06 July 2020

News Flash

गुरूदत्त कुठे गेला?

‘प्यासा’, ‘कागज के फूल’, ‘साहब, बीबी और गुलाम’सारख्या अभिजात चित्रपटांची निर्मिती करणाऱ्या गुरूदत्त यांना जाऊन आज ५० वर्षे लोटली आहेत. त्यांच्या चित्रपटांची महत्ता त्यांच्या मृत्यूपश्चात...

| December 16, 2014 01:06 am

dwi60‘प्यासा’, ‘कागज के फूल’, ‘साहब, बीबी और गुलाम’सारख्या अभिजात चित्रपटांची निर्मिती करणाऱ्या गुरूदत्त यांना जाऊन आज ५० वर्षे लोटली आहेत. त्यांच्या चित्रपटांची महत्ता त्यांच्या मृत्यूपश्चात चित्रपटरसिक आणि जाणकारांना कळली. ‘प्यासा’मध्ये त्यांनी चितारलेलं कटु वास्तव त्यांच्या स्वत:च्या आयुष्यातही पुढे खरं ठरलं. आजची संवेदनशील चित्रपटकर्मीची पिढी गुरूदत्त आणि त्यांच्या ‘प्यासा’कडे कशी पाहते, याचा वानवळा देणारा लेख..

