यशस्वी व्यक्तींच्या मागे, विशेषत: यशस्वी उद्योजकांच्या मागे पुष्कळदा त्यांच्या घराण्यातल्या अनेक पिढय़ांचं वलय असतं. आणि स्वत:च्या हिमतीवर पुढे आलेल्या माणसांमागे त्यांच्या एकेकाळच्या खडतर प्रवासाची सावली साथीला असते. अशा व्यक्तिमत्त्वांना लाभणारे मानसन्मान खूपदा त्यांना अशा उंचीवर नेऊन ठेवतात, जिथे सर्वसामान्य लोक कधीच पोहोचू शकत नाहीत. काही वेळा प्रसिद्धीच्या वर्तुळात या व्यक्ती अशा काही गुरफटतात, की बाहेरच्या जगाचं वारंही त्यांना लागत नाही.
या आणि अशा सगळ्या गृहितकांना छेद देणारी व्यक्ती.. एक अत्यंत यशस्वी आणि स्वयंप्रज्ञ उद्योजिका पुण्यात आहे. ‘व्हल्कन लावल’च्या मॅनेजिंग डायरेक्टर आणि टेट्रापार्कच्या चेअरपर्सन या बिरुदांना ज्यांनी मोठं केलेलं आहे, अशा लीला पुनावालांविषयी मी हे म्हणते आहे. याचं कारण या बिरुदांचा वर्ख त्यांच्या व्यक्तिमत्त्वावर बिलकूल चढलेला नाही. बुद्धीचं आणि कर्तृत्वाचं तेज सभोवती असलं, तरी अहंकाराचा कणभरही स्पर्श त्यांना झालेला नाही. आयुष्यात हवं ते जिद्दीनं मिळवल्यावर अनेकदा माणसं स्वत:चं एक तत्त्वज्ञान तयार करतात आणि त्याच चौकटीतून इतरांकडे पाहतात. लीला पुनावाला यांनी स्वत:भोवती असे कुठलेच अडसर उभे केलेले नाहीत. अगदी मोकळ्या, प्रसन्न आणि उत्सुक दृष्टीनं जगाकडे पाहण्याची, भोवतीच्या माणसांना समजून घेण्याची त्यांची मनमोकळी वृत्ती आहे. त्यांना भेटल्यानंतर, त्यांच्याशी खूप साऱ्या गप्पा मारल्यानंतर माझं त्यांच्याविषयी हे मत बनलंय, असंही मी म्हणणार नाही. परंतु त्यांच्या सहवासातली, त्यांच्या संपर्कात येणारी कुणीही व्यक्ती खात्रीनं हेच म्हणेल, हा मला विश्वास आहे.
लीला पुनावाला यांच्या उद्योजकीय कर्तृत्वाची माहिती बहुतेकांना आहे. त्यांना मिळालेल्या राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय स्तरावरच्या मानसन्मानांची यादीही मोठी आहे. या लौकिक गोष्टींवर भर देण्यापेक्षा त्यांचे व्यक्तिमत्त्व, आयुष्य, त्यांचं माणूसपण, त्यांचं बालपण, त्यांचं कुटुंब, त्यांची जिद्द, त्यांच्या जीवनधारणा आणि फिरोझ पुनावाला या उद्योजकासोबतचं त्यांचं सहजीवन या त्यांच्या व्यक्तिगततेविषयी जाणून घ्यायला कुणालाही आवडेल. त्यातून लीला पुनावाला यांचं जे चित्र उभं राहील, ते अधिक जिवंत, उत्कट असेल. आणि कदाचित त्यातून कुणाला आपली वाटही उजळल्यासारखं वाटेल.
लीला पुनावाला आपल्या कुटुंबासोबत पाकिस्तानातून भारतात आल्या त्या भारत-पाक फाळणीच्या वेळी. १९४४ सालचा त्यांचा जन्म. भारतात आल्यावर लोणावळ्याच्या निर्वासितांच्या छावणीत त्यांची रवानगी झाली. पाकिस्तानात असतानाच त्यांचे वडील एका रेल्वे अपघातात गेले होते. वडिलांच्या या अपघाती जाण्यानंतर दोन-चार महिन्यांतच हे कुटुंब भारतात आलं. आई, तीन सख्खे भाऊ, आजी-आजोबा, चुलतभाऊ असं भलंमोठं कुटुंब. विस्थापनाचे, दारिद्रय़ाचे चटके आणि अस्थिर वर्तमानामुळे वाटणारी अनिश्चित भविष्याची चिंता कुटुंबातल्या मोठय़ा माणसांना सतावत असली तरी मुलांच्या निरागस आयुष्याला त्याची झळ लागण्याचं कारण नव्हतं. लीला ही आठ भावांची एकमेव बहीण. तेव्हा ती होती जेमतेम पावणेतीन वर्षांची. एक सख्खा भाऊ आणि एक चुलतभाऊही तिच्यासारखेच लहान. बाकी सहा भाऊ मोठे. भावंडांसोबत दिवसभर हुंदडण्याचे, खेळण्याचे ते दिवस होते. एवढा एकच त्या काळाचा अस्पष्ट ठसा आज त्यांच्या मनावर आहे.
