Happy Diwali 2017 : सोनं खरेदी करताना…

शुद्धता ओळखता येऊ शकते

दिवाळी म्हटली की सोनंखरेदी ही ओघानेच आली. महिलांसाठी तर हे सणवार म्हणजे खरेदीसाठीच जणू. दिवाळीतील लक्ष्मीपूजन आणि दिवाळी पाडवा म्हणजे सोनेखरेदीसाठीचे खास दिवस. साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेला दिवाळी पाडवाही खरेदीसाठी मोठा मुहूर्त. घरातील लक्ष्मीची पूजा करुन तिच्या वापराने दिवाळीत सोने खरेदी केली जाते. आपल्याकडे असणारे धन म्हणजेच सोन्यालाही धन आणि संपत्तीचा दर्जा आहे. त्यामुळे सोन्याचीही पूजा लक्ष्मीपूजनाला केली जाते. सध्या भेसळ आणि फसवणुकीच्या प्रकरणांमध्ये वाढ होत असताना सोनेखरेदी करताना विशेष काळजी घ्यायला हवी. पूर्वीचे सोने जास्त चांगले होते आता तसे मिळत नाही असे आपल्या घरातील ज्येष्ठ महिलाही अनेकदा म्हणतात. कित्येक वर्षे जमा केलेली पुंजी आपण या सोनेखरेदीसाठी वापरत असतो. आणि त्यातच जर आपली फसवणूक होत असेल तर सावधानता बाळगायलाच हवी. आता यामध्ये नेमकी काय काळजी घ्यावी याविषयी..

शुद्ध सोने कसे ओळखाल?

शुद्ध सोनं म्हणजे २४ कॅरेटचंच. पण आजकाल २२ कॅरेटचंच सोनं जास्त विकलं जातं. आता यात नेमका फरक काय तर २४ कॅरेट आणि २२ कॅरेट यामध्ये सोन्याचे प्रमाण वेगळे असते. २४ कॅरेटमध्ये सोन्याचे प्रमाण ९९.९ टक्के असतं, म्हणजे यात कोणत्याही प्रकारची भेसळ नसते, तर २२ कॅरेटमध्ये ९१.६६ टक्के सोने असते. कॅरेटमध्ये गफलत होऊ नये म्हणून दागिन्यांच्या हॉलमार्कवर सोन्याच्या शुद्धतेची टक्केवारी दिली जाते. समजा आपण २२ कॅरेटची शुद्धता तपासत आहोत, तर २२ ला २४ ने भागून त्याला १०० ने गुणावे, त्यातून जे उत्तर येईल ते उत्तर म्हणजे त्या सोन्याची शुद्धता असते.

शुद्धता ओळखायच्या पद्धती

चुंबकाचा वापर – लोखंड चुंबकाकडे आकर्षित होतं हे आपल्या सगळ्यांना माहीत आहे. मात्र सोनं चुंबकाकडे आकर्षित होत नाही. त्यामुळे जर सोनं चुंबकाकडे आकर्षिले गेले तर त्या सोन्यात भेसळ आहे असे सहज समजू शकते.

पाण्याचा वापर करा – सोनं पाण्यात कधीच तरंगत नाही. त्यामुळे एका कपात किंवा भांड्यात तुम्ही घेतलेले सोन्याचे दागिने टाका. हे दागिने एका तळाशी राहिले तर ते शुद्ध सोनं आहे आणि जर ते तरंगत वर आले तर ते बनावट सोने असल्याचे समजावे.

अॅसिड टेस्ट – एखाद्या टोकदार वस्तूने सोन्याच्या दागिन्यावर पिनांच्या सहाय्याने सोन्यावर ओरखडा ओढा. ओरखडा ओढल्यानंतर त्यावर अॅसिडचा थेंब टाका. थेंब टाकल्यावर जर दागिना हिरवा झाला तर समजून घ्या की तो दागिना बनावट आहे. कारण सोन्यावर कोणत्याही धातूचा परिणाम होत नाही.

हॉलमार्कचं चिन्ह पाहा – सोन्याच्या शुद्धीकरणासाठी हॉलमार्कचे चिन्ह पाहणं गरजेचं आहे. एजन्सी ब्यूरो ऑफ इंडियन स्टँडर्ड ही तपासणी करते. कोणत्याही प्रकारच्या दागिन्यांची विक्री करण्यापूर्वी या एजन्सीकडून तपासणी करून घेणे अनिवार्य असते. त्यानंतर त्यावर हॉलमार्क दिला जातो. मात्र काही विक्रेते हॉलमार्कचे खोटे चिन्हही वापरतात. त्यामुळे हॉलमार्क खरा आहे की नाही तेही तपासून घेणे गरजेचे आहे. खऱ्या हॉलमार्कवर भारतीय मानक ब्यूरोचे त्रिकोणी चिन्ह असते. त्यात हॉलमार्किंग सेंटरसह सोन्याची शुद्धताही आणि ज्वेलरी तयार केल्याचे वर्ष तसेच उत्पादकाचा लोगोही असतो. हे सगळे आहे की नाही योग्य पद्धतीने तपासून घ्यायला हवे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व दिवाळी बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Tips for buying gold in diwali festival celebration

ताज्या बातम्या