25 February 2020

News Flash

‘रंगायन’चे दिवस

‘रंगायन’ नाटय़-चळवळीचे प्रारंभापासूनचे शिलेदार आणि पुढे ‘आविष्कार’ संस्थेच्या माध्यमातून गेली ५० वर्षे समांतर नाटय़धारेचे संगोपन, संवर्धन आणि जतन करण्यासाठी अक्षरश: जिवाचे रान करणारे ध्यासपर्व म्हणजे

| March 5, 2014 05:56 am

‘रंगायन’ नाटय़-चळवळीचे प्रारंभापासूनचे शिलेदार आणि पुढे ‘आविष्कार’ संस्थेच्या माध्यमातून गेली ५० वर्षे समांतर नाटय़धारेचे संगोपन, संवर्धन आणि जतन करण्यासाठी अक्षरश: जिवाचे रान करणारे ध्यासपर्व म्हणजे अरुण काकडे! नाटय़संमेलनाचे अध्यक्ष म्हणून त्यांची नुकतीच निवड झाली आहे. आपल्या या प्रदीर्घ प्रवासावर त्यांनी टाकलेला दृष्टिक्षेप..
१९६३ साली ‘रंगायन’ची दोन नाटकं रंगभूमीवर आली. शिवाय आधीचे एकांकिकेचे प्रयोगही सुरू होते. तेंडुलकरांची दोन नाटकं ‘मी जिंकलो, मी हरलो’ आणि ‘कावळ्यांची शाळा’! तेंडुलकर ‘रंगायन’चे हक्काचे नाटककार. पण त्यांचं नाटक करण्याचा निर्णय उच्च पातळीवर व्हायचा आणि ते करायचं ठरल्यावर आम्हाला कळायचं. ते कळताच आम्ही कलाकार, कार्यकत्रे कंबर कसून कामाला लागायचो. त्याप्रमाणे ‘मी जिंकलो, मी हरलो’ नाटकातील कलाकारांची निवड झाली. डॉ. लागू ‘मादी’पासून ‘रंगायन’मध्ये काम करत होतेच. त्यांचीच निवड मुख्य भूमिकेसाठी झाली, हे ओघानं आलंच. नायकाच्या पत्नीच्या भूमिकेसाठी स्वत: विजयाबाई. शिवाय दत्ता भट, मनुताई केंकरे, राजा बापट, जयश्री बांगर व आम्ही छोटय़ा छोटय़ा भूमिकांसाठी. आश्चर्य म्हणजे यातल्या नायकाच्या गायक-मित्राच्या भूमिकेसाठी प्रथमच सुप्रसिद्ध गायक वसंतराव देशपांडे असणार होते. बहुतेक ते प्रथमच नाटकात काम करणार होते आणि सर्वाना आश्चर्याचा सुखद धक्का देणार होते. नाटकाचं नेपथ्य असणार होतं राम शितूत यांचं.
नाटकाचा केंद्रिबदू म्हणजे त्यातील नायक माधव. त्याच्याभोवती हे नाटक फिरत राहते. माधवने नाटकांतून कामं करू नयेत, नोकरी करावी म्हणून सासरे नोकरीतील बढतीसाठी प्रयत्नात आहेत. त्यासाठी त्यांनी एका उच्चपदस्थाशी बोलणी करण्याकरिता त्यांना घरी बोलावले आहे. त्याच दिवशी नेमका माधवच्या नवीन नाटकाचा शुभारंभाचा प्रयोग आहे. प्रयोग अतिशय यशस्वी ठरलाय. त्या धुंदीत ठरल्या वेळी माधव घरी येत नाही. त्यामुळे संघर्षांची ठिणगी पडते. माधवचं अभिनंदन करण्यासाठी त्याचा मित्र गायक-नट शेख्या घरी आलेला आहे. घरातलं वातावरण तणावग्रस्त आहे. नाटकातलं काम चांगलं झालं म्हणून शेखर माधवचं अभिनंदन करतो. यशाच्या धुंदीत माधव बोलून जातो : ‘मी खर्डेघाशी करायला जन्माला नाही आलो. माझा आत्मा मला सापडलाय. मी नोकरी सोडणार आहे. रंगभूमी हाच माझा व्यवसाय असणार आहे.’ संसार आणि नाटक हा या संघर्षांचा मूळ गाभा. नाटकांमागून नाटकं, त्यांचे प्रयोग, दौरे, त्यातील नायकांचे अनुभव.. घरी गरोदर अनू.. दारिद्रय़.. तशात नाटकातील कुणा स्त्रीकलाकाराबरोबरच्या त्याच्या ‘संबंधा’बद्दल गरसमज पसरल्याने, घरातील आíथक ओढाताणीमुळे अनू आणि माधव यांचं भांडण विकोपाला जातं. त्या आवेगात माधव ‘नाटक सोडलं’ म्हणून सांगून जातो. पण..
नंतर त्यानं माध्यम बदललंय. त्याचं चित्रपटातील विनोदी काम सर्वाना आवडलंय. सत्कार सोहळे चाललेत. घरी आनंदी आनंद आहे. पसा, प्रसिद्धी, गाडी, बंगला यांचं स्वप्नरंजन चाललंय. अन् नायकाच्या मनात द्वंद्व सुरू झालंय. कुठं जायचं होतं आणि कुठं आलोय? आपण हरलो आहोत याची जाणीव होते. घरच्यांना वाटतं- आपण जिंकलो!
डॉ. लागू रविवारी पुण्याहून आले की सबंध दिवस तालमी व्हायच्या. एरवी रोज संध्याकाळी डॉक्टर ज्यात नसतील अशा प्रसंगांच्या तालमी व्हायच्या. दत्ता भट त्यावेळी खादी ग्रामोद्योग संस्थेत कामाला होते. त्यांचं ऑफिस इरला येथे- म्हणजे विलेपाल्रे पश्चिम भागात. ते ऑफिस संपवून भुलाभाई इन्स्टिटय़ूटला यायचे. मीही ऑफिसमधून यायचो. भट थकलेले असायचे. बरोबर डबा आणलेला असायचा. मला बोलवायचे. ‘काकडे, ये. थोडं खाऊ. तरतरी येईल.’ डब्यात कधी त्यांची आवडती बाजरीची भाकरी अन् ठेचा असायचा. आम्ही आवडीने खायचो. रविवारच्या तालमीसाठी कधी विजयाबाईंच्या घरून, कधी माझ्या घरून डबा यायचा. प्रभा (माझी बायको) घेऊन यायची. आम्हाला बाहेर हॉटेलात कपभर चहा घेणंदेखील तेव्हा परवडायचं नाही; खाणं तर दूरच. मात्र, एकदा सर्वजण तालमीला उभे राहिले की तहानभूक हरपलेली असायची. वसंतराव देशपांडेही पुण्याहून यायचे.
ओघात दोन महान कलाकारांविषयी लिहिलं पाहिजे. दोघांनीही रंगायनच्या नाटकांतून कामं केली. विनामोबदला. मामा पेंडसे यांनी ‘यशोदा’ नाटकात भूमिका साकारली. तर वसंतराव देशपांडे यांनी ‘मी जिंकलो, मी हरलो’मध्ये. तालमींना, प्रयोगांना येण्यासाठी म्हणून मी काही पसे त्यांना आगाऊ दिलेले असायचे. त्याचा चोख हिशेब त्यांनी ठेवलेला असायचा. अगदी रुपये-आणे-पचा. तो खर्चाचा कागद ते माझ्याकडे द्यायचे. एकदा तर गंमतच झाली. काही कारणाने वसंतराव हिशेब द्यायला विसरले असावेत. एके दिवशी शिवाजी मंदिरवरून मी शिवाजी पार्ककडे चाललो होतो, तर समोरून वसंतराव येताना दिसले. थांबलो. गप्पा मारत थोडा वेळ फूटपाथवरच उभे राहिलो. जरा वेळाने ते म्हणाले, ‘अरुणभया, हिशेब द्यायचा राहिलाय.’ त्यांनी खिशातून कागद काढला अन् केलेला खर्च टिपून ठेवलेला तो कागद मला दिला. ‘संस्थेचे हिशेब चोख असायला हवेत भया..’ ते म्हणाले. अशा ज्येष्ठ कलावंतांपुढे आपण नतमस्तक होतो.
आतापर्यंत रंगायनमध्ये नाटकाचे नेपथ्य बनवण्याकरता, प्रयोगात ते उभारण्याकरता स्वतंत्र अशी व्यवस्था नव्हती. ‘मी जिंकलो, मी हरलो’मध्ये नेपथ्य खूप महत्त्वाचं होतं. नाटकात वर्णन केल्याप्रमाणे तळमजला व वरच्या मजल्यावर जाण्याचा जिना हा महत्त्वाचा नेपथ्याचा भाग. राम शितूत हा रंगायनचा नेपथ्यकार, प्रकाशयोजनाकार, ध्वनिसंयोजक. एकदम हरहुन्नरी. ‘रंगायन’च्या वाटचालीत त्याचा महत्त्वाचा वाटा. मला सतत त्यावेळच्या व आत्ताच्या परिस्थितीची तुलना करायचा मोह होतोय. आजच्या नेपथ्यकारांना, तंत्रज्ञांना योग्य ती प्रसिद्धी मिळते. सन्मान मिळतो. राम शितूतच्या योगदानाचा मात्र कुठंच उल्लेख नाही. तेव्हा या बाबीचा स्वतंत्रपणे विचारच होत नसे. दुसरं म्हणजे नेपथ्य तयार करण्यासाठी आणि ते प्रत्येक प्रयोगाकरता नेण्या-आणण्यापासून ते लावणं-काढणं या सगळ्यासाठी बॅकस्टेज वर्कर्सची गरज भासू लागली. तेव्हा चौकशी केली. रघू पाटील भेटला. तो सगळी जबाबदारी सांभाळायला तयार झाला. रघू पाटीलने सेट तयार करून दिला. तिन्ही अंक बसवून झाले होते. सलग सेट लावून तालमी सुरू झाल्या. आम्ही सगळे कलाकार व कार्यकत्रे नाटकात मनापासून गुंतत चाललो होतो. तालमीत, प्रयोगात वसंतराव गायचे. तबला-पेटीविना. पहिल्या अंकात ‘बठी सोचे ब्रिज बावरी, नही आवत चन’ ही ठुमरी ते गायला लागले की वातावरण भारून जायचं. ती ऐकत राहावंसं वाटायचं. तालमीच्या वेळी सगळेच करडी शिस्त पाळायचे. एरवी थट्टामस्करी, हसतं-खेळतं वातावरण असायचं.
या नाटकाचा शुभारंभाचा प्रयोग मुंबईत नाही, तर नाशिकला विकास सिनेमा थिएटरमध्ये झाला. २० ऑक्टोबर १९६३ ला. प्रयोग संपला आणि आम्ही एकमेकांचं अभिनंदन करून आनंद व्यक्त करू लागलो. नाशिकचे पोट्र्रेट फोटोग्राफर व ‘होनाजी बाळा’ नाटकाचे दिग्दर्शक बाळासाहेब काळे आले होते. त्यांच्याशी विजयाबाईंनी चर्चाही केली. नाटक त्यांना आवडलं होतं. पण डॉक्टरांच्या बाबतीत त्यांनी वेगळं मत व्यक्त केलं. त्यामुळे आम्हाला बाळासाहेबांचा रागच आला. डॉक्टर त्या भूमिकेला योग्य नाहीत, असं त्यांचं म्हणणं. खरं तर डॉक्टरांच्या कामामुळे आम्ही सगळेच भारावून गेलो होतो. मग बाळासाहेबांनी असं का म्हणावं? त्यांच्या डोळ्यांसमोर शरद तळवलकर तर नसावा? अर्थात बाळासाहेबांचा तो अधिकार होता. प्रयोगाविषयी प्रेक्षकांची अनेक मतं असू शकतात. ज्याच्या-त्याच्या आवडीप्रमाणे.
