ठाणे जिल्ह्यातील विक्रमगडपासून पुढचा २०-२२ किलोमीटरचा खडबडीत डांबरी रस्ता संपून जव्हारमध्ये प्रवेश करताना एके ठिकाणी उजव्या बाजूला जेमतेम मोटार घुसेल एवढा तांबडय़ा मातीचा रस्ता फुटतो.. साडेसहाशे वर्षांचा इतिहास असलेल्या जव्हार-नरेशांच्या पंचाहत्तर वर्षांपूर्वी बांधलेल्या आलिशान राजवाडय़ाच्या प्रवेशद्वाराशी हा रस्ता थांबतो. रस्त्याच्या दोन्ही बाजूंना अस्ताव्यस्त वाढलेली, पुरेशी निगा न राखल्यामुळे जुनाट झालेली काजूची बाग. रस्त्यावरच्या खाचखळग्यांतून सांभाळत गाडी पाच-दहा मिनिटे तशीच दामटली की समोर झाडाझुडपांतच दडलेल्या राजवाडय़ाच्या मनोऱ्याचं दर्शन होतं आणि अल्पकाळासाठी का होईना, या राजवाडय़ानं शाही वैभव उपभोगलं असणार याची खात्री पटते. विक्रमगड परिसरातील दगडखाणींतून काढलेल्या, ग्रॅनाइटसारखी लकाकी असलेल्या दगडांचं भक्कम बांधकाम आणि जागोजागी कोरीव नक्षीकाम असलेला हा राजवाडा आता मात्र काजूच्या बागेसारखाच एकाकी वाटतो. २७० एकराच्या परिसरातील या राजवाडय़ाच्या आजूबाजूला आता गवत आणि रानटी झुडपं वाढली आहेत. राजवाडय़ाच्या देखण्या घुमटांपासून नक्षीदार खांबांपर्यंत सर्वत्र काळी पुटं चढली आहेत. एखाद्या रूपसुंदरीच्या चेहऱ्यावर उमटणाऱ्या रापलेपणाची लाज वाटून तिने आपला चेहरा पदराआड लपवण्याचा केविलवाणा प्रयत्न करावा तसा राजवाडय़ाचा डावा, दर्शनी बाजूचा भाग जागोजागी पत्र्याच्या आडोशाआड लपला आहे. उजवीकडच्या घुमटाखालच्या दोन-तीन खोल्या वावरण्यापुरत्या वापरल्या जातात. महिना-दोन महिन्यांनी राजे जव्हारला येतात तेव्हा त्या उघडल्या जातात. दोन-चार दिवस राजवाडय़ात माणसांच्या वावराच्या खाणाखुणा उमटतात, पण सगळ्या राजवाडय़ाला त्या जाणवतही नाहीत. या दोन-चार खोल्यांतला वावर सोडला तर बाकीच्या राजवाडय़ाला मात्र आपल्या आजच्या पिढीच्या राजपुत्राचं फारसं दर्शनही घडत नाही. मग कुलपाआडच्या बंद खोल्यांमध्येच राजवाडा कुढत राहतो..
मुंबईपासून अक्षरश: हाकेच्या अंतरावरच्या जव्हार संस्थानच्या आजच्या स्थितीचं हे चित्र!
..त्या दिवशी राजे जव्हारला येणार असं कळलं म्हणून मी लवकरच मुंबईहून निघालो आणि कुठेही न थांबता थेट राजवाडय़ाच्या पोर्चमध्ये उतरलो.
पायऱ्यांवर दोघं-तिघं बसले होते. बहुधा तेही त्यांच्या महाराजांची प्रतीक्षा करत ताटकळले होते.
