‘वयाची चाळिशी गाठणं’ या वाक्प्रचारात खरं तर खूप अर्थ भरलाय. वयाची चाळिशी म्हणजे म्हटलं तर तुम्ही अजूनही यौवनात आहात, किंवा आयुष्याचं सार समजल्याच्या परिपक्व अवस्थेत आहात. माझंही काहीसं तसं झालंय. मी चाळिशीत आलेय. जीवनाच्या या टप्प्यावर मी स्वत:ला स्थिरस्थावर झालेय असं मानावं की नाही, या संभ्रमावस्थेतच आहे. एक तरफ मेरा दिल कह रहा है- तुम सेटल्ड हो चुकी हो. दो वक्त की रोटी का जुगाड, रहने के लिए अच्छासा मकान, प्यारा बेटा नोनू, थोडीबहुत अ‍ॅक्टिंग में शोहरत पा ली है. और हा- और मोहन कपूर जैसा एक (लिव्ह-इन्) पार्टनर भी साथ में है. जिसके साथ होते, मुझे तन्हाइयाँ.. अकेलापन कभी नहीं महसूस हुआ!
एकूणच तसं आयुष्यात आलबेल आहे. मला काही खटकत नाहीये. मोहनला तर तसंही काही खटकत नाहीये. हुरहुर लागलीय, अस्वस्थता दाटलीय ती माझ्या लेकाच्या हृदयात! गेली तीन-चार वषेर्ं तो माझ्या मागे लागलाय. अगदी धोशा लावलाय- ममा, तू लग्न कर. बी सीरिअस टू गेट मॅरी विथ मोहन अंकल.
माझ्या चौदा वर्षांच्या लाडक्या नोनूला आता त्याच्या चाळिशीतल्या आईला ‘दुल्हन’च्या रूपात पाह्य़चंय. ऑफिशिअली मी मोहन कपूरची पत्नी झालेली अनुभवणे हे त्याचं स्वप्न आहे. पण अजून तरी तसा योग आलेला नाही. मोहनने आणि मी लग्नाच्या बेडीत अडकण्याचा विचार अजून तरी मनावर घेतलेला नाही! अलीकडे तर नोनूने मला बोलायचंहीं सोडून दिलं आहे. समाजाच्या चष्म्यातून मी सिंगल मदर असू नये असं वाटतं त्याला.
उत्तर प्रदेशातल्या मिरत शहरात माझा जन्म टिपिकल शीख कुटुंबात झाला. कुटुंबात गोतावळा मोठा. शिक्षण झालं. अभिनयाची आवड मनात रुजत होती, पण तसं बोलायची मनाई होती. करिअर, इच्छा-आकांक्षांना तिलांजली देत मी पुढे शिकावं, या निर्णयाप्रत येण्यापूर्वीच माझं लग्नही झालं. वैवाहिक आयुष्य सुरू  होतंय- न होतंय तोच मी नोनूची आई झाले. दुर्दैवाने माझा हा विवाह टिकला नाही. माझ्या माहेरच्या मोठय़ा कुटुंबात माझी व लेकाची गुजराण होणं कठीण नव्हतं, पण माझा स्वाभिमान मला स्वस्थ बसू देईना. मी माझ्याजवळची थोडीशी पुंजी घेऊन मुंबई गाठली. अभिनयात संधी मिळत गेली. प्रश्न होता मुलाला घेऊन एकटं राहण्याचा. मी सिंगल मदर होते. गंमत अशी की, जो फ्लॅट मी बघायला गेले होते, तोच मला आणि अभिनेता मोहन कपूरलाही पसंत पडला. तो अभिनयात तोवर स्थिरावला नव्हता. त्याला व मला फ्लॅट शेअर करून त्याचं भाडं परवडणारं होतं. म्हणून आम्ही फ्लॅट शेअरिंगचा मार्ग अनुसरला. घर शेअर करता करता एकमेकांची मनं कधी शेअर झाली, हे कळलंच नाही. आम्ही लिव्ह-इन् रिलेशनशिपमध्ये राहतोय, हे कधी आम्ही समाजापासून लपवलं नाही. आम्ही पहिल्यापासून याबाबतीत स्पष्ट होतो. माझं पहिलं लग्न हा एक कटू अनुभव होता. पुन्हा लग्न करा आणि यदाकदाचित पुन्हा तसाच अनुभव आला तर? ही भीती मला लग्न करण्यापासून रोखत होती. मनात या शंकेचं  सावट असल्याने मी मोहनपुढे लग्नाचा प्रस्ताव कधीच ठेवला नाही. दोघांचं एकमेकांवर प्रेम आहे नं, मग लग्नाचा खटाटोप हवा कशाला? असं माझं मत. मोहनही विवाहित होता. पण त्याचं लग्नही अयशस्वी होतं. आम्ही दोघं तसे समदु:खी होतो.