मुंबईला आल्यानंतर मी प्रयोग लावण्याचा सपाटाच लावला. विजयाबाईंच्या म्हणण्यानुसार, सहा प्रयोग करून आपण थांबायला हवं. पण पहिल्यापासूनच मला हे पटत नव्हतं. आपली नाटय़कृती जास्तीत जास्त प्रेक्षकांपर्यंत पोहोचवणं आपलं कर्तव्य असायला हवं, आणि आपल्याकडं ती व्यवस्था नसेल तर ती उभी करायला हवी असं मला वाटत असे. अगदी ‘शितू’पासून मी हे करत आलो आहे. आज मागे वळून पाहताना वाटतं- इतकं यशस्वी नाटक ‘ससा आणि कासव’ फक्त सहा प्रयोगांत आम्ही थांबवलं असतं तर? तसंच ‘मी जिंकलो, मी हरलो’च्या बाबतीतही झालं असतं तर? अर्थात यावरून विजयाबाईंशी आमचे मतभेद असले तरी ते प्रामाणिक होते.
‘मी जिंकलो..’चे पुणे-मुंबई असे आम्ही प्रयोग सुरू ठेवले. मुंबईत साहित्य संघ, दर रविवारी सकाळी भारतीय विद्याभवन, दादरला त्यावेळी नाटय़गृह नव्हतं म्हणून मग बालमोहन विद्यामंदिरच्या पहिल्या मजल्यावरील छोटय़ा नाटय़गृहात, शिवाय दादर शिवाजी पार्क येथील ब्राह्मण साहाय्यक संघाच्या दुसऱ्या मजल्यावरील हॉलमध्ये आम्ही प्रयोग करत असू. या नाटकाच्या यशाची वार्ता महाराष्ट्रभर पसरली. अगदी नागपूपर्यंत. ती ऐकून नागपूरच्या धनवटे रंगमंदिरचे व्यवस्थापक भाऊ सप्रे यांचा निरोप घेऊन एक गृहस्थ डिसेंबरच्या पहिल्या आठवडय़ात रविवारी सकाळी विलेपाल्रे येथील रामानंद सोसायटीतील माझ्या घरी आले. पायांत झिजलेल्या चपला, लेंगा-शर्ट व काखेत शबनम बॅग. मी त्यांचं स्वागत केलं. थोडा वेळ ते बसले. मग म्हणाले, ‘मी बागडे. नागपूरचा. सप्रेसाहेबांचा निरोप घेऊन आलोय. ‘मी जिंकलो, मी हरलो’ या नाटकाचे प्रयोग नागपूरला व्हावेत. आणि विदर्भातील काही मोक्याच्या शहरांत!’
मग आम्ही दौऱ्याच्या आíथक बाबींवर सविस्तर चर्चा केली. इतक्या लांबचा पहिलाच दौरा असल्यामुळे मी खूश होतो. आíथक गणितं जुळवत होतो. सर्वाना विचारून आपण तारखा नक्की करू या, असं मी त्यांना म्हटलं. नागपूरला दोन, अकोला, अमरावती आणि अजून एक प्रयोग- असे पाच प्रयोग बागडे करू इच्छित होते. ‘रंगायन’ला त्यासाठी पदरमोड करावी लागणार नव्हती. सगळे प्रयोग कॉन्ट्रॅक्टचेच असणार होते. एवढं ठरवून बागडे नागपूरला निघून गेले. फेब्रुवारी १९६४ च्या दुसऱ्या आठवडय़ात प्रयोग होऊ शकत होते. तसं मी भाऊसाहेब सप्रेंना कळवलं. आता नागपूपर्यंत सेट व कलाकार या सर्वाना घेऊन कसं जायचं व परत आणायचं, हा महत्त्वाचा प्रश्न होता. आतासारख्या त्यावेळी नाटक कंपन्यांकडे बसेस नव्हत्या. मात्र एक बस होती- राष्ट्र सेवादलाची. सेवा दलाच्या कलापथकाच्या कार्यक्रमांसाठी प्रा. वसंत बापट यांनी ती तयार करून घेतली होती. मी चौकशी केली. बस मिळत होती. बसच्या कॅरिअरवर नाटकाचा सेट जाणार होता आणि आत कलाकार-तंत्रज्ञ. बसमध्ये अगदी पाठीमागे तिघांसाठी झोपण्याकरता तीन बर्थ होते.
दोन दिवसांनी दौऱ्यावर निघायचं म्हणून सकाळी मी भुलाभाईवर गेलो आणि धक्कादायक बातमी समजली. सुन्न झालो. तिथेच बसून राहिलो. मेंदू बधीर झाला. विजयाबाईंचे यजमान हरीन खोटे यांचा हार्ट अॅटॅकने अकाली मृत्यू झाला होता. आणि पुढचं दु:खद चित्र डोळ्यांसमोर दिसू लागलं. आजच्यासारखे मोबाइल नसल्यामुळं मी लगेच फाऊंटनला गेलो. तार ऑफिसात जाऊन पहिली तार नागपूरला सप्रे यांना केली. दौरा पुढं ढकलण्यात आला.
मी आणि अरिवद देशपांडे कुलाब्याला दुर्गाबाईंच्या घरी ‘गुलिस्तान’वर गेलो. तेंडुलकर, श्री. पु. भागवत आलेले होतेच. मी लांब उभं राहून नुसतं बघत होतो. बाईंना भेटायचं, बोलायचं धर्य माझ्यात नव्हतं. त्याचवेळी विचार करत होतो.. आता पुढं काय? स्वप्नातही घडू नये असं घडून गेलं होतं. श्री. पु., तेंडुलकर बाईंचं सांत्वन करत होते. पुढं काय, या प्रश्नाचं उत्तर तेव्हा तरी कुणाकडेच नव्हतं. अरिवदही अबोल झाला होता. त्यालाही काय बोलावं, कळत नव्हतं.
* * * 
ही घटना घडण्यापूर्वी ‘रंगायन’चं अजून एक नाटक ५ डिसेंबर ६३ ला राज्य नाटय़स्पध्रेच्या निमित्ताने रंगभूमीवर आलं होतं. तेंडुलकरांचं ‘कावळ्यांची शाळा’. दिग्दर्शन अर्थातच बाईंचं. नेपथ्य मात्र यावेळी बाबा पास्रेकर यांनी केलं होतं. हेच नाटक ‘गृहस्थ’ नावाने दामू केंकरे यांनी साहित्य संघाच्या नाटय़महोत्सवात ५५ साली केलं होतं. तालमीअभावी ते सपशेल आपटलं होतं. तेंडुलकरांनी नंतर त्याचं पुनल्रेखन केलं. विषय अगदी साधा. सी. ए. च्या शेवटच्या परीक्षेसाठी अभ्यासाला निवांत शांतता हवी म्हणून नायक आपल्या मित्राच्या घरी येतो; पण होतं उलटंच. शांत, निवांत वेळ मिळत नाहीच; सारखी कावकाव मात्र होत राहते. तेंडुलकरांनी अनेक प्रसंगांतून, व्यक्तिरेखांतून हा कावकावचा गदारोळ, कर्कश आवाज चारी बाजूंनी असा वाढवत नेलाय, की नायक बाळ्या ओरडून ओरडून ‘खामोश.. खामोश’ शांतता.. शांतता!’ असं कोकलतोय. पण या त्या गदारोळात त्याचा आवाज कुठल्या कुठं विरून जातो. आणि नाटकाचा शेवटचा पडदा पडतो. असं हे धमाल नाटक.
बाईंनी ते इतकं मस्त दिग्दíशत केलं होतं, की यंव रे यंव. नाटकाच्या तालमी भुलाभाईच्या हिरवळीवर व्हायच्या. कारण यातली पात्रांची बेसुमार गर्दी. लहान मुलं, मोठी, म्हातारी. आणि पाश्र्वसंगीतासाठी ढाणढाण वाजणारा शशांक लालचंद याचा ऑर्केस्ट्रा. सगळी पाश्चात्त्य वाद्यं. बाकीच्या वादकांची नावं आता आठवत नाहीत. मात्र, किरण शांतारामचं नाव आठवतं. परवा भेटला तेव्हा या नाटकाची आठवण काढली, तर म्हणाला, ‘काय मजा असे! त्यावेळेला तालमी करताना खूप मजा यायची.’ एखादा कलाकार चांगलं काम करायला लागला की बाईंना त्याचा लगेचच कळवळा यायचा. मग त्या मला हाक मारायच्या.. ‘अरुऽऽऽण’ हा ‘रुऽऽ’ दीर्घ झाला की आम्ही एकमेकांकडे बघायचो. ‘अरे, तो बघ किती दमलाय. त्याला जरा दूध दे रे.’ मी मग त्या तयारीला लागायचो. तर आमचा विजय दाते मला खडसवायचा- ‘काकडे, काही नको जाऊस.’ अन् मग बाईंना म्हणायचा, ‘आम्हीही सगळे इथं उन्हातच तालमी करतोय. तेही सगळे दमतायत. मग यालाच का दूध?’ विजय दाते फार परखड बोलायचा. सर्व कामं मात्र चोख करायचा. विशेषत: हिशेबाला चोख.
अशाच पद्धतीने तालमी होत होत्या. बाईंना वाटायचं- हा कमी पडतो. नीट जमत नाही. खूप कॉन्शस होतोय. मग बाईंची नारायण पला हाक- ‘नारायऽऽऽण.’ हा ‘य’ लांबला की नारायण हातातली अर्धी सिगारेट विझवायचा. आमची सर्वाची एकमेकांशी नेत्रपल्लवी व्हायची. नारायण हळूच डोळा घालायचा. ‘आयला, आज कुणावर तरी गदा आहे!’ मग ते काम नारायण त्या कलाकाराशी अगदी गोड गोड बोलून बिनबोभाट पार पाडायचा.
नाटकाचा पहिला प्रयोग प्रेक्षक सभासदांसाठी भारतीय विद्याभवनमध्ये होता. आम्ही सगळे जीव तोडून काम करत होतो. मधून मधून हशे येत होते. पण तालमीत जी मजा यायची बघणारांना, तसं काही प्रयोगात होत नव्हतं. आमचा प्रयोग तर चोख झाला. प्रत्येक प्रयोगानंतर आमचे हितचिंतक प्रेक्षक रंगपटात येऊन प्रयोगावर आपलं मत द्यायचे. चांगलं-वाईट. मात्र प्रामाणिकपणे. पण ‘कावळ्याच्या शाळे’च्या प्रयोगानंतर रंगपटात कुणीच फिरकलं नाही. बाई रागावल्या. ‘हे काय, कुणीच कसं नाही आलं आत रंगपटात नेहमीप्रमाणे?’ आम्ही आपले पाहत राहिलो आणि आवराआवरी सुरू केली.
