dwi33नागपुरातून मुंबईत येऊन ‘काका किशाचा’द्वारे मराठी रंगभूमीवर पदार्पण करणाऱ्या आणि पुढे आत्माराम भेंडे यांच्यासमवेत फार्सिकल नाटकांतील ‘दादा’ नट म्हणून नावलौकिक कमावणाऱ्या अभिनेते किशोर प्रधान यांनी ‘मराठी ते हिंग्लिश रंगभूमी’ या आपल्या प्रदीर्घ कलाप्रवासाचं केलेलं खुसखुशीत वर्णन..

आयुष्याच्या सत्तर पायऱ्या चढून आल्यावर वाटलं, जरा थांबावं.. आजवरच्या आयुष्याचा आढावा घ्यावा.. कुणालातरी ते सांगावं. पण या धावणाऱ्या दुनियेत कुणाला वेळ आहे? मग ठरवलं, हे सगळं लिहून काढावं. पुन:प्रत्ययाचा आनंद म्हणतात ना, तसंच काहीतरी! शेवटी कोणतीही कलाकृती ही प्रथम आपल्या आनंदासाठीच असते. बाकीचं नंतर.
मी मूळचा नागपूरचा. अत्यंत लाडाकोडात वाढलेला, सधन व सुसंस्कृत कुटुंबातलं शेंडेफळ. सुप्रसिद्ध अमृत फार्मसीचे मालक काकासाहेब प्रधान यांचा मुलगा. काकांना (वडील) जेवढा समाजात मान होता, तेवढाच त्यांचा दराराही! प्रदीर्घ अनुभवामुळे आणि मधाळ स्वभावामुळे त्यांचा लोकसंग्रहही जबरदस्त. वेळप्रसंगी अडल्यानडल्या लोकांना मदत करण्याची जन्मजात वृत्ती. आज इतक्या वर्षांनीही नागपूरचे ‘काका प्रधान’ लोकांच्या स्मरणात आहेत.
माझी आई मालतीबाई. तिचं फक्त प्राथमिक शिक्षण झालेलं होतं तरी वाचनाची तिला विलक्षण हौस. त्याकाळी नागपूरसारख्या मागासलेल्या गावात वास्तव्याला असूनसुद्धा बायकांची नाटकं बसवून त्यात ती स्वत:ही भूमिका करायची. काकांचासुद्धा या तिच्या हौसेला प्रसंगी लोकांची, घरच्यांची टीका सहन करूनही पूर्ण पाठिंबा असायचा. तिच्या नाटकाच्या तालमी घरच्या हॉलमध्येच होत असत. त्या बघता बघता मी लहानाचा मोठा झालो. अभिनयाचं बाळकडू मला माझ्या आईकडूनच मिळालं. बालकलाकार म्हणून प्रथम मी रंगमंचावर उभा राहिलो ते आईच्याच नाटकात. नागपूरला नुकत्याच सुरू झालेल्या आकाशवाणीवर बालकलाकार म्हणून चमकण्याची संधी मला मिळाली. याचदरम्यान पुरुषोत्तम दारव्हेकर यांनीही आपल्या ‘रंजन कलामंदिर’ या संस्थेच्या प्रत्येक नाटकात मला भूमिका दिल्या आणि माझ्यातला कलावंत कळत-नकळतच घडत गेला. अभिनयाचं बाळकडू जरी मला आईकडून मिळालं असलं तरी त्याचे शास्त्रशुद्ध धडे मी दारव्हेकर मास्तरांच्या हाताखालीच गिरवले. शाळा-कॉलेजमध्ये शिक्षण आणि रंगभूमी अशी समांतर वाटचाल चालू असतानाच मी मॉरिस कॉलेजमधून एम. ए. (इकॉनॉमिक्स)ची पदवी घेऊन बाहेर पडलो.
त्यानंतर ‘पुढे काय?’ हा यक्षप्रश्न! प्राध्यापकीच्या नोकरीत मला रस नव्हता. आणि दुसरीही कोणती नोकरी मला पसंत नव्हती. माझ्या एका मित्रानं सुचवलं, ‘अरे, मुंबईच्या टाटा इन्स्टिटय़ूट ऑफ सोशल सायन्समध्ये का नाही प्रयत्न करीत?’ धनिक मुलांच्या या संस्थेमध्ये मला कुठल्याही वशिल्याशिवाय अॅडमिशन मिळाली, हा एक दैवी चमत्कारच! फोर्ड फाऊंडेशनच्या स्कॉलरशिपवर दोन वर्षे संशोधन करून अस्मादिक तिथून बाहेर पडले.
यापुढे काय? मुंबईसारख्या बहुरंगी, बहुढंगी दुनियेत या नागपुरी बावळटाला कोण नोकरी देणार? पण अहो आश्चर्यम्! पाच-सहा महिन्यांच्या प्रयत्नांनंतर माझ्या बुद्धिमत्तेच्या जोरावर नाही, तरी फोर्ड फाऊंडेशन, टाटा इन्स्टिटय़ूटमधील संशोधक या फसव्या लेबलाच्या जोरावर मुंबईच्या ग्लॅक्सो फार्मास्युटिकल या बहुराष्ट्रीय कंपनीत मला नोकरी मिळाली.