‘Personal is Political’ हे विधान आपण वाचलेले असते. अर्थात् अमेरिकन स्त्रीवादी चळवळीच्या दुसऱ्या पर्वामध्ये पुढे आलेला हा मुद्दा आहे. ‘Personal problems are political problems. There are no personal solutions at this time. There is only collective action for a collective solution.’ अशा पद्धतीने खासगी घरगुती जगण्यातील प्रत्येक कृती ही राजकीय असते, असा स्त्रीवादाच्या या दुसऱ्या लाटेचा प्रमुख मुद्दा होता. (१९७० – Karol Hanisch.) या वादावरील प्रमुख टीका असे म्हणते, की ‘व्यक्तिगत’मधले स्वातंत्र्य त्याला ‘राजकीय’ म्हटल्याने जाते. गुरूदत्तविषयी त्याचे निकटचे सहकारी अब्रार अल्वी आणि देवानंद यांच्या मुलाखती वाचल्या की असा अंदाज येतो, की गुरूदत्त हा एक नट, दिग्दर्शक आणि लेखक म्हणूनही त्या काळाच्या macho प्रतिमेमध्ये बसणारा माणूस नव्हता. म्हणून इथे gender चा मुद्दा आणि त्याला धरूनच ‘व्यक्तिगत आणि राजकीय’ यातला भेद एक कलाकार म्हणून, माणसाच्या सामाजिक जगण्याची irony फार ताकदीने कळू शकणारी एक व्यक्ती म्हणून आणि जगण्यातील त्रासांना कंटाळून, थकून, हरून मृत्यूला कवटाळणारी एक संवेदनशील व्यक्ती म्हणून गुरूदत्तच्या कलाकृतींशी जोडून पाहावे असे मला वाटते.
Personal is Political हा मुद्दा आजच्या काळात थोडा सैद्धान्तिक पातळीवर समजून घ्यायचा असेल तर त्यातले प्रवाद खालीलप्रमाणे होतील..
मानवी अस्मिता ही अनेकरेषीय असल्याने जेव्हा सगळेच ‘खासगी’ राजकीय होते, तेव्हा व्यक्तिवाद समष्टीवादाहून बळावतो आणि त्याचे एक टोक अराजकापाशी जाते, तर दुसरे टोकाच्या शोषणाकडे जाते. कारण व्यक्तिगत/ व्यक्तिसापेक्ष राजकारणाचे एक टोक हे felt experience या मुद्दय़ापर्यंत येते आणि felt experience चे साधारणीकरण करणे अवघड असते. तो प्रत्येक व्यक्तीसाठी वेगळा असतोच; शिवाय dwi61एका व्यक्तीसाठीसुद्धा तो काळानुसार बदलणारा असू शकतो. इथे personal is political चा मुद्दा मी फक्त स्त्रीवादाशी जोडून पाहत नाहीये, तर इथला जातीचा प्रश्न, alienation चा प्रश्न, व्यक्तिवादाचा प्रश्न आणि एका कलाकाराने इतक्या निराशावादाला पोहोचण्याच्या प्रश्नाशी जोडून पाहतोय.
‘प्यासा’मधल्या विजयला प्रेमभंग झाल्यावर गुलाबो भेटते. पण तरीही गुलाबो भेटल्यानंतरही त्याचे आयुष्य परिपूर्ण आहे असे वाटत नाही. म्हणजेच जीवनसाथी वा प्रेयसी मिळाल्यानंतर परिपूर्ण आयुष्याच्या येणाऱ्या अनुभवापलीकडे काहीतरी आहे- जे गुरूदत्त शोधतो आहे. आत्महत्येचा संबंध बऱ्यापैकी लैंगिकतेशी असतो, ज्याविषयी आपण पुढे चर्चा करूच.
गुरूदत्तने अनुक्रमे ‘बाझी’, ‘जाल’, ‘बाज’, ‘आरपार’, Mr. & Mrs. 55, ‘सैलाब’, ‘प्यासा’, ‘कागज के फूल’ या चित्रपटांचे दिग्दर्शन केले. ज्यातील पहिले तीन सिनेमे त्याने लिहिलेदेखील. (इथे विषयानुरूप मुख्यत्वे त्याने लिहिलेले आणि दिग्दर्शित केलेले सिनेमेच महत्त्वाचे धरतो आहे.) हॉलीवूडमधील चाळीसच्या दशकातल्या ‘नुआर’ चित्रपटांना मानवंदना म्हणून केलेला ‘बाजी’, इटालियन नववास्तववादी तंत्र वापरून केलेला ‘जाल’, युरोपियन वसाहतवादाची वाताहत एका घट्ट कथासूत्रात मांडणारा ‘बाज’- ज्यात अनेक ऐतिहासिक राजकीय संदर्भाची संयतपणे सूचना तर होतीच, शिवाय राजकीयदृष्टय़ादेखील प्रसंगोचित असण्याची ताकद होती; चोख धंदा केलेला ‘आरपार’; पिकरेक (Picareque- ज्यात गोष्ट ही अधिक उपाख्यान (एपिसोडिक) पद्धतीने सांगितली जाते; ज्यातील हीरो हा खालच्या जातीतला, अप्रामाणिक, मात्र लोभस असतो-) शैलीतील Mr. & Mrs. 55. अशा प्रकारे