06 July 2020

News Flash

राजहंसी वाटचाल!

मराठीतल्या पुस्तक प्रकाशन व्यवसायाचा गेल्या अर्धशतकातला इतिहास पाहिला तर आघाडीच्या प्रकाशन संस्थांमध्ये राजहंस प्रकाशनाचे नाव आवर्जून घ्यावे लागेल अशी कामगिरी राजहंसने गेल्या २० वर्षांत केली

| March 5, 2014 05:58 am

मराठीतल्या पुस्तक प्रकाशन व्यवसायाचा गेल्या अर्धशतकातला इतिहास पाहिला तर आघाडीच्या प्रकाशन संस्थांमध्ये राजहंस प्रकाशनाचे नाव आवर्जून घ्यावे लागेल अशी कामगिरी राजहंसने गेल्या २० वर्षांत केली आहे. त्याआधीची ४० वर्षे ही धडपडत, ठेचकाळत दोन पावलं पुढे जाणारी, तर एक पाऊल मागे येणारी अशी होती. विषय, लेखक, नवनव्या कल्पना यासंबंधीचे प्रयोग करत, कधी चुकतमाकत, तर बहुश: नियोजनपूर्वक राजहंसने एका निश्चित दिशेने व ध्येयाने वाटचाल केली. चालू वर्ष हे या संस्थेचे हीरकमहोत्सवी वर्ष आहे. त्यानिमित्ताने राजहंसचे प्रकाशक-संचालक दिलीप माजगावकर यांनी गेल्या ६० वर्षांतील काही महत्त्वाच्या टप्प्यांवर टाकलेला दृष्टिक्षेप..
मी ६० साली मॅट्रिक झालो. ६६ साली ‘माणूस’मध्ये आलो. (त्या वर्षी ‘माणूस’चं साप्ताहिकात रूपांतर झालं होतं.) आणि ८२-८३ ला ‘राजहंस’चं स्वतंत्रपणे काम बघायला सुरुवात केली.
शाळा-कॉलेजमधला माझा वावर तसा सामान्य विद्यार्थी म्हणूनच होता. दुसरं असं की, कुठलीच गोष्ट योजनापूर्वक, ठरवून माझ्या आयुष्यात घडलेली नाही. खूप हुशार विद्यार्थ्यांना आपण डॉक्टर, इंजिनीअर, वकील व्हावंसं वाटतं. तसं मला ठरवणं शक्य नव्हतं. कारण माझं शाळेच्या अभ्यासात लक्षच नव्हतं. अभ्यासात टंगळमंगळ तसंच काहीच गंभीरपणे न घेण्याकडे माझा कल होता. त्यामुळे मला शाळा-कॉलेजमध्ये म्हणावं तसं यश मिळालं नाही. उलट, एखाद् वर्ष नापास झाल्यानं वाया गेलं. कसे कुणास ठाऊक, मॅट्रिकला चांगले मार्कस् मिळाले. त्यामुळे माझा समज (गैरसमज म्हणा हवं तर..) झाला की, आपल्याला विज्ञान खूप चांगलं येतंय. या घोटाळ्यापायी मी सायन्सला गेलो आणि पदवीधर झालो. ६०-६५ या काळात एक मात्र झालं : माझं वाचन खूप झालं. त्या काळात आम्ही सगळे एकत्र राहत होतो. घरात वडीलबंधूंची- श्री.गं.ची (श्री. ग. माजगावकर) खूप पुस्तकं होती. शिवाय त्यांच्याकडे भेटायला, गप्पागोष्टींसाठी जी मंडळी येत, त्यांचे चर्चाविषय राजकारण, समाजकारण या अंगानं जास्त असल्यामुळे माझं त्या विषयांचं वाचन या काळात चांगलं झालं. त्यातही विशेषत: कविता. मी राजहंसकडून कवितासंग्रह फारसे काढत नसलो तरी कविता हे माझं पहिलं प्रेम होतं, अजूनही आहे.
सहज एक गंमत सांगायची तर माझा जवळचा मित्र दत्तप्रसाद दाभोळकर आणि मी एकेकाळी फोनवरून बोलतानाही एक दंडक नेहमी पाळायचो. त्यानं केलेली एक कविता तो मला ऐकवायचा आणि मी नुकतीच वाचलेली एखादी सुंदर कविता त्याला सांगत असे.
माझं कॉलेज शिक्षण रडतखडत चाललेलं असल्यानं आणि घरची परिस्थिती थोडीशी अडचणीची असल्यामुळे त्या काळात मी एक-दोन नोकऱ्याही केल्या. मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह म्हणून मी कॉलेजच्या दिवसांत दीड-दोन र्वष काम करत होतो. पुढे कॉलेज संपलं. मी पदवीधर झालो. पण चांगली नोकरी मिळाली नाही. मी फारसा शोधही घेतला नाही. हे कुठंतरी श्री. ग. पाहत होते. तेच एकदा म्हणाले, ‘तू ‘माणूस’मध्ये ये. वर्षभर काम कर. नंतर बघू.’ तिथे मी सुरुवातीपासून संपादकीय साहाय्यक म्हणून प्रूफरीडिंग, पानं लावणं, लेआऊट, प्रॉडक्शन, छपाई हे सारं बघत होतो. साप्ताहिकाचं काम रोज मोठय़ा प्रमाणावर नसल्यामुळे श्री. ग. म्हणाले, ‘तू थोडं जाहिरातीच्या कामात लक्ष घालायला सुरुवात कर.’ म्हणून मी जाहिरातीच्या कामासाठी मुंबईला जायला लागलो. त्या काळात मी आठवडय़ातून एक-दोनदा मुंबईला जायचो. बऱ्यापैकी जाहिराती मिळत होत्या. त्यावेळी ‘माणूस’चा इतका मोठा स्टाफ नव्हता, की संपादकीय कामासाठी वेगळा माणूस ठेवता येईल. त्यामुळे श्री. ग. म्हणायचे की, ‘तू आता मुंबईला जातोच आहेस तर अमुक एका लेखकाला भेट. तमुक विषयाबाबत त्याच्याशी बोलून बघ.’
असं करता करता मी हळूहळू संपादकीय कामात लक्ष घालू लागलो. त्यातच मनानं अधिक रमू लागलो. संपादकीय कामासाठी साहजिकच मी जास्त वेळ देऊ लागलो. जाहिरातीचं काम थोडंसं मागे पडायला लागलं. त्याचवेळी माझ्या असं लक्षात आलं की, जाहिराती देणाऱ्या संस्थांना मराठी भाषा, मराठी साप्ताहिकं वा मासिकं याबद्दल काडीचीही आस्था नव्हती. त्यामुळे आम्हाला त्यांच्याकडून फारशा जाहिरातीही मिळायच्या नाहीत. मिळत त्या फक्त दिवाळीला. दिवाळीव्यतिरिक्तच्या काळात मी संपादकीय कामात अधिक गुंतू लागलो. त्यात मला श्री. गं.चं पूर्ण मार्गदर्शन मिळत होतं. एका लेखकाच्या ओळखीतून दुसरा लेखक.. त्याच्या ओळखीतून तिसरा लेखक असं करत पुढच्या चार-पाच वर्षांच्या काळात मी ‘माणूस’साठी लेखकांची एक स्वतंत्र टीम उभी केली.
६६ ते ७० हा चार वर्षांचा काळ माझ्या आयुष्यातील व्यक्तिगतरीत्या आणि बौद्धिकदृष्टय़ाही मला स्वत:ला सर्वाधिक समृद्ध काळ वाटतो. ‘माझं विश्व’ असं आपण म्हणतो, ते मला तिथे गवसायला लागलं. मला चांगले लेखक, चांगले कलाकार भेटले. त्यांच्याबरोबरच्या गप्पागोष्टी, चर्चा, त्यांचा सहवास यातून केवळ साहित्यच नव्हे, तर साहित्याच्या बरोबरीने असणाऱ्या कला, निर्मिती अशा इतर अनेक गोष्टींतले बारकावे मला उमजू लागले. या साऱ्यांची प्रत ठरवण्याचे निकष मला आकळू लागले. या साऱ्यांतून साहित्याकडे आणि इतर क्षेत्रांकडे बघण्याची माझी स्वत:ची एक नजर मला मिळाली. उदाहरणच द्यायचं झालं तर पुण्यात देवीदास बागूल होते. त्यांचा माझ्यावर खूप प्रभाव आहे. टायपोग्राफीचे पहिले प्रयोग, कृष्णधवल रंगांतलं उत्तम छायाचित्रण त्या काळात बागूल करत होते. त्यातील सौंदर्यस्थळं मला समजावून सांगत होते. मुंबईत वसंत सरवटे, श्याम जोशी, बाळ ठाकूर, पद्मा सहस्रबुद्धे या कलाकारांचा मला सहवास मिळाला. सरवटय़ांमुळे पेंटिंग कसं बघावं याची नजर मिळाली. विजय तेंडुलकरांमुळे नाटक-चित्रपटाकडे बघण्याचा एक अनवट दृष्टिकोन मिळत गेला. प्रत्यक्ष वाचनापेक्षा माझ्या भोवताली हा जो ग्रुप जमत गेला, त्यातून मला खूप काही शिकायला मिळालं. या सगळ्याचा माझ्या घडणीत प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष सहभाग आहे.
माझं ‘माणूस’साठीचं कामही चालू होतं. एका बाजूला ‘माणूस’ साप्ताहिक अंक म्हणून दर आठवडय़ाला प्रसिद्ध होई, तर दुसरीकडे त्याचे विशेषांक किंवा दिवाळी अंक वेगळ्या रूपात होत. माझ्या कामातही मला हे दोन्ही पदर सांधावे लागत. एकीकडे साप्ताहिकासाठी ताजे विषय, समर्थ लेखकांचा शोध घ्यायचा; तर दुसरीकडे नवनवे लेखकही धुंडाळायचे. राजहंस प्रकाशनाच्या पुढच्या वाटचालीला लाभलेली माझी ही ‘माणूस’साठीच्या कामाची पाश्र्वभूमी आज प्रकर्षांनं जाणवते.
