आयटी क्षेत्रात काम करणाऱ्या युवावर्गाला नोकरीतील सुरक्षितता, मंदी, राहणीमान या साऱ्याबद्दल नेमकं काय वाटतं, हे जाणून घेण्याचा केलेला प्रयत्न-
‘२००८-०९ ची आर्थिक मंदी भयानक होती. सकाळी ऑफिसला गेलेला माणूस संध्याकाळी घरी येईल तेव्हा त्याची नोकरी शाबूत असेलच याची खात्री नव्हती. ऑफिसमध्ये गेल्यावर दुपारी एचआरचा मेल यायचा आणि कळायचं की, आपल्या कुठल्यातरी सहकाऱ्याचा आज शेवटचा दिवस. बाडबिस्तरा गुंडाळा आणि घरी चला..’ नीलेश सांगत होता. नीलेश तेंडुलकर जवळपास गेली साडेसात वर्षे आयटी क्षेत्रात नोकरी करतोय. तो आणि त्याची बायको गौरांगी दोघंही पुण्यात एकाच आयटी कंपनीत काम करतात. नीलेश मुंबईचा, तर गौरांगी पुण्याची. आयुष्याकडे अत्यंत सकारात्मक दृष्टिकोनातून बघणारं हे जोडपं. नीलेश सांगतो, ‘ऑफिसला जाताना-येताना एकत्र असतो आणि दुपारचं जेवण आम्ही एकत्र घेतो. त्यामुळे आम्हाला शेअरिंगला पुरेसा वेळ मिळतो. आठवडाभर एकमेकांची तोंडंही पाहायची नाहीत आणि शनिवार-रविवारीच एकमेकांना भेटायचं, असं आमच्या बाबतीत घडत नाही. आमच्या ऑफिस कॅम्पसवर खूप सोयी आहेत. टेबल-टेनिस, कॅरम, सायकलवरून फिरू शकतो. किंवा नुसतं वॉकदेखील करण्याची सोय आहे. वरवर पाहता या खूप छोटय़ा गोष्टी वाटतात, पण मला वाटतं, याच छोटय़ा गोष्टींनी फरक पडतो. तुमचं बॉन्डिंग चांगलं होतं. पण हे सगळं मला मुंबईत करता येणं कठीण आहे. मुंबईत ट्रॅफिकमध्येच अर्धा दिवस जातो. आई-बाबा मुंबईला असतात. शनिवार-रविवार मुंबईला चकरा होतात. तिथलं माझं घर, आई-बाबांना मी मिस तर जरूर करतो, पण इथं जे ‘क्वालिटी लाइफ’ मी जगतोय ते तिथं शक्य नाही. नीलेशनं स्वत:ची नोकरी, व्यक्तिगत आयुष्य हे सगळं व्यवस्थित सांभाळलंय. पण पुण्यातल्या पुण्यातच शिफ्टिंग करणारी अनेक जोडपी आहेत. आई-वडील सदाशिव पेठेत, पण मुलगा आणि सुनेचं ऑफिस हिंजेवाडीत. त्यामुळे दोघं फ्लॅट घेऊन हिंजेवाडीत राहतात.
आमची पिढी भावनिक गुंतवणुकीपेक्षा व्यावहारिक, सोयीस्कर आहे त्याला अधिक प्राधान्य देतेय. कुटुंबापासून दूर गेल्याचं दु:ख जरूर आहे; पण ते त्यात कुढत बसत नाहीत. अर्थात्, हे प्रातिनिधिक उदाहरण नाही, पण निदान तसे प्रयत्न होताना तरी दिसताहेत. कामाचे ताण कालही होते, आजही आहेत. सतत समस्या, तणावाचा विचार करण्यापेक्षा त्यातून मार्ग कसा निघू शकतो किंवा ते ताण आणि खासगी आयुष्य वेगवेगळे ठेवण्याचे मार्ग आजच्या आयटीज्ना सापडले आहेत.
