06 July 2020

News Flash

मिठालाही इतिहास आहे!

मीठ ही सर्वसामान्य, सर्वत्र आढळणारी आणि सहजप्राप्य वस्तू. परंतु मानवी संस्कृतीच्या प्रारंभापासून ते आत्ता आत्ता अगदी शंभर वर्षांपूर्वीपर्यंत मिठाच्या शोधासाठी, त्याच्यावरील मालकी हक्कासाठी देशोदेशी...

| December 16, 2014 01:05 am

dwi64मीठ ही सर्वसामान्य, सर्वत्र आढळणारी आणि सहजप्राप्य वस्तू. परंतु मानवी संस्कृतीच्या प्रारंभापासून ते आत्ता आत्ता अगदी शंभर वर्षांपूर्वीपर्यंत मिठाच्या शोधासाठी, त्याच्यावरील मालकी हक्कासाठी देशोदेशी झालेले शर्थीचे प्रयत्न पाहिले की मानवी इतिहासातील मिठाचे स्थान आणि त्याचे महत्त्व लक्षात येते. या मिठापायी अनेक शोधमोहिमा निघाल्या.. लढाया झाल्या. शास्त्यांनी जबरे कर लादून आपल्या तिजोऱ्या भरल्या. राज्यक्रांत्या झाल्या. राजवटी बदलल्या. अगदी आज वर्तमानात मध्यपूर्वेतील तेलावरून जे राजकारण आणि अर्थकारण घडतंय, तेच इतिहासात मिठापायी घडत होतं. ‘मीठ राखील तो राज्य राखील!’ अशी परिस्थिती होती.

मार्क कुर्लान्स्की (Mark Kurlansky) यांचे ‘Salt : A World History’ पुस्तक वाचत असताना मला सातत्याने गिरीश कुबेरांची तेलाविषयीची पुस्तके आठवत होती. कारण ‘सॉल्ट’ वाचत असताना लक्षात येत गेले की, तेलाप्रमाणेच मिठालाही इतिहास आहे, भूगोल आहे. त्याच्यामागे अर्थकारण आणि राजकारण आहे.
मीठ ही सर्वसामान्य, सर्वत्र आढळणारी आणि सहजप्राप्य वस्तू. पण मानवी संस्कृतीच्या प्रारंभापासून ते आता अगदी शंभर वर्षांपूर्वीपर्यंत मिठाच्या शोधासाठी, त्याच्यावरील मालकी हक्कासाठी झालेले प्रयत्न पाहिले की मानवी इतिहासातील मिठाचे स्थान, त्याचे महत्त्व लक्षात येते.
या मिठापायी अनेक शोधमोहिमा निघाल्या.. लढाया झाल्या.. शास्त्यांनी जबरे कर लादून तिजोऱ्या भरल्या.. राज्यक्रांत्या झाल्या.. राजवटी बदलल्या.. अगदी आता वर्तमानात तेलासाठी घडतंय तेच इतिहासात मिठापायी घडत होतं. ‘मीठ राखील तो राज्य राखील!’ अशी परिस्थिती होती.
एकूणच जगभरच्या प्राचीन संस्कृतीत मिठाला आणि मीठ-व्यवहाराला अनन्यसाधारण महत्त्व होते. त्यामुळे ते अनेक ठिकाणच्या धार्मिक विधींत समाविष्ट केलं गेलं. जादूटोण्यासाठी वापरलं गेलं. प्रतिष्ठेची, श्रीमंतीची बाब होऊन बसलं.
महाकवी होमरने तर मिठाला ‘डिव्हाइन सब्स्टन्स’ म्हणून गौरवलं. ‘सॉल्ट’ वाचल्यानंतर अनेकांशी चर्चा
करताना जाणवलं की, ‘मिठालाही एक इतिहास आहे..’ हे फारसं कुणाला ठाऊक नाही. म्हणूनच ‘सॉल्ट : अ dwi65वर्ल्ड हिस्ट्री’ या पुस्तकातील ठळक घटनांचा हा आढावा.. वाचलेल्या मिठाला जागण्यासाठी सारांशरूपाने.
माणूस शेती करू लागला. धनधान्य पिकवू लागला. त्याच्या खाण्यात भाज्या, पाळलेल्या जनावराचे मांस येऊ लागले आणि त्याची मिठाची गरज वाढत गेली. मिठाचा पुरेसा साठा जवळ असणं महत्त्वाचं ठरलं. मीठ माणसाच्या आयुष्याची गरज होती, तशीच ती तो पाळू लागलेल्या जनावरांच्या पोषणासाठीचीही होती. त्यामुळे मीठ हे जगभरातील व्यापारामधले प्रमुख जिन्नस ठरले. मीठ तयार करणं हा जगभरातला पहिला उद्योग ठरला आणि सत्ताधाऱ्यांना आपली सत्ता केंद्रित करण्याच्या दृष्टीने मक्तेदारीसाठीचं पहिलं साधनही ठरलं. मीठउत्पादन करणं आणि त्याचं वहन करणं हे तोवरचं सर्वात मोठं सार्वजनिक काम ठरलं. मीठ हे भूगर्भशास्त्र आणि रसायनशास्त्र क्षेत्रांतही अग्रक्रमावर राहिलं.
आधुनिक भूगर्भशास्त्राने सिद्ध करेपर्यंत- म्हणजे अगदी विसाव्या शतकापर्यंत मीठ हे पृथ्वीवर सर्वत्र आहे, हे माहीत नव्हतं. त्यामुळे त्याचा शोध मोठय़ा प्रमाणावर घेतला गेला. त्याचा व्यापार झाला.. प्रचंड साठे होत राहिले. त्या साठय़ाची मालकी मिळविण्यासाठी लढाया झाल्या. त्या काळात युद्धनिधी उभे राहाा ते मिठावर कर लादून. मिठाच्या महसुलातून सैनिकांचे पगार दिले जात, तेही मीठरूपाने.
हे सर्व आज बालिशपणाचे वाटू शकते. सतराव्या शतकात फ्रान्सच्या मिठावर अवलंबून राहावे लागण्यात ब्रिटिश राज्यकर्त्यांना जो धोका वाटे, तसेच समकालीन पुढाऱ्यांना परदेशी तेलावर अवलंबून राहणे धोक्याचे
वाटते. खरं तर ही तुलना विनोदी वाटण्याचीही शक्यता आहे.. पण ती वस्तुस्थिती होती. कारण लोकांना जे मोलाचं वाटतं, त्यालाच बाजारात खरं मूल्य असतं.
चीन
चीनमध्ये अतिप्राचीन काळापासून मीठउत्पादन होत आले आहे. इ. स. पूर्व सहाव्या शतकातील मीठ तयार करणारी क्षेत्रं तिथे आढळली आहेत. यनचेंग हे तिथल्या वाळवंटी भागातलं खाऱ्या पाण्याचं सरोवर. त्याचं पाणी सूर्याच्या उष्णतेनं आटलं की त्या पाण्यावर मिठाचा जाड थर जमे. ते मीठ गोळा केलं जाई. हे सरोवर प्रसिद्ध आहे ते त्यावरच्या मिठावर ताबा मिळविण्यासाठी झालेल्या लढायांसाठी! त्या काळात- म्हणजे प्राचीन चीनमध्ये छोटी छोटी राज्यं होती. त्यांच्यात आपापसात नेहमी लढाया होत असत. त्या लढायांमागे ‘मीठ’ हे एक महत्त्वाचं कारण असे.
इ. स. पूर्व २५० मध्ये चीनमधल्या शू प्रांताचा (आजच्या सिच्वान प्रांताचा) नायक ली बिंग हा जलविद्याविशारद म्हणून आजही गौरवला जातो. चीनमधलं पहिलं धरण सिच्वानमध्ये यानंच बांधलं. या धरणामुळे चीनचा पूर्व प्रदेश हिरवागार झाला. धनधान्याने समृद्ध झाला. विशेष म्हणजे आजही ते धरण अस्तित्वात असून कार्यक्षम आहे. या सिच्वानमध्ये इ. स. पूर्व ३००० पासून मीठ तयार केलं जातं. ली बिंगने त्या खाऱ्या पाण्याचा मूलस्रोत शोधला.. भूगर्भातून त्याचा झिरपा वर खेचला आणि त्यातून मीठ मिळवलं. जगातली ही पहिली मीठ-विहीर!
एकमेकांशी सतत लढत असणारी छोटी छोटी राज्यं ली बिंगनेच एकत्र आणली. त्यांच्यातल्या लढाया थांबविल्या. लढाया थांबल्या तरी सरकारचे स्वरूप आणि अधिकार यावर चर्चा व वादविवाद बराच काळ चालू होते. त्यात महत्त्वाचा मुद्दा ‘मीठ’ हाच होता.
गेली अनेक शतके चिनी सरकारे राज्याचा महसुलाचा महत्त्वाचा घटक म्हणून मिठाकडे पाहत आली होती. चिनी भाषेत मिठासाठी तयार झालेल्या ‘यान’ या चित्राक्षरात सरकारी अधिकाऱ्याचे सूचन आहे. मीठ-उत्पादकावरचे सरकारी नियंत्रण ते दर्शविते.
मानवी जीवनात जगण्यासाठी अत्यंत गरजेची असणारी
 वस्तू प्रत्येकालाच विकत घेणं भाग पडत असतं. त्यामुळे शास्त्यांच्या दृष्टीनं करआकारणीसाठी आणि dwi66करप्राप्तीसाठी ती उपयुक्त ठरते. कर लावण्यासाठी मिठासारखी नितांत गरजेची वस्तू महत्त्वाची ठरली. आणि त्यातून नफेखोरीलाही सुरुवात झाली.
इ. स. पूर्व ६८५ ते ६४३ या काळात चीनमध्ये एक नवीन विचारप्रणाली उदयाला आली. लीगॅलिझम (Legalism). राजकीय तत्त्वज्ञान सांगणारी एक विचारधारा. कठोर कायदे निर्माण करायचे आणि त्यांचे काटेकोरपणे पालन करून राज्य चालवायचे. या धोरणानुसार चिनी शास्त्यांनी मिठाच्या खरेदीच्या किमतीपेक्षा त्याच्या विक्रीची किंमत बरीच जास्त ठेवावी. त्यातून नफा मिळवावा, असे ‘लीगॅलिझम’वाले सांगत होते. आपल्या राज्याचा आर्थिक पाया भक्कम करण्यासाठी त्यांना हे धोरण राबवणे आवश्यक वाटत होते.
इ. स. पूर्व २२० च्या सुमारास कीन (Qin) राजघराणे प्रबळ ठरून सत्तेवर आले. त्यांनी लीगॅलिझमचं धोरण अनुसरलं. मिठापासून अमाप महसूल मिळवला. त्यातून काही सार्वजनिक कामंही उभी केली. नव्यानं शोध लागलेलं लोखंड आणि मीठ यांच्या किमती मात्र सतत चढय़ा ठेवल्या. अत्यंत गरजेच्या या दोन वस्तूंवरची शासकीय नियंत्रित मक्तेदारी दर्शविणारं हे पहिलं ज्ञात उदाहरण. या महसुलातूनच चीनची सैन्यउभारणी झाली. परकीय हूण आक्रमकांच्या वारंवार होणाऱ्या हल्ल्यांपासून संरक्षण देणारी भिंत- ‘ग्रेट वॉल’ उभारली गेली. ‘टांग’ राजवटीच्या (इ. स. ६१८ ते ९०७) काळात तर चीनला अर्धाअधिक महसूल मिठापासूनच मिळत होता.
फार पूर्वीपासूनच चीनमध्ये ताटात वेगळं मीठ वाढलं जात नाही किंवा ते वरून पदार्थावर पेरलंही जात नाही. टांग राजवटीच्या काळात मात्र मिठाला फारच मोल आलं. ते श्रीमंतीच्या प्रदर्शनाचा भाग बनलं. जेवणाच्या टेबलवर भारी किमतीच्या खास भांडय़ातून ते ठेवलं जाऊ लागलं.
मिठावरच्या सरकारी मक्तेदारीला कंटाळून लोकांनी इ. स. ८८० मध्ये उठाव केला आणि क्शिआन शहर ताब्यात घेतलं असंही इतिहास सांगतो. इ. स. १०६६ साली चीनने मीठ वापरून बंदुकीत वापरण्याची दारू बनवली. मिठाचं असं पहिलं औद्योगिक उपयोजन त्याचं मोल वाढवणारंच होतं. हा शोधही म्हणे अमरत्वासाठी रसायन तयार करण्याच्या प्रयत्नात असलेल्या एका ताओ साधूला लागला.
