29 February 2020

News Flash

लांबलेल्या पावसात दिवाळीची बाजारपेठ भिजली

अगोदरच मंदीने पोळलेल्या बाजारपेठेला आता सततच्या पावसाने भिजवून टाकले आहे.

पावसाने धास्तावलेला व ग्राहकाच्या प्रतीक्षेत असलेला  किल्ल्यांवरील चित्रे विकणारा व्यावसायिक.(छाया - इम्रान मुल्ला)

अगोदरच मंदीने पोळलेल्या बाजारपेठेला आता सततच्या पावसाने भिजवून टाकले आहे. दिवाळीच्या निमित्ताने रांगोळीच्या विक्रीपासून ते किल्ल्यावरील चित्रे, आकाशकंदील, पणत्यांपर्यंत आणि फराळापासून ते कपडय़ांपर्यंत सगळ्याच व्यवसायांची गणिते या लांबलेल्या पावसाने पूर्णपणे ओली करून टाकली आहेत.

यंदा सुरुवातीला ऐन हंगामात गायब झालेल्या पावसाने पुढे परतीच्या वेळी मात्र तब्बल १५ दिवस मुक्काम ठोकला आहे. रोज धो धो कोसळणाऱ्या या पावसाने शेतीमालाचे तर मोठे नुकसान केले आहेच. पण आता दिवाळी सणावरही काळे ढग तयार केले आहेत. दिवाळी हा वर्षांतील सर्वात मोठा सण. या सणाच्या निमित्ताने कपडे, दागिने, वाहने, विद्युत उपकरणे आदी मोठय़ा बाजारपेठेप्रमाणेच पणती, रांगोळी, किल्ल्यांवरील चित्रे, आकाशकंदील, फटाके, केरसुणी, बोळकी, पूजा साहित्य, तयार फराळ, भेटवस्तू अशी हंगामी स्वरूपाची एक मोठी बाजारपेठ गावा-शहरांमध्ये फुलत असते. दिवाळी सणाच्या निमित्ताने वर्षांतून काही काळ हा हंगामी व्यवसाय करत त्यावर पोट भरणारा मोठा वर्ग आहे. यामध्ये गरीब, कनिष्ठ मध्यम वर्ग, विद्यार्थी, होतकरू तरूण यांचा मोठा सहभाग असतो. या बहुतेक वस्तूंची विक्री अगदी रस्त्याच्या कडेला, चौकात होत असते. या साऱ्यांच्या व्यवसायावर यंदाच्या या पावसाने पाणी फिरवले आहे.

बहुतेक ठिकाणी दिवाळीपूर्वी पंधरा दिवस अगोदर ही बाजारपेठ भरत असते. पण गेले काही दिवस पावसामुळे या वस्तूंची दुकानेच लावता येत नाहीत. अचानक कोसळणाऱ्या या पावसाने पणत्या, किल्ल्यांवरील चित्रे, आकाशकंदील यांचे मोठे नुकसान होत आहे. या पावसाने तयार फराळाच्या विक्रीवरही परिणाम झाला असून पुढील ४ दिवसांत जर विक्री झाली नाही तर या खाद्यपदार्थाचे काय करायचे हा प्रश्न या छोटय़ा विक्रेत्यांना पडला आहे.

राज्यात बहुतेक गावा-शहरांत बचतगटांमार्फत अशी फराळ विक्री मोठय़ा प्रमाणात केली जाते. या महिलांनी तयार केलेल्या फ राळाची शहरात जागोजागी विक्री केली जाते. यंदाही अनेक शहरांमध्ये अशी तयार फराळांची प्रदर्शने भरविली आहेत. पण रोज पडणाऱ्या पावसाने या प्रदर्शनांकडे कुणीही फिरकेनासे झाले आहे. अगोदरच मंदी त्यात या पावसाची भर या साऱ्यांमुळे यंदाची ही दिवाळी पूर्णपणे काळवंडली गेली आहे.

दिवाळी हा आमच्यासाठी वर्षभरातील ठोस उत्पन्नाचा स्रोत. यंदा यासाठी एकात्म समाज सेवा केंद्र आणि नाबार्ड यांच्याकडून ५० हजाराचे कर्ज काढून फ राळ तयार केला आहे. पण या पावसामुळे विक्रीवर मोठा परिणाम झाला आहे. आता तर घरोघरी जाऊन फराळ विक्री करत आहोत. तरीही आमची ही वसुली होईल की नाही ही भीती वाटत आहे.

भारती जगताप, रेणुका महिला बचत गट, मिरज.

दरवर्षी ऐन दिवाळीच्या हंगामात रस्त्यावर मेणबत्ती, पणत्या, उदबत्ती, साबण, तेल, उटणे या वस्तू हातगाडय़ावर ठेवून विक्री करतो. यातून सुटणाऱ्या चार पैशांवर आमच्या गरीब संसाराला हातभार मिळत असतो. यासाठी कर्ज काढून माल खरेदी केलाय पण पावसामुळे विक्रीच होत नाही. हा माल अंगावर पडला तर जगणे अवघड होईल.

ओंकार हवालदार, फिरता विक्रेता. 

First Published on October 15, 2017 2:30 am

Web Title: rainfall disrupts diwali shopping in maharashtra
Next Stories
1 दिवाळी बाजारात यंदाही चिनी वस्तुंचे वर्चस्व
2 माहीमच्या ‘कंदील गल्ली’ला परतीच्या पावसाचा फटका
3 पणत्यांबरोबरच मातीच्या कंदिलांचीही विक्री
X
Just Now!
X