हे अन्तरयामी। मम अन्तर विकसित करो
उज्ज्वल करो, निर्मल करो
कह दो सुंदर हे!
उद्यत करो, जागृत करो
कर दो निर्भय हे!
मंगल करो, निरापद करो
नि:संशय कर दो हे!
हे अन्तरयामी! मम अन्तर विकसित करो..
‘गीतांजली’तील या ओळी कोणाशी नाते सांगताहेत?
अज्ञात कालखंडातील, अज्ञात वनातील एखाद्या अनाम ऋषीच्या ऋचांशी? ज्ञानदेवाच्या पसायदानाशी? डेव्हिडच्या साम्स्शी? ‘विश्वाचे आर्त’ मनात प्रकटले की शब्दांची प्रार्थना होते. वरील ओळी शब्द-अक्षरांच्या पलीकडे जाऊन प्रार्थना बनतात. ‘हे अन्तरयामी..’ ही कविता एकाच वेळी इतकी आत्मनिष्ठ आणि वैश्विक कशी असू शकते? असे जेव्हा घडते तेव्हा त्या रचनेला ‘अपौरुषेय’ म्हणावे का? आपल्या वेद-उपनिषदांसारखे, लोकगीतं, सुफी गीतांसारखे?
रवींद्रनाथ हे असे आपल्या अनुभूतीचे सत्त्व कवितेतून, गाण्यांतून प्रकट करतात. पण वाचणारा स्वत:च्या भावभावना टिपत टिपत ती कविता वाचत जातो. रवींद्रांची कविता साऱ्यांची कविता होते.. ती प्रत्येकाची कविता बनते. जेव्हा एका कवीच्या रचना साऱ्यांच्या होतात, तेव्हाच त्यांना ‘अक्षर वाङ्मय’ म्हणतात. हे भाग्य रवींद्रांना लाभले.
भारतीय साहित्य परंपरा विलक्षण समृद्ध आहे. भारतातील विविध प्रदेश, विविध भाषा, विविध वैशिष्टय़ांनी समृद्ध झालेली संस्कृती, लोकजीवन, लौकिकासोबत पारलौकिकाची अनुभूती, येथे स्थापन झालेले, विकसित झालेले व बाहेरील जगतातून येऊन येथील प्रवाहात मिसळलेले धर्म व दर्शने, अनेकविध विद्याशाखा, असंख्य विचारप्रणाली, वेद, उपनिषदे, कृष्ण- बुद्ध- चार्वाक-शंकराचार्य यांच्या तत्त्वज्ञानापासून ते आजच्या तंत्रज्ञानापर्यंत झालेला भौतिक, सामाजिक, सांस्कृतिक विकास या साऱ्यांचे यथार्थ प्रकटीकरण भारतीय साहित्य करत आलेले आहे. भारतीय साहित्य परंपरा वेद- उपनिषदे- महाकाव्ये यांपासून ते आजच्या उत्तराधुनिक साहित्यापर्यंत चालत आलेले आहे.. सर्जनशील साहित्यकारांच्या साहित्यकृतींनी समृद्ध होत आलेले आहे. या परंपरेतील आधुनिक, तरीही ऋषितुल्य कवी म्हणजे रवींद्रनाथ टागोर.
भारतीय साहित्यात आजवर रवींद्रनाथांसारखी अलौकिक, विविधांगी साहित्याची भर क्वचितच कुणी घातलेली असावी. या योगदानामुळेच अखिल विश्वात रवींद्रनाथांची ओळख भारतीय संस्कृतीचे एक र्सवकष प्रतीक म्हणून निर्माण झाली.
रवींद्रनाथ मूलत: कवी म्हणूनच ओळखले जातात. कारण अगदी स्वाभाविक आहे : रवींद्रनाथ ज्याला स्पर्श करतात तो विषय, तो शब्द काव्यात्म होतो. उदाहरण सांगायचे म्हणजे ‘रात्रभर मी ऐकत होतो, पहाटे सर्व येणाऱ्या आशेच्या पावलांचा आवाज’ किंवा ‘किनारा विचारी सागराला, अर्थ लाटांच्या खळबळीचा’! रवींद्रनाथांची कविता हा एक मानवी हुंकार आहे. जे जे मानवी असते, ते वैश्विक असते. रवींद्रनाथांच्या काव्यरचना अलौकिक तर आहेतच; मात्र त्याचबरोबर त्यांची नाटके, कादंबरी, कथा आदी साहित्यरचनाही तितक्याच ताकदीच्या आहेत. रवींद्रनाथांचे सारेच साहित्य पारलौकिक कल्पनाशक्ती, आत्यंतिक संवेदनशीलता, निखळ जीवननिष्ठा यांचे प्रतिबिंब आहे. या साऱ्यांचे यथार्थ दर्शन रवींद्रनाथांच्या साहित्यकृतींमध्ये होते.
बरोबर शंभर वर्षे झालीत त्या घटनेला.
