23 February 2019

News Flash

या नात्याने प्रेम आणि विश्वास दिला!

कधी न मिळालेला प्रेमाचा ओलावा मला ‘लिव्ह इन् रिलेशनशिप’मधून मिळाला आणि मी ‘लिव्ह इन्..’ला प्राधान्य दिलं. लग्नसंस्थेनं बऱ्याच अंशी मला अपंग केलं होतं. मी जगणं

| February 20, 2013 05:20 am

कधी न मिळालेला प्रेमाचा ओलावा मला ‘लिव्ह इन् रिलेशनशिप’मधून मिळाला आणि मी ‘लिव्ह इन्..’ला प्राधान्य दिलं. लग्नसंस्थेनं बऱ्याच अंशी मला अपंग केलं होतं. मी जगणं विसरले होते. मला जो प्रेमाचा भावनिक आधार हवा होता तो ‘लिव्ह इन्’मधून मिळाला. नवरा असूनही त्याच्याशी घटस्फोट न घेता मी ‘लिव्ह इन्..’मध्ये राहण्याचा निर्णय घेतला. माझ्या मुलांना घेऊनच मी घराबाहेर पडले आणि ‘लिव्ह इन्’मध्ये राहिले.    
मी माहेरची बनकर. लग्न झालं त्या घरात आठ नणंदा, सासू, एक मोठे दीर आणि काहींची मुलं असा २८-३० माणसांचा गोतावळा होता. नणंदांच्या मुलांच्या संगोपनाची जबाबदारीही मलाच पार पाडायची होती. वडील आणि भावानं सांगूनच ठेवलं होतं, की घर मोठं असलं तरी घरातील माणसं खूप प्रेम देतील. त्यामुळं नवीन घरात आल्यावर याच विचारात होते की, माझं विश्व फारच वेगळं असेल. परंतु तसं काही झालं नाही. हाताची मेंदी निघायच्या आधीच माहेरच्यांनी काय काय दिलं, याचा हिशेब सुरू झाला. नाकातील नथ छोटी का दिली? मोत्याच्या बांगडय़ा का दिल्या? सोन्याच्या का नाही दिल्या? सगळं भयंकर होतं.
माझे पती वध्र्याला सरकारी नोकरीत होते. नागपूर ते वर्धा असा त्यांचा रोजचा दिनक्रम होता. ते सकाळी पाचला निघून जायचे आणि रात्री उशिरा घरी यायचे. त्यामुळं त्यांच्याशी संवाद होऊ शकत नव्हता. ते भावंडांमध्ये सर्वात लहान असल्यानं सर्वाचे लाडके! लाड करून घ्यायची सवय त्यांनाही जडली होतीच म्हणा. पण माझे लाड करायचे असतात, हे मात्र त्यांना कधी कळलंच नाही.
मुलांचं शालेय शिक्षण सुरू झालं तरी मी एकटीच संघर्ष करीत होते. हसणं मी कॉलेजनंतर विसरलेच होते जणू. करणच्या शाळेत त्याच्या मैत्रिणीच्या वडिलांच्या भावाशी माझी ओळख झाली. वर्षभर घरी येणं-जाणं आणि फोनवरून आमचं बोलणं सुरू होतं. मुलांनाही हितेंद्र आवडायचा. मला व मुलांना त्याचा खूपच आधार वाटू लागला. माझं दु:ख हलकं होऊ लागलं. चक्क मी हसायला लागले! मला त्याची ओढ आणि गरज वाटू लागली. एवढे दिवस सतत बंदिस्त वातावरणात जगल्यानंतर आता कुठं मी मोकळा श्वास घेत असल्याचं अनुभवत होते. अर्थात तो मला हितेंद्रमुळंच मिळाला. त्याच्यापासून मी काहीही लपवलं नाही. माझ्या घरची त्याला पूर्ण माहिती होती. तो माझ्या मुलासकट मला स्वीकारायला तयार होता. माझाही कुठं तरी स्वार्थ होताच, की तो माझ्या आयुष्यात येईल आणि मला व मुलांना आधार देईल. स्त्री आणि पुरुष दोघांनाही आपण समान मानतो, तशाच पुरुषाप्रमाणेच स्त्रीच्याही लैंगिक भावना तीव्र असू शकतात. त्यांनाही त्यांच्या पुरुष जोडीदाराकडून काही अपेक्षा असतात. जे मला माझ्या पतीकडून मिळू शकलं नाही, ते मला हितेंद्रकडून मिळालं. महत्त्वाचं म्हणजे मुलांच्या शिक्षणाच्या किंवा त्यांच्या इतर गरजांच्या आड हितेंद्र कधीही आला नाही.
लग्न या विधीनं जीवनात सुरक्षा वाटते असं अजिबात नाही. माझं आणि मुलांचं कुणीच नसल्याची जाणीव मला लग्नसंस्थेत पदोपदी झालेली होती. लग्नसंस्थेचे दुष्परिणाम मी १६ वर्षे भोगले. या संस्थेनं मला बऱ्याच अंशी अपंग केलं. मला सासरचा, नातेवाईकांचा- सर्वाचाच राग होता. करणारी व्यक्ती असते तिलाच सर्व काही सहन करावं लागतं. तिच्या जगण्याचा मात्र फारसा विचार होत नाही. म्हणून ‘लिव्ह इन्’मध्ये मी केवळ माझा व माझ्या मुलांच्या जगण्याचा विचार केला. माझ्या इतक्या वर्षांच्या भकास आयुष्यातील हितेंद्रबरोबरचे दिवस मला वाळवंटातील ओअ‍ॅसिससारखे वाटले. त्यावेळी मी चांगलं किंवा वाईट याचा विचारच केला नाही. शक्य तितके दिवस ‘लिव्ह इन्’मध्ये राहण्याचं आम्ही दोघांनी ठरवलं. सामाजिक, कौटुंबिक, आर्थिक पातळीवर त्रास व्हायला लागेल तेव्हा वेगळं व्हायचं, असं आम्ही सहमतीनं ठरवलं आणि तसं केलं. पण दुर्दैवाने आमच्या ‘लिव्ह इन्..’चं आयुष्य फार वर्षे नाही टिकलं. एका अपघातात हितेंद्रचा अंत झाला. अन्यथा आमचंही ‘लिव्ह इन्’ अनेक वर्षे टिकलं असतं..
(नाव बदलले आहे.)

First Published on February 20, 2013 5:20 am

Web Title: live in relationship story of sanvi manohar