म्हणजे मी अगोदरच पोहोचलो होतो, हे माझ्या लक्षात आलं. एकजण पुढे आला. तो राजवाडय़ावर देखभालीचं काम करणारा नोकर होता. जुजबी बोलणं झाल्यावर वापरात असलेल्या उजव्या बाजूच्या दरवाजाचं शटर त्यानं ताकद लावून बाजूला केलं. जुनाट, करकरणारं ते शटर काहीशा नाइलाजानंच बाजूला झालं आणि मी आत गेलो. आतमध्ये शुकशुकाट असतानाही, या राजवाडय़ानं एकेकाळी वैभव उपभोगलं असणार, हे पाऊल टाकताच नकळत जाणवून गेलं. मन उगीचच भारावून गेलं. थोडंसं दडपणही आलं. नोकरानं समोरची खोली उघडून दिली आणि आत जाण्याची खूण केली.
राजवाडय़ाच्या एकूण आकाराला साजेशी नसली तरी बऱ्यापकी भव्य अशा त्या खोलीत मधोमध मांडलेलं एक जुनं टेबल, त्याभोवती जुन्याच सहा लाकडी खुच्र्या, मागे एका लहानशा पलंगावर जुनाट गादीवर पसरलेली मळकट चादर, बाजूला कोपऱ्यात आणखी एक टेबल.. त्यावरच्या काचेखाली काही जुनी छायाचित्रे, टेबलाआडच्या एका फ्रेममध्ये जव्हार संस्थानच्या वंशावळीचा तपशील.. बाजूच्या एका टेबलवर उजव्या सोंडेच्या गणपतीची धातूची मूर्ती आणि खिडकीत विठ्ठल-रखुमाईची देखणी, काळ्या दगडातील कोरीव प्राचीन मूर्ती.. राजवाडय़ाचं सध्याचं वैभव जणू त्या एका खोलीत साकळल्यासारखं वाटावं असं वातावरण.. आणि त्याच्याशी काहीसा विसंगत वाटावा असा विजेवर चालणारा एक पंखा..
खुर्चीत बसलो. तोवर आत येताना मनावर दाटलेलं अंधुकसं दडपण दूर झालं होतं.
राजवाडय़ात नव्हे, तर कुणाच्या तरी घरी गेल्यावर वाटावा इतका सहजपणा लगेचच आला आणि मी निवांत झालो. महाराज अजूनही जव्हारच्या वाटेवरच होते. थोडा वेळ थांबून मी तिथून बाहेर आलो. एका नोकरासोबत राजवाडय़ाभोवती चक्कर मारली. निसर्गाचा एक देखणा आविष्कार राजवाडय़ाच्या परिसराभोवती होता. सज्जात उभं राहिल्यावर अवघं साम्राज्य एका नजरेत सामावून घेता येईल अशा जागी अतिशय कल्पकतेनं हा राजवाडा उभारला गेलाय याची खात्री सभोवतालच्या डोंगरदऱ्यांनी नटलेल्या निसर्गसुंदर परिसरावर नजर टाकताच पटते. आपल्या राजाचं आपल्यावर लक्ष आहे, याची दऱ्याखोऱ्यांत राहणाऱ्या आदिवासींना त्याकाळी खात्री असणार.
अजूनही या परिसरातले आदिवासी जव्हारच्या राजाविषयी आदरानं बोलतात. संस्थान खालसा होण्याच्या काही वष्रे आधी यशवंतराव महाराजांनी हा राजवाडा उभा केला. त्यापासून काही मिनिटांच्या अंतरावर असलेला त्याआधीचा संस्थानचा शेकडो वर्षांच्या इतिहासाचा साक्षीदार असलेला आणि गादी सांभाळणारा राजवाडा आता काळाच्या पडद्याआड गेला आहे. राजवाडा वाटणार नाही अशा काही इमारतींचे अवशेष तेथे उभे आहेत. प्रवेशद्वार मात्र इतिहास जपण्याचा आटोकाट प्रयत्न करत तग धरून आहे. त्यावर अजूनही संस्थानचा भगवा फडकत असतो. इतिहासजमा झालेल्या संस्थानच्या अस्तित्वाची ही वर्तमानातील एकमेव खूण. बाकीचं सगळं पुसट होत चाललंय. आताच्या पॅलेसलाही बहुधा इतिहास जपण्याची फारशी उमेद राहिलेली नाही. तिथे जपलेल्या इतिहासाच्या बऱ्याचशा खाणाखुणा कुठेतरी कपाटात बंद होऊन निपचित पडल्या आहेत.