खरं पाहता व्यावहारिकदृष्टय़ा माझं सगळं काही व्यवस्थित चाललेलं होतं. पण ‘अभिनय’ नावाच्या किडय़ाची चटक लागलेला माझ्यातला कलाकार आतून अस्वस्थ होता. त्यावेळी मी वांद्रय़ाला जुन्या एम. आय. जी. कॉलनीत माझ्या भावाकडे राहत होतो. तेव्हा कॉलनीतल्या नाटय़प्रेमी मंडळींना एकत्र आणून मी ‘नटराज’ ही नाटय़संस्था सुरू केली. संस्थेतर्फे श्याम फडकेंचं ‘तीन चोक तेरा’ हे नाटक करायचं ठरलं. पण त्यावेळी सर्वच हौशी नाटय़संस्थांपुढे उभा राहणारा प्रश्न आमच्याही पुढे उभा ठाकला. हीरॉइनचं काम करायला कुणी मुलगी मिळेना. मग युद्धपातळीवर आमचे प्रयत्न सुरू झाले. पंधरा दिवस झाले, पण मुलगीच काय, मुलीचं नाकसुद्धा दिसेना. सगळे हवालदिल! हळूहळू आमचा धीर सुटू लागला. मुळात नाटक होईल की नाही, यावरच प्रश्नचिन्ह उभं राहिलं.
एके दिवशी आमच्या एका खबऱ्यानं बातमी आणली की, कॉलनीतील एक मुलगी नाटकात नेहमी काम करते. सगळ्यांच्या आशा पल्लवित झाल्या. ‘मी पसंती दिल्याशिवाय तिला आपल्या नाटकात काम मिळणार नाही..’ माझ्यातला दिग्दर्शक गुरगुरला. ‘बोंबला! मुळात मुलीचाच पत्ता नाहीए; तिथं तुझी पसंती-नापसंती कसली सांगतोस?’ .. कुणीतरी पचकला. पण माझ्यातल्या दिग्दर्शकाचं नाक वरचढच होतं. एक आमच्यातला खबऱ्या सोडला, तर कुणीच तिला पाहिलेलं नव्हतं. ती रोज संध्याकाळी ४ वाजता ८७ नंबरच्या बसने बाहेर जात असल्याचं कळलं. त्यामुळे मग रोज दुपारी ३ वाजल्यापासून ८७ नंबरच्या बसस्टॉपवर तिची वाट बघणं, हा आमचा दैनंदिन कार्यक्रमच झाला. आठ दिवसांच्या आमच्या घोर तपश्चर्येनंतर एक सुविद्य वाटणारी आधुनिक युवती आम्ही बसस्टॉपवर पाहिली. खबऱ्यानं तिची ओळख पटविली. ‘हीच ती!’ अशी त्यानं मला खूण केली. माझ्यातल्या फुरफुरणाऱ्या दिग्दर्शकाने तिला ताबडतोब नायिका म्हणून मुक्रर केलं आणि तिच्या घराचा पत्ता शोधण्याचं कार्य आम्ही तातडीनं हाती घेतलं. तिच्यामागून सुरक्षित अंतर राखून केलेल्या पाठलागानंतर एकदाचा तिच्या घरचा पत्ता सापडला. पण आता तिच्या घरच्यांची परवानगी काढायला कोण जाणार? यापूर्वी याच मोहिमेत दोन-तीन वेळा श्रीमुखात प्रसाद खाल्लेला असल्यामुळे मी प्रारंभीच माघार घेतली. आणि मग दिग्दर्शकाच्या माझ्या अधिकारात दोन होतकरू कार्यकर्त्यांवर ती महत्त्वपूर्ण जबाबदारी सोपवली. आम्ही हेरलेली मुलगी प्रसिद्ध नाटककार व्यंकटेश वकील यांचीच कन्या निघाल्यामुळे कसली तोशीश न पडता आमचा मार्ग प्रशस्त झाला. तिच्या पिताजींनी काहीच आढेवेढे न घेता परवानगी दिली आणि आपण सच्चे रंगकर्मी आहोत, हे त्यांनी सिद्ध केलं. दुसऱ्या दिवशी वर्गणी काढून कटिंग मसाला चहापानानं आमचा हा आनंद आम्ही सेलिब्रेट केला.
नाटकाच्या तालमी धडाक्यात सुरू झाल्या. नाटकाला चांगला आकार येत होता. सगळे आनंदात होते. आणि इतक्यात..
जगात सर्वत्र जे घडतं, तेच माझ्याही बाबतीत घडलं. दिग्दर्शकच नायिकेच्या प्रेमात पडला. अर्थात शोभाच्याही मनात तेच होतं. थोडे दिवस धीर दिल्यानंतर आमच्या भाईसाहेबांनी फतवा काढला- ‘बस्स झालं हे नाटक! (कुठचं?) नागपूरला जा आणि आई-वडिलांची संमती आणा.’ पोटात एकदम गोळाच आला. आता म्या गरीब कोकरासमोर दुसरा काही पर्यायच उरला नव्हता. मी नागपूरला अगोदर पत्र पाठवून थोडीशी वातावरणनिर्मिती केली. आणि मग सर्व शक्ती पणास लावून नागपूरचा रस्ता धरला. तिथं जाऊन पाहतो तो काय? माझ्या प्रस्तावाला विरोध करायचा, हे सर्वानी जणू काही आधीच ठरवलं होतं. संध्याकाळी आमच्या राहत्या घराच्या दिवाणखान्यात माझ्या लग्नासंबंधी ऐतिहासिक शिखर परिषद भरविली गेली. आणि त्यात माझ्या विनंत्या-विनवण्यांना जराही न जुमानता हजार कारणे देऊन माझा लग्नाचा प्रस्ताव सपशेल फेटाळला गेला. त्यानंतर बरखास्त झालेल्या त्या शिखर परिषदेने माझा रडवा चेहरा आणि डबडबलेले डोळे पाहिले. माझी ही पहिली आणि शेवटचीच करुण भूमिका!
