dwi04नाटक, चित्रपट आणि दूरचित्रवाहिनी क्षेत्रात गेली दोन दशकं लेखक, अभिनेता व दिग्दर्शक म्हणून वावरणाऱ्या अभिराम भडकमकर यांच्या आगामी कादंबरीतील प्रकरण. राजहंस प्रकाशनातर्फे ती प्रसिद्ध होत आहे..

छोटा पडदा आता छोटा राहिलेला नाही. त्यानं आपलं अवघं जगच व्यापलंय.. आपल्या जीवनावर आणि जीवनशैलीवर त्याचं आक्रमण झालेलं आहे. आपल्या सामाजिक, राजकीय, आर्थिक, वैचारिक, कौटुंबिक परिसरावर त्याचं आता अधिराज्य आपण मान्य केल्यातच जमा आहे. या आक्रमणात कला, साहित्य, नाटय़ या सगळ्याचाच संकोच होताना दिसतोय. अभिजाततेची घुसमट होते आहे. या पडद्यानं सगळे निकष, सगळी परिमाणं आणि सगळ्या व्याख्याच बदलून टाकायचा सपाटा लावलाय. या पडद्यावर आणि पडद्यामागे काम करणाऱ्या माणसांची ही कथा..
डेली सोप्स आणि रिअॅलिटी शोमागची रिअॅलिटी.. अॅट एनी कॉस्ट!

मनीष धनाला नोकरीवरून काढून टाकायची सूचना ऐकून एक्साइटच झाला होता. विकास सर सकाळी पोहोचतील, तोवर पुढल्या दहा एपिसोडची वन-लाइन लिहून काढायचं ठरवून त्यानं पारावरच बसकन् मारली. लॅपटॉप सुरू केला. अरिवदही त्याला पाहून त्याच्याजवळ आला. मनीषनं त्याला विकास सरांच्या फोनची माहिती दिली. नवीन ट्रॅकबद्दल सांगितलं. अरिवदलाही ट्रॅक आवडला. यानिमित्तानं एकूणच कामगार चळवळीची एक छान मांडणी करता येईल. मनीषला त्यानं विचारलं, ‘काय विचार केलायस तू?’ मनीषनं लगेच ‘दीवार’, ‘नमक हराम’ वगरे सिनेमांचे रेफरन्स दिले. अरिवद क्षणभर बावचळला. ‘नाही म्हणजे धना हा असंघटित कामगार आहे. फॅक्टरीला काही नियम असतात; पण खेडय़ात कुणी ते फॉलो करत नाहीत. आपण एक कामगार पुढारी दाखवू या. त्यानं धनाला आणि इतर कामगारांना त्यांचे हक्क समजावून दिले आणि लढय़ाला उभं केलं असं दाखवूयात.’
‘हो, आणि मालकाचे गुंड..’ मनीषनं फिल्मी मालक दोन बाजूला गुंड दिसणारे वळू घेऊन फिरतात, वगरे चित्र रंगवलं. अरिवद हसलाच. ‘मनीष, सिनेमाचं बाजूला ठेव. अरे, कामगार चळवळ प्रत्यक्षात तशी नसतेच.’
अरिवदला त्याचं लहानपण आठवलं. गिरणगावातले ते कामगारांचे लढे, एका हाकेत रेल्वे बंद करणारा जॉर्ज, ते संप, त्या घोषणा, तो संघर्ष, ती गीतं.. अरिवद भराभर त्या चळवळीचं वर्णन करत सुटला आणि मनीषला जाणवलं, अरिवद वेगळ्याच विश्वात गेलाय. पण नुसतंच त्या काळात न रमता अरिवदनं मनीषला कामगार कायदे, त्यांचे हक्कही सांगितले. धनाचं आणि त्याच्या बाजूनं लढणाऱ्या त्या नेत्याचं काय म्हणणं असेल, ते सांगितलं. मनीष जरा गोंधळला. सीन लिहायचा तर या सगळ्याची गरज काय, हेच त्याला कळेना. आजवर सीन लिहायचा म्हणजे कुठल्यातरी सिनेमात पाहिलेला किंवा सीरियलमध्ये पाहिलेला सीन आपल्या पद्धतीनं मांडायचा, इतकंच ठाऊक होतं त्याला. त्याचं स्कूलच ते होतं. लिखाणात जगणं येतं, आलं पाहिजे, याची त्याला फारशी जाणीवच नव्हती. कारण आजवरच्या त्याच्या कथा या केवळ रचलेल्या असायच्या. त्यातली माणसं ही त्यांच्या कपडय़ालत्त्यापासून ते बोलण्या-वागण्यापर्यंत बेगडीच असायची. हाडामांसाचं, रक्ता-घामाचं असं काही नसायचंच. किंबहुना, लिहिणं म्हणजे जगण्याला थेट भिडताना होणाऱ्या साक्षात्काराकडं कुतूहलानं पाहणंच असतं, हे त्याच्या गावीही नव्हतं. चूक त्याचीही नव्हती.
इनमीन पंचवीस-सत्तावीस वर्षांचा मनीष.. हातात पुस्तक पडण्याआधी समोर टेलिव्हिजनचा सेटच आला त्याच्या. त्याची जडणघडणच मुळी या खोक्यानं केली. त्यात दिसणाऱ्या माणसांनी, त्यांच्या तकलादू संघर्षांनी जितकं आणि जसं जग दाखवलं, तसंच आणि तेच उतरत राहिलं लिखाणात. सहा महिन्यांचा क्रिएटिव्ह रायटिंगचा कोर्स आणि त्यादरम्यान पाहिलेले असंख्य इंग्रजी हॉलीवूडपट या कमाईवर तो मुंबईत आला आणि मालिका लिहू लागला. रात्री बारा वाजताही किचनमध्ये लिपस्टिक लावून वावरणाऱ्या बायकांच्या शह-काटशहाच्या मालिका लिहिण्यात पारंगत मनीष आयुष्याच्या अस्सल जिवंत अनुभवांना लेखनातून कधी भिडलाच नाही. आजूबाजूला काय किंवा आपल्या अंतरंगात काय, एक घुसळण सुरू असते. तिचा एक-एक पापुद्रा लिखाणातून मांडण्यासाठी- आणि कितीही केलं तरी आयुष्य हे कलाकृतीच्या दशांगुळे वरच उरतं, हे जाणवून सतत अस्वस्थ राहणारा आभास कुठे आणि हा मनीष कुठे! अरिवदला याक्षणी आभासची तीव्रतेनं आठवण झाली. नाटक लिहिताना आभास नेहमीच म्हणायचा, की आपला परिसर- मग तो सामाजिक असो, राजकीय असो- त्याचं भान लेखनात उमटायला हवं.. त्याचे तरंग उमटायला हवेत. पण या सगळ्या सगळ्याच्या पलीकडे होता मनीष.
आणि म्हणूनच कामगार-मालक संघर्ष म्हटलं की लगेच त्याला आठवला तो बच्चनचा ‘दीवार’ आणि ‘नमक हराम.’ जगणं आणि लिहिणं यांच्यामध्ये अशा छान पक्क्या सीमारेषा मारून घेता येतात? जगणं आणि लिहिणं असं वेगळं काढून जगता येतं? अरिवदला हे स्कूलच वेगळं आणि आकलनाच्या पलीकडलं वाटत राहिलं. मनीषनं ‘हो- हो’ करत त्याचं सगळं ऐकून घेतलं आणि मग तो जरा चाचरतच म्हणाला, ‘लेकिन सरजी, यह सब बहुत आर्टी तो नहीं हो जायेगा?’
‘आर्टी’ या शब्दाची व्याख्याच अरिवदला कळेना. ‘आर्टी?’
‘हाँ, सरजी, चॅनेल को आर्टी नहीं मँगता. लेकिन आपका इनपुट अच्छा है..’ म्हणत तो लिहायला सरसावला. अरिवद तिथून उठलाच.
आर्टी म्हणजे नेमकं काय, असा प्रश्न त्याला पडला होता. आणि काही ‘आर्टी’ होत असेल तर त्याला ही माणसं इतकं का घाबरतात? मनीषची बोटं विजेच्या वेगाने लॅपटॉपवर धावत होती. सध्या फक्त पुढे काय काय घटना घडणार, त्यांचे पॉइंट्सच लिहायचे होते. मधून मधून फ्लोमध्ये सुचणारी वाक्यंही तो टाकत राहिला. सकाळी विकास सरांसमोर दहा एपिसोडची कथा ठेवायचं टाग्रेट ठरवून तो कामाला लागला. लिखाणाचा स्पीड आणि बसल्या जागी, म्हणाल तेव्हा आणि चॅनेलला हवं तसं सुचणं, हा लेखक म्हणून त्याचा प्लस पॉइंट होता. चॅनेल म्हणेल तसं लीलया लिहून देऊ शकायचा तो. म्हणूनच एका वेळी तीन- तीन मालिका त्याच्याकडे असायच्या. मात्र, अरिवद जे सांगत होता ते मनीषला पटतही होतं. पण लिहिताना आपण विचार करायचाच कशाला, हे त्याला समजत नव्हतं. लोकांना काय हवंय, ते चॅनेलला माहीत आहे. आणि चॅनेल खूश असलं की झालं! आपल्याला छान डायलॉग सुचतात. ड्रामा क्रीएट करता येतो. मग बाकीच्या भानगडी हव्यात कशाला? आणि आपल्याला ढीग काही लिहावंसं वाटेल- पण चॅनेलला ते हवंय का? एकूणच मनीषच्या लेखनाचा केंद्रिबदू चॅनेल हा होता आणि त्याला तो घट्ट पकडून चालत होता. टीव्हीच्या दुनियेत सलग पाच र्वष सव्र्हाइव्ह झाला होता तो. अरिवद सर फार विचार करतात.. बाकी माणूस हुशार आहे.. असं मनाशीच म्हणत त्यानं लॅपटॉपवर लिहिलेले पॉइंट्स सेव्ह केले आणि ‘चाय देना भया’ अशी ऑर्डर सोडली.
सकाळ झाली तसं शूटिंग परत सुरू झालं. धरमनं असिस्टंटला सूचना दिल्या. शब्बोदी आणि धनाचे सीन्स होते- त्यामुळे तशी काळजी नव्हती. पहिला शॉट झाला आणि तो विकास सरांच्या रूमकडे वळला. विकास तयार होऊन बसला होता. त्यानं पेढय़ांचा एक भलाथोरला पुडा युनिटला वाटायला म्हणून स्पॉटबॉयकडे दिला. दरम्यान, मनीष व अरिवद आले. ‘अरिवद सर, तुमची पहिलीच मालिका- पण हिट झाली..’ म्हणत विकासनं अरिवदला पेढा दिला. ‘विकासजी, माझं काही क्रेडिट नाही. उलट, मी शिकतोय नवं नवं. मजा येतेय.’ मनीषनं ‘सरजी..’ म्हणत विकासला आिलगन दिलं, पेढा घेत तो बसला आणि लॅपी खोलू लागला. ‘सरजी, कमाल का ट्रॅक बना है. सॉलीड. एक महिना खिंचते रहो.’
‘नाही मनीष, धना सात-आठ महिनेच आहे आपल्यासोबत. कमी वेळात जास्त ट्रॅक्स दाखवायचेत. हमेशा की तरह पानी डालना नहीं है.’
यावर दोघंही हसले. दोघांच्या दृष्टीनं आता कथा, मालिका आणि बाकी गोष्टी महत्त्वाच्या होत्या. भावभावना दुय्यम. भावभावनांच्या या जगात भावनेलाच दुय्यम स्थान! अरिवदला कससंच झालं. मनीष मात्र रंगात आला होता.. ‘सरजी, अभी धना जायेगा काम पर. कार्ड पंच करून आत शिरायचंय. पण कार्ड पंचच होत नाही. धना ट्राय करतोय, ट्राय करतोय.. आणि मागून आवाज येतो- ‘धना, मशीन खराब नहीं है, खराब है तेरी किस्मत और मालिक की नियत!’..
‘क्या बात है!’ आत शिरता शिरता धरमनं दाद दिली आणि ‘सरजी, मुबारका..’ म्हणत विकासच्या गुडघ्यांना हात लावला. विकासनं ‘धरम- द ग्रेट’ म्हणत त्याला आिलगन दिलं. ‘पूरे देश में तहलका सरजी..’ म्हणत दोघांनी मिनिटभर सेलिब्रेशन केलं. दोन पेढे घेत धरम पुढलं ऐकू लागला.
मनीषनं वाक्य पुन्हा ऐकवलं- ‘खराब है तेरी किस्मत और मालिक की नियत!’ इतक्यात मालिक का चमचा येतो. ‘मालिकने बुलाया है,’ म्हणतो. धना एसी रूममध्ये जातो. मालिक मोबाइलवर बोलतोय. पाच करोड की डील की बात हो रही है.’
‘पचास करोड करो..’ धरमनं मधेच सुचवलं.
‘पचास?’
‘अरे, आजकल पाँच करोड को कौन पूछता है? क्यों सरजी? घोटाले भी हजार हजार करोड के होते हैं.’
‘ओके..’ म्हणत मनीषनं ते नोट केलं, आणि तो पुढे वाचणार इतक्यात अरिवदनं मधेच तोंड घातलं- ‘धरम, धनाच्या फॅक्टरीचा मालक फार छोटा आहे. त्याचं ऑफिस म्हणजे एक लहानशी खोली आहे. अरे, साधा साबणचुरा बनवणारी लोकल फॅक्टरी आहे ती.’