आणि आणखीन एक आठवण आहे. गांधीजींच्या हत्येनंतर लोणावळ्याच्या या विस्थापितांच्या छावणीत मुस्लीम राहत असल्याची शंका घेऊन काही लोक छावणी जाळण्यासाठी आले होते. त्यावेळी ‘आम्ही हिंदू आहोत’ असं मोठय़ानं ओरडत या कुटुंबासह छावणीतले सगळे लोक सैरावैरा धावत सुटल्याचं दृश्य त्यांना अंधुकसं आठवतं.
काही महिने छावणीत काढल्यानंतर हे कुटुंब पुण्यात लीला पुनावालांच्या आजीच्या नातेवाईकांकडे आलं. छावणीचा तो तात्पुरता निवारा सुटून एक छोटेसं का होईना, घर त्यांना मिळालं. सदाशिव पेठेत चिंचेच्या तालमीजवळ हे घर होतं. अर्थात, या मुलांसाठी खेळण्याची फक्त जागा बदलली, एवढंच. आर्थिक ताण, भविष्याची चिंता या त्यांच्या आई आणि आजीकरता छळणाऱ्या गोष्टी होत्या. वडिलांनी उतरवलेल्या विम्याचे पैसे होते, पण एवढं मोठं कुटुंब चालवायला ते पुरेसे नव्हते. मग आईनं घरबसल्या पापड लाटून देण्याचं काम सुरू केलं. ही मुलं पापड वाळवण्याचं काम करायची. अर्थात मुलांना शिकवलं पाहिजे याची जाणीव त्यांच्या आईला होती. मंडईजवळ दत्त मंदिराजवळ महापालिकेची शाळा होती. त्या शाळेत लीला पुनावाला दाखल झाल्या. इतर भावंडंही सोबत होती. ही शाळा आणि चिंचेच्या तालमीचा परिसर या दोन्ही ठिकाणी लीला पुनावालांची मराठी भाषेशी नाळ जुळली. आजही त्या चांगलं मराठी बोलतात. ‘पुण्यात इतकी वर्षे राहून मराठी कसं येणार नाही?’ असं उलट त्या आपल्यालाच विचारतात.
त्यांचं दोन-तीन र्वष महापालिकेच्या शाळेत शिक्षण झालं. दरम्यानच्या काळात आईनं इतर मुलांना कॉन्व्हेंट स्कूलमध्ये घातलं होतं. लीलालाही इंग्रजी यावं म्हणून मग तिलाही माऊंट कार्मेलमध्ये आईनं दाखल केलं. घरापासून या शाळा तशा लांबच होत्या. पण सात-आठ मुलांना बसनं पाठवणं परवडण्याजोगं नव्हतं. त्यामुळं लीला पुनावाला आणि त्यांचा धाकटा भाऊ या दोघांनाच आईनं बसचा पास काढून दिला. सिटी पोस्टापासून कॅम्पपर्यंत बस होती. सिटी पोस्टापर्यंत ते चालत जायचे. मोठी भावंडं तर चिंचेच्या तालमीपासून कॅम्पमधल्या शाळेत चालतच ये-जा करायची.
