19 March 2019

News Flash

करवीर संस्थान वसा आणि वारसा

‘हिंदुस्थान देशातील सर्व संस्थानांमध्ये कोल्हापूर संस्थानाची योग्यता विशेष आहे. गेल्या शतकात आमच्या लोकांनी हिंदू राज्य स्थापण्यास प्रारंभ केला आणि ते बहुतेक स्थापिले होतेच.

| March 5, 2014 05:59 am


‘हिंदुस्थान देशातील सर्व संस्थानांमध्ये कोल्हापूर संस्थानाची योग्यता विशेष आहे. गेल्या शतकात आमच्या लोकांनी हिंदू राज्य स्थापण्यास प्रारंभ केला आणि ते बहुतेक स्थापिले होतेच. त्याचे एक मूळ हल्ली करवीर क्षेत्रातच काय ते राहिले आहे. कोल्हापूरचे राज्य ज्यांनी स्थापन केले त्यांच्या वंशातील पुरुषांनी जी महत्कृत्ये केली, जो देशाभिमान दाखविला व जी कीर्ती संपादन केली, ती इतिहासविश्रुत आहे.’
– लो. टिळक
(केसरी- अग्रलेख : १८७४)
‘छत्रपतींचे घराणे व तख्त ही महाराष्ट्राच्या विशुद्ध प्रेमाची पूज्य दैवते आहेत. या दैवतांकडे आशापूर्ण नेत्रांनी आपल्या भाग्योदयाच्या सूर्यप्रकाशाची वाट महाराष्ट्र आतुरतेने पाहत असतो.’
– प्रबोधनकार ठाकरे
(प्रबोधन : १६ मे १९२२)

करवीर संस्थान हे दक्षिण भारतातील एक महत्त्वाचे संस्थान. मराठय़ांच्या इतिहासात त्यास असाधारण असे महत्त्व आहे. कृष्णा, कोयना, कुंभी कासारी, हळदी, तुळशी, हिरण्यकेशी, घटप्रभा, पंचगंगा व दूधगंगा या नद्यांच्या वास्तव्यामुळे सुपीक असणारा हा प्रदेश. १९४१ साली या संस्थानातील लोकसंख्या होती- अंदाजे १३ लाख, तर विलीनीकरणाच्या वेळी उत्पन्न होते- सुमारे दीड कोटी. १७१० ते १९४९ हा करवीरचा संस्थानी काळ. करवीर, पन्हाळा, भुदरगड, गडिहग्लज, शिरोळ आणि आळते अशा सहा पेटय़ांत (तालुक्यांत) हे संस्थान विभागलेले होते. शिरोळ्यापासून ते कर्नाटकातील रायबागपर्यंत या संस्थानची सीमा. पन्हाळा, करवीर ते कोल्हापूर हा या संस्थानचा प्रवास सामाजिक व ऐतिहासिकदृष्टय़ा फार महत्त्वाचा आहे. या संस्थानाने अनेक कर्तबगार इतिहासपुरुष महाराष्ट्राला दिले आहेत. महाराणी ताराराणी, छत्रपती राजाराम महाराज ते राजर्षी शाहू महाराजांच्या देदीप्यमान कामगिरीचा संबंध या संस्थानाशी आहे. करवीर हे छत्रपतींच्या थेट वंशजांचे संस्थान. छत्रपती शिवाजी महाराजांच्या नंतर हे संस्थान सत्ताकेंद्राच्या नाटय़ाचे व खळबळीचे केंद्र बनले. पन्हाळगडावरूनच ताराराणीने आपला कारभार केला. पुढे सातारा गादी स्वतंत्र झाली.
..
छत्रपती शाहूंची कारकीर्द महाराष्ट्राच्या समाजकारणात फार महत्त्वाची आहे. जीवनाच्या सर्वच क्षेत्रांत त्यांनी समाजहिताची व लोकोपयोगी कामे केली. समाजकारण, राजकारण, शिक्षण, उद्योग, शेती, कला व क्रीडा या क्षेत्रांत शाहू महाराजांनी केलेली कामे मूलभूत स्वरूपाची होती. नवसुधारणावादी प्रबोधन शतकाचा सांगाती व नव्या काळाचे सांस्कृतिक नेतृत्व करणारा हा राजा होता. संस्थानाच्या सर्व बाजूंच्या अभ्युदयाच्या स्वप्नप्राप्तीसाठी शाहू महाराज झटले.