रात्री मी हिरमुसल्या, विमनस्क मनाने माझ्या खोलीत बसलो होतो. तिथे काका (वडील) आले आणि बराच वेळ ते माझ्याशी लग्नप्रस्तावाच्या एकूणात सगळ्या बाजूंसंबंधी सविस्तरपणे बोलले. शेवटी जाताना म्हणाले, ‘संध्याकाळी मी तुझा वडील म्हणून बोलत होतो, आता तुझा मित्र म्हणून तुला विचारतो- ‘हे लग्न करून तू खरंच सुखी होशील असं तुला वाटतं का?’ मी अर्थातच ‘हो’ म्हणालो. माझा ‘हो’कार ऐकून ते काहीही न बोलता निघून गेले. मी चक्रावून गेलो.
दुसऱ्या दिवशी सकाळी ब्रेकफास्टच्या वेळी काकांनी सर्वाना बोलावलं. आणि सांगितलं की, ‘काल मी किशोरशी सविस्तर बोललो. त्यातून माझी खात्री पटली, की तो या लग्नानं नक्कीच सुखी होईल. आता या विषयावर अधिक चर्चा करायची नाही.’ काका तेव्हा मला माझ्या वडिलांपेक्षा माझे जीवलग मित्रच आहेत असं वाटलं. आणि माझं मन भरून आलं. विजयाची पताका घेऊन मी मुंबईला परतलो आणि २३ ऑक्टोबर १९६६ रोजी अस्मादिक शोभाशी चतुर्भुज झाले.
‘आणि मग ते राजा-राणी सुखाने नांदू लागले..’ हा शेवट नाटका-सिनेमात ठीक आहे; पण वास्तवात तसं घडतंच असं नाही. आम्ही नाटकासाठी एकत्र आलो असलो तरी तालमीसाठी एकत्र येणं वेगळं आणि आयुष्यभर एका छताखाली एकमेकांना समजून घेत जगणं वेगळं.
लहानपणापासूनच शोभा अदि मर्झबान यांच्याकडे तसेच आयएनटीमध्ये गुजराती नाटकांतून काम करणारी प्रसिद्ध अभिनेत्री होती. आमच्या दोघांच्या सहजीवनात कितीही सुसंवाद असला, तरीही दोन स्वतंत्र व्यक्तिमत्त्वं एकत्र आल्यावर मतभिन्नता ही आलीच. मी ऑफिसमधून परत यायचो त्यावेळी शोभा गुजराती नाटकाच्या तालमीला गेलेली असणे, ही बाब नित्याचीच होऊन बसली होती. त्यामुळे रात्री जेवण गरम करून घेणे हा माझा रोजचा कार्यक्रम झाला. लग्नाआधीच व्यावसायिक रंगभूमीच्या या स्वरूपाची मला पूर्ण कल्पना होती आणि एका प्रस्थापित अभिनेत्रीशी लग्न करताना मी हे वास्तव स्वीकारलेलंही होतं. तरीपण मी मनातून नाराज व्हायचा तो होतच असे. अर्थात आमच्या वेळा जरी जुळत नसल्या, तरी संसारातल्या बारीकसारीक गोष्टींकडे तिचं नेमकं लक्ष असे. ती जर दौऱ्यावर जायची असली तर तितक्या dwi34दिवसांचं जेवण तयार करून तिनं फ्रिजमध्ये ठेवलेलं असायचं. अतिशय गुणी अभिनेत्री आणि त्यापेक्षाही सरस, उत्तम गृहिणी होती शोभा. माझ्या सर्व कलाप्रवासात ती माझ्याबरोबर भक्कमपणे उभी राहिली. माझ्या यशाचं सारं श्रेय तिथंच आहे.
‘तीन चोक तेरा’नंतर नटराजतर्फे नवीन नाटकाची जुळवाजुळव सुरू झाली. आमच्या नाटय़प्रयोगाला नाटय़समीक्षक वा. य. गाडगीळ आले होते. त्यांनी ‘रसरंग’ साप्ताहिकात माझ्या दिग्दर्शनाची खूप स्तुती केली होती. या नवीन दिग्दर्शकावर लक्ष ठेवायला हवं, असं त्यांनी लिहिलं होतं. आमच्या ‘तीन चोक तेरा’चा भन्नाट प्रयोग पाहून नाटककार श्याम फडके यांनी आम्हाला नवीन फार्स लिहून द्यायचं कबूल केलं. त्याचं नाव होतं- ‘काका किशाचा.’ ‘काका किशाचा’नं इतिहासच घडवला. राज्य नाटय़स्पर्धेत आणि इतर स्पर्धातूनही आमच्यावर बक्षिसांची खैरात झाली. मला दिग्दर्शनाची पारितोषिके मिळाली. मी खरोखरच लक्षवेधी दिग्दर्शक ठरलो.