१३ नोव्हेंबर १९१३ रोजी शांतिनिकेतनात वास्तव्याला असलेल्या रवींद्रनाथांना ‘गीतांजली’साठी नोबेल पारितोषिक मिळाल्याची बातमी कळली अन् हा-हा म्हणता शांतिनिकेतनातील सान-थोर आनंदाने न्हाऊन निघाले. तेथील मुलांना ‘नोबेल’ म्हणजे काय, हे माहीत नव्हते, तरीही ते उत्साहाने नाचून आपला आनंद व्यक्त करीत होते. आपल्या प्रिय गुरुदेवांचा सन्मान जगाने केलेला आहे, हे त्यांना समजले होते. त्या काळातील लक्षावधी भारतीयांना या घटनेचे मोल वा ऐतिहासिक अर्थ तेव्हा जरी कळला नसला तरी जे घडले, ती घटना महत्त्वाची आहे, ही जाणीव मात्र त्यांना होती. जाणकारांना मात्र या घटनेचा अर्थ नेमकेपणाने लावणे शक्य होते. जगाच्या इतिहासात पहिल्यांदाच एका ‘गोऱ्या’ नसलेल्या, युरोप अथवा अमेरिकेचा नागरिक नसलेल्या, दुर्लक्षित अशा तिसऱ्या जगातील खंडप्राय देशातील एका कवीला साहित्य क्षेत्रातील सर्वोच्च पारितोषिक मिळाले होते. ब्रिटिशांच्या साम्राज्याचा एक हिस्सा असलेल्या या देशाला शतकानंतर आपल्या स्वत्वाची अकस्मात जाणीव व्हावी, असे झाले. या देशात अनेक भाषा बोलल्या जातात. त्यांच्यापैकी एक असलेल्या- बंगालीत लिहिणाऱ्या कवीला विश्वकवीचा मान मिळाला. आशिया, आफ्रिका व दक्षिण अमेरिका या खंडांतील कोणत्याही राष्ट्राच्या वाटय़ाला हा सन्मान यापूर्वी आलेला नव्हता. स्वमग्न असे युरोपीयन देश, अमेरिका व कॅनडा यांच्यासाठी उर्वरित जगाचे मोल कवडीइतपतच होते. या पाश्र्वभूमीवर रवींद्रनाथांना मिळालेले नोबेल नवलाईची तसेच ऐतिहासिक घटना ठरली. नोबेल पुरस्कार देणाऱ्या स्वीडिश अॅकॅडमीने प्रथमच एखाद्या साहित्यकाराच्या साहित्यिक योगदानासोबतच त्यांचा दृष्टिकोन, जीवनविषयक तत्त्वज्ञान आणि त्यांच्या साहित्याला लाभलेले वैश्विक परिमाण याचा विचार केला. असा विचार मांडण्याचे कारण म्हणजे रवींद्रनाथांबरोबर ज्या दोन साहित्यिकांची नावे पारितोषिकासाठी चर्चेत होती, ती म्हणजे इंग्लंडचे थॉमस हार्डी व फ्रान्सचे अनाटोल फ्रान्स. दोघेही श्रेष्ठ अन् विख्यात. मात्र, थॉमस हार्डीच्या कादंबऱ्यांतील ‘निराशावाद’ व फ्रान्सच्या लेखनातील ‘संशयवाद’ यापेक्षा रवींद्रनाथांची ‘जीवनाची सघन अर्थपूर्णता व सत्यम् शिवम ् सुंदरतेवरील अदम्य श्रद्धा’ महत्त्वाची ठरली. नव्या शतकात नुकत्याच प्रवेश करणाऱ्या जगाला प्रकाशाची आस अन् कास धरावीशी वाटतेय याचाच तो संकेत होता.
रवींद्रनाथांची ‘गीतांजली’ साहित्यजगतात अवतरण्याचा कालखंड वेगळे परिमाण लाभलेला होता. पराकोटीची साम्राज्यस्पर्धा, औद्योगिक क्रांतीनंतर औद्योगिक विकास साधूनही पसरलेली भकास निराशा, बकाल शहरीकरण, अतिरेकी, हिंस्र असा राष्ट्रवाद, धर्म-श्रद्धा यांना नवनवीन ज्ञान-विज्ञानाने दिलेले आव्हान यामुळे युरोपातील समाज संभ्रमित, कुंठित झालेला होता. या काळात हा समाज ज्या नैराश्यपूर्ण निर्थकतेच्या मानसिकतेतून जात होता, त्याचे चित्रण टी. एस. एलियटने ‘द वेस्ट लॅण्ड’ व हक्स्लेने ‘पॉइंट काऊंटर पॉइंट’ या साहित्यकृतींमध्ये परिणामकारकपणे केले आहे. जीवनमूल्यांचा ऱ्हास, असुरक्षितता व स्पर्धा यांच्या अंधारात भरकटलेल्या समाजाला ‘गीतांजली’तील ‘प्रेम, सत्यम् शिवम् सुंदरम्’वरील श्रद्धा व मानवी जीवनाला अर्थ असतो, हा विश्वास दीपस्तंभासारखा न वाटता तर नवलच. ‘गीतांजली’च्या प्रकाशनानंतर या काव्यसंग्रहाबद्दल ‘बाप्टिस्ट टाइम्स’ने लिहिले, ‘गीतांजली’ हे ईश्वराच्या आगमनाचे आश्वासन देणारे काव्य होय.’ अर्थात् ‘बाप्टिस्ट टाइम्स’ने ‘गीतांजली’ची दखल केवळ ‘भक्तिकाव्य’ म्हणूनच घेतलेली होती. परंतु ‘गीतांजली’चे महत्त्व त्यापेक्षा कितीतरी अधिक होते. युरोप-अमेरिकेच्या पलीकडे एक विलक्षण समृद्ध संस्कृती अस्तित्वात आहे, अन् ती अखिल मानवी समाजाला एक नवीन दिशा, प्रकाश देऊ शकते याची जाणीव पाश्चिमात्यांना झाली. तोपर्यंत भारतच काय, पण संपूर्ण आशियाच त्यांच्यासाठी गूढ, रहस्यमय, तंत्र-मंत्रांचा प्रदेश होता. रवींद्रनाथांच्या रूपात पौर्वात्य संस्कृतीचे सार त्यांच्यासमोर साक्षात् उभे राहिले. स्वत: रवींद्रनाथांना युरोपीयन मानसिकतेची पुरेपूर जाणीव होती. ‘रात्रीच्या अंधारात ठेचाळणाऱ्या पाश्चिमात्य समाजाचे डोळे पूर्वेकडील प्रकाशाकडे लागलेले आहेत,’ असे त्यांचे ‘गीतांजली’च्या प्रकाशनापूर्वीचे उद्गार होते. भारतीय संस्कृती व ज्ञान याबद्दल भ्रामक कल्पना असलेल्या त्या समाजाला त्यांनी त्यांच्याच भाषेत, त्यांच्या राग-लयीत भारतीय (पौर्वात्य) स्वत्वं समजावून सांगितली. यांत्रिक, तांत्रिक व वैज्ञानिक प्रगतीतून संपन्नता साधणाऱ्या, पण आत्मिक जाण व भान हरवलेल्या समाजासाठी ‘गीतांजली अन् रवींद्रनाथ’ काळाची गरज होती.
‘गीतांजली’ इंग्रजीत अवतरावी असे विधिलिखित असावे. एरवी रवींद्रनाथ आपल्या आयुष्याच्या निम्म्या वाटेवर इंग्रजी भाषेकडे का वळावेत? ‘एखाद्याने मला चहा आमंत्रणाची इंग्रजीतून चिठ्ठी लिहिली तर तिला काय न् कसे उत्तर द्यावे, हे मला कळत नसे..’ अशा शब्दांत रवींद्रनाथ आपल्या स्वत:च्या इंग्रजीबद्दल बोलत. मात्र, घडले ते अनपेक्षितच. १९१२ च्या सुरुवातीला रवींद्रनाथ इंग्लंडवारी करणार होते. मात्र, आजारी पडल्याकारणाने त्यांनी तो बेत रद्द केला व पद्मा नदीकाठच्या आपल्या वास्तूत प्रकृतिस्वास्थ्यास्तव ते थांबले. मार्चचा महिना. वसंत ऋतू. रवींद्रनाथांचे अन् पद्मा नदीचे व या वसंत ऋतूचे काहीतरी खास बंध.. नाते असावे. ही वाहती नदी व उमलती पालवी रवींद्रनाथांना कसली तरी ऊर्जा देत असावी. आजाराने अशक्त झालेला हा कवी काहीतरी नवीन लिहिण्यापेक्षा जे लिहिलेले आहे, ते पुन्हा लिहून त्या प्रथम लिखाणाच्या वेळी घेतलेला सर्जनानंद पुन्हा घ्यावा, या हेतूने बंगाली ‘गीतांजली’तील काही कविता इंग्रजीतून लिहू लागले. एक चाळा म्हणून केलेला तो अनुवाद होता. रवींद्रनाथ आपल्या बंगाली कवितांना इंग्रजी परिवेशात सजवत होते. भाषा बदलली; पण आशय, अर्थ तोच राहिला. कधी अधिक सघन झाला. कधी अधिक वेगळा उमटला. घडला प्रकार अनुवाद न राहता अनुसर्जन झाला. प्रतिभावंताच्या हातून केवळ अनुवाद, रूपांतर घडणे कसे शक्य? त्यातच तो प्रतिभावंत जर रवींद्रनाथ असतील तर? काही कविता पद्मेच्या साक्षीने इंग्रजीत अवतरल्या. काही इंग्लंडला जाताना सागराच्या साक्षीने. इंग्लंडमध्ये त्यांचे काही बंगाली स्नेही होतेच. त्याचबरोबर यावेळी त्यांच्या स्वागतासाठी उत्सुक एक इंग्रज स्नेहीही होता. रोदेन स्टेन त्याचे नाव. इंग्रजी ‘गीतांजली’चा पहिला वाचक म्हणावा असा. रोदेन स्टेनने अनुसर्जित इंग्रजी ‘गीतांजली’चे हस्तलिखित वाचले खरे; मात्र त्या कविता खरोखरच वेगळ्या आहेत, हे त्या जातिवंत चित्रकाराला उमगले. त्या कवितांनी रोदेन स्टेनला वेगळ्याच भावविश्वात नेले. रोदेन स्टेनने ते हस्तलिखित कवी डब्ल्यू. बी. येटस् याला वाचायला भाग पाडले. भाग पाडले असेच म्हणावे लागेल. रोदेन स्टेनच्या आग्रहाखातर कविता वाचणाऱ्या येटस्ला त्यातील अलौकिकत्व आकळले. कवीला कवी कळला.