शाहूंच्या काळात समाजसुधारणेची अनेक कामे झाली. कोल्हापूर हे बहुजनांच्या विद्य्ोचे माहेरघर बनले. विविध जातीजमातींच्या मुलांसाठी त्यांनी २३ वसतिगृहे सुरू केली. त्यामुळे या भूमीस ‘वसतिगृहांची जननी’ (शाहूंचे शब्द.. ‘मदर ऑफ बोìडग हाऊसेस’) म्हटले जाते. शाहू महाराजांच्या दृष्टीसमोर भविष्यकाळ होता. वेगवेगळ्या जातींच्या वसतिगृहांतून पुढे जाती मोडतील, शिक्षणातून होणाऱ्या समाजजागरणातून हे घडेल असे त्यांना वाटत होते. मात्र, आज ही वसतिगृहे जातींच्या बंदिस्त इमारती बनल्या आहेत. वर्तमानात त्या- त्या जातींचे वसतिगृहकर्ते जातअस्मिता म्हणूनच या धोरणाकडे पाहतात. १९०२ साली त्यांनी राखीव जागांचे फर्मान काढले. मोफत शिक्षण व स्त्रीशिक्षणासाठी जाणीवपूर्वक कायदे केले व त्यांची अंमलबजावणीही केली. राधानगरी तलाव बांधला. १९२० च्या सुमारास आंतरजातीय विवाहांना कायदेशीर मान्यता देणारा कायदा केला. आपल्या चुलतबहिणीचा विवाह त्यांनी इंदौरच्या होळकर घराण्यातील मुलाशी ठरवला. त्याचबरोबर संस्थानातील असे शंभर मिश्र विवाह करण्याचे योजिले. त्यांच्या मृत्यूनंतर दोन वर्षांनी असे २५ विवाह झाले.
छत्रपती शाहूंची ही कारकीर्द महत्त्वपूर्णठरलीच, पण त्याचबरोबर महाराष्ट्राच्या समाजकारणात कळीचा मुद्दाही ठरली. वेदोक्त प्रकरणापासून ते ब्राह्मण-ब्राह्मणेतर वादाच्या अनेक महत्त्वाच्या घटना शाहूंच्या कार्यकालाशी संबंधित आहेत. मल्लविद्या, तसेच क्रीडा व चित्रपट क्षेत्रातील सोनेरी कारकीर्दही शाहूंच्या काळातच घडली. शाहू महाराजांनी ज्या सुधारणावादी, समताधिष्ठित, र्सवकष अभ्युदयाची आकांक्षा बाळगली, तशा सुधारणा केल्या, त्या आज हळूहळू विरत गेलेल्या दिसतात. त्यांच्या द्रष्टेपणात व आजच्या नेतृत्वाच्या धोरणांत अंतर पडलेले दिसते.
..
छत्रपती राजर्षी शाहू महाराजांच्या निधनानंतर (१९२२) त्यांचे पुत्र तिसरे राजाराम (१८९७-१९४०) गादीवर आले. शेतीशास्त्रात त्यांना विशेष रुची होती. शाहू महाराजांनी जी कामे हाती घेतली होती त्यांचा विस्तार राजाराम महाराजांनी केला. त्यांनी अनेक व्यापारीपेठांची निर्मिती केली. औद्योगिक धोरणाची नवी घडी बसवली. ‘दि कोल्हापूर शुगर मिल्स’ या पहिल्या साखर कारखान्याची निर्मिती केली. लक्ष्मीपुरी व ताराबाई पार्क या वसाहतींची स्थापना केली. छत्रपती राजाराम महाराजांनी वडिलांप्रमाणेच समाजकारणात भाग घेतला. त्यांनी ब्राह्मणेतर परिषदेचे व अखिल भारतीय मराठा शिक्षण परिषदेचे अध्यक्षपद भूषविले. विविध खेळांना तसेच चित्रपटसृष्टीला त्यांनी संस्थानात प्रोत्साहन दिले. शेतकी शाळा व कॉलेज काढण्यात त्यांचा पुढाकार होता. अस्पृश्यता निवारणाच्या कार्यातही ते सहभागी झाले. ‘झुणका-भाकरीचे स्वराज्य’ असे त्यांच्या कार्याला म्हटले जाई. औद्योगिक, व्यापारी, नवसुधारणावादी विकासाचा कार्यक्रम राजाराम महाराजांनी दिला. मात्र, आज कोल्हापुरातील औद्योगिक प्रगती संथ झाली आहे. त्या काळातील सूत मिल आणि साखर कारखाना बंद पडला आहे. सूत मिलच्या मोकळ्या जागेत स्मारक निर्मितीसाठी मोठा गदारोळ सुरू आहे. संस्थानिकांची नवी पिढी आता प्रतिमापूजनात रमली आहे.