इजिप्त
इजिप्तमध्ये फार प्राचीन काळापासून अन्नधान्य बुरशी- रोगापासून वाचविण्यासाठी तसेच मांस आणि मासे खारवून टिकविण्यासाठी मिठाचा मोठा वापर होत आलाय. या कामात इजिप्त अग्रणी मानला जातो.
dwi67नाईल नदीच्या मुखाजवळील तिकोनी प्रदेशात सागरी पाण्याचे सूर्याच्या उष्णतेने बाष्पीभवन करून मीठ तयार केले जाई. प्राचीन काळात इजिप्शियन लोक अन्नधान्य आणि कडधान्यांची निर्यात करण्यात अग्रणी होते. मीठ हे व्यापाराकरता वाहून नेण्यासाठी अवजड आणि कटकटीचेही होते. म्हणून मग अन्नधान्य व खाद्यपदार्थ टिकवण्यासाठी मिठाचा वापर करून मूल्यवर्धित करीत. त्यांचा खारवलेल्या पदार्थाचा हा व्यापार मध्यपूर्वेपर्यंत होत असे. या निर्यातीनं इजिप्तला अनेक शतकं आर्थिक मजबुती मिळवून दिली होती.
आजचा दक्षिण लिबिया म्हणजे प्राचीन फेझान प्रदेश. तिथून भूमध्य समुद्रापर्यंत इजिप्तचे व्यापारी संबंध होते. इ. स. पूर्व तिसऱ्या शतकात फेझान मीठ-उत्पादनासाठी प्रसिद्ध होते. त्याकाळी तीन फूट उंचीचे मिठाचे दंडगोलाकृती ठोकळे गवती चटईत गुंडाळून उंटावर लादून नेले जात. सहारा वाळवंट पार करून ते पोहोचवलं जाई. इ. स. पूर्व १००० मध्ये अशा तऱ्हेने मिठाचे वहन होत असल्याचे पुरावे सापडले आहेत. त्याकाळी ते बैल व उंट यांच्यावर लादून व्हायचं. पण ते कमी प्रमाणात होत असे. इसवी सनाच्या तिसऱ्या शतकात उंट वापरात आले आणि व्यापार वाढला. मध्ययुगात चाळीस हजार उंटांच्या तांडय़ाने टाऊडेनी ते टिंबक्टू असा ४३५ मैलांचा (एक महिन्याचा) प्रवास केल्याचा पुरावा मिळाला आहे. आजही सहारातून पश्चिम आणि मध्य आफ्रिकेत उंटावरूनच मीठवहन होते.
पुढे याच मार्गावरून गुलामांचा व्यापार होऊ लागला. अगदी मिठाच्या बदल्यातही गुलामांची देवाणघेवाण होत असे. अरब प्रवासी इब्न बतुताने आपल्या प्रवासमार्गातील (इ. स. १३५२) तगाझा शहराचे वर्णन लिहून ठेवले आहे. ही संपूर्ण नगरी मिठाने उभारलेली होती. तिथली एक उत्तम मशीदही मिठाने उभी केलेली होती असे तो लिहितो.
प्राचीन तगाझात २०० पौंड वजनाचे मिठाचे ठोकळे उंटाच्या दोन्ही बाजूला एकेक असे लादले जात. ते ५०० मैल दूरवरच्या टिंबक्टूला पाठवीत. पश्चिम आणि उत्तर आफ्रिका, सहारा इथून टिंबक्टूमध्ये आलेल्या मालांची अदलाबदल होई. या व्यापारातून मिळालेल्या धनाने तिथे भरभराट झाली. एक प्रगत सांस्कृतिक केंद्र तिथे उभे राहिले. तसेच शैक्षणिक केंद्रही निर्माण झाले. टिंबक्टूची ही सांस्कृतिक वाटचाल झाली ती मिठाच्या व्यापारातून! परंतु मीठ पाठविणाऱ्या तगाझाच्या लेखी ते होते केवळ बांधकामाचे साहित्य!
रोम
रोमन शास्ते हे चिनी शास्त्यांपेक्षा वेगळे होते. त्यांनी कधीच मिठाची मक्तेदारी केली नाही. पण गरज पडली तेव्हा मिठाच्या किमतीवर नियंत्रण मात्र ठेवलं. रोमन इतिहासात विशेष अधिकारप्राप्त उच्चभ्रू वर्ग आणि मतदानाचा हक्क नाकारला गेलेले सामान्यजन (Common) यांच्यात सतत लढा चाललेला दिसतो. सामान्य रोमनांना अधिकारापासून वंचित ठेवण्याचा किंवा त्यांना कमीत कमी अधिकार देण्याचा रोमन उच्चभ्रूंचा प्रयत्न असे. त्या झगडय़ातूनच पुढे ‘प्रत्येक माणसाला मिठावर हक्क मिळावा’ हा विचार मान्य झाला. सॉल्टचे ‘कॉमन सॉल्ट’ झाले, ते असे.
सामान्य माणसाला मीठ सहज उपलब्ध व्हावे म्हणून रोममध्ये वारंवार मिठाच्या किमतीला सबसिडी मिळत राहिली. ते सामान्यांच्या क्रयशक्तीत राखलं गेलं. आजही जनाधार मिळविण्यासाठी कोणतंही शासन करसवलतींचं प्रलोभन दाखवतं तसाच हेतू अशी सबसिडी देण्यामागे असे.
मार्क अँथनी आणि क्लिओपात्रा यांच्यावरील स्वारीकरता नौसेना पाठवून त्यांचा निर्णायक पराभव करण्याचा सम्राट ऑगस्टसचा इरादा होता. त्यासाठी जनमताचा भरभक्कम पाठिंबा मिळणे आवश्यक होते. ऑलिव्ह तेल आणि मीठ मुक्तपणे वाटून ऑगस्टसने तो पाठिंबा मिळवला.
याच रोमने इ. स. पूर्व २६४ ते १४६ या काळात चाललेल्या ‘प्युनिक’ युद्धात कार्थेज आणि फोनेशियन वसाहतींसकट भूमध्य समुद्रावर ताबा मिळविताना मिठाच्या किमती वाढवून युद्धनिधी उभा केला होता.
पुढे रोममध्ये ‘मीठ करआकारणी प्रणाली’ तयार झाली. त्यावेळी वेळोवेळी मिठाच्या किमती ठरवून देण्याचे dwi68काम राज्यकोषागाराच्या अधिकाऱ्याकडे असे. त्या अधिकाऱ्याला रं’्रल्लं३१ ही उपाधी प्राप्त झाली ती तेव्हापासून.
इटलीतील बहुतेक नगरं ही मिठागरांच्या परिसरात वसलेली आहेत. अगदी रोमसुद्धा टायबर नदीच्या मुखावरच्या मिठागरांच्या टेकडय़ांवरच वसले आहे. नदीच्या उत्तरेकडच्या तीरावरची मिठागरे इ. स. पूर्व ६४० च्या सुमारास एट्रस्कन (Etruscan) लोकांच्या ताब्यात होती. त्यांच्या मिठावर कशाला अवलंबून राहायचं, म्हणून रोमनांनी ऑस्ट्रिया नदीच्या खोऱ्यात मिठागरं सुरू केली. मोठय़ा रोमन राज्यमार्गापैकी पहिला राजमार्ग तयार झाला तो ‘Via Salaria’ (Salt Road). हे मीठ केवळ रोमलाच नव्हे, तर द्वीपकल्पात आतवर नेण्यासाठी हा मार्ग तयार केला गेला. रोमनांच्या ताब्यात असलेल्या इटालियन द्वीपकल्पातील भागात हे झालं. पण रोम वाढत गेलं आणि खुश्कीच्या मार्गानं दूरवर मीठ पाठवणं फार खर्चिक झालं. सामान्य लोकांना ते परवडावं ही रोमनांची धारणा होतीच; पण अधिक महत्त्वाची होती ती त्यांची महत्त्वाकांक्षा.. आपलं साम्राज्य विस्तारण्याची जिगीषा. त्यासाठी मोठे सैन्य हवे. त्याला पुरे पडेल एवढे मीठ हवे. मिठाची गरज वाढली. रोमन सैन्याला घोडय़ांकरिता, जनावरांकरताही मीठ हवं होतं. काही वेळा तर सैनिकांचे पगार मीठ देऊन भागवले जात. ‘सॅलरी’ या शब्दाचे मूळ इथे आहे. ‘वर्थ हिज सॉल्ट’, ‘अर्निग हिज सॉल्ट’ हे वाक्प्रचारही त्यातूनच निर्माण झालेत. मिठासाठीचा लॅटिन शब्द २ं’ हा फ्रेंच भाषेत solde (म्हणजे वेतन, मोबदला) झाला. soldier शब्दाचं मूळही इथे आहे.
तर, रोमनांना साम्राज्यविस्तारासाठी मीठ हवे होते. वाढत चाललेल्या साम्राज्याची गरज भागविण्यासाठी त्यांनी मीठ- उत्पादनात लक्ष घातले. आपल्या समुद्रकिनाऱ्यावर तसेच द्वीपकल्पातील खाऱ्या पाण्याच्या झऱ्यांकाठी मीठ-उत्पादन वाढविण्यावर त्यांनी भर दिला. एवढेच नव्हे तर एकेकाळी जिथे प्राचीन केल्ट लोकांची मिठागरे होती, त्या आताच्या हंगेरी, ऑस्ट्रिया, बव्हेरियापासून ते ब्रिटन, उत्तर आफ्रिका, सिसिली, स्पेन, पोर्तुगालपर्यंत सगळीकडची मिठागरे त्यांच्या ताब्यात आली.
पुढे रोमन साम्राज्याचा ऱ्हास झाला. भूमध्य समुद्राचा किनारा आणि त्यावरची मिठागरे पश्चिमेकडील देशांच्या ताब्यात आली.
रोमन लोक हिरव्या भाज्यांना मीठ लावून घेत. हिरव्या भाज्यांचा उग्रपणा कमी करण्यासाठी ते असे करत. सॅलड- salad या शब्दाचे मूळ इथे सापडते.
त्या काळात मीठ हे श्रीमंतीशी, सधनतेशी जोडलं गेलं होतं. सामान्यजन जेवणाच्या टेबलावर साध्या शिंपल्यातून मीठ ठेवत, तर उच्चभ्रू चांदीने मढविलेल्या पात्रातून!
आपला गुणधर्म न बदलणारे हे मीठ सच्चेपणाचं प्रतीक मानलं जाई. त्यामुळे करारमदारात त्याची उपस्थिती महत्त्वाची ठरे. अशा प्रसंगी टेबलावर मीठपात्र ठेवलेले असे. ते तसे तिथे ठेवलेले नसेल तर व्यवहार संशयास्पद व अविश्वासार्ह मानला जाई.
व्हेनिस ही इटालियन नगरी रोमन साम्राज्याचा भाग नव्हती. या व्हेनिसला खडतर स्पर्धा होती अॅड्रियाटिक समुद्रकिनाऱ्यावरच्या कोमाचिओची. हे ठिकाण व्हेनिसच्या ताब्यातील किओगिआपासून अगदी जवळ होते. बेनेडिक्टन धर्मगुरू- साधू तिथे मीठ-उत्पादन करीत. ९३२ साली तिथली मिठागरे व्हेनिसने उद्ध्वस्त केली dwi69आणि ही स्पर्धा संपवली. पण त्याचवेळी तिथे एक तिसरीच लवणशक्ती उदयास आली. ती अधिक शक्तिशाली होती.. सर्बिया. हा प्रदेश रावेन्नाच्या आर्चबिशपच्या अधिपत्याखाली होता. पण सर्बियापेक्षाही किओगिआचे मीठ- उत्पादन अधिक होते. कालांतराने तेराव्या शतकात वादळ, वारे, पूर यांनी किओगिआचा बहुतांश भाग उद्ध्वस्त केला. आता व्हेनिसला बाहेरून मीठ आयात करण्याशिवाय पर्याय नव्हता.
मग व्हेनिसने नवे धोरण आरंभले. मीठ तयार करत बसण्यापेक्षा ते खरेदी करून विकण्यात अधिक नफा आहे, हे त्यांच्या लक्षात घेतले. व्हेनिस शासनाने १२८१ साली व्हेनिसमध्ये आयात होणाऱ्या मिठासाठी व्यापाऱ्यांना सबसिडी दिली. ते, ते चढय़ा भावात विकत. त्यातून झालेल्या फायद्यातून व्यापाऱ्यांचा व्यापार वाढला. त्यांची गलबतं भूमध्य समुद्राच्या पूर्वेकडे जाऊ लागली. तिथून ती हिंदुस्थानी मसाले उचलत. तो माल पश्चिम युरोपात विकत. तोही कमी दामात! हे प्रकरण व्हेनेशियनांखेरीज इतरांना झेपणारे, परवडणारे नव्हते.
व्हेनिशियन जनतेला महाग दराने मीठ विकत घ्यावं लागत होतं. पण हिंदुस्थानी मसाल्याच्या पदार्थाच्या व्यापारावरचं आधिपत्य राखण्यासाठी जनता ही किंमत मोजायला तयार होती. मिठातून मिळालेल्या संपत्तीतून व्हेनिसमध्ये भव्य वास्तू, सुंदर पुतळे उभे राहिले. नगरी सुशोभित झाली.