‘लेकिन टीवी के लिये थोडा बडम बनाना पडेगा उसे. इसलिये सिर्फ पचास करोड बोला मंने.’ आणि त्यानं मनीषकडे पाहिलं.
मनीषनं वाचायला सुरुवात केली.. ‘धनाचा मालक त्याला राजीनामा द्यायला सांगतो. म्हणजे पेपर पुढे करतो. सांगतो, कलसे आने की जरूरत नहीं है. मंने यतीमखाना नहीं खोला है, ना ही यह खैराती दवाखाना हैं- जहाँ मरिजों को पाला जाय.’
विकासला मुद्दे आवडले, पण त्यानं ‘मनीष, जरा फिल्मी लग रहा है,’ म्हणत बोलायला सुरुवात केली.. ‘लक्षात घे- आपली मालिका रिअॅलिस्टिक आहे. तू डायलॉग्जचा मास्टर आहेस, पण इथे जरा टोन डाऊन कर. टोन डाऊन केल्या की सगळ्या गोष्टी रिअॅलिस्टिक होतात.’
विकासचा हा मुद्दा अरिवदला भलताच मजेदार वाटला. पण तो काही बोलला नाही. मग धनाचं गयावया करणं, हताश होऊन बाहेर येणं.. घरी शब्बोदीला हे न सांगणं, की नोकरी गेलीये. घरच्यांना कळू नये, त्रास होऊ नये म्हणून दोन दिवस घरातून नुसताच डबा घेऊन बाहेर पडणं.. दिवसभर स्टेशनवर हमाली करणं.. त्यातून येणारा पसा पगार म्हणून छोटी माँच्या हवाली करत राहणं.. असं मस्त मस्त सुचलं होतं मनीषला. आणि मग एका नातेवाईकाला स्टेशनवर सोडायला आलेल्या शब्बोदीला धना दिसतो.. लाल डगला घातलेला.. कूलीच्या वेशात.. आणि एपिसोड फ्रीझ!
विकास, धरम सगळेच सुखावले होते. मग बराच काळ धनाचं दु:ख, सिम्पथी आणि अचानक धूमकेतूसारखा त्याच गावातला एक कामगार नेता उगवतो. हा नेता धनाला समजावतो. त्याचे हक्क, कायदे सांगतो. मग सगळे कामगार शस्त्रं टाकतात. एक आंदोलन सुरू होतं. लाल बावटा फडकू लागतो आणि मग मालक झुकतो. दहा एपिसोडचं मटेरिअल हातात येतंयसं पाहून विकासनं ते अॅप्रूव्ह केलं आणि संयुक्ताला मेल केलं. यादरम्यान, अरिवदनं कामगार चळवळ करतात तेव्हाची भाषा, त्यांचे मुद्दे अधिकाधिक ऑथेंटिक कसे dwi05बनतील, यासाठी मनीषला खूपच मदत केली. मुंबईतल्या कामगार चळवळीतल्या एका जुन्या नेत्याला फोन करून त्याच्याकडून चळवळीतलं एक छान गीतही मागवून घेतलं. असेल या माणसांची एक मांडणीची चौकट; पण त्यातून काही सच्चं म्हणता आलं तर वाईट काय? आता चळवळीचा नेता मार्क्स-लेनिनची भाषा बोलत होता; सिनेमातल्या कामगार नेत्यासारखी नाही. एकेक एपिसोड तयार झाला आणि मेल होत गेला. अरिवदनं कामगार कार्यकर्त्यांच्या आपसातल्या नात्यांचीही मांडणी केली होती. मुख्य म्हणजे बाहेरून नेता आणण्याऐवजी त्यांच्यातलाच एकजण उभा राहतो असं दाखवलं होतं. सगळेच गरीब, पसा नसलेले. त्यामुळे त्यांच्यातले बंध, मत्री आणि त्यांचा धनाविषयीचा कळवळा कसा आतून आलेल्या उमाळ्यागत होता. खिशात असलेल्या पशातून येईल तितकीच अंडाभुर्जी सगळ्यांनी मिळून खायची, चहाचे घोट घ्यायचे आणि भूक मारायची. पोलीस चौकीतली दहशतही खूप सट्ल होती. पोलीस कामगारांना ठेचत होते, पण व्यवस्थेला विचार ठेचायचा होता, याचं दर्शन त्यातून घडत होतं. अरिवदनं जणू गिरणगावातली चळवळच जिवंत करून यात मांडली होती. हे एपिसोड मस्त धावणार.. धनाला सिंपथी मिळेल आणि संघर्षही दिसेल.. फास्ट धावणार.. सगळ्यांनाच एक विश्वास वाटू लागला होता.

संध्याकाळचे साडेसात होत आले होते. जुहूचा तो कळकट बार मात्र आळोखेपिळोखे देत नुकताच उठल्यासारखा दिसत होता. गिऱ्हाईकांसाठी सजायला बसलेल्या रांडेसारखा तोही सजत होता. बीयरच्या, डुप्लिकेट दारूच्या, सोडय़ाच्या बाटल्या खोक्यातून निघून आपापल्या जागेवर बसत होत्या. सोडा, बर्फ, चकली, खारी दाल, कांदा, अंडी सगळा जामानिमा झाला होता. काही उतावळी गिऱ्हाईकं आधीच तिथं येऊन बसली होती. त्यांचं सुरूही झालं होतं. तासाभरात इथला कोलाहल सुरू होईल, मग क्षणाचीही उसंत लाभणार नाही, हे शेट्टीला माहीत होतं. जुहूतल्या सुंदर बंगल्यांच्या, आलिशान फ्लॅट्सच्या प्रभावळीतलं हे सुमार दर्जाचं हॉटेल कायमच गजबजलेलं असायचं. इथल्या श्रीमंतांना होती फाइव्हस्टार हॉटेल्स; पण स्ट्रगलर्सना हेच परवडणारं होतं. दुय्यम-डुप्लिकेट दारू पाजत, आपलाही दिवस येईल, अशी स्वप्नं स्वस्तात दाखवणारं हे हॉटेल स्ट्रगलर्सच्या पसंतीचं होतं. त्यातही याची परंपरा लहान नव्हती. ‘तो अमका तमका इथंच बसायचा. फक्त एक सूटकेस घेऊन मुंबईला आला होता तेव्हा. आता स्टार झालाय.’ किंवा ‘तमक्याचा हा अड्डाच होता. परत निघाला होता घरी, काही जमत नाही म्हणून. जाता जाता दोन पेग ढकलावेत म्हणून इथं बसला, तर एका कास्टिंग डिरेक्टरनं त्याला इथं बघून सरळ ऑफरच दिली. आणि मग काय? डायरेक्ट स्टार!’.. त्या कळकट बारला या अशा कहाण्यांमुळं एक झळाळीही होती आणि वलयसुद्धा. शेट्टीच्या बारमधल्या िभतींवर लागलेल्या कॅलेंडरवरच्या नटय़ा फक्त बदलत गेल्या; बाकी सगळं जसंच्या तस्संच होतं.
रात्रीचा काळोख पसरत गेला, तसे माणसांचे पाय बारकडे वळू लागले. काही चेहरे नित्याचे होते, काही नवखे. काहींची तर टेबल्सही ठरलेली होती. ‘ए छोटू, ए तंबी, ए भिडू’ अशा हाका देत गिऱ्हाईकं दारूत रंगू लागली. आज स्ट्रगलर्स मंडळी अजून फिरकलेली नव्हती. कुणी शूटिंगला, तर कुणी ‘पृथ्वी’वर नाटक पाहायला गेली असतील, असा विचार शेट्टीच्या मनात आला. त्याला हे असं काहीतरी बनण्यासाठी म्हणून मुंबईकडे येणाऱ्या पोरांचं भारी अप्रूप वाटायचं. तो बिचारा पोट भरायला म्हणून आला होता आणि हॉटेलात कपबशा विसळत आज बारचा मालक झाला होता. जातीनं उभं राहत तो गिऱ्हाईकांकडे लक्ष द्यायचा. स्ट्रगलर्सची उधारी त्याच्या जिभेवर असायची. काही बुडवायचे, काही प्रामाणिकपणे आणून द्यायचे. या पोरांच्या डोळ्यांतली स्वप्नं पाहणं त्याला आवडायचं. आपलं स्वप्नं काय होतं? कधी कधी त्याला प्रश्न पडायचा. पोट भरणं हे काही स्वप्न असू शकत नाही. कधी कधी त्याला वाटायचं- आपल्याकडे सगळं आहे, पण स्वप्नच नाही. मामाच्या हाताला धरून मुंबईत आलो, इथं रुजलो. इथलेच झालो. बस्स, इतकंच? स्वत:च्याच विचारांवर फडका मारल्यासारखा ते विचार झटकून टाकत त्यानं काम करायला सुरुवात केली. छोटूला एका गिऱ्हाईकाचं बिल मशीनवरून िपट्र करून दिलं.
आता टेबलं भरत चालली होती. इतक्यात दोन पोरं आली. मानव गोयल आणि क्षितीज सरीन. ‘शेट्टीभाय, आकाश आया था क्या?’ म्हणत दोघांनी बसकन् मारली आणि छोटूला सिग्रेट आणायला फर्मावलं. ‘नहीं, दो दिन से दिखा नहीं,’ म्हणत शेट्टीनं त्याच्या टेबलावरच्या पंख्याचं बटन ऑन केलं. पूर्वी स्ट्रगलर्समध्ये अमुक तमुक ‘कुमार’ मंडळी असायची, आता ही नवी नावं आलीत- शेट्टीला वाटून गेलं. मानवनं बाटली मागवली. दोघं बोलू लागले.
‘गया था क्या ऑडिशन देने?’ त्यानं विचारलं.
‘हो, पण साला तेच रुटीन. डायलॉग दिले आणि सहा तास रांगेत बसून राहिलो. साला, आजकल इतना पॉप्युलेशन बढ गया है ना स्ट्रगलर्स का..’ म्हणत त्यानं बाटली ठेवणाऱ्या छोटूला कांदाही मागितला. ‘आणि शेवटी घेणार हे त्यांनाच- ज्यांची चॅनलबरोबर सेटिंग आहे. तुला नाही मेसेज आला?’
‘नाही.’ मानव म्हणाला.
‘कुणाकडून आला तुला?’
‘अरे, सुधा नावाचा आहे को-ऑर्डिनेटर.’
‘हां, मालूम है,’ म्हणत मानवनं पेग बनवले. ‘त्याची सॉलिड वट आहे हं चॅनलमध्ये. खूप मालिकांचं, अॅड्चं कास्टिंग करतो.’
‘मला मेसेज आला सकाळी. दोनला पोहोचलो, तर ही लाइन. साली सगळी चिकनीचुपडी पोरं. ना कुणी थिएटर केलेलं, ना धड डायलॉग बोलता येत.’
‘पण तसेच लागतात आजकाल. चॅनेल तर सरळ सांगतं म्हणे- अॅक्टिंग में चार आना कम चलेगा, मगर लुक मॉडेल जैसा होना चाहिये.’
‘घंटा!’ म्हणत दोघांनी ग्लासवर ग्लास आपटून चीअर्स केलं. ‘लुक बहुत मायने रखता है आजकल यार. साला आपल्यासारख्यांचे वांदेच झालेत. हे सीरियलवालेपण ना.. यांना ऑर्डिनरी लुकिंग लोक चालत नाहीत. आमच्यासारख्याला फक्त क्राइमच्या सीरियल्समध्ये स्कोप. आणि कौटुंबिक मालिकेत तसंही पुरुषांना कामच काय असतं? सगळी बायकांचीच मोनॉपॉली आहे.’
इतक्यात ‘ओय गांडू लोग.. कैसा है?,’ म्हणत आकाश आला. त्याला पाहताच दोघांनी त्याला प्रेमानं शिव्या घालत मिठय़ा मारल्या. आकाश बसला. ‘क्या ले रहे हो? ओल्ड मंक?’ म्हणत छोटूकडं त्यानं ग्लास मागितला.
‘किधर है तू चार दिन से?’
‘अरे, उटी में शूट था- पिच्चर का. अचानक बुलावा आया.’
‘काय सांगतोस? कुणाची फिल्म?’ क्षितीजनं चमकून विचारलं.
‘एक्साइट नको होऊस. हीरो पोचलाच नाही चार दिवस. आलो वापस.’
‘और पसा?,’ मानवनं विचारलं.
‘मिला ना. पर डे लिया ना सालों से.. मगर रिक्वेस्ट करके भी उन्होंने आधाही दिया. बोला- भौत नुकसान हो रहा है हीरो की वजह से.’
‘साल्यांना काम मिळतं तर ही मस्ती! आणि आपण मरतोय कामासाठी.’
छोटूनं ग्लास समोर ठेवला. पेग भरत आकाशनं विचारलं, ‘कुठल्या सीरियलचं कास्टिंग चाललंय रे?’
‘अच्छा तो हम चलते हैं’चं. हा जाऊन आला..’ मानवनं लगेच सांगितलं. क्षितीजला खरं तर हे सांगायचं नव्हतं. कशाला उगाच स्पर्धा वाढवून घ्यायची स्वत:च्याच हातानं?
‘अरे, मेसेज कर देता. आपण कसं इन्फॉम्रेशन मिळाली की शेअर करतो. तू पण गेला होतास?,’ त्यानं मानवला विचारलं.
‘नाही, मला आत्ताच कळलं,’ मानव म्हणाला. आपण मुद्दाम माहीत होऊनही इतरांना कळवलं नाही, हे आता बाहेर येतंयसं पाहून क्षितीजनं वेगळाच पवित्रा घेतला.
