22 November 2019

News Flash

व्यंगचित्रांकित साहित्यसंभार

चित्रकारी हा केवळ छंदच असू शकतो अशा समजुतीचा साठएक वर्षांपूर्वीचा जमाना! अशा काळात शि. द. फडणीस नावाच्या तरुणानं व्यंगचित्रक लेचा व्यवसाय स्वीकारावा, हे धाडसच म्हणायला

| March 5, 2014 05:58 am

चित्रकारी हा केवळ छंदच असू शकतो अशा समजुतीचा साठएक वर्षांपूर्वीचा जमाना! अशा काळात शि. द. फडणीस नावाच्या तरुणानं व्यंगचित्रक लेचा व्यवसाय स्वीकारावा, हे धाडसच म्हणायला हवं. खरं तर मुळात त्यांनी ठरवलं होतं- ब्लॉक मेकिं गचा व्यवसाय करायचा. अन् फावल्या वेळात गंमत म्हणून व्यंगचित्रे काढायची. पण चित्रकलेनं त्यांचा हात इतका घट्ट धरून ठेवला, की शेवटी त्यांनी ब्लॉक मेकिंगची सामुग्री विकून टाकली आणि व्यंगचित्रकलेतच करिअर करायचं ठरवलं! त्यांचा तो निर्णय योग्यच ठरला. कारण ब्लॉक मेकिं गचा वापर आता कालबाह्य़ झालाय, तर व्यंगचित्रकलेचं महत्त्व दिवसेंदिवस वाढत चाललंय.
घटकाभर करमणूक एवढाच व्यंगचित्राचा उद्देश नसतो. व्यंगचित्राला कोणताही विषय वज्र्य नाही. शि. दं.नी तर हलक्याफुलक्या चित्रांपासून बँकिं ग, वैद्यकशास्त्र, व्याकरण, कायदा अशा गंभीर विषयांसह अनेक विषयांवर व्यंगचित्रे काढली आहेत. फार काय, गणितासारखा क्लिष्ट विषयही मुलांसाठी त्यांच्या चित्रांनी रंजक बनवला आहे! महाराष्ट्र राज्य पाठय़पुस्तक मंडळासाठी त्यांनी गणिताची पुस्तके सचित्र केली. खरं म्हणजे त्यांनी आपल्या चित्रभाषेतून मुलांसाठी गणित सोपं केलं. सात भाषांमधून आणि पस्तीस लाख प्रतींतून शि. दं.ची चित्रं लाखो बालकांपर्यंत पोचली. हा अनुभव खूपच वेगळा आणि रोमांचक होता.
सगळ्याच दृश्यकलांचं एकमेकांशी नातं असतं. चित्रकला, शिल्पकला, छायाचित्रण, वास्तुकला, नाटय़कला यांच्यातलं नातं तर समजण्यासारखंच आहे. शि. द. फ डणीसांनी चित्रकलेत विविध प्रयोग केलेच; पण गौतम बुद्धाचं एक सुंदर शिल्पही घडवलंय. त्याचबरोबर हौशी रंगभूमीसाठी नेपथ्यही करून दिलंय. वास्तुशास्त्राच्या पुस्तकासाठी मुखपृष्ठ आणि आतील चित्रांचं रेखाटनसुद्धा केलंय. त्यांच्या ‘हसरी गॅलरी’ प्रदर्शनात विशुद्ध चित्रकलेच्या नमुन्यांप्रमाणे हलती व त्रिमिती चित्रंही मांडण्यात येतात. त्यातल्या चित्रांची कल्पना आणि तांत्रिक रचना शि. दं.नी स्वत: डिझाइन केलेली आहे. प्रदर्शनाला सोपा पर्याय म्हणून आम्ही दोघं ‘चित्रहास’ हा कार्यक्रम करतो. (व्यंगचित्रकलेबद्दल माहिती + प्रात्यक्षिक + स्लाइड शो) यासाठी लागणारा २३’’ x ३६’’ च्या कागदासाठी मोठाच्या मोठा थ्री-फोल्ड बोर्ड आणि चांगली अंगठय़ाएवढी जाड ठसठशीत रेषा काढणारा ब्रश हे त्यांनी स्वत:च्या कल्पनेप्रमाणे तयार करून घेतलंय.