त्या काळात मीठव्यापारावर व्हेनिसची पकड होती. व्हेनिसने ठिकठिकाणची मिठागरं ताब्यात घेतली होती. मीठव्यापारात सर्वदूर मुसंडी मारली होती. मीठ-उत्पादनावर नियंत्रण ठेवून बाजारपेठ आपल्या ताब्यात ठेवली. तेराव्या शतकाच्या उत्तरार्धात जगभरातल्या मिठाच्या किमती वाढविण्याच्या हेतूने व्हेनिसने क्रिटी बेटावरची सर्व मिठागरे उद्ध्वस्त केली. स्थानिक मीठ- उत्पादनांवर बंदी आणली. मग स्थानिक लोकांची गरज भागविण्यासाठी बाहेरून मीठ विकत घेतले आणि त्याचा साठा करण्यासाठी गोदामे उभी केली. मिठागरांच्या मालकांना नुकसानभरपाई दिली. स्थानिकांना खूश ठेवून मिठाच्या किमतींवर नियंत्रण ठेवण्याचे धोरण अवलंबले. १४७३ साली व्हेनिसने सर्बियाचा ताबा घेतला आणि तिथले सर्व मीठ आपल्यालाच विकणे सर्बियाला भाग पाडले.
आता व्हेनिसला तगडा प्रतिस्पर्धी उरला होता जेनोआ. भूमध्य समुद्रातील आयबिझा बेटावर जेनोआने मोठय़ा प्रमाणावर मीठ तयार करायला सुरुवात केली. व्हेनिसने १४८९ साली सायप्रस बेट ताब्यात घेऊन तिथे मोठय़ा प्रमाणावर मीठ तयार करायला सुरुवात करून जेनोआखालोखाल दुसरे स्थान मिळविले. काहीही करून व्यापार ताब्यात ठेवण्यासाठी आणि साम्राज्यविस्तार करण्यासाठी व्हेनिसने व्यापारी गलबतांचा उपयोग गरज पडल्यास राखीव नौदल म्हणून करता यावा अशी योजना केली. ही व्यापारी कम् नौसेना अॅड्रियाटिक समुद्रावर गस्त घाली. इतर गलबते अडवी. माल तपासे. त्यांचे परवानापत्र पाही.
चीनवगळता मिठावर वित्तीय उभारणी करणारं व्हेनिससारखं दुसरं राज्य नव्हतं. अशी मिठाधारित ध्येयधोरणंही अन्य कुणाची नव्हती.
आपली व्यापारी गलबते जरूर पडेल तेव्हा युद्धनौका करता येण्याच्या क्षमतेमुळे व्हेनिस प्रबळ झाले. त्यानं जेनोआही ताब्यात घेतलं आणि भूमध्य समुद्रावर अधिराज्य केलं.
व्हेनिसच्या ताब्यातल्या जेनोआतून दोघेजण नव्या प्रदेशाच्या शोधार्थ बाहेर पडले. ख्रिस्तोफर कोलंबस १४९२ साली आणि जिओवनी कॅबोटो १४९७ साली. दोघंही हिंदुस्थानच्या शोधात निघाले होते; पण पोहोचले उत्तर अमेरिकेत. मात्र, १४९८ साली वास्को-द-गामा आफ्रिकेला वळसा घालून हिंदुस्थानच्या किनाऱ्यावर थडकला.
एव्हाना मसाल्याच्या व्यापारासाठी अटलांटिक बंदरांना महत्त्व आले होते. भूमध्य समुद्र मागे पडला. पंधराव्या शतकानंतर पाश्चात्त्य जगताच्या दृष्टीने भूमध्य समुद्राचं महत्त्व संपलं.. आणि व्हेनिसचंही. जेनोआचं महत्त्व उरलं ते फक्त बंदर म्हणून.
मध्ययुगीन कॅथॉलिक चर्चने पवित्र धार्मिक दिवशी मांसाहार करण्यावर बंदी घातली होती. सातव्या शतकात या चर्चने धार्मिक दिवसांच्या संख्येत बरीच वाढ केली. चौथ्या शतकात सुरू झालेले ‘लेन्ट’चे उपवास ४० दिवसांचे झाले. त्यात भर पडली सर्व शुक्रवारांची. येशू ख्रिस्ताला सुळावर चढविलेला हा दिवस. त्यामुळे वर्षभरातले अर्धेअधिक दिवस उपवास पाळण्याचे झाले. त्या काळात कठोरपणे एकभुक्त राहावे लागे. dwi70शुक्रवारी, पवित्र दिवशी मांस खाणं निषिद्ध होतं. आणि खाल्ल्यास इंग्लंडमध्ये तिथल्या कायद्यानुसार फाशीची शिक्षा ठोठावली जाई. हे सोळाव्या शतकापर्यंत चालू होतं. आठव्या हेन्रीनं व्हॅटिकन चर्चपासून सुटका करून घेईपर्यंत इंग्लंडमध्ये हे नियम काटेकोरपणे पाळले जात.
गंमत म्हणजे काहीही कारण असो- मांसाहारावर बंदी होती; पण मत्स्याहारावर मात्र नव्हती. त्यामुळे व्हेल माशांच्या ताज्या मांसाला खूप मागणी होती. विशेषत: त्यांच्या जिभांना. व्हेलची जीभ खाणे हे श्रीमंतीचं लक्षण होतं. गरीबांसाठी असे तो व्हेलचा चरबीयुक्त मांसल भाग. त्या भागाच्या खारवून सुकविलेल्या पट्टय़ा लेन्टच्या उपवासाला चालत. त्यावरूनच त्या खाद्याला ‘लेन्ट ब्लबर’ म्हणत. फ्रान्समधील हे लेन्ट ब्लबर- गरीबांचं खाणं- लंडन ब्रिज ओलांडून इंग्लिश लोकांकडे पोहोचे. पण त्यावर इंग्लंडला भारी आयात कर भरावा लागे. कारण तिथे व्हेलचं मांस मिळत नसे. त्यामुळे भारी किंमत मोजून इंग्लिश श्रीमंत लोक फ्रान्सच्या गरीबांचं खाणं खात.
अटलांटिक समुद्राच्या किनाऱ्यावरचा सातव्या शतकातला आत्ताचा स्पेन आणि आत्ताच्या फ्रान्सचा डोंगराळ भाग या ठिकाणी बास्क ही प्राचीन संस्कृती नांदत होती. केल्ट आणि रोमन संस्कृतीच्या आक्रमणाला तोंड देऊन ती उभी होती. हे बास्क लोक व्हेल माशांची शिकार करण्यात तरबेज होते. अग्रेसरही होते. त्यांचा व्यापारही ते मोठय़ा प्रमाणात करत.
सातव्या शतकात बास्क आपली मोठमोठी गलबते घेऊन हजारो सागरी मैलांवरच्या मोहिमा काढत. ते अधिकाधिक उत्तरेकडे जात. त्या मोहिमांत त्यांना व्हेल माशांपेक्षा अधिक किफायतशीर अशी माशांची जात आढळली- कॉड मासे. अटलांटिक कॉड्स. या माशांच्या अंगावर चरबी कमी. व्हेल माशाची जाड चरबी मीठ मुरवून घ्यायला अडथळा आणी, बराच वेळ लावी. तसं कॉडच्या बाबतीत होत नव्हतं. ते खारवून सुकवणं जलद आणि सोपं होतं. तसंच त्यांचा गलबतांवर साठा करणंही कमी कटकटीचं होतं. त्यामुळे बास्क लोक आता व्हेल सोडून कॉडकडे वळले. खारवलेल्या, सुकवलेल्या माशांसाठी बाजारपेठ तर उदंड होतीच. पूर्वीचं रोमन जग मत्स्याहारी होतंच; पण हे कॉड मांस चर्चमान्य आणि गरीबांनाही परवडणारं होतं. बास्क लोकांचा ‘कॉड’ व्यापार दणक्यात चालला.
उत्तर युरोपातल्या मासेमारी करणाऱ्या सर्व देशांना या नव्यानं, तेजीनं विस्तारणाऱ्या किफायतशीर अशा खारवलेल्या कॉड माशांच्या बाजारपेठेत शिरकाव हवा होता. त्यांच्या सागरी किनाऱ्यावर कॉड होते, पण मीठ कमी पडत होतं.
आता बास्क लोकांच्या मदतीला आले व्हायकिंग्ज.. सागरी चाचे. हे व्हायकिंग्ज नौकाबांधणीत तरबेज होते, तसेच ते सागरी खाऱ्या पाण्याची कुंडे तयार करून सूर्यकिरणांच्या उष्णतेने त्यातून मीठ मिळविण्यातही वाकबगार होते. ही कला त्यांनी बास्क लोकांना शिकविली.
पॅरिसला अभय देण्याच्या बदल्यात या व्हायकिंग्जना उत्तर फ्रान्सच्या सीन (Seine) नदीच्या खोऱ्यात जमिनी दिल्या गेल्या होत्या. ते तिथे स्थिरावले. (हेच पुढे ‘नॉर्मन्स’ म्हणून ओळखले जाऊ लागले.) त्यांनी dwi71फ्रान्सचं मीठ-उत्पादन वाढवलं आणि परिणामत: खारवलेल्या कॉड माशांचा व्यापारही फायदेशीर होत गेला.
इंग्लंडमध्ये मच्छिमारांची वानवा नव्हती. त्यांचं नौदलही भारी होतं. पण त्यांच्याकडे मीठ नव्हतं. खाडीकिनाऱ्यावर खाऱ्या पाण्यापासून मीठ तयार केलं जाई. खारी वाळू धुऊन, ते पाणी आगीवर आटवून ते मिळवलं जाई. नैसर्गिक सौरउष्णतेने मीठ मिळविण्यापेक्षा ही पद्धत महागडी आणि कमी उत्पादन देणारी होती. ब्रिटिशांना मिठाची निकड होती. ब्रिटिश नौदलासाठी मोठय़ा प्रमाणावर खारवलेले कॉड मासे आणि खारवलेले मांस (Beef) लागे. फ्रान्सप्रमाणे ब्रिटिश नौदलाला त्यांची गरज होती.
१४ व्या शतकात उत्तर युरोपात बहुतेक ठिकाणी युद्धमोहिमांची तयारी म्हणजे मोठय़ा प्रमाणावर मिठाचा साठा करणे, मांस आणि मासे खारवायला सुरुवात करणे- असे. मोठमोठय़ा वेढय़ांत टिकून राहण्यासाठी, उपासमार टाळण्यासाठी खारवलेले हेरिंग, ईल, कॉड मासे हवे असत. एक खरं की, समुद्रात उदंड मिळणारे मासे खारवून साठवता आल्यामुळेच युरोपातल्या पुष्कळ भागांना दुष्काळ झेपवता आले. गरीबांचीही भूक भागे एवढं त्याचं उत्पादन होत होतं.
एक गमतीशीर नोंद : सोळाव्या शतकात खारवलेल्या माशांच्या निमित्तानं युरोपियनांच्या पोटात दर दिवशी माणशी ४० ग्रॅम्स मीठ जात असे. हे प्रमाण १८ व्या शतकात ७० ग्रॅम्स इतकं झालं. आता आधुनिक अमेरिकेत हे प्रमाण १३५ ग्रॅम्सच्या आसपास आहे. पण वैद्यकशास्त्र म्हणतं, माणसाला दर दिवसाला पाच ग्रॅम मीठ पुरेसं आहे.
नॉर्डिक देश
स्वीडनकडे हेरिंग मासे भरपूर होते, पण ते खारवून ठेवायला पुरेसं मीठ नव्हतं. तेराव्या आणि चौदाव्या शतकात युरोपियनांच्या लेन्ट उपवासाच्या आहारात खारवलेल्या कॉड माशांखालोखाल हेरिंग माशांचं स्थान होतं. ते मासे खारवण्यासाठी भरपूर मीठ लागे. चौदाव्या शतकातील व्यापारात हेरिंग माशांनी मोठा वाटा उचलला. अटलान्टिक देशांतल्या हेरिंगवाल्यांची त्यातून खूप भरभराट झाली. त्यांची शक्ती वाढली. कधी नव्हे एवढं त्यांनी बाजारपेठेवर नियंत्रण मिळवलं. अॅन्टवर्प, अॅमस्टरडॅम ही युरोपातली भरभराटीला आलेली बंदरं. त्यांनी व्हेनिस- जेनोआला मागे टाकून फार पुढची मजल मारली. ब्रिटिश व फ्रेंच नौदले खारवलेल्या कॉड माशांचा साठा करून सज्ज होत असत, तर डच गलबते खारवलेल्या हेरिंग माशांचा साठा करून!
इ. स. १२५० ते १३५० या काळात उत्तर जर्मनीतल्या काही शहरांतल्या छोटय़ा मीठ व्यापारी संघटनांनी एकत्र येऊन Hanseatic League स्थापन केली. Hanse म्हणजे सोबत, साथ. या लीगने आपल्या सर्व ताकदीनिशी बाल्टिक समुद्रातली चाचेगिरी थांबविली. व्यापारविषयक कायदे केले. गुणवत्ता राखण्यासाठी कठोर निर्णय घेतले. जलप्रवासासाठी सागरी नकाशे तयार करवून घेतले. दीपगृहे उभारली.