‘अरे, तुला सीरियल्स करायच्या नाहीत म्हणतोस ना? म्हणून नाही कळवलं.’
‘अरे, सबको फिल्में ही करनी है. पण तोवर खायचं काय?,’ आकाश म्हणाला. इतक्यात छोटू आला. ‘साब, आपका बाइक जरा खिसका के लगाओ ना, बीच में आ रहा है.’ क्षितीज उठला. तो बाहेर जाताच आकाश भसाटून बोलला, ‘साला, सांगत नाही हा. आपल्याकडून सगळी माहिती काढून घेतो. आपले कॉन्टॅक्ट्स नाही शेअर करत. सेल्फीश आहे. मला नाही, पण तुला तरी सांगायचं ना?’
मानवनं मान झटकली. ‘जाऊ दे रे. आपल्या किस्मतमध्ये आसलं ना तर कोण हिसकावूनाय शकत. पण साला इथेच नाय लिहिलेलं आपल्या! गेला चार महिना एक पण शूट नाही केला. पशांचे वांदे झालेत. ते फोटो शूट केलं होतं त्याचा चेक अजून नाही मिळाला. रोज फोन मारतोय, साला उद्या- उद्या.’ आकाशही थोडासा खिन्न झाला. ‘मायला, पाच वर्षे झाली मुंबईला येऊन; काय घंटा नाही मिळालं.’
‘इथे फक्त स्टारच्या फॅमिलीतल्या लोकांना स्कोप उरलाय. नायतर कॉन्टॅक्ट्स हवेत मजबूत.’
‘ते पण खरंय. नाहीतर तुझ्यात काय कमी आहे? उंची, रंग, फीचर्स. एखाद्या स्टारच्या, नायतर प्रोडय़ुसरच्या घरात जन्माला आला असतास तर आता पोस्टर्सवर असतास- बिग बॅनर्सच्या.’
कशात आणि कुठे कमी पडतो आपण, तेच कळत नाही- आकाशला वाटून गेलं. हॅन्डसम दिसतो आपण. रोज जीममध्ये जाऊन घासतो. बॉडी कशी छान कोरून काढावी तशी काढलीये. नुसतं कळलं ऑडिशन आहे, की धावतो. पण साला निवडले जातात ते वेगळेच. भलतेच!
‘किस्मत रे किस्मत..’ मानव कळवळला. ‘आता हा क्षितीजच बघ ना, काय कमी घासतो? साला आपल्याला सांगत नाही, पण जवळ जवळ रोज एक ऑडिशन देतो. पण काय मिळालं? घंटा!’
दोघांनी क्षितीजला येताना पाहिलं आणि दोघं घोट घेऊ लागले. क्षितीजही परत त्यांना जॉइन झाला.
‘चंदन नाही आला अजून?’
‘येईल. जातो कुठं? चुकला फकीर मशिदीत,’ म्हणत आकाश हसला. इतक्यात त्याला तनुजा येताना दिसली. ती त्यांच्याच दिशेनं येत होती. सलवार, त्यावर लो कट कमीज, हलकीशी लिपस्टिक, डोळ्यांत काजळाची रेष. हातातलं कडंही एथनिक स्टाईलचं होतं. रंग काळा असला तरी एक छान तुकतुकी होती त्यावर.
‘हाय तनू..’ म्हणत उठून त्यानं तिला हग केलं. ‘हाय-’ म्हणत तिनं बाकी दोघांशी हात मिळवला. ‘बीअर, लवकर छोटू- चिल्ड,’ म्हणत ती बसली.
‘कुठून?’
‘अरे, ऑडिशन होती- ‘अच्छा तो हम..’ नावाची सीरियल आहे ना? त्यांना हव्यात मुली.’ छोटूनं तत्परतेनं बीअर खोलली. ओतली. तनूनं एक घोट घेतला आणि ती सलावली. ‘अरे, सुधाकर नावाचा आहे को-ऑर्डिनेटर. तो भला माणूस आहे. डिसेंट. खूप शिकलेला आहे. पण त्याचा असिस्टंट साला लोचट आहे. उगाच कॅरॅक्टर समजावताना ओढणी ठीक करायचा बहाणा करत हात लावून घेत होता हरामखोर..’
‘मग झालं सिलेक्शन? कधी कळवणारेत?’ क्षितीजनं विचारलं. त्यालाही कधी कळणार, याची उत्सुकता होतीच.
‘आपण पेरत राहायचं, उगवला तर उगवला- नायतर कोल्ला..’ म्हणत ती हसली. ‘साल्या काय एक-एक बाहुल्या आल्या होत्या. गोऱ्या- गुलाबी. कन्वेन्शनल ब्यूटी. एकीला चार वाक्यं धड नाही बोलता येत. पण त्यांना काय ट्रीटमेंट! आम्ही चार- चार पानांचे संवाद सादर केलेत नाटकात. निर्मल वर्माच्या ‘तीन एकांत’चा पाऊण तासाचा पीस मी एकटी करायचे. पण इथं विचारतं कोण तुमच्या भूतकाळाला? देवाचे दागिनेच महत्त्वाचे. मागचे-पुढचे.. खालचे- वरचे!!!’ तनू बोलत राहिली. बाकी पीत राहिले. कमी-अधिक फरकानं त्यांची अवस्थाही तीच होती. कला आणि प्रसिद्धीच्या ओढीनं इथे आलो; पण इथल्या मार्केटचे नियमच वेगळे होते. त्या नियमांत, त्या निकषात बसणाऱ्यांनाच सगळं मिळत होतं. पण एक दिवस येईल- जेव्हा या मार्केटचे नियमही आपले असतील आणि निकषही! या दुर्दम्य आशेनं भारलेले ते तिघंही केव्हातरी उजाडणार असलेल्या त्या उद्याची वाट पाहत आजचा दिवस ढकलत बसले होते.
dwi06
शेट्टीनं पाहिलं- काही टेबलांवर गप्पांना ऊत आला होता. काही टेबल्सवर गंभीर चर्चा सुरू होती. कुणी नुसतीच बाटली समोर ठेवून तिच्या बुडाशी आयुष्यातल्या गहनतेचा शोध घेत होते; तर कुणी हवेवर तरंगत बाहेर पडत होते. सगळे प्रश्न, सगळं दु:ख, सगळं वैफल्य, सगळा संताप, हताशपण- आणि या सगळ्यासोबत असलेलं एकटेपण.. सगळं सगळं दारूच्या त्या प्याल्यात विरघळत होतं. रात्र चढत होती.
मध्यरात्री कधीतरी चौघं उठले, बाहेर आले. बिल आकाशनं दिलं. चार दिवसांच्या शूटचे अध्रे का होईना, पण पसे होते त्याच्याकडे. क्षितीजला नेमकं बिल द्यायच्या वेळीच नेहमीप्रमाणे शू आली होती. ‘साली मकान मालकीन म्हणते, रात्री उशिरा येत जाऊ नको,’ तनू म्हणाली. ‘मी म्हटलं, सॉरी बॉस. भलत्या अटी घालशील तर जाते निघून.’
आकाश, क्षितीज बाइकजवळ गेले. ‘चल, सी या..’ म्हणत तनूनं रिक्षा थांबवली. म्हाताऱ्या रिक्षेवाल्याची नजर तिच्या उभार शरीरावरून पाण्यासारखी ओघळली. त्याकडे दुर्लक्ष करत तिनं सांगितलं, ‘जुहू गली.’ रिक्षा सरकली तसा आकाश आपल्या बाइकजवळ जाऊ लागला. इतक्यात एक बाइक वेगानं आकाशच्या जवळ येऊन थांबली. ब्रेक दाबला नसता तर आकाश चार फूट उडालाच असता. पण बाइकस्वार हसत उतरला, म्हणाला, ‘ए, जाने का नहीं. गुड न्यूज आहे.’ तो चंदन होता. गळ्यातली सॅक काढत तो उतरला. कुरळे केस मागे सारत त्यानं तिघांना एकदम मिठीत घेतलं. गुड न्यूज? साल्याला फिल्म मिळाली की काय? क्षितीजला छातीत एक असूयेची कळ जाणवली. मग ‘हॅ! याला कोण देतंय फिल्म? मनीऑर्डर आली असेल घरून..’ असं स्वत:ला समजावत त्यानं एक्साइटमेंट दाखवत विचारलं, ‘काय झालं?’ चंदननं गळ्यातला साईबाबांचा ताईत कपाळावर लावत म्हटलं, ‘सीरियल मिला. अच्छा तो हम..’
‘क्या बात है!!! मुबारक हो भाय.’ आकाशनं मनापासून म्हटलं. ‘हिट् जा रहा है सीरियल.’ क्षितीजनंही हात मिळवला.
‘चलो तो बॉस अंदर- एक एक बीअर तरी मारू,’ म्हणत तो आत गेलाही. मग सगळेच माघारी वळले. क्षितीज जरा हिरमुसलाच. म्हणजे आपल्याला संधी नाही- त्याच्या मनात आलं. आकाशही फिल्म करतोय. कॅन्सल झालं तरी काय झालं, कधीतरी होईलच की शूट सुरू त्याचं. चंदनही ‘अच्छा तो हम..’ करणार. आपल्याच हातात काम नाही. त्याला निराशेनं ग्रासलं. आत जाऊन तिघं नव्या टेबलवर बसले. बीअर सांगितली गेली. क्षितीजनं स्वरात हताशपणा न डोकावू देता विचारलं, ‘पण आजच ऑडिशन झाल्यात ना?’
‘हो, आणि आत्ताच फोन आला. सुधाकरजी म्हणून होते, आत्ताच भेटलो. अरे, काय चांगला माणूस आहे रे तो. सगळं विचारलं. मग म्हणाला- जाने दो, माझा कट मी निम्माच घेईन. खूप आवडली त्याला ऑडिशन माझी. कामगार लीडरचं कॅरॅक्टर आहे. आता महत्त्वाचा ट्रॅक आहे. सगळे सीन हीरोबरोबर. नंतरही काम निघत राहील. सुधाकरजींनी माझ्यासमोरच फोन लावला- म्हणाले, एक अच्छा अॅक्टर भेज रहा हूँ. लंबी रेस का घोडा है. म्हणाले, इतकं चांगलं डिक्शन असलेले नट मिळत नाहीत आजकाल. मस्त रोल आहे म्हणे. बाकीच्या नटांना म्हणे ऑडिशनसाठी पाठवलेल्या संवादातले शब्दच कळत नव्हते. म्हणजे ‘सर्वहारा, बूज्र्वा’ असे खास कम्युनिस्ट माणसांचे शब्द होते. मॉडेलसारखा चॉकलेटी चेहरा मिळाला म्हणून नट व्हायला आलेल्यांना काय जमणार होते ते शब्द उच्चारणं? आपलं वाचन वगरे कामाला येतं रे अशा वेळेला.’
‘तू थिएटर केलंयस साल्या दहा र्वष दिल्लीत.’
‘हो ना! आणि लगेच परवा शूटला निघावं लागणारेय म्हणे.’
‘व्हॉव. काँग्रॅट्स.’ सगळ्यांनी बीअर उंचावत म्हटलं. त्यावर कुरळ्या बटांशी खेळत चंदन म्हणाला, ‘खूप निघणारेत म्हणाले रोल्स. बाकी लोकांनाही कळवायला सांगितलंय. आकाश, क्षितीज तुम्हीही जाऊन या-’ म्हणत त्यानं चकलीचा तुकडा तोडला.
‘क्षितीज आधीच जाऊन आलाय,’ आकाशनं सांगितलं. क्षितीज ओशाळला. पण बाकी कुणी त्यावर फार जोर दिला नाही. नाही म्हटलं तरी त्यांना एक उत्साह वाटू लागला होता. यशाचं लक्ष आपल्याकडेही जाऊ शकतं; ती काय फक्त या स्टारपुत्रांची बपौती नाही, असा विश्वास परत जोम धरू लागला होता. आपलाही दिवस येईल, ही आशा मनात निर्माण झाली. त्या उत्साहावर ते तरंगू लागले. असेच आशा-निराशेच्या िहदोळ्यावर झुलणारे हे स्ट्रगलर्स शेट्टीच्या बारचा आधार होते. एक-एक म्हणता म्हणता तीन-चार बीअर्स झाल्या. मगच सगळे उठले.
बाहेर पडताच आकाश म्हणाला, ‘मला धार मारायचीये.’
‘चल, मलाही,’ म्हणत चंदनही सोबत गेला. क्षितीज मागेच राहिला.
पँटची चेन खस्सकन् काढत चंदन बोलू लागला, ‘देखना आकाश, फाड डालूंगा सबकी. असे रोल्स केलेत मी.. ‘कॉम्रेड का कोट’मध्ये कमलाकांत केलाय मी. कॉम्रेड कमलाकांत! एकदा का माझा एपिसोड टेलिकास्ट झाला ना, की मग बघ, ही साली इंडस्ट्री येते की नाही माझ्या मागे तारखा मागत. साला, मूँह माँगा दाम देत. मग कळेल माझी किंमत.’ आणि सगळ्या जगावर, इंडस्ट्रीच्या असली टॅलेंटला कमी लेखण्याच्या वृत्तीवर धार टाकत असल्यासारखा तो फळाफळा मुतला. मग खस्सकन् परत चेन लावत तो वळला. आता फक्त ही रात्र ओलांडली की एक पहाट होती. आणि या पहाटेच्या प्रतीक्षेतच तर त्यानं मुंबईतली पाच र्वष घालवली होती. तळमळत, तगमगत..