ज्या थोर इंग्रजी साहित्यकार-तत्त्वज्ञांसमोर ‘गीतांजली’चे पहिले प्रकट वाचन झाले, त्यांच्या उत्साही प्रतिसादाने प्रोत्साहित झालेल्या रवींद्रनाथांनी आणि रोदेन स्टेन यांनी इंग्रजी ‘गीतांजली’ प्रथमत: इंडिया हाऊसतर्फे प्रकाशित केली. त्यानंतर मॅकमिलन कंपनीतर्फे रवींद्रनाथांचे काव्य जगासमोर येण्यासाठी या हितचिंतकांनी जी भूमिका घेतली, जो वाटा उचलला, त्याचे मोल मान्य करायलाच हवे. ‘इंग्रजी गीतांजली’ बंगाली आवृत्तीपेक्षा नक्कीच सरस नाही, हे सत्य मान्य करूनदेखील इंग्रजी काव्यसंग्रहाचे महत्त्व कमी
होत नाही.

मराठी साहित्याच्या साठोत्तरी वाटचालीत वैविध्यपूर्ण साहित्यिक प्रवाहांना सामावून घेणारे, त्यांचा जाणीवपूर्वक शोध आणि वेध घेणारे सव्यसाची प्रकाशकही याच काळात निर्माण झाले. त्याचबरोबर साहित्याला सर्जनशील दृश्यात्मक साज चढवून त्याच्या निर्मितीमूल्यांत भर घालणारे मर्मज्ञ चित्रकारही याच दरम्यान उदयास आले. साहित्याच्या बरोबरीने.. कधी त्याहीपल्याड जात या चित्रकारांनी मराठी वाङ्मय समृद्ध केले. या सृजनप्रक्रियेचा मागोवा घेणारा खास विभाग…

genelia and riteish deshmukh madhuri dixit reach jamnagar for anant ambani pre wedding
अनंत अंबानींच्या प्री-वेडिंगसाठी पतीसह पोहोचली माधुरी दीक्षित, तर रितेश-जिनिलीयाला पाहून पापाराझी म्हणाले, “दादा…”
prarthana behere tie knot of pooja sawant and siddhesh chavan
प्रार्थना बेहेरेने पतीसह बांधली पूजा-सिद्धेशची लग्नगाठ! लाडक्या मैत्रिणीच्या लग्नात अभिनेत्री झालेली भावुक, म्हणाली…
Sita & Akbar: How names of two lions became the reason for a plea in Calcutta High Court
अकबराची बहीण लक्ष्मी? अकबर, सीता, तेंडुलकर आदी नावं प्राण्यांना द्यायची पद्धत कशी पडली?
Pooja Sawant Siddhesh Chavan Wedding Photos Out
पिवळी नऊवारी, सातफेरे अन्…; पूजा सावंतच्या लग्नाचा मराठमोळा थाट, अभिनेत्रीने शेअर केले विवाहसोहळ्यातील खास क्षण

पाश्चिमात्य जगतात ‘गीतांजली’ला अनपेक्षित, भरभरून प्रतिसाद मिळाला. रवींद्रनाथांची तुलना डान्टे, शेक्सपीअर अन् गोथेसारख्या महनीयांसोबत होऊ लागली. ज्या देशात या साहित्यकारांच्या तुलनेचा कवी जन्माला येऊ शकतो, तो देश केवळ वसाहतीपेक्षा निश्चित वेगळा आहे. रवींद्रनाथांच्या ‘गीतांजली’तील भाव भारतीयांना नवीन नव्हता; परंतु अमेरिकन समाजाला त्याचे न्यून नेमके माहीत होते. जी उदात्तता रवींद्रनाथ आपल्या काव्यात प्रकट करतात, ती आपल्या जाणीव-नेणिवेच्या पातळीवरही उमटणे शक्य नाही, याचे भान त्यांना होते. खरं तर उदात्तता ही मनोवस्था असते, लेखनाची शैली नव्हे. म्हणून प्रत्येक काव्य उदात्त बनत नाही.
रवींद्रनाथ, थोडक्यात सांगायचे म्हणजे, त्या काळातील, त्या समाजाचे अव्यक्त नि:शब्द भाव नेमकेपणाने शब्दरूप करीत होते. तेथील बुद्धिवंत जो विचार करीत होते, पण तो शब्दबद्ध करू शकत नव्हते. ते आपसूकच रवींद्रनाथ आपल्या काव्यातून प्रतिबिंबित करीत होते. आपल्या आशा-आकांक्षा, स्वप्नं, विश्वास, श्रद्धा, प्रेम या साऱ्याच गोष्टींचे मूल्यांकन, पुनर्मूल्यांकन, परीक्षण, पुनर्परीक्षण गीतांजलीच्या निमित्ताने करण्याची संधी पाश्चिमात्य समाजाला मिळाली.