‘आठवीपर्यंत मी अगदी सर्वसामान्य विद्यार्थी होते..’ लीला पुनावाला शाळेची आठवण सांगतात. ‘पण आठवीमध्ये सुंदरजी या माझ्या सुंदरजी या वर्गशिक्षिकेला मात्र माझ्यात वेगळं काही दिसलं.’ या शिक्षिकेनं आपल्या या विद्यार्थिनीमधली ठिणगी जागी केली. ‘तुझ्याजवळ जिद्द आहे,’ त्या म्हणाल्या- ‘हुशारीही आहे, तेव्हा आपली उद्दिष्टं निश्चित कर आणि त्यासाठी भरपूर कष्टाची तयारी ठेव. स्वप्न पाहा आणि ती प्रत्यक्षात आणण्याचा नेटानं प्रयत्न कर.’ ही शिकवण लीला पुनावाला यांनी आपल्या मनावर ठासून बिंबवली आणि त्या दिशेनं सक्रीय कृतीही केली. त्यामुळे आठवी ते दहावी त्या उत्तम गुण मिळवत गेल्या. ‘सुंदरजींचा भर फक्त पुस्तकी ज्ञानावर नव्हता..’ सुंदरजींविषयी लीला पुनावाला अतिशय आत्मीयतेनं बोलतात. कारण या शिक्षिकेनं त्यांच्या आयुष्यावर अमीट असा ठसा उमटवला आहे. ‘समाजात वागावं कसं, बोलावं कसं, मुलींचा पेहेराव कसा असावा, पुरुषांच्या जगात कसं वावरावं, हेही त्या सांगायच्या. पुढे वर्कशॉप्समध्ये काम करताना, पुरुषांसोबत फॅक्टरीत वावरताना त्यांच्या या शिकवणुकीचा मला फार उपयोग झाला,’ असं त्या आवर्जून सांगतात.
शाळेतली प्रगती आणि भावांसोबत ‘टॉम बॉय’सारखी वाढल्यामुळे निर्माण झालेली धाडसी वृत्ती याचा घरी आजीपुढे मात्र काही उपयोग व्हायचा नाही. आजी स्वभावानं फार घट्ट आणि वृत्तीनं काहीशी कर्मठ होती. आईचं व्यक्तिमत्त्व मात्र अगदी सौम्य, सालस होतं. सगळ्या नातवांना जेवायला बसवून आजी गरम पोळ्या करून वाढायची आणि नातीलाही करायला लावायची. ‘सगळी भावंडं एकत्र जेवताहेत तर मी का नाही जेवायचं?,’ असा लीलाचा आजीला रोजचा प्रश्न असे. पण, मुलीच्या जातीला स्वयंपाक आलाच पाहिजे असा आजीचा कायम घोशा असे. लीलाने ‘मी पोळ्या करणार नाही’ असं म्हटलं की आजी तिला मारायची. कितीतरी वेळा रडत रडत पोळ्या लाटल्याची आठवण लीला पुनावाला खळाळून हसत आज सांगतात.
भावांना घरात प्रथम जेवण्याचा मान होता, त्याचबरोबर किमान शिक्षण घेऊन नोकरीला लागण्याची जबाबदारीही त्यांच्यावरच होती. कुटुंब चालवायचं तर त्यांना पैसे मिळवणं भाग होतं. लीला पुनावालांचा सर्वात मोठा भाऊ अकराव्या वर्षीच नोकरीला लागला. पाकिस्तानात असल्यापासून आजीची एका व्यापारी कुटुंबाशी ओळख होती. त्यांचा मद्रासमध्ये मोठा व्यवसाय होता. प्राथमिक शिक्षण झाल्या झाल्या (अकराव्या-बाराव्या वर्षीच) मोठे दोन भाऊ मद्रासला नोकरीसाठी गेले. भावानं पहिल्या पगाराची रक्कम (रुपये शंभर) मनीऑर्डरनं पुण्याला पाठवली. भाजी चिरत बसलेल्या आजीच्या हातात पोस्टमननं शंभर रुपये दिले. ते पाहून आजी इतकी विलक्षण आनंदून गेली, की त्या आवेगानं तिचं हृदय बंद पडून ती जागच्या जागीच गेली.
त्यानंतर सगळ्या घराची सूत्रं आईच्या हातात आली. दरम्यान, शाळेचं शिक्षण संपून लीला पुनावाला यांनी फग्र्युसन कॉलेजमध्ये प्रवेश घेतला होता. प्रवासाची, भटकंतीची खूप हौस असल्यामुळे एअर होस्टेस व्हावं असं लीला पुनावालांना मनापासून वाटत होतं. कॉलेजची दोन र्वष झाल्यानंतर पुढच्या शिक्षणाबाबत निर्णय घ्यायची वेळ आली. मुलांना शिकता आलं नाही, पण या मुलीनं तरी उच्च शिक्षण घ्यावं असा आईचा आग्रह होताच. मात्र, शिक्षणाचा खर्च आता आफ्रिकेत गेलेला भाऊ करत होता. ‘त्याला विचारून ठरव,’ असं आईनं सांगितल्यावर लीला पुनावालांनी भावाला पत्र लिहिलं. त्याला बहिणीनं एअर होस्टेस होणं पटलं नाही. त्याऐवजी त्यानं इंजिनीअरिंगला जाण्याचा सल्ला तिला दिला.