माझ्या कारकीर्दीत अगदी सुरुवातीच्या काळात या प्रभावामुळे माझ्याकडून ताज्या विषयांचा आवर्जून शोध घेतला गेला, तशीच काही पुस्तकंही सादर झाली. आज त्या पुस्तकांपैकी काहींच्या बाबतीत मागे वळून पाहताना जाणवतं की, ही पुस्तकं मला अधिक अभ्यासपूर्ण, अधिक सखोल बनवता आली असती तर काळाच्या कसोटीवर ती अधिक टिकाऊ ठरली असती. तसं करण्यात मी कुठेतरी कमी पडलो ही खंत मला आज जाणवते.
असं एका बाजूनं माझं काम आणि कामातलं शिक्षण सुरू होतं. यात ६८ साल संपलं. ६९ साल उजाडलं ते संस्थेच्या वाटचालीला एक अनपेक्षित वळण देणाऱ्या घटनेनं. झालं असं-
‘माणूस’चं ऑफिस त्यावेळी नारायण पेठेत होतं. तिथून जवळच नागनाथ पार. नागनाथ पाराला लागून सरदार पटवर्धनांचा मोठा दगडी वाडा. पुण्यात तो ‘मळेकर वाडा’ म्हणून प्रसिद्ध होता. हा वाडा माझ्या घरी जायच्या रोजच्या वाटेवर होता. एक दिवस दुपारी बाबासाहेब पुरंदरे आणि मी जेवायला घरी चाललो होतो. मळेकर वाडय़ावरून जाताना आम्हा दोघांची नजर त्या वाडय़ातील नोकरवर्गासाठी असलेल्या खोल्यांकडे गेली. घरी जागेची अडचण होती. ‘यातल्या एखाद् दोन खोल्या आपल्याला भाडय़ानं मिळतील का?’ असं मी बाबासाहेबांना विचारलं. कारण बाबासाहेब आणि सरदार पटवर्धनांचे अगदी घनिष्ठ संबंध होते. बाबासाहेब म्हणाले, ‘चला, आताच भेटून विचारून घेऊ.’

आम्ही तसेच वाडय़ात शिरलो. मालक होतेच. बाबासाहेबांनी त्या चाळवजा खोल्यांचा विषय काढताच सरदार म्हणाले, ‘अहो, त्या खोल्याच काय, आम्हाला सगळा वाडाच भाडय़ानं द्यायचाय.’ पण पाच हजार स्क्वेअर फुटांचा वाडा घेऊन आम्ही करणार काय होतो? घरी परत येत असताना बाबासाहेबांनी माझ्यासमोर स्वप्न रंगवलं- ‘दिलीपराव, विचार करा. परत अशी संधी येणार नाही. राजहंसचं पुढे आपण असं असं करू.. ‘माणूस’ वाढवू..’ अशा अनेक योजना बाबासाहेबांनी मला त्या तासाभरात सांगितल्या. मीही स्वप्न पाहायला लागलो. दुसऱ्या दिवशी श्री. गं.शी बोललो, तर ते म्हणाले की, ‘हे आपल्याला कसं झेपणार?’ मी म्हणालो, ‘बाबासाहेब म्हणतात असं करू, तसं करू. प्रकाशन आपल्याला भव्यदिव्य करता येईल.’
म्हणून आम्ही त्या प्रकल्पात लक्ष घालायला सुरुवात केली. पण नंतर लक्षात आलं की, या एवढय़ा मोठय़ा जागेचं आम्हाला काहीही करणं शक्य नाही. प्रकाशन कितीही वाढवलं तरी पाच हजार स्क्वेअर फूट जागेचं करणार काय? माझ्या डोक्यात आलं की, त्या जागेत पुण्यातलं चांगलं, भव्य ग्रंथालय सुरू करावं. त्यादृष्टीने मी पुण्यातली सगळी मोठी ग्रंथालये (गोखले इन्स्टिटय़ूट, विद्यापीठ, इ.) बघून आलो. पुस्तकाशी संबंधित असल्यामुळे मला ग्रंथालयांची आवड होतीच. पण जसजसं त्याचं अर्थशास्त्र बघायला गेलो तसतसं लक्षात आलं की, यासाठी कुणी बँक आपल्याला पैसे देऊ शकणार नाही. मग असा विचार मनात आला की, एवढी मोठी जागा आहे तर प्रेस सुरू करण्याचा विचार करायचा का? ‘माणूस’च्या ऑफिसजवळ सायकलवरून दोन-तीन मिनिटांच्या अंतरावर पुण्यातला त्यावेळचा मोठा संगम प्रेस होता. तिथे आम्ही ‘माणूस’ची छपाई करत होतो. त्याचं तोपर्यंत कोथरुडला स्थलांतर झालं होतं. त्यामुळे मला रोज सायकलवरून तिथे जावं-यावं लागत असे. खरं तर प्रेसमध्ये मला तेव्हा काही रस नव्हता. मुळात आम्हा दोघा भावांना ‘मशीन’ या प्रकाराची आतून एक दहशतच आहे. श्री. ग. म्हणाले की, ‘मला तू प्रेसच्या व्यवसायात लक्ष घालण्यासंबंधी विचारूसुद्धा नकोस. मला त्यात काहीही गम्य नाही.’ त्यांना त्यांचं क्षेत्र मिळालेलं होतं. त्यावेळेला वि. स. वाळिंबे आमच्या खूप निकट होते. ते म्हणाले, ‘तुम्ही विचार करा. परत एवढी जागा मिळणार नाही. तसाही संगम प्रेस दूर गेलेला आहे. ‘माणूस’चं स्वत:चं प्रकाशन असल्यामुळे कामासाठी तुम्हाला बाहेर जावं लागणार नाही. तुमच्या घरातलंच काम भरपूर आहे.’ अशा सगळ्या विचारांतून ती जागा आम्ही घेतली. म्हणजे नाल आहे म्हणून घोडा घेतला.
..आणि मी प्रेसच्या व्यवसायात पडलो.. अगदी मनाविरुद्ध पडलो. पुढे जवळपास तीस वर्षे माझ्या इच्छेविरुद्ध प्रेसचा व्यवसाय मी केला. पण मी तिथे कधीही रमलो नाही. खोटं वाटेल, पण एकाही मशीनला मी कधी बोटसुद्धा लावलेलं नाही. त्यामुळे सुरुवातीच्या काळात व्यवसायात ज्या काही चुका व्हायच्या असतात, त्या सगळ्या माझ्याकडून झाल्या. आज इतक्या वर्षांच्या अनुभवानंतर वाटतं की, जोपर्यंत तुमचं मन त्या व्यवसायात गुंतत नाही, तोपर्यंत व्यवसायाचा मूळ गाभा तुमच्या हाताशी लागत नाही.
७२-७३ पर्यंत ‘माणूस’ची घोडदौड जोरात सुरू होती. त्यावेळी प्रेस आर्थिक अडचणीत होता. त्यामुळे प्रेसचा सगळा आर्थिक ताण ‘माणूस’वर पडला. ७३ नंतर अशी परिस्थिती आली की, ‘माणूस’ही अडचणीत आला. ७३ ते ७७ हा चार वर्षांचा काळ आमच्या दृष्टीने सगळ्यात अवघड काळ होता. कारण या दोन्ही संस्था अडचणीत होत्या. त्याला मोठय़ा प्रमाणावर मी जबाबदार होतो असं मला वाटतं. कारण मी जे करत असे, ठरवत असे, त्यावर पूर्ण विश्वास ठेवून श्री. ग. ते करायला परवानगी देत. तो त्यांचा सर्वात मोठा गुण. त्यांचा माझ्या कर्तबगारीवर माझ्या स्वत:पेक्षा अधिक विश्वास होता. त्यामुळे ज्या काही चुका झाल्या, त्या माझ्याच होत्या असं आजही मला वाटतं. मी त्यावेळी त्यांना काही वेगळे पर्याय सुचवले असते तर तसं करून बघायला त्यांनी मला ‘नाही’ म्हटलं नसतं. पण तसं होऊ शकलं नाही, हे मात्र खरं.
७७ नंतर मात्र मी प्रेसकडे जास्त लक्ष द्यायला सुरुवात केली. पुढे वर्षभरात मी तो सुरळीत मार्गी लावला. या काळात राजहंसचा व्याप कमी होता. बाबासाहेबांची पुस्तकं आणि ‘माणूस’मधील लेखमालांची पुस्तकं एवढीच प्रकाशनं होती. पुढे बाबासाहेबांचा मुलगा अठरा वर्षांचा झाला. त्यानं प्रकाशन व्यवसायात यायचं ठरवलं. त्यामुळे साहजिकच बाबासाहेब आपली पुस्तकं घेऊन बाहेर पडले. हळूहळू प्रेसच्या कामात माझा कोंडमारा होत होता म्हणून मी प्रकाशनामध्ये लक्ष द्यायला सुरुवात केली. त्यापूर्वी मी राजहंसच्या पुस्तकनिर्मितीचं काम बघतच होतो. त्यामुळे मला तो अनुभव होता. ८२ साली ‘नाझी भस्मासुराचा उदयास्त’ या ‘माणूस’मधल्या गाजलेल्या लेखमालेची पाचवी आवृत्ती नव्याने प्रकाशित करायचं ठरलं तेव्हा मी श्री. गं.ना म्हणालो, ‘हे पुस्तक मी जरा वेगळ्या पद्धतीनं करतो.’ मी त्याचा आकार बदलून, त्याची जरा वेगळ्या पद्धतीने मांडणी करून ते प्रकाशित केलं. त्याआधीची मोठी घटना म्हणजे ‘आंबेडकर भारत’! ती घटना १९८१ ची.
