२००७ ते २००९ या काळात ‘बॅले डान्स’ ही चित्रमालिका करताना विविध ऋतूंमध्ये इटलीतील फ्लॉरेन्सला बऱ्याचदा माझं जाणं-येणं होत असे. त्या विमानप्रवासात ‘सिंफनी ऑफ सीझन्स’ या चित्रमालिकेची ठिणगी माझ्या मनात पहिल्यांदा पडली. झुरिकहून फ्लोरेन्सला वा फ्लोरेन्सहून म्युनिकला जाताना तसंच परतीच्या प्रवासात छोटय़ा विमानातून प्रवास होत असे. ही विमाने कमी उंचीवरून जात असल्याने या प्रवासात स्वच्छ, निरभ्र आकाशातून इटली, ऑस्ट्रिया आणि स्वित्र्झलडमधील आल्प्स् पर्वतरांगांचं विहंगम दृश्य दिसे. निसर्गाच्या नानाविध आविष्कारांनी अनेक ठिकाणं मनात घर करत. मनात येई, वरून जर ही निसर्गदृश्यं इतकी सुंदर भासतात, तर प्रत्यक्षात ती किती विलोभनीय असतील! त्यातूनच मग आल्प्स् पर्वतराजीतील अनुपमेय निसर्ग चित्रबद्ध करण्याची जबर इच्छा मनात निर्माण झाली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

२०१३ साली मी आल्प्स्च्या रेखाटनाकरता स्वित्र्झलडचा प्रवास केला. इथून माझ्या आल्प्स्वरील चित्रमालिकेच्या कलात्मक प्रवासास सुरुवात झाली. पुढे इटली, फ्रान्स, जर्मनी आणि स्वित्र्झलडमध्ये आल्प्स् पर्वतराजीच्या सान्निध्यातील प्रदेशांत रेल्वेने आणि बसने बराच प्रवास केला. त्यातून वेगवेगळ्या ऋतूंमधील आल्प्स्ची अनेक लोभस रूपं मी चितारली. ती रेखाटताना मला एक वेगळाच अनुभव आला. पूर्वी विमानप्रवासात चित्ररेखाटनाकरता हेरलेली ठिकाणं प्रत्यक्षात  मला तितकीशी आकर्षक वाटेनात. त्यापाक्षा दुसरीच ठिकाणं मला चित्रांकरता खुणावू लागली. ही ठिकाणं पर्यटकांच्या यादीत नसलेली, काहीशी अस्पर्श, अनाघ्रात अशा निसर्गसौंदर्यानं नटलेली होती. निसर्ग त्याच्या मूळ रूपात इथं गोठलेला आहे असं मला वाटलं. आल्प्स् पर्वतराजीतलं हवामान सतत बदलत असतं. ऋतूंनुसारसुद्धा त्यात बदल होत असतो. निसर्गाचं हे सतत बदलणारं रूप चित्रित करणं मला आव्हानात्मक वाटे. चित्राची सुरुवात एका बिंदूशी होई आणि प्रत्यक्षाते ते पूर्णत्वाला जाईतो तिथलं निसर्गरूप कमालीचं बदललेलं असे. म्हणूनच माझ्या या चित्रमालिकेत वेगवेगळ्या ऋतूंतल्या आल्प्स्चं प्रतिबिंब दिसून येतं. दुसरी गोष्ट म्हणजे मी एक गोष्ट ठरवून केली. ती म्हणजे- या चित्रांत मानवनिर्मित कुठलेही घटक मी चितारले नाहीत. निसर्ग त्याच्या मूळ रूपातच मला रेखाटायचा होता.

आल्प्स्च्या या चित्रमालिकेनंतर साहजिकच आपल्याकडल्या हिमालयाबद्दलची माझी उत्सुकता जागृत झाली. म्हणून मग ठरवलं, की हिमालयही आपण जवळून अनुभवायचा आणि तो जसा भावेल तसा चित्रित करायचा. त्यानुसार हिमालयातल्या विविध भागांत जाऊन मी तिथला निसर्ग चित्रबद्ध करायला सुरुवात केली.

या दोन पर्वतराजींत काही साम्यं आणि वेगळेपणही मला जाणवलं. आल्प्स्मध्ये रिमझिम पाऊस आणि बर्फवृष्टी होत असल्यानं तिथं उघडेबोडके डोंगर अभावानंच आढळतात. याच्या उलट हिमालयात धुंवाधार पाऊस पडत असल्यानं दरडी कोसळण्याचं प्रमाणही मोठं आहे. परिणामी हिमालयात अनेक ठिकाणी दरडी कोसळत असल्यानं उघडे पडलेले डोंगर दिसतात. सतत बदलता निसर्ग ही दोन्ही ठिकाणची विशेषता. या सगळ्याचं प्रतििबब चित्रांतून न उमटतं तरच नवल.

