दिवाळी आली की तरूणींना एक प्रश्न आवर्जून पडतो. दिवाळीत कोणते कपडे घ्यायचे? त्यांचं स्टायलिंग कसं असावं? कोणता गेटअप मला अधिक खुलून दिसेन? वगैरे वगैरे. हे प्रश्न कधीही न संपण्यासारखे असतात. त्यातून खरेदीला गेलं की दुकानात दिसणाऱ्या विविध प्रकारच्या आणि रंगांच्या कपड्यांनी हा संभ्रम हमखास वाढत जातो. बरं महागडे कपडे घ्यायचे तर ते आपण एकदाच घालणार नंतर अशा भरजरी कपड्यांचा आपल्याला काही उपयोग नसतो. तेव्हा सणासाठी कपडे निवडताना आणि तयार होताना काय करणं गरजेच आहे यासाठी फॅशन कंन्सल्टंट प्राजक्ता तांडेलकडून काही खास टिप्स…

– हल्ली अनेक ठिकाणी ‘दिवाळी पाहट’चे कार्यक्रम असतात. तरूण वर्ग आवर्जून अशा कार्यक्रमात सहभागी होतात. तेव्हा ‘दिवाळी पहाट’च्या कार्यक्रमासाठी कपडे निवडताना रंगसंगतीवर विशेष भर द्यावा. अशा वेळी फिक्या रंगसंगतीच्या कपड्यांना जास्त प्राधान्य द्यावं. मोती, पांढरा, ऑफव्हाईट अशा कपड्यांना पसंती द्यावी. पहाटेच्या वातावरणात असा गेटअप खूप खुलून दिसतो.
– संध्याकाळचा गेटअप करताना गडद किंवा पॉपी रंगाची निवड करा. रात्रीच्या वेळी हे रंग उठून दिसतात.
– खूप नक्षीकाम केलेले किंवा खड्यांनी सजवलेले ड्रेस निवडण्यापेक्षा वेगळं काहीतरी ट्राय करा. हे ड्रेस तसेच पडून राहतात त्यापेक्षा सिम्पल पण सोबर लुकला प्राधन्य द्या.

– साधा कुडता त्यावर भरजरी ओढणी, बनारसी ब्रोकेड दुप्पटा असं कॉम्बिनेशन तुम्ही दिवाळीत करू शकता.
– हल्ली लेहंग्याचाही ट्रेंड आला आहे, पण लेहंगा एकदा घातल्यानंतर तोही तसाच पडून राहू शकतो, तेव्हा तुम्ही काठपदराच्या किंवा कॉटनच्या साडीचा लेहंगा म्हणून वापर करू शकता. युट्युबवर तुम्हाला साडी ड्रेपिंगचे अनेक व्हिडिओ दिसतील. ते पाहून वेगवेगळ्या प्रकारे अगदी लेहंग्याचा लूक येईल अशा प्रकारे साडी ड्रेप करून वापरू शकता. यामुळे हटके लुक येईल हे नक्की.
– तुम्हाला पारंपारिक कपड्यांपेक्षा वेस्टर्न अटायर जास्त आवडत असेल तर एथनिक गाऊनही तुम्ही विकत घेऊ शकता किंवा जुनी काठापदराची साडीपासून वनपीस किंवा पायघोळ गाऊन तयार करू शकता.
– हल्ली एथनिक जॅकेटही बाजारात उपलब्ध आहेत तेव्हा साध्या कुडत्यावर एथनिक जॅकेट वापरून तुम्ही रिच लुक असलेला गेट अप करू शकता.

प्रतीक्षा चौकेकर
pratiksha.choukekar@loksatta.com