कलावंत मंडळी गणित, फिजिक्स वगैरे विषयांपासून जरा लांबच असतात असा काहीसा समज असतो. शि. दं.ना मात्र या विषयांचं प्रेमच आहे. त्यामुळेच की काय, एक दम वेगळ्या किंवा अवघड वाटणाऱ्या विषयांवरही त्यांना व्यंगचित्र सुचू शक तं!
शि. दं.चं मॅट्रिकपर्यंतचं शिक्षण कोल्हापूरला झालं. कोल्हापूर म्हणजे कलापूर. चित्रकलेची परंपरा असलेलं शहर. मोठेपणी आपण चित्रकार व्हायचं, असं शि. दं.नी बालवयातच ठरवून टाकलं होतं. तेसुद्धा मुंबईला जाऊन जे. जे. स्कूल ऑफ आर्टमध्ये शिकून! त्यांच्या घरात काही चित्रकलेची परंपरा नव्हती. मुंबईतसुद्धा ना कोणी नात्याचं, ना गोत्याचं. थोरल्या भावाचा एक मित्र त्यावेळी मुंबईत होता. हाच काय तो एकमेव आधार! तोही गेल्या गेल्या टेकण्यापुरताच फ क्त! त्यामुळे घरून सहजासहजी परवानगी मिळाली नाही. पण त्यांनी जरा हट्टबिट्ट करून एकदाची परवानगी मिळवली. या महानगरात आज इथे, तर उद्या तिथे करत, अनेक प्रासंगिक अडचणींना तोंड देत त्यांनी शिक्षण पूर्ण केलं. कोल्हापूरला त्यांचं प्रशस्त तीनमजली वाडय़ात वास्तव्य होतं. तर इथे मुंबईत टेकण्यापुरती तरी जागा कशी मिळेल, ही विवंचना!
त्यातूनच जन्माला आलं एक व्यंगचित्र- ‘मुंबईतील हल्लीची बिऱ्हाडं’! सामानानं खचाखच भरलेल्या एका खोलीतल्या बिऱ्हाडात बाडबिस्तारा घेऊन एक पाहुणा येऊन टपकतोय. साहजिकच गृहिणी वैतागलेली आहे.. असं ते चित्र! काहीशा अस्वस्थ मन:स्थितीत, पण सहज काढलेलं ते पहिलंवहिलं व्यंगचित्र ‘मनोहर’मध्ये प्रसिद्ध झालं. साहजिकच त्याचा आनंद खूपच वेगळा होता. आपण व्यंगचित्र काढू शकतो अन् ते प्रसिद्धही होऊ शक तं, ही जाणीव सुखद धक्का देणारी होती. मग ‘हंस’च्या व्यंगचित्र स्पर्धेतही सहज म्हणून भाग घेतला आणि पाठोपाठ बक्षिसं मिळत गेली. त्यामुळे शि. दं.ना व्यंगचित्रकलेची गोडी लागली अन् ती वाढतच गेली.
यामागे ‘हंस’चे संस्थापक-संपादक कै . अनंत अंतरकर यांचं सातत्यानं प्रोत्साहन हेही एक कारण होतं. ‘आमच्या अंकासाठी तुम्ही व्यंगचित्रं देत जा.  तुमच्यात ती कला आहे. तिलाही थोडा वेळ देत जा,’ असं ते नेहमी सांगायचे. शि. द. मुंबईला गेले ते सरळ चित्रकला शिकण्यासाठी. (व्यंगचित्रकला शिक्षणाची सोय आपल्या देशात अजूनही कुठेच नाही!) सरळ चित्रं काढता काढता ते व्यंगचित्रांकडे आकर्षित झाले अन् विद्यार्थीवयातच त्यांची चित्रं प्रसिद्ध होऊ लागली.