त्याच्या प्रत्येक सिनेमामधून एक ठोस राजकीय किंवा व्यक्तिनिष्ठ प्रश्न बाहेर येताना दिसतो. ‘प्यासा’ हा सिनेमा म्हणजे नुआर, व्यक्तिगत, राजकीय असे सगळेच जे ‘जोनर’ त्याने याआधी करून पाहिले, त्या सर्वाचा मिलाफ यात दिसून येतो. त्याच्या फिल्मोग्राफीकडे बघून प्रथमदर्शी असे वाटणारही नाही, की या माणसाने नंतर आत्महत्या केली. माणूस जेव्हा सामाजिक-राजकीयदृष्टय़ा सजग असतो, तेव्हा त्याची ‘स्व’ची व्याख्या बदललेली दिसते. ती अधिक व्यापक होऊन आपले अस्तित्व तसे नाममात्र आहे, हे सिद्ध करणारी झालेली असते. आत्मभानाच्या या टप्प्यावर जेव्हा माणूस आत्महत्या करतो, तेव्हा तो अहंभाव आणि लैंगिक इच्छा अथवा जगण्याच्या आणि मृत्यूच्या सहजप्रवृत्तीतला ताण असतो.
हे द्वैत राजकीय विचारात एक वेगळे स्वरूप घेते. प्लेटो शरीर आणि आत्मा यांचे द्वैत मांडतो. कांट मनाच्या प्रश्न विचारण्याच्या ताकदीमुळे ‘कर्तव्य’ या संकल्पनेपर्यंत पोहोचतो. हेगेल ‘universal’ने ‘particular’च्या पलीकडे जाण्याविषयी बोलतो आणि आत्मा व निसर्गाच्या पलीकडे जाण्याविषयी बोलतो. असाच हा ‘व्यक्तिगत’ आणि ‘राजकीय’ असण्याचा ताण आहे. ‘प्यासा’मार्फत कलात्मक पातळीवरच्या त्या आकलनापर्यंत जाऊनही गुरूदत्तने स्वत: आत्महत्या केली. म्हणूनच त्याच्याविषयी लिहावेसे वाटते.
रॉबिन विलियम्स या प्रख्यात विनोदी अभिनेत्याने गळफास लावून आत्महत्या केली. त्याचे थेट कारण त्याला त्याच्या आवाजाला ठार मारायचे होते, असे म्हटले जाते. मानवी आवाजाला मनोविश्लेषणामध्ये dwi62‘स्वतंत्र आणि तरीही शरीरावर अवलंबून असणारा’ अशा अर्थाने- ‘partial object’ असे म्हटले आहे. आवाज आपल्या शरीरातून येतो खरा; पण तो आपल्या शरीराचा भाग नसतो. मग तो नक्की कुठून येतो? आणि म्हणून आपल्याला आपल्या इतर इंद्रियांवर जसा ताबा मिळवता येतो तसा आवाजावर मिळवता येतो का? की आपला आवाज आपल्यावर ताबा मिळवतो? म्हणून आपल्याच शरीरातून आणि मेंदूतून तयार होणाऱ्या ध्वनीबरोबर आपले द्वंद्व असते? युद्धच असते. आपला आवाज जेव्हा आपण स्वत:च ध्वनिमुद्रित करून ऐकतो, तेव्हा म्हणूनच तो आपल्याला इतका विचित्र वाटतो. रॉबिन विलियम्ससारख्या विनोदी अभिनेत्याने असा जीव देणे, (कंठावर पट्टा आवळून) हे म्हणूनच समजण्यासारखे आहे. गुरूदत्तच्या आत्महत्येला केवळ ‘वैयक्तिक आणि राजकीय’ या द्वंद्वातल्या ताणाचे नाव देणे अर्थातच अतिशयोक्ती होईल. (खरे तर त्याने औषधे म्हणजे झोपेच्या गोळ्या आणि दारू एकत्र घेतले. ते त्याने ठरवून केलेले नसूही शकते. पण काही का असेना, तो खचलेला होता, हे यातूनही सिद्ध होते.) त्या खच्चीकरणाचे एक मुख्य कारण हे वैयक्तिक आणि राजकीय यामधला ताण असावे असे मला वाटते. जो ताण त्याच्या ‘प्यासा’मध्ये सर्वाधिक आला आहे. तसेच ‘प्यासा’ चित्रपट म्हणूनही सर्वच अर्थानी श्रेष्ठ आहे.
‘प्यासा’तील विजय हा एक समाजाने (प्रेयसी, कुटुंब, प्रकाशक यांनी) दुर्लक्षिलेला, एका पातळीवर वाळीत टाकला गेलेला कवी आत्महत्या करायला जातो. जाता जाता एका भिकाऱ्याला तो कुडकुडत असल्याने आपला कोट देतो. तो भिकारी त्याचा पाठलाग करतो आणि विजयला ट्रेनच्या टपरीवरून वाचविण्याच्या नादात स्वत: मरतो. तिथे विजयची आत्महत्येची चिठ्ठी पडते. त्यामुळे लोकांना वाटते की, विजय गेला. आणि गुलाबो (वेश्या.. विजयची दुसरी प्रेयसी) विजयच्या ‘मृत्युपश्चात’ त्याच्या कवितांचे पुस्तक प्रसिद्ध करते. हे पुस्तक गाजते. आणि इस्पितळात बेडवर असलेल्या विजयला ते पुस्तक दिसते. जेव्हा तो म्हणतो, की ‘या माझ्याच कविता आहेत’, तेव्हा डॉक्टर त्याला वेडा समजून वेडय़ांच्या इस्पितळात पाठवतो. म्हणजे लोकांना ते पुस्तक इतके आवडूनही त्याच्या लेखकाला मात्र ते ओळखू शकत नसण्याची वेळ ‘प्यासा’मध्ये आलेली दाखविली आहे. ‘विदेशी सूत्र’ (Videshi Sootra) नावाच्या ब्लॉगिंग साइटवरचा एक ब्लॉगर म्हणतो-