स्पर्धेचे प्रयोग आटोपले आणि मी निवांत झालो. एके दिवशी माझ्यासमोर नाटकांचे कॉन्ट्रॅक्टर यशवंत पगार अवचित अवतरले. मला म्हणाले, ‘तुमचं नाटक मला खूप आवडलं आहे. मला पाच प्रयोग लावायचे आहेत. दोन शिवाजी मंदिरात, एक साहित्य संघात आणि दोन पुण्यात.’ मी अक्षरश: आनंदाने थरारलो. त्यांच्या ‘मानधन किती?’ या प्रश्नानं तर मी कोसळलोच. नाटक करून पैसेसुद्धा मिळतात, याची त्यावेळी मला (नागपूरकडचा असल्यानं) कल्पना नव्हती. मी म्हणालो, ‘मी एकटा नाही, आमची संस्था आहे. सर्वाना विचारून सांगतो.’
रात्री ‘नटराज’च्या मंडळींची तातडीची बैठक झाली. सर्वापुढे व्यावसायिक प्रयोगांचा प्रश्न मी ठेवला. आपल्याला व्यावसायिक रंगमंचावर प्रयोग करायला मिळणार म्हणून सगळेच हुरळून गेले होते. ‘तू आमच्या म्होरक्या! तू सांगशील ते आम्हाला मान्य आहे. पण कोणत्याही परिस्थितीत पैशांसाठी प्रयोग अडता कामा नये. ही संधी आपण दवडायची नाही.’ म्हणजे शेवटी मीच बळीचा बकरा ठरलो. माझी परिस्थिती नाटकाच्या बोधचिन्हातल्या दोन चेहऱ्यांसारखी झाली होती. आनंदी आणि कारुण्यपूर्ण!
दुसऱ्या दिवशी ऑफिसमध्ये मी अस्वस्थच होतो. कशातच लक्ष लागेना. संध्याकाळी कसाबसा घरी परतलो. यशवंत पगार अगोदरच घरी येऊन माझी वाट पाहत बसले होते. मी पाणी पिऊन थोडा स्वस्थ झालो आणि घाबरत घाबरत पगारांना म्हणालो, ‘आमचे लोक प्रत्येक प्रयोगाला ६०० रुपये म्हणताहेत.’ पगार मिनिटभर गप्प बसले. त्या एका मिनिटात मी शंभर मरणे जगलो असेन. त्यांनी आपल्या खिशात हात घातला आणि पाच प्रयोगांचे तीन हजार रुपये माझ्या हातावर ठेवले. अहो भाग्यम्! अहो नशीबम्! अहो धनम्! मी मनात येईल ते बोलत मनातल्या मनात अक्षरश: नाचलो!
बघता बघता सबंध नाटय़विश्वात बातमी पसरली.. ‘किशोर प्रधान नावाचा एक भोटमामा आहे. आणि तो तुफान चालणारं नाटक फक्त ६०० रुपयांत देतो.’ आणि आमच्या नाटकासाठी व्यावसायिक निर्मात्यांची ही रांग लागली. बघता बघता शंभर प्रयोगांचा टप्पा ‘काका’ने कधी गाठला, कळलंच नाही. आमच्या शंभराव्या महोत्सवी प्रयोगाला प्रमुख पाहुण्या म्हणून अभिनेत्री सुधा करमरकर उपस्थित होत्या. त्या आपल्या भाषणात म्हणाल्या, ‘ज्या नाटकाचा मी मुहूर्त केला होता, त्या नाटकाचे आज शंभर प्रयोग होत आहेत. कोणताही नाववाला कलाकार नसताना या नाटकानं मिळवलेलं हे यश निश्चितच अभिनंदनीय आहे.’
आमचं ‘काका किशाचा’ जोरात चालल्यामुळे मी एक हुशार दिग्दर्शक आणि हरहुन्नरी कलावंत असल्याचा गैरसमज सर्वत्र पसरला. (चांगले समज लवकर पसरत नाही.) मला नाटकात काम करण्यासाठी आणि दिग्दर्शनासाठी व्यावसायिक रंगभूमीकडून आमंत्रणं यायला सुरुवात झाली. अशा रीतीने मी आपोआपच व्यावसायिकांच्या कळपात ओढला गेलो.
आमचं ‘काका किशाचा’ हे नाटक धडाक्यात चालू असतानाच माझ्या स्नेही सुधा करमरकर यांनी त्यांच्या नवीन नाटकात ‘नायकाची भूमिका करणार का?’ असं मला विचारलं. सुधा करमरकरलिखित आणि दिग्दर्शित या नाटकाचे नाव होते- ‘जेव्हा यमाला डुलकी लागते.’ उत्तम भूमिका.. तीही सुधाताई, शंकर घाणेकर यांच्यासारख्या मातब्बर कलावंतांबरोबरची लांबलचक भूमिका! साहित्य संघात या नाटकाचा पहिला प्रयोग करताना मला खूपच दडपण आलेलं होतं. पहिल्याच प्रयोगात एन्ट्रीला टाळ्यांचा कडकडाट झाला आणि माझी कॉलर ताठ झाली. ही लोकप्रियता आणि दाद माझ्या अभिनयाला जशी होती, तशीच माझ्या दूरदर्शनच्या कारकीर्दीलाही होती.