चौदाव्या शतकात या लीगने मध्य युरोपातल्या उत्तरगामिनी नद्यांची (ऱ्हाईनपासून विस्टुलापर्यंतच्या सर्व नद्यांची) मुखं ताब्यात घेतली आणि ठिकठिकाणी आपल्या संघटना उभ्या केल्या. त्यामुळे ठिकठिकाणचे dwi72मीठ विकत घेण्याची आणि उत्तरेकडच्या देशांना ते विकण्याची क्षमता लीगकडे आली. पंधराव्या शतकात व्यापारीजगतात सर्वोच्च शिखरावर असताना या लीगकडे ४० हजार गलबतं आणि तीन लाख कर्मचारी कार्यरत होते. या Hanseatic League ने सच्चे व्यापारी म्हणून लौकिक मिळविला. स्वच्छ कारभारासाठी त्याची वाखाणणी झाली. पण पुढे हे लोक आक्रमक होत गेले. मक्तेदारी मिळविण्याच्या प्रयत्नांत छोटय़ा-मोठय़ा व्यापाऱ्यांना दुखवत गेले. हेरिंग मासे आणि मीठ यांच्यावर ताबा मिळविणं म्हणजे उत्तरेकडची आर्थिक सत्ता मिळविणं. १३६० साली डेन्मार्कने हेरिंग्ज आणि मिठावर ताबा मिळविण्यासाठी लीगबरोबर लढाई केली, पण त्यात डेन्मार्क हरला. १४०३ मध्ये Hanseatic League ने बर्गेन, नॉर्वेवर कब्जा मिळविला. अर्थात त्यामुळे उत्तर युरोपमधील हेरिंग माशांवर आणि मिठावरही त्यांना ताबा मिळाला. बाल्टिक देशांशी मात्र लीगच्या लढाया चालूच राहिल्या.
कालांतराने बाल्टिक समुद्रातल्या हेरिंग्जनी स्थलांतर केलं. त्यामुळे तिथली मच्छिमारी रोडावली. पण त्याचवेळी नॉर्थ-सीमधून जाळी भरभरून सील मासे मिळू लागले. त्यामुळे इंग्लिश आणि डचांची चलती सुरू झाली. Hanseatic League मागे पडले. ब्रिटिश आणि डचांची आर्थिक व लष्करी शक्ती वाढत गेली. त्यात भर पडली ती त्यांनी उत्तर अटलान्टिक समुद्रात सुरू केलेल्या मासेमारीने. Hanseatic League बाजूला पडले तरी डच व ब्रिटिशांत स्पर्धा चालू होतीच आणि लढायाही. १६५२ मध्ये ब्रिटिशांनी डचांचे नौदल उद्ध्वस्त केले आणि मग तह झाले..
जर्मनी
इसवी सनाच्या पहिल्या शतकातील एक नोंद :
जर्मन टोळ्यांची अशी श्रद्धा आहे की, मिठाच्या खाणीत केलेली प्रार्थना देव अधिक लक्षपूर्वक ऐकतो. ते काहीही असो-एक खरं, की प्राचीन मीठ-खाणींच्या परिसरात चर्चचे मठ असत. मिठापासून मिळणाऱ्या महसुलाचे ते लाभधारक असत. मध्ययुगात चर्चच्या देखरेखीखाली मीठ-खाणी भरभराटीला आल्या. बव्हेरिया आणि ऑस्ट्रिया देशांदरम्यानच्या अल्पाइन प्रदेशात जमिनीखाली सर्वत्र मिठाचे थर आहेत. या दोन्ही देशांच्या सीमेवर हॅलेइन ही मिठाची खाण आहे. या खाणीत उतरण्यासाठी दोन्ही देशांतून तिला तोंडं आहेत. या खाणीतील मीठ आपल्यालाच मिळावं म्हणून दोन्हीकडून लोक उतरत. एकमेकांचे मीठ पळवत. तिथे सतत झटापटी व भांडणं होत.
साल्झबर्ग.. म्हणजे मीठपूर. मीठनगरी. या नगरीच्या नावातच मीठ आहे. मोत्झार्टचे हे जन्मगाव. हे मध्ययुगात स्वतंत्र होते. (तोवर ते ऑस्ट्रियात विलीन झालेले नव्हते.) या साल्झबर्गचा अधिपती होता आर्चबिशप. साल्झबर्गचा आणि बव्हेरियाचा हॅलेइन खाणीतील मिठावर कब्जा मिळवण्यासाठी नेहमी झगडा असे. साल्झबर्गच्या पहिल्या आर्चबिशपने मिठातून मिळालेल्या संपत्तीतूनच या नगरीची उभारणी केली. या साल्झबर्गच्या परिसरात सोनं, चांदी, तांबं होतं. पण ती नगरी सतत लढत होती ती मिठासाठी. आपलं स्वातंत्र्य अबाधित राखण्यासाठी मिठापासून मिळणाऱ्या संपत्तीची गरज या नगरीला होती.
सतराव्या शतकात साल्झबर्गच्या आर्चबिशपने- वोल्फ डीट्रीच याने हॅलेइन खाणीतून मिळणाऱ्या मिठाच्या किमती अचानक एकदम खाली आणल्या. त्यातून त्याला उदंड फायदा झाला. त्या पैशातून त्यानं साल्झबर्गमध्ये भव्य वास्तू उभ्या केल्या. बव्हेरियाला हे भावलं नाही. त्यानं साल्झबर्गला प्रत्युत्तर दिलं. त्याच्याशी व्यापारी संबंध तोडले. यातून मीठ-युद्ध (‘Salt War’) सुरू झालं. आर्चबिशप डीट्रीचचा पराभव झाला. साल्झबर्गचं खूप नुकसान झालं. आर्चबिशपची रवानगी तुरुंगात तर झालीच, पण चर्चनेही त्याला धिक्कारलं.
पुढे साल्झबर्ग ऑस्ट्रियात विलीन झालं. १८२९ च्या तहानुसार ऑस्ट्रिया आणि बव्हेरियानं हॅलेइन खाणीतील आपापल्या हद्दी ठरवून घेतल्या. मिठाची पळवापळवी व मीठयुद्ध थांबवले.
मध्य युरोपातले बहुतेक सर्व मीठ ‘हॅप्सबर्ग’ राजघराण्याच्या ताब्यात होते. जर्मनीत इ. स. १२७३ मध्ये हॅप्सबर्ग घराण्यातला रुडॉल्फ पहिला हा राजा झाला. त्यानं साम्राज्यविस्तार केला. डॅन्यूब, सिलेसिया, हंगेरी, दक्षिण पोलंड आपल्या कब्जात घेतले. काही काळ त्याने स्पेन, नेदरलॅंड हे देश, नेपल्स, सार्डीनिया, सीसीली, व्हेनिस ही नगरेही आपल्या ताब्यात ठेवली होती. या हॅप्सबर्ग घराण्याची मीठ-व्यापारात मक्तेदारी होती. मीठ- उत्पादन, वाहतूक, बाजारपेठ सर्वत्र याच घराण्याची मक्तेदारी होती.
१७७२ साली पोलंड देश ऑस्ट्रिया, प्रशिया आणि रशियात विभागला गेला. अगदी पहिल्या महायुद्धापर्यंत ही स्थिती होती. पोलंडचा दक्षिण भाग ताब्यात घेऊन ऑस्ट्रियन हॅप्सबर्गनी तिथल्या मिठाच्या खाणी कब्जात घेतल्या. ते मीठ अगदी रशियापर्यंत पाठवलं. मोठय़ा रशियाची मिठाची गरजही तेवढीच मोठी. ती हॅप्सबर्गनी अशी भागवली.
इंग्लंड
मिठाच्या इतिहासात महत्त्वाची भूमिका बजावली आहे ती नद्यांनी. यांगत्से, नाईल, टायबर, पो, एल्ब, डॅन्यूब-होन, लॉयरे आणि इंग्लंडची मेर्सी नदी.
मेर्सी नदीनं इंग्लंडमध्ये काय आणलं, त्यापेक्षा इंग्लंडमधून काय बाहेर नेलं, ते पाहणं महत्त्वाचं ठरेल. किंग जॉर्जने १२०७ साली मेर्सी नदीच्या मुखावर गाव वसविण्याची परवानगी दिली. ते गाव म्हणजे लिव्हरपूल. हे लिव्हरपूल बंदर आर्यलड आणि इंग्लंडला जोडण्यासाठी उभं केलं गेलं. पण पुढे ते लंडन बंदरापाठचं दुसरं मोठं आणि महत्त्वाचं बंदर झालं. वेस्ट इंडिजमधून येणाऱ्या साखरेसाठी आणि गुलामांच्या व्यापारासाठी इंग्लंडला हवं तसं बंदर मिळालं. आधी लोखंड आणि कोळसा आणि नंतर पोलाद यांची आयात या बंदरातून होऊ लागली. तिने तिथल्या औद्योगिक क्रांतीला हातभार लावला. पण तत्पूर्वीही ते प्रसिद्ध होतं ते जग ज्याला ‘लिव्हरपूल सॉल्ट’- ‘इंग्लिश सॉल्ट’ म्हणून ओळखतं, त्या ‘चेशायर सॉल्ट’साठी!
अँग्लो-सॅक्सन लोक मिठागरांना ‘विच’ (Wich) म्हणत. इंग्लंडमधील अनेक गावांना हे ‘विच’ लागलेले आहे. नॉर्थविच, मिड्लविच, ड्रॉइटविच, वगैरे. ही गावे मीठ बनवणारी होती.
आठव्या हेन्रीने इ. स. १५३३ मध्ये रोमन चर्चशी संबंध तोडले. तरीही लेंटच्या उपवासाच्या काळात मांसाहार करण्यावर बंदी होतीच. पण आता त्याचे कारण धार्मिक नव्हते, तर आर्थिक होते. कारण शास्त्यांना मत्स्यव्यवसायाला आधार द्यायचा होता. म्हणून त्यांनी १५६३ मध्ये नवा आदेश दिला. दर आठवडय़ाला शुक्रवारच्या जोडीला बुधवारीही मांसाहारावर बंदी घातली. त्यामुळे मत्स्याहाराचा आठवडी एक जादा दिवस जमा झाला. हा कायदा पुढे २२ र्वष टिकून होता. १५८५ साली तो रद्द झाला. चर्चच्या या ‘उपवास’ कायद्याबद्दल जनतेत तीव्र नाराजी होती. ती लक्षात घेऊन चर्चने नवा उपकायदा काढला. उपवासाच्या दिवशी मांसाहार करण्याची अनुमती देणारे परवाने विकले. महसूलप्राप्तीचा एक नवा मार्ग असा शोधला गेला.
मासे खारवण्यापलीकडे ‘चेशायर’ मिठाचा दुसरा महत्त्वाचा उपयोग होत होता तो खारं लोणी- Salty Butter तयार करण्यासाठी. गाईच्या दुधापासून लोणी बनतं म्हणून इंग्लंडच्या चर्चने तेही उपवासकाळात वज्र्य ठरवलं होतं. पण खास परवाने विकत घेऊन ते खाण्याची सुविधा चर्चने श्रीमंतांना उपलब्ध करून दिली आणि आपलं उखळ पांढरं करणं चालू ठेवलं. हे लोणी गरीबांनाही परवडेल अशा किमतीत विकलं जाई. त्यात भरपूर मीठ असल्याने ते वर्षभर टिके.
अठराव्या शतकात इंग्लंडमधलं जीवन बदलू लागलं. वातावरणात चांगलाच बदल घडून आला. लागवडीच्या दृष्टीने ऋतुमान योग्य व दीर्घकाळ टिकणारं झालं. त्यामुळे धनधान्यात वृद्धी झाली. धान्याच्या किमती उतरल्या. पण शेतकरी मात्र डबघाईला आला. मग हाच शेतकरीवर्ग उद्योगांसाठी कामगारवर्ग झाला. कृषिउद्योग वाढत गेले.
शेतीसाठी लागणाऱ्या अवजारांमध्ये नवनवे शोध लागत गेले. आधुनिक शेतीची सुरुवात झाली. आता वर्षभर धान्यउत्पादन होऊ शकतं, अन्न मिळू शकतं म्हटल्यावर ते टिकवण्यासाठी लागणाऱ्या मिठाची गरज कमी झाली. पण गरज कमी झाली तरी मिठाचं उत्पादन चालू होतंच. वाढत होतंच. खारं पाणी उकळून त्यातून मीठ मिळवण्यासाठी भरपूर जळण लागे. त्यासाठी सतत जंगलतोड झाल्यानं सरपणाची चणचण निर्माण झाली. म्हणजे आता चेशायरमध्ये पाण्यात मीठ होतं, ते वाहून नेण्यासाठी नदी होती, अॅटलांटिक बंदर होतं; पण मीठ बनवण्यासाठी लागणारं सरपणच नव्हतं. मग जमीन खोदून कोळशाचा शोध घ्यायला सुरुवात झाली आणि खाली सापडला मिठाचा प्रचंड मोठा खडक.