सकाळी सकाळी सुधानं पाठवलेली मेल विकासनं पाहिली. कुणा चंदन मिश्र नामक मुलाचे फोटो होते. ऑडिशनची क्लिपही होती. चॅनलनं कामगार लीडरसाठी अॅप्रूव्ह केलेलं नाव होतं. चॅनेलनंच पाठवलंय म्हटल्यावर बाकी काळजी नव्हती. त्याला मुलात स्पार्क दिसला. विशेषत: त्याचे कुरळे केस फारच आवडले. कलंदर माणसांत असते तशी नजरेत चमक होती. कामगार लीडर असाच हवा. जरासा झक्की. त्यानं पाहिलं, संयुक्तानं अजून एपिसोड्स फायनल केले नव्हते. तिलाही हा कामगार लीडरवाला ट्रॅक आवडला होता. इतक्यात हातात चहा घेऊन धरम आला. ‘सरजी, हमारे पास का मटेरिअल खतम हो जायेगा यह फ्रायडे को. अभी तक चॅनेल का फीडबॅक नहीं आया हैं. सॅटरडेसे शूट करना पडेगा सोमवार का एपिसोड.’ धरम काळजीत होता. आज गुरुवार.
‘डोन्ट वरी. चॅनलनं अॅक्टर फायनल करून पाठवलाय.. बघ,’ म्हणत त्यानं फोटो दाखवले. धरमलाही चंदन सूट वाटला. दोघं चहा घेत बाहेर आले. विकासनं सहज विचारल्यासारखं करत म्हटलं, ‘अरिवद कैसा है?’
‘अच्छा आदमी है.’ धरमनं स्टँडर्ड उत्तर दिलं. गुळमुळीत.
‘काम पसंद आया उसका? नया है सीरियल में..’ म्हणत जरा खरवडलं.
‘सरजी, बहुत विद्वान है. दुनियाभर की किताबें पढ डाली है, मगर..’ म्हणत एक पॉज घेतला. ‘मगर थोडा आर्टी आर्टी है.’ विकासला अंदाज होताच. ‘पण सर, या कामगार लीडरवाल्या ट्रॅकमध्ये काय सही सजेशन्स दिलेत. मजा आयेगा. देखना- हे एपिसोड्स फास्ट धावतील.’
दोघं पाराजवळ आले. बॉयनं खुच्र्या आणून ठेवल्या. दोघं बसले. त्यांना अरिवद व मनीष येताना दिसले. दोघांत कसलीतरी चर्चा सुरू होती. पाराजवळ येताच दोघांनी विकासला ‘गुड मॉर्निग’ म्हटलं. दोघांनी चहा घेतला.
‘कसली चर्चा सुरू होती?’ विकासनं विचारलं.
‘सरजी, रशियाबद्दल सांगत होते.’
‘नाही म्हटलं, कामगार चळवळीबद्दल लिहितोयस एपिसोड, तर मुळापासून माहिती करून घे. मी चेकॉव्हचं नाटक केलं होतं तेव्हा माझा अभ्यास झाला होता. तेच जरा शेअर करत होतो.’
‘कितने एपिसोड हुये?’ धरमला ते जास्त महत्त्वाचं होतं. त्यानं मनीषला जरा जमिनीवर आणलं.
‘दस तो भेजे हैं, दो रात को बठके कर दिये.’
‘गुड!’ धरम सुखावला. ‘अॅक्टर भी अच्छा मिला है, चंदन मिश्र नाम का.’ धरमनं विकासच्या लॅपटॉपमधून फोटो दाखवले. सगळ्यांनाच ते आवडले. हा मुलगा चांगला वाटतोय. एक छान चमक आहे याच्या नजरेत. सगळ्यांचं एकमत झालं. आता पुढचे काही एपिसोड्स धमाल होणार, यावर चर्चा सुरू असतानाच विकासचा मोबाइल वाजला. संयुक्ता होती.
‘हाय, गुड मॉर्निग. तुझ्याच फोनची वाट पाहत होतो. कसे वाटले एपिसोड्स?’
सगळ्यांनीच ओळखलं चॅनेलचा फोन.
‘एपिसोड्स आवडले होते मला, पण..’
‘पण?’ विकासच्या ‘पण..’ने धरम- मनीषचा श्वासच रोखला गेला.
‘पण हा ट्रॅक नाही चालणार.’
‘का? अगं, किती सिम्पथी आहे यात.. संघर्ष आहे, ड्रामा आहे.’
‘नाही. हा ट्रॅक रिजेक्ट करावा लागतोय. िथक समथिंग डिफरंट.’
विकास क्षणभर सटपटलाच. आज गुरुवार. सोमवारचा एपिसोड काय आणि कसा शूट करायचा? मग त्यानं डोकं शांत ठेवत म्हटलं, ‘ओके. ओके. पण कारण काय या रिजेक्शनचं?’
‘लाल बावटा!’ संयुक्ता सूचकपणे म्हणाली, आणि तिनं फोन ठेवला.
विकास खालीच बसला. ‘शीट!’ इतकी र्वष या धंद्यात काढून आपण ही चूक कशी केली? कसे कॅरीड अवे झालो या थॉटनं? मग शांतपणे सगळ्यांकडे पाहत तो म्हणाला,
‘गाइज, सॉरी. हे सगळं स्क्रॅप केलंय चॅनलनं.’
‘क्या?’ धरम वैतागलाच. ‘पण मग आता काय?’
‘साला यह चॅनलवाले ना, रायटिंग करना क्या ज्यूस बनाने जैसा है क्या? इधर मशीन में डाला, उधर बाहर निकला. कहाँसे लाने का नया नया थॉट रोज? साला गाय भी एक टैम दूध देने के बाद कुछ घंटों का गॅप मांगती है.’
मनीषही बसलाच. अरिवदला काही कळतच नव्हतं. अचानक कसं सांगू शकतं चॅनल, की हे स्क्रॅप करा म्हणून.
‘आणि ते बारा एपिसोड्स?’ अरिवदनं विचारलं.
‘गेले वाया..’ मनीषनं म्हटलं.
अरिवदला मनीषच्या बोलण्यात एक वैताग जाणवत होता. रात्र- रात्र बसून तयार केलेले एपिसोड्स. त्याला वाटलं, मनीष वैतागेल, भांडेल. मालिकाच सोडायची धमकी देईल. काही वाद, आग्र्युमेंट्स होतील. मग दोघेही थोडी थोडी तडजोड करतील. काही बदल स्वीकारले जातील; पण बारा एपिसोडची मेहनत वाया जाणार नाही. पण मनीष वैतागला असला तरी ‘कूल’ वाटला.. या सगळ्याची सवय असल्यासारखा. पण आता युद्धपातळीवर काहीतरी विचार करायला हवा, या भावनेनं मनीष, धरम, विकास पुढल्या कामालाही लागले.
‘आपण बोलूयात का परत?,’ अरिवदनं सुचवलं- ‘संयुक्ता मॅडमला मी समजावून सांगू का? एक ट्राय?’
‘काही उपयोग नाही. तिच्याही हातात नाही काही. बेटर आपण ऑप्शन्स पाहिलेले बरे.’
त्या सगळ्यांच्याच स्वरात एक थंडपणा जाणवून तो गप्प राहिला. काही वेळ वेगवेगळ्या ऑप्शन्सवर डिस्कशन होत राहिलं. सिंपथी आणि संघर्ष यावर गाडी घुटमळत राहिली. अखेर मनीष ओरडला, ‘सरजी, एक हो सकता है- आपण जर धनाचा डॉक्टर पसे मागतो, मग ट्रीटमेंट करण्यासाठी शेत विकावं लागतं, असं दाखवलं तर?’
विकासला हे बरं वाटलं. तरीही त्यात फार तर दोन-चार एपिसोड्स् जातील. कमीत कमी दोन आठवडे पुरेल असं मटेरिअल हवं. पण ‘नॉट बॅड’ म्हणत विकासनी ते नोट करून ठेवलं. धरमनं डोकं खाजवायला सुरुवात केली. इतक्यात परत संयुक्ताचा मोबाइल आला.
‘हं, बोल..’ विकासनं म्हटलं.
‘काही सापडतंय?’
‘आहेत एक-दोन ऑप्शन्स. पण अजून खास नाही काही.’
‘हं! विकास एक काम करा. ब्रिंग अ वुमन इन धनाज् लाइफ. थिंक-’ म्हणत तिनं फोन ठेवला.
‘वुमन?’ विकास विचारात पडला. ‘आपण त्याची गर्लफ्रेंड दाखवली नाहीये.’
धरम खडबडून उठला. ‘गर्लफ्रेंड? सरजी, आता दाखवू शकतो. म्हणजे बघा, धनाचं लग्नं ठरलं होतं असं दाखवू. पण त्याच्या होणाऱ्या बायकोचा बाप सांगतो- यह शादी नहीं हो सकती. मेरी बेटी छे महिने बाद विधवा हो जायेगी. धनाकडचे म्हणतात, उसके भाग्यमें ही था. शादी नहीं टूट सकती. पंचायत बसते. संघर्ष. त्यात धना तिच्यात अडकलाय. ती धनात गुंतलीये..’ आता धरमच्या शब्दांना एक वेगळीच धार होती. ‘दोन्ही बाजू आपला हेका सोडत नाहीत. आता प्रश्न प्रतिष्ठेचा आहे. शेवटी धनाच सांगतो, मं तुम्हे आजाद करता हूँ.’
‘येस.’ आता मनीषनंही उडी घेतली- ‘धना म्हणतो, ‘यह ऐसी अनोखी शादी होगी, जिस में शादी से पहले dwi07तलाक होगा!’ रिश्ते, प्रेम आणि त्यातला गुंता हा मनीषचा फोर्टे होता. विकासलाही त्यात संघर्ष, सिंपथी दिसू लागली.
‘और सर, इस में एक अॅडव्हान्टेज है, बाद में भी जब सुहानी की शादी हो जायेगी.. सुहानी नाम अच्छा है ना?’ मनीषनं नामकरणही केलं तिचं. ‘तेव्हा लग्नानंतरही ती तिच्या पतीत गुंतू शकत नाही. धनाला विसरू शकत नाही.. असा एक्स्ट्रॉ मॅरेटल प्लॉट मिळू शकतो.’
विकासला पन्नास एपिसोडचं मटेरिअल त्यात दिसू लागलं. त्यानं ‘फॅन्टॅस्टिक!’ म्हणत संयुक्ताला फोन लावला. संयुक्ताला हा प्लॉट मनीषनं ‘नरेट’ केला. तीही हरखली. मालिकेत एक प्रेम येणं, त्यात दरार पडणं आणि मग विवाहबाह्य मसाला मिळणं- तेही अशा वास्तववादी मालिकेत- हे म्हणजे लॉटरी लागण्यासारखंच होतं. तिनं ताबडतोब लिहायला सांगितलं, आणि सुधाला फोन लावला- ‘सुधा, एक गाँव की गोरी टाईप मुलगी चाहिये. सावळी चालेल, पण सेक्स अपील हवं. कचकचीत.’
मनीष- धरम पुन्हा जोमानं कामाला लागले. अरिवद तिथे आऊट ऑफ स्पेस असल्यागत बसून राहिला. त्याची या बेगडी नातेसंबंधांशी आणि त्यातल्या काल्पनिक गुंत्याशी ओळखच नव्हती. संध्याकाळपर्यंत मनीषनं तीन एपिसोड मारले होते. त्यांचं वाचन झालं.
पंचायत भरते तेव्हा सुहानी म्हणते, ‘एक बार जिस आदमी के साथ भाग्य लिखा जाता है, इस देश की औरतें उसके ही चरणों में स्वर्ग ढूँढती है. अगर मेरी किस्मत में सूनी माँग लिखी है, तो मुझे किस्मत का फैसला मंजूर है..’ वगरे वगरे. अरिवद वगळता सगळ्यांचंच समाधान झालं. पण अरिवद काहीच बोलला नाही. मनीषनं तर ‘मं सती जाऊंगी-’ वगरेही वाक्यं लिहिली होती. धरमनं त्यांचा टोन जरा डायल्यूट करायला सांगितला. एकूण, आता पुढचा गुंता सुटला होता. एपिसोड मेल केले गेले आणि संयुक्तानं, तासाभरात फीडबॅक देते, असं सांगितलं. सगळे आपापल्या कामाला निघून गेले. अरिवदही उठला तसं विकासनं त्याला बसायला सांगितलं.
‘संयुक्ता म्हणाली- कामगार चळवळीचा ट्रॅक चांगला लिहिला गेला होता. मी तिला सांगितलं, मनीषच्या बसची बात नव्हती ती. तुम्ही इनपुट्स दिले होते.’
अरिवद हसला. ‘थँक्स!’ म्हणाला. मग जरा थांबून त्यानं विचारूनच टाकलं, ‘पण विकासजी, हा ट्रॅक का नाही घेतला त्यांनी?’
विकास मंदसं हसला. त्यानं ग्लास भरले. ‘घ्या. चीअर्स!’ म्हणत तो क्षणभर गप्प झाला. ‘अरिवदजी, माझाच वेडगळपणा झाला.’ मग मोकळेपणानं हसत म्हणाला, ‘मी जरा तुमच्या बोलण्यानं प्रभावित झालो. काही अलिखित नियम असतात..’ मग परत तो थांबला. काही वेळ विचारात पडल्यासारखा वाटला. बोलावं की नको, असा विचार पडला त्याला. पण मग आता अरिवद आपलाच आहे असं मनाशी म्हणत तो बोलू लागला- ‘अडचण झाली ती लाल बावटय़ाची.’