मुंबईत मला योगायोगानं बाबूराव बागूल भेटले. मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयाखाली एक हॉटेल होतं, तिथं आम्ही गप्पा मारत बसलो. तेव्हा मी त्यांना सहज बोलता बोलता विचारलं, ‘नवीन पुस्तकासाठी काही विषय तुमच्या डोळ्यासमोर आहे का?’ ते म्हणाले, ‘आंबेडकरांचं गोष्टीरूप चरित्र लिहायचं मनात आहे.’ बाबूराव बागुलांसारखा लेखक, डॉ. आंबेडकरांसारखा विषय, त्यात कथारूप.. मला विषय आवडून गेला. त्याचवर्षी डॉ. आंबेडकरांच्या धर्मातराला आणि निधनाला २५ र्वष पूर्ण होत होती. त्यानिमित्ताने नागपूरला दीक्षाभूमीवर ६ डिसेंबरला सहा-सात लाख लोक येणार होते. यानिमित्तानं हा प्रकल्प करावा असं बागुलांनी सुचवलं. मलाही ते पटलं. संध्याकाळी डेक्कननं पुण्याला निघालो. या कल्पनेनं पुरता भारावून गेलो होतो. अनेक धाडसी योजना डोक्यात पिंगा घालू लागल्या होत्या. मी विचार केला की, आपल्याला प्रकाशनात काहीतरी करायचंच आहे, तेव्हा आपण ही पहिलीच गोष्ट मोठय़ा प्रमाणावर करू. रात्री पुण्यात उतरल्याबरोबर मी भारावल्या अवस्थेत श्री. गं.च्या घरी गेलो. त्यांनासुद्धा ही कल्पना अतिशय आवडली. सुरुवातीला आम्ही एक हजार प्रती काढायच्या ठरवल्या.
बाबूराव बागूल वेळेच्या बाबतीत फार काटेकोर नव्हते. एकेक कथा द्यायचे. ‘पुढच्या दोन दिवसांत देतो, तुम्ही कंपोज सुरू करा,’ असं म्हणायचे. तोपर्यंत माझ्या डोक्यात तीन हजार प्रती काढायच्या असं यायला लागलं. तेही त्या काळाच्या मानानं जास्त होतं. कारण तेव्हा सर्वसाधारणपणे एका पुस्तकाच्या हजारच प्रती काढल्या जात. याचदरम्यान कर्मधर्मसंयोगाने मी केव्हातरी पॉप्युलर प्रकाशनाच्या रामदास भटकळांकडे गेलो होतो. ‘आपल्याला हा विषय सुचलाय आणि हे भयंकर काही ग्रेट आहे. आपण प्रकाशन क्षेत्रात जणू क्रांतीच करणार आहोत..’ या कल्पनेने मी भारावून गेलो होतो. मी ते रामदासशी बोललो. तो म्हणाला, ‘आम्ही बाबासाहेब आंबेडकरांवर फोटो अल्बम करतोय.’ मी म्हणालो, ‘फारच चांगलं. तुमचं आणि आमचं पुस्तक आपण एकाच वेळी प्रकाशित करू.’ पुढचा एक-दीड महिना माझी पुणे-मुंबई धावपळ असायची. मी आधी बागुलांकडे जायचो, कथा घ्यायचो. मग रामदासकडे जायचो. त्याचं काम पाहायचो. रामदासला ‘तुम्ही करताय ते कितीतरी मोलाचं आहे. नेहमीच्या प्रमाणे विचार करू नका. तिथे पाच-सहा लाख लोक एकत्र जमणार आहेत. परत आपल्याला अशी संधी मिळणार नाही,’ असं सांगायचो. हळूहळू रामदासच्याही पायांनी जमीन सोडायला सुरुवात केली. एरवी त्यांनी एक हजार प्रती काढल्या असत्या, त्या त्यांनीही वाढवल्या. पुढे पुढे मी श्री. गं.नासुद्धा या कल्पनेत खेचलं. बागुलांच्या काही कथांचं लिखाण व्हायचं होतं आणि प्रूफंही वाचायची होती. तारीख जवळ येत चालली होती. तिकडे रामदासचा फोटो अल्बम अगदी युद्धपातळीवर चाललेला. इकडे आमचं पुस्तक चाललेलं. श्री. ग. आणि बागूल एकत्र बसून प्रूफं वाचायचे. इकडं माझं छपाईचं काम चाललेलं. जसजसे दिवस जवळ येत चालले, तसतशा वर्तमानपत्रांतून नागपूरच्या प्रस्तावित समारंभाच्या मोठमोठय़ा बातम्या येऊ लागल्या. तेव्हा मी विचार केला की, पाच हजार का, दहा हजार प्रती काढू. ऐनवेळी कमी पडायला नकोत. त्याच वेळेला महाराष्ट्र सरकारच्या वतीने ‘लोकराज्य’चा ‘डॉ. आंबेडकर विशेषांक’ही प्रसिद्ध होणार असल्याच्या जाहिराती येत होत्या. म्हणजे तो अंक जोरात.. पॉप्युलर जोरात.. आम्ही जोरात. शेवटी वेळेची लढाई सुरू झाली. तेव्हा श्री. ग. मला म्हणाले, ‘तू हे सगळं करतोयस. दहा हजार प्रती काढायचं तू म्हणतोयस. तुला खात्री वाटतेय ना?’ मी म्हटलं, ‘मला वाटतंय, याही कमी पडतील. तू काळजीच करू नकोस.’ ते म्हणाले, ‘तुझी इतकी धावपळ चालली आहे. रेल्वेने इतकी पुस्तकं वेळेत पोहोचणं शक्य नाही. आपण टेम्पो करू. मी तयार झालेली पुस्तकं घेऊन पुढे जातो.’ आमच्या तीनच हजार प्रती तयार झाल्या होत्या. श्री. गं.ना मी म्हणालो, ‘तेवढय़ा घेऊन तुम्ही पुढे व्हा. तोपर्यंत माझ्या आणखी दोन-तीन हजार प्रती तयार होतील.’ बाबूराव बागूल आणि श्री. ग. टेम्पोने पुढे गेले. अक्षरश: दिवसरात्र काम चाललं होतं. श्री. ग. तिकडे पोचले, कार्यक्रम सुरू झाला की पहिल्या तासाभरातच आमच्या स्टॉलवर वाचकांच्या उडय़ा पडणार.. आणि एकूण मागणीचा अंदाज घेऊन श्री. ग. मला फोन करणार.. असं ठरलं होतं. मी त्यांच्या फोनची वाटच पाहत होतो. ठरल्याप्रमाणे त्यांचा फोन आला. मी म्हणालो, ‘कसं काय?’ तर ते म्हणाले, ‘चांगला आहे तसा प्रतिसाद. पण तू आता आणखी पुस्तकं पाठवायची घाई करू नकोस. तुला मी आल्यावर सांगतो काय करायचं ते.’ असं जेव्हा ते म्हणाले, तेव्हाच माझ्या लक्षात आलं की, काहीतरी गडबड झालेली आहे. मी त्यांचाच भाऊ असल्यामुळे मला त्यांच्या आवाजातला चढउतार कळत होता. ते ऐकून टायरमधली हवा जावी तसं माझं झालं. दोन दिवसांनी श्री. ग. परतले. जिथं दहा हजार प्रती कमी पडतील असं मला वाटतं होतं तिथं ‘आंबेडकर भारत’च्या मोजून १२५ प्रतीच गेल्या होत्या. माझा अंदाज साफ चुकला होता.
मला अजूनही वाटतं की, जिथं मी मनानं खऱ्या अर्थानं गुंतलो होतो अशा काही प्रकल्पांना अपेक्षित असं यश मिळालं नाही. त्यापैकी ‘आंबेडकर भारत’ हे एक. बाबूराव बागुलांच्या लेखनाची गुणवत्ता विचारात घेता ‘आंबेडकर भारत’सारखं चांगलं पुस्तक वाचकांनी स्वीकारलं नाही याचं मला काहीसं आश्चर्यच वाटतं. वाटतं की, मी हे पुस्तक योग्य प्रकारे वाचकांपर्यंत पोहोचविण्यात कुठेतरी कमी पडलो. माझ्या स्वभावाचा एक भाग असा आहे की, एखाद्या ठिकाणी मला अपयश आलं की मी झटकन् त्यातून बाजूला होतो. मी इतका बाहेर पडतो, की मनातून मी त्याचे जवळपास सगळे धागेदोरे तोडलेले असतात. दुसऱ्या एखाद्या व्यावसायिक प्रकाशकानं काही ना काही प्रयत्न करून पुढच्या काळात ‘आंबेडकर भारत’ वाचकांपर्यंत नेटानं नेलं असतं. पण मला तो इतका मोठा धक्का होता, की त्यानंतर मी त्या पुस्तकाकडे बिलकूल बघितलंही नाही. यात मी बाबूराव बागुलांवर अन्याय केला असं आजही मला वाटतं. बाबूराव बागुलांच्या मनाचा मोठेपणा असा की, त्यांनी पुढे कधीही मला एका शब्दानंसुद्धा या प्रसंगाची आठवण करून दिली नाही. पुढे पंचवीस वर्षांनंतर- बहुधा बाबूरावांच्या पंचाहत्तरीनिमित्त मी त्यांना एक पत्र पाठवलं. त्यांच्याबद्दलच्या आपुलकीच्या ओलाव्यानं भिजलेल्या त्या पत्रात मी ‘आंबेडकर भारत’बद्दलची माझ्या मनातली खंत व्यक्त केली आणि बाबूरावांना एक सुरेख सदिच्छा भेट दिली.