आता मिठाचा प्रचंड साठाच सापडल्यावर जळणाची गरजच उरली नाही. मग मिठाच्या व्यापाऱ्यांनी सरकारला कालवे बांधायला भाग पाडले. इ. स. १७१३ ते १७४१ या काळात सरकारने चेशायरजवळच्या मेर्सी नदीला जोडणाऱ्या कालव्यांचे जाळे उभे केले. मेर्सी नदीकाठी मीठ-शुद्धीकरणाच्या यंत्रणा आणि लिव्हरपूल बंदरावर गुदामे उभी केली.
चेशायर आता नवे शक्तिस्थान झाले.. प्रभावशाली बनले. त्याचा परिणाम स्कॉटलंड इंग्लंडमध्ये विलीन करतेवेळी दिसून आला. या विलीनीकरणामुळे स्कॉटलंडचे मीठ संकटात सापडले. एकतर आता स्कॉटलंडला आपले मीठ इंग्लंडलाच विकावं लागणार होतं आणि वर चेशायरच्या मीठ व्यापाऱ्यांनी चेशायर मिठाशी स्कॉटिश मिठाने स्पर्धा करू नये, अशी अट घालायला लावली. त्यामुळे स्कॉटलंड-इंग्लंड संबंधात मिठाचा खडा पडला तो तेव्हापासूनच.
चेशायरमध्ये मीठ तयार होत होतं, मिठाचे खडकही सापडले होते, तरीही इंग्लंडला मिठासाठी परदेशावर अवलंबून राहावं लागतंय याचं दु:ख एलिझाबेथ राणीला होत होतं. सतराव्या आणि अठराव्या शतकात इंग्लंडला त्याचा मुख्य शत्रू फ्रान्स याच्याकडून मीठ घ्यावं लागत होतं. ब्रिटिश सैन्याला खुश्कीच्या मार्गाने मोहिमेवर जाताना मोठा मीठसाठा वाहून न्यावा लागे. त्यामुळे ताजं मांस मिळवून शिजवून खाणं सैनिकांना शक्य व्हायचं. ब्रिटिश नौसैनिकही सागरी मोहिमांवर जाताना सोबत मीठ आणि खारवलेले मांस नेत. त्यासाठीही प्रचंड मीठ लागे. त्यामुळे लष्करी ताकद टिकवून ठेवण्यासाठी मीठ आवश्यक होतं.
इ. स. १७१३ ते १७५९ या काळात फ्रान्सशी सतत लढत असताना इंग्लंडला उत्तर अमेरिकेतला कॉड माशांचा प्रदेश सापडला. पण नुसते कॉड सापडून कसं भागणार? तिथून ते आणायला इंग्लंडला आता गरज होती ती खूप गलबतं, मच्छिमार यांची आणि मीठ-पुरवठय़ाची! इंग्लंडने आपली ही गरज पोर्तुगालच्या साहाय्यानं कशी भागवली, ते पाहण्यासारखे आहे.
उत्तर अमेरिकेतील रस्ते पाहिले तर दिसतं की मुख्य रस्ते आणि त्यांना जोडणारे रस्ते हे काही आखूनरेखून घडवून आणलेलं काम नाही. त्यात अमुक एक विचार नाही. याचं कारण पूर्वीच्या पायवाटा आणि जनावरांच्या पायवाटा रुंदावून ते बनलेले आहेत. मिठाचा माग काढत जाणाऱ्या जनावरांच्या वाटचालीनं ते बनले होते. त्यांना हवं असणारं मीठ ती जनावरं खाऱ्या झऱ्यांवर मिळवत.. मिठाच्या खडकांवरून मिळवत.. खार-चाटणावरून मिळवत. जनावरांच्या या मागवाटांवरून माणसांनी वाटचाल करून पायवाटा बनवल्या.
उत्तर अमेरिकेच्या उत्तर भागातील न्यू फाऊंडलंड (कॅनडा) इथे ब्रिटिश प्रथम आले. तिथे त्यांना कॉड मासे सापडले. तिथून मग ते दक्षिणेला कॅरेबियन समुद्राकडे आले. तिथून त्यांनी मीठ घेतलं. आता इथे वसाहतवाले भरपूर व पुरेसे झाले आहेत हे लक्षात आल्यावर त्यांनी विचार केला की, आता इथे लिव्हरपूलचं मीठ विकायला बाजारपेठ मिळाली.
मिठाची उणीव भरून काढायची ती एकतर लढाई करून, ती जिंकून किंवा चातुर्य वापरून मीठ तयार करणाऱ्या जागाच ताब्यात घ्यायच्या- असं ब्रिटिश आरमाराचं धोरण होतं. पोर्तुगालकडे सागरी पाण्यापासून मिळणारं मीठ होतं आणि मच्छिमारीसाठी आवश्यक ते गलबतांचे ताफेही होते. पण त्या ताफ्यांना सागरी संरक्षण नव्हतं. विशेषत: फ्रेंचांकडून. फ्रेंच नेहमीच पोर्तुगीजांची गलबतं अडवत व लुटत. मग इंग्रज-पोर्तुगीज एक झाले. पोर्तुगालनं मिठाच्या बदल्यात इंग्रजांकडून संरक्षण मिळवलं.
पोर्तुगालशी गठबंधन झाल्यावर इंग्लंडला केप वर्डे (Cape Verde) बेटांवरून सागरी मिठानं आपली गलबतं भरता येऊ लागली. युरोपियन शास्ते सतराव्या आणि अठराव्या शतकात ऊस लागवडीखातर कॅरेबियन बेटांचा ताबा मिळवण्यासाठी लढत होते. इंग्लिश, डच, स्वीडिश आणि डेन्स ही उत्तर युरोपातील मंडळी ‘केप वर्डे आयलंड्स’सारख्या मीठ मिळू शकणाऱ्या बेटांवर ताबा मिळवू पाहत होती.
स्पेनपासून स्वातंत्र्य मिळवण्यासाठी डचांनी १५६८ मध्ये सुरू केलेला लढा पुढे ऐंशी र्वष चालू राहिला. त्यामुळे डच स्पेनच्या मिठाला वंचित झाले होते. पण त्याचवेळी ते अमेरिकेतील स्पॅनिशव्याप्त व्हेनेझुएलाच्या किनाऱ्यावरचं मीठ चोरून पळवत होते आणि ब्रिटिशही तिथलं जवळचं स्पॅनिश मीठ चोरत होते.
इंग्लंडहून उत्तर अमेरिकेला जाण्याच्या सागरी मार्गावर मीठ तयार करणारी छोटी छोटी बेटं होती. ब्रिटिश साम्राज्याला मीठ पुरवून ती श्रीमंत झाली.
इंग्लिश, डच आणि फ्रेंच सतत मिठाच्या शोधात होते. या तिघांनीही आपल्या ताब्यातील मिठाच्या किमयेने अमेरिकन समुद्रात हाती लागलेल्या अमाप कॉड माशांचे तितक्याच अमाप संपत्तीत रूपांतर केले.
अमेरिकेतील विविध ब्रिटिश वसाहती बराच काळ स्वत:पुरते मीठ तयार करून आपली गरज भागवत होत्या. पण चेशायरमध्ये मिठाचे खडक सापडले व तिथले मीठ-उत्पादन वाढले. ब्रिटिशांनी मग लिव्हरपूल मिठाच्या किमती कमी करून ते स्वस्त केले. सहज उपलब्धही केले. त्यामुळे अमेरिकेतील ब्रिटिश वसाहतींतील मिठाचे भाव आणि उत्पादनही गडगडले.
या वसाहतीतील लोकांचे इंग्लंडशी संबंध व्यवस्थित होते तोवर त्यांना इंग्लंडकडून गरजेपुरते मीठ मिळत होते. पण ते व्यापारउदिमासाठी पुरेसे नव्हते. त्यांनी इंग्लंडकडून सर्व विकत घ्यावे आणि इंग्लंडलाच सर्व विकावे, हेच इंग्लंडला अपेक्षित होते. पण अमेरिकेतील ब्रिटिश वसाहती तर इंग्लंड विकू शकेल त्यापेक्षा कितीतरी पटीने अधिक मीठ- विशेषत: खारवलेले कॉड्स तयार करत होत्या. केवळ ब्रिटिश मिठावर अवलंबून जोवर या वसाहती माल निर्माण तयार करत होत्या तोवर ब्रिटिश शांत होते. पण अमेरिकन वसाहतींची गरज ब्रिटिश मिठाने भागेना. मग त्या इतरत्र संधान साधू लागल्या. इंग्लंडला हे जाणवले.
व्हर्जिनिया आणि मॅसेच्युसेट्स या दोन ब्रिटिश वसाहती माशांच्या बाबतीत समृद्ध होत्या. त्या आपला माल अॅटलांटिक प्रदेशात विकत. न्यू इंग्लंड वसाहत खारवलेले कॉड्स आणि खारवून वाळवलेली फर, केसाळ कातडी इतरत्र विकून लोखंड व इतर माल विकत घेऊ लागली. गुलाम व दारू यांचा व्यापार करू लागली. ब्रिटिश वसाहत असलेल्या बोस्टनमधील व्यापारीही इंग्लंडशी असलेले संबंध तोडायला उत्सुक होते. टॉम पेन या विचारवंतानं इंग्लंडबद्दल म्हटलंच होतं- ‘एखादं बेट एखाद्या उपखंडावर राज्य करू शकत नाही.’
अमेरिकेचा व्यापार हा स्वातंत्र्याच्या दिशेनं पुढे निघालाय, हे ब्रिटिशांना जाणवलं. त्यांनी जाचक जकात, जबरदस्त कर, अटी वगैरे घालायला सुरुवात केली (१७५९). ताणाताणीला सुरुवात झाली. मग ब्रिटिशांनी सैन्य पाठवलं. तंटे वाढतच गेले. शेवटी १७७५ साली ब्रिटिशांनी या वसाहतींना बंडखोर ठरवलं. त्यांची सागरी नाकेबंदी केली. मीठपुरवठा तोडला. जॉर्ज वॉशिंग्टन यांच्या पलटणींनाही मीठ मिळेना. ब्रिटिशांनी नुसतंच मीठ तोडलं नाही, तर या वसाहतींना बाहेरून मीठपुरवठा करणारी मध्य अॅटलांटिकवरची मिठागरंही नष्ट केली.
यावर उपाय म्हणून या ब्रिटिश वसाहतींनी समुद्राचं पाणी उकळून मीठ मिळवण्याचे प्रयत्नही केले, तरीही तुटवडा कायम होता. मग त्यांनी आपल्या लोकांना आवाहन करणारी पत्रकं काढली आणि ती वाटली. मीठ कसे तयार करावे, हे सांगू लागली. त्यासाठी अधिक सवलती दिल्या. प्रलोभनं दाखवली. अगदी लष्करी सेवेतून सूटही देऊ केली. पण कितीही आणि काहीही केलं तरी वसाहतींत पुरेसे मीठ तयार होईना.
अखेरीस सप्टेंबर १७८३ मध्ये पॅरिसचा तह झाला. त्या तहानुसार शांततेसाठी वाटाघाटी झाल्या. अमेरिकेला संयुक्त राष्ट्रसंघ- ‘युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका’ अशी मान्यता मिळाली. एक नवं राष्ट्र जन्माला आलं. अर्थात आलं ते कडवट स्मृती बाळगून.. दुसऱ्यावर मिठासाठी अवलंबून राहावं लागणं काय असतं, याचा दु:खद अनुभव घेऊन!

फ्रान्स आणि त्याची मीठ करआकारणी (Gabelle)
फ्रान्समध्ये श्रीमंत-गरीब सर्वानाच मिठावर कर द्यावा लागे. साध्या, सर्वसामान्य, परंतु जीवनावश्यक गोष्टीवर कर लावल्यानं ती महाग झाली. पण राजाची तिजोरी भरत गेली. शासकीय महसुलात त्यामुळे मिठाला महत्त्व होतं. शास्त्यांचं फर्मानच होतं- आठ वर्षांवरच्या प्रत्येक नागरिकाने दरवर्षी सात किलो मीठ सरकारनियोजित किमतीत विकत घेतलं पाहिजे. हा दंड जाचक होता. पुन्हा एका माणसासाठी एवढं मीठ फारच जास्त होतं. शिवाय ते जास्तीचं मीठ मांस व मासे खारवण्यासाठी वापरणे बेकायदेशीर ठरवलेले. तसं केल्यास जबरदस्त शिक्षा होत होती. यातून मग मीठ-गफले, मीठ-घोटाळे न घडते तर नवल.