‘म्हणजे?’
‘अरिवदजी, टीव्ही कुणाच्या पशानं चालतो? स्पॉन्सर्सच्या. वेगवेगळे प्रॉडक्ट्स खपवण्यासाठी त्यांनी अॅडव्हर्टायझिंगचं शोधलेलं माध्यम आहे हे.’ मग तो हसलाच. ‘काय आहे- आपल्याला असं वाटतं, की एपिसोड्सच्या दोन सेगमेंट्सच्या मधल्या वेळात जाहिराती दाखवतात. इट्स नॉट दॅट. जाहिरातींच्या मधल्या स्पेसमध्ये काहीतरी हवं लोकांना धरून ठेवायला, म्हणून आपण आहोत.. आपले कार्यक्रम आहेत. इतकाच आपला रोल. इतकीच आपली व्हॅल्यू. त्या मंडळींना कामगारांचं एकत्र येणं, त्यांच्या हक्कांबद्दल बोलणं, हक्क माहिती करून घेणं, जरा अडचणीचं वाटलं असेल. त्यात आपण वास्तववाद म्हणून चळवळीचं इतकं सखोल रूप दाखवायला जात होतो. टिपिकल कामगार पुढारी दाखवून मालकाशी त्याची फाइट- असा फिल्मी मसाला चालला असता. म्हणजे गावगुंड घेऊन फिरणारा आणि नायकाकडून मार खाणारा मालक, त्याचे ते केस व कल्ले वाढवलेले चमचे- असे अगदी वास्तवात कुठेही न दिसणारे लोक चालतात यांना. कारण मग संघर्ष, लढाही कुणी मनावर घेत नाही ना. खरं तर या खोकडय़ातलं कुणीही काहीही मनावर घेणं नको असतं त्यांना. फक्त त्यांच्या प्रॉडक्ट्सच्या व्यतिरिक्त.’
विकास बराच वेळ बोलत राहिला. बरंच काही सांगत राहिला. या माध्यमाचं एक रूप मोकळेपणानं मांडत राहिला. त्याचा इतक्या वर्षांचा अनुभव शेअर करत राहिला. तासाभरानं अरिवद तिथून बाहेर पडला तेव्हा त्याचं मस्तक गरगरत होतं. ते स्कॉचमुळं, कीडोक्यातल्या विचारांमुळं, त्याला कळत नव्हतं. त्यानं बाहेर येऊन सरळ आभासला फोन लावला.
‘हाय अरिवद!’
‘काय करतोयस रे?’
‘काय नाय रे. दिवाकरांच्या नाटय़छटा वाचायला घेतल्यात. तुझं कसं चाललंय?’
‘माझं? कळत नाहीये. अरे, डोकं गरगरतंय. भन्नाट आहे हे सगळं. अतक्र्य आहे.’
‘का रे? मालिका तर मनासारखी मिळालीये ना तुला?’
अरिवद त्यावर हसलाच. ‘आभास, वास्तववादी म्हणतात हिला हे- पण वास्तव कधी पडद्यावर येणारच नाहीये. अरे, हा टीव्ही हे- हे भांडवलशाही अर्थव्यवस्थेचं अपत्य आहे, हे मला कळलंच नाही आजवर. किंवा तसा विचारही केला नाही आपण कधी. गंमत बघ, आता हा धना! सामान्य माणूस दाखवतोय आम्ही त्याला. सामान्य माणसाचं जगणं, संघर्ष, जीवन दाखवणार आम्ही. पण या गरीब, लोअर क्लासच्या माणसाचं घर आम्ही बांधलंय ना, ते एखाद्या पाटलाच्या वाडय़ासारखं टुमदार आहे. बाकी मालिकांतही ब्रीफिंग असतं, की मध्यमवर्गीय, सामान्य माणसांचे प्रश्न दाखवा. पण तो अगदीच लोकलला लटकणारा नको. मग एखादी छोटी चारचाकी गाडी दाखवायची त्याची. जशी आम्ही फक्त सायकलच परवडणाऱ्या धनाची बाइक दाखवलीये- एका प्रसिद्ध कंपनीची. महागडी. मग म्हणतात, या मध्यमवर्गीय माणसाची बायको अगदीच कळकट नका दाखवू. मग स्लीवलेसवाली. छान केस मेंटेन केलेली, दागिनेवाली दाखवतात. का तर? लुक चांगला हवा मालिकेचा. इथेही धनाच्या बहिणीला, गावातल्या इतर बायकांना, त्या शब्बोदीला दिलेले कपडे बघ.. दागिने बघ. मग हा राहिला कुठे सामान्य, आर्थिकदृष्टय़ा मागासलेला? ऐकतोयस ना?’
‘हं.’ आभासनं हुंकार दिला.
‘मग भोसडीच्या हं- हं कर ना! मी काय एकटाच बडबडतोय चुत्या?’ अरिवदचा बिघडलेला मूड आभासला जाणवला. ‘हो- हो. बोल,’ तो म्हणाला.
‘बरं, चळवळींबद्दल बोलू नका. राजकारणाचा विषय काढू नका. धार्मिक प्रश्न नकोत. कुणाच्या धार्मिक भावनांना हात घालू नका. नाहीतर चॅनलवर मोच्रे येतील. शेतकऱ्यांचं काही दाखवू नका, कारण ते डाऊन मार्केट वाटतं. आमच्या खेडय़ात शूट होणाऱ्या मालिकेत शेती येते ती फक्त बॅकग्राऊंडला. शेतकऱ्यांचे प्रश्न नकोत- कारण शहरातल्या ऑडियन्सला त्यांच्याशी काय देणं-घेणं?’
‘हं.’ आभास हुंकारला.
‘बरं, दलित-सवर्ण असं काही बोलू नका. परप्रांतीय, भाषिक वाद वगरे नको. आणि काही प्रोग्रेसिव्ह विचार मांडूच नका. करवां चौथ, नवस, सुहाग, मंगळसूत्र यांची रेलचेल दाखवा. का, तर म्हणे आपली संस्कृती बघायला आवडतं लोकांना. ही संस्कृती आपली? आणि या संस्कृतीला क्वेश्चन करू नका. मग या सामान्य माणसाच्या आयुष्यात एकच गहन प्रश्न उरतो. आणि तो म्हणजे- हा हिच्याबरोबर, ती त्याच्याबरोबर. बॉसचं सेक्रेटरीशी, सेक्रेटरीचं बॉसच्या मेहुण्याशी, त्या मेहुण्याचं त्याच्या मित्राच्या बायकोशी लफडं! बस्. स्वत:चा जोडीदार सोडून जगात कुणावरही प्रेम करा- हाच जणू अलिखित कायदाच!’
‘म्हणजे खरे प्रश्न बाजूला ठेवा; खोटय़ा प्रश्नांत गुंतून राहा..’ आभास म्हणाला.
‘हो! भांडवलशाही अर्थव्यवस्थेचं नकळत माऊथपीस होऊन बसतं हे खोकडं. किंवा त्यासाठीच तर नसेल शोधून काढलं गेलं असेल हे? आपल्या सामाजिक, राजकीय, धार्मिक, आर्थिक, वैचारिक परिसराशी कसलंच नातं नसलेली ही पात्रं आणि त्यांचे हे प्रश्न. हे सगळं मुद्दाम केलं जात असेल का रे? समाजावर एक प्रकारची गुंगी चढावी म्हणून? आणि यातून त्यांना हवा असलेला, त्यांना धार्जिणा समाज निर्माण करायचं कारस्थान असेल का हे?’
आभासही विचारात पडला. त्यालाही हे पटत होतं.
‘अरे, आता त्या धनाचंही एक लफडं दाखवतायत. मला कंटाळा येईल असं वाटतंय.’
‘ए, थांब. घाई नको करूस. तू हे सगळं बदलायला तिथे गेलेला नाहीयेस, हे लक्षात ठेव. तू हे सगळं फक्त बघायला गेलाहेस. नीट बघ ती प्रोसेस जवळून. एकदमच फोफावलेला एक कलाप्रकार आहे तो. आपण तो समजून घेतलाच पाहिजे. आणि धनाकडून, त्या रॉ अॅक्टर्सकडून कामं करून घेण्याची गंमत आहेच ना!’
‘तीही फार काळ नाही. कारण महत्त्वाच्या भूमिकांसाठी मुंबईहूनच स्ट्रगलर्स मागवताहेत. गाँव की गोरी मागवलीये एक- धनासाठी.’
आभास हसला. ‘चील, बडी चील. चल, तुला एक मस्त नाटय़छटा वाचून दाखवतो दिवाकरांची. फ्रेश होशील.’
त्याला त्या मूडमधून बाहेर काढायला म्हणून आभासनं वाचायला सुरुवात केली आणि अरिवद त्या शब्दकळेवर झुलत झुलत रूमवर आला, दार लावलं आणि पलंगावर पडून ऐकत राहिला. बराच वेळ.

पहाटेच उठलेल्या चंदननं पूजा केली. रात्रीच भरून ठेवलेल्या बॅगची परत एकदा चाचपणी केली. दहा दिवसांच्या शूटसाठी बाहेर- तेही चांदणगावसारख्या खेडय़ात राहायची त्यानं तयारी केली होती. अगदी पोट बिघडलं तर असावीत म्हणून घेतलेल्या औषधांसकट सगळं चेक केलं. नऊ वाजताची गाडी पकडून जायचं होतं. घरातनं साडेसातलाच निघालेलं बरं- अशा विचारात तो समोरच्या टपरीवर चहा-नाश्ता उरकायला बाहेर पडला. चहा घेता घेता त्याला जाणवलं, देव आहे. वाट पाहायला लावतो, पण मागे उभा राहतो. टपरीवर मारुती, गणपती, माँ शेरावाली असे कितीतरी देव होते. साईबाबा, सत्य साईबाबाही होते. मनातल्या मनात त्यानं सगळ्यांना नमस्कार करून घेतला. चहा-नाश्त्याचे पसे देत तो रस्ता ओलांडायला उभा राहिला आणि फोन वाजला.
‘सुधाकरजी, गुड मॉर्निग.’ त्यानं आदरानं म्हटलं. आदरासोबत आपल्या स्वरात एक किंचित लाचारीही आहे, हे त्यालाही जाणवलं.
‘चंदन, अं.. सॉरी बाबा, पण शेडय़ूल जरा चेंज झालंय.’
‘म्हणजे?’ चंदन टरकलाच.
‘अं.. तुला आज निघायचं नाहीये. आय मीन, हा ट्रॅक चॅनलनं स्क्रॅप केलाय. बट डोन्ट वरी- काहीतरी रोल निघतीलच नंतर. ओके? सॉरी फॉर द इन्कन्व्हिनिअन्स.’
चंदन काही विचारणार, बोलणार, इतक्यात पलीकडून फोन ठेवला गेला. चंदन एका क्षणात सगळं हातून निसटल्याच्या भावनेनं खचूनच गेला. आजूबाजूला मुंबई उठून धावू लागली होती. चंदनच्या पायातली शक्तीच निघून गेली होती. त्यानं माघारी वळत टपरीच्या बाकडय़ावर बसकणच मारली. समोरचे सगळे आपापल्या कामांत मग्न होते. आणि सगळे देव, सगळे बाबा निर्विकार!!!

रात्री उशिरा आलेल्या फोन कॉलनुसार तनुजा चांदणगावाकडे निघाली होती. खास गाडी पाठवलीये घ्यायला याचाच अर्थ रोल महत्त्वाचा असणार, हे तिनं ताडलं होतं. पसेही व्यवस्थित ठरवले होते. आणि सध्याच्या रिकामपणच्या काळात ‘अच्छा तो हम..’सारखी मालिका म्हणजे नाही म्हणायचा प्रश्नच नव्हता. गाडीच्या पुढच्या भागावर गणपती होता, साईबाबा होते. तिनं मनोमन नमस्कार केला. तिला वाटून गेलं, देव आहे. वाट पाहायला लावतो, पण मागे उभा राहतो.

चांदणवाडीला शूटिंगची तयारी सुरू झाली होती. धरमनं असिस्टंटला शॉट समजावून दिला होता. अरिवद, मनीष सेटकडे निघाले होते.
‘फॅक्टरी वर्करसारखं झालंय आयुष्य- सरजी,’ मनीष म्हणाला, ‘रोजंदारीवर काम केल्यासारखं. बघा ना, सगळी माणसं कामाला लागलीत. आज सुहानीचं काम करणारी नटी येईल. ‘
अरिवदलाही हे असं रोज सकाळी कम्पल्सरी काम करणं जरा विचित्रच वाटत होतं.
‘कोण करतंय सुहानी?’
‘आहे कुणीतरी नेत्रा खन्ना नावाची. फोटो पाहिला. वाटते मस्त.. गाँव की गोरी.’
‘पण मनीष, तो ट्रॅक छान होता रे. फॅक्टरी मालकाचा. बारा एपिसोड फाडून टाकलेस तू? तुला राग नाही आला?’
‘सरजी, इथं आपल्याला काय आवडतं, याला अर्थच नाहीये. चॅनलला काय हवं, ते महत्त्वाचं. चॅनल खूश, आपण खूश. शर्ट शिवणारा किंवा इंटेरिअर डेकोरेटर कसं गिऱ्हाईकाला जे हवं ते देतो- तसं.’
‘मनीष, तू लेखक आहेस. तुला काही सांगायचं, म्हणायचं असतं. हे सगळं खूप उथळ, मिडीऑकर लेव्हलचं काम नाहीये का?’