त्यानंतर कोल्हापूरचे छत्रपती म्हणून देवासचे विक्रमसिंह पवार (१९१० ते १९८३) हे छत्रपती झाले. शाहू महाराजांचे हे नातू. कोल्हापूरच्या राजकन्या आणि देवासच्या महाराणी राधाबाईसाहेब ऊर्फ अक्कासाहेब यांचे पुत्र. विक्रमसिंहाचा जन्म, बालपण आणि शिक्षणही कोल्हापुरातच झाले. विद्यापीठातून पदवीधर होण्याचा मान मिळवणारे ते भारतातील पहिले मराठा संस्थानिक. विक्रमसिंह महाराजांनी देवास संस्थानात काही काळ कारभार केल्यानंतर लष्करी अधिकारी म्हणून दुसऱ्या महायुद्धात भाग घेतला. १९४७ साली त्यांचा दत्तकविधी झाला आणि ते कोल्हापूरचे छत्रपती (छत्रपती शहाजीराजे) झाले.
छत्रपती शहाजीराजे उत्तम लष्करी अधिकारी होते. भारत सरकारने त्यांना ‘मेजर जनरल’ किताब देऊन गौरवले होते. फुटबॉल, टेनिस हे त्यांचे आवडते खेळ. राजाराम कॉलेजच्या फुटबॉल टीमचे ते कॅप्टन होते. शिकार हाही त्यांच्या आवडीचा प्रांत. वाघाची शिकार त्यांना विशेष आवडे. संस्थान १९४९ साली विलीन झाले. छत्रपती शहाजीराजे कोल्हापूरच्या समाजजीवनात फारसे मिसळले नाहीत. त्यांच्या काळातच दत्तकविधानावरून कोल्हापुरातील जनतेच्या नाराजीला त्यांना सामोरे जावे लागले.
समाजापासून काहीसे दूर राहिलेल्या या राजाने आपल्या एकांतमय जीवनात वेगळ्या गोष्टीचा ध्यास घेतला होता. तो म्हणजे इतिहासप्रेम आणि ग्रंथप्रेम. मराठय़ांच्या इतिहासाला चालना देण्याचे महत्त्वाचे काम त्यांनी केले. करवीरचा इतिहास आणि मराठय़ांच्या इतिहासाची साधने उपलब्ध करून देण्यात त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. इतिहास संशोधक मा. वि. गुजर यांच्याकडून त्यांनी करवीर व देवास घराण्याच्या कागदपत्रांच्या प्रसिद्धीचे काम करवून घेतले. त्यांची दुसरी महत्त्वाची ऐतिहासिक कामगिरी म्हणजे स. मा. गग्रे यांनी लिहिलेला ‘करवीर रियासत’ हा बृहद्ग्रंथ. छत्रपती शहाजींच्या प्रेरणेतूनच हा ग्रंथ सिद्ध झाला. इतिहासप्रेमातून त्यांनी कोल्हापुरात इतिहास चर्चा मंडळ चालविले. यात त्यांच्यासह स. मा. गग्रे, मनोहर माळगांवकर, ले. ज. एस. पी. थोरात, रत्नाकरपंत राजाज्ञा, खंडेराव गायकवाड व यशवंतराव रास्ते ही जाणकार मंडळी होती. वर्षांतून सात-आठ वेळा ही मंडळी राधानगरीच्या निसर्गरम्य परिसरात शिवाजी व्हिला या वास्तूत जमत आणि त्यांच्यात इतिहासावर अनौपचारिक चर्चा झडत. त्यातून काही नवे विषय त्यांना सुचले. त्याची पूर्तता त्यांनी केली.
शिकार व ग्रंथप्रेम ही शहाजी महाराजांची खासीयत होती. इतिहास, धर्म, युद्ध, शिकार या विषयांवरचे बारा-तेरा हजार ग्रंथ त्यांनी जमवले होते. १९६२ साली डॉ. जॉन फ्रिअर या अभ्यासकाने ‘न्यू अकाऊंट ऑफ ईस्ट अॅण्ड पíशया’ नावाचे एक पुस्तक लिहिले. त्यात छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक प्रत्यक्ष ज्या व्यक्तीने पाहिला त्याचे अनुभवकथन आहे. हे पुस्तक मोठय़ा कष्टाने व जिद्दीने शहाजी महाराजांनी मिळवून त्याचा आनंदोत्सव साजरा केला.
