22 May 2018

News Flash

ती जुनी दिवळी नव्या दमाने आली…

अखेर ती जुनी दिवाळी नव्या दमाने दाखल झाली. जुन्या जगाच्या गालावर नवी झळाळी आली.. कानठळ्या बसविणाऱ्या गडगडाटी फटाकेबाजीमुळे दाटलेल्या धूरभरल्या धुक्यातून पहाट फटफटू लागली.

| Updated: November 2, 2013 2:43 AM

अखेर ती जुनी दिवाळी नव्या दमाने दाखल झाली. जुन्या जगाच्या गालावर नवी झळाळी आली.. कानठळ्या बसविणाऱ्या गडगडाटी फटाकेबाजीमुळे दाटलेल्या धूरभरल्या धुक्यातून पहाट फटफटू लागली. उगवत्या सूर्याच्या सोनेरी किरणांभोवती धुराच्या वेटोळ्यांनी फेर धरला, आणि घुसमटवून टाकणाऱ्या वासातून वाट काढत अखेर दिवाळीच्या पहाटेची पहिली किरणे धरणीवर उतरली..
कुठे पहाटेवर सुरांची धुंदी चढली, कुठे सुगंधी उटण्याने केलेल्या पहाटस्नानानंतरच्या आरती-धुपारतीचे सूर घुमू लागले.. घरासमोरच्या चतकोर तुकडय़ांवर रांगोळीच्या रंगांची उधळण झाली, आणि दारे खिडक्यांवर आपले रंगीबेरंगी डोळे मिचकावत इकडून तिकडे गिरक्या घेणाऱ्या चिनी दिव्यांची प्रकाशकिरणे झेलत झेंडूच्या माळा झुलू लागल्या. रस्ते गर्दीने फुलून गेले.. आनंद, उत्साहाला उधाण आले आणि सारी दुखे, व्यथा, वेदना विसरून घराघराची आपापली दिवाळी आनंदाने बहरून गेली.. बाजारातल्या मिठायांच्या गोडव्याला घरी बनविलेल्या फराळाच्या खमंगपणाची साथ मिळाली. मराठमोळ्या घरांत देवपूजेनंतरच्या फराळांचा फड बसला, आणि नेहमी पहिल्या चहाची सोबत करणाऱ्या वर्तमानपत्राबरोबर नवा दिवाळी अंकही हातात खेळू लागला.
या दिवाळीला असंख्य रूपे आहेत. धनिकांची दिवाळी, गरीबांची दिवाळी.. तरुणांची दिवाळी, मुलांची दिवाळी, आजीआजोबांची दिवाळी.. बोनसची दिवाळी, बिनबोनसची दिवाळी.. कुणाची सुट्टीची दिवाळी, तर कुणाची डय़ूटीची दिवाळी.. कुणाची अंधाराची दिवाळी, कुणाची रोषणाईची दिवाळी.. दिवाणखान्यात रंगलेली तीनपत्तीची खुळखुळती दिवाळी, कुठे फुटपाथवरची जेमतेम पैशातली दिवाळी. कुठे परंपरेची दिवाळी, तर कुठे आधुनिकतेची दिवाळी.. कुठे सुरांची दिवाळी.. एसएमएसची दिवाळी, व्हॉटसअपची दिवाळी.. असंख्य रंग आणि रूपे घेऊन दाखल झालेल्या या दिवाळीचा माहोल आता दाटून राहणार आहे. येत्या तीनचार दिवसांत अवघी मुंबई परस्परांवर शुभेच्छांचा वर्षांव करेल..

First Published on November 2, 2013 2:43 am

Web Title: diwali comes with happiness
टॅग Diwali
  1. No Comments.