ज्या ‘गीतांजली’चे असे सार्वत्रिक स्वागत झाले, तिला नोबेल पारितोषिक मिळणे यथायोग्य होते. भारतीयांसाठी ही गोष्ट अनेक अर्थानी महत्त्वाची होती. या घटनेने भारतीय समाजमनाला विलक्षण उभारी मिळाली. भारतीय संस्कृतीचे सत्व अन् स्वत्व अधोरेखित करणारी ही घटना होती. अशाच घटना देशाला राष्ट्ररूप देत असतात. एक भौगोलिक तुकडा म्हणजे राष्ट्र नव्हे, तर त्या जमिनीवर राहणाऱ्या लोकांचा ‘सामायिक अनुभव’ म्हणजे राष्ट्र. अनुभव भलेबुरे कसेही असोत, ते राष्ट्राची वीण घट्ट करीत जातात. या खंडप्राय देशाला राष्ट्र म्हणून ओळख मिळवताना, गुलामगिरीमुळे आलेला न्यूनगंड दूर सारताना, आपले विस्कळीत अस्तित्व सावरताना, सांधताना रवींद्रनाथांचे काव्य जगाकडून स्वीकारले जाणे, त्याला नोबेल मिळणे, या घटनेची नक्कीच मदत झाली. रवींद्रनाथांचे चाहते, अभ्यासक ‘गीतांजली’ला त्यांची सवरेत्कृष्ट साहित्यकृती नक्कीच मानणार नाहीत. ‘गीतांजली’ रवींद्रनाथांची एक भावावस्था दाखविणारे काव्य आहे. त्याच्या पलीकडेही रवींद्रनाथ आहेतच. इंग्रजी गीतांजलीमुळे रवींद्रनाथांना अन् भारताच्या साहित्य परंपरेला जगन्मान्यता मिळाली, हे मात्र खरे.
रवींद्रनाथांना मिळालेला पुरस्कार हा त्यांच्या प्रतिभेचा, तत्त्वज्ञानाचा, त्यांच्या साहित्यिक योगदानाचा, तसेच त्यांच्या काव्यातील उदात्तता, वैश्विकता यांचा विचार करून देण्यात आला होता. परंतु यानिमित्ताने ज्या प्रतिक्रिया पाश्चिमात्य जगतातून आल्या, त्या भारताबद्दल आणि एकंदरच आशिया खंडाबद्दलच्या पूर्वग्रहदूषित दृष्टिकोनामुळे आलेल्या होत्या. त्यातच आंतरराष्ट्रीय राजकारण, वसाहतींचे धोरण, भारतीय बाजारपेठ आणि पाश्चिमात्य राष्ट्रांमधील स्पर्धा यांची पाश्र्वभूमी या प्रतिक्रियांमागे होती. एझरा पाउण्ड हा कवी रवींद्रनाथांचा साक्षेपी टीकाकार होता. तो आपली खंत व्यक्त करताना म्हणाला की, ‘अमेरिका हा खंड या कवीला समजून का घेत नाही? त्यांच्या कवितांना कविता म्हणून का स्वीकारत नाही? त्यांना तुम्ही राष्ट्रध्वजावरील ताऱ्यांप्रमाणे नव्हे, तर प्रत्यक्ष आकाशातील ताऱ्यांकडे पाहावे, तसे पाहावे.’ एका फ्रेंच लेखकाने लिहिले की, ‘या योग्यतेचा कवी आजवर पाश्चिमात्य जगताला ठाऊक नव्हता, हीच मानवाची मर्यादा स्पष्ट करणारी गोष्ट आहे.’ स्वीडिश अकादमीचे एक सदस्य हॉलस्टॉर्म यांनी ‘गीतांजली’वर लेख लिहिले. वेरनेर वान हेडेनस्टॅम या लेखकाने ‘गीतांजली’वर लिहिलेल्या रसग्रहणाने रवींद्रनाथांची बाजू अधिकच बळकट झाली होती. त्यांच्या मते, ‘गेल्या पाव शतकात इतकी सुंदर गाणी लिहिली गेलेली नव्हती. त्यातील उदात्त भावना व विचार, अंत:करणाची निर्मळता, अनुरूप शैली यामुळे गीतांजलीमध्ये क्वचितच आढळणारे आध्यात्मिक सौंदर्य आहे.’ प्रख्यात कादंबरीकार हालडोर हॅक्नेस म्हणतो की, ‘गीतांजलीने नव्या प्रकारच्या कविता लिहिण्यास प्रेरणा दिली. युरोपातील छोटय़ा देशांमध्येदेखील गद्य कविता लिहिण्यास सुरुवात झाली.’
युरोप-अमेरिकेमधून संमिश्र प्रतिक्रिया येत असताना जपान व चीन यांना ‘पौर्वात्यांचा पश्चिमात्यांवरील विजय’ असे काहीसे वाटत होते. भारतात अर्थात आनंद व अभिमानाची लहर उमटणे स्वाभाविक होते. आजवर कवी-राष्ट्रनेता म्हणून माहीत असलेले रवींद्रनाथ नोबेल मिळाल्यानंतर भारतीय संस्कृतीचे प्रतीक म्हणून भारतात आणि जगभर स्वीकारले गेले.