The consumers value the object of production (the book) so much more then the producer (Vijay), that they have a difficult time recognizing him, when they see him. This is why in the final climactic scene, Vijay says : “The Vijay who you wish to welcome so warmly, the Vijay for whom you shout slogans, I am not that Vijay.” He is not lying. He is saying that he is not the imagined Vijay represented by their insincere attraction to his book, but is in fact Vijay- the poet who imbued the book with ignored meaning.
पण मग हा विजय कोण आहे? जो असे म्हणतो आहे, की ‘मी तो कवी विजय नाही.’ इथे वरच्या व्याख्येनुसार मन शरीराच्या पूर्णपणे पलीकडे गेले आहे. ‘चैतन्य निसर्गाच्या’ पलीकडे गेले आहे आणि universal’ – ‘particular’च्या पलीकडे गेले आहे. जो ‘ऑथर’ आहे, तो authority च्या पलीकडे गेला आहे. लेखक लेखनाच्या पलीकडे गेला आहे.
इथे मला समाजशास्त्रातल्या rational choice आणि मानसशास्त्रातल्या ‘विवेका’ची तुलना करावीशी वाटते. समाजशास्त्रातला rational choice हा व्यक्तीच्या अधिकाधिक फायद्याशी निगडित असतो आणि मानसशास्त्रातला, विशेषत: criminology प्रांतातला rational choice हा उपयुक्ततावादाशी (utilitarianism) जास्त निगडित आहे. म्हणजे स्वत:चा जीव संपवणारा गुरूदत्त हा स्वत:च्या मृत्यूची उपयुक्तता, ही समाजात तो असण्याच्या उपयुक्ततेपेक्षा अधिक महत्त्वाची मानतो. पण मग हे वर आपण ‘personal’ आणि ‘political’ अशा द्वैताबद्दल जे बोललो आणि त्यानिमित्ताने येणाऱ्या ‘स्व’च्या जाणिवेबद्दल जे बोललो, त्याच्याशी विसंगत नाही का?
नसरीन मुन्नी कबीरच्या ‘गुरूदत्त- अ लाइफ इन् सिनेमा’ या पुस्तकात अब्रार अल्वी (‘प्यासा’चे संवादलेखक) यांचा एक वाद दिलेला आहे. त्यात अब्रार अल्वी म्हणतात, ‘‘मला विजयने जगाला असे सोडून देणे योग्य वाटत नव्हते. त्याने तिथेच थांबून व्यवस्थेशी लढा द्यायला हवा होता. मी गुरूदत्तला म्हटले, ‘तो जिथे जाईल तिथे त्याला हाच समाज, हीच मूल्यव्यवस्था मिळणार आहे. तर तो का सोडून जाईल?’ पण गुरूदत्तने मला उडवून लावले आणि म्हणून सुरुवातीचा सिनेमाचा शेवट टाळून (ज्यात कागदांच्या उडत्या थारोळ्यात विजय निघून जातो.. तो कुठे जातो, कुणालाच कळत नाही.) मी हा शेवट लिहिला. ज्यात तो गुलाबोपाशी येतो आणि म्हणतो की, ‘इथून निघू. अशा जागी- जिथून परत कुठेही जावे लागणार नाही.’ ‘पण या जगात अशी कुठली जागा आहे का?’ (स्वार्थ, अहंभाव, शोषण, भ्रष्टाचार, दांभिकता नसलेली?) – मी गुरूदत्तला विचारले. त्यावर गुरूदत्त म्हणाला- ‘मला आवडतोय हा शेवट. सूर्यास्त आणि ते दोघे हातात हात धरून चाललेत.. लोकांना आवडेल.’’
मला अल्वींचा प्रश्न महत्त्वाचा वाटतो.
खरंच, अशी कुठली जागा आहे या जगात? – नाही. हे तर नक्कीच.
मग गुरूदत्त कुठे गेला? कदाचित त्याने ती जागा या जगाबाहेर शोधली असावी.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 16, 2014 1:06 am

Web Title: guru dutt
Next Stories
1 मिठालाही इतिहास आहे!
2 ‘संगीत शारदा’ अर्थात् स्त्रीशक्तीचा उद्गार!
3 मूलभूत गणित हेही संगीतशिक्षणासारखंच!
Just Now!
X