20 March 2019

News Flash

आठवणीतील दिवाळी: ऐन दिवाळीत डेंग्यू!

'हसवाफसवी' नाटकाचे प्रयोग यशस्वीपणे सुरू असल्याने माझ्यासाठी यंदाची दिवाळी आधीपासूनच सुरू झालीये. १५ वर्षांपूर्वी आलेले, दिलीप प्रभावळकर यांच्या सहा भूमिका असलेले

| November 1, 2013 01:47 am

‘हसवाफसवी’ नाटकाचे प्रयोग यशस्वीपणे सुरू असल्याने माझ्यासाठी यंदाची दिवाळी आधीपासूनच सुरू झालीये.  १५ वर्षांपूर्वी आलेले, दिलीप प्रभावळकर यांच्या सहा भूमिका असलेले हे प्रसिद्ध नाटक करण्याचे भाग्य मला मिळाले. आतापर्यंतच्या सर्वच दिवाळी माझ्यासाठी चांगल्या गेल्या आहेत.  पण लक्षात राहण्यासारखी दिवाळी म्हणजे १२ वर्षापूर्वी ऐन दिवाळीत मी डेंग्यूने आजारी होते.  डेंग्यू झालेला मराठी चित्रपटसृष्टीतील मी पहिलाच अभिनेता असून, त्यावेळी या आजाराने अनेक लोकांचे पटापट बळी जात होते. मला तातडीने रुग्णालयात भरती करून वेळेवर उपचार करण्यात आले. या आजारातून पूर्णपणे बरा होऊन सहीसलामत बाहेर पडायला १५ ते २० दिवसाचा कालावधी लागला.
दिवाळी दरम्यान मी ‘संगीत पहाट’चे कार्यक्रम करतो. दिवाळी सण हा उत्साहाचा आणि एकमेकांशी आनंद शेअर करण्याचा सण आहे. या दिवशी कुटुंबीयांसोबत मजेत वेळ घालवतो. आम्ही मित्र परिवार एकमेकांना भेटून शुभेच्छा देऊन, फराळाचा आस्वाद लुटतो. दिवाळी फराळातील कानोले हा पदार्थ माझा खूप आवडीचा असून, आमच्या सीकेपी लोकांमध्ये खासकरून दिवाळीत हा पदार्थ बनवला जातो.
माझा जन्म पार्ल्यातला. मी येथेच लहानाचा मोठा झालो. सांस्कृतिक आणि शैक्षणिक वारसा असलेले पार्ले हे मानाचे उपनगर आहे. माझे शिक्षणदेखील येथेच झाले. लहानपणीची दिवाळी अजूनही आठवते. दिवाळीत सकाळी लवकर ऊठून अंघोळ करून, नवीन कपडे घालून आजूबाजूचे सर्वजण पार्लेश्वराच्या देवळात दर्शनासाठी जायचो. त्यानंतर मित्र परिवारातील सर्वजण प्रत्येकाच्या घरी जाऊन एकमेकांना दिवाळीच्या शुभेच्छा द्यायचो. घरातील मोठ्या माणसांच्या पाया पडून त्यांचे आशीर्वाद घ्यायचो. एकत्र फराळ करायचो. कामाच्या व्यापामुळे या सर्व गोष्टींपासून दुरावलो आहे. या सर्व गोष्टी खूप ‘मिस’ करतो.
आवाज करणारे आणि खूप धूर सोडणारे फटाके उडवणे कधीच बंद केले. त्याचप्रमाणे अशाप्रकारचे फटाके न वापरण्याचे आवाहन लोकांनादेखील करीत असतो. पूर्वी काकांबरोबर घरीच आकाशकंदील बनवायचो. आता वेळ नसल्याने बाजारातून पारंपरिक पद्धतीचे रेडिमेड आकाशकंदील आणतो. आमचे एकत्र कुटुंब असून, प्रत्येकाच्या दारासमोरचा आकाशकंदील हा आयडेंटिकल असतो. माझी बायको ख्रिश्चन असल्याने दिवाळीच्या दिवसांमध्ये घरासमोर आकाशकंदील लावतो, तर ख्रिसमसला चांदणी लावतो.
(छाया सौजन्यः फेसबुक पेज)

First Published on November 1, 2013 1:47 am

Web Title: diwali in memory pushkar shrotri says he faced dengue in diwali 2
टॅग Diwali