पुढे स्पध्रेसाठी प्रयोग केला. तोही चांगला झाला. आणखी एक प्रयोग मी दादरला मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयाच्या तळमजल्यावरील ओपन एअर नाटय़गृहात केला. तिथे िवगेत जागा अपुरी. त्यामुळे वादकांना बसवायचं कुठं? शशांक लालचंद म्हणाला, ‘आम्ही वर मंडपाच्या बाजूला.. िवगांच्या वरच्या जागेत बसतो.’ जिथे उभे राहून पडदे सोडले जातात, वर घेतले जातात अशा जागी बसून, खाली प्रयोग सुरू आहे तो बघत त्यांनी चांगल्या प्रकारे वेळ निभावून नेली. त्यांना आणि आम्हालाही हा एक नवा अनुभव होता.
ीीी
आम्ही ‘गुलिस्तान’वरून परत आलो. दिवस कसातरी जायचा. पण संध्याकाळ झाली की भुलाभाईला जाऊन बसायचो. बसून परत यायचो. कधी अरिवदकडे जाऊन बसायचो. तोही सुन्न झाला होता. मग श्रीपुंना भेटायला ‘मौज’मध्ये जायचो. भेटायचे विष्णुपंत. श्रीपु गंभीर वाटायचे, तर विष्णुपंत मिश्कील. गेलो की स्वागत व्हायचं- ‘आले.. रंगायनवाले आले!’ धोतर, कोट व वर पांढरी टोपी. कधी कोट खुर्चीला अडकवलेला असायचा. समोर खुर्चीवर बसवून गप्पा मारायचे. मी काहीतरी कारण सांगायचो. ‘मौज’ साप्ताहिकात नाटकाचं परीक्षण आलेलं असेल तर ‘मौज’चा अंक मिळवायचा. मग काही छापायचं असेल तर प्रभाकरपंतांकडे जाऊन बसायचो. आमची छपाईची कामं सगळी प्रभाकरपंतांकडे असत. पांढराशुभ्र लेंगा-झब्बा. बाह्य़ा नेहमी दुमडलेल्या. आमचं कधी पत्रकं, तिकिटं असं काहीतरी काम असायचं त्यांच्याकडे. पण आता तसं काहीच काम नव्हतं. म्हणून मग नुसतंच त्यांच्या समोर जाऊन बसायचो. परीक्षा, कॉलेज यामुळं श्रीपु क्वचितच तिथे यायचे असं कळे. भेटले असते तर पुढं काय करायचं, हे मला त्यांना विचारायचं असे. पण एक महिना-दीड महिन्यात बाई सावरल्या. आम्हाला आनंद झाला. पुन्हा चतन्य संचारलं. ‘मी हरलो, मी जिंकलो’चे प्रयोग आम्ही पुन्हा सुरू केले. आणि पुन्हा माझी धावपळ सुरू झाली. सालये यांच्याकडे जाऊन जाहिराती देणं.. साहित्य संघात, रविवारी सकाळी भारतीय विद्याभवनात, कधी दादरला, पुण्याला- असा प्रयोग लावण्याचा मी पुन्हा सपाटा लावला.
नाटकाची रौप्यमहोत्सवी प्रयोगापर्यंत मजल गेली. बातमी सर्वत्र पसरली. त्यावेळी तेंडुलकर ‘मराठा’मध्ये उपसंपादक होते. आचार्य अत्रे यांना या प्रयोगाला बोलवावं असं आम्हाला वाटत होतं. तेंडुलकरांना तसं म्हणालो तर ‘या’ म्हणाले, ‘साहेबांची गाठ घालून देतो.’ मी निमंत्रण घेऊन गेलो. अत्र्यांच्या खोलीत सगळीकडे कपाटंच कपाटं. पुस्तकांनी भरलेली. मधे भलंमोठं टेबल. समोर खुच्र्या. मी त्यांना नाटकाला येण्याचं आमंत्रण दिलं. म्हणालो, ‘तेंडुलकरांच्या नाटकाचा रौप्यमहोत्सव आम्ही साजरा करतोय. आपण आलात तर आम्हाला खूप आनंद होईल.’ ‘प्रचंड’ असं आचार्य अत्रे यांचं वर्णन तेंडुलकरांनी केलेलं आहे. ते म्हणाले, ‘आम्ही ऐकलंय.. चांगली नाटकं लिहितो तो. जरूर येऊ.’
रविवारी सकाळी भारतीय विद्याभवनमध्ये आचार्य अत्रे येणार म्हणून मी बाहेर वाट पाहत उभा होतो. आणि खरोखरच ते आले. आपल्या ऑस्टिन कारमधून उतरले. सुटाबुटात. वर डोक्यावर नुसतीच ठेवलीय अशी वाटावी अशी फेल्ट हॅट. मी त्यांचं स्वागत केलं आणि पहिल्या रांगेत नेऊन त्यांना बसवलं. लगेच प्रयोग सुरू झाला. प्रयोग सुरू असताना प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया पाहायची माझी पहिल्यापासूनची सवय. (अद्यापपर्यंत ती कायम आहे.) माझी एन्ट्री तिसऱ्या अंकात. म्हणून मग मी अधूनमधून प्रेक्षकांत डोकवायचो. हशा-टाळ्यांनी नाटय़गृह दुमदुमत होतं. प्रयोग संपला. पण अत्रे काहीच बोलले नाहीत. त्यांना कापर्यंत पोचवून आलो. तेंडुलकरांना म्हणालो, ‘साहेब काहीच बोलले नाहीत प्रयोगाबद्दल.’
अन् दुसऱ्या दिवशी ‘मराठा’मध्ये तेंडुलकरांच्या नाटकावर अग्रलेख!
त्या अग्रलेखाची आम्ही अक्षरश: पारायणं केली. जल्लोष केला सर्वानी मिळून. आचार्य अत्र्यांचे आभार मानायला ‘मराठा’मध्ये गेलो. तेंडुलकर होतेच बरोबर. मी आणि तेंडुलकर त्यांना भेटायला त्यांच्या खोलीत गेलो. मी अदबीनं उभं राहून म्हणालो, ‘आपण तेंडुलकरांच्या नाटकावर अग्रलेख लिहिलात. आम्हाला खूप आनंद झाला.’ नाटककाराच्या नाटकावर अग्रलेख मराठी पत्रकारितेत प्रथमच लिहिला गेला होता. पुढं म्हणालो, ‘आपले आभार मानायला मुद्दाम आलो.’ आणि एकदम गडगडाट झाला- ‘मूर्ख आहात.’ मी घाबरलो. तेंडुलकरांकडे पाहू लागलो. आपलं काही चुकलंय का, असा मनात विचार आला.. तोच पुन्हा गडगडाट.. ‘मूर्ख आहात. एवढी चांगली नाटकं करता, पण ते लोकांना कळायला नको? नाटक चांगलं आहे म्हणून बोंब मारत जा. एवढं चांगलं काम करताय. लोकांपर्यंत ते पोचायला हवं.’ अगदी खरं बोलत होते ते. माझी खटपट तीच होती पहिल्यापासून. प्रेक्षकांपर्यंत नाटय़कृती पोचली पाहिजे. पण साहेब म्हणाले तसं बोंब मारणं मात्र काही जमलं नाही. नेमस्तपणे जेवढं करता येईल तेवढं मात्र करत आलोय.
असाच एकदा साहित्य संघात नाटकाचा प्रयोग होता. प्रयोगादरम्यान प्रभाकर पणशीकर आणि मोहन वाघ भेटायला आले. त्यांनी प्रस्ताव ठेवला. ‘मी जिंकलो, मी हरलो’ नाटकाचे प्रयोग ते त्यांच्या नाटय़संस्थेतर्फे करणार होते. प्रमुख भूमिका तेच करणार होते. आजपर्यंत आम्ही कलाकार-कार्यकर्त्यांनी नाटकाचे प्रयोग यशस्वीपणे आयोजित केले होते. संस्थेला त्यांतून पसाही मिळाला. आमचं- विशेषत: माझं नाटकाशी, त्याच्या प्रयोगांशी नातं असतं. कायमचं. अपत्य-पालकाचं. आता आपलं अपत्य दुसऱ्यांना सांभाळायला द्यायचं म्हणजे.. वाईट वाटणारच. आतापर्यंत आपण कमी पडलो काय? मग ते दुसऱ्यांना का सांभाळायला द्यायचं? भावनिक पातळीवर आम्ही कलाकार-कार्यकत्रे या प्रस्तावाविरुद्ध होतो. बाईंच्या सहा प्रयोगांच्या योजनेला जसा आमचा विरोध होता तसाच या प्रस्तावालाही होता. तशात डॉ. लागूंच्या ऐवजी प्रभाकर पणशीकर काम करणार. इतर नवे कलाकार कोण असणार? मग ते ‘आपलं’ नाटक होणार नाही. ही ‘दूरता’ आम्ही मान्य केली नाही आणि प्रयोग चालूच ठेवले. यावर बाई म्हणतात, ते प्रयोग तोटय़ात गेले. चूक आहे हे. आज सर्व हिशेबाच्या वह्य़ा, ऑडिट रिपोर्ट- जे मी तयार करून ठेवले होते- त्यातलं काहीच उपलब्ध नाही. पण नक्कीच ते प्रयोग तोटय़ात गेलेले नाहीत. उलट, एक मोठा दौरा तोपर्यंत कुणीही न केलेला आम्ही आयोजित केला होता.
‘मी जिंकलो’चे प्रयोग चालू असतानाच डॉ. लागू यांनी युगो बेट्टीचं ‘Queen and the Rebels’ या नाटकाचं रूपांतर केलं. ‘एक होती राणी’ नावानं. या नव्या नाटकाच्या तालमी सुरू झाल्या. रविवारी पुण्याहून डॉक्टर आले की ‘मी जिंकलो’चा सकाळी प्रयोग, नंतर सबंध दिवस तालमी. दत्ता भट, अरिवद, सुलभा व ‘प्रजाजन’ म्हणून आम्ही सगळे १५-२० कलाकार. रूपांतराऐवजी डॉक्टरांनी चक्क भाषांतर केलं असतं तर कदाचित प्रेक्षकांनी ते त्या दृष्टीने पाहिलं असतं. जसं शेक्सपीयरचं ‘हॅम्लेट’, ‘ऑथेल्लो’ नाटकांचं विदेशीपण समजून घेऊन पाहिलं तर मग प्रेक्षक ते मान्य करतात. पण नाटकाचं रूपांतर होतं तेव्हा विदेशी नाटकातील समस्या, वातावरण, त्यातील व्यक्तिरेखा प्रेक्षक जेव्हा इथल्या पाश्र्वभूमीवर पाहू लागतात तेव्हा त्यांना त्याची संगती लावता येत नसावी. त्यामुळे मग धड आपलंही नाही आणि परकीयही नाही, असं प्रेक्षकांना वाटलं तर तो दोष प्रेक्षकांचा नाही असं मला वाटतं. ‘एक होती राणी’च्या बाबतीत असंच झालं असावं. अर्थात हे आमचं नंतरचं शहाणपण! पण त्यावेळी मात्र आम्ही जोरदार तालमी करत होतो. तालमींत आमचा उत्साह वाढत होता. नेपथ्य, वेशभूषा अशा सगळ्याची तयारीही जोरात चालू होती.