१९७४ साली शहाजी महाराजांनी शहाजी छत्रपती म्युझियम ट्रस्टची स्थापना केली व राजवाडय़ात भव्य असे संग्रहालय उभे केले. या संग्रहालयात राजघराण्यातील अनेक मौल्यवान वस्तू, नकाशे, पत्रे, चित्रे, पोशाख, तलचित्रे, राजचिन्हे, शिकार, ट्रॉफीज्, हत्तीवरील चांदीची अंबारी, मराठेशाही पगडय़ा, राजघराण्यातील स्त्रियांची कलाकुसरीची कामे, पेंटिंग्ज, तलवारी, भाले, बंदुका, वंशावळी, साठमारीची हत्यारे अशा वस्तू जतन करून ठेवल्या आहेत. तसेच त्यांनी पशुपक्ष्यांच्या व प्राण्यांच्या आवडीपोटी न्यू पॅलेस येथे प्राणिसंग्रहालयही उभारले आहे. इतिहाकार स. मा. गग्रे यांनी शहाजी महाराजांबद्दल म्हटले आहे की, ‘त्यांच्या सहवासात इतिहास संशोधनाबरोबरच माझ्या जीवनाच्या अनुभवकक्षाही विस्तारल्या.’ शहाजी महाराजांचे निधन ९ मे १९८३ रोजी राधानगरी येथे झाले.
..
राजघराण्यातील स्त्रियांच्या कर्तबगारीकडे इतिहासलेखनात तसे दुर्लक्षच होते. वास्तविक राजघराण्यांतील निर्णयप्रक्रियेत अनेक स्त्रियांची भूमिका महत्त्वाची ठरलेली आहे. करवीर संस्थानातील स्त्रियांची कामगिरीही ऐतिहासिकदृष्टय़ा महत्त्वाची ठरली आहे. राजाराम महाराजांच्या पत्नी ताराराणी यांची कर्तबगारी आणि पराक्रम तर सर्वश्रुतच आहे. तत्कालीन कवी कवीन्द्र गोिवदने ताराराणीबद्दल म्हटले होते-
दिल्ली झाली दीनवाणी । दिल्लीशाचे गेले पाणी ।
ताराबाई रामराणी । भद्रकाली कोपली ।
छत्रपती राजाराम महाराज यांच्या प्रथमपत्नी महाराणी ताराबाई (१९०५-१९५४) या बडोद्याच्या युवराज फत्तेसिंगराव गायकवाड यांच्या कन्या. त्यांच्या द्वितीय राणी विजयमाला (१९०८-१९९३) या तंजारवरच्या अमृतराव मोहित्यांच्या कन्या. १९६७ साली त्या कोल्हापूर मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेल्या. राजर्षी शाहू महाराजांचे धाकटे चिरंजीव प्रिन्स शिवाजी यांच्या पत्नी श्रीमंत इंदुमती राणीसाहेबांची (१९०६-१९७१) जीवनकथा फार करुण आहे. प्रिन्स शिवाजी नेज कुंभोजजवळ शिकारीप्रसंगी मृत्युमुखी पडले. त्यांना अवघे एक वर्षांचे वैवाहिक जीवन लाभले. पडदानशीन राजघराण्यातील या विधवा राणीने या प्रसंगाने खचून न जाता आपले शिक्षण पूर्ण केले. शाहू महाराजांना या घटनेचा फार चटका बसला. त्यांनी घरातील व बाहेरच्यांचा विरोध पत्करून इंदुमतीराणींना शिकविले. १९२५ साली त्या मॅट्रिक झाल्या. दिल्लीला मेडिकल कॉलेजला त्यांचा प्रवेश निश्चित झाला होता, परंतु त्यांना तिथे जाता आले नाही. त्यांनी काही शिक्षणसंस्थांची उभारणी केली. या पाश्र्वभूमीवर स्वातंत्र्योत्तर काळात राजघराण्यांतील स्त्रियांचा समाजकारणातील सहभाग नगण्य राहिलेला आहे. उलट, सरंजामी व्यवस्थेतील पडदापद्धत जोपासताना ही घराणी दिसतात.
