यक्तीच्या मताला तितकेच महत्त्व दिले जाते. अगदी वरिष्ठ अधिकारी असेल किंवा नुकताच चमूमध्ये दाखल झालेल्या व्यक्तीचे मतही विचारात घेतले जाते. प्रत्येकाने त्याच्या कामाशी संबंधित गोष्टीवर मत मांडणे हा कर्मचाऱ्यांचा अधिकार मानला जातो. यातूनच विहित काम अधिकाधिक कौशल्यपूर्वक पार पाडणे आणि ते सर्वोच्च गुणवत्तेचे करण्याचा प्रत्येकाचा ध्यास असतो.

कामाचे दडपण जगभरात सगळीकडेच असते. वरिष्ठ अधिकारी उच्च पातळीवरचे काम आपल्याला देतात. यात प्रत्येकाकडे स्वतंत्र जबाबदारी असते. इथे काम करत असताना एक महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्यावी लागते, ती म्हणजे आपल्या कामासाठी प्रत्येकापाशी स्व-प्रेरणा असावी लागते. आपल्याला दिलेले काम छोटय़ा छोटय़ा कप्प्यांमध्ये विभागून आपण ते कसे करणार, हे वरिष्ठांना सांगण्याची जबाबदारी कनिष्ठांवर असते. यातून आपण एखादे काम पेलू शकतो की नाही याचा अंदाज बांधला जातो. आपल्याला दिलेल्या कामातील एखादी गोष्ट आपल्याला येत नसेल तर ती आपण मोकळेपणाने सांगू शकतो. तसे सांगितल्यावर ‘एवढे पण येत नाही का?’ असा प्रश्न कुणीही विचारत नाही. याउलट, आपल्याला ते कौशल्य अवगत व्हावे यासाठी आवश्यक ते प्रशिक्षण दिले जाते. प्रसंगी कंपनीबाहेरचे प्रशिक्षणही उपलब्ध करून दिले जाते. काम करत असताना जर एखादी अडचण जाणवली तर ती तातडीने सांगणे, हे इथे कार्यसंस्कृतीत महत्त्वाचे कर्तव्य मानले जाते. वेळीच अडचण सांगितल्यास त्यावर तातडीने तोडगाही काढला जातो. जेणेकरून प्रकल्पाच्या शेवटी कोणतीही गडबड होत नाही.

कामात कोणतीही अडचण येऊ नये यासाठी कंपनीकडून कर्मचाऱ्यांना दिल्या जाणाऱ्या सोयीसुविधांबाबत विशेष काळजी घेतली जाते. अगदी कर्मचाऱ्याच्या बसायच्या जागेपासून ते त्यांना लागणारी प्रत्येक आवश्यक गोष्ट कंपनीकडून पुरविली जाते. इतकेच नव्हे तर प्रकल्पात काम करण्यासाठी जर एखादी गोष्ट पाहिजे असेल तर ती थेट खरेदी करण्याचे अधिकारही कर्मचाऱ्यांना दिले जातात. त्यामुळे एखादी वस्तू हवी असेल तर ती थेट मागवण्याची मुभा कर्मचाऱ्यांना असते. त्यामुळे भरपूर वेळ वाचतो. मला एकदा तीन मॉनिटर्सची आवश्यकता होती. तेव्हा मी थेट बाजारात मागणी नोंदवून ते मागवून घेतले. त्यामुळे वेळ वाया न जाता माझे काम झाले. इथे कामाला आणि कर्मचाऱ्यांना विशेष महत्त्व देण्यात येते. या दोन्हीच्या दृष्टीने अनेक नियम बनवले गेले आहेत.

