फराळाचीही ऑनलाइन विक्री

महिलांची गरज लक्षात घेऊन काही विक्रेत्यांनी गेल्या काही वर्षांत ऑनलाइन फराळ विक्रीला सुरुवात केली आहे

फेसबुक, इन्स्टाग्राम, संकेतस्थळे अशा माध्यमांतून फराळाच्या विक्रीला उत्तम प्रतिसाद मिळत आहे

बाजारभावापेक्षा अधिक दर असूनही चांगला प्रतिसाद

आधुनिक जीवनशैलीचे पडसाद दिवाळीसारख्या पारंपरिक सणातही उमटू लागले आहेत. कपडेलत्ते, इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या बरोबरीनेच आता दिवाळीचा फराळही ऑनलाइन मागविला जाऊ लागला आहे. अर्थात त्यासाठी ग्राहकांना थोडे अधिक पैसे मोजावे लागत आहेत, पण ऊन-पावसाचा सामना करत, वाहतूककोंडीतून वाट काढत बाजारात किंवा मॉलमध्ये जाऊन भरपूर वेळ घालवून खरेदी करण्यापेक्षा ग्राहकांना ही घरबसल्या खरेदी सोयीची वाटू लागली आहे.

फेसबुक, इन्स्टाग्राम, संकेतस्थळे अशा माध्यमांतून फराळाच्या विक्रीला उत्तम प्रतिसाद मिळत आहे. नोकरीच्या व्यापात फराळ करण्याची चिंता असणाऱ्या महिलांनी हा ऑनलाइन फराळ खरेदीचा पर्याय निवडला आहे. ऑनलाइन फराळ विक्रेत्यांनीही दिवाळीच्या पाश्र्वभूमीवर विशेष सवलती देऊन ग्राहकांना आकर्षित करण्याची क्लृप्ती लढवली आहे. फराळासोबतच दिवाळीच्या सजावटीसाठी लागणाऱ्या साहित्याचीही समाजमाध्यमांवर विक्रीसाठी प्रसिद्धी केली जात असल्याने दिवाळीचा ऑनलाइन बाजार तेजीत आहे.

दिवाळीच्या काही दिवस आधीच घराघरांत फराळ तयार करण्याची लगबग सुरू होते. अलीकडे बहुतेक महिला कार्यालयीन जबाबदारी सांभाळून सण साजरे करत असल्याने दिवाळीचा तयार फराळ उपलब्ध असल्यास उत्तम ठरते. महिलांची ही गरज लक्षात घेऊन काही विक्रेत्यांनी गेल्या काही वर्षांत ऑनलाइन फराळ विक्रीला सुरुवात केली आहे. या ऑनलाइन फराळ विक्रीला उत्तम प्रतिसाद मिळत असून ऑक्टोबरच्या सुरुवातीपासूनच फराळाची मागणी नोंदवली जात आहे.

केवळ फोटो पाहून फराळ चांगला आहे की नाही, हे ओळखणे अशक्य असते. ऑनलाइन विक्रीतील हा अडथळा दूर करण्यासाठी काही विक्रेत्यांनी त्यांच्या संकेतस्थळांवर विशिष्ट मुदतीपर्यंत मोफत फराळ उपलब्ध करून दिला आहे. काही संकेतस्थळांवर विशिष्ट कालावधीपर्यंत फराळाची मागणी नोंदवल्यास फराळाच्या किमतीवर पाच टक्क्यांची सवलत देण्यात येत आहे.

महिला बचत गट चालवणाऱ्यांच्या उत्पादनांना या ऑनलाइन विक्रीमुळे व्यासपीठ उपलब्ध झाले आहे. या महिलांनाही या ऑनलाइन फराळ विक्रीतून मोठय़ा प्रमाणात ग्राहक उपलब्ध झाले आहेत, असे फराळवाला डॉट कॉमचे मनोज मोरे यांनी सांगितले. वेळेची बचत करण्यासाठी अनेक महिलांनी हा ऑनलाइन फराळ खरेदीचा पर्याय निवडला असला तरी बाजारात प्रत्यक्ष मिळणाऱ्या फराळापेक्षा ऑनलाइन मिळणाऱ्या फराळाच्या किमती चढय़ा असल्याचे निदर्शनास येते. दिवाळीचे दिवस जवळ येऊ लागल्यावर फराळ तयार करण्याची धांदल सुरू होते. मात्र नोकरी सांभाळून वेळेत फराळ पूर्ण करणे कठीण जात असल्याने ऑनलाइन फराळ खरेदीचा पर्याय निवडल्याचे राजश्री साळवी यांनी सांगितले.

कंदील, दिव्यांची खरेदीही इन्स्टाग्रामवर

पूर्वी केवळ बाजारातच विक्रीसाठी ठेवण्यात येणारे मातीचे दिवे आता इन्स्टाग्रामसारख्या समाजमाध्यमावरून विकले जात आहेत. मातीच्या दिव्यांवर सुबक नक्षीकाम करून दिव्यांचे छायाचित्र विक्रेते इन्स्टाग्राम अकाउंटवर अपलोड करतात. त्यामुळे घरच्या घरी, एकाच वेळी अनेक पर्याय ग्राहकांना मिळतात, त्यामुळे ऑनलाइन दिवे विक्रीला उत्तम प्रतिसाद मिळत आहे, असे गिफ्ट पिक्सी या इन्स्टाग्राम अकाउंटवरून दिव्यांची विक्री करणाऱ्या श्रेया जोशी यांनी सांगितले.

फराळ पदार्थ                                   बाजारातील      ऑनलाइन

दर           दर

भाजणीची चकली                                  ३८०          ४५०

पोहे चिवडा                                           २६०          ३५०

शंकरपाळे                                             २८०          ३५०

अनारसे                                               ३८०          ७००

करंजी                                                 ४००          ५५०

साजूक तुपाचा रवा लाडू                      ५००          ४५०

साजूक तुपाचा बेसन लाडू                    ५००          ६५०

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Online diwali faral sales get good response