परत भारतात येणे हा निर्णय माझ्या बाबतीत म्हणायचं तर तसा अंगावरच आला. स्पिट्र टेलिकॉममधला प्रोजेक्ट संपला होता. माझ्या व्हिसाची मुदतही संपत आली होती. माझी कंपनी ग्रीन कार्ड करायला तयार होती, पण पुन्हा नवीन प्रोजेक्ट शोधायचा कंटाळा आला होता. आणि ग्रीन कार्डची पद्धत खूपच जाचक नि लांबलचक- अगदी गुलामगिरीसारखीच. त्यातून माझं स्वत्व डोकं वर काढत होतं. आपण चांगले आयआयटीमधून पदवीधर आहोत.. असं काय मरण ओढवणार आहे अगदी ! थोडीशी तरुणाईही फुरफुरत होती- लाथ मारू तिथे पाणी काढू. मात्र, या सगळ्यापेक्षाही एक स्वार्थी हेतू होताच, तो म्हणजे अगदी स्वत:पुरता जगण्यापेक्षा थोडं  काहीतरी सामाजिक काम करत जगता येईल का, हे बघण्याचा. भांडवलशाही यशोगाथांपेक्षा अनिल अवचट, पुलं आणि जयंत नारळीकर इत्यादी नॉन-कॅपिटॅलिस्ट उदाहरणांचा मोह पडत होता. नुसता पसा मिळाला की पाया नसलेली व्यक्तित्वं आपल्या इथे तयार होतात, हे बघितलं होतं.. कुठेतरी भाबडी आशा वाटत होती की, आपणही प्रयत्न केला तर काहीतरी छान करू शकू. एक हक्काचं घर असलं की झालं. मग माझं स्वातंत्र्य मला मिळेल. हप्ताविरहित आयुष्याचा मोह खुणावत होता. थोडंसं आयुष्य १ीु३ करण्याचा. अर्थात पुनश्च: हरि ओम् करावंसं वाटत होतं. माझं पुणे विद्यापीठातील रम्य बालपण मला खुणावत होतं. तेच माझं
शांतीनिकेतन होणार होतं. थोडक्यात, नशीब काढायला पुन्हा भारतात परतलो, असं म्हटलं तर चूक ठरू नये! ‘एनसीएल’चे माशेलकर, त्यांच्या रेडिओवरील मुलाखतीमध्ये अमेरिकेच्या पंचलाइनचं उदाहरण देत होते- ‘अमेरिकेला संधींची भूमी’ असं म्हटलं जातं. मग भारताबद्दल असं काय वाक्य बनू शकेल, असं ते श्रोत्यांना विचारत होते. माझ्या दृष्टीने भारत ही ‘शक्यतांची भूमी’ आहे. त्यामुळे एकूणच ‘क्वान्टम मेकॅनिक्स’ माझ्या अंगावर आदळणार, हे आडाखे मनाशी बांधले आणि परतीचा प्रवास सुरू केला.
परत आल्यानंतरचा माझा प्रवास हा करुणा, शोध आणि मग उद्वेग या टप्प्यांमध्ये विभागता येईल. सगळेच चुकीचं करतायत आणि सगळेच बरोबर करतायत, या दोन िबदूंमध्ये पकडलेल्या दोरीवर हा प्रवास चालू होता.. आहे. माझा एक मित्र म्हणतोच- लाइफ गोज ऑन! पण मग वयानं मोठं होणं याला काही अर्थ आहे का? आधीची स्वप्नावस्था हळूहळू ओघळून पडत होती. खऱ्या जगाची ओळख मी माझ्या पायावर उभं राहायचा प्रयत्न करताना वेगळीच होऊन राहत होती. आणि माझी रम्य स्वप्नं ही ‘युटोपिअन’ जगात विरून जाऊ लागली होती. टागोरसुद्धा जमीनदार वाटू लागले. जगद्विख्यात गायिका हॉटेल आणि हॉस्पिटलची व्यावसायिक वाटू लागली. माणसाचा तळ शोधू लागलो.. कार्ल मार्क्‍स वगरे पटू लागले. सगळंच अर्थकारणाशी निगडित आहे असं वाटत राहिलं. आणि ज्याच्यापासून दूर जायचा प्रयत्न करत होतो, ते बूमरॅंग होऊन माझ्यावर आपटू लागलं.