चित्रकलेचा मूळ पायाभूत अभ्यास झाल्यामुळे शि. दं.च्या व्यंगचित्रांमध्ये रेखाटनाची सफाई येऊ लागली. अंतरकर त्यांच्या चित्रांवर खूश असायचे. इतके, की ‘मासिकाच्या मुखपृष्ठावर विनोदी चित्र आपण छापू. तुम्ही एक सुंदर बहुरंगी चित्र मला द्या,’ अशी कल्पना त्यांनी मांडली. त्याप्रमाणे ‘हंस’च्या विनोदी विशेषांकासाठी दोन वेळा शि. दं.ची चित्रं मुखपृष्ठावर झळकली. त्यांचं छान स्वागत झालं. त्यानंतर ‘मोहिनी’च्या दिवाळी अंकावर झळकलं ते सुप्रसिद्ध उंदीर-मांजराचं चित्र!
१९५२ च्या ‘मोहिनी’ दिवाळी अंकावर हे उंदीर-मांजराचं रंगीत चित्र प्रसिद्ध झालं आणि त्याला अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला! तोपर्यंत दिवाळी अंकाच्या मुखपृष्ठावर सिनेतारकेची छबी किंवा आरतीचं तबक घेतलेली, दागदागिने ल्यालेल्या सुंदर ललनेचं चित्रं छापणं हाच खाक्या होता. पण सुंदरीच्या मुखकमलाऐवजी चक्क उंदीर-मांजरं? तेही ऐन दिवाळीच्या सणाला? पण वाचकांना हे चित्र बेहद्द आवडलं. जाणकारांनीही ‘चाकोरीबाहेरचं मुखपृष्ठ’ म्हणून त्याचं कौतुक केलं. तेव्हापासून ‘मोहिनी’ दिवाळी अंकावर शि. द. फडणीसांचं चित्र हा सिलसिला चालू आहे. या वर्षी नाबाद ६२! उंदीर-मांजराचं हे चित्र शि. दं.च्या कलाप्रवासाला दिशा देणारं ठरलं. मराठी प्रकाशन व्यवसायालाही तेव्हापासून मुखपृष्ठांच्या संदर्भात एक नवी दिशा मिळाली असे म्हणायला हरकत नाही.
त्यापूर्वी पुस्तकं-मासिकांवर चित्रकार दलाल, मूळगावकर, द. ग. गोडसे वगैरेंची चित्रं असत. ती सुरेख असायची. दलालांनी तर साहित्याला कलात्मक चेहरा दिला. काही मासिकांतून व्यंगचित्रं असायची; पण त्यांचं स्थान बहुधा मासिकाच्या पानावर एखाद्या कोपऱ्यात! पानपूरक इतपतच त्यांना स्थान असे. अपवाद : ‘किलरेस्कर’! शं. वा. किलरेस्करांनी स्वत: काढलेलं, अर्थपूर्ण, उपदेशपर असं मोठय़ा आकारातलं व्यंगचित्र ‘किलरेस्कर’च्या प्रत्येक अंकात प्रसिद्ध व्हायचं. त्याला मजकुराची जोड असायची. मुखपृष्ठावर मात्र निराळं चित्र असायचं.
म्हणजे मुखपृष्ठावर विनोदी चित्र हे जवळजवळ नव्हतंच असं म्हणता येईल. यामागे सामाजिक आणि शैक्षणिक कारणंही आहेत. विनोदाची अभिरुची आपल्याकडे इंग्रजी शिक्षणामुळे रुळली. विनोदी लेखनही श्रीपाद कृष्ण कोल्हटकरांपासून प्रामुख्यानं सुरू झालं. पण त्यांच्या किंवा राम गणेश गडकरी, चिं. वि. जोशी यांच्याही पुस्तकांना सुरुवातीच्या आवृत्तींत विनोदी मुखपृष्ठ नव्हतं.
शि. दं.नी श्रीपाद कृष्ण कोल्हटकर, चिं. वि. जोशी, व. पु. काळे यांच्या पुस्तकांना मुखपृष्ठासाठी विनोदी चित्रं दिली.
‘सुदाम्याचे पोहे’, चिं. विं. चं ‘चिमणरावाचं चऱ्हाट’ तसेच व. पुं.चं ‘रंगपंचमी’ या पुस्तकांची अंतर्बाह्य़ सजावट शि. दं.चीच आहे. ‘सजावट’ हा शब्द रुळला आहे; पण तो तितकासा अन्वर्थक नाही. एखादं पुस्तक सुंदर दिसावं म्हणून ती चित्रं नसतात; तर लेखकाला शब्दांतून जे सांगायचं असतं, त्याला पूरक किंवा वेगळं परिमाण देणारी अशी ती चित्रं आहेत.