‘गीतांजली’चा साहित्यकृती म्हणून विचार करताना रवींद्रनाथांच्या समग्र जीवनदृष्टीच्या आधारे त्यांच्या साहित्य- व्यवहाराच्या साखळीत अन् भारतीय साहित्य, संस्कृतीच्या पाश्र्वभूमीवर तिचा विचार करावा लागतो. एडवर्ड थॉम्पसन म्हणतो तसे रवींद्रनाथांची कविता अथपासून इतिपर्यंत त्यांच्या आत्म्याचे प्रतिबिंब आहे. ‘गीतांजली’त आढळणारी प्रगाढ शांती अन् संतुलित भावावस्था- ज्यामुळे या कविता पाश्चिमात्यांना भावल्या- त्या रवींद्रनाथांच्या अनुभूतीचा हिस्सा होत्या. रवींद्रनाथ ज्या कालखंडाचे अपत्य आहेत, ज्या परंपरेची एक कडी आहेत, जो संस्कार त्यांच्यावर झाला आहे, त्या काळाचे, परंपरेचे, संस्कारांचे भान ठेवून त्यांच्या कवितांचा अभ्यास करावा लागतो. अर्थात एवढेच पुरेसे नाही. टी. एस. इलियट म्हणतो त्याप्रमाणे परंपरा व व्यक्तिगत प्रतिभा एकमेकांना प्रभावित करीत असतात.. समृद्ध व संपन्न करत असतात. या तत्त्वाप्रमाणे परंपरेच्या मुशीतून रवींद्रनाथांचे काव्य मातीशी इमान राखत रुजले, वाढले, तरी त्यांच्या वैयक्तिक प्रतिभेने ते अनोख्या रंगांनी, गंधांनी सजले. भारतीय तत्त्वचिंतनाचा, लोकगीत-संगीताचा, बाऊल गीतांचा, सुफी तत्त्वज्ञानाचा, आधुनिक साहित्यविचारांचा संस्कार त्यांच्यावर झालेला दिसतो. येथे ‘प्रभाव’ हा शब्द न वापरता, ‘संस्कार’ शब्द वापरलाय. (व्यक्तीवर प्रभाव पडतो. तो टिकतो किंवा विरतो. मात्र, संस्कारांचे अभिसरण होते.) जयदेव-चंडिदासाची गाणी ऐकत, निसर्गाशी गुज करीत मोठय़ा होणाऱ्या मुलाच्या संवेदना, कल्पनाशक्ती कशी विकसित होईल याची कल्पना करता येऊ शकते. रवींद्रनाथांच्या काव्याचे विषय अनंत. तुलनेने भिन्न. रवींद्रनाथांना ‘जीवनाचे कवी’ म्हटले जाते. (खरं तर त्यांना ‘नदीचे कवी’ असे कोणीतरी संबोधले आहे.) नदी आणि जीवन दोघांतही कितीतरी प्रवाह मिसळलेले असतात. दोघांच्या आपल्या स्वत:च्या भाव-अवस्था असतात.
रवींद्रनाथ जे जगले, ते ते कवितेत मांडत गेले. ते काव्य प्रत्यक्ष जगले. त्यांनी आपल्या स्वत:च्या अनुभूती इतक्या निखळपणे, प्रांजळपणे, पारदर्शकपणे प्रकट केल्यात, की त्यांची कविता, त्यांची गीते सगळ्यांची अन् प्रत्येकाची झाली. रवींद्रनाथांच्या सर्व कृती-उक्तींमागील प्रेरणा एकच- प्रेम. हा कवी एका कवितेत म्हणतो, ‘मी या जगात नसेन तेव्हा हे तरुवरा, तू साऱ्यांना सांगत जा- हा कवी केवळ प्रेम करतच जगला.’ त्यांनी जे जे केले ते प्रेमाने.. प्रेमासाठी. सारे काही सुरात. (प्रेमाला बेसूरता मान्य नाहीच.) रवींद्रांचे नाते शब्दांशी आहे, सुरांशी आहे, नादाशी आहे, रंग-गंधांशी आहे. रवींद्रनाथ निर्गुण-निराकाराची अनुभूती घेऊ शकतात, तसेच सगुण-साकाराला आनंदाने, मनोभावे सामोरे जातात. त्यांच्या विचारसरणीत द्वैत आणि अद्वैत दोन्हीही तत्त्व-विचारांचे अद्वैत साधले गेले आहे. नाही तरी एका रवींद्रनाथात किती रवींद्रनाथ दडले आहेत, असा अचंबित करणारा प्रश्न पडावा असा हा माणूस. पुलं त्यांना म्हणूनच ‘पूर्ण पुरुष’ म्हणत असावेत.