या नाटकात मुख्य भूमिका मिळाल्याबद्दल मी आनंदात होतो. प्रयोग जोरात सुरू झाले. यात मी एका बावळट आणि विसराळू नायकाची भूमिका करीत असे. माझी भूमिका लोकांना खूप पसंत पडली. कदाचित मी प्रत्यक्षात तसाच असल्यामुळेसुद्धा असेल. असो.
शंकर घाणेकरांबरोबर काम करणे हा एक दबाव आणणारा आणि तरीही अतिशय आनंददायी अनुभव होता. अत्यंत शिस्तबद्ध आणि रेखीव काम करणारा हा अभिनेता. दिग्दर्शकाने दिलेल्या सर्व सूचना आणि हालचाली आग्रहपूर्वक पाळणारा शिस्तीचा नट. पदरची वाक्ये नाटकात घालण्याच्या पद्धतीला त्यांचा जबरदस्त विरोध. तालमीला उभे राहण्यापूर्वी जर एखादा मुद्दा पटला नाही तर त्याची तड लागेपर्यंत हिरीरीने वाद घालणारा; पण तालमीला उभे राहिले की अत्यंत रेखीव काम करणारा! आमच्या अगोदरच्या पिढीमध्ये दिसणारे हे वंदनीय गुण, जिद्द आणि इच्छाशक्ती आज कुठेतरी कमी होत चाललीय की काय, अशी कुठेतरी मनात शंकेची पाल चुकचुकते.
त्यानंतर ज्या संधीची मी वाट पाहत होतो ती संधी मला मिळाली. गुरुवर्य आत्माराम भेंडे यांच्या दिग्दर्शनाखाली काम करण्याची संधी. सुधाताईंचे नेमके आणि टोकदार दिग्दर्शन आणि शंकर घाणेकारांचा शिस्तबद्ध अभिनय असलेल्या या नाटकाच्या ४०-५० प्रयोगांतून व्यावसायिक रंगभूमीवर हळूहळू स्थिरावलेला मी बापूंच्या (आत्माराम भेंडे) मोकळ्याढाकळ्या दिग्दर्शनशैलीने थोडासा गदगदलो. ते प्रथम नटाला सीन समजावून सांगत. त्यातले बारकावे आणि मूड्ससकट. त्यानंतर त्या पात्राच्या हालचाली सांगत- नव्हे, स्वत: करून दाखवत. नंतर नटाकडून तो सीन ते करून घेत. त्यांनी आपले दिग्दर्शन, आपली मते कधीच नटावर लादली नाहीत. आपणच त्यांना विचार करायला लावून ती भूमिका त्यांच्याकडून ते करवून घेत. नटाला त्यांनी कधीच बांधून ठेवले नाही. आणि म्हणूनच त्यांच्या हाताखाली काम करणाऱ्या नटांची भविष्यात दिग्दर्शक म्हणून एक नवीन फळी तयार झाली. बापूंचे रंगभूमीवरचे हे एक मोठे ऋ णच म्हणायला हवे. आणि कोणीही विचारी रंगकर्मी ते नाकारू शकत नाही.
त्यांच्या दिग्दर्शनाखाली ज्या महत्त्वाच्या नाटकांत मी भूमिका केल्या त्यापैकी पहिले नाटक होते अनिल सोनारलिखित ‘मालकीण मालकीण दार उघड.’ त्यानंतर ‘लागेबांधे’, ‘घरोघरी मातीच्या चुली’, ‘हनिमून झालाच पाहिजे’, ‘हात खाली, डोकं असताच असा नाही’ अशा अनेक नाटकांतून त्यांनी मला भूमिका दिल्या आणि माझ्यातला विनोदी अभिनेता हळूहळू घडत गेला. त्यांची संवादफेक,ी७स्र्१ी२२्रल्ल२ आणि रंगभूमीवरचा वावर सातत्याने बघत असल्यामुळे ते केव्हा माझ्या गुरूस्थानी गेले, हे मला कळलेही नाही. आजही जर मला कोणी विचारले तर या माझ्या विधानावर मी ठाम आहे.
त्यानंतर माझी गाठ पडली ती एका अत्यंत लोकप्रिय अवलियाशी. त्याचे नाव- राजा गोसावी. मी त्यांच्याबरोबर ‘रात्र थोडी, सोंगं फार’, ‘ब्रह्मचारी’, ‘असावा शेजारी’सारख्या काही मोजक्याच नाटकांतून भूमिका केल्या. त्यांचा रंगभूमीवरचा वावर आनंदी वातावरण निर्माण करणारा होता. आखून दिलेल्या हालचालींची फारशी तमा न बाळगता ते संपूर्ण स्टेज ताब्यात घेत असत. त्यांचा अभिनय उत्तम असे, पण आपल्या पदरची वाक्ये टाकण्याची त्यांची सवय नेहमीच दिग्दर्शकाला टेन्शनमध्ये ठेवीत असे. त्यांचा एक किस्सा सांगण्यासारखा आहे.