आणखी एक गोष्ट यानिमित्तानं मला सांगावीशी वाटते, या दोन्ही ठिकाणची माणसं, पशुपक्षी, प्राणी निसर्गाशी एकजीव झालेले आहेत. इथल्या माणसांचं जगणं खडतर असलं तरी त्यांचं इथल्या निसर्गाशी जैविक नातं आहे. उभयतांतला संवाद विलक्षण आहे. भोवतालच्या निसर्गाबद्दल त्यांच्या मनात अपार प्रेम, आदर आणि अभिमानाची भावना आहे. माणसानं निसर्गाशी असलेलं आपलं हे नातं कायम जपायला हवं असं मला वाटतं. त्याचबरोबर आपल्या सभोवतालचा निसर्ग हा त्याच्या मूळ अस्पर्श रूपात जतन करायला हवा.

परंतु आपल्या हव्यासामुळे निसर्गावर मात करण्याच्या नादात आपण आपलं स्वत:चंच अस्तित्व एके दिवशी गमावून बसू असं मला वाटतं. निसर्गाची स्पंदनं, त्याच्या रूपांतली स्थित्यंतरं, मधेच प्रत्ययाला येणारं त्याचं भयाण रौद्ररूप हे याचेच गर्भित इशारे आहेत. त्यांची वेळीच दखल आपण घेतली नाही तर आपला विनाश अटळ आहे. तेव्हा निसर्गाशी दोस्ती करून त्याचा योग्य तो आब आणि आदर राखणं हेच अंतिमत: मानवाच्या हिताचं आहे. या दोन चित्रमालिकांतून मला हेच सुचवायचं आहे.

अंकाच्या मुखपृष्ठावरचं चित्र हे आल्प्स् पर्वतराजीतलं आहे. तर सोबतच्या पानावरचं चित्र हिमालयाच्या परिसरातल्या सिक्कीममधलं आहे. सतत रंग-रूप बदलणारा निसर्ग, तसंच हवामान, विलक्षण अनुभव देणारे प्रदेश तसंच ऋतूनुसार त्यांत होणारे बदल याचं मला विलक्षण आकर्षण आहे. म्हणूनच या गूढ पर्वतराजींच्या निकट जाऊन मी ते अनुभवले. आणि माझ्या दृष्टीतून चित्रांतून ते साकारण्याचा प्रयत्न केला.

मुखपृष्ठ : स्वित्र्झलडमधला वसंत ऋ तू

मी जेव्हा जेव्हा आल्प्स्ला गेलो, तेव्हा तेव्हा आल्प्स् पर्वताची हिमाच्छादित शिखरेवगळता सबंध परिसर नजरबंदी करणाऱ्या मोहक हिरव्या छटा ल्यालेला होता. रिमझिमत्या पावसानं आल्प्स्चा आसमंत अतिशय आल्हाददायी वाटे. स्वच्छ, शुद्ध हवा.. डोंगर उतरणीवर हिरव्या कुरणांत चरणारी गुरं हे वसंत ऋ तूतलं इथं नेहमीचंच दृश्य. २०१५ साली स्वित्र्झलडमधील दावोसचं आल्हाददायी वातावरणातलं हे चित्र.

सोबतचं चित्र : सिक्कीममधली नीरव शांतता

सिक्कीममधले ऐन उन्हाळ्याचे दिवस. स्विस आल्प्स्प्रमाणेच हिमालयाची बर्फाच्छादित शिखरं वगळता भोवतालचा देखावा हिरवाईच्या वेगवेगळ्या छटांनी नटलेला. मात्र, या छटा स्विस आल्प्स्पेक्षा वेगळ्या आहेत. इथली झाडंझुडपं, इथलं लोकजीवन खास हिमालयीन आहे. आल्प्स्मध्ये पाऊस रिमझिमतो, तर हिमालयात तो मुसळधार बरसतो. त्यामुळे हिमालय पर्वतराजीत प्रचंड प्रमाणावर दरडी कोसळतात. त्यामुळे काही ठिकाणी पर्वताचे कडे कुणीतरी तीक्ष्ण हत्यारानं उभेच्या उभे कापल्यासारखे किंवा सुरुंग लावून उडवल्यासारखे उघडे पडलेले दिसतात. इथं शहरांत कदापि प्रत्ययाला न येणारी नीरव शांतता आपल्याला अनुभवायला मिळते. इथं विस्मयकारी (Magical), गहन-गूढ, रहस्यमय (Mystic) असं काहीतरी वातावरणाला भारून राहिलंय असं आपल्याला सारखं वाटत राहतं. उघडय़ा डोंगरकडय़ांवर मुलायम, चकचकीत फर असलेले याक निर्धास्तपणे चरताना दिसतात. उत्तर सिक्कीममधला हा आगळा निसर्ग मे २०१६ साली मी चित्रबद्ध केलेला आहे.
देवदत्त पाडेकर

मराठीतील सर्व दिवाळी अंक २०१६ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Symphony and seasons
First published on: 08-03-2017 at 01:26 IST