भक्तीसाहित्याची एक सघन, संपन्न परंपरा भारतात आदिकाळापासून आहे. रवींद्रनाथांनी ‘गीतांजली’च्या रूपात त्यात भर घातली. रवींद्रांच्या या भक्तिकाव्याचे वेगळेपण कोणते? तर- ‘गीतांजली’तील कविता या ईश्वराबद्दलच्या कविता नाहीत, तर ‘ईश्वरपणा’बद्दलच्या आहेत. ‘ईश्वर’ या संकल्पनेसोबत धर्म ही संकल्पना येते. मात्र, ‘ईश्वरपणा’सोबत त्याची अनुभूती येते. ही अनुभूती सापेक्ष असते. निरपेक्ष असते. ती प्रवाही आहे. त्यामुळे ‘गीतांजली’तील ‘तो’ दूरचा, परका नाही वाटत, तर तो आपल्या सभोवतालातील एक, जवळचा, खूपदा स्वत:मध्येच दडलेला असा आहे. ‘गीतांजली’तील ‘तो’ प्रत्येकाच्या अनुभूतीच्या कक्षेत येतो. ही अनुभूती माणसासारखी, माणसाइतकीच चैतन्यशील आहे. रवींद्रनाथ हे ‘ईश्वरपण’ आपल्या खास शैलीतून, भाषेतून व्यक्त करतात. त्यांची भाषा नाद असलेली, सूर असलेली आहे. मंगेश पाडगावकर म्हणतात तशी ती सर्वस्वाची भाषा आहे. शब्द तेच, पण खोल खोल आत असलेले ओल घेऊन आलेले. म्हणूनच रवींद्रनाथ जे सांगतात ते आत आत झिरपत जाते. रवींद्रनाथांची कविता वाचता येते, गाता येते, अनुभवता येते. रवींद्रनाथ शब्दांपलीकडील मौनाची भाषा जाणतात. विलक्षण उत्कट भाव त्या मौनाच्या भाषेतून व्यक्त करतात.
यासोबतच रवींद्रनाथांची गीतांजली ही ‘मी’ व ‘तो’ यांच्या संबंधांवर प्रकाश टाकते. माणूस व विश्व यांच्यातील परस्परसंबंधाचा वेध घेणे ही मानवी आदिम वृत्ती आहे. ‘मी कोण?’ या प्रश्नाचे उत्तर शोधताना ‘तू कोण?’ या प्रश्नाची उकल करावी लागते. माझे ‘मीपण’ तुझ्या ‘अस्तित्वा’शिवाय अधुरे, अपूर्ण आहे. या अधुरेपणाची, अपूर्णतेची जाणीव माणसाला पदोपदी येते. त्याला स्वत:ला सभोवतालचा निसर्ग, सजीव-निर्जीव, स्थूल-सूक्ष्म, लौकिक-अलौकिक यांना वेगळे करून स्वत:चे अस्तित्व अर्थपूर्ण करता येत नाही. माणसाचे असे बंधनात असणे, आणि या बंधनातून मुक्त होण्याचा त्याने प्रयत्न करणे- हे त्याच्या ‘जन्म-मृत्यू’ या दोन टोकांतील जीवनाला.. अस्तित्वाला अर्थ देत असते. ‘मी’ सत्य आहे, म्हणूनच ‘तू’देखील सत्य आहे. हा ‘तू’ साकार असतो, कधी निराकारपण असतो, हे खरं. हे चिंतन रवींद्रांच्या ‘गीतांजली’त प्रकट झालेलं आहे. हे चिंतन केवळ कुतूहलापोटी नव्हे, तर अनुभवाने सिद्ध झालेलं आहे. ‘गीतांजली’च्या कवितांमध्ये ‘मी’ व ‘तू’ यांत कधी द्वैत आढळते, तर कधी अद्वैत. मी कधी ‘प्रेयसी’, तर ‘तू’ प्रियकर असतो. ‘मी’ कधी ‘बासरी’, तर ‘तू’ त्यात प्राण फुंकणारा वारा ठरतो. कधी ‘तो’ निसर्गघटकांमध्ये, सर्वसामान्यांमध्ये असतो. त्याचे देणे अफाट असते. त्याचे अस्तित्व असण्या-नसण्याच्या पलीकडे असते. ‘या विश्वात मी एकटा आहे’ असे भारतीय तत्त्वपरंपरा मानत नाही. याउलट, ‘मी’ हा समाज, निसर्ग अन् ईश्वरीय चैतन्य- जे सर्वत्र, सर्व रूपांत प्रकटते- त्यांच्याशी जुळलेला असतो. ‘मी’ या अनादी, अनंत, अनाहर चैतन्याचा एक भाग आहे, तेच तत्त्व माझ्यातही विराजमान आहे, याची प्रचीती घेणे रवींद्रनाथांना शक्य झाले. हे शक्य होण्यासाठी ‘स्व’चे विसर्जन करणे त्यांना जमले. रवींद्रनाथ ‘स्व’चे विसर्जन करीत म्हणजे काय? सूर्योदय पाहताना सूर्य होणे, नदी पाहताना प्रवाह होणे, फूल पाहताना त्याच्या रंग-गंधात एक होणे. प्रेम करताना प्रेम व्हावे तसे त्यांचे होत असावे.
रवींद्रनाथ साऱ्याचा स्वीकार करतात. आनंदाचा, दु:खाचा, मीलनाचा, विरहाचा, हर्ष-खेदाचा. जगणे स्वीकारणे हा रवींद्रनाथांचा धर्म आहे. हा धर्म ‘गीतांजली’ मांडते. याच गुणवैशिष्टय़ांमुळे ‘गीतांजली’चा एवढय़ा उत्साहाने, उत्कटतेने स्वीकार झाला असावा. ‘गीतांजली’ आणखीन एका गुणवैशिष्टय़ामुळे विशेष ठरते. या कवितांमध्ये एक आस आहे.. एकरूप होण्याची आस. ही आस जितकी पारमार्थिक आहे, तितकीच मानवीयदेखील. ईश्वर हा रवींद्रनाथांसाठी भक्ती नव्हे, तर प्रेमाचा विषय आहे. प्रेमात असलेली मीलनाची अमिट आस त्या नात्याला कायम जिवंत, लसलशीत ठेवते.