या सगळ्याला कंटाळून दक्षिण फ्रान्समधल्या एका भागात (१५४३ साली) चाळीस हजार शेतकऱ्यांनी एकत्र येऊन सशस्त्र उठाव केला. त्यामुळे राजाने मिठावरचा कर कमी केला. पण मीठ-उत्पादक आणि मीठ-व्यापाऱ्यांवर कर वाढवला! हा कर गोळा करणारे अधिकारी जाचक होते. यातूनच मिठाची चोरटी आयात-निर्यात सुरू झाली. खुनाखुनी, मारामाऱ्या वाढल्या. एकटय़ा लॉयरे नदीवरचं स्मगलिंग रोखण्यासाठी १७७३ साली तीन हजार सैनिक तैनात होते. मग त्यांना लाच देऊन वश करणे, हे आलेच.
या ‘गाबेल’विरोधात वागल्याने अठराव्या शतकात दरवर्षी तीन हजार फ्रेंच स्त्री-पुरुष-मुले तुरुंगात जात होती, तर काहींना फाशीही होत होती. फ्रान्समध्ये राज्यक्रांती होण्यामागे मीठ हे एकमेव कारण नव्हतं; पण ते सरकारी अन्यायाचं प्रतीक होतं. फ्रेंच राज्यक्रांतीनंतर हा ‘गाबेल’ (कर) रद्द झाला होता. पण १८०४ साली नेपोलियन बोनापार्टने तो पुन्हा लागू केला. अखेरीस १९४६ साली तो पूर्णत: रद्द झाला.
पॅरिसचा तह झाला. अमेरिका ‘संयुक्त राष्ट्र’ झालं म्हणून काही पुढचं सुरळीत झालं असं नाही. शत्रुत्व तर मागे उरलेलं होतंच. मिठाचा प्रश्न अजूनही सुटलेला नव्हता. अमेरिकेत मीठ प्रचंड महाग होऊन बसलं. त्याचं उत्पादन वाढवण्याशिवाय गत्यंतर नव्हतं. तेव्हा मग नवअमेरिकनांनी न्यूयॉर्कच्या ऑनॉन्डागा भागात मीठ तयार करायला सुरुवात केली. ऑनॉन्डागा हे फार पूर्वी अस्तित्वात असलेलं एक मीठक्षेत्र. त्यावर त्यांनी लक्ष केंद्रित केलं. मीठ व्यापार वाढावा या हेतूनं कालवा बांधण्याचा एक प्रस्ताव १८०८ साली पुढे आला. या प्रस्तावानुसार न्यूयॉर्कच्या हडसन नदीवरून अल्बनी इथून निघणारा कालवा आपल्या मार्गात ‘ग्रेट लेक्स’ जोडत ३६३ मैलावरच्या लेक इरीला बफेलो (न्यूयॉर्क) इथे मिळणार होता. हा इरी कालवा तयार व्हावा म्हणून अनेकांनी प्रयत्न केले. पण दरम्यान राष्ट्राध्यक्षपद भूषवून गेलेल्या थॉमस जेफरसन आणि जेम्स मॅडिसन यांना त्या कालव्याच्या यशस्वीतेची खात्री न वाटल्यानं तो प्रस्ताव बासनात गुंडाळून पडला होता.
या कालव्यासंबंधीच्या प्रस्तावाने १८१७ साली पुन्हा डोकं वर काढलं. लोकमत जागृती केली गेली. विशेष म्हणजे या प्रस्तावाचं महत्त्व लक्षात आल्यावर लोकसंमतीतून इरी कालवा तयार झाला. मिठावर कर लावून त्या कराच्या पैशातून हे घडून आलं. १८२५ साली हा कालवा तयार झाला आणि अमेरिकेच्या भरभराटीचा काळ सुरू झाला. न्यूयॉर्कमधलं मीठ-उत्पादन वाढलं.. उत्पादकही श्रीमंत झाले. या कालव्यानं आणलेली सुस्थिती पाहून इतर अनेक कालव्यांचे प्रस्ताव पुढे आले.. आणि ते कालवे झालेही.
व्हर्जिनिया राज्याच्या पश्चिम भागातून (म्हणजे आताच्या वेस्ट व्हर्जिनियातून) ग्रेट कनाव्हा नदी निघते, ती ओहियोच्या दिशेनं वाहत जाते. या मार्गात दहा मैल लांबीचा पट्टा मीठ देणारा आहे. तसेच ग्रेट कनाव्हाच्या उत्तरेला मोठे खारचाटण आहे- ग्रेट बफेलो लीक. या कनाव्हा मिठाला १८५० च्या दशकात फार महत्त्व आलं. कारण लवकरच अमेरिका खंड दुभागला गेला- उत्तर अमेरिका व दक्षिण अमेरिका. मिठागरांना महत्त्व आले. सैन्य पोटावर चालते.. त्यांना मीठही लागते. दोन्ही भागांतल्या सैन्यांच्या कोटय़ात मीठ होतं. पण ते पुरेसं पुरवलं जात नव्हतं.
१८५८ सालात दक्षिण अमेरिकेत प्रमुख मीठ-उत्पादक होते व्हर्जिनिया, केटुंकी, फ्लॉरिडा आणि टेक्सास आणि उत्तरेत न्यूयॉर्क, ओहियो आणि पेन्सिल्व्हानिया. दोन्ही भागात मिठागरं वाढली असूनही यूएसला मीठ पुरत नव्हतं. अजूनही मीठ परदेशातून आयात करावं लागत होतं आणि हे मीठ जास्तकरून जात होतं यूएसच्या दक्षिणेत.
दक्षिण-उत्तरेतलं यादवी युद्ध सुरू झाल्यावर चार दिवसांनी- म्हणजे ४ एप्रिल १८६१ रोजी राष्ट्राध्यक्ष लिंकन यांनी दक्षिणेतल्या बंदरांची नाकाबंदी केली. ती युद्ध संपेपर्यंत- म्हणजे १८६५ पर्यंत चालू होती. उत्तरेने प्रचंड ताकद लावून ही नाकाबंदी चालू ठेवली. त्यामुळे दक्षिणेत महागाईने कळस गाठला. अन्नधान्य, मिठाच्या किमती गगनाला भिडल्या. दक्षिणेत मिठाचे दुर्भीक्ष्य निर्माण झाले.. खारवलेले मांसही साठय़ात नव्हते. उपासमारीला तोंड द्यायची वेळ आली. उत्तरेने ही संधी मानली. तिचा लाभ उठवला. या यादवीत व्हर्जिनिया ते टेक्सासपर्यंतची सर्व मिठागरे, दक्षिणेच्या सैन्याच्या ताब्यात असलेली समुद्रकिनाऱ्यावरची सर्व मिठागरं उत्तरेच्या सैन्यानं नष्ट केली. मीठ-उत्पादनाच्या यंत्रणाच उद्ध्वस्त केल्या. लाखो डॉलर्स किमतीचं मीठ नष्ट झालं. या काळात मिठाच्या चोरटय़ा आयातीनं, जुगारानं दक्षिणेला छळलं होतं. मिसिसिपीच्या गव्हर्नरने एक भन्नाट आयडिया केली होती. पन्नास हजार गोणी फ्रेंच मिठाच्या बदल्यात ५००० गासडय़ा कापूस देण्याची बोलणी करून त्यानुसार कापसाच्या ५०० गासडय़ा रवाना केल्या. फ्रेंचांनी कापूस ठेवून घेतला, पण मीठ काही पाठवलं नाही.
अलाबामात, जॉर्जियात सर्वत्र मिठासाठीचे स्रोत, झरे शोधले जाऊ लागले. समुद्राचे खारे पाणी आटवण्यासाठी दक्षिणेत प्रचंड जंगलतोड झाली. मग तर इंधनाचाही तुटवडा निर्माण झाला. परिस्थिती अशी आली की, मिठागरात काम करणारे मजूर वेतन चलनात न मागता मिठाच्या रूपाने मागू लागले. कारण मिठाचे भाव सतत वाढत होते. हातात पडलेल्या मिठाला उद्या वाढीव भाव मिळणार आहे, याची कल्पना मजुरांना होती. त्यामुळे ते मिठात गुंतवणूक करू पाहत. मीठ जवळ असणं हे प्रतिष्ठेचं झालं होतं. किती? तर विवाहप्रसंगी आहेर म्हणून मिठाची पुरचुंडी दिली जाई.. खिशातही मीठपुडी ठेवली जाई.
मिठावर दक्षिणेनं किती म्हणून माहितीपत्रकं, आवाहन पत्रकं काढावीत! वर्तमानपत्रातून सदरं चालवावीत! मीठ कसे कमीत कमी वापराल, मिठाला पर्याय काय, घरगुती उपयोगासाठी घरच्या घरी मीठ कसे तयार करावे.. इ.

* रोमन लोक प्रेमात पडलेल्या व्यक्तीला salax म्हणजे ‘खार लागलेला’ म्हणत. salacious या शब्दाचे मूळ salax मध्ये आहे.
* पायरेनिज लोकांत विवाहविधीसाठी चर्चमध्ये जाणाऱ्या नववराच्या डाव्या खिशात मीठ ठेवत. असं केल्याने वंध्यत्व टळते असा त्यांचा विश्वास होता. फ्रान्समध्ये काही भागांत फक्त वर मीठ न्यायचा, तर काही भागांत फक्त वधू. जर्मनीत नववधूच्या पादत्राणांवर मीठ शिंपडलं जाई.
* उद्दीपित होते, या समजुतीमुळे इजिप्शियन धर्मगुरूंना ब्रह्मचर्य राखता यावे म्हणून त्यांना मीठ वज्र्य होते.
* अनेक प्रदेशांत मैत्री आणि निष्ठा यांच्यावर शिक्कामोर्तब करण्यासाठी मीठ वापरलं जातं. मिठाचे गुणधर्म बदलत नाहीत, ते सातत्य राखतं, हे त्यामागचं कारण असावं. इस्लाम आणि ज्युडाइझमध्ये मिठाच्या साक्षीने सौदे पक्के होतात. हिंदू संस्कृतीतही ‘मिठाला जागलं’ जातं.
* रंगमंचावर अभिनय करणाऱ्या नटांना दुरात्म्यांनी, भूत-पिशाच्चांनी पछाडू नये, त्रास देऊ नये म्हणून जपानमध्ये पारंपरिक रंगमंचावर प्रयोग सुरू होण्याआधी मीठ शिंपडतात.
* ‘हाइती’मध्ये भूतबाधा उतरवण्यासाठी मिठाचा उपयोग करतात. हिंदू लोकांत दृष्ट काढण्यासाठी मीठ वापरले जाते. ज्यू मुस्लीम लोकांतही वाईट नजरेपासून वाचवण्यासाठी मीठ वापरले जाते.
* हॉलंडमध्ये मुलाच्या पाळण्यात मिठाची पुरचुंडी ठेवतात.
* कॅरेबियन संस्कृतीत धार्मिक विधीच्या भोजनात मीठ नसते. मीठ आत्म्यांना दूर ठेवते, अशी त्यांची धारणा आहे. (हिंदू लोक नैवेद्याच्या ताटात मीठ वाढत नाहीत.)
* सोळाव्या शतकातील ज्यू कायदेग्रंथात मीठ हाताळण्यासंबंधीचे काटेकोर नियम सांगितले आहेत.
* मधल्या दोन बोटांच्या चिमटीत मीठ उचलावे.
* मीठ उचलताना अंगठा वापरणाऱ्याची मुले मरतील.
* करंगळी वापरली तर दारिद्रय़ येईल.
* तर्जनी वापरली तर खुनाचा आळ येईल. ती व्यक्ती खुनी होईल.
* मध्ययुगीन युरोपात मीठ हाताळण्याचे नियम होते. मीठ हाताने वाढायचे नाही, तर ते सुरीच्या टोकावर घेऊन वाढायचं, हा दंडक होता.
* ख्रिश्चन धर्मात मीठ सातत्याशी, दीर्घायुष्याशी निगडित मानतात. सत्य आणि प्रज्ञेचे ते प्रतीक मानतात. कॅथॉलिक चर्च पवित्र पाणी शिंपडते, त्यात मीठ असते. ते पाणी sal sapent म्हणजे salt of wisdom म्हणूनही शिंपडलेले असते.
* ज्यू लोकांसाठी ‘देवानं इस्रायलशी केलेल्या कराराचे निरंतरत्व दर्शवणारे प्रतीक’ म्हणून मिठाला महत्त्व आहे.

दक्षिणेतलं ग्रेट कनाव्हा खोरे उत्तरेच्या सैन्यानं ताब्यात (१८६१) घेतलं तेव्हा तिथे कुठलाच कडवा प्रतिकार झाला नाही. तिथे पुरेशी सुरक्षा नसल्याने उत्तरेच्या सैन्याला ते ताब्यात घेणं सहज शक्य झालं. या प्रसंगाविषयी दक्षिणी युद्ध खात्यातला एक कारकून नोंदवतो- ‘‘राष्ट्राध्यक्ष (जेफरसन डेव्हिस) हे इतरांना राष्ट्र घडवणारा उत्तम पुरुष वाटत असतील, पण ते या देशासाठी उत्तम मीठकर्ते ठरले नाहीत.’’