अशीच गोष्ट ‘विद्यार्थी दैनंदिनी’ची! मी आणि दत्तप्रसाद दाभोळकरांनी खरोखरच दृष्ट लागावी इतकी उत्तम विद्यार्थी दैनंदिनी तयार केली होती. कल्पना सुचल्यावर झोकून देऊन काम करणं हा अनुभव मी आणि दाभोळकरांनी त्यावेळी घेतलेला आहे. जयंत साळगावकरांचा आणि माझा तेव्हा परिचय नव्हता. पण त्यांनी आमची ‘विद्यार्थी दैनंदिनी’ कुठेतरी बघितली. ती पाहून ते म्हणाले, ‘या मुलांनी फारच चांगली दैनंदिनी केलेली आहे.’ इतक्या कल्पकतेनं अन् परिश्रमानं तयार केलेल्या त्या दैनंदिनीला प्रत्यक्षात विद्यार्थ्यांचा मात्र म्हणावा तितका प्रतिसाद मिळाला नाही.
८९ साली पं. जवाहरलाल नेहरूंची जन्मशताब्दी देशभर मोठय़ा प्रमाणावर साजरी झाली. त्यानिमित्ताने मी ‘नेहरू डायरी’ प्रकाशित केली. निर्मितीच्या बाबतीत ही डायरी अतिशय देखणी, वैशिष्टय़पूर्ण आणि वेगळेपणाचा ठसा उमटविणारी होती. वृत्तपत्रांतून या डायरीचं भरभरून कौतुकही झालं. पण या डायरीसंदर्भात प्रादेशिक राजकारण्यांच्या लॉबिंगपायी सरकारदरबारी अनंत अडचणी उभ्या राहिल्या, डायरीची पूर्ण कोंडी झाली आणि हा प्रकल्प आमच्या डोक्यावर कर्जाचा मोठा डोंगर ठेवून गेला. या डायरीच्या अपयशाचा आघात इतका खचवणारा होता, की आजही मी ती डायरी मोकळेपणाने बघू शकत नाही. नकोच वाटतं. व्यावसायिकतेच्या दृष्टीनं खरं तर हे बरोबर नाही. पण माझ्या या वागण्यात कुठेतरी माझ्या स्वभावाची चमत्कारिक गाठ असणार.
असे धक्के खाणं ‘पानिपत’पर्यंत सुरूच होतं. ९० सालानंतर मी संपूर्णपणे प्रकाशन बघायला सुरुवात केली. ९२ पासून मला पुस्तकांचे चांगले विषय मिळायला लागले. ‘इंदिरा गांधी’ (मूळ लेखिका : पुपुल जयकर, अनुवाद : अशोक जैन) या पुस्तकानं राजहंस प्रकाशनाला चैतन्य आणलं. हे पुस्तक विलक्षण लोकप्रिय झालं. तसंच यश ‘एक होता काव्र्हर’च्या डिलक्स आवृत्तीलाही लाभलं. त्यानंतर ‘सृष्टिविज्ञान गाथा’ आलं. डॉ. श्रीराम गीत यांचं लेखन आणि जयंत नारळीकरांचं संपादन. मराठी माणसाच्या मनात डॉ. नारळीकरांबद्दल एक वेगळंच आदराचं स्थान कोरलं गेलेलं आहे. या प्रकल्पाला कल्पनेबाहेर यश मिळालं. ‘पानिपत’नं राजहंसची कोंडी फोडली आणि नंतरच्या ‘सृष्टिविज्ञान गाथा’, ‘झाडाझडती’, ‘महानायक’, ‘शुभमंगल’, ‘५७ ते ४७’पासून अलीकडच्या ‘अर्थात’, ‘किमयागार’, ‘चंद्रलोक’, ‘मला उत्तर हवंय’ अशा अनेक पुस्तकांनी या वाटचालीला वेग दिला.

तत्पूर्वी ९१ साली प्रकृतिअस्वास्थ्यामुळे श्री. ग. प्रकाशन व्यवसायातून निवृत्त झाले आणि प्रेस अन् प्रकाशन हे दोन्ही व्यवसाय माझ्याकडे आले. त्यावेळी मी मनाशी एक निर्णय घेतला. प्रेस चालवणं ही माझी
गरज असणार आहे आणि प्रकाशन करणं ही माझी आवड असणार आहे. या दोन गोष्टींची आपण गल्लत करता कामा नये. राजहंस प्रकाशनाची गरज म्हणून प्रेस चालवणं असा दुय्यम दर्जा प्रेसला न देता तो एक स्वतंत्र व्यवसाय म्हणून चालवायला हवा. त्याप्रमाणे मी ९२ सालापासून राजहंसचं एकही पुस्तक माझ्या प्रेसमध्ये छापलं नाही. प्रेस फक्त कमर्शिअल कामं करत राहिला. माझ्या मुद्रणाचा दर्जा अत्यंत वरचा असल्याने मला चांगली कामे मिळत गेली. मात्र, प्रकाशनाची सर्व छपाई मी बाहेरून करून घ्यायला सुरुवात केली. हा माझ्या दृष्टीनं टर्निग पॉइंट ठरला. त्यामुळे दोन्ही विभाग स्वतंत्रपणे कार्यरत राहिले. ही स्थिती २००० सालापर्यंत सुरू राहिली. या सुमारास मुद्रण व्यवसायात फार मोठे तांत्रिक बदल होत गेले. आधुनिक मुद्रणयंत्रं पुण्यात मोठय़ा संख्येनं येऊ लागली. मी बाहेरच्या परिस्थितीचा अंदाज घेत होतोच. एका क्षणी मला जाणवलं की, आज माझा प्रेस सुस्थितीत आहे, कामं भरपूर येत आहेत; पण मी जर नव्या काळाशी जोडून घेण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञान आत्मसात केलं नाही तर दोन-चार वर्षांच्या काळात बाहेरच्या स्पर्धेत माझा टिकाव लागणार नाही. आता माझ्यापुढे दोन पर्याय होते. एक- प्रेसचं आधुनिकीकरण.. म्हणजे प्रेसमध्ये अधिक अडकत जाणं. दुसरा- या चक्रात न अडकता प्रेसमधून पाय मोकळा करून घेणं आणि माझ्या आवडीच्या प्रकाशन व्यवसायावरच लक्ष केंद्रित करणं. मी विचारपूर्वक दुसरा पर्याय स्वीकारला.

९२ नंतर आधीच्या अपयशाची भरपाई म्हणून असेल कदाचित; पण मला चांगली पुस्तकं, चांगले विषय आणि लेखक मिळत गेले. ९२ नंतरच्या माझ्या या वाटचालीत ‘माणूस’मधला माझा उमेदवारीचा काळ फार महत्त्वाचा ठरला असं मला वाटतं. आपल्याला कोणत्या विषयात काम करायचंय आणि कोणते लेखक नक्की काही वेगळं देणार आहेत, याची पुरेशी चाचणी मला ‘माणूस’मध्ये करता आली होती. तिथे माझा दर आठवडय़ाला वाचकांच्या नाडीवर हात असायचा. त्यातून मला अंदाज यायला लागला, की कोणते विषय वाचकांना आवडतात. लेखक, त्याचं लेखन, तो काय देऊ शकेल, तो आता कोणत्या मन:स्थितीत आहे, त्याचबरोबर वाचकांच्या मन:स्थितीचाही एका बाजूने कायम अंदाज घेत राहणं.. या सगळ्याचं चिंतन माझ्या मनात सतत चाललेलंच असतं. सामाजिक, राजकीय अन् सांस्कृतिक भोवतालाचा वेध माझे कान अन् डोळे सतत घेत असतात.
प्रकाशन व्यवसायाची आर्थिक घडी सुस्थिरपणे बसवणं ही कोणत्याही अन्य व्यवसायाप्रमाणे प्रकाशन व्यवसायाचीही गरज होती. पण त्याचवेळी माझ्या मनाशी मी हेही पक्कं ठरवलं की, काही विषय, काही पुस्तकं, काही विचार हे मला आर्थिक गणितापलीकडे जाऊन एका निश्चयानं, एका हट्टानं माझ्या वाचकांपर्यंत पोहोचवायला हवेत. राजहंसनं दिलीप कुलकर्णीची पर्यावरणावरची पुस्तकं प्रकाशित केली, ती याच भावनेतून. डॉ. नरेंद्र दाभोलकरांचा अंधश्रद्धा निर्मूलनाचा विचार अन् विवेकवादाचा जागर वाचकांपर्यंत पोहोचवला, तोही याच निर्धारातून. विज्ञानाला लोकाभिमुख बनविण्यासाठी अनेक विज्ञानविषयक पुस्तकं प्रसिद्ध केली, तीही या हट्टातून. नवे विषय, नवे विचार वाचकांपर्यंत पोहोचवण्यासाठी राजहंसनं अनेक प्रयोग केले. त्यातले काही सफल ठरले. पण सगळेच काही यशस्वी झाले असं नाही.