करुणेच्या आवर्तनामध्ये भोवताली दु:ख दिसत होतं, किंवा मी ते शोधत होतो, उकरत होतो. एक सामान्य माणूस बनायचा आणि माझ्या लहानशा अस्तित्वाशी प्रामाणिक राहण्याचा माझा आटोकाट प्रयत्न होता. त्याचबरोबर इथल्या तथाकथित प्रतिष्ठित लोकांचंही हसू येत होतं. सगळे एका बंदिस्त जगात बंदिस्त आयुष्य जगत होते आणि मी मात्र गोष्टींकडे मुक्तपणे बघण्याच्या प्रयत्नात होतो. गो. नीं.चा ‘पवनाकाठचा धोंडी’ मोह घालत होता! ‘अ‍ॅलिस इन वंडरलँड’चे जी.ए कुलकर्णीचं स्पष्टीकरण डोळ्यासमोर दिसत होतं. ‘कळणे’ याचा अर्थ कळू लागला होता जणू काही. पुणे विद्यापीठात चक्कर टाकली की ‘रिप व्ॉन विन्कल’ सारखे वाटायचे. मागे वळून बघितले तर हा तसा सुंदर काळ. त्या काळात सगळ्या प्रातिनिधिक बंधनातून मुक्तता होती- कदाचित वित्तीय स्वातंत्र्यामुळे असेल! पण टागोरांसारखी जमीन घेता येत नव्हती. मनात आलं की पुणे विद्यापीठातील फेरफटका ती उणीव भरून काढत होती. खरं तर  बदलाचं खूळ ओबामांच्या आधीच डोक्यात डोकावलं होतं. एकीकडे वाटायचं की, सगळे सवंगडी एकत्र आले तर भारत पालटून टाकू शकू. आर्किमिडिजने म्हटल्यासारखं, एक टेकू हवा होता. जो हप्त्यांपासून सुटका झाल्याने मिळाला, असे वाटत होते. अमेरिकेतील बँकेचा हप्ता आणि इथला हप्ता या दोन्हीपासून सुटका तर होतीच. इथे राहिलेल्या मित्रांच्या आयुष्यरेषा खूपच प्रकाश टाकणाऱ्या होत्या. आइन्स्टाईनच्या  सापेक्षता सिद्धान्तासारखा माझा सामाजिकतेचा सापेक्ष सिद्धान्त तयार होत होता. दोन  व्यवस्थेमधील शाश्वतता शोधणे म्हणजेच ज्ञानी माणूस, असं वाटून राहिलं. यामध्ये मग सुराज्य कसे असायला हवे, याचे आडाखे बांधले जात होते. खरं तर हे सगळं लहान तोंडी मोठा घास आहे, हेही जाणवत होते. पण विक्रमादित्याच्या वेताळासारखा मीही हट्ट सोडायला तयार नव्हतो. या सगळ्यासाठी इंजिनीअरिंगमधल्या प्रोटो-टाईप या संकल्पनेचा वापर करून माझ्या गृहनिर्माण वसाहतीलाच लक्ष्य केले आणि िवचुर्णीचे धडे अगदी घरबसल्या मिळाले. शिवाय भारतीय अर्थरचनेत बसण्यासाठी अमेरिकन कंपन्यांचे काम करण्यापेक्षा चक्क बेकरी चालवून पाहिली. मराठी माणसाची बेकरी, मराठी माणसाचे दुकान आणि मीही मराठी! हे करताना बरेच मनोरंजक अनुभव आले. एकदा नगरपरिषदेचे दोन गृहस्थ आले. मला वाटलं की, आता नोंदणीचे कागद मागणार. पण तसं न होता त्यांनी काही पदार्थ घेतले आणि त्यांचं लक्ष मी ठेवलेल्या पुस्तकांकडे गेलं. त्या पुस्तकांमध्ये एका प्रतिष्ठित राजकीय व्यक्तीचे आत्मचरित्र होते. त्यांनी ते पुस्तक मागितल्यावर मी ते देऊन टाकले नि आश्चर्य म्हणजे ते त्यांनी वाचून परत आणूनही दिले. असे अनुभव अपवाद म्हणून न येता नेहमीच यावेत! अशा छोटय़ा-मोठय़ा अनुभवांतून कळत-नकळत सुराज्यासाठी काय काय करावे लागेल, याच्या संकल्पना बांधू लागलो. माझ्या दहा मागण्या तयार होऊ लागल्या. उत्तम रस्ते हवेत, थुंकण्यावर बंदी हवी, उघडय़ावर उरकल्या जाणाऱ्या प्रातर्विधीवर बंदी आणा, अशा माझ्या माफक मागण्या २०२० साठी मला डॉ. अब्दुल कलामांना पाठवायच्या आहेत. या प्रसिद्ध लोकांचं फार विचित्र असतं. त्यांना साधं उद्दिष्ट चालत नाही. आंतरराष्ट्रीय परिषदेत ते मांडता येत नाही ना!