उदा. पु. लं.च्या ‘अपूर्वाई’ किंवा ‘पूर्वरंग’ या पुस्तकांतली चित्रं! पु. ल. तर शब्दप्रभूच होते. पण एकदा फ्रान्समधील प्रवासात त्यांना वेटरला फ्रेंचमध्ये दूध कसं मागायचं, ही ‘शाब्दिक’ अडचण उद्भवली. शेवटी गाईचं चित्र काढून पु. लं.नी ‘दूध हवंय’ असं सांगितलं! शब्द जिथे संपतात तिथे चित्र सुरू होतं- ते असं. या प्रसंगाचं पु. लं.नी चांगलं परिच्छेदभर वर्णन केलंय. त्याला चपखल बसणारं चित्र शि. दं.नी काढलंय. ‘अपूर्वाई’ आणि ‘पूर्वरंग’ या दोन्ही लेखमाला चालू असताना किंवा नंतर पुस्तकरूपानं प्रकाशित झाल्यावर त्यातल्या चित्रांबद्दलचे खूप सुंदर प्रतिसाद तर मिळालेच; पण अजूनही काही रसिक त्या चित्रांना दाद देतात. स्वत: पु. लं.नीसुद्धा ‘माझे लेख आणि फडणीसांची चित्रं यांचं असं काही गणित जमलंय!’ या शब्दांत या चित्रांचं कौतुक केलेलं आहे. (‘पूर्वरंग’-प्रस्तावना)
विनोदी पुस्तकाला विनोदी मुखपृष्ठ हवं, ही प्रकाशकांची मागणी समजण्यासारखी आहे.  द. मा. मिरासदार यांच्या तर तब्बल दीड डझन पुस्तकांना शि. दं.चं मुखपृष्ठ आहे. मात्र, कधी कधी विनोदी नसणाऱ्या पुस्तकालाही ‘शि. दं.चं विनोदी मुखपृष्ठ हवं,’ असा आग्रह धरणारे प्रतिष्ठित लेखक भेटतात. मला वाटतं, यात शि. दं.वरील प्रेमाप्रमाणेच विनोदी मुखपृष्ठांची वाढती आवड हेही कारण असावं.
व्यंगचित्र म्हणजे काहीतरी वेडंवाकडं चितारलेलं आणि घटकाभर हसवणारं चित्र- असा पूर्वी गैरसमज होता. सुदैवानं आता तो दूर झालाय. व्यंगचित्राला काही वैचारिक बैठक असते.. असू शकते, हे आता लोकांना पटलंय. म्हणूनच हजार शब्दांत जे सांगता योणार नाही ते एक व्यंगचित्र सांगून जातं, असं माणसं सहज बोलून जातात.
जिथं शब्दांचा उत्सव असतो तिथं आता व्यंगचित्रकारालाही मानाचं स्थान मिळू शकतं. चिपळूणला ८७ वं अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन झालं. त्यावेळी ‘आमच्या रेषा- बोलतात भाषा’ असा एक परिसंवाद ठेवला होता. त्या परिसंवादाचे अध्यक्ष होते शि. द. फडणीस! साहित्य संमेलनात एका व्यंगचित्रकाराला हा बहुमान मिळावा, ही गोष्ट विशेषच नाही का? संमेलनाच्या ८६ वर्षांच्या वाटचालीत हे कुणालाच सुचलं नव्हतं. चित्रकला आणि व्यंगचित्रकला यांबद्दलची जाणीव, सजगता निश्चितच वाढतेय याचं हे द्योतक आहे.
आज शि. द. एक नामवंत व्यंगचित्रकार आहेत. राजकीय टीकाचित्रांमुळे फत्ताडं नाक किंवा ओबडधोबड चेहरे म्हणजे व्यंगचित्र असं पूर्वी काही लोकांना वाटायचं. त्याउलट सुंदर चेहरेपट्टी, सुबक रचना आणि आकर्षक रंगसंगती हे शि. दं.च्या चित्रांचं वैशिष्टय़ आहे. त्यांच्या चित्रांत शब्द जवळजवळ नसतातच. शिवाय त्यांच्या चित्रांतला विनोद प्रसंगनिष्ठ असतो. त्यामुळे कोणत्याही भाषिकाला ते चित्र समजतं. अगदी परदेशीसुद्धा! शि. दं.ची बहुसंख्य चित्रं मुखपृष्ठावर आलेली आहेत. त्यामुळे चांगला कागद आणि उत्तम बहुरंगी छपाई यांचाही लाभ नकळत मिळतो.