मितेश आणि लीनादेखील असंचं आयटीतलं जोडपं. दोघेही गेली चार वर्षे या क्षेत्रात आहेत. त्यांच्या लग्नाला सहाच महिने होताहेत.. मितेश एका एमएनसीत ‘सॉफ्टवेअर डेव्हलपर’ म्हणून काम करतो, तर लीना वर्क फ्रॉम होम. ती ‘सीनिअर प्रोजेक्ट मॅनेजर’ आहे. घरीच काम करत असल्यामुळे कामाचे तास नक्की नाहीयेत. मितेशचं घर आणि ऑफिस १५ मिनिटांच्या अंतरावर आहे. त्यामुळे तो मला संध्याकाळी फोन करतो, ‘मी निघू का, तुझं काम संपलंय का?’ मी म्हणते, ‘एखाद्दोन तास लागतील.’ मग तोही तोपर्यंत ऑफिसमध्ये काम करत बसतो. उशीर होत जातो. अशा वेळी मला वाटतं की, मी त्याला वेळ देऊ शकत नाहीये. मला या गोष्टीवर काम करायचंय. कधी कधी डेडलाइन जवळ आली की रात्रभर जागरण होतं. मी खूपदा रात्री १० ते पहाटे सहापर्यंत काम करते. कधी कधी दिवसभर कॉम्प्युटरसमोर असते तेव्हा मितेश घरातलं सगळं काम मनापासून करतो. माझ्याच क्षेत्रातला नवरा असल्यानं मी इतका वेळ काय काम करतेय, किंवा हे काम आता माझ्यासाठी किती महत्त्वाचं आहे, हे त्याला कळतं. त्याने घरातल्या कामांची जबाबदारी घेतल्यामुळे मी संपूर्ण झोकून देऊन काम करू शकते. पण या पातळीपर्यंत आमचं नातं पोहोचणं सोपं नव्हतं. आधी खूप भांडणं व्हायची. आमचा प्रेमविवाह. त्यामुळे सगळं सोपं वाटलं होतं. पण मितेश खूप समजूतदार आहे. त्याला नीट समजावून सांगितलं की त्याला पटतं. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्याचं माझ्यावर खूप खूप प्रेम आहे. भांडण, अहंकार, वैचारिक मतभेद हे कोणत्याही नातेसंबंधात असतातच. पण तुम्ही ते कसं हाताळता, यावर तुमच्या नात्याचं यशापयश अवलंबून असतं. ‘वीकएन्ड कल्चर’ आयटीवाल्यांना सरावाचं झालंय. अचानक पैसा हातात आल्यावर त्याची झिंग येणं स्वाभाविक आहे. आज एका आयटी ग्रॅज्युएटला तीन ते साडेतीन लाखांचं पॅकेज मिळतं. शिवाय मोठय़ा कंपनीत जॉब सिक्युरिटीदेखील असते. एखाद्या छोटय़ा गावातून किंवा शहरातून आलेल्या मुला-मुलींसाठी हा आकडा खूप मोठा असतो. माझ्या माहितीत असे अनेक मित्र-मैत्रिणी आहेत, ज्यांच्या वीकएन्ड पार्टीजचं बिल ५-१० हजार रुपये येतं. प्रत्येक वीकएन्डला दहा हजार खर्च नॉर्मल आहे. डिस्को-दारू, सिनेमा, शॉपिंग, सोमवार ते शुक्रवार मान मोडून काम करायचं आणि तो ताण शनिवार-रविवारी घालवायला पाहायचं. पैशामुळे तुमची क्रयशक्ती वाढलेली असते. हल्ली कर्ज मिळणेदेखील सोपे झालेय. अनेकदा ऑफिसमधल्या एखाद्या मित्राची, मैत्रिणीची जीवनशैली आपल्याला प्रभावित करते. नवनवीन फोन्स, ब्रॅन्डेड कपडे या सगळ्या वस्तू गरज आहे का, यापेक्षा मी विकत घेऊ शकतो किंवा शकते, मला परवडतं, या विचारातून विकत घेतल्या जातात. शिवाय या सगळ्या गोष्टी मला समाजात मिळणारं स्थान, माझे सहकारी, दोस्त मंडळी यांच्यात मला मिळणारा मान यांच्याशी जोडल्या जातात; आणि त्यातूनच माझा सहकारी हनीमूनसाठी परदेशी फिरायला गेला म्हणून मलाही जायचंय, पण माझी आर्थिक ताकद इतकी नाही, म्हणून मित्रांकडून पैसे उधार घेण्यापर्यंत मजल जाते.
२०११-१२ ची आर्थिक मंदी मात्र थोडी वेगळी आहे. माणसं कमी करण्यापेक्षा अनेक कंपन्यांनी आपले खर्च कमी केलेत. कर्मचाऱ्यांना मिळणाऱ्या सोयी-सुविधांवर गदा आलीय किंवा कॅम्पस इंटरव्ह्यूमध्ये नवीन उमेदवार भरती कताना त्यांचं नोकरीत रुजू होणं आठ महिने ते एक वर्षांपर्यंत पुढे ढकललंय. नोकरीवरून माणसं काढण्यापेक्षा माणसं घेतानाच कमी घ्यायची, असे धोरण अनेक कंपन्या राबवताना दिसताहेत. नोकरी जाणं ही घटना फक्त आर्थिकच नाही, तर एखाद्याच्या संपूर्ण आयुष्याला भयानक कलाटणी देणारी ठरू शकते. नैराश्य, आत्महत्या, घटस्फोट, एकटेपणा व्यसनाधीनता या सगळ्या गोष्टी या एका घटनेशी जोडल्या गेलेल्या आहेत. एका जोडप्याची नोकरी गेली, त्यांना कमी वेतनाची नोकरी त्रिवेंद्रम शहरात मिळाली. त्यामुळे नोकरी गेल्याच्या लाजेस्तव कोणाचाही निरोप न घेता रातोरात मुंबईतील आपला गाशा गुंडाळल्याची घटना ऐकण्यात आली.