‘आहे ना सरजी. आधी मलाही फार वाईट वाटायचं. पण एकदा विकास सरांनी समजावलं- मनीष, हे बघ- क्रिएटिव्हिटी गयी तेल लेने. माल कमा, माल. चॅनलला जे हवंय ना ते त्यातल्या त्यात चांगलं करून द्यायचं. मला पटलं. ते म्हणाले, आय नो आय एम डुइंग शीट! बट माय शीट शुड बी द बेस्ट शीट ऑफ टाऊन.’
या म्हणण्यावर अरिवदचं सगळं म्हणणंच संपलं होतं. त्यानं समोर पाहिलं- शब्बोदी मेकअप रूमकडे जात होत्या. धरम शॉट लावत होता. कॅमेरामनची माणसं स्पॉट अॅडजेस्ट करत होती. चहावाल्या बॉयनं चहा उकळायला घेतला होता. विकास पलीकडे कुणाशीतरी बोलत होता. कामं करून घेत होता. शुबीरदा कशाला तरी रंग लावत होते. चेतना हातात सुहानीचे कपडे घेऊन कुठूनतरी कुठेतरी जात होती. सगळे आपापल्या कामात गुंग होते. फॅक्टरी सुरू झाली होती. कामगार कामाला लागले होते.
अरिवद मात्र गोंधळून गेला होता. आपण कामगार की कलाकार? त्याला कळतच नव्हतं. काही काळ तो तसाच उभा राहिला.

पाच हजारांच्या करकरीत नोटा अॅडवान्स म्हणून हातात पडल्यावर बाळू सुताराच्या कुम्याला चक्करच यायची बाकी होती. गावातल्या उनाड पोरांबरोबर िहडणारा आणि धनाच्या नाटकात सुंदर बासरी वाजवणारा कुम्या खरं तर वायाच गेल्यात जमा होता. लग्नाची बेडीसुद्धा त्याला हातात करवत घेऊन बसायला भाग पाडू शकली नव्हती. बिचारा बाळू सुतारच दोन्ही संसार हाकत होता. पोराला शिव्या घालत होता. कुम्यानं नाक भरून त्या नोटांचा वास घेतला आणि घराकडे पळाला. हीच गत नाटक मंडळीतल्या सुदाम, नरेश, हसन्या, महेशची, कुंभाराच्या तुषारची, टेलरमास्टर विष्ण्याची, म्हाताऱ्या बाबूची झाली होती. सगळेच हसन्याच्या अब्बूच्या न्यू वेलकम हॉटेलजवळ आले, आणि हसन्याच्या अब्बूनी, ‘‘ए, जमाल, फडका मार, आ गये देख फुकटे सब..’’ म्हणत तोंड वाकडं केलं. अब्बूचं तोंड गटार होतं, पण हाताला चव होती. त्याला आज या सगळ्यांच्या हालचालीत कसलीशी ऊर्जा जाणवली.
‘क्या रे हसन्या? आज सुब्बे सुब्बे? आँ?’
‘अब्बू, सेठ बन गया हसन्या तुमारा. ए, दाव ना दाव.’
हसन्याने खिशात हात घालत पाच हजाराच्या नोटा गल्ल्यावर ठेवल्या. अब्बूचे डोळे क्षणभर गरगरले. पण मग सावध होत तो म्हणाला, ‘इत्ता काय को? शिनेमावालों पे भरौसा करने का नई. कब कौ किधर गंडा डालींगे समझेगा नई.’
आख्खं टोळकं खदाखदा हसलं.
‘कामाचे पसे आहेत. आता असेच पसे मिळत रहाणार. मोठ्ठं लॉज बांधा लॉज- तालुक्याच्या गावाला जमीन घेऊन..’ असा सल्लाही विष्ण्यानं, म्हाताऱ्या बाबूनं अब्बूला दिला. आणि वडापाव, मिसळी, चहा- बिडीची मागणी झाली. अब्बूचं ते खोकडंवजा हॉटेल एका अद्भुत वातावरणानं भारलं गेलं. इतका उत्साह, इतका जोम त्या खोकडय़ानं कधीच अनुभवला नव्हता.
त्या खोकडय़ातला तो उत्साह आता धूर पसरावा तसा गावभर पसरत गेला. घराघरात त्या नोटा पोहोचल्या. त्या पाहून घराघरातल्या माणसांच्या भुवया उंचावल्या. डोळे गरगरले, विस्फारले गेले. आनंदानं कुणाला भरून आलं, तर कुणी नोटा यमलाईच्या चरणी ठेवून दंडवत घातले. कुणाला चार-चारदा नोटा हातात घेऊनही हे स्वप्नच आहे असं वाटत राहिलं. कागदाच्या त्या कोऱ्या करकरीत तुकडय़ांनी चांदणवाडीला ढवळून काढलं. पण अखेर लक्ष्मीच ती. चंचला. ती कुठली तिथं थांबायला! तिला पाय फुटले. नरेशच्या बायकोला- विद्याला हाताशी धरून त्या नोटा लगोलग चंदूलाल सराफाच्या पेढीवर गेल्या आणि तिथं गहाण पडलेली नथ आता विद्यीच्या हातात पडली. मग येता येता नरेशच्या मागं लागून लाजत-मुरकत तिनं एक साखळीसुद्धा गळ्यात पाडून घेतली. त्या नोटांवर स्वार होऊन ती लक्ष्मी चहुदिशांनी चांदणगावच्या वेगवेगळ्या दुकानांत शिरली.
गावात जणू पशाचा वळीवच आला. मगन हलवायाच्या दुकानातून मिठाईचे पुडे बाहेर गेले. नाऱ्याचं किराणामालाचं दुकानंही हलकं झालं. कापड दुकानदार नरहरीदादांनी दुकानाच्या फळ्या सरकवल्या नाहीत तवर तागे फाटू लागले. ती कापडं विष्ण्या टेलरच्या दुकानात येऊन पडली. त्यांच्या चोळ्या, झंपरं, पॅन्टा होऊ लागल्या.
‘गुणा फूट वेअर’ नावाच्या बोर्डाचं ओझं घेऊन बसलेल्या खोकडय़ातल्या नव्या वहाणा वर्तमानपत्रात बांधून गिऱ्हाईकांकडे गेल्या. कुरमुऱ्या-फुटाण्यांच्या गोण्या तर किती वेळा रीत्या झाल्या, सुमारच नाही. म्हाताऱ्या बाबूनं लय दिसापास्नं ‘घ्याचं, घ्याचं’ म्हणत असलेल्या पितळंच्या हंडय़ांची खरेदी केली, वर चार चांगल्या कपबशाही घेतल्या. कुम्याचा बाप कुम्यानं एका दमात कमावलेल्या पाच हजाराच्या नोटा बघून बायकूला घेऊन तालुक्याला खासगी डॉक्टराकडे जायचं ठरवून रिकामा झाला. म्हातारी दम्यानं ख्यॅक झाली होती. सुदामनं हिशेबीपणे नवी कौलं टाकायचा विचार केला आणि तो बाजाराकडे पळाला. सुलतान्याच्या मटणाच्या दुकानात चार कोंबडय़ा, दोन बकरं जास्तीचं खपलं.
दिवसभर नोटांच्या कौतुकात गेला. रात्री चावडीसमोरच्या पारावर चांदणवाडीतली माणसं जमली. खिसा गरम असला की माणसाच्या चालीत एक डौल येतो. तशी ऐट त्या सगळ्यांच्या हालचालीत होती. चंच्या सुटल्या, बिडय़ांची देवाणघेवाण झाली. हातातल्या तंबाखूची मळणी सुरू झाली. कुम्यानं मात्र गुटख्याचा पाऊच काढला. आज तालुक्यास्नं येताना त्यानं आठवडाभराची बेगमी करून टाकली होती. चकचकीत पाकिटातला गुटखा त्यांनं पाकीट सोलून तोंडात टाकताना चमचमला. त्याच्या चमचमाटापुढं तंबाखूची कागदी पुडी गावंढळ वाटत राहिली. आणि हसन्यानं ठरवलं, परवा तालुक्याला गेल्यावर आधी गुटखा आणि सिगारेटी आणायच्या. शूटिंगच्या माणसांना पण लागतीलच आता. तंबाखू, बिडय़ा, पानं- सगळ्यानं मस्तकात एक छान झिनझिणी आली आणि माणसं सलावली.
‘मायला, शूटिंगवालं लय पक्कंशब्दाचं. बलवून पसं दिलं हातात,’ म्हताऱ्या बाबूनं सुरुवात केली.
‘तर, ही मानसं बरी दिसत्यात,’ सुदामानं दुजोरा दिला.
‘आरं, त्यांना पशाचं काय पडलंया? बक्कळ आसतो म्हनं त्यांच्याकडं,’ नरेशनं उगाच माहीतगाराचा आव आणला. कुणी या शहरी माणसांच्या वागण्याचं, कुणी बोलण्याचं, कुणी कपडय़ांचं कौतुक केलं. एकंदरीत पसा बोलत होता. माणसं त्याखाली दबली होती. या सगळ्यात पक्या सलूनवाला शांतपणे दातात काडी फिरवत दाढेत अडकलेला ऐवज काढत होता. मधेच तो पच्कन थुंकला आणि त्यानं विचारलं, ‘ते खरं, पन काय धना खरुखरचा मरनार हाय व्हय रं?’
या प्रश्नानं सगळेच स्तब्ध झाले. नोटांच्या फडफडाटात या प्रश्नाचा विचारही मनात आला नव्हता.
‘धना आजारी तर हायच की, पन..’ नरेश चाचरत बोलू लागला, ‘पन यवडा तरना मानूस मरतुया व्हय?’ नरेश म्हणाला. पण त्याच्या आवाजात जरा धास्तीच होती.
मग सुदाम पुढं झाला, ‘आरं, नाटक करतो ना आपन- ते काय खरं आसतं? शिरियल हाय ती. त्यात काय खरं आसनारे का?’ सुदामच्या बोलण्यानं सगळ्यांनाच जरा हायसं वाटलं.
मग सगळ्यांनीच हे सगळं नाटकच असणार, असं दुसऱ्याला आणि स्वत:च्या मनालाही ठासून सांगितलं. खरं तर हा प्रश्न आत्ता उगाच निघाला, असं त्या प्रत्येकालाच वाटत होतं. मग महेश सरसावला. ‘यडय़ानो, आपल्या गावातला धनाच मोट्टा कलावंत. नाटकात पन त्योच हीरो आसतो. त्याचं काम त्या विकास सायबास्नी आवडलं म्हनून त्याला मुख्य नट केला. आता धना जरा मागल्या वर्सापासून नरम-गरम हाय, हा योगायोग म्हनायचा.’
महेशच्या बोलण्यानं सगळ्यांनी सुटकेचा नि:श्वास टाकला. आणि परत तंबाखू-बिडय़ा निघाल्या. कुम्याचा गुटखा परत चमचमला.
पण पक्या सलूनवाल्याच्या दातातली वळवळ काही थांबली नव्हती. त्यानं दात आणखी कोरत सवाल टाकला-
‘मर्दानू, तुमाला पाच- पाच हजारांच्या नोटा वाटल्या त्या शिरियलवाल्यांनी. धना मुख्य नट. त्याला काय दिलं म्हनता?’ या प्रश्नानं मात्र सगळ्यांच्याच मनात एक चलबिचल झाली. आपल्या पशांच्या नादात धनाच्या हातात काय पडलं, हे कुणी पाहिलंच नव्हतं. पण आता मात्र सगळ्यांच्याच मनात हा किडा वळवळला. ‘धा-बारा हज्जार दिलं असनार बेन्याला. मला इचारा!’
पक्याची काडी बरोब्बर नेमक्या जागी फिरली आणि भाकरीचा भलाथोरला कण बाहेर आला. तो कण त्यानं मजेत जिभेवर घोळवला आणि परत, ‘तुमच्या दीड-दोन पट तरी घेनार त्यो-’’ म्हणत पच्कन जमिनीवर थुंकला.
‘आसंल की,’ महेश जरा नरमल्या स्वरात म्हणाला.
सगळ्यांनाच जाणवलं, या तुलनेनं त्यांच्या पाच हजारांचं मोल जरा कमीच झालंय. चावडीवरच्या टय़ुबलाइटला चिलटं चिकटत होती, खाली पडत होती. अचानक निर्माण झालेल्या शांततेनं- त्या टय़ुबलाइटमधनं ती बिघडल्याचा एक आवाजही येतोय, हे सगळ्यांनाच जाणवलं. इतका वेळ त्या आवाजाचं अस्तित्वच नसल्यासारखं होतं. मग म्हाताऱ्या बाबूनं आधी खाकरून घसा साफ केला आणि हात उडवत म्हणाला, ‘काय का मिळना त्याला. आपल्याला आपलं मिळालं, लय झालं. ज्याचं त्याला बरूबर देतो दानोबा.’
या बोलण्यानं सगळ्यांच्याच मनातला सल थोडा कमी झाला. ‘चला, लय रात झाली,’ म्हणत बाबू उठला तसे सगळेच उठू लागले. हळूहळू चावडी रिकामी झाली. आता तिथं फक्त लांबवरून येणाऱ्या देवळातल्या भजनाचा स्वर येत राहिला. देव जागवत राहिला.

धना सकाळी लवकरच उठला.
‘आये, सावकाराचं किती पसं द्यायचं आसतील गं?’
‘चुलत्यानं कर्ज दिलं तुज्या. आता त्यो म्हनंल ती रक्कम. जमल तसं दर म्हैन्याला देतुयाच की आपन. पन मागल्या खेपंला आला तवा म्हनला दीड लाख उरल्यात.’