पुढील शिक्षणाचं क्षेत्र म्हणून आपण मेकॅनिकल इंजिनीअरिंगची निवड केल्याचं लीला पुनावालांनी आपल्या मैत्रिणींना सांगितलं तेव्हा त्या हसल्या. ‘कसं जमणार तुला ते?’ मुली असलं काही करू शकतात?,’ असे प्रश्न त्यांनी उपस्थित केले. पण त्यांच्या प्रत्येक प्रश्नाबरोबर आणि उंचावणाऱ्या प्रत्येक भुवईबरोबर लीला पुनावालांचा निर्णय आणखीनच ठाम झाला. मुळात घरी मुलांसोबत वाढल्यामुळे त्यांच्यासाठी ‘पुरुष’ हा कुणी वेगळा प्राणी नव्हताच. त्यातून या प्रसंगानं त्यांच्यातली आव्हान स्वीकारण्याची वृत्ती जागी झाली. ‘तुम्ही मला जमणार नाही असं म्हणा. मग मी ते करून दाखवतेच,’ अशा जिद्दीनं त्या पुण्याच्या शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयात दाखल झाल्या. वर्गात मुली अवघ्या दोनच. बाकी सगळी मुलं. पण वातावरण खेळीमेळीचं होतं. कामात श्रम आणि शक्तीची गरज लागे तेव्हा मुलं या दोघींच्या मदतीला येत. एरवी ड्रॉइंग्ज वगैरे काढताना या दोघी त्यांना मदत करत. कॉलेजचे दिवस मस्त मजेत गेले आणि लीला पुनावाला उत्तम गुणांनी इंजिनीअिरग पासही झाल्या.
आता प्रश्न होता नोकरीचा! मेकॅनिकल इंजिनीअर मुलीला नोकरी द्यायला फारसं कुणी उत्सुक नव्हतं. पण रस्टन हॉर्न्सबीमध्ये त्यांचं काम झालं. पहिल्या दिवशी कंपनीच्या बसथांब्यापर्यंत सोडायला भाऊ आला होता. रस्टनमध्ये नोकरी करणारे फिरोझ पुनावाला त्याच स्टॉपवर बसच्या प्रतीक्षेत उभे होते. त्यांना लीलाचा भाऊ म्हणाला, ‘माझी बहीण आजपासून कंपनीत जॉइन होतेय. तिची काळजी घ्या.’ फिरोझ पुनावालांनी लीलाच्या भावाला (नंतर झालेल्या मेव्हण्याला!) दिलेला शब्द आजपर्यंत पाळला आहे. (असं ते आजही लीला पुनावालांना चिडवतात.)
पहिल्या भेटीतच या दोघांना एकमेकांची ओळख पटली. अर्थात, परस्परांवरील प्रेम व्यक्त करायला त्यांना काही काळ जावा लागला. लीला पुनावालांची हुशारी आणि चौकस बुद्धी हे गुण फिरोझना अतिशय भावले. आपल्या या वरिष्ठ सहकाऱ्याला लीला पुनावाला पुष्कळ प्रश्न विचारायच्या. ‘मीही तिला कामाबद्दल माहिती देत राहायचो..’ फिरोझ सांगतात- ‘पण तिच्या काही प्रश्नांची उत्तरं माझ्याजवळही नसायची. मग आता मला वेळ नाही, उद्या सांगतो, असं म्हणून मी लीलाला कटवायचो. आणि रात्री तिनं विचारलेल्या गोष्टी पुस्तकांतून शोधून दुसऱ्या दिवशी तिला सांगायचो.’
