शनिवारी पुण्यात अग्नीशमन दलाच्या जवानांसोबत भोई प्रतिष्ठानतर्फे भाऊबीज साजरी करण्यात आली. शहरात कुठेही आग लागण्याची घटना घडली तर तिच्यावर नियंत्रण मिळवण्यासाठी तत्पर असलेल्या या जवानांना कोणताही सण कुटुंबासोबत साजरा करता येत नाही. नेमकी ही बाब लक्षात घेऊन मागील २० वर्षांपासून भोई प्रतिष्ठानतर्फे अग्नीशमन दलाच्या जवानांसोबत भाऊबीज साजरी केली जाते. यंदाही त्याचप्रमाणे भाऊबीज साजरी करण्यात आली. यावेळी या जवानांच्या कुटुंबातील सदस्यही हजर होते. या सगळ्यांच्या चेहऱ्यावर एक वेगळाच आनंद बघायला मिळाला.

भाऊबीजेच्या सोहळ्याला भोई प्रतिष्ठानचे मिलिंद भोई, अग्नीशमन विभागाचे प्रमुख प्रशांत रणपिसे, माजी आमदार उल्हास पवार, ज्येष्ठ अभिनेते सुनील गोडबोले आणि इतर पोलीस अधिकारीही हजर होती. २० वर्षांपूर्वी जवानांसोबत आम्ही भाऊबीज साजरी करण्याचा निर्णय घेतला. यावर्षीचे २१ वे वर्ष आहे. समाजासाठी झटणाऱ्या घटकासाठी आम्हाला काहीतरी योगदान देता येते याचे समाधान वाटते आहे असे मिलिंद भोई यांनी म्हटले आहे. दरवर्षी भोई प्रतिष्ठानतर्फे भाऊबीज साजरा करण्याचा हा सोहळा साजरा होतो याचा विशेष आनंद आहे अशी प्रतिक्रिया प्रशांत रणपिसे यांनी दिली आहे.