‘हे’ आहेत उटणे लावण्याचे फायदे

स्क्रबरसारखा वापर

दिवाळी जवळ आली की आपल्याला आठवण होते कडाक्याच्या थंडीत पहाटे तेल लावणे आणि मग उटणे लावून केलेली आंघोळ. त्यानंतर होणारा फराळ आणि नवनवीन कपडे घालून फटाके फोडण्याचा आनंद. यामध्ये अभ्यंगस्नानाला आपल्याकडे पूर्वीपासून महत्त्व आहे. अभ्यंगाचे आयुर्वेदात असंख्य वर्षांपूर्वी महत्त्व सांगितले आहे. विविध नैसर्गिक घटकांपासून तयार झालेले हे सुगंधी एकप्रकारचे स्क्रबर असल्याचेच म्हणावे लागेल. हे उटणे केवळ थंडीतच नाही तर एरवीही वापरायला हवे ज्यामुळे चेहऱ्याची त्वचा चांगली होण्यास मदत होते. या उटण्याचे शरीराला होणारे फायदे काय आहेत पाहूया…

१. त्वचा मुलायम होण्यासाठी

दिवाळी हा थंडीच्या दिवसांत येणारा सण. थंडीमुळे शरीराची त्वचा कोरडी होते. अनेकदा अशा कोरड्या त्वचेमुळे आगही होते. या समस्येपासून सुटका व्हावी यासाठी पूर्वीपासून उटण्याचा वापर केला जातो. उटण्यामधील आयुर्वेदिक घटकांमुळे त्वचेचा कोरडेपणा कमी होऊन ती मुलायम होण्यास सुरुवात होते. उटण्यामध्ये असणारी चंदन पावडर आणि हळद यामुळे त्वचा उजळण्यास मदत होते. त्यामुळे दिवाळी शिवायही एरवी आणि विशेषतः थंडीच्या दिवसात आठवड्यातून एकदा उटण्याचा वापर जरुर करावा.

२. नैसर्गिकरित्या चमक देते

उटण्यामध्ये रक्तचंदन, वाळा, चंदन, वेखंड, कात, नागरमोथा यासारख्या वनस्पती आणि खोडांचा वापर केला जातो. हे घटक त्वचेला स्क्रबर म्हणून काम करतात. यामुळे काळवंडलेली त्वचा उजळण्यास मदत होते. याशिवाय उटण्याच्याबरोबरीने बेसन पीठही लावल्यास ते फायद्याचे ठरते. चंदनामुळे शरीराला थंडावा मिळतो

३. सुरकुत्या टाळणे शक्य

वयानुसार त्वचेला येणाऱ्या सुरकुत्या हे अतिशय सामान्य आहे. उटण्यामुळे सुरकुत्या पडण्याचे प्रमाण कमी होते. हळदीमध्ये अ‍ॅन्टी एजिंग घटक असल्याने त्याचा त्वचेला फायदा होतो. त्वचा दीर्घकाळ तजेलदार आणि टवटवीत दिसते. याशिवाय उटण्यात मध किंवा दूध लावल्यास त्याचा जास्त फायदा होतो. मध मिसळल्यास त्वचा मुलायम होण्यास मदत होते.

४. चेहऱ्यावरील अनावश्यक केसांची वाढ रोखण्यास उपयुक्त

चेहऱ्यावरील किंवा हाता-पायावरील केस जास्त वाढू नयेत यासाठी लहानपणी बाळाला आंघोळ घालताना मसुराच्या डाळीचे पिठ किंवा हरभरा डाळीच्या पिठ लावले जाते. मात्र तरीही हे केस कमी न झाल्यास उटणे हा अतिशय उत्तम पर्याय असतो. उटणे लावून ते गोलाकार फिरवल्यास त्याचा केसांची वाढ थांबण्यासाठी उपयोग होतो. मात्र अशाप्रकारे उटणे चोळताना त्याचा त्वचेवर वाईट परिणाम होणार नाही याची काळजी घ्यायला हवी.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Uses of utne for good skin abyanga diwali celebration festival

ताज्या बातम्या