अमेरिकेत यादवी युद्ध सुरू होण्याच्या आधी वर्षभर, १८६० साली, फ्रेंच भूगर्भशास्त्रज्ञ थॉमसी याने ल्युझिआनात पेटिट अॅन्से (Petite Anse) या ठिकाणी जमिनीत मिठाचे खडक सापडू शकण्याची शक्यता वर्तवली होती. आणि तिथे खाऱ्या पाण्याच्या झऱ्यांचा उगम शोधताना खोदकामात १८६२ साली तसा प्रचंड मोठा खडक सापडलाही. विशेष म्हणजे हे मीठ शुद्ध आणि सुके, भुरभुरीत होते. आता दक्षिणेला मिठाची चणचण पडणार नव्हती. इथून सत्तर लाख टन मीठ मिळेल असा अंदाज वर्तवला गेला. पण कालांतराने हा अंदाज किरकोळ ठरावा इतकं मीठ तिथे निघालं.
उत्तरेच्या सैन्याने या ‘पेटिट अॅन्से’वर ताबा मिळवण्यासाठी खूप प्रयत्न केले आणि एप्रिल १८६३ मध्ये तसा तो मिळवलाही. तिथल्या मीठनिर्मिती यंत्रणा संपूर्णपणे उद्ध्वस्त केल्या. या एवढय़ा प्रचंड मोठय़ा मीठ-उत्पादक क्षेत्राचं दक्षिणी सेना संरक्षण करू शकली नाही, त्याअर्थी ती नक्कीच दुबळी होत चाललीय असा कयास उत्तरेच्या सेनेने काढला. आणि मग मुक्त गुलामांच्या मदतीने तिने दक्षिणेतली मीठक्षेत्रे (व्हर्जिनिया, फ्लोरिडा, अलाबामा, टेनेसी वगैरे ठिकाणची) संपूर्णत: नष्ट केली.
उत्तर अमेरिकेला उटाहमध्ये मोठे मीठक्षेत्र ‘Great Salt Lake’ सापडले. नेवाडा आणि कॅलिफोर्नियातही सोन्या-चांदीबरोबर प्राचीन मिठागरं सापडली. आणि त्या राज्यांची भरभराट होत गेली.
पॅरिसचा बल्लवाचार्य निकोलास अॅपर्टने याने एकोणिसाव्या शतकाच्या पहिल्या दशकात एक प्रयोग केला आणि त्याच्या अनुभवाला आले की, हवाबंद भांडय़ात अन्नपदार्थ ठेवून त्याला उष्णता दिली की त्यातले अन्न नासवणारे घटक नष्ट होतात. मग त्याने तसे पदार्थ बनवायला सुरुवात केली. नेपोलियनच्या नौदलाने १८०३ मध्ये त्याने बनवलेले असे र्निजतुक अन्नपदार्थ वापरले. त्यांना ते पटले. ताज्या भाज्यांची, अन्नपदार्थाची चव त्यात बाकी असल्याने ते त्यांना रुचले. त्यांची मागणी वाढत गेली. हवाबंद डबाबंद अन्नपदार्थाचा प्रसार सुरू झाला. फ्रान्समध्ये १८३० मध्ये असा पहिला हवाबंद-डबाबंद अन्नपदार्थ करणारा कारखाना सुरू झाला. त्याची भरभराट झाली. या व्यवसायाला तेजी आली. त्यामुळे तिथला खारवलेला मासळीचा धंदा बसला. लवकरच या धंद्याला दुसरा जोरदार धक्का बसला. अन्न आणि मासळी टिकवून ठेवण्यासाठी ‘शीतपेटी’, ‘शीतगृहे’ यांचा उपयोग केला जाऊ लागला. त्यामुळे न खारवलेले आणि मूळ चवीपासून दूर न गेलेले अन्नपदार्थ मिळण्याची सोय झाली. मिठाची गरज रोजच्या अन्नपदार्थाकरता असली तरी त्याचे औद्योगिक महत्त्व कमी झाले.
औद्योगिक क्रांती झाली आणि मिठाचे एकेकाळचे महत्त्व कमी झाले असले तरी मिठाने बरंच काही दिलेलं होतं. जमिनीखालचे खारे पाणी वर खेचणारे पंप, मिठाचे खडक फोडण्यासाठीचे ड्रिलिंग तंत्र, मीठ-वाहतुकीसाठी विविध साधनांचा वापर, कालवे, रस्ते..
१९०१ साली एक अघटितच घडले. टेक्ससमधील स्पिंडलटॉप ठिकाणी मिठाच्या आशेने ड्रिलिंग करत असताना तिथून तेलाचा फवाराच वर उडाला. पेट्रोलियम युगाची सुरुवात झाली. आणि ही वेळ अशी होती, की शोध घेऊनही अमेरिकेला तेलाचा साठा सापडत नव्हता. सर्व आशा मावळल्या होत्या. पण स्पिंडलटॉप घटनेनं दाखवून दिलं की, जिथे मिठाच्या खडकांचे साठे असतील त्याच्या आसपास तेल, वायू यांचे अस्तित्व असणार. कारण मीठ हे अभेद्य आहे. सेंद्रिय घटक त्या खडकाभोवती अडकून राहतात. त्यांचे विघटन होऊन त्याचे तेल व वायू होतात. त्यामुळे मिठाच्या खडकाच्या क्षेत्रात कुठेतरी तेलसाठा असणारच! स्पिंडलटॉप घटनेनंतर ड्रिलिंग तंत्रज्ञानात सुधारणांनी वेग घेतला. मीठ शोधण्याचं तंत्रज्ञान तेलशोधाच्या कामी आलं.
भारत
भारताच्या दोन्ही- पूर्व व पश्चिम किनाऱ्यांवर मीठक्षेत्र भरपूर आहे. मधल्या भागात दगडी मिठाचे साठे आहेत, मिठाची सरोवरे आहेत. कच्छच्या रण भागात तर तिथल्या ९००० चौ. मैल क्षेत्रफळावर पाच हजार वर्षांपूर्वीपासून मीठ बनत आलंय. भारताच्या ज्या भागात मीठ तयार होत नाही तिथेही मीठ पोचवण्याची सोय प्राचीन काळापासून आहे. आणि फार पूर्वीपासून मिठावर अल्पशी करआकारणीही होत आलेली आहे. आणि त्यावरून त्या काळात लढाया, झगडे वगैरे झाले नाहीत.
भारतात मीठ-प्रश्नाला सुरुवात झाली ती ब्रिटिशांच्या राजवटीत.. तीही ओरिसातील मिठापासून. भारताच्या पूर्व किनाऱ्यावरच्या ओरिसाचं मीठ प्रसिद्ध होतं. आजूबाजूच्या राज्यांतील व्यापारी मिठासाठी तिथं येत. बंगाल प्रांतातले ब्रिटिशही तिथलं मीठ घेत. १८ व्या शतकात ब्रिटिशांच्या फ्रेंचांशी लढाया चालू होत्या, त्यावेळी बंदुकीच्या दारूसाठी त्यांना मुबलक मीठ हवं असे. ते ओरिसातून नेत. अठरावे शतक सरता सरता इंग्लंडमधल्या चेशायरनं आपलं मीठ-उत्पादन वाढवलं आणि आता ते देशाबाहेरच्या बाजारपेठांचा शोध घेऊ लागलं. अशी बाजारपेठ उपलब्ध करून देणं, ही साम्राज्याची जबाबदारी. पण चेशायरचं ‘लिव्हरपूल सॉल्ट’ ओरिसाच्या मिठाच्या गुणवत्तेपुढे आणि कमी किमतीपुढे उभं राहू शकत नव्हतं.
ईस्ट इंडिया कंपनीने १७९० साली रघुजी भोसले (द्वितीय) यांच्यापुढे ओरिसाचे सर्व मीठ कंपनीला विकण्याचा प्रस्ताव ठेवला. (त्यावेळी रघुजी भोसले (द्वितीय) यांच्या अधिपत्याखाली ओरिसा होता.) भोसलेंनी कंपनीची चाल ओळखली आणि तो प्रस्ताव फेटाळला. त्यांनी लिव्हरपूल मिठासाठी इंग्रज ओरिसा मिठाला दाबू पाहताहेत हे ताडले. आपला प्रस्ताव फेटाळला जाताच ईस्ट इंडिया कंपनीने ओरिसा मिठावर बंदी घातली. पण बंगाल आणि जोडूनच असलेल्या ओरिसाच्या सीमेवर भरपूर जंगल होतं. तिथून मिठाची चोरटी आयात बंगालमध्ये होऊ लागली. ती इतकी, की बंगालच्या बाजारपेठेत ओरिसाचं मीठ मुबलक झालं. ‘चेशायर’च्या लिव्हरपूल मिठाला काही उठाव मिळेना. मग कंपनीने ओरिसाच ताब्यात घेतला आणि बंगालला जोडला. १ नोव्हेंबर १८०४ च्या जाहीरनाम्यानुसार ओरिसा मिठावर कंपनीची मक्तेदारी झाली. ओरिसात तयार होणारं मीठ कंपनी सरकारलाच विकावं लागे. तेही ठरावीक भावानेच. मिठाबाबतचा कोणताही व्यवहार खासगी पातळीवर करायला बंदी घातली गेली. मीठ व्यवहारावर कंपनीने करडी नजर ठेवली. पगारी नोकर ठेवून पाळत ठेवली. शेवटी- फक्त कंपनी सरकारच मीठ तयार करणार, अन्य कोणी नाही, असा फतवाच काढला. ओरिसात वेगवेगळ्या पातळ्यांवरून या कंपनीच्या धोरणाला विरोध झाला. तो फारसा परिणामकारक ठरला नसला तरी त्याची दखल इंग्लंडमध्ये घेतली गेली.
एकोणिसाव्या शतकाच्या सुरुवातीला ईस्ट इंडिया कंपनीने करातून पैसा मिळावा आणि मिठाचा चोरटा व्यापार थांबावा म्हणून बंगालच्या संपूर्ण सीमेवर जकातनाके उभे केले. कमिशनर स्मिथने तर इतर किरकोळ मालावरची जकात एकदम कमी करून मिठावरची वाढवली. जकात अधिकारी त्यामुळे मीठ व्यापारावर जास्त कडक पाळत ठेवतील असा त्याचा रास्त कयास. या जकात अधिकाऱ्यांना कमी पगार आणि जास्त अधिकार दिले. त्यामुळे व्हायचे ते झालेच. लाचलुचपत, भ्रष्टाचार बोकाळला.
ईस्ट इंडिया कंपनीनं अतिउत्साहानं बंगालच्या पश्चिम सीमेवर चौदा फूट उंच आणि बारा फूट जाडीचं काटेरी झाडांचं कुंपण उभारलं. जकात चुकवून बाहेरचं मीठ आत येणार नाही याचा बंदोबस्त केला. पुढे १८५७ च्या उठावानंतर ब्रिटिश सरकार सर्वेसर्वा झालं तेव्हा त्यानं ही जकातनाक्यांची मालिका वाढवली. ओरिसा ते हिमालय अशी अडीच हजार मैल लांबीची ‘कस्टम लाइन’ तयार झाली. १८७० साली या कस्टम लाइनवर नेमल्या गेलेल्या अधिकाऱ्यांची संख्या बारा हजार होती.
सर्व अधिकार हाती आल्यावर आता ब्रिटिश सरकारला स्वत:च ओरिसात मीठनिर्मितीत उतरायचे होते. स्वत: ठरवलेल्या किमतीत ते बंगालला विकायचे होते. म्हणून मग सरकारने मीठ तयार करण्यासाठी किनारपट्टीवरची जंगलं तोडून जमीन साफ केली. पण ब्रिटिश मीठ-व्यापाऱ्यांना यात धोका जाणवला. बंगालच्या बाजारपेठेत मोठय़ा स्पर्धेला तोंड द्यावं लागणार म्हणून त्यांनी ब्रिटिश पार्लमेंटशी संधान साधलं. लॉबिंग केलं. ओरिसाच्या मीठनिर्मितीवर बंधन घालायला लावलं.
१८३६ साली सरकारनं आयात केलेल्या आणि स्थानिक मिठावर एकच कर बसेल, हे पाहिलं आणि मीठ कुठलंही खपो- आपल्या तिजोरीत भरच पडेल याची निश्चिती केली. पण स्थानिक मिठाला आयात मिठाशी स्पर्धा करून पुढे जाणं शक्य नव्हतं. तशात सरकारनं ओरिसाचं मीठ दुय्यम प्रतीचं, अशुद्ध ठरवून त्याच्या उत्पादनावर मर्यादा घातल्या. काही ठिकाणी बंदीच घातली. आणि १८४५ साली तर आधीच्या वर्षांच्या निम्म्यानंच मीठ तयार करायची आज्ञा दिली. त्यावेळच्या ओरिसा कमिशनरने ब्रिटिश शासनाला इशारा दिला- मिठाचं उत्पादन कमी करून तुम्ही ओरिसाच्या शेतकऱ्यांचा रोष ओढवून घेत आहात.