बाहेरगावच्या, विशेषत: साखर कारखान्यांतल्या प्रयोगांचे मानधन वेळेवर मिळणे ही निर्मात्यासाठी नेहमीच डोकेदुखी असे. राजाभाऊंनी यावर एक अक्सीर उपाय सांगितला. प्रयोगाच्या आधी दिग्दर्शकाने निर्मात्याला विचारायचे, ‘उषाताई आल्या?’ म्हणजे ‘पैसे आले का?’ तो जर ‘नाही’ म्हणाला तर प्रयोग सुरू करायचा नाही. ‘उषाताई येईपर्यंत पडदा उघडणार नाही..’
आणि त्यानंतर आमच्या ग्रुपमध्ये ‘उषाताई आल्या’ हा एक परवलीचा शब्द बनला. कोणीही तो कुठेही वापरायचे. सेट आला का, असं विचारायचं असेल तरी विचारले जायचे, ‘उषाताई आल्या?’
मला नेहमी एक प्रश्न विचारला जातो : ‘विनोदी नाटक आणि फार्स यांत फरक काय?’
जी विनोदी गोष्ट किंवा घटना विनोदी पद्धतीने अभिनयांकित केली जाते ते विनोदी नाटक. आणि तीच घटना काहीशी अतिशयोक्ती वापरून विनोदनिर्मिती केली जाते, तो फार्स! यात गोची अशी आहे की, निरनिराळ्या लोकांच्या विनोदाच्या जाणिवा या वेगवेगळ्या असतात. एकच घटना जर फार्सिकल पद्धतीनं सादर केली तर एखाद्या प्रेक्षकाला ती पोट धरधरून हसवते, तर दुसऱ्याला ती चक्क पोरकट किंवा बालिश वाटू शकते.
फार्सच्या नटाला हे भान बाळगणे अतिशय आवश्यक असते. आलेला प्रेक्षक कोणत्या स्तरातला आहे, हे ध्यानी घेऊन त्याच्या विनोदबुद्धीला अनुसरून प्रत्येक प्रयोगात त्यांनी आपली अभिनयशैली बदलायला हवी. वास्तविक हे फार कठीण आहे. पण फार्सची डिग्निटी सांभाळण्यासाठी हे अतिशय आवश्यक आहे. म्हणूनच फार्सिकल अभिनय करणं कठीण मानलं जातं.
तेव्हापासून आजवर मी ३० ते ४० नाटकांतून विविध प्रकारच्या भूमिका रंगविल्या आणि १५-२० नाटकांचे दिग्दर्शनही केले.
२ ऑक्टोबर १९७२ ला मुंबई दूरदर्शन सुरू झालं आणि मला त्यावर पहिल्या नाटकात भूमिका करायची संधी मिळाली. त्या नाटकाचं नाव होतं- ‘निरोप.’ त्यानंतर सातत्यानं दूरदर्शनच्या विविध कार्यक्रमांतून कामं करण्याची संधी मला सहज मिळत गेली. मी आणि माझी बायको शोभाने काही कार्यक्रमांचं सूत्रसंचालनही केलं. त्यापैकी ‘गजरा’ हा रंगरंग कार्यक्रम विलक्षण लोकप्रिय झाला. लोक आजही त्या कार्यक्रमाची आठवण काढतात. त्यावेळी एकच दूरदर्शन ही एकमात्र वाहिनी असल्यामुळे आमचा टी. आर. पी. विलक्षण चढा राहिला. मी मनापासून अगदी प्रामाणिकपणे सांगतो की, मला आज जी काही लोकप्रियता लाभली आहे त्याचं कारण मुंबई दूरदर्शन हे आहे.
याचदरम्यान माझ्या आयुष्याला एक विलक्षण कलाटणी मिळाली. ग्लॅक्सोमध्ये मला भराभर बढती मिळत गेली आणि मला मॅनेजरची अतिशय जबाबदारीची, अधिकाराची जागा मिळाली. आता दांडी मारून सकाळ-दुपारचे प्रयोग करणं मला जड जाऊ लागलं. नाटक सुरू व्हायच्या अगोदर निर्माते माझ्या सगळ्या अटी मान्य करायचे खरे; पण नाटक जोरात चालू लागलं की मला सकाळ-दुपारचे प्रयोग करायचा ते आग्रह धरू लागले. त्यांनी त्याकरता खूप आकर्षणंही मला दाखविली. नोकरीतल्या कमाईपेक्षा जास्त पैसे देतो, म्हणू लागले. नोकरी सोडण्याचा दबाव आणण्याचाही प्रयत्न झाला. पण मी या कसल्या मोहात पडलो नाही. एकच विचार मनी ठाम होता- ग्लॅक्सो ही माझी करिअर आहे, तर नाटक हा माझा छंद. दोघांची काहीही झालं तरी सरमिसळ करायची नाही.
परंतु या सगळ्या ओढाताणीत दोन्ही गोष्टी साध्य करायच्या प्रयत्नांत मला अनेकदा अक्षरश: तारेवरची कसरत करावी लागायची. ग्लॅक्सोतले माझे सर्व वरिष्ठ हे अमराठी होते. त्यामुळे मी बाहेर काय उद्योग करतो, याची त्यांना काहीच कल्पना नव्हती. शिवाय मी माझ्या कामात चोख होतो. टेलिव्हिजनवर मला पाहून ते खूश व्हायचे. मला शाबासकी द्यायचे.
