बचत गटांची चलती

यंदाच्या दिवाळीत महिला बचत गटांची चांगलीच चलती असल्याचे दिसत आहे.

जीएसटीमुळे घरगुती फराळाला मागणी

दिवाळी फराळावर मिठाईच्या दुकानांमध्ये जीएसटी आकारला जात असल्याने ग्राहकांनी महिला बचत गटांच्या फराळाला अधिक पसंती दिल्याचे चित्र आहे. शिवाय हे पदार्थ चवदार तर आहेतच, पण त्यावर जीएसटीदेखील आकारला जात नसल्याने स्वस्त आणि मस्त असा फराळ खरेदी करण्याकडे ग्राहकांचा कल आहे. त्यामुळे यंदाच्या दिवाळीत महिला बचत गटांची चांगलीच चलती असल्याचे दिसत आहे.

दिवाळीत फराळ हा बहुतेक करून घरी बनवला जातो, मात्र आजच्या धावपळीच्या युगात काहींना हे शक्य नसल्याने तयार (रेडीमेड) पदार्थ खरेदीसाठी अनेकांचा कल असतो. मात्र यंदा दिवाळी फराळावर दुकानांमध्ये १२% जीएसटी आकारला जात असल्याने फराळावर प्रतिकिलो ४० रुपयांची वाढ झालेली आहे. मात्र दुसरीकडे बचत गटांच्या माध्यमातून तयार केलेल्या पदार्थावर मात्र जीएसटी आकारला जात नसल्याने स्वस्त दरात उपलब्ध झालेल्या या पदार्थाच्या खरेदीकडेच अनेकांचा भर असल्याने बचत गटांनी तयार केलेल्या घरगुती पदार्थाना अधिक मागणी असल्याचे दिसत आहे.

कोपरखैरणे येथील ‘प्रकल्पग्रस्त महिला आघाडी’ या संस्थेतील काही बचत गट फराळाच्या ऑर्डर्स घेतात. गतवर्षीच्या तुलनेत यंदा या गटातील महिलांकडे जास्त मागणी असल्याचे दिसत आहे. आतापर्यंत १०० किलोहून अधिक फराळ या महिलांनी तयार केला असून मागील वर्षी फक्त ५० किलोच्या आसपास व्यवसाय झाल्याची माहिती येथील महिलांनी दिली. त्यामुळे यंदा बचत गट महिलांच्या मेहनतीचे चीज झाले असून दर्जेदार आणि स्वादिष्ट पदार्थ तेही स्वस्तात मिळत असल्याने ग्राहकांकडूनदेखील त्याला पसंती दिली जात आहे.

दिवाळीत घरगुती फराळाला मागणी असते. गेल्या वर्षीपेक्षा यंदा दुपटीने मागणी आहे. शिवाय आमच्या पदार्थावर जीएसटी कर नसल्याने ग्राहक वाढले आहेत.

स्मिता जगताप, सदस्य महिला बचत गट.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व दिवाळी बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Diwali 2017 bachat gat diwali faral gst

ताज्या बातम्या