आणि एके दिवशी नागपूरहून बागडे आले. आले ते दुपारी जेवायच्या वेळेसच. जेवण झाल्यावर म्हणाले, ‘चला, दिवसाची निश्चिती झाली.’ असा ठेकेदार नाटकाचे प्रयोग ठरवायला आला होता. पण माझा विश्वास भाऊसाहेब सप्रे यांच्या शब्दावर होता. ‘मी जिंकलो, मी हरलो’चे सगळे प्रयोग काँट्रॅक्टनेच असणार होते. त्यात ‘एक होती राणी’चाही प्रयोग नागपूरला करावा असं ठरलं. तारखा ठरवताना असं आढळून आलं की, श्रीकांत मोघे नागपूरला एक दिवस उशिरा पोहोचणार होता. वसंतराव देशपांडे यांच्या ऐवजी आता श्रीकांत मोघे काम करत होता. वसंतरावांची बदली दूर आसामात झाली होती. मग आम्ही ठरवलं- पहिल्या दिवशी ‘एक होती राणी’चा प्रयोग अंगावर करायचा व पुढचे दोन प्रयोग ‘मी जिंकलो’चे! ‘काँट्रॅक्ट’ तेच असणार होते. बागडे यांच्याबरोबर दिवसभर बसून सविस्तर दौऱ्याचा प्लान आखला आणि मग सगळ्यांना सांगून ठरवून टाकलं. लगेचच राष्ट्र सेवादलाच्या ऑफिसात जाऊन बसही ठरवली. १५ दिवसांचा मोठा दौरा असणार होता विदर्भात. पहिले तीन दिवस नागपुरात. नंतर भंडारा, वणी, गजानन महाराजांचं केडगाव, धुळे, जळगाव, अमरावती, नंदुरबार, अकोला. प्रायोगिक काय किंवा व्यावसायिक काय, नाटकाचा एवढा मोठा दौरा प्रथमच होणार होता.
भुलाभाईच्या टेरेसवर ‘एक होती राणी’च्या आता सलग तालमी सुरू झाल्या. पण व्हायचं काय, प्रजाजनांचा जो घोळका नाटकात होता त्याचे प्रवेश बसवताना सारखे बदल व्हायचे. एकदा असं करून बघा. नंतर मग वेगळ्याच पद्धतीने प्रवेश बसवले जात. पण बाईंचं समाधान काही व्हायचं नाही. त्या पुन: पुन्हा बदल करून पाहायच्या. एकदा तालमीत गंमतच झाली. आमचा घोळक्याचा प्रवेश चालू असतानाच बाईंनी एकदम तो थांबवला. ‘अरे, तुम्हाला असं नव्हतं सांगितलं करायला.’ आमच्या घोळक्यात एक कोकण्या होता. स्पष्टवक्ता. म्हणाला, ‘बाई, आमचा गोंधळ होतोय. एकदा तुम्ही एक सांगता, दुसऱ्यांदा दुसरंच. यातलं नेमकं कुठलं करायचं, हेच मग समजत नाही.’ पण ही सृजनप्रक्रिया आहे, हे मात्र या कोकण्याच्या लक्षात येत नव्हतं.
भुलाभाईच्या टेरेसवरच आमच्या रंगीत तालमी झाल्या. आणि १४ ऑक्टोबर १९६४ ला साहित्य संघात या नाटकाचा पहिला प्रयोग झाला. प्रयोग चोख झाला; पण प्रेक्षकांना बुचकळ्यात टाकून गेला. सरळ सरळ भाषांतर असतं तर प्रेक्षकांनी त्यादृष्टीने तो पाहिला असता. पण त्याचं रूपांतर झालं आणि त्यातली समस्या, राणीविरुद्ध झालेलं बंड, उठाव, परागंदा झालेली राणी.. असं आपल्याकडे कुठंच घडलेलं नसल्याने त्याची संगती प्रेक्षकांना लावता आली नसावी. म्हणजे आपल्या दृष्टीने एखादा प्रयोग चोख होतो. पण यशस्वी..? प्रेक्षकांच्या दृष्टीने तो तसा होत नाही. असंच काहीसं ‘एक होती राणी’च्या बाबतीत झालं असावं.
लोकमान्य सेवा संघ, साहित्य संघ महोत्सवात प्रयोग व पुणे असे प्रयोग होत होते. दरम्यान दौऱ्याचा कार्यक्रम निश्चित होत होता. मला आठवतं त्याप्रमाणे डिसेंबरमध्ये हा दौरा आखला होता. दौऱ्याची तयारी करून पुढची जुळवाजुळव करण्यासाठी मी दोन दिवस आधीच नागपूरला गेलो होतो. भाऊ सप्रेंना भेटलो. त्यांनी निवास-भोजनाची व्यवस्था चोख करून ठेवली होती. ‘एक होती राणी’तील कलाकार रेल्वेने येणार होते आणि प्रयोग करून परत जाणार होते. त्यांना तिकिटं काढून दिली होती. त्याची चिंता नव्हती. ‘मी जिंकलो’चे कलाकार, तंत्रज्ञ बसने येणार होते. शितूत, विजय दाते, प्रभाकर गोखले, रघु पाटील यांची बॅकस्टेजची माणसं, इलेक्ट्रिशियन भिकू.. भिकू हा एक अवलिया होता. तो आमच्या सगळ्या नाटकांची विडंबनं मस्त करायचा. गुजराती असूनही. विशेषत: ‘मादी’ एकांकिकेची.
मुंबईहून सर्व सामान भरून निघायला कदाचित उशीर झाला असावा. आणि प्रवास करणाऱ्यांना कळलं असावं की, बस काही ठरल्या वेळेला नागपूरला पोचू शकत नाही. म्हणून नाशिकहून त्यांनी मला तार केली. सकाळी मी धनवटे रंगमंदिरातील सप्रेंच्या ऑफिसात पोहोचलो तेव्हा सिगारेट ओढत सप्रेच सचिंत चेहऱ्याने माझी वाट पाहत थांबले होते. म्हणालो, ‘काय झालं?’ त्यांनी तार हातात ठेवली. आली का पंचाईत! म्हणजे ‘एक होती राणी’चा प्रयोग रद्द करावा लागणार होता. प्रेक्षकांचे पसे परत द्यावे लागणार होते. या सगळ्याची चर्चा करत आम्ही सप्रेंच्या ऑफिसमध्ये बसलो होतो. अन् काय आश्चर्य! बाहेर आवाज आला म्हणून आम्ही दोघेही बाहेर आलो.. पाहतो तर आमचीच बस आली होती! क्षणात काळजी दूर पळाली. उत्साहाने त्यांच्या स्वागतासाठी पुढे झालो. सगळी तयारी झालेलीच होती. धनवटे रंगमंदिरच्याच वरच्या मजल्यावर निवास-भोजनाची सोय केली होती. आता प्रयोग निश्चित होणार होता. एक घोर मिटला.
चौकशी केली तेव्हा दत्ता भट सांगायला लागले, ‘नाशिक सोडलं आणि पांचाळ यांनी ज्या वेगात बस सोडली! मी शेवटच्या स्लीपर बर्थवर लवंडलो होतो. झोप लागत नव्हती. ज्या वेगात पांचाळ बस चालवत होते त्यानं धडकीच भरली. सगळे आपापल्या खुर्चीत पेंगत पेंगत झोपले होते. सगळा रस्ता मोकळा मिळाला होता. कुठेच वाहनांची गर्दी नव्हती. मी मात्र सारखा काळजीत होतो. पांचाळांचा गाडीवरचा ताबा सुटला तर काय होईल याची.’ पण पांचाळांना अशा गोष्टींची सवय असावी. मी पांचाळांचे आभार मानले. नाशिक ते नागपूर ते नॉनस्टॉप आले होते. त्यानंतर दौराभर पांचाळ आमच्यातलेच एक होऊन गेले. सेवा दलातलंच वातावरण इथंही आहे असं त्यांना वाटलं असावं. नेहमी हसत-खेळत. कामाच्या वेळी शिस्तीत.
रात्री प्रयोगाला हाऊसफुल्ल गर्दी होती. गॅलरीतही प्रेक्षक तुडुंब भरले होते. नागपूरच्या प्रेक्षकांविषयी ऐकून होतो की, त्यांना नाटक नाही आवडलं तर खुच्र्यावर उलट तोंड करून डग्गा बडवीत बसतात. प्रयोगाचा विचका होतो. खरं-खोटं कुणास ठाऊक. पण ही आख्यायिका प्रचलित होती त्यावेळी. ‘एक होती राणी’च्या प्रयोगाला मात्र असं काही झालं नाही. प्रयोग संपल्यावर काही शेरे मात्र ऐकायला मिळाले- ‘मुंबईत खपलं नाही म्हणून इथं विकायला आलात का?’ वगरे वगरे.
पण दुसऱ्या दिवशी असं होणार नव्हतं. ‘मी जिंकलो’चा प्रयोग होता. नागपूरचे ‘मी जिंकलो, मी हरलो’चे दोन्ही प्रयोग हाऊसफुल्ल गेले होते. प्रेक्षकांना ते मनापासून आवडले होते. तशा प्रतिक्रियाही आमच्यापर्यंत पोचत होत्या. ‘झिम्मा’मध्ये बाईंनी लिहिलंय की, या नाटकामुळे मराठी रंगभूमीला आणखी एक नाटककार मिळाला- महेश एलकुंचवार. पण महेशनी स्वत:च हे आधी लिहून ठेवलेलं आहे.
५८ साली ‘मधल्या िभती’च्या निमित्ताने नागपूरला गेलो होतो तेव्हा विजय दातेमुळे नाना देशमुख याच्याशी मत्री झाली होती. तो भंडाऱ्याचा. त्याला आम्ही नागपूरला येतोय असं कळल्यावर त्यानेही एक प्रयोग भंडाऱ्याला करायचं ठरवलं. पण हा प्रयोग बागडे यांनी घेतलेल्या कॉन्ट्रॅक्ट प्रयोगात नव्हता. नाना देशमुखांनी तो स्वत: अंगावर लावला होता. म्हणाला होता, ‘तुम्हाला काही प्रयोगासाठी पदरमोड करावी लागणार नाही आणि प्रयोगाचे काही पसेही मिळणार नाहीत. मात्र, सर्व जबाबदारी माझी.’ नाना देशमुखांनी ती व्यवस्थित पार पाडली.
संध्याकाळी सगळे पाय मोकळे करायला नदीवर फिरायला गेले. आम्ही कामाला लागलो. नंतर कळलं की, एक रेडा उधळल्याने फिरायला गेलेल्यांची चांगलीच पळापळ झाली होती.
दौऱ्यातील चौथा प्रयोग गजानन महाराजांच्या शेगावला. आता इथून पुढचे काही प्रयोग चित्रपटगृहांत असणार होते. भंडाऱ्यावरून दुपारचं जेवण करून आम्ही शेगावला संध्याकाळी पोचलो. सिनेमा थिएटरच्या समोर बस थांबली. सगळ्या कलाकारांचं मी एक पाहिलंय- थिएटरवर आले की आधी ते प्लॅन पाहतात. आमचे कलाकारही बसमधून उतरून आधी बुकिंग काऊंटरवर गेले. पाहतात तो काय, प्लॅनवर एकही फुली नाही! झालं. वरपासून खालपर्यंत सर्वानी मला लाखोली वाहिली. ‘अशा आडगावात कोण येणार आहे असली नाटकं पाहायला? या काकडय़ाला कळायला हवं होतं. नस्ते प्रयोग ठरवून बसलाय.. ब्ला ब्ला ब्ला ब्ला.’