इथल्या नियमानुसार, प्रत्येकाला आठवडय़ाला ३८.५ तास काम करणे बंधनकारक आहे. जास्त वेळ काम करणे इथल्या कार्यसंस्कृतीत बसत नाही. यामुळे तुम्ही अधिक क्षमतेने काम करणेच फायद्याचे ठरते. रोज ४५ मिनिटांची जेवणाची आणि कॉफीसाठीची सुटी मिळते. त्याचबरोबर कामाच्या वेळा या तुमच्या आणि तुम्ही करत असलेल्या प्रकल्पाची गरज लक्षात घेऊन सोयीच्या असू शकतात. आपण जे काम करतो त्याचा सतत आढावा घेण्याची पद्धत इथे आहे. कार्यालयात येण्यासाठी इथे प्रामुख्याने सार्वजनिक वाहतुकीवरच भर दिला जातो. इथल्या कंपन्या आपल्या कर्मचाऱ्यांना ४० टक्के सवलतीच्या दरात मासिक पास उपलब्ध करून देतात. ऑस्ट्रियात नागरिकांच्या आरोग्याला विशेष महत्त्व दिले जाते. त्यामुळे प्रत्येक नागरिकाचा आरोग्य विमा असणे बंधनकारक आहे. सरकारी मदतीने सर्व कंपन्यांना त्यांच्याकडे असणाऱ्या कर्मचाऱ्यांचा आरोग्य विमा काढणे अनिवार्य आहे. तसेच कायद्यानुसार, बेरोजगार, लहान मुले तसेच वयोवृद्धांसह सर्वाचाच आरोग्य विमा उतरवला जातो. इथे आरोग्यासाठीच्या सुविधाही अद्ययावत असून सरकारी रुग्णालयांमध्ये सर्व तऱ्हेच्या आरोग्यसुविधा उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत.

आमच्या कंपनीत ज्या वार्षिक सुटय़ा दिल्या जातात त्यात आजारपणाच्या रजा गणल्या जात नाहीत. आजारपणाच्या रजा अमर्याद असून त्या भरपगारी दिल्या जातात. गर्भवती महिलांना मिळणाऱ्या सुटय़ांप्रमाणेच वडिलांनाही आपले मूल दोन वर्षांचे होईपर्यंत त्याच्यासोबत वेळ घालवण्यासाठी चार महिन्यांची रजा घेणे सक्तीचे आहे. गर्भवती महिलांना कंपनीखेरीज सरकारकडूनही विशेष भत्ते दिले जातात. त्याचबरोबर सरकारी कामे- म्हणजे पासपोर्ट नूतनीकरण, करभरणा आदी सरकारी कामांमुळे जर कार्यालयात येणे जमले नाही तर ती सुट्टी गृहीत धरली जात नाही. आपल्या कर्मचाऱ्यांचे शारीरिक व मानसिक आरोग्य चांगले राहावे याकरता कंपनीतर्फे विविध क्रीडास्पर्धाचे आयोजन केले जाते. त्यात सहभागी होणे सर्वाना बंधनकारक असून, यातून कर्मचाऱ्यांचे आपापसातील नाते अधिक दृढ होऊ शकते. आमचा साहेब आणि आम्ही जर कधी बाहेर भेटलो तर कार्यालयातील गप्पा मारणे अत्यंत चुकीचे मानले जाते. त्यामुळे ‘साहेब आयतेच भेटलेत, तर कार्यालयातील अमुक एक समस्या सांगून टाकू या’ असा विचार ऑस्ट्रियामध्ये करता येत नाही.

कर्मचाऱ्यांच्या वेतनाच्या बाबतीतही कंपन्या विशेष काळजी घेतात. सरकारी कायद्यांनुसार ठरवून देण्यात आलेले किमान वेतन देणे सर्व कंपन्यांना बंधनकारक आहे. याशिवाय कंपनी वर्षांच्या सुरुवातीला प्रत्येक कर्मचाऱ्याला काही उद्दिष्टे आखून देते. त्या उद्दिष्टांची पूर्तता आपण किती केली व कशा प्रकारे केली, यावर वार्षिक वाढ अवलंबून असते. ही प्रक्रिया अगदी पारदर्शक असते. तीत जर आपल्याला काही शंका असल्यास तिचे निराकरण करण्यासाठी वरिष्ठ अधिकारी नेहमीच तत्पर असतात. जर त्यांना आपले म्हणणे पटले तर त्यांनी घेतलेल्या आधीच्या निर्णयाचा फेरविचारही होऊ शकतो. आपल्या कंपनीतील कर्मचारी हा आपली मालमत्ता आहे, त्यामुळे त्याची विशेष काळजी घेणे ही आपली जबाबदारी असल्याचे कंपन्या मानतात. म्हणूनच कर्मचाऱ्यांना काहीही कमी पडणार नाही याची प्रकर्षांने काळजी घेतली जाते. यामुळेच ऑस्ट्रियातील कंपन्यांमधील कर्मचारी हे जगातील समाधानी कर्मचाऱ्यांपैकी गणले जातात.
(मेड-एल मेडिकल इलेक्ट्रॉनिक्स, इन्सब्रुक, ऑस्ट्रिया)
मयूर नांदे