..
सध्याचे छत्रपती घराण्याचे वंशज आहेत छत्रपती शाहूमहाराज. नागपूरच्या भोसले घराण्यातून ते दत्तक आले आहेत. याआधीचे महाराज छत्रपती शहाजीराजे यांच्या मुलीचे ते चिरंजीव. पूर्वीचे नाव दिलीपसिंह. जन्म : मुंबईस.. ७ ऑगस्ट १९४८ चा. नागपूर व बंगलोर येथे बिशप कॉटन हायस्कूलमध्ये शिक्षण. इंदौरच्या ख्रिश्चन कॉलेजमधून अर्थशात्र, इतिहास व इंग्रजी साहित्य या विषयांतून पदवी परीक्षा उत्तीर्ण.
छत्रपती शाहूमहाराजांचे वैशिष्टय़ म्हणजे राजघराण्याची कोणतीही झूल त्यांच्या अंगावर किंवा वागण्यात आढळत नाही. साधेपणा, ऋजुता आणि सुजनत्व हे त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचे विशेष. ते उदारमतवादी आहेत. कोल्हापूरच्या सार्वजनिक जीवनात त्यांचा सभा-समारंभांतून वावर असतो. समाजातील व राजकारणातील व्यक्तींशी त्यांचे मत्रीचे संबंध आहेत. त्यांच्याशी बोलत असता त्यांनी यशवंतराव चव्हाणांविषयीच्या दोन आठवणी सांगितल्या. ते म्हणाले, ‘दत्तकविधानापूर्वी यशवंतराव चव्हाण आमच्या घरी नागपूरला आमच्या वाडय़ावर आले होते. त्यावेळी दिवाणखान्यात त्यांनी मला बोलावून घेतले व माझ्याशी बोलले. तेव्हा मला नुकताच फोटोग्राफीचा छंद लागला होता. माझ्याजवळच्या कॅमेऱ्याने त्यावेळी मी त्यांचा एक फोटोही घेतल्याचे मला आठवते.’ दुसरी एक आठवण त्यांनी सांगितली ती अशी- ‘राजीव गांधी नुकतेच पंतप्रधान झाले होते. त्यावेळी मी काही कामानिमित्ताने दिल्लीला गेलो होतो. यशवंतरावांना त्यांच्या घरी भेटलो. ते तेव्हा मंत्रिमंडळात नव्हते. घरी एकटेच पुस्तक वाचत बसले होते. मनाने काहीसे उदास वाटत होते.’
स्वातंत्र्योत्तर काळात या संस्थानिकांचे वंशज विविध सामाजिक-राजकीय जीवनात सक्रीय आहेत. याआधी उल्लेख केल्याप्रमाणे १९६७ साली विजयमाला राणीसाहेब लोकसभेवर निवडून गेल्या होत्या. सध्याच्या छत्रपती महाराजांना राजकारणाची आवड आहे. त्यांनी राजकारणात सक्रिय होता येईल का, हेही आजमावले. पण त्यांनी प्रत्यक्ष राजकारणात सक्रीय सहभाग घेतला नाही. त्याबद्दल ते म्हणाले, ‘माझे मन राजकारणाच्या सीमारेषेवर नेहमी राहिले. हवे तर आपण त्याला ‘पेरीफेरी’ (periphery) म्हणूयात.’ मात्र, छत्रपती शाहूमहाराजांचे दोन्ही पुत्र राजकारणात आहेत. त्यांचे द्वितीय पुत्र मालोजीराजे हे २००४ च्या विधानसभा निवडणुकीत कोल्हापूर मतदारसंघातून काँग्रेसच्या तिकिटावर निवडून गेले होते. २००९ च्या निवडणुकीत मात्र त्यांचा पराभव झाला. त्यांचे ज्येष्ठ पुत्र युवराज संभाजीराजे हे २००९ साली लोकसभेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडून कोल्हापूर मतदारसंघातून उभे राहिले होते. पण त्यात त्यांना यश मिळाले नाही.