‘एक काम कर आये, बोलावून घे त्याला. तुकडाच पाडतो.’
‘म्हंजे?’
‘तू बोलाव तर..’ म्हणत धनानं सायकलची चावी घेतली आणि तो बाहेर पडला.
जाता जाता कुम्याच्या म्हातारीनं, ‘का रं धना, कुटं चाललाईस?,’ असं उगाचंच विचारलं. धनानंही, ‘हित्तंच,’ असं बिनअर्थाचं उत्तर दिलं. तो गावातल्या छोटय़ा छोटय़ा रस्त्यांवरून सायकल पिटाळू लागला. इतक्यात मागून त्याला हसन्याचा आवाज आला- ‘धना.’ हसन्याचा आवाज मागे न बघताही त्यानं ओळखला, आणि ‘काय रे?’ म्हणत त्यानं वेग मंदावला. हसन्या सायकल मारत जवळ आला. ‘ए, धना.. हे बग-’ म्हणत त्यानं एका हातानं सायकल चालवत काही पेपर्स धनाच्या हातात दिले.
‘काय आह,े सांग की मर्दा.’
‘धना, बाईक घ्याची हाय.’
‘तुला रं कशाला बाईक?’
‘आरं लागती की- कवा कवा तालुक्याच्या गावाला जायला.’
‘आन पसं?’
‘कर्ज मिळतंया. या शिरियलवाल्यांनी परवा अजून पंदरा हजार रुपये दिलं. साटवल्यालं हुतं धा माज्याकडं. बाकी हफ्तं. दीड वर्षांत फिटतंय घे.’
दोघं हसन्याच्या हॉटेलजवळ आले. त्यांना जाताना पाहून अब्बू किंचाळले, ‘अबे ए रांडके, किधर न्हाटतईस? चल, इधर आ.’
हसन्यानं नाइलाजानं सायकल थांबवली. ‘आतू. चल रे,’ म्हणत सायकल वळवून तो हॉटेलजवळ आला.
‘धना, इसकू समझा. पसा उडाने का हय इसकू. बाईक लेतई. क्या करने का बाईक लेके?’
‘मढे पे डालने का आच्चींगा..’ आतून हसन्याच्या आईचा आवाज आला. ती गिऱ्हाईकांसाठी भजी तळत होती. छानसं हिरवंकंच पातळ, गळ्यात सोन्याची माळ, हातात हिरव्या बांगडय़ा, हाताला मेंदी. नुकतीच कुणा नातेवाईकाच्या लग्नाला जाऊन आली असणार.
‘मढेपे कायकू? मेरे को होना बाईक.’
‘धना, इसको बोल तू. मी म्हटलं, पसे आलेत, हिच्या भावाची जागा हाय तालुक्याला- तिथं हाटेल काडू नवं. ते हा बगंल. उद्या लगीन झालं की याला स्वतंत्र हाटेल गावंल की. तर याच्या अकलेवर परदा पडलाय. सुक्काळीचा बाईक घेनार म्हंतो.’
आता हसन्याची अम्मा बाहेर आली. हात नाचवत बोलू लागली, ‘मुडदा बिठाया इसका भिताडानजीक. एक पसा बाप के हाथ में नई दिया.’
‘कपडा लाया सो?’ हसन्या पण चिडला.
‘इनो क्या गलत बोले? पसा आया अल्ला की मेहेरबानी से. वो रखने का संभाल के, क्या उडाने का? हीरो बन के घुमने का है इसकू गाँव में. चारसौ का जाकीट लिया, बुट्टा लाया आठ सौ का-’’ अम्मानं हिशेब मांडला, तेव्हा धनाची नजर त्याच्या पायांकडे गेली. चकाचक शूज पायात चमकत होते.
‘मेरेको शूटिंगा में जानेका आसतंय. उदर ऐसाच कपडा पेनते वह लोग. ऐसा बनियान-चड्डी पे नई बठतई लोगा..’ अब्बूच्या हॉटेलमधल्या कळकट बनियान- पजाम्यावर पोरानं तीर मारल्याचं अम्माला चांगलंच झोंबलं. तिनं मशीनगनच्या फैरीसारखी शिव्यांची फैर झाडली.
‘आरे, पटकी आयी तेरे को, मुडदा घलाया डबरे में. लाजशरम है के नई?’ पण तिच्या बोलण्याकडे ना अब्बूनी गंभीरपणे पाहिलं, ना हसन्यानं.
धना- हसन्या हॉटेलातच बसले. अम्मीनं शिव्या देत देतच भजी आणून आदळली.
‘भेजा है के क्या है? चार बहनों की शाद्या करने का है. और यह भाई है ऐसा.’
निर्लज्जपणे दोघांनी भजीचे तुकडे मोडले. आणि धनानं विचारलं, ‘काय प्रकार आहे?’
हसन्यानं बँकेचे फॉर्मस् काढले.
‘कर्ज द्यायलीया बँक. तुषार, पक्या दोघंपन घ्यायल्यात.’
‘बाईक कशाला लागती आपल्याला?’
‘धना, आपून तरी कवा फिरनार बाईकवरून? कवा ऐष करनार?’
इतक्यात दाराजवळ टेंपो आला आणि त्यातून पलटण उतरली. तुषार, कुम्या, नरेश, विष्ण्या- सगळेच होते. सगळे धनाकडे आले.
‘धना, चल की मर्दा, तालुक्याला जाऊ. नाऱ्याला दुकानाचा माल आनायचाय, विष्ण्याला शिवणकामाचं सामान आनायचंय.’
धनानं शेवटचं भजं तोंडात टाकलं आणि तो उठला. ‘चल की हसन्या,’ म्हणत त्यानं हसन्याला इशारा केला. हीच वेळ आहे इथून बाहेर पडायची, हे हसन्यानं ओळखलं आणि ‘तो अब्बा, कुच लाने का है क्या तालुकेसे?’ म्हणत बाहेर पडला. आब्बू काही बोलले नाहीत. पण अम्मानं मात्र ‘चद्दर ला मेरे कब्रपर चढाने-’ म्हणत बोटं मोडली. दोघं चपळाईनं टेंपोत बसले. टेंपो तालुक्याकडे धावू लागला.
टेंपोत उभ्या उभ्या कुणी सिग्रेटी पेटवल्या, कुणी तंबाखूचे बार भरले. टेंपोच्या मागे अधर्ं दार होतं. गुढघ्याइतकं. त्या दारावर बूड टेकत, वरती आधाराला धरत विष्ण्यानं सुरुवात केली.
‘मायला, ही शिनीमावाली लय पक्की निगाली की शब्दाला. शनवारी संध्याकाळी न मागता पसं हातावर ठेवाय लागल्यात.’
‘तर!’ कुम्यानं त्याला दुजोरा दिला.
‘पन चेक देत्यात राव. तालुक्याला बँकंत भरावं लागत्यात पसं..’ नरेश जरासा कुरकुरला.
‘बरं झालं की. पसं हातात तरी ऱ्हातील. नाय तर कवा सपतील, कळायचं बी नाय.’ धनानं त्याला गप्प केलं.
‘व्हय. आता घरच्या मानसांनाबी ही मानसं भली मानसं वाटाय लागल्यात,’ कुम्या बोलला, ‘काल चेक दावला न् बाला इचारलं, सुतारकामात हाय का यवडा पसा? तर गपगारच झालं. म्हनलं, कुम्या, रांडच्या त्या लोकाईस्नी धरून ऱ्हा. भांडणं नगो काडूस.’
‘भांडतईस कशाला? चांगली मानसं हायीत,’ सुरेश म्हणाला. मग धनाच्या खांद्यावर हात ठेवून गहिवरल्या आवाजात म्हणाला, ‘धना, बाबा तू गडय़ा लई मोटं काम केलंस. तू गावासाटी, आमच्यासाटी सोत्ताचं दुख मागं सारलंस आनी..’ मग त्याच्या डोळ्यात पाणीच आलं. सगळेच क्षणभर गहिवरले. या सगळ्याच्या मागे असलेल्या धनाबद्दलच्या कृतज्ञतेनं त्यांना भरून आलं. बाहेर त्या जुन्या खटारा टेंपोचा खडखडाट ऐकू येत होता. सगळेच गप्प झाले आणि तो आवाज जरा जास्तच अभद्र वाटू लागला.
टेंपो तालुक्याच्या बाजारात शिरल्याचं सगळ्यांनाच जाणवलं. मग उत्साहानं धना उठला आणि उत्साहातच त्यानं टेंपोचं मागचं दार उघडलं. सगळ्यांनी उडय़ा मारल्या आणि- ‘तासाभरात हितंच यावा रे. मी शिवणकामाचं सामान घेऊन येतो. चल रे कुम्या-’ म्हणत विष्णू कुम्याला घेऊन कापड दुकानाकडं वळला.
नाऱ्यानं हातातली यादी काढली आणि नेहमीच्या होलसेल व्यापाऱ्याकडे मोर्चा वळवला.
‘धना, तू येतोस का संगट?’
‘चल की येतो. ए पक्या, तुमी जावा चक्कर मारून या बाजारात,’ म्हणत तो नाऱ्यासोबत चालू लागला.
टेंपोवाल्यानं नेहमीच्या सवयीनं ‘महावीर होलसेल’ लिहिलेल्या दुकानाच्या गोडाऊनकडे गाडी घेतली. मालक बसले होते. ‘सातगोंडा तायशेटे’ अशी बाहेर पाटी होती. वर ‘महावीर होलसेल’ असा बोर्ड होता. शेटजींनी आपल्या चौसोपी वाडय़ातच बठक टाकली होती. आत घर, मागे गोडाऊन.
‘या नारबा,’ म्हणत त्यांनी नाकात सुवासिक तपकीर कोंबली. पेढीसारखी बठक. त्यावर स्वच्छ पांढरे तक्के- लोड. वरती महावीरांची, बाहुबली देवाची अशा दोन मोठय़ा तसबिरी. त्यांच्या गेल्या काही पिढय़ांनी इथे व्यापारात नाव कमावलेलं. समोर शिसवी बसकं रायटिंग टेबल. त्यावर कागद, पेन, पेन्सिली, खोडरब्बर असा जामानिमा. सगळं कसं छान, सुबक. मागे मांडी घालून बसलेले शेटजी. तेही कडक इस्त्रीचे कपडे घालून. धोतर, पांढरा सदरा, त्यावर राखाडी कोट. कानातनं केस बाहेर आलेले. हातात, गळ्यात सोनं. कपाळाला गंध. सकाळी बस्तीत जाऊन पूजा केलेली दिसत होती. िभतीवर घरातल्या माणसांचे काही फोटो आणि यशवंतराव, वसंतदादांच्या सोबतचे त्यांना हार घालतानाचे फोटो- सत्तरीच्या दशकातले. नाऱ्या, धना बसले.
शेटजींनी नाकात सुवासिक तपकीर कोंबत म्हटलं, ‘ए, बाळू, चा एक-दोन कप सांग रे.’ पण आतून आवाज आला, ‘बाळू न्हाय हाय वो. लिगाडय़ांच्यात गेलाय माल टाकायला.’
‘मग तुला सांगाय होत नाही काऽऽऽ रे? जा की जाऊन सांग जा आऽऽ त-’ म्हणत त्यांनी परत नाक भरून घेतलं. त्यासोबत एक छान िशक दिली आणि जवळच्या कपडय़ानं नाक पुसून घेतलं.
‘बोला.’
‘काय न्हेमीचंच की-’ म्हणत नाऱ्यानं यादी सरकवली.
‘डाळ नाय बाबा शिल्लक इतकी. मालच येत नाय बग. काय सांगायचं तुला? आली की सांगून सोडतो तुला. आनी हे काय चिप्स, कोल्ड्रिंक यवडं लागतंय होय रे? काय जेवान करंना झाल्यात काय रं गावातली मानसं आता?’
‘शेटजी, ते शूटिंगवाले आल्यात ना, त्यांना लागतंय आसलंच. आनि त्यांचं बघू बघू गावातली मानसंपन खाया लागल्यात. चिक्की गुडदानी खपचना वो. माल तसाच पडलाया.’
‘हं-’ शेटजींनी मान हलवली.
‘फ्लास्टिकच्या पिशवीतनं इकलं की कितीबी भाव लावा- घेत्यात. आनि चिरमुरे आटान्यानं वाडवले की बोंबलत्यात.’
‘ए, हा माल भर रे मागं टेंपोत..’ म्हणत त्यांनी नोकराला ती यादी दिली.
दरम्यान, आतून चहा आला. शेटजींच्या घरातली सून असावी. ती धनाला पाहून थबकली. तिच्या नजरेत अविश्वास गोळा झाला. चहा ठेवत धनाकडे कोपऱ्यातनं बघत ती आत गेली. नाऱ्यानं चहा उचलला. धनानंही उचलला. त्याला घराच्या दारात लगबग जाणवली. चार-दोन बायका उगाच आतून बाहेर येत परत आत गेल्याचं जाणवलं. मग घरातल्या शाळकरी पोरींनी धिटाई दाखवत पडवीतून खातरजमा करून घेतली. मग ‘त्योच हाय, त्योच..’ असा गलका करत त्या आत धावल्या.