या सगळ्या चक्रामध्ये जग बदलत होतंच. इंटरनेटवर प्रसिद्ध विद्यापीठे अभ्यासक्रम ऑफर करत होते. त्यात सामाजिकशास्त्राचा एक अभ्यासक्रम पूर्ण केला आणि एथ्नोसेन्ट्रिझम (ी३ँल्लूील्ल३१्र२े) संकल्पनेने मोहिनी घातली. थोडक्यात, माझी अवस्था ‘एआरसीडी- अमेरिका रिटन्र्ड कन्फ्युज्ड देसी’ अशी होऊन राहिली.
करुणेची पुढची नसíगक पायरी म्हणजे शोध! तो सुरू झाला. आणि मग  इतर अनेक विश्वं दिसू लागली. एकाच स्थळ-काळामध्ये अनेक विश्वं सामावून जातात, हे पदार्थविज्ञानशास्त्राने खरं तर सामाजिक शास्त्रांकडून शिकावे. प्रत्येकाचं जगणं हा माझ्या कुतूहलाचा विषय झाला. विज्ञानाकडून अध्यात्माचा शोध सुरू झाला. शेवटी आपल्याला जे दिसतं, ते निवडता येत नाही. गांधीजींची तीन माकडं सत्यात उतरवता येत नाहीत. सगळ्यांना चांगलं जगावं असं वाटत नाही का, असं राहून राहून वाटू लागलं. आणि मग लोकशाहीचं भकास रूप दिसू लागलं. चांगले लोक कसे निरुपयोगी होऊन राहतात आणि टगे कसे टवटवीत होतायत, हे वारंवार दिसू लागलं. जमीनदारी अजून संपली नाही, हेच सत्य. लोकशाही आणि भांडवलशाही या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत, याचा प्रत्यय येत राहिला. एकच नगरसेवक, त्याचाच पेट्रोल पंप नि त्याचाच मॉल! माझा एक मित्र नेहमी म्हणत असतो की, प्रदीर्घ कालावधीनंतर गोष्टी बरोबर होत असतात. अल्पावधीत याचंही काही वाटेनासं झालं.