बंगलोरला ‘हसरी गॅलरी’ प्रदर्शन झालं. त्यावेळी उद्घाटक आपल्या भाषणात म्हणाले, ‘फडणीसांची काही चित्रं मला कवितेप्रमाणे वाटतात, तर काही चित्रं पेंटिंगप्रमाणे वाटतात! मात्र, काव्य किंवा नर्मविनोद एवढय़ापुरताच त्यांचा कुंचला सीमित नाही.’
शहरीकरणाचा रेटा किती विलक्षण आहे.. त्यापायी माणूस किती अगतिक होतो, हे ‘डबलडेकर बस’या चित्रांत दिसतं. एकेकाच्या डोक्यावर पाय देऊन बसमध्ये शिरायची वेळ आली तर लोक उद्या त्यालाही तयार होतील. ही कल्पना विदारक आहे. दारू पिऊन बायकोला बडवणाऱ्या नवऱ्यांच्या हकीकती आपण ऐकतो. पण दारूडय़ा नवऱ्याला बायकोने (धुण्याप्रमाणे) बडवलं तर?  तर सुटेल का त्याची दारू? शि. दं.च्या चित्रांतून अशा सामाजिक प्रश्नांचाही विचार सहजपणे डोकावतो.
बऱ्याचदा मुखपृष्ठावरील विनोदी चित्र चावट किंवा उत्तानही असतं. कधी कधी संपादकांचीच ती मागणी असते. शि. दं.नी मात्र अगदी उमेदवारीच्या काळातही असली चित्रं काढली नाहीत. सवंग प्रसिद्धीचा त्यांना कधीच मोह पडला नाही. यात सोवळेपणाचा भाग नाही. एका मुखपृष्ठावर तर त्यांनी चक्क न्यूड पेंटिंग चितारलं आहे. मात्र, कलाकाराच्या स्टुडिओत पाहुणा येतो तेव्हा चित्रातल्या न्यूडने कॅनव्हासच अंगाभोवती गुंडाळून लज्जारक्षणाचा प्रयत्न केला आहे! सेक्स अपीलपेक्षा कल्पकता हीच या चित्राची अधिक महत्त्वाची बाजू आहे.
तिच्या साडीवर मांजराचे छाप आणि त्याच्या शर्टावर उंदराचे छाप हे शि. द. फडणीसांचं गाजलेलं चित्र! शि. दं.च्या आणखीही एका चित्रात उंदीर-मांजर आहे. एक मांजरी सुस्तावून झोपली आहे. पिल्लांना पाजतेय. आनंदानं, समाधानानं तिनं डोळे मिटून घेतलेत. आणि डोळे मिटून घेतल्यामुळे आपल्या चार पिल्लांच्या बरोबरीनं हे पाचवं कोण दूध पितंय, याची तिला खबरही नाही! त्या क्षणी ते उंदराचं पिल्लू तिचं भक्ष्य नाही की मांजरीही मूषकबाळाची शत्रू नाही. त्या क्षणी ती फक्त मातामाऊली आहे.
‘कलाकार, कवी आणि शास्त्रज्ञ हे एकाच जातकुळीतले.. उद्याची स्वप्नं बघणारे!’ असं विधान आपण नेहमी ऐकतो. शि. दं.च्या एका चित्रानं या विधानाचा विलक्षण प्रत्यय दिला आहे. या चित्रात आपण बघतो की, टेलिफोनच्या साह्य़ानं एक डॉक्टर दूर अंतरावरच्या तरुणीला तपासतोय.  हे चित्र जून १९६० मध्ये प्रकाशित झालं. त्यानंतर १० एप्रिल १९६६ च्या दै. ‘केसरी’मध्ये ‘टेलिफोनवरून हृदयाचे ठोके’ या मथळ्याची बातमी प्रसिद्ध झाली. बातमी वाचली अन् शि. दं.पेक्षाही मला जास्त आनंद झाला. एखादी व्यक्ती सहज काहीतरी बोलते आणि योगायोगानं ते खरं ठरतं, अशी आणि इतकीच भावना या आनंदामागे होती.