मोहन व मी एकत्र, एका घरात राहिल्याने प्रेम, जवळीक वाढली. तेव्हाच आम्ही लग्नाचा विचार बाजूला सारला. मोहनचा आग्रह- ‘अ फ्रेन्डली रिलेशनशिप, दॅट इज बियॉन्ड द लीगल स्टॅम्प.’ मलाही ते पटलं.
नोनूला सिंगल मदर म्हणून वाढवताना मला अनेक कष्ट उपसावे लागलेत. मोहन जेव्हा आम्हा दोघांमध्ये रुळला तेव्हा नोनू आणि त्याच्यातही अलवार मैत्रीचे बंध निर्माण होत गेले. विवाहाच्या प्रमाणपत्राविना आमचं त्रिकोणी कुटुंब गेली १०-१२ वर्षे सुखासमाधानात नांदतंय. मोहन जेव्हा माझ्या व लेकाच्या जीवनात प्रवेश करता झाला, तेव्हा या संबंधांना मी थांबवलं नाही. तसा प्रयत्नही केला नाही. याचं कारण माझ्या मनात नोनूचेच विचार होते. मोहनमुळे जर नोनूला एक सुरक्षित, प्रेमळ आणि नॉर्मल आयुष्य मिळत असेल तर मी आडकाठी का करावी? समाजाचं दडपण का घ्यावं? ही कदाचित स्वार्थी वृत्ती असेल माझी; पण मोहनने मला सुरक्षिततेचं, प्रेमाचं कवच दिलं. नोनूलादेखील मोहनमध्ये पित्यासम मित्र मिळालाय. मग आता लग्नाची गरजच काय, असा प्रश्न मलाच कधी कधी पडतो.
अभिनयाची दुनिया शाश्वत नसते हा अनुभव मी घेतला. माझं व नोनूचं पालनपोषण मोहनने करावं असा माझा आग्रह पूर्वीही नव्हता व आजही नाही. मोहनने ‘वी आर फॅमिली’ हे गृहीत धरलंय. पण माझा स्वाभिमान मला स्वस्थ बसू देत नाही. म्हणूनच काही वर्षांपूर्वी मी लोखंडवाला संकुलात स्वत:चं ‘स्पा-सलॉन’ सुरू केलं. त्याला चांगला प्रतिसाद मिळाला. आपण आपल्या पायांवर उभं असलं पाहिजे, हा माझा हेतू होता.
मोहनशी असलेली माझी लिव्ह-इन् रिलेशनशिप उजळपणे, समर्थपणे निभावण्याची माझ्यात क्षमता होती. या नात्याला मी सदैव पारदर्शी, स्वच्छ, आरस्पानी मानत आलेय. म्हणूनच मी आत्मविश्वासाने म्हणू शकते- हो. मोहन कपूर माझा लिव्ह-इन् पार्टनर आहे!

Smartphone
‘डेटा’ग्रस्त समाज.. : समाजभानाचं हरपणं..
Women Health
स्त्री आरोग्य : लग्नानंतर लगेच मूल होत नाहीए?
Budh Gochar 2024
होळीनंतर ‘या’ राशींचे सुखाचे दिवस सुरु? बुधदेवाच्या कृपेने होऊ शकतात प्रचंड श्रीमंत
ravichandran ashwin profile
व्यक्तिवेध : रविचंद्रन अश्विन