‘रोश विरुद्ध अॅडॅम्स’ नावाचं एक पुस्तक राजहंसनं प्रकाशित केलं. या पुस्तकाची थोडीशी पाश्र्वभूमी अशी- मी एका मित्राकडे गेलो होतो. त्याच्या टेबलावर वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनचा अंक पडला होता. मी तो सहज चाळला. त्यात र्अध पान स्टॅन्ले अॅडॅम्सचा फोटो आणि एक अगदी छोटी बात
मी होती. स्टॅन्ले अॅडॅम्स हा रोश नावाच्या जगप्रसिद्ध औषध कंपनीत वरिष्ठ अधिकारी होता. त्यानं रोश कंपनी करत असलेल्या आर्थिक घोटाळ्यांविरुद्ध युरोपियन युनियनकडे तक्रार नोंदवली. प्रदीर्घ काळ चाललेल्या या कायदेशीर लढाईचा निकाल त्या बातमीमध्ये प्रसिद्ध झाला होता. रोशनं काही लाख पौंडांची नुकसानभरपाई स्टॅन्ले अॅडॅम्सला दिली होती. त्या बातमीत पुढं असंही नमूद केलेलं होतं की, अॅडॅम्सनं या घटनेवर लिहिलेलं पुस्तक भारतात सहजी उपलब्ध नाही. माझे मित्र डॉ. विश्वास राणे डब्ल्यूएचओशी संबंधित होते. मी डॉ. राणेंना ते पुस्तक मिळवायला सांगितलं. पंधरा-वीस दिवसांत ते माझ्या हातात आलं. ते वाचल्यावर माझ्या लक्षात आलं- हे अप्रतिमच पुस्तक आहे. ते आपण प्रकाशित करायला हवं. त्याचा अनुवाद डॉ. सदानंद बोरसे यांनी केला. सुभाष अवचटांनी त्याचं अप्रतिम मुखपृष्ठ केलं. मला वाटलं, या पुस्तकाला वाचकांचा चांगला प्रतिसाद मिळेल. पण ते बिलकूल खपलं नाही. जे काही खपलं, ते पुलंच्या पुण्याईनं. पुल आणि सुनीताबाईंना ते खूप आवडलं होतं. मला वाटतं, बहुराष्ट्रीय कंपन्यांनी केलेल्या आर्थिक पिळवणुकीच्या घटना मोठय़ा प्रमाणावर तेव्हा सामान्य लोकांपर्यंत पोहोचत नव्हत्या. त्यादृष्टीनं हे पुस्तक काळाच्या थोडं आधीच आलं. मला कधी कधी असंही वाटतं की, या पुस्तकाचं शीर्षक चुकलं का? मूळ पुस्तकाचं नाव- ‘रोश व्हर्सेस अॅडॅम्स’ असं आहे. मराठीत वाचकांना ‘रोश’ म्हणजे काय, ‘अॅडॅम्स’ म्हणजे कोण, हे कळलंच नाही की काय?

आमची काही पुस्तकं नावांमुळेही फसली आहेत. उदाहरणार्थ- संतोष गोंधळेकरांचं एक पुस्तक आम्ही प्रकाशित केलं होतं- ‘झोपले अजून माळ’! ही बाबा आमटेंच्या कवितेची एक ओळ आहे. महाराष्ट्रातील पाण्याचा प्रश्न आणि त्यावरचे उपाय याविषयीचं हे सुरेख पुस्तक आहे. पण त्याचं आम्ही काव्यात्मक नाव ठेवलं. वाचकांना ते कवितासंग्रहाचं नाव वाटलं असावं. या पुस्तकाला मिळालेल्या थंडय़ा प्रतिसादात त्याच्या नावाचा लक्षणीय वाटा असेल का?
पुढे राजहंसनं ग. ना. सप्रे यांचं वर्क एथिक्सवरील ‘कामाची किमया’ हे अतिशय सुंदर पुस्तक काढलं. वसंत सरवटे यांनी त्यातली चित्रं काढली आहेत. हे पुस्तक कामगारांच्या कार्यशैलीवर मूलभूत परिणाम करू शकेल असं आहे. हे पुस्तक त्याच्या नावामुळे अनेकांना सेक्सवरचंच वाटलं. जळगावचे जैन आणि पुण्यातले किलरेस्कर या दोन कंपन्यांतील वरिष्ठांनी ते वाचलं. त्यांना असं वाटलं की, हे पुस्तक आपण कामगारांना दहा रुपयांत दिलं तर त्यांच्या दृष्टिकोनात काही प्रमाणात फरक पडेल. त्याच्या त्यांनी हजार- हजार प्रती घेतल्या. पण नुसतंच पुस्तक एकगठ्ठा जाणं यात काही लेखक आणि प्रकाशकाला आनंद नसतो. पुस्तकं ‘टॉक ऑफ द टाऊन’ व्हायला पाहिजे, त्याच्याबद्दल चर्चा घडायला हवी. ती त्याच्या वाचकप्रियतेची खूण असते.
‘तांडव’ ही महाबळेश्वर सैल यांची कादंबरी राजहंसनं अलीकडच्या काळात प्रकाशित केली. विषय, आशय व मांडणीच्या अंगानं मराठीतील ती एक लक्षणीय कादंबरी आहे असं माझं ठाम मत आहे. जाणकारांनी, समीक्षकांनी या कादंबरीचं भरभरून कौतुक केलं. तिला पुरस्कार मिळाले. पण तरीही सर्वसामान्य वाचकांपर्यंत ही कादंबरी पुरेशी पोहोचली आहे असं मला वाटत नाही. ही कादंबरी वाचकाच्या हाती सोपवताना कादंबरीच्या पहिल्याच पानावर काही मान्यवरांच्या प्रतिक्रिया मुद्रित केलेल्या होत्या. ‘ललितकृतीबाबत अशा रीतीनं चौकटीत बांधलेली कलाकृती वाचकांना नकोशी वाटली असेल का?’ ही शंका या कादंबरीबाबत मला अजूनही सतावते.
कृष्णमेध कुंटेचं ‘एका रानवेडय़ाची शोधयात्रा’! २५ वर्षांचा हा तरुण लेखक. मला तो भेटायला आला असताना त्याच्या बोलण्यातलं एक वाक्य मला पुस्तक प्रकाशित करायला प्रवृत्त करून गेलं. ते असं- ‘मी रानात ऋतू भोगण्यासाठी गेलो होतो.’ या एका वाक्यावरून मला असं वाटलं की, या माणसाकडे ‘मटेरिअल’ आहे. मी त्याला म्हणालो, ‘नऊ वर्षांनी तुम्ही माझ्याकडे येताय. तुम्ही इतके दिवस हे हस्तलिखित नुसतंच बासनात तुमच्याकडे का ठेवलं होतं?’ तो म्हणाला, ‘मी रानात राहण्याचा आनंद उपभोगला. तो वाचकांना आज मिळाला काय अन् पाच वर्षांनी मिळाला काय, मला काय फरक पडतो?’ इतका तात्त्विक विचार जो करू शकतो त्याचं लेखन नक्कीच उजवं असणार, हे संहिता न वाचताच मला कळलं.
एकदा जेवणानंतर स. ह. देशपांडे यांच्याशी बोलत बसलो होतो. पुलंच्या भाषाशैलीचा विषय निघाला. स. ह. म्हणाले, ‘अनेकदा पुलं भाषणात किंवा लेखनात ५७-५७ शब्दांचं वाक्य व्याकरणदृष्टय़ा अतिशय बरोबर पेलतात. पुलंच्या भाषाशैलीकडे यादृष्टीने कुणी पाहिलेलं नाही.’ या त्यांच्या एका उद्गारावरून मला ट्रिगर मिळाला. पुलंचं आपण अमाप कौतुक करतो; पण पुलंच्या भाषेचे हेसुद्धा पैलू आहेत, याकडे अभ्यासकांनी नीट बघितलेलं नाही. या अंगानं पुलंची भाषाशैली अभ्यासावी, पुलंचं व्यक्तिमत्त्व अनेक अंगांनी कसं होतं याचा शोध घ्यावा असं वाटून गेलं. त्यातून मग स. ह. देशपांडे आणि मंगला गोडबोले यांनी ‘अमृतसिद्धी’ हा ग्रंथ साकार केला. एका विचारातून ‘अमृतसिद्धी’ची ही निर्मिती झाली.
मी ८२-८३ पासूनच ठरवलं होतं की, आपण प्रकाशित केलेलं पुस्तक केवळ ग्रंथालयांसाठी वा जिल्हा परिषदांच्या गुदामासाठी असणार नाही. ते वाचकांसाठी असणार आहे. ते वाचकांसाठी असेल तर त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचे जे जे मार्ग असतील, ते ते आपण विचारात घ्यावेत, त्यादृष्टीने प्रयत्न करावेत. सुरुवातीच्या काळात महाराष्ट्रात बऱ्याच ठिकाणी, विशेषत: कोकण भागात शाळा-प्रतिनिधी नेमून त्यांच्यामार्फत पुस्तकं विकण्याचा राजहंसनं प्रयत्न केला. ८३-८४ मध्ये जेव्हा माझं नक्की ठरलं की, आपण प्रकाशनाचंच काम करणार आहोत- तेव्हा राजहंसच्या प्रकाशित पुस्तकांची संख्या फार तर साठ-सत्तरच्या घरात होती. एवढय़ा पुस्तकांच्या जोरावर विक्री यंत्रणा बांधता येणार नव्हती. कारण त्यावरचा विक्रीखर्च परवडत नव्हता. म्हणून सुरुवातीला पाच र्वष आम्ही इतर प्रकाशन संस्थांची पुस्तकं विक्रीला घेतली आणि ती पुस्तकं प्रदर्शनांद्वारे लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला. प्रदर्शन करतानासुद्धा त्यामागचा विचार मी बारकाईने केला होता. मराठीत पुस्तकांची विक्री होत नाही, मराठी वाचकाला पुस्तकं विकत घ्यायची सवय नाही.. ही माझ्या लहानपणापासून चालू असलेली तक्रार तेव्हाही होती. आपण वाचकाकडे त्याच्या सोयीच्या दृष्टीने जाऊन पोहोचलो, त्याच्या दारात पोचलो; तर तो पुस्तकं घेतो की नाही?