छत्रपती शाहूमहाराजांच्या वारसांचा शैक्षणिक व क्रीडा क्षेत्रात सहभाग आहे. थोरले छ. शाहूमहाराजांनी शतकापूर्वी दिलेल्या उदार देणगीतून ज्या संस्था स्थापन झाल्या, त्या संस्थांचे अध्यक्ष वारसा परंपरेने सध्याचे शाहूमहाराज आहेत. विशेषत: ऑल इंडिया श्री शिवाजी मेमोरिअल सोसायटी, पुणे तसेच डेक्कन एज्युकेशन सोसायटीचे ते अध्यक्ष आहेत. तसेच न्यू पॅलेसच्या परिसरात असणाऱ्या छत्रपती शाहू विद्यालयाचेही ते अध्यक्ष आहेत. कोल्हापुरातील अनेक शैक्षणिक, सामाजिक, क्रीडा संस्थांचे ते विश्वस्त आहेत. वडील छत्रपती शहाजी महाराजांच्या लष्करप्रेमाचा व इतिहासप्रेमाचा वारसा शाहूमहाराजांनी जपला आहे. भारतातील महत्त्वाच्या ठिकाणच्या लष्करी केंद्रांना त्यांनी भेटी दिल्या आहेत. अनेक लष्करी समारंभांत ते सहभागी झाले आहेत. १९६८ पासून दरवर्षी ते बेळगाव येथील मराठा लाइट इन्फंट्री सेंटरला आवर्जून भेट देत असतात. इतिहासाला चालना मिळावी म्हणून करवीर रियासतीच्या पुढील आवृत्त्या तसेच राजर्षी शाहू ग्रंथाच्या प्रकाशनाला त्यांचा मोठा हातभार लागला आहे. महाराष्ट्र इतिहास परिषदेचे ते मुख्य विश्वस्त आहेत.
आजच्या वंशजांपकी युवराज संभाजीराजे व मालोजीराजे यांचा समाजकारण व राजकारणात सहभाग आहे. विविध सामाजिक व क्रीडासंस्थांशी ते संबंधित आहेत. संभाजीराजांचा विवाह छत्तीसगढ येथील घाटगे-किरदत्त घराण्यातील संयोगिताराजे यांच्याशी झाला, तर मालोजीराजांचा विवाह माजी मंत्री दिग्विजय खानविलकर यांच्या कन्या मधुरिमाराजे यांच्याशी झाला. युवराज छत्रपती संभाजीराजे यांना ऐतिहासिक वास्तू व स्थळांविषयी फार आस्था व प्रेम आहे. गेल्या आठ-नऊ वर्षांपासून रायगड येथे त्यांच्या मार्गदर्शनाखाली शिवराज्याभिषेक सोहळा संपन्न होतो. सहा जूनला साजऱ्या होणाऱ्या या शिवराज्याभिषेक सोहळ्यास लोकोत्सवाचे स्वरूप प्राप्त करून देण्यात त्यांचा सहभाग महत्त्वाचा ठरला आहे. छत्रपती संभाजीराजे यांचा वावर महाराष्ट्रभर आहे. त्यांचे तरुणांचे संघटन व लोकसंग्रहही चांगला आहे. त उत्तम भाषणे करतात. अलीकडे मराठा आरक्षण समितीचे मार्गदर्शक म्हणून ते या चळवळीत सहभागी झाले आहेत.
..
भारत हा राजेरजवाडय़ांचा देश म्हणून ओळखला जातो. राजेशाहीवर प्रेम करणे हा भारतीयांचा स्वभावधर्म. त्यास अनुसरून महाराष्ट्र व महाराष्ट्राबाहेर करवीर संस्थानाच्या वारसांबद्दल कमालीचा आदरभाव लोकांच्या मनात आहे. कोल्हापूर संस्थानाविषयी हा आदरभाव आहे तो दोन महापुरुषांमुळे. एक शककत्रे छत्रपती शिवाजीमहाराज व दुसरे राजर्षी छ. शाहूमहाराज! या महानायकांचा संबंध या गादीशी आहे. त्यामुळेच त्यांच्या वारसांबद्दल भारतीय मनाला प्रेम व ममत्व वाटते. यशवंतराव चव्हाण यांनी या संस्थानाबद्दल दत्तकविधी प्रसंगावरून एक वादग्रस्त विधान केले होते. त्यावरून कोल्हापूरच्या जनतेचा रोष त्यांना पत्करावा लागला होता. तसेच भारताचे माजी लष्करप्रमुख जनरल एस. पी. थोरात यांनाही येथे लोकसभा निवडणुकीत पराभव पत्करावा लागला होता.