जव्हार संस्थानचा इतिहास रंजक आहे. इगतपुरीजवळच्या मुकणे गावातील जयबा नावाच्या इसमास सदानंदबाबा नावाच्या एका सत्पुरुषाचा सत्संग घडला. जयबांनी सदानंदबाबांना गुरू मानले होते. जयबांवर प्रसन्न झालेल्या सदानंदबाबांनी एकदा जयबांशी बोलताना जव्हारच्या दिशेने बोट दाखवले आणि ‘जेथे घोडा आणि ससा खेळताना दिसतील तेथे जाऊन राज्य स्थापन कर,’ असे सांगितले. जयबा मोहिमेवर निघाले, जव्हारला आले आणि त्यांनी हे ठिकाण ताब्यात घेऊन राजगादी स्थापन केली. ही घटना १३०६ मधली. तेव्हापासून १९४७ पर्यंतच्या ६४१ वर्षांत जव्हारच्या गादीवर मुकणे घराण्याच्या १९ वंशजांनी राज्य केले. पाचवे पतंगशहा म्हणजे यशवंतराव महाराज हे या गादीचे व आदिवासींच्या या संस्थानाचे अखेरचे राजे. लहान वयात एकटे पडल्याने इंग्रज सरकारने त्यांना देखभालीसाठी इंग्लंडला नेले व पंधरा-सोळा वर्षांचे होईपर्यंत त्यांचे पालनपोषण तेथेच झाले. त्यामुळे यशवंतरावांवर त्या काळात इंग्रजी संस्कृतीचे संस्कार झाले. त्याआधीचे सारे राजे आदिवासी संस्कृतीत वावरले. यशवंतराव रॉयल एअर फोर्समध्ये पायलट होते. जतच्या राजकन्येशी त्यांचा विवाह झाला. संस्थान खालसा झाल्यानंतर ते राजकारणात गेले. जव्हार-डहाणू लोकसभा मतदारसंघातून दोन वेळा काँग्रेसच्या तिकिटावर खासदार म्हणून ते निवडून आले. बाहेरच्या जगाचं शिक्षण घेतलेल्या आणि बडय़ा लोकांसोबत वावरलेल्या यशवंतराव महाराजांमुळे जव्हारला त्या काळात नगरपालिका झाली. आणि आज दिसणाऱ्या काही सुविधांची सुरुवात त्यांच्याच कारकीर्दीत झाली.
..महाराज येईपर्यंत आपण जव्हारच्या बाजारपेठेत चक्कर मारावी असा विचार करून मी राजवाडय़ातून बाहेर पडलो. त्या दिवशी उरुस होता. सद्रुद्दीनबाबा दग्र्याचा हा उरुस. सद्रुद्दीनबाबा म्हणजे तेच ते सदानंदबाबा. मुस्लीम रहिवासी त्यांना सद्रुद्दीनबाबा म्हणतात. आता यावरून काही वाद सुरू आहेत. तर त्या उरुसाच्या गर्दीत िहडत स्थानिक लोकांशी गप्पा मारत मी ही माहिती मिळवत होतो. त्यातून आपसूक महाराजांविषयीच्या जनतेच्या भावनाही व्यक्त होत होत्या.
तासाभरानंतर पॅलेसवरून फोन आला. महेंद्रसिंह महाराज आले होते. मी लगेचच तिकडे पोहोचलो.