फिरोझ लीला पुनावालांपेक्षा सात वर्षांनी मोठे. साहजिकच त्याहीवेळी अधिक समंजस आणि परिपक्व असं त्यांचं व्यक्तिमत्त्व होतं. दोघांनी लग्न करायचं ठरवलं, पण दोन्ही घरचा त्याला विरोध होता. पण तरी दोघांचा निर्णय ठाम होता. दोघांनी आजारपणाचं कारण सांगून कंपनीतून रजा घेतली आणि थेट कुलू गाठलं. नोंदणी पद्धतीनं लग्न करून एक महिनाभर दोघं तिथेच राहिले. ते साल होतं १९७०. परत आले तेव्हा दोन्ही घरचं वातावरण निवळलं होतं. मग दोघांनी आपला स्वतंत्र संसार सुरू केला. फिरोझ पुनावालांच्या आई वृत्तीनं अतिशय उदार आणि प्रेमळ होत्या. फिरोझ पुनावालांच्या एकूण घडणीत त्यांचा मोठा प्रभाव आहे. मुलानं वेगळं घर करून आपला संसार थाटला तेव्हाही त्यांनी त्याला बजावलं, ‘स्वत:च्या निर्णयानं तू लग्न केलं आहेस. त्यामुळे बायकोला सुखात ठेवण्याची जबाबदारीही तुझी आहे. लीलाला त्रास होईल असं कधीही वागू नकोस.’ फिरोझ पुनावालांनी आईची ही सूचना कधीच दृष्टीआड केली नाही. गेल्या ४३ वर्षांच्या त्यांच्या सहजीवनात त्यांनी मित्र, मार्गदर्शक आणि पाठीराखा बनून लीला पुनावालांना आजवर खंबीर साथ दिलेली आहे.
लग्न झाल्यानंतर अचानक या दोघांपुढे एक वेगळाच प्रश्न उभा राहिला. कंपनीच्या नियमानुसार पती-पत्नी दोघांना एकत्र नोकरी करता येणार नव्हती. दोघांपैकी एकाला नोकरी सोडणं भाग होतं. फिरोझ वरच्या पदावर असल्यामुळे त्यावेळी त्यांचा पगार जास्त होता. त्यामुळे त्यांनी रस्टनमध्येच राहायचं आणि लीला पुनावालांनी नोकरी सोडायची असं ठरलं. पुन्हा एकदा त्यांची नोकरीसाठी वणवण सुरू झाली. मुलगी म्हणून सगळीकडे नकार मिळत होता. शेवटी एका ओळखीचा उपयोग होऊन त्या व्हल्कन लावलमध्ये दाखल झाल्या. इंजिनीअर म्हणून जरी त्यांना सेवेत रुजू करून घेतलेलं असलं तरी त्यांच्यावर जबाबदारी सोपवली होती ती मात्र बागकामावर देखरेख ठेवण्याची आणि कंपनीतल्या एकूण स्वच्छतेची! लीला पुनावाला अर्थातच फार निराश झाल्या. घरी येऊन त्या दररोज फिरोझजवळ तक्रार करायच्या. दोन-तीन दिवस हा प्रकार झाल्यावर फिरोझ त्यांना म्हणाले, ‘लीला, तुला जे काम नेमून दिलंय ते तुला आवडत नसेल तर नोकरी सोड. असं मन नसताना काम करण्यात अर्थ नाही. पण एक आव्हान म्हणून हेच काम तू आनंदानं आणि उत्तमरीत्या करू शकतेस. आज कंपनीने आपल्याला डावलल्यासारखं तुला वाटतंय, हे खरंय. पण हेही काम मी उत्तम करून दाखवेन अशी जिद्द बाळग. आणि मग काय होतं ते बघ.’
फिरोझ पुनावालांच्या या बोलण्यानं लीला पुनावाला खरंच पेटून उठल्या. त्यांनी कंपनीच्या बागा आणि एकूण साफसफाईचं चित्र अशा पद्धतीनं पालटून टाकलं, की कंपनीला त्यासाठी प्रत्येक वर्षी बक्षीस मिळायला लागलं. व्हल्कन कंपनीला लागोपाठ बारा र्वष हे पुरस्कार मिळाले. याचं श्रेय पूर्णपणे लीला पुनावालांचं आहे. त्यानंतर व्यवस्थापनाला त्यांच्या क्षमतांचा अंदाज आला. तरी त्यांच्याविषयीची दृष्टी अजूनही बदलली नव्हती. कंपनीच्या मुख्य प्रवाहातलं काम त्यांना दिलं गेलं खरं; पण ऑर्डर्स आणण्यासाठी त्यांना आधी कुवेतला आणि मग रशियाला पाठवलं गेलं. ‘अरब देशात ही बाई कशी जाते आणि काय काम करते, बघू या!’ असाच त्यांना कुवेतला पाठवताना हेतू होता. वैतागून ही बाई काम सोडणार असं व्यवस्थापनाला वाटत होतं. पण आव्हानं स्वीकारण्यात आनंद मानणाऱ्या लीला पुनावाला पूर्ण अभ्यास आणि प्रेझेंटेशनची तयारी करून या दोन्ही देशांत गेल्या. अरब लोकांविषयी त्यावेळी उलटसुलट बरंच ऐकलेलं असल्यामुळे फिरोझ रजा घेऊन स्वत:च्या खर्चानं बायकोसोबत गेले होते. रशियातही उणे ४५ डिग्री इतक्या कडाक्याच्या थंडीत त्यांना जावं लागलं. तेव्हाही फिरोझ लीला पुनावालांसोबत होते. दोन्ही ठिकाणी लीला पुनावालांनी उत्तम प्रेझेंटेशन करून मोठय़ा ऑर्डर्स मिळवल्या. ‘कंपनीचं प्रतिनिधित्व तुम्ही कसं करता, तुमचा तुमच्या उत्पादनाबाबतचा अभ्यास, तुमचं प्रेझेंटेशन कसं आहे, हेच खरं तर महत्त्वाचं असतं,’ असं लीला पुनावाला याबाबतीत म्हणतात. ‘या गोष्टी उत्तम असतील तर व्यावसायिक क्षेत्रात तुम्ही स्त्री आहात की पुरुष, यानं काही फरक पडत नाही.’ त्यांनी कंपनीसाठी मोठय़ा ऑर्डर्स आणल्या खऱ्या; पण ते आकडे बघून व्यवस्थापनानं सरळ हात वर केले. ‘एवढय़ा मोठय़ा ऑर्डर्स पूर्ण करण्याची आपली क्षमताच नाही,’ असं त्यांनी सांगून टाकलं. लीला पुनावालांसाठी हा मोठाच धक्का होता आणि पुन्हा नवं आव्हानही! ही ऑर्डर पूर्ण करायचीच- असा त्यांनी चंग बांधला. व्हल्कन लावलच्या स्वीडनमधल्या मुख्य ऑफिसशी त्यांनी संपर्क साधला. दोन्ही युनिट्सनी कशा पद्धतीनं काम केलं तर ही ऑर्डर पूर्ण करता येईल, आणि त्यातून कंपनीला किती फायदा होईल, याचा सविस्तर आराखडाच त्यांनी स्वीडनमधील अधिकाऱ्यांसमोर मांडला. त्यांनाही लीला पुनावालांची कार्यपद्धती पटली. त्यांचा आवाका तिथल्या व्यवस्थापनानं ओळखला आणि पुनावालांच्या नेतृत्वाखाली ही मोठी ऑर्डर वेळेत पूर्ण करण्यात आली. यानंतर व्हल्कन लावल व्यवस्थापनाचा त्यांच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला. त्यांची पदोन्नती आणि कंपनीची प्रगती या दोन्ही गोष्टी मग सातत्यानं एकत्र होत राहिल्या. १९८७ साली वयाच्या ४३ व्या वर्षी लीला पुनावाला व्हल्कन लावलच्या मॅनेजिंग डायरेक्टर झाल्या. त्यांचं कर्तृत्व, कार्यक्षमता, बुद्धी आणि कार्यपद्धती पाहून ज्येष्ठतेच्या तिसऱ्या पातळीवरून व्यवस्थापनानं त्यांना थेट पहिल्या स्तरावरील सर्वोच्च पदावर विराजमान केलं.
लीला पुनावालांच्या कुटुंबीयांसाठी, विशेषत: त्यांच्या आईसाठी ही घटना फार फार आनंदाची होती. त्यांच्या लेकीनं त्यांच्या कल्पनेच्या पलीकडे भरारी घेतली होती. फक्त व्हल्कन लावलमधला किंवा देशातलाच नव्हे, तर संपूर्ण औद्योगिक विश्वातला हा सर्वोच्च सन्मान होता. म्हणूनच पुण्यातल्या काही वृत्तपत्रांनी लीला पुनावालांच्या कर्तृत्वाला वाहिलेल्या खास पुरवण्या त्यावेळी काढल्या. महाराष्ट्र हेराल्डनेही चार पानी मोठी पुरवणी प्रसिद्ध केली. त्यांच्या आईला ती वाचताना आकाश ठेंगणं झालं. दिवसभर त्या नातवंडं आणि नातेवाईकांशी आपल्या लेकीबद्दल व तिने प्राप्त केलेल्या सन्मानाबद्दल मोठय़ा अभिमानानं बोलत राहिल्या आणि कृतार्थतेचा तो आनंद सोबत घेऊन त्यांनी त्या रात्री डोळे मिटले ते कायमचेच. ‘आईनं माझं यश पाहिलं आणि आनंदी मनानं ती गेली याचं मला समाधान आहे,’ असं लीला पुनावाला म्हणतात तेव्हा त्यांच्या व्यक्तिमत्त्वातली सकारात्मकता प्रकर्षांनं जाणवते. व्यक्तिगत आयुष्यापासून व्यावसायिक जीवनापर्यंत सगळीकडेच या सकारात्मक दृष्टिकोनानं त्यांना अधिकाधिक ज्ञान मिळवायला, जगाकडे पाहणारी नजर विस्तारायला आणि पुढच्या मोठय़ा जबाबदाऱ्या पेलायला बळ दिलं आहे.