छत्रपतींच्या घराण्यात शिकारीचा छंद प्रारंभापासून पाहायला मिळतो. खुद्द शिवाजी महाराजांचे वडील शहाजीराजे व शाहू-महाराजांचे चिरंजीव प्रिन्स शिवाजी हे शिकारीदरम्यानच दुर्दैवाने मरण पावले. घोडेस्वारी व शिकारीचे शिक्षण राजपुत्रांना लहानपणीच दिले जात असे. कोल्हापूर परिसरात शाहूवाडी, गगनबावडा, राधानगरी या गर्द झाडीच्या प्रदेशांत विविध पशुपक्षी-प्राण्यांचा आढळ मोठय़ा प्रमाणात होता. रायबाग, हुपरी, शिरोळ, अंबा, राधानगरी येथील जंगलाचा प्रदेश शिकारीसाठी आरक्षित असे. वाघ, हरण, गवे, सांबर, रानडुक्कर या प्राण्यांची शिकार केली जाई. त्यात ‘चित्ता हंटिंग’ (चित्त्याकडून हरणाची शिकार) व ‘पिग स्टिकिंग’ (रानडुकराची शिकार) विशेष प्रिय मानली जाई. याकरता चित्त्याला माणसाळले जाई. शिकारी कुत्र्यांचा सांभाळ केला जाई.
पूर्ववैभवाच्या काही खुणा व प्रथा कोल्हापूरकरांनी अजूनही जपलेल्या आहेत. यापकीच एक म्हणजे दसरा महोत्सव! पूर्वी तो जुन्या राजवाडय़ात व्हायचा. नंतर तो राजर्षी शाहू चौकाच्या बाजूस असणाऱ्या भव्य प्रांगणात साजरा होऊ लागला. यावरूनच या परिसराचे नाव ‘दसरा चौक’ असे पडले आहे. राजेशाही थाटाचा शिलंगण व सोने लुटण्याचा हा पारंपरिक उत्सव. पूर्वी या मिरवणुकीचा थाट काही औरच असे. राजवाडय़ातून मिरवणूक निघे. ती पाहायला आजूबाजूच्या गावांतील लोक मोठय़ा संख्येनं येत. पांढऱ्या, काळ्या, तपकिरी रंगाच्या अबलख घोडय़ांची अशी तीन घोडय़ांच्या रांगा असलेली शिस्तशीर मिरवणूक निघे. लाल डगलेवाले जरीकिनारीच्या लाल फेटे परिधान केलेले घोडेस्वार त्यात असत. तोफखाना, लष्करी दल, शिकारखान्यातील वाघ, नगारा लादलेले उंट, जहागीरदार, इनामदार, सरदार मिरवणुकीत सहभागी होत. बँडपथकाच्या निनादात मिरवणूक निघे. आजही शाहूमहाराजांच्या कुटुंबीयांच्या उपस्थितीत हा सोहळा साजरा होतो.
कालौघात बरेच काही वाहून जाते, नामशेष होते. तरीही इतिहासातील काही खुणा वर्तमानात पाझरत असतात. इतिहासातील पूर्ववैभवाच्या अनेक खाणाखुणा कोल्हापूरच्या जीवनशैलीत व परिसरात आहेत. आहारापासून वेशभूषेपर्यंत या जुन्या रिवाजांची रूपे इथे पाहायला मिळतात. वास्तु या संस्थानाच्या महत्त्वाच्या खुणा. या इतिहासकालीन वास्तु आज शहरात रूपांतरीत होत असलेल्या काँक्रीटच्या भव्य वास्तूंमुळे कशाबशा जीव मुठीत घेऊन उभ्या असलेल्या दिसतात.
घाटगे पाटील, खर्डेकर सरकार, जहागीरदार, िशदे सरकार या नावांमागे असणाऱ्या परंपरेतील सरंजामी वृत्तीचे आकर्षण इथल्या समाजमनाला अजूनही आहे. आजही राजघराण्यातील व्यक्तींना लोक आदराने पाहतात. आजही शाहूमहाराजांना भेटताना पारंपरिक पद्धतीने मुजरा केला जातो.
शहरातील आताची ताराबाई पार्क ही नागरी वसाहत पूर्वी रेसिडेन्सी परिसर म्हणून ओळखला जाई. गावाबाहेरील या वसाहतीत संस्थानातील सरदारांचे बंगले होते. हिम्मतबहादूर चव्हाण, जमखंडीकर, सांगलीकर पटवर्धन, इचलकरंजीकर, कापशीकर घोरपडे, सरलष्कर खर्डेकर, दिवाणबहादूर सुर्वे, पंत अमात्य बावडेकर, डफळे सरकार, िशदे सरकार यांचे बंगले या परिसरात होते. इंदूमती राणीसाहेबांचाही बंगला इथेच होता.