काही वेळातच त्याच दिवाणखान्यातल्या टेबलवर आम्ही समोरासमोर बसून गप्पा मारत होतो. काही वेळानंतर महेंद्रसिंहांच्या मातोश्रीही आल्या आणि जुन्या आठवणींना उजाळा मिळू लागला. तो काळ अंधुकसा जिवंत होऊ लागला. तोवर बाहेरचं ढगाळ वातावरण दूर होऊन लख्ख ऊन पडलं होतं. बाजूच्या खिडकीतून उन्हाची एक तिरीप दिवाणखान्यात आली होती. जणू मघापर्यंत उदास उदास वाटणारा तो राजवाडा जुन्या आठवणींनी पुन्हा मोहरून गेला होता.
यशवंतरावांच्या पुढच्या पिढीला गादीचा मान मिळाला नाही, पण संस्थानच्या प्रजेने मात्र त्यांना राजाचा मान दिला. यशवंतरावांनी उभ्या केलेल्या या राजवाडय़ात आज अधूनमधून वावरणाऱ्या त्यांच्या नातवाच्या- महेंद्रसिंहांच्या कुटुंबाला त्या काळातल्या संस्थानिकी थाटाची फारशी जाणीव नाही. गोव्याचे माजी मुख्यमंत्री प्रतापसिंह राणे यांची बहीण ही यशवंतराव महाराजांची सून. युवराजांची पत्नी. आज युवराज हयात नाहीत. महाराजांच्या सूनबाई अधूनमधून मुलासोबत- म्हणजे महेंद्रसिंहांसोबत जव्हारला येतात तेव्हा वाटेवरच्या प्रवासात त्यांच्या डोळ्यांत मात्र तो काळ तरळत असतो. लग्न होऊन प्रथमच जव्हारला येताना विक्रमगडच्या आळशी कुटुंबाच्या घरी झालेला पहिला पाहुणचार, राजवाडय़ावर प्रियंवदा महाराणीसाहेबांनी- म्हणजे यशवंतराव महाराजांच्या पत्नीने आयोजित केलेले हळदीकुंकू समारंभ, जव्हार-विक्रमगड परिसरातून वेगवेगळ्या निमित्ताने राजवाडय़ात जमणारा महिलांचा गोतावळा, सांस्कृतिक कार्यक्रमांची धमाल.. सगळं त्यांना लख्ख आठवतं. त्यांच्या चेहऱ्यावर त्या आठवणी स्पष्ट उमटलेल्या दिसतात. बाजूला खुर्चीत बसलेले महेंद्रसिंह महाराजही त्या आठवणी आपल्या मनात साठवू लागतात. त्यांच्या डोळ्यांतही चमक उमटू लागते. आणि राजवाडय़ाच्या उदास िभती उजळल्याचा भास होऊ लागतो..
राजघराण्याचे आताचे वारस म्हणजे यशवंतरावांचे नातू महेंद्रसिंह हे पुण्याला असतात. कोरेगाव पार्कात तिसऱ्या गल्लीत यशवंतरावांनीच बांधलेल्या बंगल्यात त्यांचा जन्म झाला, तिथेच ते शिकले आणि तिथेच लहानाचे मोठे झाले. यशवंतराव महाराज कडक शिस्तीचे, वेळेचे काटेकोर पालन करणारे होते, एवढीच त्यांच्या मनात अखेरच्या महाराजांविषयीची आठवण.. कधीतरी सुट्टीच्या दिवसांत जव्हारला आल्यानंतर इथल्या दरबारी कारभाराच्या लहानपणीच्या आठवणी आता अंधुक झाल्या आहेत. संस्थान संपलं, तनखाही गेला आणि पॅलेसवरच्या संस्थानी कारभाराच्या खुणाही पुसट झाल्या. आपण आता एक सामान्य नागरिक आहोत असं महेंद्रसिंह मानतात. यशवंतरावांनी त्यांच्या कारकीर्दीत कुटुंबासाठी जे काही मिळवलं ते सांभाळायचं.. पॅलेसचा परिसर स्वच्छ करून, इथल्या हिरवाईला आधुनिक आकार देऊन, इथल्या संस्थानी रूपाला फारसा धक्का न लावता एक छानसं पर्यटक भवन.. रिसॉर्ट सुरू करायचा त्यांचा विचार आहे. काजूची बाग नीट देखभाल करून पुन्हा टवटवीत करायचीय. पॅलेसच्या आवारातील आणि जव्हार परिसरातील मालमत्तांची देखभाल करायचीय. त्यामुळे अलीकडे त्यांच्या पुणे-जव्हार चकरा वाढल्या आहेत. महिन्यातून दोन-चार वेळा जव्हारला येणं होतं. त्यामुळे तो उदास पॅलेस अधूनमधून थोडासा जागा होतो. दोन-चार चाकर झाडलोट करून ठेवतात आणि महेंद्रसिंह महाराज आलेत असं कळलं की आदिवासी समाजातील कुणी येऊन मुद्दाम त्यांची भेट घेतो.. विचारपूस करतो. त्यावेळी एखादा वृद्ध आदिवासी जुन्या सवयीनं वाकून महाराजांना मुजराही करतो. पण महेंद्रसिंह स्वत: यापासून थोडे अलिप्तच असावेत असं त्यांच्याशी बोलताना उगीचच जाणवत राहतं.