‘गीतांजली’त प्रकट होणारा भाव, आशय व तो ज्या शब्दांत व्यक्त होतो ते शब्द वाचणाऱ्याला एक निर्मळ, सात्त्विक अनुभव देतात. डब्लू. बी. येट्स ‘गीतांजली’च्या प्रस्तावनेत नेमके असाच अनुभव मांडतात. त्यातील कविता कुठलाही मूड ल्यालेली असो- वाचून झाल्यानंतर एक प्रकारची शांती दरवळत राहते. त्यातील सुंदरता, त्यातील मांगल्य मनाची अवस्था अधिकाधिक उदात्त करीत जाते.
रवींद्रनाथ विश्वकवी आहेत याचा अर्थच मुळात ते वैश्विकतेचे गाणे गातात. साऱ्या विश्वाला समग्रतेने स्वीकारतात. त्यांना भेद मान्य नाही. सीमा मान्य नाही. बंधने मान्य नाहीत. निसर्गाने त्यांना अखंडता, सातत्य, समरसता शिकविली. त्यामुळे पोथीनिष्ठ विचारांचे साखळदंड, राष्ट्रा-राष्ट्रांतील सीमा, माणसा-माणसांतील भेद ते मान्य करीत नाहीत. रवींद्रनाथ म्हणतात..
‘का करावे बंद द्वार
कोणी नसे जेव्हा परके..’
असे म्हणताना रवींद्रनाथ साऱ्यांवर प्रेम करतात. त्यांच्या ‘आंतर-सौंदर्य-मुक्ती’ या त्रिमूर्तीचा पाया प्रेमच आहे. रवींद्रांची कविता मुळात प्रेमाचे ‘मेटॅफर’ आहे.
आज गीतांजलीला नोबेल पुरस्कार मिळून १०० वर्षे उलटलीत. त्यांची ‘गीतांजली’ अथवा इतरही कलाकृती कालजयी आहेत असे म्हणताना कुठला निकष लावावा? काव्याचा विषय, त्यांचा फॉर्म, त्यांतील भाषाशैली याचा विचार केला तर प्रत्येक काव्य कालजयी व वैश्विक ठरावे. परंतु असे होत नाही. ‘ईश्वर’ ही संकल्पना अनंत काळापासून अस्तित्वात आहे, म्हणून ईश्वरासंबंधीची प्रत्येक कविता, गीत, स्तोत्र हे सगळ्यांनाच सर्व काळ भावेल असे नाही. जगणं, प्रेम, मृत्यू हे मानवाचे नित्य अनुभवविषय असताना त्यावरील प्रत्येक कलाकृती काही कालजयी ठरताना दिसत नाही. मग यापलीकडे अजून काही आहे का- जे त्या काव्याला उदात्त, वैश्विक व कालजयी ठरवू शकेल?
याचे उत्तर आहे- ‘कवीची अनुभूती’! रवींद्रनाथांची अनुभूती त्यांच्या काव्याला उदात्त, वैश्विक व कालजयी बनवते. कवीची अनुभूती जर निखळ, प्रामाणिक असेल तर ते काव्य कालजयी ठरते. ‘सर्वात सुंदर गाणे आपुले.. आपल्या दु:खाचेच असते’ असं म्हणणारा शेले विषय, विचार, हेतू, कल्पना नव्हे, तर स्वत:ची अनुभूती व्यक्त करीत असतो.
‘हे जग सोडून जाण्याआधी सांगून जाईन काही,
जे पाहिले, जे अनुभवले, त्याची तुलना नाही’
या ओळींत रवींद्रनाथांचे जगण्यावर भरभरून केलेले प्रेम अन् मिळालेल्या आनंदाची अनुभूती व्यक्त होते. रवींद्रनाथ गीतांजलीमध्ये देवाचे देवत्व मिरवीत नाहीत, तर त्याची आलेली प्रतीती, अनुभूती शब्दांत पेरतात. ती अनुभूती रुजून येते अन् वाचकाच्या मनाला साद घालते. अनुभूतीची समानता किंवा अनुभूतीचा प्रत्यय, पुनप्र्रत्यय घेण्याची आदिम प्रवृत्ती त्या काव्याला कालजयी व वैश्विक बनविते. राधा-कृष्णावर लिहिले गेलेले कोणत्याही भाषेतील काव्य भारतीय मनाला अनादि अनंत काळापासून भावत आले आहे. कारण प्रेमाची वैयक्तिक अनुभूती राधा-कृष्णाच्या प्रतीकांतून व्यक्त झालेली असते. रवींद्रांचे काव्य ‘राधा-कृष्णाच्या मोहिनीप्रमाणे अजर आहे, सुंदर आहे, नित्यनूतन आहे. म्हणूनच कालजयी आहे!