नोकरी, नाटक आणि दूरदर्शनवरील कार्यक्रम अशा सगळ्या पळापळीत खूप गमतीजमतीही घडायच्या. त्यातला एक प्रसंग..
एकदा शिवाजी मंदिरला सकाळी ११ वाजताचा माझा प्रयोग लागला होता. त्यामुळे त्या दिवशी ऑफिसला सबंध दिवस दांडी मारण्याशिवाय गत्यंतर नव्हतं. मी माझ्या बॉसच्या सेक्रेटरीला फोन केला. ‘डिसेंट्री लागली आहे, येऊ शकत नाही.’ बॉसने मला तब्येतीची काळजी घ्यायला सांगितलं. संपूर्ण विश्रांती घेऊन उद्या तंदुरुस्त होऊन ऑफिसला ये, असं त्यांनी काळजीच्या सुरात मला म्हटलं.
मी त्या दिवशी आनंदात प्रयोग पार पाडला आणि दुसऱ्या दिवशी तंदुरुस्त होऊन ऑफिसात गेलो. जरा वेळानं आमच्या पर्सोनेल मॅनेजरचा मला फोन आला. तो मराठी होता. पाटकर त्यांचं नाव. आमच्यात पुढील संवाद झडला :
‘किशोर, काल फोन केला होता. पण तुमची तब्येत बरी नाही असं कळलं. काय झालं होतं?’
‘डिसेंट्री झाली होती..’ – मी.
‘डिसेंट्री हाऊसफुल्ल होती का?’ – पाटकर.
मी अक्षरश: उडालोच. पाटकर माझ्या त्या प्रयोगाला आले होते. त्यांनी मला नाटकात काम करताना पाहिलं होतं.
त्या दिवसापासून मी पाटकरांना, त्यांच्या कुटुंबाला आणि त्यांचं नाव सांगून येणाऱ्या अनेकांना नाटकाचे फुकट पास आपणहून देत असे.
ऑफिसचं काम आणि प्रयोग दोन्ही सांभाळता सांभाळता नाकीनऊ यायचे. दुपारचा प्रयोग असला आणि बॉसने चर्चेला बोलावलं, तर काय करायचं? ही ताणाबाणी अखेरीस शिगेला पोचली आणि मी मराठी नाटकाला रामराम ठोकायचा अतिशय क्लेशकारक आणि दु:खद निर्णय घेतला. शोभा प्रधान लिखित आणि दिग्दर्शित ‘संभव-असंभव’ हे माझं मराठी रंगभूमीवरचं शेवटचं नाटक! (१९८९)
त्यानंतरचे काही दिवस अत्यंत वाईट मन:स्थितीत गेले. आयुष्यभर माझ्यात एकजीव झालेला कलाकार खवळून उठायचा. नाटकाच्या जाहिराती पाहिल्या की स्वत:चा खून करून घ्यावासा वाटायचं. आणि.. सतत माझ्या डोक्यावर आशीर्वादासाठी हात ठेवणारा देव माझ्या ‘दीना’घरी धावला.. माझ्या मदतीला धावून आला.
मला गुरुस्थानी असलेल्या आत्माराम भेंडे यांचा मला एके दिवशी फोन आला. ते म्हणाले, ‘भरत दाभोळकर एक इंग्रजी नाटक करतोय. त्यातली एक भूमिका तू करावीस अशी आमची सगळ्यांची इच्छा आहे. तुझा काय विचार?’ विचार कसला? मी त्यांना माझी ऑफिसची अडचण सांगितली. ते म्हणाले, ‘इंग्रजी नाटकांचे प्रयोग फक्त शनिवारी-रविवारीच असतात. तेव्हा त्याची तू काळजी करू नकोस. बाहेरगावच्या प्रयोगासाठी विमानानं जायचं असतं. त्यामुळे वेळ फुकट जात नाही.’
मी ताबडतोब होकार दिला. आणि माझ्या कलाजीवनातला नवा अध्याय सुरू झाला.
‘बॉट्म्स अप’ हे नाटक रंगभूमीवर आलं तेव्हा इंग्रजी रंगभूमीचं स्वरूप वेगळं होतं. त्यावेळी इंग्रजी रंगभूमीवर शेक्सपिअरची आणि अन्य पाश्चात्त्य नाटककारांचीच नाटकं व्हायची. संपूर्ण वेगळ्या पठडीच्या आणि वरच्या दर्जाच्या या नाटकांची प्रयोगसंख्या आणि प्रेक्षकसंख्याही मर्यादितच असायची. पंचवीस प्रयोग झाले की ते नाटक सुपरहिट् झालं असं समजलं जाई.
अशा परिस्थितीत ‘बॉट्म्स अप’ रंगभूमीवर आलं. या नाटकाद्वारे इंग्रजी आणि हिंदीची सरमिसळ असलेली ‘हिंग्लिश’ ही नवीन भाषा लोकांनी डोक्यावर घेतली. शिवाय त्या- त्या वेळच्या घटनांवर भरत प्रहसनं लिहायचा, त्यांना प्रेक्षकांची प्रचंड दाद मिळायची. ‘बॉट्म्स अप’ विलक्षण लोकप्रिय झालं. या नाटकानं इंग्रजी नाटय़विश्वात एक हंगामाच निर्माण केला. टाइम मॅगझिनसारख्या सुप्रसिद्ध मासिकानं आमच्या नाटकाबद्दल लिहिताना म्हटलं- ‘ब्रॉडवे बीवेर.’