मी बागडय़ांना म्हणालो, ‘एकही फुली नाहीए प्लॅनवर. पसे मिळणार ना आमचे?’
बागडे शांत होते. प्रयोग रद्द होणार म्हणून श्रीकांत मोघे स्वामींच्या मठात जाऊन अभंग गात बसला. काहीजण भटकायला गेले. बागडे म्हणाले, ‘काळजी करू नका. ऐनवेळी इथली लोकं येतात. आपण एक करू या. आपली बस गावातून फिरवून आणू या. म्हणजे लोकांना कळेल की, नाटक कंपनी आलीय.’ शिवाय पुढं टांग्यातून भोंग्याद्वारे प्रयोगाची जाहिरात चालली होतीच. एवढीच प्रसिद्धी त्यावेळी. आम्ही गावातून बस फिरवून आणली. बागडे म्हणाले, ‘मी तुम्हाला ठरलेले पसे देणार आहे. प्रयोग रद्द करू नका.’
झालं! मी तयारीला लागलो. सिनेमाचं थिएटर असल्यामुळं स्टेज एकदमच लहान. त्यामुळं सेटचा काही भाग वगळावा लागला. जिना ठेवला. दोन खिडक्या कमी केल्या. स्टेजवरील हालचालींना जागा अपुरी पडेल असं वाटलं, पण कलाकारांनी ते अॅडजस्ट केलं.
रात्री आठपर्यंत प्लॅनवर एकही फुली नव्हती. नंतर एक मोठी बस आली. त्यातून एकदम तीस-चाळीस प्रेक्षक आले. प्लॅनवर हळूहळू लाल फुल्या वाढायला लागल्या. पहिल्या रांगेत सगळे सरकारी अधिकारी. आपल्या पोराटोरांसह.
श्रीकांत अजून मठातच होता. पण प्रयोग होणार म्हटल्यावर लगेचच आला. असल्या आडगावच्या प्रेक्षकांना नाटक कळणार नाही म्हणून त्यातला काही महत्त्वाचा भाग गाळायचा असं ठरलं.
प्रयोग सुरू होईपर्यंत थिएटर भरलं होतं. मला हायसं वाटलं. नाहीतर माझी खैर नव्हती. प्रयोग संपला. अन् तावातावानं काही प्रेक्षक रंगपटात आले. ते रागावले होते. त्यांचं विचारणं होतं, ‘नाटकातील महत्त्वाचा व चांगला भाग तुम्ही का गाळला?’ (त्यांना कसं सांगायचं, की इथल्या प्रेक्षकांना तो कळणार नाही म्हणून गाळला.) म्हणजे प्रेक्षक नाटक वाचून आले होते. पुस्तकातील पानावर बोट ठेवत म्हणाले, ‘हे बघा.. ‘वेदना फार सुंदर असते शेखर. वेदनेची संगत सोडता नये. सुटता नये. फार मोठं सामथ्र्य असतं तिच्यात. तार पिळवटली की तंतुवाद्य सुरात बोलू लागतं तसं आहे वेदनेचं. वेदनेची तार वारंवार पिळवटली जाईल तेव्हाच कलावंत चांगला बोलतो..’ अशी वाक्यं, असे प्रसंग तुम्ही गाळले आहेत. का? आम्ही पुण्या-मुंबईपासून दूर आहोत म्हणून?’
मुंबई-पुण्याबाहेरच्या प्रेक्षकांच्या अभिरुचीबद्दल आम्ही नेहमी जसे साशंक असतो तसंच थोडंफार इथं झालं होतं. त्यांना सांगितलं- ‘पुढचा प्रयोग वणीला आहे. तिथं तुम्ही या. विनातिकीट तुमचं आम्ही तिथं स्वागत करतो. तिथं संपूर्ण नाटक काहीही भाग न गाळता सादर करू.’
वणीला शाळेच्या मदानावर प्रयोग होता. रात्री प्रयोगाच्या वेळी पाहिलं तर स्टेजवर मायक्रोफोन नाही. एवढे हजारभर प्रेक्षक येणार.. त्यांना ऐकू कसं जाणार? पण थोडय़ाच वेळात ध्वनिप्रक्षेपणाची व्यवस्था झाली. एकच मोठा गोल्ड मायक्रोफोन मध्ये ठेवला. मी म्हणालो, ‘अहो, एवढय़ा एका माईकने काय होणार?’ तर म्हणाले, ‘तुम्ही आधी ऐकून तर बघा. मग बोला. इथं एका माईकवरच नाटक होतं.’ आणि खरंच, नाटक व्यवस्थित प्रेक्षकांना ऐकू गेलं. कुठून आणला होता असला माईक, कोण जाणे. पुढे आम्ही यवतमाळ, अमरावती, अकोल्याला प्रयोग केले.
पुढचा मलकापूरचा प्रयोग सगळ्यांच्या चांगलाच स्मरणात आहे. मनुताई केंकरे यांनी या प्रयोगाचं सविस्तर वर्णन केलंय. ते नुकतंच माझ्या वाचनात आलं. थंडीचे दिवस. विदर्भात थंडीचा कहर असतो. आतापर्यंत जाणवत होती थंडी; पण उबदार कपडय़ांवर भागवून नेत होतो. मलकापूरला भलामोठा शामियाना उभा केला होता. बंदिस्त. म्हणजे प्रेक्षकांसाठी पांढऱ्याशुभ्र गाद्या-लोड. बागडे यांनी एका मालदाराला हा प्रयोग दिला होता. रंगमंच मात्र उघडय़ावर. वर ताडपत्री होती; पण जेवढय़ास तेवढी. प्रयोग करताना मनुताईंना थंडीने हुडहुडी भरलेली. पण स्टेजवर गेल्या की अंगभर पदर घेऊन त्या चोख काम करायच्या. बाहेर आल्या की पुन्हा कुडकुडायच्या. दात वाजायचे. अंग गदगदा हलायचं. ‘काय रेऽऽ ही थंडी! चहा दे बाबा गरम गरम. बरं वाटेल!’ प्रत्येक प्रवेशाला मनुताई गरम गरम चहा पिऊन काम करायच्या. स्टेजवर गेल्या की काम चोख. एवढय़ा थंडीतही त्यांच्या भूमिकेतून त्या कधी बाहेर आल्या नाहीत.
धुळे, नाशिक असे शेवटचे प्रयोग करून आम्ही मुंबईला परतलो. नाशिकचा प्रयोग संपवून सकाळी मुंबईला आलो. हौशी-प्रायोगिक नाटकांचा हा पहिला यशस्वी दौरा. तोपर्यंत कुणीही न केलेला. एवढा मोठा दौरा; पण डॉ. लागूंच्या ‘लमाण’मध्ये काय किंवा विजयाबाईंच्या ‘झिम्मा’मध्ये काय, त्याचा फक्त ओझरता उल्लेख आहे याचं वाईट वाटतं. दोन दिवसांनी मी राष्ट्र सेवा दलाच्या ऑफिसमध्ये गेलो. हिशोब पुरे करायचे होते. तेवढेच बाकी राहिले होते. दौऱ्यातील इतर सगळे हिशोब विजय दाते यांनी चोख लिहून ठेवले होते. राष्ट्र सेवा दलाच्या ऑफिसमध्ये बिलाचे पसे चुकते केले. पावती घेतली. सुदैवानं पांचाळ ऑफिसमध्येच होते. त्यांची गळाभेट घेऊन निघालो. दौऱ्याचं महत्त्वाचं अपूर्व पर्व संपलं.

पासष्ट साल उजाडलं अन् आम्ही दुसऱ्या नाटकाच्या तयारीला लागलो. कादंबरीकार श्री. ना. पेंडसे यांच्या ‘यशोदा’ या नाटकाच्या तालमींना आता सुरुवात झाली होती. यशोदेला लग्नापूर्वीच दिवस गेलेत. त्यामुळं घरात हलकल्लोळ माजलाय. यशोदा कुणाचंच नाव सांगायला तयार नाही. तिच्या सुटकेसाठी मग सगळ्यांचेच प्रयत्न सुरू होतात. ‘श्रीमंत’ नाटकातही हीच समस्या आहे. कुमारी मातेची. पण दोन्हीत फरक आहे. त्यांतील व्यक्तिरेखांत, वातावरणात, मांडणीत, भाषेत. यशोदा कोकणातील साध्या गरीब कुटुंबातली, तर मथू श्रीमंताघरची. मुख्य म्हणजे ही दोन्ही नाटकं विजयाबाईंनीच दिग्दíशत केलीत आणि त्यांतील महत्त्वाच्या भूमिकाही! ‘श्रीमंत’मध्ये श्रीधर काही अटींवर मथूशी लग्न करायला तयार होतो, तर ‘यशोदा’मध्ये वेंधळ्या, पुरुषत्व हरवलेल्या विठोबाशी यशोदेचं लग्न लावून ही समस्या सोडवली जाते. तेंडुलकरांची शहरी भाषा, तर श्री. ना. पेंडसे यांची कोकणी बोली.
मुख्य कलाकार- विजयाबाई, आशा दंडवते, मामा पेंडसे, डॉ. लागू आणि प्रथमच नाटकात काम करत असलेली कुमुद लेले (नंतरची कुमुद शंकर). नाटक चार अंकी. खरं म्हणजे चार प्रवेश. दोन स्थळं : घर आणि व्याघ्रेश्वराचं देऊळ. नेपथ्यकार आमचा राम शितुत. त्याने व्याघ्रेश्वराच्या देवळासाठी फक्त गोल खांब उभे करून ते सूचित केलं होतं. त्यावेळी लिनोलियम काप्रेट मिळायचं. त्याची वरची बाजू रंगीत, चकचकीत, तर पाठीमागची बाजू खरबरीत, करडय़ा रंगाची. शितूतने उलटय़ा बाजूने हे लिनोलियम काप्रेट गोल करून खांब उभे केले आणि देवळाच्या मंडपाचा भाग सूचित केला. शितूत हरहुन्नरीच.
भारतीय विद्या भवनमध्ये रंगीत तालमी आणि प्रयोगही आम्ही केले. या नाटय़गृहात प्रकाश नियंत्रण प्रेक्षकांच्या उजव्या हाताच्या पहिल्या िवगेच्या वरून गॅलरीतून केलं जात असे. अगदी परवा-परवापर्यंत. म्हणजे नाटक खाली विहिरीत पाहिल्यासारखं पाहून प्रकाश नियंत्रण करावं लागे. प्रकाश नियंत्रणाच्या बाजूलाच एक दार आहे. तिथून गॅलरीत जाता येतं. शिरूभाऊ तालमींना, प्रयोगांना यायचे, पण समोरून-जवळून नाटक पाहायचे नाहीत. गॅलरीत प्रेक्षक नसायचे. शिरूभाऊ गॅलरीत बसून बघायचे. मी मधून मधून शितूतला मदत करायला स्टेजवरील पाठीमागच्या जिन्याने गॅलरीत जात असे. एकदा असाच गेलो.. आणि नाटक चालू असताना हुंदके दिल्याचा आवाज मधून मधून येऊ लागला. मी हळूच गॅलरीच्या दरवाजातून पाहिलं- तर शिरूभाऊ तोंडावर हात ठेवून हुंदके देताहेत. मी न बोलता खाली रंगमंचावर गेलो. कुणालाच त्याबद्दल बोललो नाही. नाटककार आपली नाटकं कशा पद्धतीने बघतात, हा अनुभव मात्र मला असाच येत गेला.