आपण असं मानू की, पुस्तक ही गरजेची गोष्ट नाही; औषध मात्र गरजेचं आहे. ते मिळालं नाही तर पेशंटच्या प्रकृतीला नक्की धोका होऊ शकतो. तरीसुद्धा औषध कंपन्या किती कल्पकतेने आपली औषधं विकतात! सात-आठ वर्षांपूर्वी एका औषध कंपनीने खोकल्याची गोळी काढली. त्या कंपनीने पुण्यातल्या सर्व मेडिकल स्टोअर्सना सांगितलं की, ‘तुम्ही तुमच्या काऊंटरवरच्या माणसाला खोकल्याचं औषध कोणतं आहे, असं गिऱ्हाईकांनी विचारल्यावर आधी आमच्या कंपनीचं नाव घ्यायला सांगा, मग बाकीची नावं सांगा. हे तपासायला आमची माणसं केव्हाही अचानक येतील आणि जर त्यानं आमच्या कंपनीचं नाव प्रथम घेतलं, तर त्याला तिथल्या तिथे पाचशे रुपये देतील. विक्रीसाठीची कल्पकता किती आगळी असू शकते, याचं उदाहरण म्हणून हे सांगता येईल. अशी कल्पकता आम्ही प्रकाशकांनी वापरली तर आम्हालाही त्याचे परिणाम दिसू शकतात. जीवनावश्यक औषधसुद्धा जर या पद्धतीने विकावं लागत असेल, तर पुस्तक विकण्यासाठी तुम्ही किती प्रयत्न करायला हवेत!
प्रकाशन व्यवसायातला अवघड भाग पुस्तकं लोकांपर्यंत पोहोचवणं हा असेल; तर यात आपण काम करायला हवं असं मी ठरवलं. हे करताना एकेक गोष्टी माझ्या लक्षात येऊ लागल्या. ९० पर्यंत अशी परिस्थिती होती की, पुण्यातला प्रकाशन व्यवसाय हा दोन-चार पेठांपुरताच मर्यादित होता. मुख्यत: अप्पा बळवंत चौकाभोवती. पुण्यापुरता विचार करायचा झाला तर बहुसंख्य नोकरवर्ग हा शिवाजीनगर ते तळेगाव यादरम्यानच्या कारखान्यांत काम करणारा किंवा नोकरीनिमित्ताने वेगवेगळ्या ठिकाणी जाणारा. सकाळी नऊला घर सोडलं की संध्याकाळी सहा-साडेसहाला घरी येणारा. त्यानंतर सगळी कामं बाजूला टाकून अप्पा बळवंत चौकात जाणं आणि हवं असलेलं पुस्तक घेणं, हे किती जणांना शक्य असतं? अशावेळी सहज हाताशी आलेल्या गोष्टींवरच तो वाचनाची गरज भागवून घेणार. आणि आठवडय़ातल्या सुट्टीच्या दिवशी वेळ मिळेल तेव्हाच दुकानात जाऊन पुस्तकं खरेदी करणार. यातून सीमारेषेवरचा वाचकवर्ग गळण्याची शक्यताच जास्त असते. हे लक्षात घेऊन मी असा विचार केला की, यातला बहुसंख्य वर्ग जातो कुठे, तर कारखान्यात! म्हणून मग आम्ही पुण्या-मुंबईच्या कारखान्यांतून तिथल्या व्यवस्थापकांना भेटून वेगळी विक्री यंत्रणेची माणसं उभी केली. ही माणसंही अशी घेतली, की जी कारखान्यातल्या व्यवस्थापनवर्गाकडे जाऊ शकतील, उत्तम इंग्रजी-मराठी बोलू शकतील. टेल्को, बजाजसारखे कारखाने दिवाळीच्या निमित्ताने पादत्राणे, इलेक्ट्रॉनिक वस्तू यांची प्रदर्शने लावायचे. कामगारांना या वस्तू घेताना रोख पैसे द्यायला लागू नयेत म्हणून त्यांच्या पगारातून हप्त्यांनी कापून घ्यायचे. अशा काही खरेदी योजना काही कारखान्यांतून सुरू झालेल्या होत्या. त्यावेळी माझी अशी कल्पना होती की, कामाची वेळ संपल्यावर जर दहा कामगार पादत्राणे किंवा इलेक्ट्रॉनिक वस्तू बघायला येणार असतील, तर ते पुस्तकंसुद्धा बघतील. इतिहासकार शेजवलकर म्हणायचे की, ‘उधारीवर दिला तर मराठी माणूस हत्तीसुद्धा घरी घेऊन जाईल.’ हे सूत्र कुठेतरी माझ्या डोक्यात होतं. मग मी कारखान्यांमधून प्रदर्शनं लावायला सुरुवात केली. त्याला मोठय़ा प्रमाणावर प्रतिसाद मिळाला. सुरुवातीला राजहंसची पुस्तकं अर्थातच कमी होती, अन्य प्रकाशकांची पुस्तकं अधिक होती. तिथं माझ्या असं लक्षात आलं की, आपण वाचकाची सोय बघून पुस्तकं जर त्याच्या दारात नेली, तर त्यातून काही ना काही विक्रीचा मार्ग निघू शकेल.
८२ ते ९० च्या काळात मी राजहंसची प्रकाशनं एका बाजूनं वाढवत गेलो. ९१ ला माझ्या असं लक्षात आलं की, राजहंसची दोन-अडीचशे पुस्तकं झाली आहेत. आता मला फक्त राजहंसच्या पुस्तकांच्या आधारे स्वतंत्र प्रदर्शन करणं शक्य आहे. मग मी इतरांची वितरण व्यवस्था बंद केली आणि फक्त राजहंसची प्रदर्शनं लावायला सुरुवात केली. हे करत असतानाच मी दुसऱ्या बाजूनं हाही विचार करत होतो की, कमकुवत का असेना, पण त्या- त्या गावात पुस्तक दुकानदारांची जी वितरण व्यवस्था उभी आहे, ती अधिक सशक्त कशी बनवावी, आणि माझा नवीन उपक्रम त्याला पूरक ठरेल अशा प्रकारे कसा करावा! त्यादृष्टीनं मी छोटय़ा गावांतल्या पुस्तक दुकानदारांचा वेगळा विचार सुरू केला. संगमनेर असेल, नगर असेल.. इथं वाचकवर्ग का नाही? कमी असेल, पण आहे. नगरच्या दोन दुकानदारांचं उदाहरण सांगतो. मी त्यांचं रेकॉर्ड पाहिल्यावर माझ्या लक्षात आलं की, जानेवारीत त्याच्या नावावर पाचशे रुपयांची पुस्तकखरेदी आहे. पुढे वर्षभरात त्यांची काही खरेदीच नाही. का नाही? ऑफिसकडून नेहमीचं उत्तर मिळालं की, त्यांचे मागचे पैसेच आलेले नाहीत. का आले नसतील? आपण सरसकट म्हणतो की, त्यांना ते बुडवायचेच आहेत. हे मला कधीच बरोबर वाटलेलं नाही. जो दुकानदार दहा वर्षांपेक्षा जास्त काळ व्यवसाय करतो, तो सातत्याने पैसे बुडवून व्यवसाय करू शकत नाही. जो दर दोन-तीन वर्षांनी व्यवसाय बदलतो, त्याच्या बाबतीत तुम्ही हे विधान करू शकता. जिल्हा किंवा तालुका पातळीवरील छोटय़ा दुकानदारांची नेमकी अडचण कुठे असते? राजहंसच्या नव्या पुस्तकाची जाहिरात आली की तो पाच प्रती मागवतो. पुढे त्याच्या लक्षात येतं की, पाच प्रती आपण घेतल्या आहेत खऱ्या; पण दोनच प्रती गेल्या आहेत. त्यामुळे राजहंसला त्याला पैसे पाठवता येत नाहीत. कारण त्याचे पैसे न खपलेल्या त्या तीन प्रतींमध्ये अडकलेले असतात. मग तो राजहंसला काही उत्तर देत नाही. राजहंसकडून फोन आला तरी तो घेत नाही.. टोलवाटोलवी करत राहतो. तो पैसे देत नाही म्हणून मग आम्ही पुढची पुस्तकं त्याला पाठवत नाही. तुम्ही त्याच्याकडे दोन-तीन हेलपाटे मारता. इतक्या लांब हेही करणं खरं तर परवडत नाही. शिवाय त्यावेळी तो दुकानदार जागेवर असेल-नसेल, ते वेगळंच. अशाने त्याच्याकडे नवीन पुस्तकं येत नाहीत, म्हणून त्याचा व्यवसाय चालत नाही. परंतु म्हणून ‘त्याला पैसे बुडवायचे आहेत..’ असा शिक्का त्याच्यावर मारणे योग्य नाही. दहातले दोन बुडवतातही. पण हे फक्त प्रकाशन व्यवसायातच चालतं असं नाही; तर जगातल्या सगळ्या व्यवसायांत चालतं. म्हणून काही तुम्ही त्या व्यवसायावर फुली मारत नाही ना? ..तर माझ्या बाजूने अशा पाच-पाच प्रती पाच ठिकाणी गेलेल्या असतात. त्यातल्या एकाही ठिकाणचे पैसे आलेले नसतात. म्हणजे गोडाऊन बदलण्यापलीकडे काही झालेलं नसतं. त्यावर मी असा मार्ग काढला की, ‘बाबा रे, आता सहा महिने झाले. माझा माणूस तिकडे येणं शक्य नाही. तुझे पैसे न खपलेल्या पुस्तकांत अडकलेत म्हणून तू पैसे देत नाहीयेस ना? मग तू त्या प्रती तरी मला परत कर. मी तुला पुस्तक बदलून देतो. जे खपणारं पुस्तकं आहे, ते तू घे.’ म्हणजे त्याचे पैसे मोकळे झाले. एवीतेवी माझ्या तीन प्रती त्याच्या गोडाऊनमध्ये पडल्या होत्या, त्या निदान माझ्या गोडाऊनला तरी पडतील. अशा तऱ्हेनं मी या छोटय़ा दुकानदारांचा विचार करत गेलो. त्यांच्या अडचणी, समस्या जाणून घेऊन त्यांना विचारात आणि विश्वासात घेतलं.