आमच्या या नव्या धाटणीच्या नाटकांना जबरदस्त लोकप्रियता मिळाली आणि प्रेक्षकसंख्याही! एक नवीनच प्रेक्षकवर्ग आमच्या नाटकांनी निर्माण केला. इंग्रजी नाटकांच्या कधी वाऱ्यालाही उभे न राहणारे प्रेक्षक आवर्जून आमचं नाटक बघण्यासाठी गर्दी करायला लागले. रंगभूमीवर हा नवा प्रयोग सुरू करण्याचे श्रेय नि:संशय ‘बॉट्म्स अप’ला जातं.. भरत दाभोळकरला जातं.
‘बॉट्म्स अप’ या नाटकात सुरुवातीला मला फार छोटी भूमिका होती. त्यामुळे नाराज होऊन मी बापूंना (आत्माराम भेंडे) म्हणालो, ‘मी नाटक सोडतो.’ ते म्हणाले, ‘असा घाईघाईने निर्णय घेऊ नकोस. आगे आगे देखिये होता है क्या?’
आणि तसंच झालं. भरतने माझं बलस्थान ओळखून माझी भूमिका वाढवली आणि प्रेक्षकांना ती भलतीच आवडायला लागली. थोडय़ाच कालावधीत मी इंग्रजी रंगभूमीवरचा लोकप्रिय कलाकार म्हणून ओळखला जाऊ लागलो. खूप प्रसिद्धी मिळाली. माझ्या नाटय़जीवनातला सुवर्णकाळ सुरू झाला.
आम्ही इंग्रजी रंगभूमीवर काम करीत असलो तरी मराठी रंगभूमीची गुणवत्ता अमराठी प्रेक्षकांपर्यंत पोचावी, या उद्देशाने मराठीत गाजलेली काही नाटकं आम्ही हेतूपूर्वक इंग्रजी रंगभूमीवर सादर केली. ‘तुझे आहे तुजपाशी’, ‘पुरुष’, ‘कमला’ ही त्यापैकी काही. इंग्लिश नाटकांच्या निमित्ताने मला देश-विदेश पाहायला मिळाले. इंग्रजी रंगभूमीवर काम केल्यामुळे माझं कलाजीवन एकरंगी आणि एकांगी न राहता सर्वागाने समृद्ध झालं.
इंग्रजी रंगभूमीवर बराच काळ वावरल्यामुळे ‘मराठी नाटकांच्या प्रेक्षकांत आणि इंग्रजी नाटकांच्या प्रेक्षकांत काय फरक आहे?,’ असा प्रश्न मला नेहमीच विचारला जातो. या विषयावर अधिकारवाणीने बोलायला खरं तर मी पात्र नाही. तरीपण मला वाटतं की, आपला मराठी प्रेक्षक इतरभाषिकांच्या तुलनेने अधिक प्रगल्भ आहे. दीडशे वर्षांहून अधिक काळ वैभवशाली नाटय़परंपरा लाभलेल्या मराठी रंगभूमीच्या प्रेक्षकांच्या नाटय़जाणिवा अनुभवसमृद्धीनं चांगल्याच टोकदार झालेल्या आहेत. मी इंग्रजी रंगभूमीवर फक्त कॉमेडीज् केल्या आहेत. तेव्हा ते प्रेक्षक हिशेबात घेतले तर माफक मनोरंजनाची अपेक्षा करणारेच ते असतात असं मला वाटतं. माझं हे विधान कुणाला धाडसाचं वाटेल कदाचित; पण ते माझे अवलोकन आहे. कुणालाही कमी लेखण्याचा माझा पुसटसादेखील प्रयत्न नाही.
शेवटी जाता जाता एवढंच सांगावंसं वाटतं, की मी समाधानी आयुष्य जगलो. कदाचित मी फार महत्त्वाकांक्षी नसेन म्हणूनही ते झालं असावं. आयुष्यात घोर निराशेचे प्रसंग फारसे आले नाहीत. ज्या गोष्टी मिळवण्यासाठी लोकांना खूप धडपड करावी लागते, त्या गोष्टी विशेष प्रयत्न न करता मला सहजगत्या मिळाल्या. अर्थात नोकरी आणि नाटक सांभाळताना खूप कसरत करावी लागली. बाहेरगावी प्रयोग असले म्हणजे ऑफिस संपवून प्रवास.. प्रयोग.. पुन्हा ऑफिस.. परत प्रवास.. पुन्हा प्रयोग अशी सतत धावफळ करावी लागली. पण त्याचा कधी त्रास झाला नाही. आपल्या आवडीची गोष्ट करायला कुणाला कधी त्रास होतो का? मग ती ग्लॅक्सोतली नोकरी असो की नाटकातली कारकीर्द! नाटय़क्षेत्रातल्या लोकांनी मला नेहमीच मानानं वागवलं. रंगदेवतेच्या, आई-वडिलांच्या आशीर्वादाने आयुष्याची वाटचाल खूप आनंदमयी आणि सुखकर झाली. माझ्यासारख्या सामान्य नटाची याहून जास्त काय अपेक्षा असणार?