लीला पुनावालांच्या या यशात, तसंच त्यांच्या अलौकिक कर्तृत्वात मोठा वाटा आणि खंबीर पाठिंबा आहे तो फिरोझ पुनावालांचा. ‘मला माणूस म्हणून घडवलं ते फिरोझनंच..’ त्या सांगतात, ‘मी ज्या प्रतिकूलतेतून वर आले त्यामुळे असेल, पण मला सगळ्या गोष्टी अक्षरश: ग्रॅब कराव्याशा वाटायच्या. फिरोझनं मला देण्यातल्या आनंदाची ओळख करून दिली. त्यानं मला जगायला, स्वप्नं पाहायला, ध्येयं ठरवायला आणि त्यांचा पाठपुरावा करायला शिकवलं. जगण्यात आणि कामातही भरभरून आनंद घेण्याची सवय त्यानं मला लावली.’ त्यांचे हे शब्द वरवरचे, पोकळ नाहीत याची प्रचीती फिरोझ पुनावालांशी बोलतानाही येते. दोघांच्या ‘त्या’ पहिल्या भेटीपासून आजपर्यंत या माणसानं लीला पुनावालांना आभाळासारखी सोबत केली आहे. त्यांनी आपल्या या मैत्रिणीवर समंजस प्रेम केलं आहे. तिला वेळोवेळी खंबीरपणे साथ दिली आहे. स्वत: उद्योजक असूनही तिच्या कर्तृत्वाला आवश्यक ते अवकाश आणि वावही दिला. तिला समजून घेत तिच्या व्यक्तिगत आणि व्यावसायिक जीवनात योग्य मार्गही दाखवला.
लग्नानंतर हळूहळू लीला पुनावालांच्या यशाची कमान उत्तरोत्तर चढत गेली तेव्हा या दोघांनी मिळून मूल होऊ न देण्याचा निर्णय घेतला. व्यवसायामुळे मुलांसाठी वेळ देणं शक्य नाही म्हटल्यावर मुलं नसलेलीच चांगली, हा निर्णय घरच्या मोठय़ा मंडळींना पटवून देण्याचं अवघड कामही त्यांनी केलं. मुलांविषयी वाटावी अशी माया फिरोझ आपल्या या मैत्रिणीवर करत राहिले. अतिशय प्रेमळ आणि समजूतदार अशा या माणसाकडे पुरुषी अहम् कधीच फिरकला नाही. आदर्श जोडीदार कसा असावा याचं सर्वोत्तम उदाहरण फिरोझ यांनी जगासमोर ठेवलं आहे.
फिरोझ पुनावालांविषयी बोलताना मी ‘आदर्श नवरा’ असा शब्दप्रयोग हेतुत:च वापरलेला नाही. याची दोन कारणं आहेत. एक तर हे दोघंही खरोखरच सहचर आहेत. आणि दुसरं म्हणजे स्त्री-पुरुषांमध्ये दोघांनीही कमी-जास्त असा भेद कधीच केलेला नाही. म्हणूनच स्वकर्तृत्वावर मोठय़ा झालेल्या लीला पुनावाला स्त्रीवादापासून दूर आहेत. लोकांपर्यंत पोचण्याचा जो स्त्रीसुलभ गुण बाईजवळ असतो, त्यामुळे ती चांगली वरिष्ठ (ु२२) होऊ शकते असं त्यांना वाटतं. हा गुणच स्त्रियांनी आपली ताकद म्हणून वापरावा असा त्यांचा आग्रह असतो. पुरुष आपल्या प्रगतीच्या आड येतात, असं म्हणून पुरुषांवर खापर फोडणंही त्यांना मान्य नाही. करिअरमध्ये सर्वोच्च बिंदू गाठायचा की गृहिणी ही भूमिका निभावायची, याचा निर्णय स्त्रीनं घेतला पाहिजे आणि त्यानुसार आपलं लक्ष त्या गोष्टींवर केंद्रित केलं पाहिजे असं त्यांचं मत आहे. ‘पुरुषांनाही आपलं ध्येय गाठताना घरगुती पातळीवर त्याग करावे लागतातच की! मग फक्त बायकांपुढेच अडथळे असतात, हा समज आपण का करून घेतला आहे?,’ असा लीला पुनावालांचा सवाल आहे.