‘काय कालवा कराईलायसा गं? अभ्यास नसंल तर घरातली कामं करा जावा की.’ शेटजी उगाच डाफरले. पण आतला गलका आणि लगबग काही कमी होईना. मग शेटजींची बायकोच बाहेर आली. तिनं जरा निरखून पाहिलं. दरम्यान, यांचा चहा संपून व्यवहाराचं बोलणं सुरू झालं होतं. शेटजींनी हिशेब केला होता. नाऱ्यानं काही रोख रक्कम देत बाकी उधारी मांडायला सांगितली होती. चहाचे कप उचलत शेटजींची बायको म्हणाली,
‘तुम्हीच असताय ना टीवीत कामाला?’
धनाला प्रश्न अनपेक्षित होता. ‘अं..’
‘बगतो तुमानी- आमी टीवीत.’
आता बाकी बायकाही धीर करून बाहेर आल्या होत्या. त्याही धनाला नीट बघू लागल्या होत्या. धना संकोचला.
‘होय, मीच.’
‘आनि हे बी हुते.’ नाऱ्याकडे बघत एक शाळकरी पोरगी म्हणाली.
‘होय.’ नाऱ्याही सुखावला.
आता शेटजींना काही कळेना.
‘काय म्हंतायसा? कोन कामाला हाय टीवीत त्ये?’
‘हेनीच हायीत वो. शिरीयल आसती त्येंची..’ सौभाग्यवतींच्या आवाजात कौतुक दाटलं होतं.
आता शेटजींनी कुतूहलानं धनाकडे पाहिलं. शेटजी टीवीसमोर बसण्याची वेळ कधीतरी र्वष- सहा महिन्यातनं एकदा येणार; त्यामुळे त्यांना सगळेच सारखे. पण टीवीतला कुणीतरी आपल्याकडे आलाय, याचं त्यांनाही अप्रूप वाटलं. इतक्यात मुलींनी शेजारीपाजारी बातमी नेली होतीच. आजूबाजूच्या मुली घरात डोकावू लागल्या होत्या. बायका आपापल्या मर्यादेत पदर डोक्यावर घेत, तोंडावर मुकटा धरत नवलाईनं बघत होत्या. धना लाजलाच. मग दोघं उठले, तशी एक पोर धिटाईनं पुढं झाली.
‘एक फोटो काडू का संगट?’ म्हणत तिनं तिच्या बहिणीला मोबाइल दिला आणि ती धनाजवळ उभी राहिली. तशा अजून चार-दोनजणी आल्या. धनाभोवती एक अर्धवर्तुळ झालं आणि फोटो निघाला. मग फोटो काढणारीनं बहिणीला मोबाइल देत ‘माझा.. माझा’ म्हणत काही मत्रिणींसोबत फोटो काढला. घरातल्या बायका कौतुकानं बघत होत्या. ‘येतो शेटजी-’ म्हणत दोघं बाहेर पडले तेव्हा बाहेरही एक घोळका जमला होता.
सगळे मोठय़ा अप्रुपानं त्यांना पाहत होते. दोघं घराला वळसा घालत टेम्पोपर्यंत आले तरी माणसं मागे येतच होती. धना टेम्पोत चढला तसा एकानं हात मिळवला. मग दुसऱ्यानं. मग तिसऱ्यानं. टेम्पो सुरू होईपर्यंत धनाचा हात कुणी कुणी हातात घेत राहिलं. दाबत राहिलं. टेम्पो पुढं गेला तसा धना सुटला. हे सगळं होत असताना धनाच्या हृदयात अनामिक गुदगुल्या होत राहिल्या. नाटकात काम करताना टाळ्या पडल्या की जसं होतं, त्याहीपेक्षा काहीतरी वेगळं, विलक्षण असं त्याला वाटत राहिलं. तो काहीसा उत्तेजित झाल्याचंही त्याला जाणवलं.
‘नाऱ्या, माणसं ओळखाय लागली की रे आपल्याला. मायला, या तालुक्याच्या गावात दरसाली नाटकाचे खेळ केले आपण; पण यकदा तरी मार्केटमध्ये कुणी ओळख दाखवली का?’
नाऱ्याही चांगलाच फुलला होता.
टेम्पो ठरलेल्या जागी आला. चहासाठी म्हणून धना- नाऱ्या उतरले तेव्हा त्यांना ज्युनिअर कॉलेजच्या पोरांचा घोळका दिसला. त्यांनी नरेश, सुरेश, कुम्या सगळ्यांना गराडाच घातला होता. शेकहॅण्ड होत होते. त्या पोरांच्या चेहऱ्यावर एक वेगळाच उत्साह दिसत होता. मोबाइलवर फोटो घेतले जात होते. आणि एकानं पाहिलं- धना टेम्पोजवळ उभा.
‘ए, धनंजय.. धनंजय..’ म्हणत तो धनाच्या दिशेने धावला. मग सगळेच धनावर जवळजवळ पुराच्या लाटेसारखे झेपावले. आणि धना त्या लाटेत गडप झाल्यासारखा दिसेनासा झाला. तेव्हा चहापाण्याचा बेत रद्द करत धना म्हणाला, ‘नाऱ्या चला रे, बसा.’ आणि मग त्या पोरांच्या कचाटय़ातून सुटका करून घेत, हसत त्यांचा हात हलवून निरोप घेत धनानं टेम्पो सुरू करायला सांगितलं, आणि टेम्पो यमलाईवाडीकडे धावू लागला.
‘आगं बाबौ..’ विष्ण्या आपल्या चुरगळलेल्या बाहय़ा ठीक करत म्हणाला. सगळ्यांनाच घाम आला होता. हाताची बोटं दुखल्यागत झाली होती. अचानक नरेश किंचाळला, ‘हसन्या, फोद्रीच्या हीरो झालास की तू.’ आणि अचानक मिळालेल्या या नव्या ओळखीच्या जाणिवेनं सगळेच आनंदून गेले.
‘ हेऽऽऽऽऽ हुईक हुईकऽऽऽऽ’ असे निर्थक स्वर काढत सगळ्यांनी मनातल्या उत्तेजनेला वाट करून दिली. टेम्पोलाही जणू या नव्या जाणिवेचा वारा लागला होता. तो जोमानं धावत राहिला. वाट मागे पडत राहिली. मंडळी गावात पोहोचली तेव्हा रात्रीचे सात वाजत होते.
सेटवर दुपारीच काम संपवून सुटी दिली गेली होती. टेम्पो नाऱ्याच्या दुकानाजवळ आला तेव्हा धना उतरला. ‘आरं मर्दानू, जातो रं.’
‘का? बसत नाहीस व्हय रं?’ नरेशच्या ‘बसणं’ शब्दाला एक अर्थ होता.
‘नगो. आज नगो-’ म्हणत धना जाऊ लागला. बाकीच्यांना बसायचं होतंच. त्यांच्यात इशारे झाले आणि नाऱ्या, विष्ण्यानं ‘सामान टाकतो न् येतो-’ म्हणत सामान उचलायला सुरुवात केली.
धना घराकडे जाऊ लागला. ‘मेलो तरी कायतरी करून मेलो म्हणेल जग..’ त्याचं मन त्याला सांगू लागलं. ‘नुसता कीडा-मुंग्यासारखा नाय मेला तुझा लेक आये.’ त्याला त्याच्या निर्णयाचं समाधान वाटत राहिलं. मधेच देवळातल्या घंटांचा आवाज आला तसा तो थबकला. नकळत त्याचे हात जोडले गेले. देवळात आरती सुरू झाली होती. ‘देवा दानोबा, आई यमलाई..’ असं काहीसं पुटपुटत त्याला हुंदकाच फुटला. एका रात्रीत मिळालेल्या या प्रसिद्धीची कृतज्ञता त्याच्या डोळ्यांवाटे वाहत होती.

‘चांगभलं..’ म्हणत नाऱ्यानं ग्लास उचलला तसा सगळ्यांनीच ग्लास उचलून त्याला प्रतिसाद दिला. ग्लास स्टीलचेच असले तरी आतली बाई अंग्रेजी होती. तालुक्याहून येताना पक्या ती सोय करून आला होता. म्हाताऱ्या बाबूच्या गोठय़ामागं सगळी कंपनी जमली होती. गोठा सेटच्या जवळ होता. त्यामुळं अधूनमधून त्याच्या म्हशींनाही शूटिंगवाले सेटवर उभे करत होते.
‘मायला, हय़ा रमची मजाच यगळी राव. डोस्क्यातच जाती पहिल्या छूटला-’ बाबू म्हणाला.
‘मायला, बाबूला आता रमशिवाय काय चालत न्हायी. त्याची म्हसबी कमवाय लागलीया पसं.’ बाबूसकट सगळे हसले.
‘तर ही रमाबाई लय लाडकी बरं का हय़ा शूटिंगवाल्यांची.’
‘मारा चार चार पेग आनी व्हा बाजीराव तिच्या मायला..’ म्हणत म्हाताऱ्या बाबूनं ग्लास रिकामा केला.
‘बाबू, दमानं घे.’ पक्यानं म्हटलं, तसे सगळे हसले.
‘काय पोरं फोटू काडून घेत होती राव-’ सुरेश म्हणाला.
‘तर- मला तर कालीजातल्या पोरांनी ठँक्यू दिला,’ कुम्या म्हणाला, तसे बाबूचे डोळे पांढरे झाले.
‘खरं का काय मर्दानू?’
‘तर! म्हाताऱ्या, ठँक्यू द्यून द्यून हाताची बोटं ढिली झाली.’
‘आता राव कुटं बी गेलं तरी मानसं आशीच मागं लागनार.’
‘तर म्हनून म्हंतो बाईक घ्याची. दबात फिरायचं त्यांच्या म्होरं.’
‘तर! आसं सदरा-पँट घालून फिरलो तर आपल्याला शानी म्हनतील का खुळी? काय नाय, उद्याच बाईकचं पसं भरतो.’ दुपारच्या प्रसिद्धीची झिंग त्यांच्या डोक्यात शिरली होतीच; त्यात ही रमाबाई! हसन्यानं तर आता निर्णयच घेतला. इतक्यात त्यांनी पाहिलं- प्रॉडक्शन मॅनेजर गुप्ता येत होता. ‘या गुफ्ताजी या-’ म्हणत सगळे उठले.
‘अरे, बठो बठो..’ म्हणत त्यानं बठक मारली आणि खिशातून त्याची रमाबाई काढली. ‘बसायला जागाच शोधत होतो. कैसा चल रहा है? चंगे?’ त्यानं कुठल्याशा भारी सिगरेटचा धूरही सोडला.
‘सर, अच्चा चल रहा है-’ म्हणत हसन्यानं तालुक्यातली हकिकत सांगितली. गुप्ताच्या चेहऱ्यावरची रेषही हलली नाही. काही वेळ नुसता धूर सोडल्यावर तो म्हणाला, ‘भाई लोग, यह तो ट्रेलर है. आगे आगे देखते जाओ. शहरात हे बडे बडे पोस्टर्स लागलेत तुमचे. महिनाभर थांबा, मग शहरात गेल्यावर नुसते शेकहॅण्ड करायचे पसे मोजाल.’
‘म्हंजी?’ सगळ्यांचेच चेहरे विस्फारले गेले.
मग व्यवस्थित पॉज घेत गुप्ता बोलू लागला, ‘भया, यह सब पसों का और ग्लॅमरचा खेळ आहे. नाव कमवा, नावातून पसा करा. आणि पसेवाले झालात, की अजून नाव मिळेल. अरे, मैं तब से टीवी कर रहा हूँ, जब तेरा- तेरा एपिसोड की सीरियल्स आती थी. तो हा नट..’ म्हणत त्यानं दोन बडी नावं घेतली- ‘रिक्षातून काम मागत फिरायचा. आता बीएमडब्ल्यूतनं पोराला शाळेत सोडतो. ती ही नटी- लोकसभेत गेली आता. पण नाइंटी फोरला मी तिचे फोटो घेऊन चार प्रोडय़ुसर्सकडे दाखवले होते. बॉस, हा टीव्ही दिसतो छोटासा खोकडा, पण याची ताकद मोठी आहे. साला माणसाला कुठून कुठे नेईल, सांगता येत नाही.’ गुप्तानं बसल्या बसल्या तीन पेग मारलेसुद्धा. ‘अब खेतीबाडी भूल जाओ. या सीरियलनंतर रांगा लागतील तुमच्या दारात. अॅड करो. पिक्चर्स करो. फावडं लावा, फावडं. कमवा. या खोकडय़ात कुणी कधी स्टार बनेल, सांगता येत नाही. ही सीरियल संपेल वर्षभरात- पण तुमची कामं संपणार नाहीत.’ गुप्ता पिणं संपवून ‘चलो. गुड नाइट-’ म्हणत उठलासुद्धा.
पण या सगळ्यांच्याच नजरेत एक चतन्य दिसू लागलं होतं. काहीतरी घडतंय, आयुष्य बदलतंय, अशी भावना होती. रमाबाईच्या बाटल्या रिकाम्या होऊ लागल्या.
मंडळी आयुष्यात आलेल्या या नव्या अनुभवानं खरं तर भंजाळून गेली होती. त्यांच्या आखीवरेखीव आयुष्यात काही भलतंच घडत होतं. जे जग त्यांनी नुसतं ऐकलं होतं, सिनेमात पाहिलं होतं- आज अचानक त्यांच्या जगाशी येऊन भिडलं होतं. त्यांच्या जगात त्यानं शिरकाव केला होता. त्यांचं सोपं-साधं जग घुसळून निघालं होतं. पोटापुरतं कमावणाऱ्या आणि आयुष्याकडून फार काही अपेक्षा नसणाऱ्यांच्या आयुष्यात अचानक काहीतरी घडू लागलं होतं. आणि या बदलाचे रंग गावात दिसू लागले होते..