19 March 2018

News Flash

Happy Diwali 2017 : घरच्या घरी आकाशकंदील तयार करण्याच्या पाच सोप्या पद्धती

दिवाळी करा जास्त आनंदी

लोकसत्ता ऑनलाइन | Updated: October 13, 2017 10:55 AM

घरच्याघरी तयार करता येतील असे सोपे आकाशकंदिल

दिवाळी म्हणजे दिव्यांचा सण. या काळात घरासमोर असणारा आकाशकंदील, पणत्या, रांगोळी घराची शोभा वाढवतात. त्यातही हे सगळे घरात राहणाऱ्या लोकांनी आपल्या हाताने केले असेल तर त्याचे सौंदर्य या सणाच्या आनंदात आणखीनच भर घालते. लहानपणी शाळेत केलेले छोटे छोटे आकाशकंदील आपल्याला आठवतही असतील. त्यानंतर छावा किंवा इतर दिवाळी अंकांमध्ये पाहून तयार केलेले आकाशकंदील आणि मग थोडे मोठे झाल्यावर आपण राहत असलेल्या इमारतीतील मित्रमंडळींनी मिळून एकत्रितपणे केलेले आकाशकंदील या सगळ्याची मजाच काही औरच. मागच्या काही दिवसांपासून टाकाऊपासून टिकाऊ आकाशकंदील करण्याचा ट्रेंड वाढत आहे.

आता यासाठीही कल्पकता असणे आवश्यक असते. कुटुंबातील एक जरी व्यक्ती असा कल्पक असला तरी दिवाळीत घर सजवणे हा एक चांगला उत्सव होऊ शकतो. याशिवाय कुटुंबातील व्यक्ती किंवा मित्रमंडळी यांनी एकत्रितपणे हे कलाकुसरीचे काम केल्याने घरातही एक वेगळ्याप्रकाचे आनंदी वातावरण निर्माण होते. सध्या इंटरनेटमुळे या गोष्टी आणखी सोप्या झाल्या आहेत. आकाशकंदील तयार करण्याचे थेट व्हिडिओच आता इंटरनेटवर सहज उपलब्ध होतात. आता टाकाऊपासून टिकाऊ किंवा अगदी सहज उपलब्ध होतील अशा गोष्टींपासून आकाशकंदील कसा तयार करायचा पाहूया….

१. चहा पिण्याच्या प्लॅस्टीकच्या किंवा थर्माकोलच्या ग्लासपासून अतिशय आकर्षक असा आकाशकंदील तयार करता येतो. यामध्ये एक फुगा घ्यावा. तो गोलाकार फुगवून त्याच्या भोवती प्लॅस्टीकचे ग्लास स्टेपलरने किंवा दोऱ्याने एकमेकांत अडकवावेत. त्यानंतर फुगा फोडून टाकल्यास एकमेकांमध्ये अडकलेले हे ग्लास अतिशय सुंदर दिसतात. करायला सोपे आणि कमीत कमी खर्चात होणारा हा आकाशकंदील दिवाळीनंतरही शोचा दिवा म्हणून वापरता येऊ शकतो.

२. गोलाकार फुगवलेल्या फुग्याला फेव्हीकॉल लाऊन त्यावर पुड्याचा किंवा पतंगाचा दोरा गुंडाळल्यास त्यापासूनही अतिशय सुंदर आकाशकंदील तयार होतो. हाही आकाशकंदील करणे अतिशय सोपे आणि वेळ वाचवणारे असते. दोऱ्याची छान जाळी तयार झाल्याने त्यातून पडणारा प्रकाश आपल्या दारात एक छान नक्षी तयार करतो.

३. हँडमेड पेपरपासून आकाशकंदील बनविण्याचा ट्रेंडही मागच्या काही दिवसात पुढे येताना दिसत आहे. यामध्ये विविध रंगाचे आणि डिझाईनचे हँडमेड पेपर आपण वापरु शकतो. त्याशिवाय त्याला आपल्या आवडीची लेस लावली किंवा इतरही काही सजावट केली तर तो दिसायलाही आकर्षक दिसतो.

४. कार्डशिट हे काहीसे जुने झाले असले तरीही त्यापासून फोल्डींगचा उत्तम असा आकाशकंदील आपल्याला तयार करता येतो. हा आकाशकंदील फोल्ड करणे शक्य असल्याने तो एकाहून जास्त वर्षांसाठीही वापरता येतो. यासाठीही किमान खर्च येतो तसेच प्रत्येकजण आपल्या आवडीनुसार त्याची सजावट करु शकतो. यामध्ये आपल्याला आलेल्या लग्नपत्रिकांच्या कागदाचाही आपण अतिशय चागंल्यापद्धतीने वापर करु शकतो.

५. आकाशकंदील सजवण्यासाठी घरात असणारी एखादी लेस, साडीचे काठ, वेगवेगळ्या प्रकारची बटणे, लोकर, टिकल्या, लटकन यांचा वापर करता येतो. याशिवाय सध्या बाजारातही सजावटीसाठी अनेक वस्तू मिळतात. त्यांचा वापर करुन आपण आपली दिवाळी नक्कीच प्रकाशमय आणि आनंदी करु शकतो.

First Published on October 12, 2017 3:51 pm

Web Title: diwali celebration home made lanterns types of lanterns how to make at home
  1. No Comments.