स्त्री-पुरुष भेद मानत नसल्यामुळे यशस्वी होण्यासाठी अफाट कष्टांना कुणालाच पर्याय नाही असं त्या म्हणतात. अभ्यास, काम, नियोजन आणि छोटी छोटी ध्येयं ठरवत, त्या दिशेनं पुढे जात राहणं, हे त्यांचं यशाचं तत्त्वज्ञान आहे. हे तत्त्वज्ञान त्यांनी आजवर स्वत:च्या कृतीतून राबवलं आहे. आजच्या स्पर्धात्मक जगात माणसं परस्परांना शत्रू मानतात हे त्यांच्या पचनी पडत नाही. ‘कामातल्या अडचणी या खऱ्या शत्रू असतात. त्यांच्यावर हल्ला करा. त्यातून मार्ग काढा..’ असं त्यांचं सांगणं आहे. कामगारांशी बोलून, त्यांचे प्रश्न समजून घेऊन संप मिटवण्याचं आणि उत्पादन पुन्हा सुरू करून कंपनी आणि कामगार अशा दोघांचंही हित जपायचं काम करताना त्यांनी हीच गोष्ट अधोरेखित केली आहे.
आज लीला पुनावाला सत्तरीत पोचल्या आहेत. पद्मश्रीसारखे बहुमानाचे किताब आणि ‘रॉयल ऑर्डर ऑफ स्वीडन’सारखे मानसन्मान यांचं वलय त्यांच्यामागे आहे. तरीही आजसुद्धा त्या पूर्वीच्याच झपाटय़ाने काम करतात. त्यांनी हुशार व गरजू मुलींना उच्च शिक्षणात मदत करण्यासाठी लीला पुनावाला फाऊंडेशनची स्थापना केली आहे. हे फाऊंडेशन मुलींना नुसती शिष्यवृत्ती देऊन मोकळं होण्याऐवजी नियमित प्रशिक्षण, ओरिएन्टेशन देऊन त्यांना नोकरी मिळेपर्यंत मदत करण्याचं काम करते. त्यांनी आपली संपत्ती व घर फाऊंडेशनला दिलं आहे. इतर उद्योगही मदतीचा हात पुढे करताहेत.
या सगळ्या कामांच्या बरोबरीनं त्यांनी अनेक छंदही जोपासले आहेत. विविध ठिकाणचं लोकसंगीत, छायाचित्रं, काडेपेटय़ा, कलाकुसरीच्या वस्तू अशा अनेक गोष्टींचा अद्भुत खजिना त्यांच्या घरी आहे आणि या सगळ्याचं सुरेख रेकॉर्डही त्यांनी ठेवलेलं आहे. आजही पहाटे चारला उठून दोन तास त्या या छंदासाठी देतात. बागकामाची त्यांना आवड आहे. पण त्यांची महत्त्वाची आवड संवादाची आहे. तऱ्हेतऱ्हेच्या आणि सगळ्या स्तरातल्या माणसांशी संवाद साधणं आणि नाती निर्माण करणं हा त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा गाभा आहे. संवाद व संपर्क हे त्यांच्यासाठी ऊर्जेचा स्रोत आहेत. संवादाची ही भूक त्यांना घराबाहेरच्या विश्वात तरुण, चैतन्यपूर्ण राहायला बळ देते आणि घरात सहजीवनाचा ताजेपणा टिकवून धरते. कामाचा व्याप कितीही असला तरी त्यांनी बाहेरचे ताण कधी घरी नेले नाहीत. परस्परांना वेळ देणं दोघांनीही कधी चुकवलं नाही. दोघंही यशस्वी, दोघंही मनानं कणखर, निश्चयी. किरकोळ वाद झाले तरी दोघांमध्ये पसरलेलं समजुतीचं अवकाश त्या वादांना विखारी होण्यापासून वाचवत राहिलं. क्वचित कधी फिरोझ यांचा आवाज चढला तर आजही लीला पुनावालांना रडू येतं. ‘मी जगाशी लढायला समर्थ आहे, पण तुझ्याशी नाही,’ हे त्यांचे शब्द फिरोझनाही शांतवतात. झाकोळू पाहणारं आभाळ क्षणार्धात निवळतं. स्वच्छ सूर्यप्रकाश फाकतो. सहजीवनाचं यापरतं दुसरं उदाहरणं कुठलं असणार!