या सगळ्याचा उपयोग मला ‘पानिपत’च्या वेळी झाला. ‘पानिपत’नं कोंडी फोडली. कोंडी फोडली म्हणजे नेमकं काय केलं? ८८ पर्यंतच्या काळात पुस्तक प्रदर्शनं, विक्री यंत्रणा यांतून राजहंसचं नाव वाचकांपर्यंत पोहोचायला लागलं होतं. वाचकांच्या ध्यानी यायला लागलं की, राजहंसची पुस्तकं चांगली आहेत. आपण त्याकडे लक्ष ठेवलं पाहिजे. मी ‘पानिपत’च्या वेळेला सर्व दुकानदारांना आवाहन केलं की, ‘ही मोठी कादंबरी आहे. तिच्यासाठी एक खास योजना आहे. तुम्ही त्यात सहभागी व्हा.’ जो विक्रेता ‘पानिपत’च्या जास्तीत जास्त प्रतींची नोंदणी करेल त्याला जाहीर समारंभात बक्षीस द्यायचं ठरवलं. विक्रीच्या दृष्टीनं आम्ही महाराष्ट्राचे एकंदर नऊ विभाग केले. आणि प्रत्येक विभागासाठी स्वतंत्र पुरस्कार ठेवले. दुकानदार या योजनेत मोठय़ा प्रमाणावर सहभागी झाले. कारण त्यांना वाटलं की, आपल्याला यात जास्त कमिशन मिळणार आहे आणि विक्री अधिक केली तर वर जाहीर सन्मानही होणार आहे. राजहंसचा हा उपक्रम लक्षणीय ठरला. यातून महाराष्ट्रातल्या विक्रेत्यांशी आमचं जिव्हाळ्याचं नातं तयार झालं. आजही ते कायम आहे.
पुढे मी असा विचार केला की, प्रदर्शनांतून ‘राजहंस’ किती वाचकांपर्यंत आणि किती काळ पोहोचणार? माझ्याकडे काही कायमची मोबाइल टीम नाही. वितरण यंत्रणा सशक्त नसल्यानं तुम्ही थेट वाचकांनाच जेव्हा अपील करता तेव्हा सुरुवातीला तुम्हाला फायदा झाल्यासारखा वाटतो. पण तो अल्पकालीन असतो. वेगळं उदाहरण द्यायचं झालं तर- इंदिरा गांधींनी जेव्हा काँग्रेसची यंत्रणा बाजूला करून ‘गरिबी हटाव’चा नारा दिला आणि थेट लोकांशी संधान बांधलं, त्यावेळेला त्या- त्या भागातली काँग्रेसची यंत्रणा दुर्बळ होऊ लागली. पक्षबांधणी ही जशी ग्रासरूटपासून व्हायला पाहिजे तसंच वितरण यंत्रणा बांधतानाही ग्रासरूटवरचा दुकानदार विचारात घेतला पाहिजे. त्याच्या अडचणी नेमक्या काय आहेत, त्याचे पैसे नेमके कुठे अडकतात, हे ध्यानात घेतलं पाहिजे. पुस्तक निवडताना जर तुमचा अंदाज चुकत असेल, तर ते विकत घेताना दुकानदाराचाही अंदाज चुकू शकतो आणि तो अडचणीत येऊ शकतो, हे प्रकाशक म्हणून आपण विचारात घ्यायला हवं.
वाचकांपर्यंत परिणामकारक रीतीनं पोहोचणं हे राजहंस प्रकाशनाचं नेहमीच महत्त्वाचं उद्दिष्ट राहिलं आहे. एका बाजूला जिल्हा-तालुका पातळीवरील छोटय़ा-मोठय़ा दुकानदारांची सशक्त वितरण यंत्रणा बांधणं आणि काही मोठय़ा प्रकल्पांसाठी जोडीला थेट वाचकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करणं- अशा दोन्ही प्रकारे हे उद्दिष्ट साधण्याचं धोरण राजहंसनं आजवर राबवलं आहे. वरकरणी परस्परविरोधी वाटणाऱ्या या दोन गोष्टी प्रत्यक्षात मात्र एकमेकांना पूरक ठरतात असा आमचा अनुभव सांगतो. थेट वाचकांपर्यंत पोहोचण्याच्या अशा काही अभिनव योजना राजहंसनं ‘सृष्टिविज्ञान गाथा’, ‘आकाशाशी जडले नाते’, ‘अमृतसिद्धी’, ‘५७ ते ४७’ अशा ग्रंथांबाबत यशस्वीपणे राबविल्या. दोन ठळक उदाहरणांचा उल्लेख करतो. ‘सृष्टिविज्ञान गाथा’साठी आम्ही महाराष्ट्रात एक मोहीम राबवली. स्वतंत्र विक्री प्रतिनिधी नेमले. त्यांच्यासाठी व्यवस्थापन तज्ज्ञांची व्याख्यानं आयोजित केली. गाथेतील विषय, वैशिष्टय़ं, तिचं स्वरूप अशा सगळ्या तपशिलांची त्यांना नीट माहिती देण्यात आली. वाचकांशी संपर्क साधताना त्यांनी कोणती वेळ पाळावी, कोणाकडे केव्हा जावं, कोणत्या व्यक्तीशी काय आणि कसं बोलावं, कमीत कमी वेळात ग्रंथाबद्दलची उपयुक्तता कशी सादर करावी, अशा विविध गोष्टींचं प्रशिक्षण या प्रतिनिधींना देण्यात आलं. या कामासाठी डॉ. श्रीराम गीत, रवींद्र देसाई, अनिल कुलकर्णी यांचं मोठं योगदान राजहंसला मिळालं. याचाच आणखी एक भाग म्हणून टेलिफोन कॅम्पेनही आम्ही राबवली.
‘५७ ते ४७’ या वि. स. वाळिंबे यांच्या ग्रंथासाठीही अशीच एक मोहीम राबवली गेली. त्यात आधीच्या सगळ्या बाबींच्या जोडीला आणखी एक अभिनव योजना आम्ही अमलात आणली. त्या विषयाचं स्वरूप आणि महत्त्व लक्षात घेऊन या अभिनव योजनेत आम्ही शाळा आणि देवळांचा समावेश केला. शाळांमधून विद्यार्थ्यांसाठी व्याख्यानमाला, तर देवळांतून प्रवचनं आयोजित केली. दोन्हीमधून ‘५७ ते ४७’ या ग्रंथामधले विविध विषय मांडले जात होते.
१९९० ते २००० या दहा वषार्र्त राजहंसला वितरण व्यवस्थेत जे यश मिळालं, ते अशा अथक प्रयत्नांतूनच.
काही वेळा आयुष्य अचानक अपघाती वळण घेतं आणि ध्यानीमनी नसलेली गोष्ट प्रत्यक्षात होते. माझी धाकटी बहीण अलका गोडे ही राजहंस प्रकाशनाचं काम करू लागली ती अशा अपघाती घटनेतूनच. अलकाची मुलगी एका अपघातात गेली. त्या आघातातून सावरण्याचा अलका प्रयत्न करत होती. सहज बोलता बोलता मी तिला सुचवलं, ‘राजहंसचं मुंबईतलं काम तू सांभाळशील का? हवं तर तू एक-दोन मैत्रिणींना सोबत घे आणि राजहंसची पुस्तकं विकायला सुरुवात कर.’ त्यावेळी मुंबईत विनायक पणशीकर राजहंसचं काम बघत होते. अलकानं त्यांच्याबरोबर काम सुरू केलं. सुरुवातीला अलका मैत्रिणींना सोबत घेऊन घरोघर जाऊन पुस्तक विक्री करू लागली.
अशी रीतीनं घरी जाऊन विक्री करणाऱ्या व्यक्तीला येणारे अनुभव निराशाजनक असतात. दहा घरी हिंडलं तर पाच ठिकाणी मुळात दारच उघडलं जात नाही, दोन ठिकाणी ‘नको’ म्हणून सांगतात, किंवा ‘संध्याकाळी मिस्टर भेटतील, तेव्हा या..’ अशा सबबी ऐकाव्या लागतात. अशा वेळी कोरडी आश्वासनं घेऊन बाहेर पडावं लागतं. असे धक्के लागोपाठ बसले की दुसऱ्या दिवशी कामाला बाहेर पडूच नये अशीच भावना होते. स्वत: मेडिकल रिप्रेझेंटेटिव्हचं काम करत असताना मी हे सगळं सोसलेलं होतं. एवढी वणवण करूनही पुस्तकं खपली नाही तर.. तर विक्रेत्याचं कमिशनही अडकून पडतं. या सगळ्या ताण आणणाऱ्या गोष्टींवर मी माझ्या परीनं एक तोडगा काढला होता. विक्री प्रतिनिधीवर होणारा खर्च हा जाहिरातखर्च धरावा, या विचारानं मी या प्रतिनिधींना काही पगार आणि त्यांचा खर्च देऊ लागलो. मग त्यांचं पुस्तक खपो किंवा न खपो.