माझ्या दोन आयआयटी मित्रांचं उदाहरण सांगतो. एक उद्योगनगरीत आयुष्य काढलेला. दुसराही तिथलाच पण अमेरिकेतून परत येऊन मग पुण्यात स्थायिक झालेला. त्याची मोठी कंपनी वगैरे वगैरे.. त्याने स्वत:च्या पायावर उभी राहायची खटपट पहिल्यापासून चालवली. इमेज डेटाबेसमध्ये ठेवण्यासाठी क्लृप्ती शोधणारा तो पहिलाच असावा. छोटा स्टीव्ह जॉब्सच म्हणा की! दुसरा नि मी गप्पा मारताना विषय निघाला की, पहिला अजून मोठा व्हायला हवा होता. त्यावर दुसरा म्हणाला की, तो लोकांना करिअर देऊ शकत नव्हता. मी जरासा चकित झालो. करिअर म्हणजे काय? इन्फोसिस देतं ते करिअर का ? म्हणजे थोडक्यात, जगण्यासाठी पसे, मग तत्त्वत: ते स्वस्त मजुरीचे कंत्राट का असेना! मग मी (विश्राम बेडेकरांच्या भाषेत –  ‘याने’) स्वस्त मजुरीची कंत्राटं घेऊन कामे केली. तोही अनुभव झाला. पण या सगळ्यात आयआयटीयन्स मी इथे आकृष्ट करू शकलो तर बदल घडवता येईल, या भ्रमाचा भोपळा फुटला. या दुष्टचक्रातून सुटण्यासाठी सरकारी वैज्ञानिकांबरोबर काम करण्याचा प्रयत्न करून झाला. एकंदरीत सरकारी वैज्ञानिक संस्थांमध्ये बिल्डर लोकांचं भलं होतं असं जाणवलं. पर्यावरणासंदर्भात काम करणाऱ्या संस्थेने स्वत:ची पॉवर केबल टाकण्यासाठी चांगल्या पादचारी मार्गाची आणि सायकल मार्गाची विल्हेवाट लावलेली पाहून तीळपापड झाला. एकंदर ‘आहे मनोहर परी, गमते उदास’ असंच वाटत होतं. या सगळ्या जगण्याच्या गोंधळात माझा स्वत:चा शोध सुरूच होता नि त्याला वेगवेगळी वळणे लागत होती. मग त्यातून वाटय़ाला आला उद्वेग आणि थोडीशी निराशा! थोडं वयं मोठ्ठं खोटं वाटून राहिलं. एक प्रसंग मनावर कोरला गेला. एकदा बसस्टॉपवर एक सद्गृहस्थ दिसले. बऱ्याचदा नजरभेट व्हायची. ही चांगली संधी आहे, म्हणून त्यांना  राइड ऑफर केली (लिफ्ट नाही.) ती पाच मिनिटांची सफर चटका लावून गेली. १९८० च्या आसपास हे गृहस्थ ग्रीन कार्डचा मोह सोडून अमेरिकेहून परत आले.  इथे खूप काही प्रयत्न केले, पण सगळीकडेच निराशा पदरी पडली,  म्हणजे यांनाही िवचुर्णीचे धडे! खूप चटका लावून गेला तो प्रसंग. सरळमार्गी लोकांचं काय होतं, याचं जिवंत उदाहरण मिळालं. विवेकानंद म्हणून गेले तसं जग हे कुत्र्याच्या शेपटीसारखं वाकडंच राहणार असं वाटू लागलं. आणि मग माझ्या एका पदार्थविज्ञानशास्त्रज्ञ मित्राचं वाक्य पटू लागलं की, जीवन हे एक शून्य आहे! त्यात फिरत राहायचं.. नि मग मी परत सॉफ्टवेअरकडे बघू लागलो नि माझी लोहचुंबक सुई पुन्हा उत्तर-दक्षिण पहिल्यासारखी दाखवत राहिली. पण तोपर्यंत खूप पाणी वाहून गेलं होतं!  शेवटी मध्यमवर्गीय सरडय़ाची धाव काही आíथक कुंपणाच्या बाहेर पडणार नाही, ही खूणगाठ बांधली आणि घेतला वसा सफल संपूर्ण.. असे स्वत:चे समाधान करून घेऊन आमची स्वारी मार्गस्थ झाली!
आयटीमुळे केल्याने देशाटन झाले.. थोडासा परिसस्पर्श झाला, माझ्यासारख्या सामान्य व्यक्तीला. त्यामुळे थोडासा नारद होऊन फिरता आलं. त्यातून जे काही दिसलं, त्यात दुसरी काळी बाजूच जास्त दिसली. मी स्वत:ही कळत-नकळत जे काही करत गेलो, त्याकडे सूक्ष्मपणे बघितलं. आपली स्वत:ची वाट शोधण्याचा निखळ आनंद मिळाला, हेच सर्वात महत्त्वाचं! दोन व्यवस्थांमध्ये मग शेवटी  शाश्वत ते काय? कदाचित पसा! पण त्याचीही दोन अंगे आहेत- असणे आणि नसणे. भौतिकशास्त्रीय मूलकण जसे फिरताना वर आणि खाली होत असतात, तसेच. पण या दोन अंगांमुळे दोन्ही व्यवस्थांमध्ये काळे आणि पांढरे  हे इशरच्या पक्ष्यांच्या चित्राप्रमाणे चपखल बसलेले असते. हेच शाश्वत सत्य असावे.