आयटीतले लोक म्हणजे कमीत कमी दोन वर्षांला एक नोकरी बदलणारी जमात म्हणून ओळखली जाते. पण वृंदा या सगळ्याला अपवाद आहे. ट्रेनी म्हणून कामाला सुरुवात केलेल्या कंपनीतच आज ती बँकिंग आणि वित्त व्यवस्थापक म्हणून काम पाहते. गेली आठ वर्षे ती या कंपनीत काम करतेय आणि म्हणूनच अनेक बदलांची ती जवळची साक्षीदार आहे. आधी ट्रेनिंगसाठी चेन्नई, मग पोस्टिंग पुण्यात, प्रोजेक्टसाठी स्वित्र्झलड- पुणे- स्वित्र्झलड, आता परत पुणे असा तिचा प्रवास आहे.  आपल्या या प्रवासाबद्दल ती सांगते, ‘स्वित्र्झलडच्या वास्तव्यात खूप गोष्टी शिकता आल्या. एक म्हणजे क्लाएंटशी थेट संपर्क आणि तिथल्या लोकांची कामाची पद्धत. या सगळ्यामुळे खूप फरक पडला. पण घरची आणि घरच्यांची खूप आठवण यायची. आठ वर्षांपूर्वी वेब कॅमेरा, व्हिडीओ चॅटिंग नवीन होतं. त्यामुळे रोज घरच्यांशी बोलताही यायचं नाही. स्वित्र्झलडला जाणं हे साऱ्यांचं स्वप्न असतं. इतकं सुंदर शहर; पण मला त्यातलं काहीच आवडत नव्हतं. मी रोज घरी फोन करून रडायचे. मला खूप एकटं वाटायचं. मग मी माझ्या भारतातल्या वरिष्ठांशी बोलले. परत यायचं ठरवलं. स्वित्र्झलडच्या क्लाएंटनीदेखील खूप मदत केली आणि मी परत आले. पुन्हा जायची संधी मिळाली तेव्हा मात्र मी बऱ्यापैकी मनाची तयारी केली होती. त्यावेळच्या माझ्या तिथल्या वास्तव्यादरम्यान आई-बाबा, बहिणी माझ्याकडे काही दिवस राहायला आले. आई-बाबांना स्वित्र्झलड दाखवलं. तेव्हा खूप अभिमान वाटला. तिथे एक गोष्ट खूप जवळून पाहिली, ती म्हणजे लोक खूप व्यावसायिकरीत्या वागतात. कामाच्या वेळी काम करायचं आणि कामाचे तास संपले की घरी जायचं. लोक बारा-बारा तास काम करताहेत, रात्री जागताहेत, असं मी कुठेच पाहिलं नाही. लोक आपल्या कामाइतकंच वैयक्तिक आयुष्यदेखील महत्त्वाचं समजतात. आपल्या इथे लोकांनी दोन तास काम केलं तर त्यांना कामसू, कष्टाळू, कंपनीचं हित जपणारा कर्मचारी समजलं जातं. कंपनी तुम्हाला आठ-नऊ तास काम करण्याचा पगार देते, त्यामुळे तुम्हीही तितकंच काम केलं पाहिजे. बाकी वेळ तुमचा वैयक्तिक असतो. परंतु आपल्याकडे जास्त काम करणंच गृहीत धरलं जातं. माझे सहकारी जर मला संध्याकाळी सहानंतर ऑफिसमध्ये दिसले तर मी विचारते, ‘काय प्रॉब्लेम आहे? तू अजून ऑफिसमध्ये का?’ आपण इतक्या वाईट पद्धतीनं काम करतो, त्यामुळे आपण सतत ताणाखाली असतो आणि वीकएन्डला तो ताण घालवण्याचे उपाय शोधतो. मला ही पद्धत बदलायचीय. तरच आपण एक चांगलं आयुष्य जगू शकतो. मीदेखील सध्या मानेच्या दुखण्यानं ग्रासलेली आहे. गेली दोन वर्षे हा त्रास होतोय. सतत कॉम्प्युटरसमोर बसून मान दुखते.
नीलेश, मितेश, लीना, वृंदा ही सगळी आयटीची आजची पिढी. मंदी पाहिलेली. कामाचे ताण, स्पर्धा, संघर्ष, नात्यांचे बदलणारे अर्थ हे सगळं अनुभवणारी. आयुष्याकडे सकारात्मक दृष्टिकोनातून पाहणारी. भारतातलं आयटी उद्योगाचं भवितव्य कायमच उज्ज्वल होतं. बँकिंग, टेलिकॉम, बीपीओ अशा सेक्टरमधून आपल्यापर्यंत असंख्य सोयीसुविधा पुरवायला हे आयटीजन अहोरात्र राबत असतात. लोकांची आयुष्ये आधुनिक तंत्रज्ञानाने समृद्ध करता करता या आजच्या आयटीजनांना स्वत:च्या सुखी आयुष्याची युक्तीदेखील सापडली आहे.
(‘समग्र आयटी’ विभागाच्या समन्वयक- सुचिता देशपांडे)