दुसर धोरणं : एका वेळी दोघांना पाठवायचं. त्याचा फायदा असा की, समजा, नकार मिळाला तर त्याबद्दलची निराशा त्या एकटय़ाला न येता ती दोघांत विभागली जाते. बाहेर पडल्यावर कुठल्यातरी अन्य विषयावर बोलून ते त्या निराशेला वाट करून देऊ शकतात आणि पुन्हा नव्या उत्साहानं पुढच्या घरी जातात. दोन लोकांच्या चार टीम परवडत नाही ना, मग दोन लोकांच्या तीन टीम करा. पण त्या टीमना वेगवेगळ्या भागांत न पाठवता एकाच भागात पाठवा. त्या टीमने तो भाग पूर्ण विंचरून काढावा. त्यांनी शक्य तेवढय़ा लोकांशी संपर्क साधून त्यांची नावं, पत्ते इत्यादी तपशील आणावेत. त्यांना कोणत्या पुस्तकांत रस आहे/ नाही याची नोंद करावी. अशा पद्धतीनं सुरुवातीच्या काळात आम्ही कामाची आखणी केली.
अशा पद्धतीने बहिणीने चार मैत्रिणी गोळा करून वर्ष- दीड वर्ष डोअर टू डोअर जाऊन पुस्तक विक्री केली. पहिल्या दोन-चार महिन्यांत काही हजारात आमची उलाढाल झाली. हळूहळू त्यात बहीण रमली. पणशीकर रमले. त्यांना आत्मविश्वास आला की, नवनव्या कल्पना लढवल्या तर काहीतरी मार्ग निघतो. ८४-८५ ला त्यांनी हे काम चालू केलं. पहिली पाच र्वष उमेदवारीची होती. तेव्हा बाबासाहेबांच्या शिवचरित्राचं वितरण आमच्याकडे होतं. त्याची नोंदणी करायला लोक ऑफिसमध्ये यायला लागले. हे करेपर्यंत ‘पानिपत’ बाजारात आलं. तेव्हा त्याला मुंबईत चांगला प्रतिसाद मिळाला.
काहीसं अचानक मिळालेलं हे मुंबई वळण राजहंसच्या वाटचालीत इतकं महत्त्वाचं ठरलं, की याच ब्लू प्रिंटच्या आधारे महाराष्ट्रातील इतर प्रमुख ठिकाणी याच धर्तीवर काम करण्याचा विचार सुरू झाला. सुदैवानं राजहंसनं सुरू केलेल्या विविध केंद्रांची जबाबदारी अत्यंत समर्थपणे सांभाळणारे प्रतिनिधी राजहंसला लाभत गेले. नागपूर केंद्रात नरेश सब्जीवाले, औरंगाबाद येथे श्यामराव देशपांडे, तर नाशिक येथे पंकज क्षेमकल्याणी राजहंसची वितरण व्यवस्था अत्यंत परिणामकारकरीत्या राबवीत आहेत.

राजहंस प्रकाशनाची मुहूर्तमेढ रोवली १९५२ मध्ये शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी. १९५७ मध्ये ‘माणूस’कार श्री. ग. माजगावकर बाबासाहेबांना येऊन मिळाले. आज ही संस्था हीरकमहोत्सवाचा टप्पा पार करत आहे. साठ वर्षांच्या या वाटचालीत राजहंसनं अनेक चढउतार अनुभवले.. खाचखळगे पार केले. प्रतिभावान साहित्यिकांबरोबरचे सृजनशील निर्मितीचे क्षण अनुभवले. अनघड लेखकांच्या दुर्दम्य, उत्स्फूर्त स्रोतांचे सामथ्र्य पाहिले. अतीव समाधान देणाऱ्या क्षणांचीही गळाभेट घेतली. राहून गेलेल्या किंवा शक्य न झालेल्या अपूर्तीचीही स्मृती ठेवली. या साठ वर्षांच्या प्रवासाकडे आज मागे वळून बघताना पुढच्या दिशेचाही थोडा वेध घ्यायचा प्रयत्न करावासा वाटतो.
वैचारिक क्षेत्रात अजूनही राजहंसचं काम म्हणावं तेवढं झालेलं नाही. जे केलं गेलं आहे, ते मोलाचंच आहे. तरीही आजच्या काळाचे विचारवंत हुडकून त्यांच्याकडे जाणं मला गरजेचं वाटतं. उदा. राजीव साने, विनय हर्डीकर, सुहास पळशीकर, शेषराव मोरे, सदानंद मोरे या मंडळींकडून भरीव वैचारिक योगदान होऊ शकेल. आज जो गुंतागुंतीचा काळ आहे त्याच्याकडे बघावं कसं, याचे वेगवेगळे पदर उलगडून दाखवणाऱ्या लेखकांचं लेखन राजहंसकडून येऊ शकलं तर मला ते हवं आहे. उदा. हिंदू, मुस्लीम, ख्रिश्चन, जैन आणि बौद्ध या धर्मावर आपली भारतीय व्यवस्था उभी आहे. या धर्माविषयी काही चिकित्सात्मक काम करता येतंय का, याचा एका बाजूनं आमचा विचार चालू आहे.
नवा तरुणवर्ग ज्ञानेश्वरी, तुकारामाची गाथा मुळातून संपूर्णपणे वाचेलच असं नाही; पण या ग्रंथांचा आशय त्याच्यापर्यंत त्याला आवडेल अशा मार्गाने पोहोचवला तर त्याला नक्कीच जाणून घ्यायला आवडेल. आजची तरुणाई कितीही टेक्नोसॅव्ही झालेली असली तरी त्यातही एक वर्ग निश्चितपणे असा आहे, की ज्याला या वैचारिक गोष्टी जाणून घेण्याची उत्सुकता आहे. त्यांना हे देण्यात कमी पडत असू, तर ते आम्ही प्रकाशकच कमी पडत आहोत. आम्ही अशी समजूत करून घेतली आहे की, आजच्या वाचकांना वैचारिक काही नकोच आहे, त्यांना सगळं हलकंफुलकं तेवढंच हवं आहे. समाजातल्या किती लोकांना हे वैचारिक वाङ्मय हवं आहे? आपण गृहीत धरू की, पाच टक्के लोकांना ते हवं आहे. यापूर्वीच्या शंभर वर्षांतल्या देशविदेशातल्या प्रकाशन व्यवसायावर जर तुम्ही एक नजर टाकली, तर तुमच्या लक्षात येईल की, वैचारिक लेखन वाचणारा वर्ग सर्वत्र कमीच असतो. इंग्रजीत तो संख्येने मोठा वाटतो, कारण तो अनेक खंडांत पसरलेला आहे. आपला मराठी वर्ग एका प्रांतापुरता आहे, म्हणून आपल्याला तो कमी वाटतो. म्हणून काही तो दुर्लक्षून चालणार नाही. या पाच टक्के लोकांचा प्रभाव पुढे वीस-पंचवीस टक्के लोकांवर पडत असतो, हे विसरून चालणार नाही. विचारवंत कमी असतात, पण त्यांचा प्रभावाचा परीघ मोठा असतो. त्यामुळे वैचारिक लेखनाकडे आपल्याकडून दुर्लक्ष होता कामा नये.
प्रकाशकांच्या बाजूने पाहता मला असं वाटतं की, येणाऱ्या काळाची जशी आव्हानं मोठय़ा प्रमाणावर आहेत, तशाच संधीसुद्धा मोठय़ा प्रमाणात आहेत. पूर्वी विषय मर्यादित होते. मधल्या काळात विषयांची कोंडी मोठय़ा प्रमाणावर फुटली आहे. जीवनशैली, व्यक्तिमत्त्व विकास, आरोग्य, व्यायाम अशा सगळ्या विषयांवर आता वाचकांना पुस्तकं हवी आहेत. हळूहळू आपल्याकडेही स्पेशलायझेशन सुरू झालेलं आहे. आताच्या काळात दोन-दोन वर्षांनी वाचकांची पिढी बदलतेय. शिवाय तिला इलेक्ट्रॉनिक माध्यमातून अनेक नव्या गोष्टी मिळत आहेत. इलेक्ट्रॉनिक माध्यमं पुढचा काही काळ तरी वरवरचीच राहणार. वाचकांची विविध विषयांची भूक चाळवण्याचं काम ही माध्यमं करतील. त्यातून अधिक सखोल, वैचारिक मांडणी करून कोणते विषय वाचकांपुढे सादर करायचे, याचा विचार प्रकाशकांना करावा लागेल. पुढचा काळ हा राजकारण, समाजकारण, अर्थकारण, व्यापार या विषयांवरील पुस्तकांची मागणी असणारा काळ असेल असं वाटतं. म्हणूनच या काळाची आव्हानं स्वीकारणं हे एका अर्थानं प्रकाशकांना सोयीचंही ठरेल. कारण माहितीचे विविध स्रोत उपलब्ध होत राहणार आहेत. या नव्या काळात प्रकाशन व्यवसायाला काहीही धोकाबिका आहे असं मला वाटत नाही. उलट, अतिशय चांगला काळ आहे हा. कमीत कमी पुढची वीस-पंचवीस र्वषे प्रिंट माध्यमातली पुस्तकं आणि इलेक्ट्रॉनिक माध्यमातली पुस्तकं ही समांतर प्रवास करतील असं वाटतं. आणि काही काळ तरी प्रिंट मीडिया पुढे असेल. दहाएक वर्षांनी कदाचित ती बरोबर राहू शकतील. त्यामुळे त्याची भीती बाळगायचं कारण नाही. ा
शब्दांकन- राम जगताप

गेल्या पन्नास वर्षांत आपल्या वैशिष्टय़पूर्ण चित्रशैलीने मराठी साहित्याच्या प्रांगणात आपली सशक्त नाममुद्रा उमटविणाऱ्या दोन चित्रकारांच्या सृजनप्रक्रियेचा घेतलेला धांडोळा..

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 5, 2014 5:58 am

Web Title: rajhans prakashan
Next Stories
1 व्यंगचित्रांकित साहित्यसंभार
2 कर्तृत्वापल्याडचं अथांग आभाळ
3 सत्यजित राय आणि प्रेमचंद !
Just Now!
X