यशवंतराव महाराजांच्या हयातीत जव्हारला अनेक सण-उत्सव संस्थानी थाटात पार पडायचे. दसऱ्याच्या दिवशी महाराजांसोबत अवघं गाव शिलंगणाचं सोनं लुटायचा. आदिवासींच्या तारप्याचे सूर गावात घुमत राहायचे. आणि रयतेसोबत राजादेखील या उत्सवात पारंपरिक पद्धतीने सहभागी व्हायचा.. आता तो थाट राहिलेला नाही. दसऱ्याचा सण राजवाडय़ात रयतेसोबत पार पडत नाही. यशवंतराव महाराजांचे त्याकाळच्या अन्य संस्थानिकांशी जिव्हाळ्याचे संबंध होते. काही संस्थानांशी तर नातेसंबंधच होते. वेगवेगळ्या कार्याच्या निमित्तानं एकमेकांच्या भेटीगाठी होत असत, हे महेंद्रसिंहांना आठवतंय. त्यांच्या आठवणींतून आता तो काळ मागे गेलाय. महेंद्रसिंह वास्तवासोबत आहेत हेही त्यांच्याशी बोलताना जाणवत राहतं..
गप्पा मारता मारता मध्येच काहीतरी आठवल्यासारखं करून ते उठले आणि दोन-चार मिनिटांत परत आले. त्यांच्या हातात बायंिडग केलेली एक जुनाट वही होती. त्यांनी ती माझ्या हातात दिली. १९१० साली संस्थानच्या दिवाणसाहेबांनी तयार केलेला जव्हार संस्थानच्या कारभाराचा त्यावर्षीचा तो अहवाल होता. इंग्रजीतून टाईप केलेला. वहीची कागदपत्रं काहीशी जीर्ण झाली होती. अशी आणखीन काही जुनी कागदपत्रं अजून आपल्याकडे आहेत असं महेंद्रसिंह म्हणाले. पण जव्हारच्या हवेमुळे कितीतरी कागदपत्रं, जुने फोटो आता नष्ट झालेत. त्यामुळे संस्थानच्या इतिहासाचे अनेक लिखित साक्षीदार आता काळाआड गेलेत. महेंद्रसिंहांचे कुटुंब पुण्यात असते तेव्हा राजवाडय़ात शुकशुकाट असतो, हे पाहून मागे इथे चोरीचा प्रयत्न झाला. चोरटय़ांनी कपाटं उपसली, जुन्या पेटय़ा फोडल्या. पण त्यांच्या हाती काहीच लागलं नाही. मग कपडे, किरकोळ वस्तू अस्ताव्यस्त फेकून ते निघून गेले. राजवाडय़ाच्या पोर्चमध्ये एक चाकावरची जुनी तोफ आहे. वर कुठल्यातरी खोलीत तलवारी आहेत. संस्थानी काळातल्या तेवढय़ाच खुणा आता उरल्या आहेत. जुन्या, पारंपरिक राजवाडय़ावर झेंडा चढवायची प्रथा मात्र अजूनही कायम आहे. महेंद्रसिंहांच्या हस्ते हा झेंडा चढवला जातो.