आठ वर्षांच्या मुलापासून ऐंशी (किंवा अधिक) वयापर्यंतच्या माणसांना शि. दं.ची चित्रं मनापासून का आवडतात? मला वाटतं, मनाला प्रसन्नता देण्याची एक विलक्षण क्षमता त्यांच्या चित्रांत आहे. ‘हसरी गॅलरी’ प्रदर्शनात याचा प्रत्यय येतो. लांबच लांब रांगा लावून प्रदर्शनाला रसिक गर्दी करतात. स्मितहास्यापासून सातमजली हशापर्यंत त्यांच्या प्रतिक्रिया असतात. तरीदेखील काही अनुभव अगदी संस्मरणीय आहेत.
दिल्लीच्या प्रदर्शनात एक माणूस दररोज यायचा. हा रसिक अपंग होता. कुबडय़ा घेऊन यायचा. तासन् तास चित्रं न्याहाळायचा. मधूनच ‘वाह! क्या कमाल की आर्ट है!’ असं म्हणायचा. नाशिकमधील प्रदर्शनाचा हॉल पहिल्या मजल्यावर होता. आजारातून उठलेला एक रसिक. त्याला जिना चढायला डॉक्टरांची परवानगी नव्हती. तर हा पठ्ठय़ा स्ट्रेचरवरून प्रदर्शनापर्यंत आला! प्रदर्शन बघून म्हणाला, ‘खूप म्हणजे खूप बरं वाटलं. हे एक टॉनिकच जणू मला आज मिळालंय.’ बेळगावच्या प्रदर्शनात दोन महिला धारवाडहून मुद्दाम आल्या होत्या. म्हणाल्या, ‘प्रदर्शनाचं कळलं त्याचवेळी यायचं ठरवलं होतं. इतका आनंद झाला प्रदर्शन बघून! संसारातले सारे व्याप-ताप विसरून गेलो बघा.’
प्रदर्शनात प्रेक्षक असा खूप आनंद घेऊन परत जातात. अनेकजण जाताना ‘लाफिंग गॅलरी’ या चित्रसंग्रहाची प्रत विकत घेतात. या पुस्तकाच्या आजवर अठरा हजाराहून अधिक प्रती खपल्या आहेत. शि. दं.ची चित्रं परदेशातही गेली आहेत- छापील किंवा मूळ स्वरूपात आणि वेबसाइटवरही!
या विविध अनुभवांचा प्रवास रेखाटणारं आत्मवृत्त त्यांनी लिहिलंय- ‘रेषाटन’! त्याला वाचकांचा तर उत्तम प्रतिसाद आहेच; पण महाराष्ट्र साहित्य परिषदेचा लक्ष्मीबाई टिळक पुरस्कारही त्याला मिळाला. आता त्यांचं आणखी एक पुस्तक येऊ घातलंय- ‘फडणीस गॅलरी’! हे त्यांच्या कलाप्रवासाबद्दल समालोचक असं पुस्तक असेल. संपूर्ण आर्ट पेपर, संपूर्ण रंगीत छपाई, मोठा आकार अन् भाषा इंग्लिश! ही ‘लाफिंग गॅलरी’ची डीलक्स एडिशन नसून वेगळंच पुस्तक आहे.
विनोद म्हणजे पृथ्वीतलावरचं अमृत असं म्हणतात. आता ते अमृतबिमृत कुणी हो पाहिलंय? पण चांगला विनोद माणसाला निर्मळ आनंदाचा ठेवा देत असतो, त्याचं मानसिक स्वास्थ्य राखत असतो. जीवनात अडीअडचणी, काटेकुटे असतातच; पण त्यापेक्षाही मिळणाऱ्या आनंदाचा विचार करणं, हीच नवसंजीवनी. नाही का?

First Published on March 5, 2014 5:58 am

Web Title: cartoon literature
Just Now!
X