..
कोल्हापूर हे एकेकाळी रम्य सरोवरांचे नगर होते. शतकभरापूर्वी शहरात आणि लगतच्या परिसरात पन्नासेक सरोवरे होती. एखाद् दुसरा अपवाद वगळता आज ती लुप्त झाली आहेत. शहरात अनेक सरदारांचे वाडे, वास्तु आणि जहागिरी होत्या. ते पाडून त्या ठिकाणी बंगले, कॉम्प्लेक्स, अपार्टमेंट्स उभी राहिली आहेत. न्यू पॅलेस, खासबाग मदान, केशवराव भोसले पॅलेस, करवीर नगर वाचन मंदिर, राजाराम हायस्कूल व कॉलेज, शाहू महाराजांचे अखेरच्या काळात वास्तव्य असलेली पन्हाळा रोडवरील सोनतळीची वास्तू, राणी इंदुमतीचा बंगला, जिल्हाधिकारी कार्यालय, प्रमिलाराजे हॉस्पिटल, टाऊनहॉल, अनेक वसतिगृहे, राजाराम तलाव, रंकाळा, आयर्वनि म्युझियम हॉल (सध्याचे जिल्हाधिकारी कार्यालय), जिल्हाधिकारी निवास, पंचगंगा नदीवरील मंदिरे व घाट, रंकाळा, शालिनी पॅलेस, राधानगरी तलाव, अनेक तालमी, पन्हाळ्यावरील विविध वास्तू यांनी हे शहर आकाराला आलेले आहे. साठमारी मदानाचे जीर्ण अवशेष अजूनही पाहायला मिळतात. शाहू काळातील दोन मोठी रेसकोर्स मदाने आता नाहीशी झाली आहेत. शालिनी पॅलेस या दिमाखदार वास्तूचे हॉटेलात रूपांतर झाले आहे. आता ते ‘अँटिक पीस’ म्हणून चित्रपटांच्या शुटिंगसाठी वापरले जाते. काळाच्या ओघात या ऐतिहासिक वास्तूंचे रंग उडून गेले आहेत. जुना राजवाडा इतिहासकाळाचा, अनेक खळबळींचा साक्षीदार आहे. आज त्याची दयनीय अवस्था झाली आहे. करवीर संस्थानाच्या राजधानीचे मुख्य ठिकाण असणारी ही वास्तू. १८५७ चा उठाव, कुटुंबकलह, राजìषची देदीप्यमान कामगिरी पाहिलेली ही वास्तू. बस स्टेशन, पोलीस स्टेशन, शेतकरी संघाचे गोडाऊन व इतरही कार्यालये या वास्तूत आता थाटली गेली आहेत. जुन्या राजवाडय़ाच्या बाहेर पडणाऱ्या रस्त्याला शाहू महाराजांनी आपल्या मित्राचे- भावनगरचे राजे भावसिंगराजे यांचे स्मरण म्हणून भाऊसिंगजी रोड हे नाव दिले. शहरातील बावडय़ानजीकचा शाहूंच्या संस्थानिकी खूण असलेला न्यू पॅलेस सध्याच्या वंशजाकडे आहे. विस्तीर्ण प्रदेशात पसरलेला. लहानसे तळे, बदके, हरीण, मोरांचा वावर असलेला हा परिसर. न्यू पॅलेस ही भव्य ऐतिहासिक वास्तू तिथे उभी आहे. याच वास्तूत एका बाजूला सध्याचे शाहू महाराजांचे कुटुंबीय राहतात.
करवीर संस्थानची स्वातंत्र्योत्तर काळातील ही एकंदर वाटचाल. भूतकाळातील वारशाच्या दंतकथा तेवढय़ा आता उरल्या आहेत. या बदलाची नोंद इथल्या एका शाहिराने फार चांगली घेतली आहे. तो म्हणतो-
राजवाडा नवा जुना, साठमारी शिकारखाना
राजा हुता तेव्हा इथं हत्ती झुलती
राज गेलं हत्ती गेलं घोडं उंट वाघ गेलं
पाकोळ्यांची गर्दी आता झाली भलती…

First Published on March 5, 2014 5:59 am

Web Title: karveer sansthan