यातील छोटी, पण महत्त्वाची विठोबाची भूमिका मी करायचो. रंगमंचावर दहा-पंधरा मिनिटंच; आणि काही थोडी वाक्यं. पण व्यक्तिरेखा साकार करताना खूप प्रयत्न करावे लागले. पालथी मांडी घालून बसणं, बायकी बोलणं, वेंधळेपणा हे सगळं आतून यायला हवं. ते वाटतं तेवढं सोपं नव्हतं. विठोबाची मानसिकता साकारताना पुरुषत्व हरवलेलं, नपुंसक व्यक्तित्व यायला हवं असायचं. ते खूप कठीण होतं. शिवाय ते सहज, स्वाभाविक वाटायला हवं. कलाकारांच्या अभिनयाबद्दल सांगायलाच नको. विजयाबाई, डॉ. लागू हे कसलेले अभिनेते. मामांचं काम मी प्रथमच पाहत होतो. व्यावसायिक रंगभूमीवरील ते एक प्रथितयश कलाकार. पण आमच्या प्रायोगिक नाटकात इतके समरसून गेले, की आम्हाला ते फार जवळचे वाटायला लागले. आमच्यातलेच. या थोर कलाकारांपुढे कुमुद लेले आणि आशा दंडवते यासुद्धा कुठेच कमी पडल्या नाहीत. व्याघ्रेश्वराच्या देवळातील प्रवेशात डॉ. लागू आणि आशा दोघे आमनेसामने येत. पण तोडीस तोड.
आता मधून मधून ‘यशोदा’चे प्रयोग, कधी एकांकिका असे आमचे उपक्रम सुरू होते. ६५ जरा यथातथाच गेलं. ‘यशोदा’ नाटकाचे प्रयोग का कुणास ठाऊक- थांबवण्यात आले. अरिवद पहिल्यापासून साहित्य संघाच्या नाटकांतून कामं करत होता. ६४ साली त्याने तेंडुलकरांचं ‘सरी ग सरी’ हे नाटक दिग्दíशत केलं होतं. त्याचे प्रयोगही बऱ्यापकी चालू होते. विजयाबाईंनी दुर्गा खोटे प्रॉडक्शनची काही जबाबदारी स्वीकारली होती. त्या जाहिरातींची निर्मिती करायच्या. नंतर बाई प्रताप शर्मा यांच्या इंग्लिश नाटकाच्या तालमींना जायला लागल्या. तिथेच त्यांची फारुख मेहताशी ओळख झाली आणि ६५ च्या डिसेंबरात त्यांनी फारुख मेहतांशी विवाह केला. डॉ. लागूही डिसेंबर ६५ मध्ये पूर्व आफ्रिकेला गेले.
आम्ही काही काळ पोरके झालो. नाटकांचे प्रयोग होत नव्हते. नवीन काही घडत नव्हतं. सुरुवातीला जे ‘यशोदा’ नाटक झालं होतं, तेही आता थांबलं होतं. अशावेळी महाराष्ट्र राज्य नाटय़स्पध्रेसाठी फॉर्म पाठवायची वेळ आली. बाई व्यग्र होत्या. अरिवद आता पहिल्यांदाच रंगायनचं नाटक दिग्दíशत करणार होता. सरिता पदकींचं ‘बाधा’ नाटक स्पध्रेला करायचं ठरलं. त्यामुळे आता तालमींत वेळ जाऊ लागला. पुन्हा आम्ही कामाला जुंपलो. ‘बाधा’चा प्रयोग मात्र आज मला दिसत नाही. कलाकार कोण होते, तेही आठवत नाही. पण ‘बाधा’चे दोनच प्रयोग झाले. एक आमच्या ‘हितचिंतक’ प्रेक्षक सभासदांसाठी अन् दुसरा स्पध्रेतला प्रयोग. बस्स.

६६ साल भाकड जाणार की काय, अशी काळजी वाटत असतानाच श्रीपुंनी चिं. त्र्यं. खानोलकरांचं एक महत्त्वाचं नाटक बाईंना वाचायला दिलं. खानोलकर ‘मौजे’चेच लेखक. त्यांच्या ‘रात्र काळी घागर काळी’, ‘कोंडुरा’ या कादंबऱ्या गाजल्या होत्या. बाईंनी व श्रीपुंनी निर्णय घेतला- खानोलकरांचं ‘एक शून्य बाजीराव’ हे नाटक रंगायनतर्फे रंगभूमीवर आणायचं. नाटकाच्या तालमी सुरू होणार होत्या. खानोलकरांबरोबर मीही जात होतो. पात्रांची निवड सुरू होती. खानोलकरांना वाटायचं, त्यात मी एक छोटी भूमिका करावी. मी ‘मला नाटकात काम द्या,’ असं कुणालाच कधी अजूनपर्यंत सांगितलेलं नाही. वाटत असे- काम करावं. पण नाटक होतंय यातच आनंद वाटायचा.
‘एक शून्य बाजीराव’ची तयारी होत होती. पण मनुष्यबळाची कमतरता जाणवत होती. मी कामाला लागलो. मुंबईत भर उन्हाळ्यात २८ मे ६६ रोजी विल्सन कॉलेजच्या छोटय़ा सभागृहात नाटकाचा पहिला प्रयोग झाला. अंगाला घामाच्या धारा लागल्या होत्या. त्या सभागृहात तर विशेषच. (कारण हवा खेळायला तिथं फारशी जागाच नव्हती.) बाईंनी सांगितलं, ‘अरे, पंखे घेऊन या.’ त्यावेळी हाताने वारा घ्यायचे पंखे मिळायचे. गिरगावात जाऊन तसे पंखे आणले. येणाऱ्या प्रेक्षकांना नाटक पाहता पाहता पंख्याने वारा घेता यावा म्हणून प्रत्येकाला ते दिले.
‘एक शून्य बाजीराव म्हणजे माधव वाटवे’ हेच समीकरण रूढ झालं! पहिला प्रयोग झाला. शेवटच्या प्रवेशात माधव म्हणजे बाजीरावला विषप्राशनामुळे अंगाचा दाह होतोय. त्यात त्याचं ते शेवटचं स्वगत.. मनाला आणि शरीराला थकवा आणणारं. माधवचं तेच झालं होतं. नाटक संपलं नि प्रचंड थकलेला, घामाघूम झालेला माधव वाटवे रंगपटात शांत डोळे झाकून बसला होता. बाईंनी सांगितलं, ‘अरुण, रंगपटात कुणालाही सोडू नकोस.’ मी बाहेर उभा होतो. ‘काही वेळाने भेटा..’ असं सर्वाना विनवीत होतो. एवढय़ात प्रत्यक्ष नाना (केशवराव दाते) समोर उभे. काय बिशाद माझी त्यांना अडवायची. उलट, त्यांना हाताला धरून आत घेऊन गेलो. नाना पाहतायत तर माधव डोळे मिटून शांत खुर्चीवर बसलेला. नाना त्याच्या जवळ गेले. थांबले. त्याच्याकडे पाहिलं. आणि शांतपणे हातातल्या पंख्यानं त्याला वारा घालू लागले. माझा कंठ दाटून आला. दोन पिढय़ांचे दोन महान कलाकार. मोठय़ा पिढीच्या कलाकाराने दुसऱ्या पिढीच्या कलाकाराला दिलेली ही दाद! नि:शब्द.. अंत:करणापासूनची! नाना नंतर विजयाबाईंशी बोलले माधवविषयी. पण माझं लक्ष नव्हतं तिकडे. माझ्या डोळ्यासमोरचा तो प्रयोग.. त्यातून बाहेर येऊच नये असं वाटायला लावणारा.
आता या नाटकाचे प्रयोग करायला मिळणार म्हणून मी आनंदात होतो. पण प्रयोग होत नव्हते. पूर्वीसारखा निर्णय घेऊन मी प्रयोग लावू शकत नव्हतो. अरविंदला म्हणालो, ‘रंगायन करत नसेल तर मी प्रयोग करतो. पण या नाटकाचे प्रयोग व्हायला हवेत.’ अरिवद, विजयाबाई दोघेही संस्थेचे कार्यवाह. निर्णय झाला. परवानगी मिळाली. प्रयोगाचं मानधन म्हणून काही रक्कम रंगायनला द्यायचं मी कबूल केलं. थिएटर ठरवून कामाला लागलो. खानोलकर बरोबर होते. खरं तर त्यांचाच मोठा आधार वाटत होता. त्यांनाही प्रयोग व्हावेत असं वाटायचं. मग आम्ही पहिली धाड घातली ते जे. जे. स्कूल ऑफ आर्टवर. संभाजी कदम, हणमंते यांना एकेक तिकिटांचं पुस्तक दिलं. आग्रह केला- ती खपवायचा. त्यांचंही आश्वासन मिळालं. एवढय़ा पशांत आता थिएटर भाडं सुटणार होतं. नंतर खानोलकरांचे मित्र रायभान जाधव माहीमला राहायचे- त्यांच्या घरी गेलो. ते सनदी अधिकारी. त्यांनी तिकिटं तर घेतलीच, पण थोडंसं आíथक सहाय्यही दिलं. तो प्रयोग प्रेक्षकांना चक्रावून गेला.
दुसऱ्या प्रयोगाच्या वेळी आमच्या ओळखी संपत आल्या म्हणून तिकिटं जास्त खपली नाहीत. आता बुकिंगवरच भिस्त. खर्च निघाला, पण रंगायनला द्यायला पसे कमी पडले. म्हणून मग अरविंदला भेटलो. म्हणालो, ‘पसे कमी आहेत, पुढच्या प्रयोगाला देईन.’ मग मीटिंग झाली. त्यात अरिवद एवढंच म्हणाला, ‘काकडे आपलाच कलाकार आहे. नाटकाचा कॉन्ट्रॅक्टर नाही. तेव्हा ती रक्कम माफ करावी.’ हे लिहीत असताना मला दोन ओळी आठवल्या-
हाती नाही बळ । दारी नाही आड।
त्याने फूलझाड । लावू नये॥
सृजन प्रसवायचं, पण त्याचं संगोपन करण्याची कुवत आपल्यात नाही, याची प्रकर्षांने जाणीव होत राहिली. त्यासाठी खूप मेहनत करावी लागणार होती. प्रयोगांना संजीवनी मिळण्यासाठी आड (विहीर) खोदावे लागणार होते. आजवर तेच करत आलोय.
‘एक शून्य बाजीराव’ हे चिं. त्र्यं. खानोलकर यांचं पहिलंच नाटक. खानोलकरांची प्रतिभा रुजली, उगवली कोकणाच्या मातीत. पानाफुला आली मुंबईत. तिची मशागत केली श्रीपुंनी. खानोलकरांच्या लेखनाचा झपाटा अचंबित करणारा. एकटाकी. एका रात्रीत पांढऱ्या कागदावर सुवाच्य अक्षरांत लिहिलेला नाटकाचा संपूर्ण अंक दुसऱ्या दिवशी त्यांनी मला दिला होता. नाटकाचं नाव होतं : ‘ललित नभी चार मेघ’! खानोलकर मराठी रंगभूमीवर धूमकेतूसारखे चमकून गेले. रसिकमनावर आपला साहित्यिक ठसा कायम ठेवून!
