23 April 2019

News Flash

Diwali 2017 : जावे कंदीलांच्या गावा…

माहिमच्या 'कंदील गल्ली'ला विषेश पसंती असते

या कंदील गल्लीला किमान ८० हून अधिक वर्षांचा इतिहास असल्याचं इथले स्थानिक विक्रेते सांगतात.

दिवाळी म्हटलं की कंदील आलाच आणि जेव्हा विषय कंदील खरेदीचा असतो तेव्हा मुंबईतल्या अनेक ग्राहकांची पसंती असते ती माहिममधल्या ‘कंदील गल्ली’ला. अगदी लहान मुलांना आवडतील असे कार्टूनचे कंदील, लहान काठ्या आणि कागदांपासून तयार केलेले पारंपरिक कंदील, इको फ्रेंडली कंदील, टाकाऊ पासून टिकाऊ कंदील असे कंदीलाचे शेकडो प्रकार याठिकाणी पाहायला मिळतात. त्यामुळे ग्राहक येथे कंदील खरेदी करण्याला अधिक पसंती देतात. चायनीज वस्तूंच्या भाऊगर्दीत ही कंदील गल्ली आजही आपली स्वतंत्र ओळख राखून आहे.

‘सिटी लाईट’ थिएटरपासून सुरू होणारी कंदील गल्ली ‘गोवा पोर्तुगीजा’ हॉटेलपर्यंत पसरली आहे. ही संपूर्ण गल्ली घरगुती कंदीलसाठी प्रसिद्ध आहे. एलजे रोडवरून वांद्र्याच्या दिशेने जाणाऱ्या रस्त्यावरदेखील अनेक कंदील विक्रेते आहेत, पण हे विक्रेते घरगुती कंदीलपेक्षा राजकीय पक्षांचे मोठे कंदील तयार करण्यासाठी ओळखले जातात. या कंदील गल्लीला किमान ८० हून अधिक वर्षांचा इतिहास असल्याचं इथले स्थानिक विक्रेते सांगतात. काही विक्रेत्यांची तिसरी किंवा चौथी पिढी या व्यवसायात आहे. खरं तर ‘कंदील गल्ली’ हे लोकांनी दिलेलं नाव आहे. येथे ‘कवळे वाडी ‘ आणि ‘कादरी वाडी’ अशा दोन वाड्या आहेत. प्रत्येक वाडीमध्ये शंभरएक कुटुंब आहेत. त्यातले जवळपास ८० टक्के लोक कंदील घरच्या घरी तयार करून विकण्याचा व्यवसाय करतात. वाडीतले बहुतांश रहिवासी आणि विक्रेते हे मराठी आहेत. आपली नोकरी आणि इतर व्यवसाय सांभाळून दिवस-रात्र एक करून कुटुंब दिवाळीच्या महिनाभर आधी कंदील तयार करण्याचं काम करतात.

Happy Diwali 2017 : घरच्या घरी आकाशकंदील तयार करण्याच्या पाच सोप्या पद्धती

साधारण दिवाळीच्या आठवडाभर आधी या दोन्ही वाडीतल्या कोणत्याही घरात पाऊल टाकलं तर बच्चेकंपनीपासून ते ज्येष्ठांपर्यंत प्रत्येकजण कंदीलच्या कामात व्य्रग दिसतील. येथे प्रत्येकांची घरं खूप लहान आहेत. त्यामुळे दिवाळीच्या आधी संपूर्ण घरामध्ये कंदीलाचे साहित्य पसरलेले असते. घरात बसायलाही जागा मिळणार नाही, असं चित्र येथे दिसतं. पण तरीही लोकं आवडीने कंदील तयार करतात. पांरपरिक कंदीलच नाही तर अनेक जण वेगवेगळ्या प्रकारचे कंदील तयार करण्यास पसंती देतात. ग्राहकांच्या मागण्या वाढल्या, आवड बदलली त्यामुळे प्रत्येक ग्राहकांच्या आवडी आणि गरजेनुसार कंदील विक्रेते वेगवेगळे प्रकार तयार करू लागले. सुरूवातीला छंद म्हणून वाडीतल्या दोघा-तिघांनी व्यवसाय सुरू केला होता, तेव्हा या परिसरात पाच-सहा कंदीलचे स्टॉल लागायचे आता या परिसरात साधरण कंदीलची हजार एक दुकानं असल्याची माहिती कवळे वाडीतल्या एका स्थानिक कंदील विक्रेत्यांनी दिली. अगदी दहा रुपयांपासून ते पाच-सहा हजारांच्या किंमतीत येथे कंदील विक्रीसाठी उपलब्ध आहेत.

Happy Diwali 2017 : राजगिरा लाह्यांची टिक्की

कवळे वाडीपासून काही दूर अंतरावर असलेली कादरी वाडी देखील कंदीलसाठी प्रसिद्ध आहे, पण येथे घरगुती कंदीलपेक्षा मोठमोठे सार्वजनिक कंदील किंवा राजकीय पक्षांचे कंदील तयार केले जातात. फुटाला साधारण एक हजार रूपये अशा दराने या कंदीलांची विक्री केली जाते. हे कंदील साधारण चार ते पाच फुटांचे असतात. पाच ते सहा जण मिळून एक कंदील तयार करतात. फक्त मुंबईतूनच नाही तर राज्यातल्या विविध ठिकाणाहून या कंदीलला मागणी आहे. कादरी वाडीतले रहिवासी दत्ताराम पाटील हे वयाच्या पाचव्या वर्षांपासून कंदील तयार करत आहे. ते आज ७५ वर्षांचे आहेत. कादरी वाडीतले ते सर्वात जुने कंदील व्यवसायिक आहेत. हल्लीचे विक्रेते नवनवीन प्रकारचे कंदील तयार करत असले तरी दत्ताराम आजोबा मात्र आजही पांरपारिक प्रकारेचे कंदील तयार करतात. या वाडीतलं प्रत्येक मुलं हे लहान असल्यापासूनच आपल्या आजोबांकडून किंवा बाबांकडून कंदील तयार करायला शिकायचे, माझीही सुरूवात वयाच्या पाचव्या वर्षांपासून झाली असं त्यांनी ‘लोकसत्ता ऑनलाईन’ला सांगितले.

दिवाळीच्या आठवडाभर आधी कंदील गल्ली विविध प्रकारच्या कंदीलांनी नव्या नवरीसारखी नटलेली असते, चायनीय उत्पदानांच्या गर्दीत या कंदील गल्लीनं आजही आपलं वेगळंपण आणि परंपरा जपली आहे.

प्रतीक्षा चौकेकर

pratiksha.choukekar@loksatta.com

First Published on October 16, 2017 12:11 pm

Web Title: diwali 2017 history and information of kandli galli mahim railway station