दिवाळी म्हटले की फराळ हा आलाच. त्यामुळे घराघरांमध्ये फराळ बनविण्याची लगबग सुरू झाली आहे. हल्ली बाजारात उपलब्ध होणाऱ्या फराळालादेखील मागणी असल्याने या संधीचा फायदा घेण्यासाठी शहरातील बचत गटदेखील सरसावले आहेत.

दिवाळी आली की फराळाच्या विविध पदार्थाचा घमघमाट दरवळायला लागतो. दिवाळीतील बहुतेक पदार्थ घरी बनवले जातात. मात्र आजच्या धकाधुकीच्या जीवनात नोकरदार महिला वर्गाला घरी फराळ बनवणे शक्य नसल्यामुळे बाजारात उपलब्ध असलेल्या तयार पदार्थानादेखील चांगली मागणी असते. म्हणूनच याच संधीचा फायदा घेण्यासाठी शहरातील बचत गटदेखील तयारीला लागले आहेत. ग्राहकांना बाजारातील फराळाबरोबरच घरगुती स्वाद देणाऱ्या फराळाचा पर्याय म्हणून महिला बचत गटांनी पुढाकार घेतला आहे. त्यामुळे दुकानांमधून फराळ घेण्यापेक्षा बचत गटांतील महिलाकडून फराळ घेण्यासाठी रीघ लागली आहे. शिवाय हे पदार्थ दर्जेदार आणि दुकानांमधील पदार्थापेक्षा स्वस्त असल्यामुळे ग्राहकांकडून त्याला चांगलीच पसंती मिळत आहे. शिवाय या विक्रीमुळे आर्थिक नफाही चांगला होत असल्यामुळे बचत गटातील महिलांमध्येदेखील समाधान आहेत.

टीव्हीवरच्या मालिका बघण्यात वेळ घालवण्यापेक्षा महिला बचत गटांच्या माध्यमातून दिवाळीसाठी लागणारा फराळ बनवतो. हा फराळ विकत घेण्यासाठी नोकरदार महिला वर्गाकडून उत्तम प्रतिसाद आहे. तसेच या माध्यमातून मिळणाऱ्या पैशांमुळे कुटुंबालादेखील हातभार लागतो.

रंजना रोडे, जाईजुई महिला बचत गट