‘.. बाजीराव’ नाटकाचा विषय पाहिला तर तसा साधाच वाटणारा. मुंबईतील एक नाटक कंपनी आपल्या नाटकाचा पहिला प्रयोग दूरच्या गावात सादर करण्यासाठी आली आहे. दिग्दर्शक व नाटकाकाराचंही हे पहिलंच नाटक. नाटकाचं थ्रिल म्हणून नाटय़व्यवसायात आलेली गौरी या नाटकात महत्त्वाची भूमिका साकारतेय. तिच्यावर बाजीराव प्रेम करतो. त्याच्या ‘मृच्छकटिक’ नाटकाचा शेजारच्या गावी प्रयोग आहे. तो करून तो इथं आलेला आहे.. त्याच भूमिकेच्या वेशात. गौरी त्याला झिडकारते. त्याचा स्पर्श ओंगळणारा, किळसवाणा आहे, असं त्याला सांगते. याच गावात दहा वर्षांपूर्वी ती ‘शारदा’ नाटक करायला आली असताना गावच्या इनामदारानं -अप्पारावानं तिला लग्नाची मागणी घातलेली असते. पण गौरीने ती झिडकारलेली असते.
नाटक अनेक पातळ्यांवर फिरत राहतं. नाटकातल्या नाटकाचं नाटक अशी त्याची वीण आहे. खानोलकरांना नाटकाची बांधणी जमत नाही, ते क्राफ्टस्मन नाहीत, आतून येईल तसे ते लिहीत जातात.. असा त्यांच्यावर आक्षेप घेतला जातो. पण या त्यांच्या पहिल्याच नाटकात त्यांची समज किती सकस आहे हे जाणवतं.
हे नाटक म्हणजे फक्त बाजीराव : माधव वाटवे. त्याच्या अभिनयाबद्दल गौरीच म्हणते- ‘नाटकात नटाच्या पंचेंद्रियांचं एक दिव्य इंद्रधनुष्य व्हायला हवं. बाजीराव, तू नाटकात उतरलास की तुझंही तेच होतं.’
माधव वाटवे यांनी सर्व खानोलकरी स्वगतांचं, भाषेचं सोनं केलं. रंगायनच्या काळातील दोन महान कलाकार- दत्ता भट, माधव वाटवे. दोघेही माझे सहकारी हा माझ्यासाठी भाग्ययोग! ‘झाले मृगजळ आता जलमय’ असे सांगत दत्ता भट निघून गेले. सुखासमाधानानं. माधव अकाली गेला. एक महत्त्वाचं कार्य अर्धवट सोडून. नाटय़कलेवर तो ग्रंथ लिहिणार होता. आता तो ग्रंथ होणे नाही, आणि आपण तो वाचणे नाही.
‘एक शून्य बाजीराव’ म्हणजे काव्यात्म प्रतीकात्मकता. भाषासौष्ठव. बाजीरावचा प्रवेशच एका हातात व्हायोलिनची केस व दुसऱ्या हातात वाकडीतिकडी काठी घेऊन! व्हायोलिनच्या केसला तो शवपेटी म्हणतो, तर ती काठी वारसाहक्कानं त्याच्याकडे आलीय! या काठीचा आणि व्हायोलिन केसचा बाजीरावच्या व्यक्तिमत्त्वाशी काय संबंध आहे? तो आहे मात्र! कुणीतरी शोधायला हवा.
‘एक शून्य बाजीराव’चा प्रयोग अजून माझ्या डोळ्यांसमोर उभा आहे. डोळ्यांच्या पटलांवर कोरलाय. डोळे मिटतील तेव्हाच तो पुसला जाणार.
पण ‘एक शून्य बाजीराव’चे प्रयोग फारसे होत नव्हते. मी ते करू शकत नव्हतो. अरिवद साहित्य संघाशी जोडला गेला होता. त्या वर्षी त्याने संघासाठी तीन नाटकांचं दिग्दर्शन केलं. त्याचवेळी बहुतेक ‘वाऱ्यावरची वरात’चे प्रयोग चालू होते. विजयाबाई त्यात काम करायच्या. पण त्यांनी वेळात वेळ काढून तेजपालमध्ये दोन एकांकिकांचे प्रयोग केले. ‘चार दिवस’ आणि ‘थीफ-पोलीस’! ‘थीफ-पोलीस’मध्ये अरिवद गार्डचं काम करायचा. अफलातून. ‘चार दिवस’मध्ये मला आठवतंय तसं सुलभा (देशपांडे)ने काम केलं होतं.

दरवर्षी ५ नोव्हेंबरला दिल्लीच्या महाराष्ट्र परिचय केंद्रातर्फे रंगभूमीदिन साजरा होत असे. त्याचं निमंत्रण रंगायनला आलं आणि त्याच्या तयारीला आम्ही लागलो..
आम्ही दिल्लीला गेलो ते रंगायनची चार नाटकं घेऊनच. तेव्हा स्वतंत्र महाराष्ट्र राज्याची निर्मिती होऊन दिल्लीमध्ये महाराष्ट्र परिचय केंद्र सुरू झालं होतं. या केंद्राचे पहिले प्रमुख होते भा. कृ. केळकर. दिल्लीकरांना महाराष्ट्रीय संस्कृतीची ओळख करून देण्याचं काम महाराष्ट्र परिचय केंद्रातर्फे महाराष्ट्र शासनाने सुरू केलं. ५ नोव्हेंबर हा रंगभूमीदिन म्हणून महाराष्ट्रात साजरा होतो. या दिनानिमित्ताने दिल्लीकरांना महाराष्ट्रातील नाटय़कला कळावी, ती पाहायला, अनुभवायला मिळावी म्हणून शासनाने दिल्लीत मराठी नाटकांचे प्रयोग सुरू केले. महाराष्ट्रातील निरनिराळ्या नाटय़संस्थांना आमंत्रित करून त्या- त्या वर्षीच्या चांगल्या नाटकांच्या प्रयोगांचे आयोजन दिल्लीकरांसाठी सुरू केले. त्यासाठी खर्चाची सर्व तरतूद करण्यात आली. अशा रीतीने एक चांगला उपक्रम महाराष्ट्र शासनाने हाती घेतला. शिवाय मूळ मराठी नाटकाचा िहदी प्रयोग करून दिल्लीतील मराठीतर नाटय़रसिकांना मूळ नाटकाचा आस्वाद िहदीतून घ्यायला मिळावा, हीसुद्धा एक चांगली कल्पना. त्यासाठीही खर्चाची खास तरतूद केली गेली.
आम्ही १९६६ साली ५ नोव्हेंबरपासून रंगभूमी दिनानिमित्त चार नाटकांचे प्रयोग सादर करण्यासाठी दिल्लीला गेलो. महाराष्ट्र परिचय केंद्राकडून आम्हाला त्यासाठी बोलावणं आलं होतं. १९६६ पूर्वीही इतर नाटय़संस्थांच्या नाटकांचे प्रयोग रंगभूमी दिनानिमित्त दिल्लीत सादर झाले होते. मूळ मराठी नाटकाचा िहदी भाषेत प्रयोग या योजनेत आम्ही विजय तेंडुलकर लिखित व विजया खोटे (मेहता) दिग्दíशत ‘मी जिंकलो, मी हरलो’ या नाटकाचा िहदी अनुवाद ‘मं जीता, मं हारा’ या नावाने सादर केला. भाषांतर प्रा. वसंत देव यांचं होतं. विजय तेंडुलकरांची बहुतेक सगळी नाटकं वसंत देव यांनीच िहदीत अनुवादित केलेली आहेत. मराठी नाटकात डॉ. लागू प्रमुख भूमिका करायचे. पण ६५ च्या डिसेंबरात डॉ. लागू आफ्रिकेला गेले. तरी विजयाबाईंनी निर्णय घेतला की, यानिमित्ताने िहदीत प्रयोग करायचाच.
दिवस फार थोडे होते. कमलाकर सारंग हे आव्हान पेलायला तेव्हा पुढे आला. मराठी प्रयोगात विजयाबाई, दत्ता भट, वसंतराव देशपांडे, डॉ. लागू, राजा बापट, जयश्री बांगर, मनुताई केंकरे व आम्ही सर्व कलाकार काम करायचो. म्हणजे भाषा सोडली तर सगळ्या कलाकारांना फारसं जडं गेलं नाही िहदीत काम करायला. वसंतराव देशपांडे यांचा बोलण्याचा ढंगच िहदी असल्याने त्यांना काहीच फरक पडला नाही. कमलाकर सारंगने मात्र कमाल केली. एवढय़ा थोडक्या दिवसांत प्रयोगात तो उभा राहिला आणि प्रयोग यशस्वी केला. इतर तीन नाटकांपकी शं. गो. साठय़े यांचं ‘ससा आणि कासव’ हे नाटक आम्ही १९६० च्या राज्य नाटय़स्पध्रेत करून पाहिलं होतं. त्याला पारितोषिकही मिळालं होतं. त्यात दत्ता भट, माधव वाटवे, नारायण प, शरयू भोपटकर, निर्मला दाते, सुलभा देशपांडे हे कलाकार होते. आम्ही श्री. ना. पेंडसे यांचं ‘यशोदा’ ६५ साली रंगभूमीवर आणलं होतं. तेही या दिल्लीच्या यादीमध्ये होतं. त्यात मामा पेंडसे, विजयाबाई, डॉ. लागू, आशा दंडवते, अरुण आपटे, मी, कुमुद लेले (शंकर) हे कलाकार होते. पण दिल्लीच्या प्रयोगाला डॉ. लागू उपलब्ध नव्हते. त्यामुळे ती भूमिका बहुतेक दत्ता भट यांनी केली होती. चौथे नाटक चिं. त्र्यं. खानोलकरलिखित ‘एक शून्य बाजीराव’! चारही नाटकं विजयाबाईंनी दिग्दíशत केलेली होती.
चार नाटकांतील कलाकार, तंत्रज्ञ वगरे मिळून जवळजवळ ३०-३५ जणांची यादी तयार झाली. रेल्वेच्या नियमानुसार प्रत्येकाला जास्तीत जास्त सहाच तिकिटं त्यावेळी मिळत. म्हणजे एवढी तिकिटं काढायची तर सातजणांना तिकिटाच्या रांगेत उभे राहावं लागणार. पण रेल्वेतील एका अधिकाऱ्याने आम्हाला मदत केली. त्यामुळे चौघेजण तिकिटाच्या रांगेत रात्री जाऊन पत्ते कुटत बसले. श्रीकांत लागूंना हे सगळं अजून आठवतंय. नारायण प, राम शितूत, विजय दाते.. रात्रभर पत्ते खेळून झोप यायला लागली अन् तिकिटाची खिडकी उघडली. पुढे दोनच माणसं असल्यानं जातानाची तिकिटं मिळाली. त्यावेळी परतीची तिकिटं मुंबईहून काढण्याची सोय नव्हती. पण रेल्वे बोर्डाला आधी विनंती करून परतीचीही तिकिटं तिथे काढून घेण्याची व्यवस्था केली.