मिठागरात काम करणाऱ्या मलंगी लोकांची स्थिती कधीच सुखद नसली तरी ब्रिटिशांच्या काळाआधी ती इतकी विदारक नव्हती. ओरिसाचे धनिक, जमीनदार त्यांना निगुतीनं जगता येण्याइतकी काळजी घेत. पण याच मलंगींना ब्रिटिश सरकारने सर्वच अप्रिय गोष्टींना जबाबदार धरायला सुरुवात केली. मीठ- वहनात त्याची गळती होवो, त्याची साठवण नीट केली न जावो- काहीही संबंध नसताना मलंगीनाच जबाबदार धरले जाई.
मीठ गुमास्त्यांनी मलंगींचा मोबदला वाढवून द्यावा अशी शिफारस शासनाला केली. तर शासनाने उलट मोबदलाच कमी केला आणि ओरिसा मिठाचे उत्पादन अडचणीत येईल असं पाहिलं. हे कमी की काय म्हणून १८६३ साली ब्रिटिश शासनाने स्थानिक मीठनिर्मिती थांबवण्याचा इरादा जाहीर केला. मीठ गुमास्त्यांना तशा सूचना देऊन निर्मिती बंद करायला फर्मावलं. मीठनिर्मिती थांबली आणि ओरिसाला दुष्काळानं (१८६६) घेरलं. त्यात जास्त भूकबळी गेले ते या मलंगींचे. त्यांच्याकडे ना जमीन, ना धान्य, ना धान्य विकत घ्यायला पैसा. सरकारी धोरणामुळे बंगालमध्ये मिठाचा दुष्काळ पडला, तो वेगळाच. यावर तोडगा म्हणून ब्रिटिश सरकारने स्वत:च ओरिसात मीठनिर्मितीचा प्रकल्प सुरू केला. लोकांना स्वस्तातलं साधं मीठ मिळावं आणि थोडा तरी रोजगार मिळावा, हा हेतू होता. पण तो हेतू एवढा सफल झाला, की लिव्हरपूल मीठ मागे ढकलले गेले. म्हणून मग १८९३ मध्ये सरकारने तो प्रकल्प बंद केला. स्पर्धेत ब्रिटिश मिठाला मागे टाकलं जाणं ते कसं सहन करणार?
प्रकल्प बंद झाला आणि मलंगींच्या उपासमारीला सुरुवात झाली. पायाशी असलेल्या मिठाला हात लावता येत नव्हता. ते उचलून विकलं की हातावर पैसा पडला असता. पण मीठ उचलण्यावर, त्याला हात लावण्यावर बंदी. मग हे मलंगी आपली बायकापोरं मागे ठेवून भारताच्या इतर भागांत वणवण फिरू लागले. काम शोधू लागले. मलंगी ओरिसातून नाहीसेच झाले.
कटकच्या ‘उत्कल सभा’ या राजकीय पक्षाने फेब्रुवारी १८८८ मध्ये जाहीर सभा घेऊन ओरिसासंबंधांतल्या ब्रिटिशांच्या अन्याय्य मीठ-धोरणाबद्दल निषेध व्यक्त केला. ही भारतातली पहिली अशी सभा. विसाव्या शतकाच्या प्रारंभीच्या दशकांत भारतभर सर्व प्रांतीय विधिमंडळांमधून ब्रिटिश सरकारच्या मीठ-धोरणावर हल्ले चढवले गेले. शिलकी अंदाजपत्रक सादर करताना सरकारने मिठावरचा कर दुप्पट करण्याचा प्रस्ताव मांडला. पण त्याला पाठिंबा देण्याचे भारतीय विधिमंडळाने नाकारले. पण ब्रिटिश सरकारने व्हाइसरॉय लॉर्ड रीडिंगच्या हुकूमनाम्याचा आधार घेऊन १९२७ साली तो प्रस्ताव पारीत करून घेतलाच. मिठाविषयीचे धोरण शासनाने बदलावे म्हणून भारतीय विधिमंडळाने प्रयत्न केले. पण त्यात त्याला यश आले नाही. ब्रिटिश सरकार यावर गंभीरपणे विचार करायला तयार नव्हते. पण तिकडे इंग्लंडच्या पार्लमेंटमध्ये मात्र काहींनी सावधगिरीचा इशारा देण्याचा प्रयत्न केला. मिठावरच्या अन्याय्य करामुळे जनतेत अशांतता निर्माण होईल असा धोका वर्तवला. आणि ओरिसात १९३० सालात तसा उठाव होण्याच्या बेतातच होता.
लाहोरमध्ये १९२९ साली इंडियन नॅशनल काँग्रेसची बैठक झाली. तिचे फलित म्हणजे महात्मा गांधींनी मिठासाठी सत्याग्रह सुरू केला. भारतीय स्वातंत्र्य चळवळीत हा सत्याग्रह महत्त्वाची भूमिका बजावणारा ठरला. १२ मार्च १९३० रोजी महात्मा गांधींनी सुरू केलेल्या दांडीयात्रेचा इतिहास इथे सांगण्याची गरज नाही.
मृतसमुद्र
हा इतिहास झाला मिठाच्या शोधासंबंधीचा. त्याच्या साठय़ांवर, निर्मितीक्षेत्रांवर ताबा मिळवण्यासाठी झालेल्या प्रयत्नांचा. पण जिथे अत्र तत्र सर्वत्र मीठ, मीठ आणि मीठच आहे त्या मृतसमुद्राची कथा काय?
अलीकडेच भूगर्भशास्त्रज्ञांनी मांडलेल्या सिद्धांतानुसार, पन्नास लाख वर्षांपूर्वी आताच्या हायफा बंदराजवळ भूमध्य समुद्र आणि मृतसमुद्र एकमेकाला जोडलेले होते. भूस्तर हालचालींमुळे (Geological Shift) ‘गॅलिली हाइट्स’ निर्माण झाल्या. या नव्याने निर्माण झालेल्या डोंगरांमुळे भूमध्य समुद्राचे दोन भाग झाले आणि मृतसमुद्र तयार झाला. या अडवल्या गेलेल्या पाण्याचे सूर्याच्या उष्णतेने सतत बाष्पीभवन होत असताना त्या प्रमाणात बाहेरून पाणीपुरवठा न झाल्याने ते पाणी अधिकाधिक संपृक्त होत गेले. दिसामासांनी मृतसमुद्र आटत, मागे हटत, आकसत चाललाय. आज त्याची लांबी ३१ मैल आणि रुंदी १० मैल आहे.
या मृतसमुद्रातून जॉर्डन-इस्रायल सरहद्द जाते. या समुद्राचा किनारा म्हणजे नुसते वाळवंट आहे. इथे मनुष्यवस्ती होणे अशक्यच. पण इस्रायलने आपल्या इथल्या प्रदेशात वीज आणि पाणी यांचा उदंड पुरवठा करून तिथे नवाच व्यवसाय सुरू केला. तिथल्या समुद्राच्या अतिसंपृक्त मीठ द्रावणावर चालण्या-फिरण्या- लोळण्याचा आनंद लुटण्यासाठी पर्यटक येतात. त्यांच्यासाठी विविध सोयींनी युक्त असे वातानुकूलित रिसॉर्ट्स उभे केलेत. तिथला चिखल आणि पाणी हे आरोग्याला हितकारक, व्याधीमोचक असल्याचा दावा केला गेल्यानं आता ‘हेल्थ स्पा’ची चलती सुरू झालीय. वातानुकूलित स्पा, रिसॉर्टमध्ये बसून वाळवंटाची मजा लुटण्याची सोय झाल्यानं पर्यटकांची संख्या वाढलीय. त्यांची व्यवस्था ठेवण्यासाठी चौदा हॉटेल्समध्ये मिळून चार हजार खोल्यांची सोय आहे. ही सर्व हॉटेल्स ‘हेल्थ स्पा’ आहेत. इस्रायली जनतेनं महाप्रयत्नांनी आपला वाळवंटी प्रदेश हिरवा केला. आपले गोडय़ा पाण्याचे साठे काळजीपूर्वक वापरले. जनतेच्या प्रयत्नांना मदत लाभली ती या क्षारसंपत्तीची.
पण आता एक नवीच समस्या भेडसावतेय. हा मृतसमुद्र वेगानं आटतोय. दरवर्षी तीन फुटांनी त्याची पातळी खाली जातेय. या समुद्रातल्या ‘माऊंट सोडोम’चे या मिठाच्या डोंगराचे (टेकडय़ांचे) मीठ भूमध्य समुद्राकडे वाहून नेण्यासाठी तयार झालेला लवणमार्ग प्रसिद्ध होता. हे वहन १९९० पर्यंत चालू होते. आता नवा प्रस्ताव पुढे आला आहे की, भूमध्य समुद्राचं पाणी मृतसमुद्रात सोडण्याच्या दृष्टीने या मार्गावर जलमार्ग तयार करावा. पण भीती अशी, की तसं केलं तर मृतसमुद्राच्या पाण्याचा गुणधर्म बदलेल. त्याची घनता कमी होईल. इस्रायलने उभे केलेले रिसॉर्ट्स, स्पा धोक्यात येतील. पर्यटक कमी होतील. नुकसानच नुकसान होईल!
मृतसमुद्रातील पाण्यापासून बाष्पीभवनाने मीठ तयार करण्यासाठी जॉर्डन आणि इस्रायलचे पंप सतत आपल्या सीमेवर पाणी उपसत असतात. ते पाणी एका तळ्यात सोडलं जातं. बाष्पीभवनाने मीठ तयार होता होता त्या तळ्यात गाळ खाली बसतो. साचतो. त्या गाळानं तळी उथळ होतात. मग त्यांची खोली वाढवण्यासाठी त्यांच्याभोवती उंच बांध घातले जातात. सीमेरेषेवरती दोन्हीकडची मंडळी हे करतात. मग हे तळ्यातलं पाणी पाझरून झिरपून ‘स्पां’च्या रिसॉर्ट्सच्या तळघरात शिरतं. ते पाणी उपसून काढणं हा नवा व्याप होऊन बसतो. पर्यटन व्यवसायवाले तिथल्या मीठ-उत्पादक कंपन्यांविरुद्ध तक्रार करू लागलेत. यावर काय तोडगा काढावा याची चिंता दोन्ही राष्ट्रांना लागलीय.
सर्वसामान्यजनांचं ‘कॉमन सॉल्ट’ असं नाकी दम आणतंय.
एकेकाळी मातकट, राखाडी रंगाचं सार्दळलेलं मीठ शुभ्र आणि दाणेदार, भुरभुरीत करण्यासाठी किती म्हणून प्रयत्न झाले! त्यासाठी किती किंमत मोजावी लागली!.. पण आता चक्र उलटं फिरलंय. दाणेदार नसलेल्या काळपट खडेमिठासाठी श्रीमंत खवय्ये अधिक पैसे मोजताहेत. पारंपरिक पद्धतीने बनवलेल्या घरगुती मिठाचं कौतुक वाढतंय.. आणि आता ते पॅकबंद शुभ्र दाणेदार मिठापेक्षा महाग होऊन बसलंय.
अलीकडेच अभियंते, शास्त्रज्ञ यांना मीठखाणींच्या नव्या वैशिष्टय़ांचा शोध लागलाय. १९४५ साली अमेरिकन सैन्याला जर्मनीत एका मीठखाणीत शंभर टन सोने, नाणी, परदेशी चलनाच्या थप्प्या यांचा साठा सुस्थितीत आढळला. शिवाय हजारभर पेंटिंग्जही. अब्जावधी डॉलर्स किमतीचा हा साठा. वस्तू आहेत तशाच सुस्थित राखण्याचा हा मिठाचा गुणधर्म नवा उपाय सुचवून गेला. आण्विक कचरा गाडण्यासाठी मिठाच्या खाणी योग्य ठरतील का, हा तो विचार. न्यू मेक्सिकोत अशी एक खाण प्लुटोनियमसाठी तयार होतेय. दूषित आण्विक कचरा हा पुढची २४ हजार र्वष हानीकारक असणार.. पण ‘ही खाण उघडू नका’ अशी दिलेली सूचना हजार वर्षांनंतरच्या लोकांपर्यंत कशी पोचवणार? कोणत्या भाषेत पोचवणार?.. प्रश्नच आहे.

(आजही सहाराच्या वाळवंटात टाउडेनी ते टिंबक्टू हा पाचशे मैलांचा प्रवास मिठाच्या व्यापारासाठी उंटांवरून केला जातो. Men of salt, crossing sahara on the canavan of white Gold : by Michael Bananav हे पुस्तक त्यासाठी जरूर वाचावे.)

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 16, 2014 1:05 am

Web Title: salt history
टॅग History
Next Stories
1 ‘संगीत शारदा’ अर्थात् स्त्रीशक्तीचा उद्गार!
2 मूलभूत गणित हेही संगीतशिक्षणासारखंच!
3 उंचच उंच व्यंगचित्रं
Just Now!
X