आमची भेट झाली त्या दिवशीच सूर्यास्ताच्या वेळी तो समारंभ पार पडणार होता..
‘एवढा एकच सोहळा आता शिल्लक आहे..’ महेंद्रसिंहांनी बोलता बोलता सांगितलं, तेव्हा त्यांच्या सुरातले भाव मात्र ओळखता आले नाहीत.
..गप्पा खूप वेळ चालल्याचं जाणवलं म्हणून मी सहज घडय़ाळाकडे बघितलं. दुपार झाली होती. आम्ही परस्परांचा निरोप घेतला. महेंद्रसिंहांच्या मातोश्रींना नमस्कार करताना नकळत मी झुकलो होतो.
बाहेर येऊन पोर्चमध्ये थांबलो. सोबत महेंद्रसिंह महाराजही होते. तिथून पुन्हा राजवाडय़ावर नजर फिरवली. दोन-चार फोटो काढले. राजवाडय़ाच्या पोर्चमध्ये मी आणि महेंद्रसिंह महाराज बोलत उभे होतो. त्यांनाही फोटोत घेतलं..
आणखी काही वर्षांत राजवाडय़ाला रिसॉर्टचं रूप आलेलं असेल.. मनात उगीचच विचार येऊन गेला.
‘तुमची मुलं इथं रमतात की नाही?’मी अगदी सहज महेंद्रसिंहांना विचारलं आणि त्यांनी नकारार्थी मान हलवली.
‘इथे टीव्ही नाही, वीज जाते, इंटरनेटही नाही. मुलं एक दिवसानंतर कंटाळतात. पुन्हा पुण्याला जाऊ म्हणून मागे लागतात..’ महेंद्रसिंह सांगत होते.
ते ऐकत मी राजवाडय़ावरून नजर फिरवत होतो.
महेंद्रसिंहांचे ते शब्द संपले आणि अचानक आकाशात ढग आले.. पावसाचे थेंब पडू लागले. पुन्हा राजवाडय़ाच्या िभती उदासवाण्या झाल्याचं मला वाटू लागलं. उगीचच!!
मी वळलो, गाडीत बसलो आणि मागे न पाहता पुन्हा परतीच्या वाटेला लागलो. त्याच तांबडय़ा मातीच्या, खाचखळग्यांच्या रस्त्यानं. दुतर्फा जुनाट, अस्ताव्यस्त पसरलेल्या काजूच्या बागेतून वाट काढत डांबरी रस्त्यावर आलो आणि थेट मुंबई गाठली..
घरी पोहोचलो तेव्हा एका पुसल्या जाऊ पाहणाऱ्या इतिहासातून वर्तमानात आल्यासारखं फ्रेश वाटलं.

Onion auction closed for 11 days in nashik
कांदा लिलाव ११ दिवसांपासून बंद; नाशिकमध्ये एक लाख क्विंटलची खरेदी-विक्री ठप्प
heavy traffic on manor wada bhiwandi state highway closed due to crack in bridge near manor
पालघर: मनोर वाडा अवजड वाहतूक बंद; टेन जवळील पुलाच्या सुरक्षिततेबद्दल शंका
Who is throwing stones at houses since a month
अद्भूत! एक महिन्यापासून घरांवर दगडफेक, कोण करतंय?
dombivli marathi news, pedestrian bridge on railway line
डोंबिवलीतील गणपती मंदिराजवळील रेल्वे मार्गावरील पादचारी पूल धोकादायक; १ एप्रिलपासून डोंबिवली पूर्व-पश्चिमेकडे जाण्याचा मार्ग बंद