12 July 2020

News Flash

हे सारे कोठून येते?

हा प्रश्न विजय तेंडुलकरांनी विचारला त्याला आता बरीच र्वष झाली. पण त्याचं उत्तर काही मिळालेलं नाही. मिळणारही नाही कदाचित. उलट, त्याच्या जोडीला आणखीही उपप्रश्न येऊन

| February 20, 2013 08:26 am

हा प्रश्न विजय तेंडुलकरांनी विचारला त्याला आता बरीच र्वष झाली. पण त्याचं उत्तर काही मिळालेलं नाही. मिळणारही नाही कदाचित. उलट, त्याच्या जोडीला आणखीही उपप्रश्न येऊन पडलेत. का आणि कसे, हे. सारेच दीप कसे मंदावले आता.. असं वाटत असताना माणसं उभी राहतात. लढतात. आपल्या परीनं परिस्थिती नावाच्या अजस्र गोळय़ाला आकार द्यायचा प्रयत्न करतात. मोडत नाहीत. पिचत नाहीत. हे पाहणं खूप काही शिकवून जातं आपल्याला. त्यामुळे एक सजग आणि काही मूल्यांचा नुसता आदरच नाही, तर त्यांचं पालन करणारं वर्तमानपत्र म्हणून दै. ‘लोकसत्ता’मध्ये या साऱ्याचा शोध घेण्याचा प्रयत्न सतत सुरूच असतो. आमचा हा दिवाळी अंकदेखील त्याच शोधाचा एक भाग!
एका पिढीतल्या पिढीतसुद्धा अंतर वाढत असताना अशा काही पिढय़ांतलं अंतर सहज मिटविणारे गुलजार त्यामुळेच या अंकातल्या कथांत दिसतील. त्या गुलजार यांना ज्या कवीनं नादावलं होतं, त्या ग्रेस यांच्या कवितेचा त्यांच्याच चंद्रमाधवीच्या प्रदेशात जाऊन घेतलेला शोध या अंकात आढळेल. त्या कवितांइतकंच अलवार वाङ्मयविश्व ज्यांनी अनुभवलं, घडवलं, त्या ‘मौजे’च्या दिवसांचा आलेख या अंकात सापडेल. आणि त्या विश्वाचा आपल्या परीनं अर्थ लावणाऱ्या ‘लंपन’कर्त्यांच्या आयुष्याचं प्रतिबिंबही इथं पाहायला मिळेल. जगण्याच्या संदर्भात कलेला वास्तवाची टोचणी असते. या वास्तवाचे कडू-गोड झोके माहिती तंत्रज्ञान क्षेत्राला जितके बसले तितके अन्य कोणत्या क्षेत्राने अनुभवले नसतील. त्याची कहाणी या अंकात आढळेल. या वास्तवाच्या आर्थिक परिमाणामुळे पाश्चात्य जगात एक नवीनच जीवनशैली अस्तित्वात आली. पती-पत्नीसारखंच राहायचं; पण लग्नाच्या बंधनाचा विळखा पडू द्यायचा नाही. आपल्याकडेही हे आता मोठय़ा प्रमाणावर होतंय. त्याचा वास्तववादी धांडोळा या अंकात आहे. गेलं वर्ष हे जनतेच्या कथित क्रांतींचं होतं, तर आताचं वर्ष त्या न झालेल्या क्रांत्यांनंतर येणाऱ्या शिणवटय़ाचं आहे. गेल्या वर्षी वृत्तमानस घडवणाऱ्या तीन क्रांत्यांचा ताळेबंद या अंकात वाचायला मिळेल.
तो देत असताना प्रसिद्धी माध्यमांच्या मनोरंजनीकरणाचा मुद्दा दुर्लक्षित करता येणार नाही. आता लोकांना वाचायला आवडत नाही.. असं वर्तमानपत्रवालेच म्हणायला लागलेत. हे भयंकरच. याची दोनच कारणं असू शकतात. एक म्हणजे असं म्हणणारी वर्तमानपत्रं आता पत्रकारांपेक्षा जाहिरात खात्यातल्या मंडळींच्या हाती गेली आहेत, हे. आणि दुसरं म्हणजे आता लिहिता न येणारी पत्रकार मंडळीच या व्यवसायात उच्च पदांवर गेली आहेत, हे. या दोन्हींपैकी कोणतं कारण कोणाला लागू होतं, याचा विचार आता वाचकांनी करायचा आहे. तसा तो नाही केला, तर मराठीतील उज्ज्वल, तेजस्वी लेखनपरंपरा क्षीण होण्याचा धोका संभवतो. आणि तसं झालंच, तर ती पुढील काळातील अंधाराची नांदी असू शकते. दिवाळीतील मौजमजा आणि उत्साहाच्या रोषणाईत ही बाब दुर्लक्ष करून चालणार नाही.
एरवी गेल्या वर्षीच्या तुलनेत हे वर्ष तसं बरं गेलं म्हणायला हरकत नाही. मंदीचे काप जाऊ लागलेत. भोकांचे व्रणदेखील लवकरच भरतील. पुन्हा एकदा अर्थव्यवस्था उठून उभी राहील आणि तुम्हा-आम्हाला जगण्याचा रोजचा गाडा ओढायला बळ मिळेल. अर्थमंदी तर दूर होईलच; पण त्याबरोबरच बौद्धिक, सांस्कृतिक आणि राजकीय क्षेत्रालादेखील आलेलं म्लानपण जाईल आणि सर्वार्थानं आपलं आयुष्य उजळेल, या शुभचिंतनासह…

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 20, 2013 8:26 am

Web Title: editorial in loksatta diwali anka 2012
Next Stories
1 गुलजार अक्षरचित्रे!
2 साहिर आणि जादू
3 फुटपाथवरून…
Just Now!
X