News Flash

Diwali 2017: यंदा आम्ही ठरवून दिवाळीला सुट्टी घेतली- प्रिया मराठे

दिवाळीत पाऊस पडला तर कंदीलाचं काय होईल, हा प्रश्न आतापर्यंत कधीच पडला नव्हता

Diwali 2017: यंदा आम्ही ठरवून दिवाळीला सुट्टी घेतली- प्रिया मराठे
प्रिया मराठे

‘दिवाळीचा सण मोठा, आनंदाला नाही तोटा’ असं म्हणत आज प्रत्येकानेच दिवाळी पहाट अगदी आनंदाने साजरी केली असेल. अभ्यंग स्नान करुन झाल्यावर फराळावर ताव मारत कुटुंबासोबत वेळ घालवण्यात आज अनेकजण व्यग्र असतील. मग त्यात आपले मराठी कलाकार तरी कसे मागे राहतील. प्रसिद्ध अभिनेत्री प्रिया मराठे हिनेही यावर्षीची तिची दिवाळी कामातून थोडा वेळ काढत कुटुंबासोबत साजरी करण्याचा निर्णय घेतलाय. प्रियाने ‘लोकसत्ता ऑनलाइन’कडे तिचे यावर्षीचे दिवाळीचे प्लॅन सांगितले.

मी एकत्र कुटुंबात राहते. आम्ही आतापर्यंत प्रत्येक सण एकत्रितपणेच साजरा करत आलो आहोत. यावर्षीही आम्ही एकत्रितपणेच दिवाळी साजरी करणार आहोत. माहेरी एकत्रित कुटुंब असल्यामुळे सगळे पदार्थ घरीच केले जातात. आम्ही कागदी कंदीलही घरीच तयार करतो. मी आणि शांतनूने यावर्षी ठरवून दिवाळीत एकत्रित सुट्ट्या घेतल्या आहेत. आम्ही दोघंही मालिकांच्या चित्रीकरणामध्ये व्यग्र असल्यामुळे कुटुंबासोबत हवा तेवढा वेळ घालवता येत नाही. त्यामुळे आम्ही फार पूर्वीच प्रोडक्शन हाऊसला सुट्टी हवी असल्याची कल्पना देऊन ठेवली होती. मात्र, अखेरच्या क्षणापर्यंत कामात बिझी असल्यामुळे आम्हाला खरेदीला वेळच मिळाला आहे. पण तरीही कुटुंबाला भेटण्याच्या आनंद हा खरेदीपेक्षा कैकपटींनी मोठा आहे. आम्ही पहिले काही दिवस पुण्याला माझ्या सासरी जाणार आहोत. तिथे दिवाळी साजरी केल्यानंतर ठाण्यात माहेरीही सर्वांसोबत वेळ घालवणार आहोत.

मला आजही आमची लहानपणीची दिवाळी आठवते. कडाक्याच्या थंडीत पहिली आंघोळ करताना उडणारी त्रेधातिरपीट आता कुठेच दिसत नाही. यंदा तर थंडीचे सोडाच, पण पाऊसही थांबायचे नाव घेत नाही. आम्ही कागदी कंदील बनवत असताना हाच विचार करत होतो की , कंदील बाहेर लावला तर तो भिजेल म्हणून यावर्षी आम्ही गॅलरीत कंदील लावलाय. दिवाळीत पाऊस पडला तर कंदीलाचं काय होईल, हा प्रश्न आतापर्यंत कधीच पडला नव्हता. पण आता त्याचाही विचार करावा लागतोय, याचेच अधिक हसू येते. गेल्या काही वर्षांपासून आम्ही फटाके फोडणे जाणीवपूर्वक बंद केले आहे. मी लोकांनाही हेच सांगू इच्छिते की फटाके फोडू नका. मात्र, तरीही ज्यांना मोह आवरत नसेल त्यांनी ध्वनीप्रदूषण आणि वायूप्रदूषण कमी होईल, याची काळजी घ्यावी, असे प्रियाने सांगितले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 18, 2017 1:14 pm

Web Title: marathi celebrity priya marathe on diwali 2017 celebration
Next Stories
1 Happy Diwali 2017 : दिवाळीत आहाराची ‘अशी’ घ्या काळजी
2 Happy Diwali 2017 : इमिटेशन ज्वेलरीचा पर्यायही उत्तम
3 Happy Diwali 2017 : टोमॅटो शेव
Just Now!
X