आज आम्ही दिल्लीला जातो तेव्हा आमच्या सेटचे डिझाइन आधी पाठवून देतो आणि तिथेच ते तयार करून घेतो. त्यावेळी अशी सोय नव्हती. सगळे सेट बरोबर ‘लगेज’ करून न्यावे लागायचे. त्याचं वजन, आकार हे सगळं नियमाबरहुकूम करावं लागायचं.
दिल्लीत आम्ही करोल बागेतील पूना गेस्ट हाऊसमध्ये उतरलो होतो. पूना गेस्ट हाऊसचे मालक बंडोपंत सरपोतदार एक अवलियाच. झुपकेदार मिश्या. मिश्यांवरून उलटी बोटं फिरवत बोलायची सवय. आदरातिथ्यात सगळेच सरपोतदार कुटुंबीय प्रसिद्ध. पुण्यात नाही का चारुदत्त सरपोतदार पूना गेस्ट हाऊसमध्ये येणाऱ्या प्रत्येक कलाकाराचं पोटभर आदरातिथ्य करत! दिल्लीत आमच्याबरोबर मामा पेंडसे, वसंतराव देशपांडे हे बुजर्ग कलाकारही होते. प्रत्येकाला जेवण काय आवडतं त्याप्रमाणे तयार करून बंडोपंत सरपोतदार आनंदाने खिलवत. मामा पेंडसे, वसंतराव यांच्यासाठी दोन टोकांना दोन स्वतंत्र खोल्या दिलेल्या होत्या. तळमजल्यावर स्त्री-कलावंतांसाठीही स्वतंत्र खोल्या. बाकी आम्ही सगळे पहिल्या मजल्यावरच्या मोठय़ा हॉलमध्ये.
पाच तारखेला ‘मं जीता, मं हारा’चा पहिला प्रयोग मावळणकर सभागृहात झाला. प्रयोग अतिशय रंगतदार झाला. वसंतराव देशपांडे यांनी नाटकातील आपल्या गाण्यानं प्रेक्षकांना खूश केलं. दत्ता भट, विजयाबाई, कमलाकर सारंग.. सगळ्यांचीच कामं, नाटक, प्रयोग प्रेक्षकांना, विशेषत: मराठीतर रसिकांना खूप आवडला. आम्ही त्या खुशीत. मुंबई राज्यात तेव्हा दारूबंदी होती. दिल्लीत नव्हती. त्यामुळे काही मंडळींचं दारूकामही चाले!
या दिल्लीवारीत रंगायनचे अध्यक्ष श्री. पु. भागवतही आमच्याबरोबर आले होते.
दुसऱ्या दिवशी ‘यशोदा’ नाटकाचा प्रयोग. त्याच्या तयारीसाठी सकाळपासून राम शितूत, विजय दाते, रघू पाटील व इतर बॅकस्टेज वर्कर्सना घेऊन मी थिएटरवर गेलो. सगळी तयारी करायला वेळ लागे. प्रयोगापूर्वी तीन तास मी सगळ्या कलाकारांना घेऊन थिएटरवर जायचो. प्रयोग संपल्यावर आधी कलाकारांना करोल बागेत पोहोचवून, नंतर सेटची आवराआवर करून आम्ही रूमवर यायचो. थिएटर आणि पुणे गेस्ट हाऊस अंतर खूप. म्हणून एक टॅक्सी भाडय़ाने घेतली होती.
रंगायनची ही चारही नाटकं भिन्न प्रकृतीची. विषय, कथानक, मांडणी यांत वैविध्य. पण विजयाबाईंचं दिग्दर्शन आणि कलाकारांचा अभिनय, सर्व तांत्रिक अंगं चोख. त्यामुळे प्रयोग अगदी संस्मरणीय होत.
तिसऱ्या दिवशी इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ पब्लिक अॅडमिनिस्ट्रेशनच्या नाटय़गृहात ‘ससा आणि कासव’चा प्रयोग होता. नेहमीप्रमाणे मी पूर्वतयारीसाठी संबंधितांना घेऊन थिएटरवर गेलो. नंतर या सर्वासाठी दुपारचा जेवणाचा डबा आणण्यासाठी मी पूना गेस्ट हाऊसवर गेलो. बंडोपंत सरपोतदारांनी तो तयारच ठेवला होता. पूना गेस्ट हाऊसवर गेलो अन् एक विचित्र दृश्य समोर पाहिलं. पहिल्या दिवशीच्या नाटकात काम केलेल्या एका कलाकारानं सकाळपासूनच दारूकाम सुरू केलं होतं. अन् व्हायचं तेच झालं. जेवायला म्हणून बसला. जेमतेम तीन-चार घास खाल्ले असतील. टेबलावरच्या जेवणाच्या ताटातच मान टाकून तो झोपी गेला. शेजारी श्री. पु. बसलेले. ते त्याला शांतपणे उठवताहेत. पाठीवरून हात फिरवताहेत. असा प्रसंग श्रीपुंच्या आयुष्यात कधी आला नसावा. मी गेलो अन् त्या कलाकाराला उठवून, हात धरून त्याच्या अंथरुणावर नेऊन झोपवलं. एव्हाना ही घटना सगळ्यांना कळली होती.
त्यावेळी पार्लमेंट सेशन चालू होतं. आमचा ‘ससा आणि कासव’चा प्रयोग संध्याकाळी ६.३० वाजताचा. तेव्हा मुंबई, पुणे, महाराष्ट्र सोडलं तर इतरत्र सगळे प्रयोग संध्याकाळीच होत. पहिल्या दोन नाटकांच्या प्रयोगांना प्रेक्षकांची तुडुंब गर्दी झाली होती. याही प्रयोगाला अफाट गर्दी. ‘ससा आणि कासव’चा प्रयोग तुफान रंगत चालला होता. आम्ही िवगेतून पाहत होतो. सगळे खुशीत होतो. अन् एकदम भा. कृ. केळकर यांनी आतून माइकवरून जाहीर केलं की, ‘नंग्या साधूंचा पार्लमेंटवर मोर्चा गेलाय आणि दंगल उसळलीय. ताबडतोब कर्फ्यू लागू करण्यात आला आहे. त्यामुळे नाटकाचा प्रयोग बंद करावा लागत आहे. तसंच उद्या होणारा ‘एक शून्य बाजीराव’ या नाटकाचा प्रयोगही होणार नाही.’
आम्ही भा. कृ. केळकरांना विनंती केली. कर्फ्यू लागलाच आहे तर निदान या नाटकाचा प्रयोग तरी पूर्ण होऊ द्यात. विजयाबाईंनीही केळकरांना विनंती करून पाहिली. पण केळकर सनदी अधिकारी. जबाबदारीची जाणीव असलेले. शिवाय नेमस्त. त्यामुळे त्यांनी आमची विनंती मान्य केली नाही. प्रयोग मधेच बंद करावा लागला.
काही क्षणांपूर्वी विंगेतून आम्ही आनंदोत्सव साजरा करीत होतो. आता सगळेच हिरमुसले झालो. भा. कृ. केळकर मला म्हणाले, ‘काकडे, टॅक्सी केलीय. शिवाय कर्फ्यूतून जाण्या-येण्यासाठी परवानगी काढलीय. तुम्ही सगळ्यांना पूना गेस्ट हाऊसवर घेऊन जा.’ आणि ते निघून गेले. प्रेक्षकही नाराज झाले. आत येऊन त्यांनी भा. कृं.ना विनंती केली होती. तेही निराश होऊन मग आपापले परवाने घेऊन निघून गेले. एका टॅक्सीत जास्तीत जास्त कलाकारांना बसवून मी तीन-चार खेपा केल्या. तोपर्यंत बॅकस्टेज वर्कर्सनी सेट बांधून ठेवला होता. शेवटच्या बॅचला घेऊन मी पूना गेस्ट हाऊसवर आलो. सगळेच हिरमुसलेले. निराश झालेले. काही रडवेले. सगळे आमच्या पहिल्या मजल्यावरच्या हॉलमध्ये जमलो होतो. वसंतराव देशपांडे यांना ही हकिगत कळली. ते वर आमच्यात येऊन बसले. बंडोपंत सरपोतदारांचा सकाळपासून आकंठ पाहुणचार चाललाच होता. सकाळीच आमच्यातील काहीजणांनी बाटल्या आणून ठेवल्या होत्या. त्या रित्या व्हायला लागल्या. झालेलं दुख विसरायचं होतं. वसंतराव म्हणाले, ‘दोस्तों, होता है ऐसा जिंदगी में. आपण निराश होतो अशावेळी. पण हे आपल्या हातात आहे का? भूल जाओ और सुनो..’
आणि मग जवळजवळ पहाटेपर्यंत वसंतरावांची गाण्याची बठक जमली. ट्रेनमध्ये टाइमपास करण्यासाठी म्हणून बाबा पास्रेकर यांनी ढोलकी घेतली होती. बाबा पास्रेकर हा प्रख्यात तबलावादक दामूअण्णा पास्रेकर यांचा पुतण्या. घरातच तो तालवाद्य शिकला होता. वसंतराव गाताहेत अन् ढोलकीवर बाबा पास्रेकर त्यांना साथ करतो आहे. अशी मफल वसंतरावांच्या आयुष्यात दुसरी झाली नसेल. आणि मफिलीला आमच्यासारखे श्रोतेही मिळाले नसतील. दत्ता भट, माधव वाटवे दाद देताहेत. बाबा पास्रेकरांनी ठेका धरून अचूक ताल धरलाय. वसंतराव गाताहेत. आमची निराशा, दु:ख विसरायला लावणारं त्यांचं ते गाणं. एकेक सुरावट, तिच्या नादलहरी आमच्या अंगावर रोमांच उभे करतायत. आतून उचंबळून यायला होतंय. कधी डोळे पाणावतायत त्यांच्या ठुमरीनं. त्या रात्रीचा तो अनुभव. नाटय़गृहातील हर्ष-निराशेचे िहदोळे. त्यातून डचमळलेली मनं. आणि आता इथे पूना गेस्ट हाऊसमध्ये ही अपरात्री चाललेली अनोखी गाण्याची मफल. आयुष्यभर विसरता न येणारी. काळजाच्या कोपऱ्यात साठवून ठेवलेली.
हळूहळू एकेकाची विकेट पडायला लागली. वसंतराव सुखावले. धन्य झाले. अन् म्हणाले, ‘अरुणभया, झोपा आता.’ अन् पाठीवर हात मारून तेही जिना उतरून झोपायला गेले.
सकाळी उठलो तर काय, दिल्लीतले सगळे व्यवहार सुरळीत चालू झाले होते. काल संध्याकाळी लागलेला कर्फ्यू उठला होता. म्हणजे आजचा आमचा ‘एक शून्य बाजीराव’चा प्रयोग होऊ शकला असता. पण आता काय उपयोग? भा. कृ. केळकरांनी कालच जाहीर करून टाकलं होतं की, ‘एक शून्य बाजीराव’ या नाटकाचा प्रयोग रद्द करण्यात आलाय म्हणून! तर अशी ही आमची दुसरी दिल्लीवारी संस्मरणीय झाली.
(अरुण काकडे यांच्या आगामी आत्मकथनातील संपादित अंश..)

First Published on March 5, 2014 5:56 am

Web Title: arun kakde
टॅग Diwali,Loksatta,Marathi
Next Stories
1 ब्रेकिंग न्यूज ई-मीडियाची
2 सृजनशील मुखपृष्ठे
3 काय बरे होणार या निवडणुकीत
Just Now!
X